गिरीन्द्रशेखर बोस आणि भारतीय मनोपचार.


गिरीन्द्रशेखर बोस आणि भारतीय मनोपचार.

सुशांतसिंग राजपूत आत्महत्येनंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, की भारतात मानसोपचार तज्ञांची खूप गरज आहे. सुशांतसिंगला तर यांची गरज होतीच, पण या प्रकरणामध्ये वार्तांकन करणारे बहुतेक सर्वच रिपोर्टर आणि अँकर यांचा आक्रळास्तेपणा पाहता सामान्य माणसाला स्वतः ऑड मॅन आउट झाल्यासारखे वाटेल. जागतिक आरोग्य संघटना म्हणते की पाचपैकी एका व्यक्तीला लहानमोठ्या आजारांसाठी मानसिक उपचारांची गरज असते. पण प्रसारमाध्यमांकडून श्रोत्यांचे मेंदू हायजॅक करण्याचे चाललेले प्रमाण पाहता भारतामध्ये हे प्रमाण अधिक भीषण असावे. 😞

आधीच आपल्या देशामध्ये मानसिक आजारांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची आणि त्यावरील उपचारांची दुरावस्था जगजाहीर आहेच. आज मानसोपचार विषयातील बहुतेक ज्ञान हे पश्चिमात्य देशातून आलं असलं तर भारतीय मानसोपचार पद्धतीचा ही एक मोठा इतिहास आहे. अगदी प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक काळात देखील. अघोरी उपायांपासून मनाच्या तळापर्यंत जायचा प्रयत्न करणाऱ्या ध्यान धारणा पद्धती इथे प्रचलित होत्या. आधुनिक काळात मानसोपचार विषयांमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी, भारतात मानसोपचार चळवळ सुरू करणारी व्यक्ती म्हणजे गिरीन्द्रशेखर बोस. आज त्यांची माहिती थोडक्यात घेऊ. 

३० जानेवारी १८८७ रोजी आता बिहार राज्यात( तेव्हा बिहार, ओडिसा बंगाल प्रांतात होते) असलेल्या दरभंगा येथे गिरीन्द्रचा जन्म झाला. त्याचे वडील दरभंगा संस्थानचे दिवाण, संस्कृतमधील पंडित होते तर आई कवयित्री. चार पोरं आणि पाच पोरी अश्या नऊ भावंडांमध्ये हे शेंडेफळ. गिरीन्द्रच्या लहानपणापासून असलेल्या चौकसबुद्धीला घरातील सुबत्ता आणि सुसंस्कृतपणा खतपाणी घालत होते. गिरीन्द्रचे शालेय शिक्षण दरभंग्यातच झाले, त्यानंतर कोलकात्यात प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये रसायनशास्त्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक मार्क मिळवत वयाच्या १८ व्या वर्षी BSc पदवी प्राप्त केली. भाऊचे सगळे लहान वयातच झाले म्हणायचे.. 😂 कारण त्या काळातील पद्धती प्रमाणे वयाच्या १७ व्या वर्षी त्याचे लग्न १० वर्षाच्या इंदुमती सोबत झाले. पुढे त्यांच्या संसारात दोन मुलीदेखील दाखल झाल्या. 

पुढे २३ व्या वर्षी कोलकाता मेडिकल कॉलेज मधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून MB पदवी मिळवली. आणि प्रॅक्टिसपण सुरू केली. त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये ते योगा, संमोहन इत्यादीचा देखील वापर करायचे. म्हणून त्यांना या विषयात अधिक ज्ञान मिळवायची तहान लागली. त्यांचं BSc मधील आणि वैद्यकीय परीक्षेतील यश आणि अनुभव लक्षात घेता त्यांना प्रायोगिक मानसशास्त्र विषयात MSc ची परीक्षा देण्याची खास सवलत मिळाली. आणि त्यात देखील ते पहिले आले. नंतर त्यांनी त्याच विद्यापीठात अर्धवेळ व्याख्यात्याची नोकरी स्वीकारली, पुढे बारा वर्ष केली सुद्धा.
भारतामध्ये मानसशास्त्र विषयात सर्वात पहिली PhD केलेली व्यक्ती म्हणजे गिरीन्द्रशेखर बोस. १९२१ मध्ये त्यांनी PhD मिळवली, पुढे वीस बावीस वर्ष भारतात ते एकमेव मानसशास्त्रातील डॉक्टरेट होते. त्यांचा संशोधनाचा विषय होता "दमनाची संकल्पना." आज दमन म्हणाले की आपल्याला सत्तेवर असलेले हुकूमशहा आठवतात. (तडीपारच्या तर नावातच शहा आहे😂) पण एक दोन पिढ्या आधी पाहिले तर घराघरात एक हुकूमशहा असायचा. घरातील सगळे निर्णय त्याच्या आज्ञेनुसार होणार. घरापासून सुरू होणारे व्यक्तीचे दमन सरकारापर्यंत सुरूच असते. यावर भारतीय मानसिकतेतून त्यांनी मौलिक संशोधन केले. 

त्यांनी त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध मानसोपचार शास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड याला पाठवले. ते वाचून फ्रॉइड खूपच चकित झाला. त्याच्या ईडिपस कॉम्प्लेक्स सिद्धांताला बोस यांनी आव्हान तर दिले होतेच, पण भारतीय मानसिकतेबाबत पाश्चात्य लोकांच्या तत्कालीन दृष्टीकोनाला देखील हे संशोधन हादरे देणारे होते.फ्रॉइड यांना आपले गुरू मानून बोस वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेत होते, तसेच त्यांच्या संकल्पनेला छेद देणाऱ्या आपल्या वेगळ्या संकल्पना देखील सांगत होते.दोघांना एकमेकांच्या संशोधनाचा आणि लिखाणाचा फायदा होत होता.
भारत, भारतीय लोक आणि येथील विविध धर्मांच्या विविध चालीरिती यासर्वांबद्दल अतिशय गैरसमज पाश्चात्त्य लोकांमध्ये असल्याने या देशावर राज्य करण्याचे ते एक प्रकारे समर्थन करत होते. जणूकाही केवळ त्यांचे राज्यच या देशातील लोकांना एक सुजाण नागरिक बनवेल. स्वातंत्र्याचा लढा केवळ जहाल-मवाळ, हिंसा-अहिंसा, सशस्त्र क्रांती की सनदशीर मार्ग यापलीकडे सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक पातळीवर देखील खेळला जात होता. या अर्थाने गिरीन्द्रशेखर बोस यांचे देखील स्वातंत्र्य लढ्यात योगदान आहे असे म्हणावे लागेल.

ईडिपस कॉम्प्लेक्स मध्ये फ्रॉइड ने मांडणी केली होती की ३-५ वर्षांनंतर लहान मुले आईकडे तर लहान मुली वडिलांकडे जास्त ओढली जातात. मानवाप्रमाणेच इतर प्राण्यांच्या पिल्लांमधे देखील वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यात हे वर्तन दिसून येते. मुली वडिलांचे अधिक लक्ष, प्रेम प्राप्त करण्यासाठी आईशी स्पर्धा करतात, तर मुले आईचे लक्ष वेधून घेण्यासाठी वडिलांशी स्पर्धा करतात. या काळात आपल्याला खच्ची केले जाईल अशी भीती त्याच्या मनात असते. (ईडिपस हा ग्रीक पुराणकथेमधील एक पात्र आहे, ज्याने या भीतीपोटी आपल्या वडिलांचा खून करून आईशी लग्न केले होते)

गिरीन्द्रशेखर बोस यांना संशोधन करताना भारतीय रूग्णांमध्ये ईडिपस कॉम्प्लेक्सची महत्त्वाची भूमिका आढळली नाही. भारतीय बालकांचे संगोपण आणि पाश्चात्त्य बालकांचे संगोपण यामध्ये अर्थातच खूप फरक होता. इथे कौटुंबिक दमनाचे प्रमाण खूप जास्त असते. म्हणून मुलगा लहानाचा मोठा होत असताना आदर्श बाप होण्याचे शिकत असतो तर मुलगी आदर्श आई होण्याचे शिकत असते. त्यामुळे इथे मुलगा वडिलांचे तर मुलगी आईचे आकर्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करते. बोस यांच्या संशोधनामुळे हे निश्चित झाले की पाश्चात्य ज्ञानाच्या आधारे भारतीय आजारांचे सरसकट सामान्यीकरण करता येणार नाही. जैसा मर्ज वैसा इलाज.
भारतामध्ये मानसिक आजार आणि उपचार यांची मोठी परंपरा आहे.अथर्ववेदामध्ये मानसिक आजारांचे उल्लेख येतात मात्र त्याची कारणमीमांसा करताना त्याला दैवी प्रकोपाचे रूप दिले आहे. गौतम बुद्धाला तर अनेक जन मनाचे डॉक्टर असेच संबोधतात. मनाच्या तळाचा शोध घेण्यसाठी त्यांनी ध्यानाचा उपयोग केला. आयुर्वेदाचा पाया असलेल्या सुश्रुतसंहिता आणि चरक संहितांमध्ये मानसिक आजार आणि उपचार यावर सखोल मार्गदर्शन केले आहे. अगस्त्य ऋषींनी मानसिक आजारांचे १८ प्रकार आणि त्यावर उपाय यांचे वर्णन केले आहे.

एका अर्थाने भगवतगीता हा समुपदेशनाचा संपूर्ण दस्तऐवजच आहे. पाश्चात्य देशात जवळजवळ सतराव्या शतकापर्यंत मनोविकारांकडे दैवी प्रकोप म्हणून पाहत होते त्यामानाने आपल्याकडे खूप लवकर सुधारणा झाली होती. सम्राट अशोकाच्या काळात मानसिक रुग्णांसाठी वेगळे रुग्णालय बांधल्याचे उल्लेख सापडतात. चौल साम्राज्यात आताच्या तामिळनाडू मधील तिरूमुक्कुदल येथील वेन्कटेश्वर मंदिरातील भिंतीवर देखील मनोपचाराचे संदर्भ सापडतात. मोहम्मद खिलजीच्या काळात देखील काही मनोरुग्णासाठी रुग्णालये बांधल्याचे उल्लेख आहेत.

युरोपीय वसाहती स्थापन झाल्या, त्यांची भरभराट झाली आणि मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे त्यांच्या अधिकारी आणि भारतीय सिपॉय साठी मनोरुग्णालय काढण्यात आली त्याकाळात मनोपचार करताना आयुर्वेदिक आणि युनानी वैद्य रुग्णांना गरम पाण्याने स्नान घालने आणि अफू चारणे असे उपचार करायचे. काही प्रसंगी रुग्णांचे रक्त शोषण करायला जळू लावायचा प्रकार देखील केला जायचा. काही रुग्णालयात रुग्णांना बरे वाटावे म्हणून संगीताचा प्रयोग देखील केला जायचा.

आयुर्वेदात वेडांचे वर्गीकरण पित्तोन्माद, कफोन्माद आणि वातोन्माद असे केले होते. आणि इलाज करण्याऱ्यास भूतवैद्य असे नाव होते. १०० वर्षे जुने तूप, गुळवेल, काळे मीठ, हिंग, नागवेलीच्या मुळांचे चूर्ण; ब्राम्ही, शिंगरू आणि मध यांचा वापर करून औषधी बनवली जायची. रुग्णालयाशिवाय, वैद्याशिवाय उपचार करायची तर भारतीयांची मोठी परंपरा, जी अजूनही सुरु आहेच. दंडे, दोरे, ताईत, पीर बाबाचे दर्शन, देवळात नेवून बसवणे, साखळदंडाने बांधून ठेवणे, रुग्णाला साप, सिंह किंवा भयानक चेहऱ्याची भीती दाखवणे यासारखे अंधश्रद्ध उपाय केले जायचे.

परदेशात मनोरुग्णांना इतर कैद्यांप्रमाणे कारागृहातच ठेवले जायचे. फिलिप पिनल याने प्रयत्न केले अन रुग्णाकडे evil ऐवजी ill म्हणून पाहू जाऊ लागले. १८५८ मध्ये पहिला लुनासी ऍक्ट आला. लुना म्हणजे चंद्र, जो मनाचा कारक असून वेडेपणाला तोच कारण असतो असे अनेक संस्कृतीत मानले जायचे.कायदा आला आणि वैद्यकीय सेवेत प्रमाणीकरण आले. त्या काळात रुग्णांवर क्लोरल हायड्रेटचा मारा केला जायचा जेणेकरून रुग्णाला जास्तीत जास्त झोप येईल किंवा एकाजागी शांत तरी बसेल.
भारतात मानसिक आजारावर आधुनिक पद्धती १९२२ पासून सुरू झालेली दिसते. १९२३ मध्ये जलोपचार सुरू झाले. बोस यांनी या विषयाच्या पाश्चात्य ज्ञानाला भारतीय तत्त्वज्ञानाची तसेच योगसाधनेची जोड दिली. केवळ औषधाचा मारा न करता आहार पद्धतीमध्ये बदल, अन्न घटकांमध्ये बदल असे अभिनव प्रयोग केले. लोकांना मानसोपचाराची रुग्णांना वाटत असते ती भीती घालवण्यासाठी त्यांनी शब्दश: जादूचे खेळ देखील करून दाखवले. त्यानंतर ग्रामीण भागातील रुग्ण त्यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकत. एक मनोचिकित्सक (psychiatrist) आणि मानसशास्त्रज्ञ (psychologist) असण्यासोबत ते एक कुशल मनोविश्लेषक (psychoanalysist) देखील होते. 
गिरीन्द्रशेखर बोस यांना भारतातील मनोविश्लेषण शाखेचा जनक असे म्हटले जाते. त्यांनी भारतीय मनोविश्लेषण संस्था स्थापन केली आणि तिला जागतिक मनोविश्लेषण संस्थेशी जोडून घेतले. संस्थेच्या १५ संस्थापक सदस्यांपैकी नऊ मानसशास्त्राचे व्याख्याते होते तर पाच सैनिकी डॉक्टर. संस्थापक अध्यक्ष म्हणून स्वतः गिरीन्द्रशेखर बोस. जागतिक संघटनेची जोडून घेतले तरी बोस यांनी आपल्या संस्थेची वेगळी ओळख ठेवली होती, आणि कार्यपद्धती देखील. याची तुलना तुम्हाला दोन्ही संस्थेचा लोगो पाहून करता येईल. जागतिक संघटनेच्या लोगोमध्ये एक माणूस एका पंख फुटलेल्या महिलेला काही तरी समजावून सांगतोय.(हे माझे विश्लेषण आहे बरं .. पूर्वग्रह दूषित असू शकते..) तर भारतीय संस्थेच्या लोगोमध्ये अर्धनारीनटेश्वर घेतला आहे. अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री.... किती समर्पक ना❤️
दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांच्या वतीने भाग घेतला होता, त्यांच्या मानसिक आजारावर बोस यांनी उपचार केले होते. मानसिक आजार ओळखण्यासाठी नवनवीन उपकरणे आणि चाचण्या यांचा त्यांनी विकास केला. याशिवाय मानसिक आजाराबाबत जागृती व्हावी यासाठी चळवळ चालवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी १० पुस्तके आणि ४० पेक्षा जास्त लेख लिहिले. पुराणे, पातंजलयोग आणि भगवतगीतेतील मनोविकार विषयाशी संबंधित विवेचनाचा यात समावेश आहे. लहान मुलांसाठी देखील पुस्तक लिहिलेले बोस हे लहान मुलांशी खेळण्यात दंग होत असत.

रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी बोस यांनी घराच्या व्हऱ्यांड्याचा उपयोग सुरू केला. १९३८ मध्ये त्यांनी लुम्बिनी पार्क मनोरुग्णालय सुरू केले. तीन रुग्णांने त्याची सुरुवात झाली होती आणि ८० रुग्णक्षमता एवढा त्याचा विस्तार झाला. त्या काळातील ते सर्वात मोठे खासगी मनोरुग्णालय होते. मनोरुग्ण मुलांना छोटी-मोठी कामे शिकून आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी बोधगया येथे प्रशिक्षण केंद्र सुरू केले. सुप्त मेंदूवर त्यांनी केलेले संशोधन खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरले आहे. संमोहनशास्त्रामध्ये संशोधन करून त्यांनी अनेक सर्जन मंडळीना वेळोवेळी मदत केली.

सिग्मंड फ्राईड आणि बोस दोघेही आधी वैद्यकीय व्यवसाय करत असताना नंतर मानसोपचाराकडे वळले. दोघांनी मानवाच्या सुप्त मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच कदाचित या दोघांचे खूप चांगले सुत जमले. त्या दोघांमध्ये वीस वर्षे झालेल्या पत्रव्यवहार हा आज मानसोपचार विद्यार्थ्यांसाठी एक मोलाची ठेव बनला आहे. दुनिया है मेरे पीछे, लेकिन मे तेरे पीछे असे काहीसे फ्रॉइडचे बोस यांच्याबाबत झाले. बोस यांच्या सिद्धांताने फ्रॉइड यांना शब्दश: मोहिनी घातली होती. बोस यांच्यामुळे भारतीय मानसोपचार परंपरेची दखल आज जगभरातील शास्त्रज्ञांना घ्यावी लागत आहे. 

३ जून १९५३ रोजी बोस यांचे निधन झाले. दुर्दैवाने त्यांनी चालू केलेले हॉस्पिटल देखील १९८० मध्ये सरकारला चालवायला घ्यावे लागले. बोस यांना आदरांजली म्हणून मनदर्शन फाउंडेशन ने २००९ साली ब्युटीफूल माईंड स्पर्धा घेतली होती. ज्याप्रमाणे सौंदर्य स्पर्धेत स्पर्धक भाग घेतात, त्याप्रमाणे या स्पर्धेत ४००० व्यक्तींनी दूरध्वनी वरून भाग घेतला, प्रश्नावली सोडवली, मानसिक सौंदर्याचे आंतरराष्ट्रीय निकष लावून सुंदर मनांची निवड केली होती. आणि शानदार कार्यक्रमात त्यांना पारितोषीके देण्यात आली होती.

मला ही ब्यूटिफुल माईंड संकल्पना खूप आवडली, म्हणून मी मनदर्शन फाउंडेशनशी संपर्क साधला, तेव्हा समजले, त्यांना खूप खर्च झाला. त्यांनी पदरमोड करून तो केला मात्र पुढच्या वेळेस त्यांना शक्य झाले नाही. मात्र भविष्यात कोणी ही संकल्पना राबवणार असतील तर ते तांत्रीक मदत करायला तयार आहेत.❤️ स्पर्धेत भाग घ्या किंवा नको पण मनाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.. मनाचे आरोग्य जपले पाहिजे...मन सुंदर तर जग सुंदर. स्वतःला वेळ दिला पाहिजे.. आणि कुटुंबाला पण.. रडावे वाटले तर रडले पाहिजे.. जग काय म्हणेल याचा विचार करू नये.. कूच तो लोग कहेंगे.. लोगोका  काम है केहना.... व्यवस्थेविरुद्ध राग असेल तर तो देखील त्या त्या वेळेस जमेल तसा व्यक्त केलाच पाहिजे..✊✊ भले तुम्हाला कोणी आंदोलन जीवी म्हणोत😂  


#richyabhau
#girindrasekhar

Comments

  1. अप्रतिम.. आपल्यामुळे अनेक हिरो कळताय. खुप खुप आभार.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव