बार्बरा लोव्ह : आदर्श शिष्या, आदर्श गुरू आणि संशोधक

बार्बरा लोव्ह : आदर्श शिष्या, आदर्श गुरू आणि संशोधक

ऑक्सफर्डमध्ये एका प्राध्यापिकेचे नेमणूक झाली मात्र तिने केवळ मुलींना शिकवायचे होते. मुलांना शिकवायला मनाई केली होती. त्या प्राध्यापिकेने या अपमानाकडे संधी म्हणून पाहिली आणि महिला शास्त्रज्ञांची मोठी फळी उभी केली. आपल्या गुरूचा वसा चालवत त्यातील एक शिष्येने हीच चळवळ अमेरिकेत सुरू केली. मूलभूत संशोधनात तर या गुरुशिष्येचे बहुमूल्य योगदान आहेच पण विज्ञानातील पुरुषसत्ताक यंत्रणेला आव्हान देत महिला शास्त्रज्ञांची फळी निर्माण करण्याचे देखील त्यांना निर्विवाद श्रेय जाते. यातील गुरू होती डोरोथी हॉजकिन तर शिष्या होती बार्बरा लोव्ह.

बार्बराचा जन्म इंग्लंडमधील लँकॅस्टर येथे २३ मार्च १९२० रोजी झाला. मॅथ्यू लोव्ह आणि मेरी जेन व्हार्टन या किराणा मालाचे दुकान चालवणाऱ्या दाम्पत्याच्या दोन मुलींपैकी बार्बरा ही मोठी. मार्जोरी तिची छोटी बहिण. घरची परिस्थिती तशी बेताचीच, त्यामुळे कोणतीही गोष्ट मागितली की लगेच मिळाली नाहीच, त्यासाठी वाट पहावी लागायची, संयम ठेवायला लागायचा. हीच बाब तिला संशोधनात देखील उपयोगी पडली. गरीबीची जाणीव असल्यामुळेच, तिने पुढे आयुष्यात अनेक गरीब विद्यार्थिनींना मदत देखील केली. प्रसंगी अगदी त्यांना स्वत:च्या घरात देखील ठेऊन घेतले.😍

ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील 'महिलांसाठी खास' म्हणून प्रसिद्धीझोतात आलेल्या समर्विल्ले महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेण्यासाठी बार्बरा १९३९ साली दाखल झाली. डोरोथी हॉजकिन तिला मार्गदर्शक म्हणून लाभली. डोरोथीचे प्रथिनांवर संशोधन सुरू होते, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा सर्व विद्यार्थिनींना होत होता, मदत करता करता सर्व शिकायला मिळत होते. यथावकाश  बार्बराने १९४३ मध्ये पदवी, १९४६ मध्ये पदव्युत्तर तर १९४८ मध्ये पीएचडी देखील याच ठिकाणी पूर्ण केली. बार्बराची हुशारी आणि चिकाटी डोरोथीच्या खूपच लवकर लक्षात आली होती म्हणूनच पदवी पूर्ण व्हायच्या आधीच डोरोथीने तिला स्फटिकशास्त्र विभागात संशोधन सहाय्यक म्हणून ठेवून घेतले. आणि पेनिसिलीन प्रकल्पात काम करायला सांगितले. 
पदवीदेखील पूर्ण नाही, अशा अवस्थेत एवढी मोठी जबाबदारी पाहून बार्बरा काहीशी हबकली. डोरोथीने सोपवलेल्या जबाबदारीबद्दल बार्बरा म्हणते," लोकांना खोल समुद्रामध्ये फेकायला तिला आवडत असावं,😂 ती तुम्हाला अशा स्फटिकासोबत काम करायला सांगते जे केवळ मायक्रोस्कोपच्या सर्वोच्च क्षमतेवर दिसू शकतात. मला तो क्षण कायम लक्षात राहील जेव्हा मला काचेच्या एका छोट्या तुकड्यावर असलेल्या रेझिनच्या एका छोट्या स्फटिकासोबत काम करायला सांगितले."

पेनिसिलीनचा शोध जरी १९२८ मध्ये लागला असला तरी त्याचा मनुष्यावर वापर होण्यास नुकतीच सुरुवात झाली होती. मात्र आलेल्या निष्कर्षांनी अतिशय आशादायी चित्र उभे केले होते, पेनिसिलीन ही संजीवनी ठरणार होती.पूर्वी साध्या जखमांनी प्रसंगी लोकांचे जीव जात होते, त्यावर प्रतिजैविके उपाय बनून आली होती. दुसऱ्या महायुद्धाचे लोन तेव्हा संपूर्ण युरोपमध्ये पसरले होते. महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर पेनिसिलिनची प्रचंड गरज होती.पेनिसिलिन शुद्ध स्वरूपात मिळवणे अन् त्यासाठी त्यावर तातडीने अधिक संशोधन होणे गरजेचे होते. 

स्फटिकीकरणाचे काम तसे खूपच किचकट. छोट्या नलिकेमध्ये वापरण्याजोगे स्फटिक तयार करण्यासाठी तासनतास निष्फळ वाया घालवावे लागायचे.आणि पेनिसिलीनचा रेणु हा त्या काळात माहीत असलेला सर्वात मोठा रेणू होता, शिवाय स्फटिकीकरण प्रक्रियेमध्ये तो साथ देखील देत नव्हता. थोडक्‍यात कामही अवघड आणि त्यात ते लवकर पूर्ण व्हावे अशी सगळ्यांची अपेक्षा. पण चांगल्या खेळाडूची कामगिरी दबावाच्या प्रसंगी अधिक सुधारते अगदी तसेच बार्बराबाबत झाले.🤗

स्फटिकाला एक्सरे बीममध्ये ठेवून त्याचे विविध अंगाने पुन्हा पुन्हा फोटो काढणे आणि त्याची निरीक्षणे गणितीय सूत्रांमध्ये टाकून पुन्हा पुन्हा तेच विश्लेषण स्पष्ट होत आहे का हे तपासणे, असे वेळखाऊ काम होते. कामाची गती वाढविण्यासाठी संगणकाचा वापर करण्यात आला. तेव्हा संगणक देखील खूप प्राथमिक अवस्थेत होते पंच कार्डचा वापर त्यांना माहिती पुरवण्यासाठी केला जायचा. आणि संगणक दिवसा उपलब्ध देखील नसायचा. दिवसा त्याचा वापर सागरी वाहतुकीच्या नियोजनासाठी केला जायचा. त्यामुळे संगणकाकडून पेनिसिलीन रेणूमधील अणूंची स्थिती समजून घेताना बार्बराला रात्रपाळी करायला लागायची.😞
रात्रंदिवस केलेल्या तिच्या प्रयत्नाला यश आले. "एक जबरदस्त खबर", बार्बरा डोरोथीला म्हणाली,"पेनिसिलीन आणि त्याची सर्व दुय्यम उत्पादने यांच्यामध्ये गंधक सापडले, मोठे गुपित उघड झाले"  १९४५ मध्ये डोरोथी, बार्बरा आणि सहकार्‍यांना पेनिसिलिनची रेण्वीय रचना उलगडण्यात यश आले. मात्र युद्धकाळातील गुप्तता विषयकनियम तसेच युद्धानंतर त्यातील व्यावसायिक बाबी यामुळे हे संशोधन खूप उशिरा... १९४९ साली प्रसिद्ध झाले. त्यानंतर पेनिसिलिनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येणे शक्य झाले आणि गंधकाचा वापर इतर प्रतिजैविकांमध्ये देखील केला गेला. 👍

युद्ध संपण्याआधी जर हे प्रसिद्ध झाले असते तर नक्कीच मोठ्या आमूलाग्र संशोधनात याचे नाव नोंदवले गेले असते. आणि बी१२ साठी डोरोथीला मिळालेले नोबेल कदाचित या शोधासाठीच मिळाले असते आणि सोबत बार्बराला देखील.  त्यावेळेस कदाचित अमेरिकेने तिचे पायघड्या घालून स्वागत केले असते. मात्र त्याआधी साम्यवादी असल्याच्या संशयावरून बार्बराचा अमेरिकेने खूप वेळा विसा नाकारला होता. १९५० साली तिला विसा मिळाला त्याच वर्षी तिने जे ई बुडका या अमेरिकन जीवरसायन शास्त्रज्ञाशी लग्न देखील केले. १९५६ साली अमेरिकेने तिला आपले पूर्ण नागरिकत्व दिले. 
 
बार्बरा मानवतावादी होती, जगात कुठेच युद्ध नाही झाले पाहिजे याबद्दल उघडपणे बोलायची. महायुद्ध संपल्यानंतर  बार्बराने पोलीश भाषा शिकून घेऊन युद्धात उध्वस्त झालेल्या पोलंडमध्ये मदतकार्य देखील केले होते. मात्र त्यामुळेच तिच्यावर डाव्या विचारांची समर्थक असा शिक्का बसला गेला. बार्बरा साम्यवादी आहे असा ग्रह करून बार्बराशी तिची सहाध्यायी मार्गारेट रॉबर्ट्स देखील कडकडून भांडली होती. हीच मार्गारेट रॉबर्ट्स भविष्यात मार्गारेट थॅचर आणि  इंग्लंडची पंतप्रधान बनली.😌

पीएचडी करून अमेरिकेमध्ये आलेल्या बार्बराने कॅलटेक मध्ये पाऊलिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट डॉक्टरल काम सुरू केले. १९५० ते १९५६ या काळात तिने हार्वर्ड विद्यापीठात जीवभौतिकी रसायनशास्त्राची सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. १९५६ साली तिला सहयोगी प्राध्यापक म्हणून कोलंबिया विद्यापीठात संधी मिळाली, १९६६ साली तीची प्राध्यापक पदावर बढती झाली. १९९० साली निवृत्त होईपर्यंत ती या पदावर होती, तसेच २०१३ सालापर्यंत, वयाच्या ९३ व्या वर्षी सुद्धा ती विशेष व्याख्याता म्हणून या विद्यापीठात आपले योगदान देत होती. ❤️
या प्रदीर्घ कालावधीमध्ये तिने  प्रोटिन्स, इन्सुलीन, अल्बुमिन यासोबतच तिने न्युरोटॉक्सीन विषयावर अतिशय मौलिक संशोधन केले आहे. प्रोटिन्समध्ये असलेले π हेलिक्स तिनेच शोधून काढले. तिचे मार्गदर्शक पाऊलिंग यांच्यासोबत याबाबत तिचे मतभेद देखील झाले होते.  π हेलिक्स ही अल्फा हेलिक्स प्रमाणे काही प्रोटिन्समध्ये आढळणारी संरचना आहे. अल्फा हेलिक्स संरचनेचा शोध लावणारे पाऊलिंग यांना काही प्रोटिन्स यामध्ये अपवाद असल्याचे समजले होते, मात्र तिथे छोट्या आकाराचे π हेलिक्स असेल असे त्यांना वाटले नव्हते.😞 

मात्र १५ टक्के पेक्षा जास्त प्रथिनात π हेलिक्स हीच संरचना असते हे बार्बराने पुढे आणले. बार्बराच्या शोधाची बातमी प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी π हेलिक्स ही संकल्पना सपशेल नाकारली, मात्र जेव्हा त्यांना समजले की आपण समजतो त्याप्रमाणे  π हेलिक्स हे अल्फा हेलिक्स आणि गॅमा हेलिक्स यांच्या "मधले काहीतरी" नाही, त्यावेळी त्यांनी आपली चूक कबूल करत बार्बरा यांच्या संशोधनाकडे दुर्लक्ष झाल्याचे मान्य केले. दोघांचेही संशोधन योग्य होते. अर्थात या प्रसंगानंतर त्या दोघांमध्ये बिलकुल कटुता आली नाही.😍
न्यूरोटॉक्सीनवर केलेले काम हे देखील खूप उल्लेखनीय. प्रशांत महासागरात आढळून येणाऱ्या अतिविषारी समुद्र सापांमध्ये असलेल्या विषावर प्रतिविष शोधून काढण्यात बार्बराचे योगदान महत्वाचे आहे. दंशानंतर या सापाचे विष रक्तात भिनले की सजीवाच्या चेतासंस्थेवर हल्ला करत असते. यामध्ये त्या सजीवाचा मृत्यू हमखास ठरलेलाच. या विषामध्ये असणाऱ्या घटकांची त्रिमितीय रचना बार्बराने शोधून काढल्याने त्यावर उपाय करणे शक्य झाले आहे. ✊

संशोधनाशिवाय तिने महिला शास्त्रज्ञांना जे प्रोत्साहन दिले ते काम देखील खूपच महत्वाचे आहे. ऑक्सफर्डमध्ये तिने डोरोथीवर झालेला अन्याय पाहिला होता. अमेरिकेमध्ये ती साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झालेली असताना एका बैठकीसाठी हजर राहिली होती. मात्र तिने सभागृहात पाऊल ठेवताच बाकीच्या प्राध्यापकांनी तिचे "चहावाली, आता लगेच नको येऊस" असे स्वागत केले. त्यांना वाटले होते चहावाली बाई आली, एक महिला प्राध्यापिका असेल असे त्यांना वाटले नव्हते. हा अपमान तेव्हा तिने गिळला, मात्र त्याचा बदला तिने पुढील आयुष्यातील कृतीतून घेतला. ✊
महिला आणि वांशिक अल्पसंख्यांक यांच्यासाठी संशोधन क्षेत्रे खुली करण्यासाठी तिने जीवनभर प्रयत्न केले. तिच्या प्रयोगशाळेमध्ये अधिकाधिक महिलांना नोकरीची तसेच संशोधनाची संधी दिली. कोलंबिया विद्यापीठाच्या सकारात्मक कृती समितीच्या माध्यमातून तिने अतिशय हिरीरीनेण समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. केवळ संशोधनासाठी नाही तर "या विविधतेची पाईक" म्हणून मला ओळखावे अशी तिची इच्छा तिने अनेक वेळा व्यक्त केली होती. 

आज जरी नोबेलसारख्या मोठ्या पुरस्कारांवर तिचे नाव नसले तरी देखील तिच्या इच्छेप्रमाणे विविधतेची पाईक म्हणून तिची ओळख कायम आहे. ९८ वर्षांचे अनुभव संपन्न आयुष्य जगून १० जानेवारी २०१९ तिचा मृत्यू झाला. डोरोथीने लावलेल्या रोपट्याचे तिने मोठ्या वृक्षात रूपांतर केले.. आज त्या वृक्षाला रसदार फळे आली आहेत. मानवतेचा तिचा ध्यास घेऊन आपण जगणे हीच तिला आदरांजली असेल. 

जय समता जय विज्ञान✊🏾
#richyabhau

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव