होजे डेलगाडो : वेडा मानसोपचारतज्ञ

होजे डेलगाडो : वेडा मानसोपचारतज्ञ

भारतामध्ये आयटी नियम २०२१ लागू करण्यात आले आहेत, ज्याद्वारे वेबपोर्टलवरील बातम्यांवर डायरेक्ट शासनाचे नियंत्रण येणार आहे. वेबपोर्टल वरील हवे ते कन्टेन्ट काढून टाकण्यात किंवा त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार शासनाला म्हणजे पर्यायाने बाबूलोकांना असणार आहेत. द वायरचे संस्थापक त्याविरोधात न्यायालयात देखील गेले आहेत. टीव्हीवरील तर जवळपास सर्वच चॅनल सरकारचीच वकिली करत असतात. लोकांची डोकी बथ्थड करायचा कारखाना जोरात सुरू आहेच ना. 😭अर्थात तिथे केवळ भक्त बळी पडतात.. मग त्याऐवजी असे केले तर...🙄 सरकारने सरसकट सर्व जनतेचं प्रोग्रामिंग केले तर.😬😬

आजपासून ५० वर्षापूर्वी एका शास्त्रज्ञाने मानवी मेंदूचे प्रोग्रामिंग करता येते असा दावा करून खळबळ उडवून दिली होती. केवळ मानवी मेंदू नाही तर प्राण्यांच्या मेंदूवर देखील त्याने अनेक यशस्वी प्रयोग केले होते. नैतिक अनैतिकची, मानवतेची व्याख्या बदलली, मानसिक रुग्णांवर उपचार करताना काहीसे अघोरी वाटणारे, वैज्ञानिक परिभाषेत बसतील असे अभिनव प्रयोग केले. मात्र सनसनाटी निर्माण करत असले तरी वैद्यकीय जगात त्याच्या प्रयोगांना जास्त महत्त्व देण्यात आले नाही, एका प्रयोगशील शास्त्रज्ञाची ही काहीशी शोकांतिकाच म्हणावी लागेल. तो शास्त्रज्ञ होता होजे मॅन्युएल रॉड्रिग्ज डेलगाडो. 

होजेचा जन्म ८ ऑगस्ट १९१५ रोजी स्पेनमधील रोंडा येथे झाला. वडील डोळ्याचे डॉक्टर होते, आणि होजेचे पण लहानपणी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत नेत्रतज्ञ बनण्याचे स्वप्न होते. मात्र एके दिवशी न्यूरोसायन्स शाखेचे जनक, नोबेल विजेते सँटियागो कहाल यांचे "मेंदूमधील गुपिते" विषयावरील भाषण ऐकायची संधी मिळाली. मेंदूमध्ये किती गमतीजमती आहेत, कित्येक आपल्याला माहीत आहेत आणि त्यापैकी किती जास्त आपल्याला माहित देखील नाहीत याची त्याला मजा वाटली. भाषणानंतर होजे त्यांना घरी जाऊन भेटला देखील आणि त्याच वेळी होजेने ठरवून टाकलं... हो.. जे काय व्हायचे ते होऊ दे, आपण मात्र मोठं झाल्यावर न्यूरोसर्जन बनायचं.❤️
१८ वर्षाचा होजे वैद्यकीय शिक्षण आणि शरीरविज्ञानशास्त्र यांचे घेण्यासाठी १९३३ मध्ये माद्रिद मेडिकल स्कूल मध्ये दाखल झाला, नेग्री गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्याच प्रयोगशाळेमध्ये त्याने हृदयाच्या स्नायूंवर संशोधन सुरू केले. वयाच्या १८व्या वर्षीच त्याचा पहिला शोधनिबंध सादर झाला. ही केवळ सुरुवात होती. पुढील आयुष्यात होजेचे ५०० पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. मात्र १९३६ मध्ये स्पेन मध्ये सैनिकी बंड झाले, जनरल फ्रॅंकोने हिटलर आणि  मुसोलिनी यांच्या मदतीने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षाच्या समर्थकांची धरपकड चालू केली. होजेचे मार्गदर्शक नेग्री गुरुजी जीव वाचवून देशाबाहेर पळून गेले. महाविद्यालय बंद पडले.😭

२१ वर्षीय होजने इथे टशन द्यायची ठरवली.✊🏾 त्याने या नागरी युद्धात फ्रॅंकोच्या विरुद्ध बाजूला उडी घेतली. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या रिपब्लिकन पक्षाचा समर्थक म्हणून आणि त्याच्या सैन्याचा एक डॉक्टर म्हणून होजेने सक्रिय सहभाग घेतला. मात्र फ्रॅंकोचे बंड यशस्वी झाले, फासीवादी सत्तेवर आले आणि बंडामध्ये साथ न देणार्‍यांना देशद्रोही ठरवण्यात आले. होजेला छळछावणीमध्ये पाठवण्यात आले. पाच महिने तिथे काढल्यानंतर त्याची सुटका झाली. तिथून बाहेर पडल्यावर होजेने आपले लक्ष्य राहिलेल्या अभ्यासाकडे वळवले. लवकरच १९४० मध्ये एमडी पदवी विशेष योग्यता श्रेणीत संपादन केली. आणि शरीरशास्त्राचा निदेशक म्हणून काम देखील सुरू केले. १९४२ मध्ये त्याने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देखील विशेष योग्यता श्रेणीत प्राप्त करून घेतली.
नंतरचा वेळ त्याने पूर्णतः प्राण्यांवरील संशोधनाला दिला. कुत्रा, मांजर आणि माकड यांच्यावर विद्युतलहरींचा काय परिणाम होतो यावर त्याचे संशोधन सुरू होते. यासाठी प्राणी विशेषतः माकडे मिळवण्यात त्याला अनेक अडचणी येत असत. एकदा तर त्याने आफ्रिकेमधून गोरीला आणला होता, त्यासाठी प्रवासामध्येच दोन आठवडे घालवले होते. पण गोरीलाशी त्याचे काही जमेना. गोरीलाभाऊने एवढा राडा घालायला सुरुवात केली (एवढा तर बजरंग दल वाले पण नाही घालणार😂) की त्याची रवानगी प्राणी संग्रहालयात करावी लागली. संशोधनासाठी त्याला तरुण पणीच १९४४ साली मौड पुरस्कार, १९४५ साली रोयेल पुरस्कार तर ज्यांना आदर्श मानत होता, त्यांच्या नावाचा "कहाल पुरस्कार" १९५२ साली मिळाला.❤️

डेलगाडोला १९४६ साली अमेरिकेतील येल विद्यापिठात पुढील संशोधनासाठी छात्रवृत्ति मिळाली. "लँड ऑफ अपॉर्च्युनिटी" त्याला बोलावत होती. 😍 अमेरिकेत येल विद्यापीठात त्याने पुढची ३५ वर्ष काढली. शरीरशास्त्र विभागप्रमुख डॉ. जॉन फल्टण यांची मर्जी संपादन करत १९५३ साली सहाय्यक प्राध्यापक, १९५५ साली सहयोगी प्राध्यापक तर १९६६ साली प्राध्यापक पदापर्यंत मजल मारली. ❤️ याच काळात विद्यापीठ कुलसचिवाच्या मुलीला प्रेमात पाडण्यात डेलगाडो यशस्वी झाला. ४१ वर्षाचा डेलगाडो आणि त्याची २२ वर्षाची बायको कॅरोलिन यांचा विवाह १९५६ साली संपन्न झाला. 😍 या जोडीच्या संसारात एक मुलगा आणि एक मुलगी यांची भर पडली.
फल्टण यांनी १९३५ साली चिंपाजीवर केलेले प्रयोग मानसशास्त्रात आमुलाग्र बदल करणारे होते. पिसाळलेल्या, वेड्या झालेल्या चिंपाजीला शांत करायचे असेल तर त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून मधला भाग काढून टाकायचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला होता. एड्गर मोनीझ या पोर्तुगीज शास्त्रज्ञाने हा प्रयोग शिकून घेऊन "लोबोटॉमी" नावाखाली मनोरुग्णांवर वापर करायला सुरुवात केली होती. 😱सदर प्रयोगांना प्रचंड यश येत असल्याचे मोनीझ जाहीर करत होता. यामुळेच त्याला १९४९ या वर्षीचे नोबेल पारितोषिक देखील देण्यात आले. 

याच काळात अमेरिकेतील वाॅट- फ्रीमन या शास्त्रज्ञांनी लोबोटॉमी करत दहा वर्षात जवळजवळ अडीच हजार मनोरुग्णांच्या कवट्या फोडून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. 😬मात्र हा अतिशय अघोरी प्रकार तर होताच पण त्या शिवाय त्याची शास्त्रीय पडताळणी झाली नव्हती. बरे झालेले रुग्ण दिवसभर एकाच दिशेत बघत बसलेले असत. मोनीझ किंवा वाॅट-फ्रीमन यांनी खोटी माहिती देऊन केवळ सवंग प्रसिद्धी मिळवली होती आणि अनेक रुग्णांच्या आयुष्याशी खेळले होते. मनोरुग्णालयाची अवस्था कारागृहापेक्षा वाईट असते केवळ याच कारणामुळे रुग्णाचे कुटुंबीय अशा अघोरी प्रयोगाला परवानगी देत असावेत. 😔
होजे डेलगाडो अमेरिकेत गेला तेव्हा या लोबोटॉमी प्रयोगावर बंदी आणण्याची मागणी १९४९ मध्ये मोनीज सोबतच नोबेल मिळालेला "हेस" आणि इतर न्यूरोसर्जनकडून येत होती. स्वीस शरीरविज्ञानशास्त्रज्ञ हेस हा प्राण्यांवर आणि त्यांच्या प्रतिसादावर नवनवीन प्रयोग करत होता. शेपूट हलवत आहे याचा अर्थ कुत्रा लाडीगोडी लावतोय, किंवा मांजर फीसकारत आहे याचा अर्थ ती चिडली आहे हे आपल्याला कोणी सांगितलं, मानवी स्वभावातील गुणदोषांची जोड त्यांना देणे योग्य असेल का यावर हेस संशोधन करत होता. मांजरांच्या मेंदुला वायर जोडून त्यांच्यामधून भूक राग आणि झोप यांसारख्या भावना काढून घेण्याचा हेसचा प्रयोग यशस्वी झाला होता.🙄

हेस म्हणायचा, मेंदूवर शस्त्रक्रिया करुन आतील भाग काढण्यापेक्षा मेंदूला नियंत्रित करता येईल अशी इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवली पाहिजे. डेलगाडोने हेसचा मार्ग निवडला. त्यात त्याचे संशोधन सुरू झाले, येल विद्यापीठात डेलगाडोचा लौकिक "टेक्निकल कीडा" म्हणून पसरू लागला. डेलगाडोने ध्वनी लहरीवर आधारित स्टिमोसिवर नावाचे उपकरण बनवले ज्याच्या साह्याने भावनांचा, संवेदनाचा आलेख काढणे, त्यांना नियंत्रित करणे शक्य झाले, याशिवाय त्याने केमोट्रोड्स नावाचे उपकरण बनवले जे मेंदूमध्ये कमी पडणाऱ्या रसायनाचा तुडवडा भरून काढेल. १९५२ मध्ये डेलगाडोने मनोरुग्णांवर इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करायला सुरुवात केली. 
स्थानिक मनोरुग्णालयात त्याची मागणी वाढली. बहुतेक रुग्ण स्किझोफ्रेनिक किंवा इपिलेपक्टिक(अपस्मार झालेले) होते. इथे उत्तेजकांचा वापर करताना प्रयोग फसायचे देखील. एक ३६ वर्षीय अपस्मार रुग्ण महिला जी दिवसभर शून्यात बघत बसायची, उत्तेजकांचा वापर केल्यावर तिच्या लैंगिक भावना जागृत झाल्या, आणि ती अश्लील बडबड करू लागली, संशोधक तरुणाशी चाळे करू लागली. एक अकरा वर्षाचा घुमा पोरगा अचानक नॉनस्टॉप गप्पा मारू लागला, आणि म्हणू लागला की त्याला मुलगी बनायचे आहे.

प्रचंड वेदना होत असतील तेथे डेलगाडोचे स्टिमोसिवर खूपच उपकारक ठरत होते. एका कारखान्यामध्ये कामगाराचा अपघात होऊन खूप मोठी जखम झाली होती. वेदनाशामकांचा मारा केला तरी वेदना दाद देत नव्हत्या. मात्र स्टिमोसिवरचा वापर करून त्याच्या वेदना आणि नैराश्य कमी करण्यात यश आले, आणि तो कामगार पुन्हा कामाला जायला लागला. नंतरच्या काळात डेलगाडोने जेवढे रुग्ण स्वीकारले त्यापेक्षा अनेक नाकारले देखील. प्रचंड वेदना असलेले रुग्ण असेल तरच तो स्वीकारायचा. अन्यथा त्याला माकडे, चिंपांजी, गिबन यांच्यावर संशोधन करायला आवडायचे. येल विद्यापीठ, बहामा आणि न्यू मेक्सिको येथे त्याचे प्रयोग सुरू असायचे.
माकडे मानवाचे अनुकरण लवकर का करत नाहीत यावर त्याचे प्रयोग सुरू होते. एका प्रयोगात एक माकड पिंजऱ्यातील इतर माकडांना खूप त्रास द्यायचे त्याला स्टिमोसिवर लावला. त्याचे बटन दाबले कि माकड शांत होणार. ते बटन पिंजऱ्यात असे ठेवण्यात आले की प्रयोग करणाऱ्या संशोधकाला देखील वापरता येईल. माकड चिडले की बटन दाबायचे मग माकड शांत. असे तीन-चार वेळा केल्यानंतर पिंजऱ्यातील माकडीनीला हे लक्षात आले. मग पुन्हा ते माकड चिडले की बटन दाबायला ती उत्साहाने पुढे यायची. " हुकुमशहावर हुकूमत मिळवण्याचे मानवाचे जुने स्वप्न किमान माकडांनी तरी इथे पूर्ण केले" असे डेलगाडो म्हणाला 😂
डेलगाडो जनावरांमधील हिंस्रतेच्या प्रेमातच पडला. जणूकाही त्याला व्यसनच लागले होते. त्याने १९६३ मध्ये स्पेनमधील प्रसिद्ध बैलझुंजीच्या प्रकारात स्वतःला उतरवायचे ठरवले. या प्रयोगाने डेलगाडोला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. या प्रयोगासाठी स्पॅनिश विद्यापीठाने निधी दिला होता तर एका संस्थेने चार बैल पुरवले होते. या चारही बैलांच्या मेंदूमध्ये स्टिमोसिवर बसवायचे काम डेलगाडो, त्याची बायको कॅरोलिना आणि इतर सहकारी तीन दिवस करत होते. झुंजीचे हौदात लाल फडका घेऊन डेलगाडो स्वतः उतरला. एक सांड देखील हौदात सोडण्यात आला. लाल रंग पाहून सांड उत्तेजित झाला आणि चालून आला. मात्र डेलगाडोपर्यंत पोचायच्या दोन पावले आधीच सांडाला नियंत्रित करण्यात आलं होतं😱 नियंत्रित केलं होतं केवळ एक बटन दाबून.
डेलगाडोच्या आयुष्यात प्रसिद्धी आणि खूप प्रसिद्धी हातात हात घालूनच आली होती. काही संशोधकांनी असा दावा केला की बैलाच्या मेंदूमध्ये बसवण्यात आलेली उपकरण नक्कीच शॉक देत असेल किंवा बलाचा उपयोग करत असेल, ज्यामुळे तो शांत होतो. बदनामी वाढत होती त्याचा फायदा घेऊन अनेक अनोळखी व्यक्ती दावा करायला लागले की डेलगाडोने त्यांच्या मेंदूमध्ये स्टिमोसिवर बसवला आहे. एक महिला जिला डेलगाडो भेटला देखील नव्हता तिने डेलगाडो आणि येल विद्यापीठावर दहा लाख डॉलरचा दावा ठोकला. टीकाकारांनी त्याला फॅसिस्ट विचारसरणीचा, आणि चेतातंत्रज्ञानाचा वापर ह्युमन प्रोग्रामिंगमध्ये करून मानवांना गुलाम करू पाहणारा सैतान अशी त्याची जोरदार बदनामी केली. 
मानवतेची नवी व्याख्या केली तेव्हा डेलगाडोच्या गाडीने ट्रॅक सोडला. मॅट्रिक्स किंवा टर्मिनल मॅन सारख्या चित्रपटात दाखवण्यात येणारा प्रोग्राम केलेला मारेकरी ही संकल्पना शक्य असल्याचे तो म्हणतो. केवळ एक बटण दाबून व्यक्तीच्या हास्य, क्रोध, भय, भूक, वासना, समाधान, लहरीपणा आणि इतर भावना जागृत करता येतील असा दावा तो करायचा. त्यात त्याच्या प्रकल्पाला अमेरिकेच्या नाविक आणि वायुदलाकडून निधी मिळत होता. फौजेला प्रोग्रामिंग केलेले सैनिक तर बनवायचे नाहीत ना?🙄 या प्रश्नाकडे संशयाने बघून डेलगाडो नक्कीच काहीतरी अनैतिक गोष्टी करत आहे यावर चर्चा सुरू झाल्या. (आपल्याकडे विचारवंतांचे खून झाले तेव्हा असेच, मात्र इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरता केवळ हिप्नॉटिझम द्वारे, प्रोग्रामिंग केलेलेे मारेकरी वापरले असावेत असा संशय शाम मानव यांनी व्यक्त केला होता.)
ज्ञानाला तुम्ही अडवू शकत नाही, त्यापेक्षा ज्ञानाचा चांगला वापर करा, नवीन तंत्रज्ञानाचा फायदा दहशतवाद्यांनी घेण्याऐवजी एक चांगला समाज घडविण्यासाठी आपण मिळून करूया. "कमीत कमी हिंसा करणारा आनंदी माणूस घडवणे म्हणजे मानवता" असे तो म्हणायचा. या "घडवणे" मध्ये त्यांच्या मेंदूमध्ये चीपचा वापर करून त्यांना सुसंस्कृत करणे अभिप्रेत असायचे. (भारी ना राव. सगळेच भक्त करून सोडायचे .. मग सकाळ संध्याकाळ रंगा बिल्लाची आरती..😂) मानवाचे एका छापाच्या गणपती करायच्या या संकल्पनेवर खूप गदारोळ झाला. नोबेल पारितोषिकाकडे डेलगाडोची सुरू असलेली वाटचाल इथेच रखडली.. नव्हे, त्याच्या पाऊलखुणा देखील नष्ट करण्यात आल्या. त्याने लिहिलेल्या लेखांचे आज कोणी संदर्भ घेताना क्वचितच आढळतो.😭

डेलगाडोचे नाव अघोषितपणे काळया यादीत समाविष्ट करण्यात आले. तसेच या प्रकल्पांना मिळणारा निधी थांबवण्यात आला. जोवर पैसा तोवर बैसा..😭 प्रकल्प रखडले, नोकरीमध्ये देखील निवृत्ती जवळ आलेली. मानवतेचा नवा प्रेषित बनायचे स्वप्न फसल्यावर आणि अमेरिकेत राहणे मुश्किल झाल्यावर डेलगाडोने १९७४ मध्ये सहकुटुंब स्पेनमध्ये यायचा निर्णय घेतला. अर्थात स्पेनमध्ये त्याचे जंगी स्वागत झाले. (भाऊचा अमेरिकेमध्ये बाजार उठला होता हे माहीत नव्हतं का या येड्यांना) येल विद्यापीठात मिळत असलेल्या सोईसुविधांपेक्षा भारी त्याला स्पेन सरकारने देऊ केल्या. मग भाऊला अजून काय पाहिजे.. 😂
स्पेनमध्ये परतल्यावर त्याने जरा सोज्वळ प्रयोग केले. त्याला त्याचे जुने प्रयोग अघोरी वाटायला लागले होते. मानवी मेंदूचे ऑपरेशन करून चीप टाकण्यापेक्षा विद्युतचुंबकीय प्रारणे निर्माण करणारे शिरस्त्राण (हेल्मेट रे भाऊ आपल्या भाषेत) तयार केले. त्याची चाचणी प्राणी, सहकारी, स्वतः आणि स्वतच्या मुलीवर केली. हवे तेव्हा झोपेची तंद्री मिळवणे, हवे तेव्हा जागता येणे यासाठी हे शिरस्त्राण उपयुक्त असल्याचा त्याने दावा केला. याशिवाय कंपवात (पार्किन्सन) मधील कंपावर देखील त्याने यशस्वी संशोधन केले. डेलगाडो कदाचित काळाच्या पुढे असावा कारण अपस्मार, कंपवात, लकवा, नैराश्य आणि इतर आजारांवर डेलगाडोची संकल्पना असलेली चीप उपयुक्त पडेल का यावर आज चाचपणी सुरू आहे.

डेलगाडो अतिशय हजरजबाबी होता आणि मिश्किल देखील. एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार पहिलाच प्रश्न केला की "डेलगाडो, तुम्ही आज आम्हाला काय सांगणार आहात?" डेलगाडोने उत्तर दिले, " माझ्या बायको आणि मुलांबद्दल तर निश्चित नाही, कारण ते विज्ञान नाहीत" लोक मेंदूची रचना समजून घ्यायला लोक अनुत्सुक का असतात असे विचारल्यावर ते म्हणाले, "मेंदूतील केमिकल लोच्यामुळे आपला जन्म झाला आहे, ही कल्पना लोकांना सहन होत नाही. 😂 किती ओंगळ कल्पना आहे ही, मला स्वतःला देखील आवडत नाही."

स्वतःला शांततावादी आणि उदारमतवादी मानणाऱ्या डेलगाडोवर फॅसिस्टचा शिक्का एकदा बसला तो बसलाच. "मानवाचा स्वतःच्या आनुवंशिक व्यक्तिमत्वावर काहीच अधिकार नाही" असे फॅसिस्ट वाटणारे विचार मांडणारा शास्त्रज्ञ त्याच्या तरुणपणात फॅसिस्ट शक्ती विरोधी दंड थोपटून उभा होता हे जग विसरले हीच त्याच्या आयुष्याची शोकांतिका. मधल्या काळामध्ये त्याचे संशोधन अगदीच रद्दी कसे ठरवण्यात आले...  आज ज्यांना न्यूरोसायन्स किंवा कृत्रिम प्रज्ञा या क्षेत्रामध्ये संशोधन करायचे आहे त्यांच्यासाठी डेलगाडो यांचे संशोधन मार्गदर्शकच ठरत आहे. जग आयुष्यावर वेडा समजत आले, असा हा शास्त्रज्ञ १५ सप्टेंबर २०११ रोजी वयाच्या ९७ व्या वर्षी मृत्यू पावला.
डेलगाडो महान होता की नाही, नैतिक की अनैतिक, मानवतावादी होता की फॅसिस्ट अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे आज मिळत नाहीत मात्र त्याच्या प्रयोगशीलतेला आणि कल्पनाशक्तीला कुणीतरी, कधीतरी दाद दिली पाहिजे असे वाटले म्हणून आजचा लेख. तू काळाच्या पुढे होता म्हणूनच बरे झाले. आज जगभरात अनेक देशांत हुकुमशहांचा उदय झालेला असताना जर तो असता तर कदाचित चीपद्वारे मानवी प्रोग्रामिंग चालू झाले असते. अर्थात काही वाट चुकलेल्या वैज्ञानिकांमुळे विज्ञान कधी पराभूत होत नसतं... आणि काही वाट चुकलेल्या नेत्यांमुळे मानवता मूल्यही पराभूत होत नसतं...

जय मानवता जय विज्ञान✊🏾

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव