जॅक पार्सन्स : एक सैतानी शास्त्रज्ञ 🥶

जॅक पार्सन्स : एक सैतानी शास्त्रज्ञ 🥶

धर्म किंवा अध्यात्म हे विज्ञानापेक्षा श्रेष्ठ कसे आहे हे सांगण्यासाठी अनेक वेळा अनेक नामवंत शास्त्रज्ञांचे दाखले दिले जातात. एवढे मोठमोठे शास्त्रज्ञ, त्यांना एखाद्या देवाची किंवा एखाद्या बाबाची अनुभूती आली असेल तर त्यांना खोटे ठरवणारे तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहात काय? असा प्रश्न विचारला जातो. या मोठमोठ्या नावांमध्ये आपल्या सर्वांचे आवडते मिसाईल मॅन तसेच महासंगणक बनवणाऱ्या टीमचे प्रमुख यांची नावे देखील सामील असतात. मात्र व्यक्ती वैज्ञानिक असला म्हणजे त्याने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतःच्या जीवनात अंगिकारला असेलच असे नाही. पाण्यात राहून कोरडे राहणारे कमळाचे पान आपल्याला माहित आहेच. तसेच आयुष्यभर विज्ञानाच्या क्षेत्रात राहणारे काही अभागे स्वतःमध्ये विज्ञान भिनवू शकत नाहीत. जॅक पार्सन्स हा त्याचेच एक उदाहरण.

जगात अनेक घटना योगायोगाने घडतात, मात्र त्याला दैवी शक्ती किंवा चमत्कार म्हणून पाहायची सवय लागली की व्यक्ती त्यातच अडकत जातो. जॅक पार्सन्सचे पहा ना.. रॉकेट सायन्समध्ये ज्याच्या नावावर तब्बल सात पेटंट आहेत असा एखादा व्यक्ती सैतानाची पूजा करतो, चंद्राकडून मुलप्राप्ती होईल या अपेक्षेने काळ्या जादूचे विधी करतो..😬 ऐकावे ते नवलच ना. एकाच वेळी कोणी व्यक्ती दोन ध्रुवावर पाय ठेऊ शकेल का? बळीराजाकडे तीन पावले जमीन भिक्षा म्हणून मागणाऱ्या वामनाच्या भाकडकथेप्रमाणे एवढ्या मोठ्या ढांगा टाकता येतील का? साहजिकच त्याची पॅन्ट फाटेल नक्की 🙊 जॅक पार्सन्स असाच दोन धृवावर पाय ठेवायला गेला. आणि त्याचे आयुष्य फाटून गेले. 😞 उमेदीच्या काळातील त्याचा संघर्ष पाहता त्याची कीव येते पण त्याच वेळेस मोठेपणी त्याने केलेले उद्योग हे त्याच्या बुद्धीची कीव करायला भाग पाडतात. एक मोठा शास्त्रज्ञ व्हायची क्षमता असलेला जॅक वयाच्या ३७व्या वर्षी हे जग सोडून गेला आणि उरला केवळ कादंबरी, कॉमिक्स आणि दंतकथा यांचा विषय😞
२ ऑक्टोबर १९१४ रोजी जॅकचा जन्म लॉस अँजेलिस येथे झाला. २० वर्षाचा बाप मार्वल पार्सन्स आणि २१ वर्षाची आई रूथ व्हाईटसाईड अश्या अपरिपक्व आईवडिलांच्या पोटी. मार्वलचे बाहेरचे धंदे एवढे वाढलेले होते, की एक दिवस रूथने त्याला रंगे हाथ पकडले आणि घटस्फोटाचा अर्ज केला. पाच महिऱ्यांच्या जॅकला शेवटचे पाहून मार्वल जो पसार झाला तो नंतर त्याला मोठ्यापणीच भेटला. रुथच्या घरचं बरं होतं , तिचे वडील जॅकसोबत तिला घरी घेऊन गेले. जॅकचे पाळण्यातील नाव वडिलांच्या नावावरुन "मार्वल व्हाईटसाईड पार्सन्स" असे ठेवले होते. मात्र वेगळे झाल्यावर रुथने जॅकचा वडिलांशी संबंध पण तोडला आणि त्याचे नावपण. रूथने त्याचे नाव जॉन ठेवले पण मित्रांनी त्याला "जॅक" लावला तो कायमचा राहिला.

पौगंडावस्थेत येईपर्यंत जॅकचे जीवन सुखी होते. घरात कशाची ददात नव्हती. आजुबाजूला नोकरचाकर होते. वाचायला छान छान पुस्तक होती, विविध पुराणकथा, अरेबियन नाईट्स मधील कथा वाचून झोपणे हा त्याचा दिनक्रम. भाऊ बहीण कोणी नाही जॅक आपला एकटाच. ज्यूल वेर्णेच्या विज्ञानकथा वाचून त्याला रॉकेट बनवायचे वेड लागले. त्यात त्याला त्याच्यासारखाच एक वेडा मित्र भेटला. एडवर्ड फोरमन.. गरीब घरातून आलेला. जीवाला जीव देणारा, शाळेत मुले जेव्हा जॅकच्या खोड्या काढायचे तेव्हा त्यांच्याशी दोन हात करणारा बेस्टी. 👯🏽‍♂️जॅकचे वाचन दांडगे असल्याने त्याने एडवर्डवर लय छाप मारली. त्याने बिचाऱ्याने पुढे उद्योग करताना जॅकसमोर कायम दुय्यम भूमिका स्वीकारली. दोघांनी गनपावडर वापरून रॉकेट उडवायचे अनेक अयशस्वी प्रयोग केले.
याच काळात जॅकच्या वाचनात काळ्या जादूची पुस्तके आली. त्याला त्या पुस्तकात लिहलेल्या भाकडकथा आणि अंधश्रद्धायुक्त प्रथा खऱ्या वाटू लागल्या. लहान मुलांना एखादी शक्ती वश करायची फँटसी असतेच. रोज रात्री झोपताना वाचायच्या सुरसकथांची जागा भाकडकथांनी घेतली. झोपताना सैतानाची पूजा करण्याचे विधी गुपचूप सुरु झाले. रॉकेट बनवताना देखील सैतान कशी मदत करेल यावर त्याचा भर. या सर्व घडामोडींचा त्याच्या दिवसभरावर देखील परिणाम झाला. त्याचे मन अतिशय चंचल झाले. अभ्यासात तर अजिबात मन लागेना. तिरंदाजी आणि तलवारबाजी हे खेळ सोडले तर अभ्यास आणि इतर बाबी यात त्याची कामगिरी दिवसोदिवस ढासळू लागली.

आईने त्याची शाळा बदलून पाहिली. सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या शाळेत त्याला टाकले, पण आपल्या भाऊने रॉकेटचा प्रयोग करताना शाळेचे टॉयलेट उडवून दिले. मग कोण त्याला तिथे ठेवणार.. तीन शाळा बदलून झाल्या होत्या शेवटी त्याला पारंपरिक पद्धतीचा अभ्यास वगैरे नसलेली ज्ञानरचनावादी शाळा मिळाली. तिथे ह्याच्या प्रतिभेला पंख फुटले. गेलेला आत्मविश्वास परत आला. शाळेच्या बुलेटिनचा संपादक झाला. आदर्श विद्यार्थी म्हणून नावाजला जाऊ लागला. रसायनशास्त्राची तर लहानपणापासून आवड होतीच. गनपावडर सोबत ऍल्युमिनियम फॉईल ग्ल्यु वगैरे काय काय वापरून झालं होतंच.

१९२९ मध्ये जागतिक मंदीची लाट आली होती आणि त्या पाठोपाठ अमेरिकेत नैराश्याची देखील लाट आली होती. अनेक अमेरिकन लोकांचे आर्थिक गणित फसले, ज्यात जॅकच्या आजोबांचा देखील समावेश होता. आलिशान घर सोडले तर त्यांच्याकडे रोकड पैसे काहीच उरले नाहीत. नैराश्याचा सामना करतच आजोबा १९३१ मध्ये ऑफ झाले. आणि घर चालवायची जबाबदारी सोळा वर्षाच्या जॅकवर येऊन पडली. सुट्टीत त्याला काम करावे लागत होते. राहते घर भाड्याने देऊन आई आणि आजीसोबत जॅक लहान घरात शिफ्ट झाला. शालेय शिक्षण पूर्ण करत असतानाच  रॉकेटवर काम करणाऱ्या जगभरातील शास्त्रज्ञांशी त्याचा संपर्क सुरु होता.
आयुष्यात पुढे काय करायचे ते ठरलेले होतेच. भौतिक आणि रसायनशास्त्र शिकण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा पण आर्थिक चणचण असल्याने ते वर्ष अर्धवट सोडावे लागले. पार्टटाइम कामाने भागेनासे झाले शेवटी त्याने हर्क्युलस पावडर कंपनीमध्ये पूर्णवेळ नोकरी स्वीकारली. तिथे काम करण्याचा एक फायदा होता. त्याला हवी तेवढी गनपावडर लंपास करत येत होती. कामाच्या ठिकाणी त्याला बदलीची ऑफर आली, जिथे पगार देखील वाढवून मिळणार होता. पैसे कमावून, साठवून पुढच्या वर्षी कॉलेजमध्ये परत जाता येईल या हिशोबाने जॅक तिकडे गेला खरा, पण तिकडे त्याला नायट्रोग्लिसरीनची एलर्जी होऊन प्रचंड डोकेदुखी सुरु झाली. शेवटी साठलेले पैसे घेऊन मूळगावी परत आला. शिक्षणाचे स्वप्न तेवढ्या पैश्यात पूर्ण होणारे नव्हते. शिक्षण अर्धवट राहिले ते कायमचेच. 
जरी राईट बंधूंच्या यशस्वी विमान उड्डानानंतर मानवाच्या कल्पनेला पंख फुटले होते तरीदेखील रॉकेट सायन्स यशस्वी होणे हे त्या काळात अशक्य असलेली बाब वाटत होती. १९२० साली रॉबर्ट गोराड या अभियंत्याने जेव्हा "मानव चंद्रावर पाऊल ठेवू शकेल" असे वक्तव्य केले होते त्यावेळेस अगदी न्यूयॉर्क टाईम सारख्या प्रथितयश वर्तमानपत्राने देखील त्याची खिल्ली उडवली होती. तरीदेखील देश विदेशामध्ये शास्त्रज्ञांकडून पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण भेदण्यासाठी आवश्यक शक्तीची चाचपणी सुरू होती. एका सेमिनारमध्ये युजिन सॅन्गर या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाचे व्याख्यान ऐकायला जॅक आणि एडवर्ड गेले होते.तिथे त्यांची ओळख फ्रँक मेलिना या अभियंता संशोधकाशी झाली. फ्रँकचे "रॉकेट उडवण्यासाठी आवश्यक शक्ती" यावर phd साठी संशोधन सुरू होते. एकाच विषयाची आवड असलेल्या या तिघांचं चांगलं त्रिकुट जमलं. चाराचे सहा हात झाले..❤️

जॅक, एडवर्ड आणि फ्रँकने फ्रँक शिकत असलेल्या कॅलटेक संस्थेतून निधी मिळावा यासाठी अर्ज केला. अर्थात जॅक आणि एडवर्ड हे शिक्षण अर्धवट सोडले विद्यार्थी.. त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार. जॅकची तर "जॅक ऑफ ऑल ट्रेड बट मास्टर ऑफ नन" अशी संभावना देखील करण्यात आली. फ्रँकचे गाईड कारमान यांना मात्र या त्रिकुटावर विश्वास बसला आणि त्यांनी अपेक्षित सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आणि मग या तिघांचे प्रयोग सुरू झाले.  कसेतरी जुगाड करून आवश्यक रसायने मिळवायची आणि प्रयोग करून पाहायचा. त्यांच्या धोकादायक प्रयोगाची चर्चा संपूर्ण संस्थेत होऊ लागली आणि या तिघांना "सुसाइड स्क्वाड" असे नाव देण्यात आले😂
"पदवी" म्हणजे केवळ कागद असतो त्याचा ज्ञानाचे संबंध नसतो हे जॅकने लवकर दाखवून दिले. वेगवेगळ्या रसायनांचे मिश्रण करून विस्फोटक तरीही नियंत्रण राहील अशी शक्ती तयार करण्यामध्ये जॅकचे डोके जोरात चालत होते. दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता त्यामुळे सुसाईड स्कॉडला निधीची कमी पडली नाही. कारमान सरांनी अमेरिकन आर्मीकडून निधी मिळवला होता. आर्मीसाठी अग्निबाण बनवणे सुरू झाले. याशिवाय रॉकेटच्या मोटरमध्ये जॅकचे प्रयोग चालू होतेच. जॅकने लवकरच रॉकेट सायन्समधील सात पेटंट मिळवली. (आजही जॅकने तयार केलेल्या फॉर्म्युलामध्येच विकास करून नासा अंतरिक्ष कार्यक्रम राबवत असते.) 

१९३६ मध्ये या तिघांचा पहिला जाहीर रॉकेट उडवण्याचा प्रयोग झाला. मोटरमध्ये इंधन म्हणून अल्कोहोलचा वापर करण्यात आला होता. १९४३ मध्ये तिशी देखील पार न केलेल्या सुसाईड स्वाडच्या या तीन सभासदांनी "जेट प्रोपलशन लॅबोरेटरी" स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यापीठाच्या अधिनस्त असलेल्या संस्थेवर आर्मीचे नियंत्रण होते. ही संस्था आज नासाचा एक भाग आहे. जर जॅकचे डोके स्थिर असते तर नक्कीच तो त्या काळातील एलन मस्क किंवा स्टीव जॉब्स सारखा मोठा व्यक्ती झाला असता..
रॉकेट सायन्स मध्ये संशोधन करत असतानाच त्याचा संपर्क ऍलिस्टर क्रॉवली याच्याशी आला. आपल्या भारतात जसे अनेक भोंदूबाबा लोक स्वतःला पंथ काढत असतात, ऍलिस्टर क्रॉवलीने तसाच "थेलेमा" नावाचा एक पंथ काढला होता. "जे वाटते ते करा" अशी शिकवण असलेल्या या पंथात मुख्यतः लैंगिक अतृप्त कामनांची पूर्ती व्हावी म्हणून लोक सामील व्हायचे. सैतानाची पूजा केली जायची आणि अनेक अघोरी विधी, विकृत लैंगिक क्रिया केल्या जायच्या. (तुमच्या अंगावर काटा येईल किंवा खूपच किळस वाटेल म्हणून तपशील देत नाही🙏) बालपणापासून सैतानी शक्तींचे आकर्षण असलेला जॅक या पंथाच्या मीटिंगला उपस्थित राहू लागला. १९३९ साली त्याने त्या पंथाची दीक्षा घेतली.. आणि नंतर त्यातच वाहवत गेला .

महायुद्ध काळामुळे संशोधनासाठी भरपूर निधी येत गेला आणि जॅकला त्यामध्ये सैतानी कृपा आहे असे वाटू लागले. त्याने वाढत्या श्रीमंतीचा उपयोग एक भुतबंगला बांधन्यासाठी केला. अगदी हॉरर सिनेमाचा सेट असावा अश्या त्या घरात ह्याचे थेलेमी मित्र मैत्रिणी भयानक मेकप करून अतिशय पातळ, पारदर्शी कपड्यात वावरायचे. दिवसेंदिवस जॅकचे त्या पंथांमध्ये महत्व वाढत गेले. १९४० मध्ये तर तो पश्चिम प्रांताचा प्रमुख देखील झाला. ऍलिस्टर क्रॉवली सोबत तो आता रोज डायरेक्ट बोलत असे. अनेक स्त्रियांसमवेत तर त्याचे संबंध होतेच पण १७ वर्षाच्या मेव्हणीसोबत देखील त्याने लैंगिक संबंध स्थापित केले. बायकोला देखील इतरांसोबत तसेच करायला भाग पाडले. लवकरच त्याची बायको त्याला सोडून गेली.

बायको सोडून गेल्यावर त्याला अंकुश राहिलाच नाही. त्याच पंथातल्या मार्जोरी सोबत त्याने दुसरे लग्न केले. जॅकच्या आयुष्याची वाट लावण्यात सर्वात मोठा रोल विज्ञानकथा लेखक हबर्डचा आहे. हा देखील एवढा अंधश्रद्धाळू की विज्ञानकथा कसा लिहीत असेल सैतान जाणे. 😂 त्याने जॅकला भरीस घातले की आपण दोघं मिळून आकाशातली देवी जमिनीवर आणू. त्यासाठी त्याने अतिशय विकृत विधी देखील केले, करायला लावले. आणि काही दिवसांनी जॅकच्या "त्या" मेहुणीसोबत परागंदा झाला, जॅकला भल्यामोठ्या रकमेची टोपी घालून. 😭
आता तरी भाऊने शहाणा व्हायचे ना .. पण नाही.. मार्जोरी ही कलावंत असलेली त्याची दुसरी बायको थेलेमा पंथातीलच.. त्यामुळे आता अंधश्रद्धेत तो पूर्ण बुडला होता. घरच्या अंगणात आग करायची त्यात नग्नावस्थेत मार्जोरी उड्या मारणार.. असे बारा दिवस चालले होते. कशासाठी तर, हा विधी केला तर चंद्र खुश होऊन एक चंद्रपुत्र तिच्यापोटी जन्माला येईल, जो थेलेमा पंथाला वैभवशाली बनवेल. रोजच्या या धिंगाण्याला वैतागून शेजाऱ्यांनी पोलीस मध्ये तक्रार देखील केली होोती. 

रात्रीच्या असल्या आपल्या धंद्यांची संशोधक सहकाऱ्यांना भनक लागू नये याची तो पुरेपूर काळजी घ्यायचा. फक्त रॉकेट उड्डाणाची चाचणी घेताना तो क्राउलीच्या कवितेतील काही ओळी पुटपुटत असे. त्याची वाढती लैंगिक विकृती त्याने संस्थेत देखील दाखवली. संस्थेतील अनेक महिलांसोबत त्याने संबंध ठेवले. जरी एफबीआयच्या मते तो बायसेक्च्युअल होता तरी संस्थेत त्याचे संबंध केवळ महिलांशी असल्याचे आढळते. पॉल मॅथीसन या अभिनेत्याने मात्र त्याचे जॅकशी समलैंगिक संबंध असल्याचे कबूल केले होते. 

कामाच्या ठिकाणी पुरुष सहकाऱ्यांशी जॅक नेहमी खेळीमेळीत राहायचा. छोटे छोटे बॉम्ब स्फोट करून समोरच्याला घाबरवणे त्याला खूप आवडायचे. सश्यांच्या शिकारीचा त्याला नाद. नेमबाजीची एवढी आवड की पहिल्या बायकोला प्रपोज करताना या हिऱ्याने तिला पिस्तूल गिफ्ट दिलं होतं. घरी आलेल्या पाहुण्याने बेल वाजवली की गळ्यात मोठा साप घालून हा दार उघडायला येणार. श्रीमंती आली तरी आपल्या जुन्या खटारा गाडीतूनच रोज कामाला जाणार. अंघोळ करताना तर दोनदोन तास टबमध्ये पडून राहणार. आपल्या जे कृष्णमूर्ती यांच्या व्याख्यानाला देखील जॅक गेला होता बरं का 😭
थेलेमावर सरकारचे बारीक लक्ष होते, अनेक बेकायदेशीर गोष्टी तिथे घडतात याचा वास आला होता. त्यामुळे एफबीआयमध्ये जॅकची फाईल दिवसेंदिवस मोठी होत होती. संशोधनाची काही कागदपत्रे चुपचाप इस्रायलला पाठवत असताना तो सापडला. सरकारच्या दृष्टीने तो धोकादायक व्यक्ती बनला होता. त्यात त्याचे शेअर्स विकत घेऊन त्याला या संस्थेतून हद्दपार करणे हाच एकमेव उपाय होता. सरकारने तो केला.. आयुष्यभर ज्यासाठी संशोधन केले त्या कामातून त्याला हाकलून देण्यात आले.

आता तर जॅकची गोची झाली. सरकारी काहीच कामे मिळणार नाही. त्याने हॉलिवूडकडे आपला मोहरा वळवला. सिनेमामध्ये छोटेमोठे बॉम्बस्फोट चित्रित करायचे असतात, त्यातून पैसे मिळवू लागला. मेक्सिकन सरकारने त्याला तिकडे येऊन संशोधन संस्था सुरू करायचे आवाहन केले. काही दिवस मेक्सिकोमध्ये राहून नंतर इस्रायलला सटकायचा जॅकने प्लॅन बनवला. मात्र १७ जून १९५२ रोजी घरच्याच प्रयोगशाळेत काम करत असताना बॉम्ब स्फोटाच्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. आणि त्याच्या मृत्यूच्या बातमीचा धक्का लागून त्याच्या आईने देखील लगेच प्राण सोडले. 😞
त्याच्या मृत्यूविषयी अनेक मांडण्या करण्यात येतात. काही जण म्हणतात की त्याने जीवनाला कंटाळून आत्महत्या केली असेल.. काही जण म्हणतात की तो अपघात असेल. काही लोक म्हणतात की नक्कीच सरकार किंवा इतर कुणी केलेला घातपात असेल, कारण अपघात होणार नाही याची पुरेपूर दक्षता तो घ्यायचा. पण घातपात किंवा आत्महत्या नसावी. त्या वेळ बॉम्बस्फोट झाल्यानंतर रुग्णवाहिका बोलावणे आणि रस्त्यात तिला व्यवस्थित मार्गदर्शन करणे हे सगळे जॅकनेच केले होते. एक हात उडून गेला होता, चेहरा पूर्ण भाजला होता. रुग्णालयात पोचला आणि त्याचा जीव गेला. आयुष्यभर स्फोटकांशी खेळणारा, अतिशय स्फोटक आयुष्य जगणारा हा सैतानपूजक स्फोटामध्येच मेला. 

तो मेल्यावर सहा वर्षांनी १९५८ मध्ये त्यांच्या प्रयोगाला लक्षणीय यश आले. जॅकचे लोकांना कुतूहल वाटू लागले आणि नंतर त्याचा सगळा इतिहास जगासमोर आला. त्यानंतर पुढे अनेक वर्ष तो कॉमिक्स कथा-कादंबरी यांचा विषय झाला. काही कॉमिक्सवरची चित्रे पाहिली की तुमच्या लक्षात येईल की जॅकचे आयुष्य कसं भडक होतं. "स्ट्रेंजर एंजल" कादंबरी आणि तिच्यावर आधारित वेबसिरीज आजदेखील लोक आवडीने पाहत आहेत. चंद्र जरी त्याला मुल देऊ शकला नसला तरी चंद्रावर असलेल्या एका विवराला आज त्याचे नाव दिले आहे.. आणि ते विवर चंद्राच्या कायम अप्रकाशित असलेल्या भागात आहे.😞 
त्याची ही गोष्ट मराठीमध्ये आणण्याची पण खरंच गरज होती का हा प्रश्न मला आत्ता पोस्ट संपवत असताना पडत आहे. मी तर तिच्याकडे केवळ एक शोकांतिका म्हणून पाहतो. आयुष्यात अनेक लोकांचे ट्रॅक चुकतात मात्र त्यांना ट्रॅकवर परत येण्याची संधी मिळते. जॅक च्या या छोट्याशा आयुष्यात घटनांची एवढी दाटी आहे की त्याला आत्मावलोकन करायची, पुन्हा ट्रॅकवर येण्याची संधीच मिळाली नसावी असे मला वाटते. दिवसभर विज्ञानाच्या वातावरणात असणाऱ्या जॅकला प्रश्न पडलेच नसतील का? आपण करतोय त्याला काहीच वैज्ञानिक आधार नाही हे त्याला एकदा देखील वाटले नसेल का? 

जॅकची माहिती मिळवत असताना थेलेमा प्रमाणेच भारतात काही संस्था ईश्‍वरी राज्य आणण्यासाठी धडपडत आहेत याची मला आठवण झाली. तिकडे सैतान आहे आणि ईकडे ईश्वर एवढाच काय तो फरक. बाकी साधकांचे मेंदू १००% हायजॅक केलेलेच. त्यांना येणाऱ्या अनुभूती पाहिले की लक्षात येते ही सर्व मानसिक आजारी पडत चालली आहेत. मात्र तिथेही प्रश्न विचारायचे नाहीत इथेही प.पू. यांना प्रश्न विचारायचे नाहीत. विज्ञान तर हे नेहमी प्रश्न उपस्थित करायला शिकवते. झापडे काढून बघायला शिकवते.. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास कधी सोडली नाही पाहिजे . जॅकची कहाणी त्यासाठी सांगितली आहे. आपल्या प्रतिभेची माती करून घ्यायची नसेल तर विज्ञानावर प्रेम केलं पाहिजे.. वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रेम केलं पाहिजे.

❤️लव्ह विज्ञान❤️✊❤️ लव्ह मानवता✊❤️

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव