दर्शन रंगनाथन : चाकोरीबाहेरची शास्त्रज्ञ

दर्शन रंगनाथन : चाकोरीबाहेरची शास्त्रज्ञ

काल आपण दोन आंतरराष्ट्रीय महिला शास्त्रज्ञांची माहिती घेतली, आज महिला दिना निमित्त भारतीय शास्त्रज्ञेची ओळख करून घेऊ. आपल्याकडे एक गमतीशीर विरोधाभास दिसून येतो. ज्या महिला वैज्ञानिक दृष्टिकोनापासून खूप दूर असतात, त्यांनी सणासुदीला नटणे आणि लग्नसमारंभात शोभेची बाहुली बनून मिरवणे यामध्ये त्यांच्या  आयुष्याला मर्यादित करून घेतलेले असते, आणि त्यावेळी स्त्रीमुक्तीच्या घोषणा करणारे किंवा स्त्रीवादी असलेल्या कार्यकर्त्या "साधी राहणी दाखवण्याच्या" प्रयत्नात एक पोशाखी व्यक्तिमत्व बनून वावरतात. पुरुष कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना देखील हे लागू होते. टागोरांसारखा गेटअप केला म्हणून तुम्हाला कोणी गुरुदेव म्हणत नसतं, तसेच केवळ मफलर गुंडाळला म्हणून तुम्हाला कोण "चळवळ्या" समजत नसतं. आपली ओळख केवळ पोशाखापूरती मर्यादित न राहता आपल्या कामातून व्हावी.  

शास्त्रज्ञ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं.. केस वाढलेला, कपडे अस्ताव्यस्त असलेला, जगाचे भान असलेला अवलिया, मात्र शास्त्रज्ञ महिला असेल तर थोडेसे छान, केस व्यवस्थित कापलेले, छान कपडे घातलेले, डोळ्याला चष्मा लावलेला अशी प्रतिमा उभी राहते. पण ती महिला शास्त्रज्ञ भारतीय असेल तर.😬 खरं सांगायचं तर एकतर भारतीय महिला शास्त्रज्ञ असणे ही संकल्पनाच पचनी पडत नाही, असे काही पाहायची डोळ्यांना सवयच नाही. पण एक शास्त्रज्ञ होऊन गेली, मस्तपैकी कांजीवरम साडी नेसून, मोठी टिकली, अंबाडा अशा साग्रसंगीत पोषाखामध्ये संशोधन करायची. तिला एक जर्मन शास्त्रज्ञ म्हणाला देखील की तुम्ही अगदी भारतीय देवीप्रमाणे दिसता. त्याला भारतीय देवीचे दर्शन घडवणारी शास्त्रज्ञा.. दर्शन रंगनाथन.
दर्शनचा जन्म दिल्लीमधील करोलबाग येथे ४ जून १९४१ रोजी झाला. ४ जूनशी त्यांचे नाते विलक्षणच, कारण पुढे लग्न आणि मृत्यू देखील ४ जूनलाच. शांतिस्वरूप आणि विद्यावती मार्कन या दांपत्याचे हे तिसरे अपत्य. सुखवस्तू घरात अभ्यासाला पोषक वातावरण होते, त्यात दर्शना मुळचीच हुशार मुलगी. संगीत आणि नृत्याची आवड होतीच यासोबत अभ्यासात आणि खोड्या काढण्यात देखील कायम आघाडीवर. वयाच्या पाचव्या वर्षी तिला आर्यसमाजी मुलींच्या प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले. तिथे शाळेत धमाल करत असताना तिने पहिला नंबर सोडला नाही. ❤️

दहाव्या वर्षी तिचे दिल्लीमधीलच इंद्रप्रस्थ उच्च माध्यमिक शाळा इथे माध्यमिक शिक्षण सुरू झालं. त्याच काळात तिला एस. व्ही. एल रतन हे शिक्षक लाभले ज्यांनी तिची रसायनशास्त्रातील गोडी वाढवली. पुढे दिल्ली युनिव्हर्सिटीतून रसायनशास्त्रामध्ये पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून तिथूनच १९६७ साली डॉ. शेषाद्री यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी देखील पूर्ण केली. पीएचडी सुरू असतानाच मिरांडा महाविद्यालयात रसायनशास्त्र शिकवण्याचे काम देखील केले. डॉ. दर्शन मार्कन यांना संशोधक म्हणून जीवनभरातील कारकीर्दीत अनेक फेलोशिप मिळाल्या. Phd नंतर रॉयल कमिशन फॉर द एक्झिबिशनकडून त्यांना पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी फेलोशिप मिळाली आणि संशोधनासाठी त्या लंडनला रवाना झाल्या.

लंडनमधील इम्पीरिअल कॉलेजमध्ये डॉ. बार्टन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे संशोधन सुरू झाले. फणसामधील सायक्लोआर्टेनॉल या संयुगाचा अभ्यास त्यांना करायचा होता. या संयुगाच्या रचनेबाबत सैद्धांतिक पातळीवर डॉ. दर्शनचे मार्गदर्शक डॉ. बार्टनबरोबर मतभेद झाले. आता यावर उपाय काय. प्रात्यक्षिकच करावे लागणार. आणि त्यात एक छोटीशी अडचण होती, लंडनमध्ये फणस उपलब्ध नव्हता. दर्शनने आईला सांगून भारतामधून सुकवलेल्या अवस्थेतील फणस मागून घेतला. आणि त्या सुकलेल्या फणसाचे भाग्य उजाडून त्याला विमान प्रवास घडला. 🤣
लंडनमध्ये असताना मिळालेल्या वेळाचा आणि शिष्यवृत्तीचा त्यांनी अगदी पुरेपूर उपयोग केला. स्टेरॉइडमधील प्रकाशरासायनिक क्रियांचा अभ्यास केला, इमिडाझोल या बुरशीनाशक प्रतिजैविकाच्या पुनरुत्पादनासाठी नवीन नियमावली बनवली. याशिवाय प्रोटीन फोल्डिंगचा अभ्यास केला. प्रथिनांच्या साखळ्या तयार होऊन त्यातून त्रिमितीय रचना तयार होण्याची क्रिया म्हणजे प्रोटीन फोल्डिंग. तसेच विद्युतचुंबकीय बंधांद्वारे रेणू एकमेकांशी जोडले जाऊन तयार होणाऱ्या सुपरमॉलेक्यूल संरचनेचादेखील त्यांनी अभ्यास केला. दोन वर्षातील समृध्द अनुभव घेऊन १९६९ साली त्या भारतात परत आल्या.

भारतामध्ये एका परिसंवादात त्यांची भेट रंगा नावाने प्रसिद्ध असलेल्या शास्त्रज्ञ सुब्रमनिया रंगनाथन यांच्याशी झाली. रंगा यांनी जीवरसायनशास्त्रात  अमेरिकेतून पीएचडी आणि पोस्ट डॉक्टरल संशोधन करून आयआयटी कानपूर येथे अध्यापनाची नोकरी स्वीकारली होती. लवकरच ओळखीचे रूपांतर मने जुळण्यात झाली आणि काही महिन्यांनी सुब्रमनिया यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली. ४ जून १९७० रोजी दोघांचा विवाह संपन्न झाला. रंगांच्या रंगात न्हाताना १९७२ साली त्यांचा संसार आनंदाने फुलला. आज या दाम्पत्याचा मुलगा आनंद देखील संशोधनात कार्यरत आहे.😍
लग्नानंतर १२ दिवसातच आयआयटी कानपूरच्या प्रयोगशाळेमध्ये डॉ. दर्शन रंगनाथन दाखल झाल्या. खरं तर त्यांना शिक्षण आणि अनुभवाच्या आधारे तिथे नोकरी देखील सहज मिळाली असती, मात्र एका विभागात पती-पत्नी पैकी केवळ एकालाच नोकरी देण्याचा तेथील प्रशासनाचा अलिखित नियम होता. यावेळी दांपत्याने एकत्र बसून विचार केला. अध्यापन नोकरीपेक्षा संशोधन महत्त्वाचे. नवऱ्याने अध्यापन आणि बायकोने फेलोशिप मिळवुन संशोधन करायचे. आयुष्याचा जोडीदार हे विशेषण दोघांनाही खऱ्या अर्थाने लागू पडत होते. घरातील कामे देखील वाटून घेतली होती आणि प्रयोगशाळेतील रसायने, प्रकल्प निधी, विद्यार्थी, उपकरणे यासारखे रिसोर्सेस देखील वाटून घेतले होते. एकत्र संशोधन, एकत्र लेखन असं सुंदर सहजीवन सुरू झालं. दोघांनी मिळून केलेले संशोधन अनेक जर्नल्समधून प्रसिद्ध झाले आहे.❤️

दर्शन यांची कामावर प्रचंड निष्ठा, कामापुढे त्यांना वेळकाळाचे भान राहत नसे. साध्या साध्या गोष्टीसाठी हाताखालच्या लोकांना राबवण्यापेक्षा त्यांना ती कामे स्वतः करायला आवडत असत. सोबत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्या ममतेने वागत. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या त्या आवडत्या व्यक्ती. संस्थेत काम करणाऱ्या आणि शिकत असणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या बुद्धीमत्तेची, क्षमतेची कल्पना होती, तसा यथोचित आदर त्यांना मिळत असे. हाताखाली शिकलेली मुले पुढे प्राध्यापक झाली तरी या फेलोच राहिल्या. बाहेरच्या व्यक्तीने संस्थेला भेट दिली असता त्यांच्याकडे फेलो असे दुय्यम अर्थाने पाहिले जाई, पण त्याचे त्यांनी कधी मनावर घेतले नाही.😍

नैसर्गिक जैवरसायन प्रक्रिया प्रयोगशाळेमध्ये निर्माण करायची दर्शन यांना हौस होती. त्यांनी युरिया निर्मिती चक्राचे प्रारूप बनवले. जसजशी त्यांची कारकीर्द पुढे जात गेली, पेप्टाईड सारख्या अमिनो आम्लांच्या छोट्या साखळीवर तसेच प्रथिनांच्या रचनेवर त्यांनी संशोधन अधिक केंद्रित केले. शिर्शस्थ ग्रंथीमधील रचना, आणि तिथे होणारी जैवरासायनिक क्रिया यांचा अभ्यास देखील दर्शन यांनी केला. त्यांचे संशोधन खूपच तोलामोलाचे होते मात्र तरीही त्यांच्या संशोधनाची विशेष दखल भारतामध्ये घेतली गेली नाही. मात्र आपल्यापेक्षा आपली पत्नी अधिक बुद्धिमान आहे याची जाणीव रंगा यांना होती. ते तिला नेहमी "तू स्टार आहेस" असं म्हणायचे. ❤️

अमेरिकेतील नाविक संशोधन प्रयोगशाळेमध्ये कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञा इसाबेला कार्ल यांच्यासोबत स्ट्रक्चर ऑफ मॅटर याविषयावर केलेले काम हे दर्शन यांचे सर्वात मोठे संशोधन योगदान म्हणता येईल. विशेष म्हणजे इसाबेला आणि दर्शना या दोन्ही महिलांनी एकमेकीला एकदाही न भेटता सात वर्षांमध्ये २५ पेक्षा अधिक संशोधन पत्रिका एकत्र प्रसिद्ध केल्या. १९९३ मध्ये दर्शन यांनी त्रिवेंद्रम येथील विभागीय संशोधन प्रयोगशाळेमध्ये काम सुरू केले. तर १९९८ मध्ये हैदराबाद मधील भारतीय रसायनिक तंत्रज्ञान संस्थेमध्ये (IICT) उपसंचालकपदावर काम करायची त्यांना संधी मिळाली.😍
१९९४ मध्ये रंगा यांची निवृत्ती झाली आणि त्यांना मेंदूक्षयाच्या आजाराने ग्रासले. त्यावेळी सेवासुश्रुषा करून त्यांना मृत्युच्या दाढेतून बाहेर काढताना दर्शन यांनी अतोनात श्रम घेतले. आणि याच काळात दर्शन यांना स्वत:च्या उजव्या स्तनामध्ये छोटीशी गाठ असल्याचे लक्षात आले. नक्कीच स्तनाचा कर्करोग असणार, त्यांना खात्री होती. मात्र या बातमीचा रंगा यांच्या स्वास्थावर परिणाम होईल म्हणून रंगा बरे होईपर्यंत त्यांनी त्याची वाच्यता केली नाही, वेदना सहन केल्या. नंतर त्यांनी उपचार घेतले, ज्यामुळे अजून काही मोजकी वर्षे त्यांचे आयुष्य वाढले.

कर्करोगाने ग्रस्त असताना देखील त्यांचे संशोधन कार्य अजिबात थांबले नाही. आयुष्याच्या शेवटच्या पाच वर्षांत अमेरिकन केमिकल सोसायटी सारख्या संस्थेच्या प्रसिद्ध नियतकालिकात त्यांचे १५ पेक्षा जास्त संशोधन लेख प्रकाशित झाले होते. थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स यांनी त्यांना पुरस्काराने गौरवान्वित केले, त्या प्रसंगी तेहरानमध्ये आपला सत्कार स्वीकारताना, भाषण देत असताना त्यांना अचानक श्वसनाचा त्रास झाला. भारतात आल्यावर त्यांनी पुन्हा तपासणी केली असता कर्करोगाने पुन्हा डोके वर काढले होते. 
आता सेवा करायची संधी रंगाची होती. रंगा आणि आनंद यांनी त्यांची खूप काळजी घेतली. पण  कर्करोगाच्या आजारात आपण रुग्णाच्या असह्य वेदना वाटून घेऊ शकत नाही. जोपर्यंत श्वास चालु आहे तोपर्यंत त्याला हसवू शकतो, त्याचे मन रमवू शकतो, ज्याने काही क्षण तो वेदना विसरेल. दर्शन यांनी अखेरचा श्वास त्यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या, तसेच लग्नाच्या बत्तीसाव्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे ४ जून २००१ रोजी घेतला. रंगाचा बेरंग झाला, ३२ वर्ष जुळलेली केमेस्ट्री संपली, अन् दर्शन यांच्या अंत्यदर्शनाला लोकांनी गर्दी केली. जीवरसायनाच्या शोधात आयुष्य व्यतीत केलेला हा जीव, हे अद्भुत रसायन, अनंताचा शोध घेण्यासाठी पंचतत्वात विलीन झाले. 😞

रंगा यांच्या पुढाकाराने दर्शन त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दर दोन वर्षांनी "दर्शन रंगनाथन  व्याख्यानाचे" आयोजन करण्यात येते तसेच त्यांच्या नावाने पुरस्कार देखील दिला जातो. २०१६ साली रंगा यांचे निधन झाले असले तरी व्याख्यान आणि पुरस्काराची परंपरा सुरू आहे. दर्शन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लिहिलेल्या निबंधात रंगा यांनी आपले मन मोकळे केले आहे, तो निबंध आवर्जून वाचण्याजोगा आहे. कारण तो निबंध नसून एक प्रेमपत्रच आहे. त्या दोघांमधील प्रेमळ नात्यांचा त्यामध्ये सहज अंदाज येतो आणि संशोधकाला घरात कशी पूरक पार्श्वभूमी असावी याचे आदर्श उदाहरण देखील मिळते.❤️

अशी आदर्श जोडपी निर्माण झाली तर विज्ञानाला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही, ज्यांचे लग्न झाले नाही, आणि लग्न करायचेच आहे, त्यांना चांगला जोडीदार मिळावा, आणि ज्यांचे आधीच झाले आहे त्यांना🤔🤔 त्यांना त्यांच्या जोडीदाराने छान साथ द्यावी या महिला दिनाच्या सदिच्छा.. 

जय समता जय विज्ञान✊🏾

#richya
#darshan_ranganathan

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव