ज्युलियन हक्सले : मानवतेचा प्रेमी ❤️

ज्युलियन हक्सले : मानवतेचा प्रेमी ❤️

सध्या उत्क्रांतीवादाला वाईट दिवस आले आहेत. शालेय अभ्यासक्रमातून त्याला वगळण्यासाठी सरकार आग्रही आहे. धर्माचे राजकारण करणाऱ्यांना उत्क्रांतीचे वावडे असणे स्वाभाविक आहे. कारण एकदा तुम्हाला उत्क्रांतीचे तत्व समजले की तुम्हाला कोणत्याही देव आणि धर्म संकल्पनेची गरज लागत नाही. सर्व मानवांचा पूर्वज एकच असल्याने वंश आणि प्रांतवादाच्या भिंती देखील गळून पडतात. उत्क्रांतीवाद आणि मानवतावाद यांना वेगळं काढता येत नाही. मानवता हेच जीवनासाठी आवश्यक सुंदर मूल्य समजत असलेला हा व्यक्ती इतर बंधने नाकारतो. आज आपण एका खानदानी उत्क्रांतीसमर्थकाची आणि मानवतावाद्याची ओळख करून घेणार आहोत. "खानदानी" यासाठी की आजोबा टी एच हक्सले यांनी देखील उत्क्रांतीचा हिरीरीने प्रचार केला आणि तोच वारसा ज्युलियन हक्सले यांनी देखील जपला.  

सर ज्युलियन साॅरेल हक्स्ले... एक शास्त्रज्ञ, एक लेखक, एक पक्षीनिरीक्षक, ऑस्कर विनिंग डॉक्युमेंट्री बनवणारा एक अवलिया.. एक युजीनिक्सवादी जो पुढील काळात मानवतावादी बनला, एक शिक्षणतज्ञ ज्याने प्राणिमात्रांच्या संवर्धनासाठी वर्ल्ड वाइल्ड फंडची स्थापना केली, अन् युद्धकाळात लोकांची पत्रे सेन्सॉर करणारा एक अधिकारी, जो पुढे जाऊन युनेस्कोचा संस्थापक संचालक बनतो, मात्र आपल्या नास्तिक विचारसरणीमुळे सहा वर्षासाठी असलेले पद त्याला दोनच वर्षे सोडावे लागते. व्यक्ती एकच.. पण त्याचे पैलू अनेक.
ज्युलियनचा जन्म २२ जून १८८७ रोजी इंग्लंडमधील सरे इथे एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबात झाला. हक्स्ले कुटुंबात विद्वत्ता भांडी घासत होती.(जरा नवीन, पाण्याची पाईपलाईन घरात आली असेल😁) ग्रीक भाषेचे प्राध्यापक, प्रसिद्ध चरित्रलेखक, तसेच स्वतःच्या प्रयोगशाळेत वनस्पतीवर प्रयोग करणारे लिओनार्ड हक्स्ले हे वडील. ते कॉर्नहिल मासिकात सातत्याने लिहायचे. तर आई ज्युलिया ही शिक्षणतज्ञ होती, जिने १९०२ मध्ये मुलींसाठी प्रायर फिल्ड स्कूलची स्थापना केली होती. लिओनार्ड-ज्युलिया यांना झालेल्या चार पोरांपैकी सर्वात थोरला ज्युलियन. जसे इंडियाचे इंडियन तसा ज्युलियाचा ज्युलियन😍

२० जून १८८७ रोजी राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारीहणाला पन्नास वर्ष पूर्ण झाली होती. या पन्नासाव्या वाढदिवस समारंभाला लिओनार्ड आणि त्यांचे वडील थॉमस उपस्थित होते. डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा पुरस्कार करणारे शास्त्रज्ञ थॉमस हक्स्ले हे आपल्या जूल्याचे आजोबा, डार्विन स्वतः त्यांना माझा सेनापती म्हणायचा, तर माध्यमांनी दिलेले "डार्विनचा बुलडॉग” हे विशेषण थॉमस कौतुकाने मिरवायचे. प्रसिद्ध रग्बी स्कूलचे मुख्याध्यापक. Agnostic (अज्ञेयवादी) हा शब्द देखील थॉमस हक्सले यांनीच दिला आहे. आस्तिक आणि नास्तिक याच्या मध्ये कुठेतरी असणारे अज्ञेयवादी. 🤔
थॉमस यांचा या नातवंडावर चांगला प्रभाव पडला, म्हणूनच ज्युलियन आणि त्याचा धाकटा सावत्र भाऊ अँड्र्यू दोघे जीवशास्त्राकडे वळले.अँड्र्यूने त्याच्या संशोधनासाठी नोबेल देखील मिळवले आहे. ज्युलियनचा जन्म त्याच्या ऑगस्टा वार्ड या मावशीच्या घरी झाला होता. ज्युलियाच्या माहेरी साहित्यिकांची परंपरा होती. ऑगस्टा वार्ड देखील प्रसिद्ध कादंबरीकार होती. ज्युलियनचा एक भाऊ अॅल्डस वडिलांप्रमाणे साहित्यिक झाला, नंतर त्याने हॉलिवूडमध्ये देखील खूप नाव कमावले आणि पैसा ही. पुढे जर्मनीमधून ज्यु  लोकांना बाहेर काढण्यासाठी, आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्याने या पैशाचा सढळ हाताने उपयोग केला होता.❤️

घरच्याच प्रयोगशाळेत वयाच्या चौथ्या वर्षापासून वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण करत आठव्या वर्षी ज्युलियन इतरांना माहिती देऊ शकेल एवढा जाणकार बनला. पक्षीनिरीक्षणाची एकही संधी तो सोडत नव्हता. हीच आवड जोपासत त्याने जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इटाॅन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. जीवशास्त्राचा अधिक अभ्यास करण्यासाठी जर्मन भाषेवर प्रभुत्व आवश्यक होते म्हणून त्याने जर्मन भाषा देखील शिकून घेतली होती. १९०६ मधील उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याने जर्मनीतील हायडेलबर्ग शहरात हान्स ड्रीष या शास्त्रज्ञांच्या हाताखाली उमेदवारी करून संशोधनाच्या मूलभूत गोष्टी शिकून घेतल्या. 
सुट्टी संपवून ज्युलियन ऑक्सफर्डमध्ये दाखल झाला. इथे त्याने कविता आणि जीवशास्त्र या परस्परविरोधी वाटणाऱ्या गोष्टींशी एकाच वेळी गट्टी केली. ऑक्सफर्डमधील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ठ लिखाणाला दर वर्षी "सर रॉजर न्यूडीगेट पारितोषिक" देण्यात येते. १९०८ मध्ये ते बक्षीस होलीरुड या दीर्घकवितेसाठी आपल्या ज्युलियन भाऊने पटकावले होते❤️ जीवशास्त्रमध्ये पहिल्या क्रमांकाचे गुण घेऊन तो १९०९ साली पदवीधर झाला.त्याला नेपल्स स्कॉलरशिप देखील मिळाली. प्रोटोझोआ आणि गर्भवाढशास्त्र हे त्याचे अभ्यासाचे विषय. १९०९ साली डार्विन जन्मशताब्दी आणि ओरिजिन ऑफ स्पेसीज प्रकाशित होऊन पन्नास वर्षे पूर्ण झाली त्याचे औचित्य साधून केंब्रिज विद्यापीठात कार्यक्रम आयोजित करण्यात जुलियनचा पुढाकार होता. 
छात्रवृत्तीचे एक वर्ष ज्युलियनने नेपल्स मरीन बायोलॉजिकल स्टेशन येथे समुद्रीपक्षांवर संशोधन केलं. १९१० मध्ये ज्युलियनची ऑक्सफर्ड विद्यापीठातच प्राणिशास्त्र आणि शरीरशास्त्र शिकवण्यासाठी नेमणूक झाली. तिथे त्याने लाल पायाचा बगळा आणि पाणबुड्या पक्ष्यावर संशोधन केले. पाणबुड्या पक्षात नर-मादी समानता पाहायला मिळते, आपण म्हणतो ना प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषामध्ये स्त्री. पाणबुड्या पक्षांमध्ये लक्षणीयरीत्या नर, मादी दोन्हीमध्ये नर मादी वृत्ती ५०-५० टक्के विभागलेली असते त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी दोघांची समसमान. ❤️ पाणबुडीवरील त्याच्या संशोधनपत्रिकेचे नंतर १९१४ मध्ये पुस्तकात रूपांतर झालं. त्यात ज्युलियनने अनेक पक्ष्यांच्या वर्तणुकीचा केलेला अभ्यास पुढे अनेक संशोधकांना उपयोगी पडला. 

१९०८ ते १९१८ हा काळ ज्युलियनसाठी भावनिकरीत्या खूप हार्ड गेला. १९०८ साली त्याची आई कर्करोगाने मृत्यू पावली. चार वर्षानंतर २५ वर्षाच्या जुलियनला २५ वर्षाची सावत्रआई आली. १९११ मध्ये बालमैत्रीण आणि आईची माजी विद्यार्थिनी कॅथलीनच्या तो प्रेमात पडला होता, मात्र दोनच वर्षात त्यांचं ब्रेकअप झालं. 😭 आणि ब्रेकअप के बाद आपल्या भाऊला नैराश्य आलं. उपचारासाठी मानसिक रुग्णालयात ठेवण्यात आलं. त्यातच छोटा भाऊ ट्रेवेनन याचादेखील प्रेमभंग झाला, त्याला नैराश्य एवढे आले की उपचारासाठी त्याच दवाखान्यात ठेवायला लागले, आणि तिथंच त्याने आत्महत्या देखील केली होती. आणि त्यात भरीस भर म्हणून १९१४ साली जेव्हा पहिलं महायुद्ध चालू झालं तेव्हा जुलियन जर्मनीमध्ये होता. 😬
प्रेमात सदैव अपयशी मात्र लग्नामध्ये ज्युलियन कमालीचा यशस्वी झाला. ज्युलिएट बय्यो (फ्रेंचमध्ये स्पेलिंग आणि उच्चार खूप वेगळे असतात) ही फ्रेंच वकील त्याची आयुष्याची साथीदार बनली. ज्युलियाचा मुलगा ज्युलियन आणि ज्युलियनची बायको ज्युलिएट.. भारी योगायोग आहे ना. १९१९ मध्ये त्याने ज्युलिएटशी लग्न केले. चंचल व्यक्तीच्या ज्युलियनचा संसार ज्युलिएटने खूप जबाबदारीने केला. ज्युलियनला लग्नाची बंधने मान्य नव्हती, त्याची अनेक प्रेमप्रकरणं चालूच राहिली.‌ मात्र प्रत्येक वेळेस हात पोळल्यावर तो पुन्हा ज्युलिएटकडे यायचा आणि ती बिचारी त्याला पदराखाली घ्यायची. तिने त्याला संशोधनामध्ये देखील मदत केली. या जोडीला अँथनी आणि फ्रांसिस अशी दोन गोंडस मुलं झाली. दोघंही पुढे जाऊन शास्त्रज्ञ बनले.‌❤️
१९१२ साली ज्युलियनला अमेरिकेत टेक्सास येथे विल्यम राईस विद्यापीठात प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून बोलावण्यात आलं. आणि त्याचा भाग म्हणून महायुद्धाच्या आधी काही महिने तो जर्मनीमध्ये तयारी करत होता. महायुद्ध सुरू झाले आणि त्याने पुन्हा अमेरीका गाठली. टेक्सासमध्ये त्याची पक्षीनिरीक्षणाची हौस चांगली भागत होती पण डिप्रेशन काही साथ सोडत नव्हतं. शेवटी वैतागून १९१६ पुन्हा इंग्लंडमध्ये आला. सेन्सॉर विभागात रुजू झाला. महत्त्वाच्या व्यक्तींचा झालेला पत्रव्यवहार तपासण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. खरं तर त्याला सैन्य एकच काम करायचं होतं पण मानसिक स्थिती नीट नसल्यामुळे त्याला तिथं नाकारण्यात आलं. १९१७ मध्ये त्याला सैन्याच्या इंटेलिजन्स विभागामध्ये काम करण्याची संधी मिळाली.
युद्ध संपलं, अन् ज्युलियनचं आयुष्य देखील बदललं. संसार सुरू झाला, आणि ऑक्सफर्डमध्ये प्राध्यापकी सुद्धा. युद्धामध्ये मनुष्यहानी भरपूर झाली होती, त्यात ऑक्सफर्डमध्ये ज्यांनी ज्युलियनला शिकवले होते ते स्मिथसर देखील मृत्यू पावले होते, त्यांच्या जागी ज्युलियनची नियुक्ती झाली. १९२७ पर्यंत त्याने पूर्ण वेळ प्राध्यापकी केली मात्र नंतर नोकरीचा राजीनामा देऊन  संशोधनाला वेळ द्यायचं ठरवलं.१९२७-१९३१ या काळात त्याने गेस्ट प्रोफेसर म्हणून सेवा दिली. प्राध्यापकी करताना त्याने कोनरॅड लरेन्झ सारख्या अनेक संशोधकांना मार्गदर्शन केलं. कोनरॅड लरेन्झने पुढे जाऊन १९७३ मध्ये नोबेल पारितोषिक पटकावलं.
१९२७ मध्ये त्याने त्याचा मित्र वेल्स याला विज्ञान विषयक संशोधन करेल आणि रोज किमान १००० शब्द लिखाण करेल असं वचन दिलं होतं. त्याचं फळ म्हणून दोन वर्षात "सायन्स ऑफ लाइफ" नावाचं पुस्तक तयार झाले. त्याचे "Religion without Revelation" हे पुस्तक प्रसिद्ध झाले ज्यामध्ये मानवाची उत्क्रांती कशी झाली, यासाठी कोणतीही दैवीशक्ती किंवा चमत्कार आवश्यक नाही याचा पुरस्कार केला. गॅनेट या समुद्रपक्षाच्या संपूर्ण जीवनाची माहिती देणारी डॉक्युमेंट्री त्याने बनवली, जिला १९३४ साली ऑस्कर अवार्ड मिळाले. ❤️
तिशीच्या दशकात त्याने खूप प्रवास केला. त्याने आफ्रिकेचा दौरा केला तेव्हा ट्सेट्से माशीवर संशोधन केलं, ही माशी चावली, की व्यक्तीची झोप उडून जायची. योग्य उपचार नाही केले तर मृत्यू देखील. 😬 आफ्रिकेत संशोधन करत असतानाच त्याची मानवतावादी आणि भूतदयेची भावना जागृत झाली. ज्याचे पर्यवसान पुढे युनेस्को आणि वर्ल्ड वाईड फंड स्थापन करण्यात झाली. १९४३ मध्ये पुन्हा आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना त्याला काविळीची लागण झाली, त्याचे पर्यवसन मानसिक आजार देखील झालं आणि पूर्णपणे बरं होण्यासाठी एक वर्ष द्यावं लागलं.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, १९४१ साली व्याख्यान देण्यासाठी ज्युलियन अमेरिकेमध्ये गेला होता. तेव्हा त्याने अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात सहभाग घ्यावा असे जाहीर व्याख्यानात मत व्यक्त केले होते. युद्ध करणाऱ्या दोन्ही पक्षांना शस्त्रं पुरवून गब्बर श्रीमंत होणाऱ्या अमेरिकेमध्ये जणू वादळ उठले, प्रचंड टीका झाली. मात्र त्यानंतर काही आठवड्यातच पर्ल हार्बरवर जपानने हल्ला केला आणि नाईलाजाने का होईना, अमेरिकेला उतरावं लागलं. पण ज्युलियनबद्दल त्यांची अढी राहीली ती कायमचीच.‌ 😭
युनेस्कोमध्ये त्यांना पहिलं संचालकपद देण्यात आले, याच्या मिरच्या अमेरिकेला झोंबल्या होत्या. युनेस्कोची घटना लिहिण्यापासून संस्था स्थापन करेपर्यंत ज्युलियन यांचाच मोठा वाटा होता. मात्र १९३१ साली रशियन दौऱ्यावर असताना त्याने स्टॅलिनची स्तुती केली होती. एवढी बाब आग लागण्यासाठी पुरेशी होती. नाकाने कांदे सोडणाऱ्या अमेरिकेत ज्युलियनचे नास्तिक असणे अधोरेखित करून टीकेची झोड उठवली गेली. त्यामुळे सहा वर्षासाठी पद असले तरी ज्युलियन हक्सले यांना दोन वर्षातच पायउतार व्हावे लागले.😬

विसाव्या शतकातील इतर जीवशास्त्रज्ञांप्रमाणे हक्सले देखील सुरुवातीला युजीनिक्सचे समर्थन करायचे. चांगल्यात चांगली गुणसूत्रे पुढच्या पिढीत संक्रमित होऊन अधिकाधिक चांगला मानववंश तयार व्हावा अशी त्यामागची प्रामाणिक भूमिका. पण युजीनिक्सच्या नावाखाली नाझी जर्मनीने केलेले भयंकर प्रयोग पाहता त्यांनी पुढील आयुष्यात मानवतावाद आणि ट्रान्सह्युमॅनीज्म स्वीकारला. ट्रान्सह्युमॅनीज्म म्हणजे तंत्रज्ञानाने मानवी जीवनावर केलेले अतिक्रमण टाळण्यासाठी उभारलेली चळवळ. अणुशक्ती किंवा रासायनिक बॉम्ब द्वारे मानवी जीवनाला केलेला धोका असो, स्वयंचलनामुळे रोजगाराला निर्माण झालेला धोका असो किंवा कृत्रिम प्रज्ञेमुळे मानवी बुद्धीवर झालेले अतिक्रमण... या सर्वाविरुद्ध आवाज उठवणारी चळवळ. 
१९७३ साली मानवतेच्या जाहीरनाम्यावर सही करण्यात हक्सले आघाडीवर होते. हक्सले यांचा मानवतावाद आंतरराष्ट्रीय सीमांच्या पलीकडचा होता. लायसेंको या रशियन "राजकीय" शास्त्रज्ञाने लामार्किझम नावाखाली उत्क्रांतीचा चुकीचा अर्थ काढून, इतर शास्त्रज्ञांचा छळ चालवला होता, अनेक शास्त्रज्ञांना नोकरीवरून कमी केले होते, काही तर कैदेमध्ये टाकले होते. तसेच याच्या घोडचुकीमुळे रशियामध्ये तीव्र अन्नटंचाई निर्माण होणार होती. त्याबद्दल आवाज उठवण्याचे, पुस्तक लिहून लामार्किझम मधील दावे खोडून काढण्याचे काम हक्सले यांनी केले. उत्क्रांतीचे समर्थन करतो म्हणून या चार्डीन या विचारवंताला फ्रान्समधील चर्चमध्ये दुजाभाव करण्यात येत होता, मात्र स्वतः नास्तिक असला तरी चार्डीनच्या मदतीला हक्सले धावून गेले.

ज्युलियन हक्सले यांनी आपल्या आयुष्यात उत्क्रांती, जीवशास्त्र मानवतावाद या विषयांवर विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. मात्र त्यांची देव आणि धर्म यांची चिकित्सा करणारी काही वाक्य अतिशय प्रसिद्ध झाली. उदा. "ज्या बाबतीत पुरावा नाही, त्याबाबत आपण अज्ञेयवादी असले पाहिजे." किंवा "काहीही नसण्याच्या पूर्वी तेथे काहीतरी होते या कल्पनेपेक्षा काहीतरी असण्यापूर्वी तेथे काहीच नव्हते ही कल्पना जास्त रास्त नाही का" तसंच "लोक म्हणतात की उत्क्रांती सिद्धांत देव आणि धर्म संकल्पना मोडीत काढतील, आणि जगभर अनैतिकतेचे राज्य माजेल, हे खरे नाही. पण नवे पीक काढण्यासाठी आधीच्या धसाटीवर नांगर फिरवावाच लागतो."
ते म्हणतात, "आज जगाला मानवता तत्वावर आधारित एका नव्या धर्माची गरज आहे असे मला प्रकर्षाने जाणवते. मी धर्म म्हणतो त्यामध्ये कोणताही देव किंवा शक्ती अभिप्रेत नाही, त्यामध्ये केवळ नैतिकता आणि विज्ञान अभिप्रेत आहे. याच प्रकारचा धर्म सर्व मानवजातीला आवडेल देखील आणि परवडेल देखील." ते अज्ञेयवादासंदर्भात एक गॊष्ट सांगतात: एका अंधार्‍या खोलीमध्ये एका तत्त्वज्ञानी आणि एका ब्रह्मज्ञानी व्यक्तीला काळे मांजर शोधायला सांगितले. खरेतर खोलीत मांजर नव्हतेच. दोघेजण शोधून थकले तेव्हा तत्त्वज्ञानी म्हणतो, " खोलीमध्ये काळे मांजर असेलही, नसेलही, पण ब्रह्मज्ञानी माणसाला नक्की सापडेल😄"

हक्सले म्हणायचे "एकदा का तुम्ही जीवसृष्टीशी नाते जोडले, मग जगात तुम्ही कोठेही असा, तुम्ही एकटे कधीच नसणार, तुमच्याभोवती तुमच्या गणगोतांचा गराडा असणारच." आयुष्यात त्यांनी मानवांशी आणि सृष्टीतील सर्व घटकांशी आपली मैत्री जीवापाड जपली. मानवतेच्या प्रश्नासाठी प्रसंगी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. अगदी मृत्यूच्या काही महिने आधी, इस्रायलवर बहिष्कार टाकला म्हणून ज्या संस्थेची स्थापना स्वतः केली होती, त्या युनेस्कोवर कठोर शब्दात त्यांनी टीका केली होती. मानवतेवर प्रेम करणारा असा हा प्रेमवेडा १४ फेब्रुवारी १९७५ म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हे जग सोडून गेला. 
त्यांना आयुष्यभर अनेक सन्मान मिळाले, मोठमोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली, सोप्या भाषेत विज्ञान समजून सांगितले, विज्ञान लोकप्रिय केले म्हणून त्यांना युनेस्कोचे कलिंगा पारितोषिक मिळाले, १९५८ साली त्यांना सर पदवीने गौरवण्यात आले. अनेक विद्यापिठांच्या मानद पदव्या मिळाल्या, रॉयल सोसायटीचे डार्विन पदक देखील मिळाले. पण मगाशी म्हटलं तसं प्रेमाच्या बाबतीत हक्सले अपयशीच.😔 मानवतेवरचे त्याचे प्रेम आणि प्रयत्न हे निष्फळ होताना दिसते आहे. जगाच्या सर्वच भागांमध्ये धर्मवादी शक्ती प्रबळ होताना दिसत आहेत. 

खरंच विज्ञानाचा प्रसार होतो तेव्हा धर्म कालबाह्य होणारं, अधिक लोक नास्तीक होणारं. व्यक्ती नास्तिक म्हणून जगायला लागतो, ज्याचा धोका पंडित, पाद्री, मुल्ला यांच्या दुकानांना होतो म्हणूनच उत्क्रांतीचे सूत्र मांडणाऱ्या शास्त्रज्ञांना धर्म विरोध करत आला आहे. तरुण पिढीने ही मेख ओळखली पाहिजे. आजची तरुण पिढी जात, धर्म, वंश, प्रांत यासारख्या अर्थहीन बाबींवर चर्चा करणार आहे की तिच्या बोलण्यात नॅनोटेक्नॉलॉजी, सायबरनेटीक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, जेनेटिक इंजीनियरिंग, ट्रान्सहयुमॅनीस्म यासारखे विषय येणारं, यावरच या देशाचे, या जगाचे आणि मानवतेचे भवितव्य अवलंबून असणारं आहे.

जय विज्ञान जय मानवता✊🏾

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव