डोरोथी हॉजकिन : जीवरसायन शास्त्रातील तपस्विनी

डोरोथी हॉजकिन : जीवरसायन शास्त्रातील तपस्विनी

मेरी क्युरी आणि तिची आयरीन क्युरी मुलगी यांच्यानंतर रसायनशास्त्रात तिसरे नोबेल पारितोषिक मिळवलेली एक शास्त्रज्ञा होती.. जिला तिच्या विचारसरणीमुळे अमेरिकेत यायला बंदी घालण्यात आली होती. जी आयुष्यभर मजूर पक्षाची समर्थक होती तरीदेखील हुजूर पक्षाच्या मार्गारेट थॅचर पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या केबिनमध्ये तिचा फोटो होता. कम्युनिस्ट विचारांची नव्हती तरी तिला लेनिन शांतता पुरस्कार मिळाला. ब्रिटनमधील पहिल्या दहा वैज्ञानिक महिलांमध्ये जीचा समावेश होतो अशी शास्त्रज्ञा, रॉयल सोसायटीची सभासद आणि सर्वात महत्वाचे इन्सूलिनची रचना शोधण्यासाठी तब्बल ३५ वर्षे विज्ञानाची तपस्या करणारी तपस्विनी म्हणजे डोरोथी हॉजकिन.

खरे तर डोरोथी मेरी क्रोफुट हॉजकिन असे तिचे भले मोठे नाव ब्रिटिश अर्काइव्ह मध्ये नोंदवले आहे. तिचे लग्नापूर्वीचे नाव डोरोथी मेरी क्रोफुट होते, डोरोथी हे तिचे, मेरी हे आईचे तर क्रोफुट हे वडिलांचे आडनाव. थॉमस हॉजकिन याच्याशी विवाह झाल्यानंतर तब्बल बारा वर्षांनी तिने मेरी वगळून क्रोफुट पुढे हॉजकिन हे नवऱ्याचे आडनाव जोडले, (अगदी आपल्या दीक्षित नेने प्रमाणे) डोरोथी क्रोफुट हॉजकिन याच नावाने तिला नोबेल मिळाले आहे. मात्र रॉयल सोसायटीने तिला सभासदत्व देताना तिच्या नावाचे डोरोथी हॉजकिन असे सुलभीकरण केले. तेच नाव पुढे प्रचलित झाले. एका लघुग्रहाला ‘हॉजकिन’ असे नाव देऊन तिचे नाव अजरामर झाले आहे.
डोरोथीचाचा जन्म १२ मे १९१० रोजी इजिप्तची राजधानी कैरो येथे झाला. तिचे वडील जॉन क्रोफुट हे पुरातत्व शात्राचे अभ्यासक आणि ब्रिटिश शिक्षण खात्यामध्ये कामाला होते. १९२२ साली इजिप्त देश स्वतंत्र झाला, त्याआधी तो ब्रिटिश वसाहतीचा भाग होता. ड्युटीचा भाग म्हणून जॉन इजिप्तमध्ये शाळा निरीक्षक पदावर काम करत होते. डोरोथीची आई मेरी वनस्पतीशास्त्राची अभ्यासक होती आणि तिने अनेक वनस्पतींच्या प्रजातीची चित्रे काढली होती. समाजवादी विचारांचा पगडा असलेली मेरी ही खूप अभ्यासू होती. जॉन आणि मेरी या दाम्पत्याच्या चार मुलींपैकी डोरोथीचा नंबर सर्वात पहिला.

इजिप्तमधील कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मेरी दरवर्षी उन्हाळ्यात इंग्लंडला यायची. १९१४ साली जेव्हा डोरोथी चार वर्षाची होती आणि पाठच्या दोन मुली अनुक्रमे दोन वर्ष आणि सात महिन्याच्या होत्या, तेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले. त्या वर्षी मेरी तीन मुलींना घेऊन इंग्लंडला आली, मात्र इजिप्तला परत जाताना एकटीच गेली. या युद्धात डोरोथीचे चार मामा मारले गेले, त्यामुळे आई कट्टर युद्धविरोधक बनली. त्याकाळात बर्ट्रांड रसेल सारख्या ज्यांनी-ज्यांनी युद्धविरोधी भूमिका घेतली त्यांना देशद्रोही ठरवण्यात आलं होतं. मात्र शासनाला न घाबरता आपल्या तत्त्वांना चिकटून राहायचे बाळकडू डोरोथीला तिच्या आईकडून या काळात मिळाले. माझी आईच माझी आदर्श आहे असं ती नेहमी म्हणायची. 

