शिवजयंती

आज शिवजयंती.. महाराष्ट्राच्या गौरवाचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. महात्मा जोतिबा फुले यांनी सर्वप्रथम रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली. मात्र आता त्याला काही अती उत्साही भक्त मंडळींकडून केवळ उत्सवी रूप आले आहे. नववारी नेसून, चंद्रकोर लावून, काळा गॉगल टाकून, फेटा बांधला, आणि बंद बुलेटवर बसून फोटो काढला की अनेक स्त्रियांची शिवजयंती साजरी होते. उत्सव साजरा जरूर करावा, अगदी धामधुमीत करावा, त्याबद्दल दुमत नाही. मात्र त्या उत्सवाला अभ्यासाचे अधिष्ठान देखील असावे ही अपेक्षा करणे गैर होणार नाही. 
शिवाजी महाराज यांच्याबद्दल विचारले की भक्त लोकांची मजल अफझलखानच्या पोटा आणि शाईस्तेखानच्या बोटा पलीकडे जात नाही. अफझलखानाचा पाडाव आणि शाहिस्तेखानाची त्याच्या छावणीत घुसून केलेली फजिती हे निश्चितच शिवरायांच्या शौर्याचे, धाडसाचे निदर्शक आहेत. त्याबद्दल कुणाचेच दुमत असणार नाही मात्र त्याचे कुणी भांडवल करु पाहत असेल, तर त्याला सर्व शिवभक्तांनी वेळीच रोखले पाहिजे अन्यथा मिरज दंगलीसारखे प्रसंग घडतात. आपल्या डोक्यामध्ये चुकीचा शिवाजी कोणी स्वतच्या फायद्यासाठी घुसवू पाहत आहे का याची दक्षता प्रत्येक शिवभक्तांनी घेतली पाहिजे.. गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता हे पुस्तक तर आवर्जून वाचले पाहिजे

स्वराज्याचा प्रमुख शत्रूराज्यांचे बादशहा मुस्लिम होते त्यामुळे वरकरणी जरी हा हिंदू मुस्लिम लढा दाखवला जात असला तरी शिवरायांची लढाई ही हिंदुत्वाची नव्हती, ही लढाई अन्यायाविरुद्धची होती. मुस्लिम पातशाहीमध्ये अनेक हिंदू सरदार होते जे वतनासाठी हातचे राखून लढत होते, त्याच वेळेस स्वराज्यासाठी आपले शीर तळहातावर घेऊन अनेक मुस्लिम केवळ शिवरायांच्या प्रेमापोटी मुस्लिम पातशाहीशी लढत होती. शिवरायांचे रयतेविषयी धोरण, नियोजन, प्रशासनावरील पकड, न्यायदान, स्त्रियांबद्दल असलेला आदर, भविष्याच्या पडद्यापलीकडे पाहू शकेल अशी दूरदृष्टी, सर्व जाती धर्मांना देण्यात येणारी समान वागणूक अश्या असंख्य पैलूमुळे शिवराय जाणते राजे ठरतात. 

तोरणा आणि इतर गड घेऊन स्थापन केलेलं स्वराज्य आणि प्रतापगडचे युद्ध या घटनांमध्ये बारा वर्षाचा कालावधी आहे. दुर्दैवाने या काळाबद्दल जास्त बोलले जात नाही. या काळात राजांनी स्वराज्याची घडी बसवली, रयतेच्या मनात विश्वास आणि आपुलकी निर्माण केली. रयतेला स्वराज्य न्यायाचे आणि आपल्या हक्काचे राज्य वाटू लागले. जीवा महाला, शिवा काशिद यासारखे हजारो साथीदार राजांसाठी आपले प्राण देखील द्यायला का कमी करत नव्हते, याचे उत्तर या बारा वर्षातील कालखंडात सापडते. पुढील काळ धामधुमीचा गेला असला तरी स्वराज्याची घडी या काळात अशी बसवली होती, की पुढे महाराज आग्रा येथे कैद होते तरी येथील व्यवस्था टिकून राहिली. 
शिवरायांनी सुरतची लूट केली असली तरी त्यावेळी स्त्रियांना हात लावायचा नाही याची सख्त ताकीद दिली होती. तसेच आधीचे राजे सैनिकांना लुटितील हिस्सा देऊ करायचे.. महाराजांनी ते बंद केले. पगार मिळतो आहे ना .. मग बस. यामुळे जबरी लुटीचे प्रमाण कमी झाले. सैन्याचा रयतेला उपद्रव झाला नाही पाहिजे यासाठी अगदी काटेकोर काळजी महाराज घेत.शिवरायांनी वेळोवेळी काढलेली आज्ञापत्रे वाचली की महाराजांचे नियोजन किती सूक्ष्म पातळीवर असायचे, आणि त्या नियोजनात रयत कशी केंद्रबिंदू असायची हे स्पष्ट दिसते. असा हा राजा केवळ कुणाच्या पोटा आणि बोटापुरता मर्यादित राहू नये. सध्या भडक करून दाखवत जात असलेला इतिहास हा जरी खोटा नसला तरी शिवरायांची चुकीची प्रतिमा नव्या पिढीपुढे जात आहे. तुम्हा आम्हा सर्व विवेकी लोकांनी शिवरायांचे खरे रूप जनतेसमोर नेण्याची गरज आहे. 

जय जिजाऊ जय शिवराय✊

#richyabhau
#शिवजयंती

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके

ऑनलाईन गणित शिकवणी

दृष्टी तशी सृष्टी