क्रोफूट आजीआजोबांच्या घरात या तिघी मुली मोठ्या होऊ लागल्या, लवकरच त्यात चौथी पण सामील झाली. जॉनची नोकरी बदलीची असल्यामुळे मुलींचे शिक्षण नियमित आणि चांगल्या ठिकाणी व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. डोरोथी अवघी दहा वर्षाची असताना वडिलांचे मित्र डॉ. जोसेफ यांनी डोरोथीला प्रयोग करून पाहायला काही रसायने दिली. आणि तिचे रसायनशास्त्राशी नातं जडलं. त्याच वर्षी जेव्हा डोरोथीला सर जॉन लेमन ग्रामर स्कूल मध्ये टाकण्यात आलं, तेव्हा तिथे रसायनशास्त्राचा अभ्यास करणार्‍या अवघ्या दोन मुलींपैकी ही एक होती.
सोळाव्या वाढदिवशी डोरोथीला आईकडून एक पुस्तक भेट मिळाले त्यातून स्फटिकशास्त्राचा अभ्यास करण्याची प्रेरणा तिला मिळाली. त्यासाठी डोरोथीला पुढे रसायनशास्त्र शिकायचं होतं आणि त्यासाठी ऑक्सफोर्डला जायचं होतं. मात्र तिथे प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा असायची आणि त्यात पास व्हायचे तर लॅटिनचा अभ्यास असणे गरजेचे असायचे. तिच्या शाळेमध्ये तर लॅटिन विषयच नव्हता. तिची तळमळ पाहून शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतः शिकवणी घेऊन तिला लॅटिन भाषेमध्ये तरबेज केले आणि ती प्रवेश परीक्षा पास झाली सुद्धा.❤️ डोरोथी यासाठी मुख्याध्यापकांची आयुष्यभर ऋणी राहिली. 

ती तेरा वर्षाची असताना वडील नोकरी निमित्त सुदानमध्ये स्थलांतरित झाले होते. शाळेला सुट्ट्या लागल्या की डोरोथी तिकडे जायची. १९२८ मध्ये ती वडिलांसोबत आफ्रिकेमध्ये फिरत असताना त्यांनी पाचव्या शतकातील काही चर्च पाहिले. वडिलांनी पुरातत्त्व शास्त्रानुसार तिला मार्गदर्शन केले. तेथील मोझेक कलाकृती, पॅटर्न यांचे निरीक्षण आणि रेखन करत तिने सुट्टी व्यतीत केली, पुढे आयुष्यभर पेनिसिलिन, इन्शुलीन, बी१२ यासारख्या बाबींचे चित्रण करण्याची ही जणू नांदीच होती. सुट्टी संपल्यावर ऑक्सफर्ड मध्ये दाखल होत असताना ती येथील काही काचेचे तुकडे नमुने म्हणून संशोधनासाठी घेऊन गेली होती.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील समर्विल्ले कॉलेजमध्ये तिने अभ्यासाचा धडाका लावला. तेव्हाच्या प्राचार्या मार्जरी फ्रे यांचा पिच्छा पुरवला. त्यांच्याकडून नवनवीन माहिती शिकून घेतली. नवे अभ्यासक्रम पूर्ण केले. याशिवाय पुरातत्वशास्त्र आणि व्यवसाय यांची सांगड घालून आणलेल्या काचेच्या नमुन्यांचा अभ्यास केला. याशिवाय विद्यापीठाबाहेरील प्रयोगशाळांना भेटी देऊन तेथील संशोधन पद्धतीचा अभ्यास केला. १९३२ मध्ये तिने विशेष योग्यता श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली. विशेष योग्यता मिळवणारी त्या संस्थेच्या इतिहासातील ती तिसरी मुलगी होती. 

समर्विल्ले कॉलेजमधून पुढील एक वर्ष केंब्रिज आणि एक वर्ष ऑक्सफर्ड येथे संशोधनासाठी तिला ७५ पाऊंडची फेलोशिप मिळाली. याशिवाय तेथील रहिवासामधील इतर बिल देण्यासाठी मावशीने आर्थिक मदत देऊ केली, यांचा आधार घेऊन पीएचडी करण्यासाठी ती केंब्रिजमध्ये आली. जॉन बर्नाल यांच्या मार्गदर्शनाखाली पेप्सीन या जीवशास्त्रीय घटकाचे विश्लेषण करण्यासाठी संशोधन करू लागली. पेप्सीनचा प्रयोग यशस्वी झाला, मात्र त्याचे श्रेयाचा मोठा वाटा बर्नालचाच असल्याचे ती नमूद करते. याच काळात तिला स्फटिकीकरण करून क्ष किरणांच्या साहाय्याने प्रथिनांच्या रचना उलगडण्यात मोठा वाव असल्याचे लक्षात आले.
मार्गदर्शक जॉन बर्नाल यांचा डोरोथीच्या जीवनावर खूप वैज्ञानिक, राजकीय आणि वैयक्तिकरित्या खूप प्रभाव पडला. बर्नाल हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडचे महत्वाचे शास्त्रज्ञ होते, याशिवाय ते साम्यवादाचे आणि सोविएत रशियाचे देखील उघडपणे समर्थन करायचे. त्यांची राहणी साधी आणि अनौचारिक असायची.डोरोथी या संत व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमातच पडली, अर्थात त्यांचे असे अनौपचारिकपणे एकत्र येणे समाजाला पचणारे नव्हते. लवकरच डोरोथीच्या आयुष्यात थॉमस हॉजकिन आला. दोघांनी १९३७ मध्ये लग्न केले आणि हा पेच सुटला.

थॉमस हॉजकिन हा देखील साम्यवादी. हॉजकिन घराण्यात इतिहासकारांची परंपरा. थॉमसचे वडील आणि दोन्ही आजोबा देखील इतिहासकार, स्वतः थॉमस आणि नंतर त्यांना झालेली मुलगी एलिझाबेथ हे देखील इतिहासकार. या सर्वच हॉजकिनांचा आफ्रिकी देशाच्या इतिहासावर अभ्यास होता हेही विशेष. पॅलेस्टाईन येथील नोकरीला लाथ मारून आलेला, आणि आता ऑक्सफर्डमधील बेलिऑल कॉलेजमध्ये प्राध्यापकी करत असलेला थॉमस डोरोथीला भावला. त्यांच्या सुखी संसाराला तीन गोंडस फळे देखील लागली. पुढे जाऊन थोरला लूक गणितज्ञ, मधली एलिझाबेथ इतिहासकार तर धाकटा टोबी वनस्पतीशास्त्राचा अभ्यासक बनले.
डोरोथी जेव्हा १९३४ मध्ये ऑक्सफर्ड मध्ये परत आली, पुढे निवृत्त होईपर्यंत ती समर्विल्ले येथेच प्राध्यापकी करत होती. तिला पुरुष विद्यार्थ्यांना शिकवायला मनाई होती. तिच्यावर मुलींना मुख्यतः रसायनशास्त्र शिकवायची जबाबदारी होती. याशिवाय स्फटिकशास्त्र, खनिजशास्त्र हे विषय देखील ती घ्यायची. मार्गारेट थॅचर तिचीच विद्यार्थिनी होती. नक्कीच तिचे शिकवणे, आणि विद्यार्थ्यांशी वर्तणूक अतिशय उत्तम प्रतीची असेल, त्यामुळे विरुद्ध पक्षाची समर्थक असली तरी पंतप्रधान झालेल्या मार्गारेट थॅचर यांना केबिनमध्ये फोटो लावावा इतपत ती आदर्श वाटत होती.

डोरोथी जेव्हा १९३४ मध्ये ऑक्सफर्ड मध्ये परतली होती, तेव्हाच सर रॉबर्ट रॉबिनसन यांच्या मदतीने पैसे जमवून एक्सरेचे उपकरण विकत घेतले आणि इन्सूलिनवर काम चालू देखील केले होते. रॉबिनसन यांनी तिला स्फटिकीकरण केलेल्या इन्सूलिनचा थोडा नमुना दिला, त्या काळात क्ष किरण क्रिस्टलोग्राफी तंत्रज्ञानाचा अधिक विकास झाला नव्हता. तिने नंतर चालू केलेल्या इतर प्रकल्पांस लवकर यश आले मात्र इन्सूलिन संरचनेचा फोटो काढण्याचा प्रयोग तब्बल पस्तीस वर्षानंतर १९६९ मध्ये यशस्वी झाला. मात्र हा शोध खूप महत्त्वाचा आणि पथदर्शक ठरला, त्यानंतर इन्सूलिनपेक्षा मोठमोठ्या रेणूंची क्रिस्टलोग्राफी करणे देखील शक्य झाले.
बी१२ जीवनसत्त्वाचे संशोधन करण्यासाठी देखील डोरोथीला आठ वर्षे विज्ञानाची उपासना करावी लागली.१९५५ मध्ये तिला ब१२ची स्फटिकरचना शोधून काढण्यात यश आले. ब१२ जीवनसत्त्वाच्या रेणूत केंद्रस्थानी कोबाल्ट (Co) हे मूलद्रव्य असते आणि कोबाल्टाचा अणू संतृप्त कार्बन अणूला जोडलेला असतो. ब१२ चे रेणुसूत्र C63H88CoN14O14P असते हे तिने क्ष-किरण उपकरणाव्दारे दाखवून दिले. या शोधासाठीच तिला १९६४ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. 
कोलेस्टेरील आयोडाईड या संप्रेरकावर ती phd करत असताना पासून संशोधन करत होती. १९४५ मध्ये तिने त्याची रचना शोधून काढली. याच वर्षी बार्बरा लोव्ह या विद्यार्थिनीसोबत पेनिसिलीनची संरचना शोधून काढली.पेनिसिलीनचा रेणू हा तेव्हा सगळ्यात मोठा समजला जायचा. त्याची रचना शोधून क्रिस्टलोग्राफी क्षेत्रात मोठी क्रांती झाली होती. या संशोधनाबद्दल आपण पुढे बार्बरा लोव्ह यांची माहिती घेताना पाहणार आहोतच. 

विज्ञान जगतातील नवीन घडामोडी बदल डोरोथी अतिशय जागरूक आणि उत्साही होती, १९५३ मध्ये जेव्हा वॉटसन आणि क्रिक ने डीएनएचे द्विसर्पिल मॉडेल शोधून काढल्याचे तिला समजले, तेव्हा आपल्याकडील स्टाफ घेऊन, ऑक्सफर्ड ते केंब्रिज प्रवास करुन ते पाहायला गेली. ते मॉडेल पाहणारी केंब्रीज बाहेरील ती पहिली व्यक्ती होती. तसेच तिने इन्सुलिनचा फोटो काढल्या नंतर पुढच्याच वर्षी चीनमधील काही संशोधकांनी तिच्यापेक्षा सुस्पष्ट असा इन्सुलिनचा फोटो काढला, त्यावेळी ती चीनमध्ये देखील आवर्जून जाऊन पाहून आली. ना इर्षा, ना मत्सर.. केवळ खुल्या दिलाने स्वागत. 
डोरोथी जरी कम्युनिस्ट पक्षाशी प्रत्यक्ष संबंधित नसली तरी तिचा नवरा सदस्य होता. याच कारणामुळे १९५३ मध्ये तिला अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली. नंतर अनेक वर्षांनी ती उठवली गेली. तिने जगभर फिरून विज्ञानाचा प्रसार केला. आज महत्वाचे साधन झालेले "क्रिस्टलोग्राफी तंत्रज्ञान" विकसित करण्यात डोरोथीचा सिंहाचा वाटा असेल. अशा या तपस्वीनीचे स्ट्रोक येऊन वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. २९ जुलै १९९४ रोजी आपल्या गावी मोकळ्या हवेत तिने शेवटचा श्वास घेतला. तिच्या तपस्येला, संयमी संशोधक वृत्तीला लाख सलाम 🙏🏾

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव