ॲडा लव्हलेस : कॉम्प्युटर प्रोग्रॅमची जननी.

 ॲडा लव्हलेस : कॉम्प्युटर प्रोग्रॅमची जननी.


 



  


 


५ जून १८३३ चा दिवस. चार्ल्स बॅबेज, ज्याला आपण “कॉम्प्युटरचा पप्पा” म्हणतो, त्याच्या घरी पार्टी सुरु होती. पार्टीमध्ये सौंदर्य, बुद्धिमत्ता किंवा प्रतिष्ठा यापैकी कोणताही एक निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनाच निमंत्रित केलं होत. या पार्टीत एक १७ वर्षाची मुलगी आलेली असते. विशेष म्हणजे सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि प्रतिष्ठा हे तीनही निकष तिच्याबाबत पूर्ण होत असतात. या पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना चार्ल्स बॅबेज आपलं बहुचर्चित “डिफरन्शीयल इंजिन” दाखवतो. आणि त्या इंजिनकडे सर्वात कुतूहलानं पाहणारी एकमेव व्यक्ती ती सतरा वर्षाची तरुणी असते. इथेच चार्ल्स बॅबेजला आपली शिष्या मिळून जाते.❤️ त्या तरुणीचं नाव होतं ॲडा लव्हलेस..


आपल्यापैकी बहुतेक जणांनी चार्ल्स बॅबेज हे नाव ऐकलेलं असतं, मात्र ॲडा लव्हलेस हे काहीसं अंधारात असलेलं नाव.. जाऊ द्या..शेक्सपियर म्हणून गेला आहेच की नावात काय आहे… इथं मात्र नावात एक गंमत आहे. ॲडा, जीचं बालपण लव्ह लेस होतं. आई बापाच्या प्रेमाविना जे करपून गेलं.. गावभर प्रेम वाटणारा बाप होता, तरी हिच्या वाट्याला काहीच प्रेम आलं नाही. मात्र लग्न होऊन जेव्हा तिच्या नावाला जेव्हा लव्हलेस नाव जोडलं गेलं आणि तिचं आयुष्य लव्हफुल झालं❤️


एकोणीसावं शतक सुरू होत असताना लॉर्ड जॉर्ज गॉर्डन बायरॉन हा उमराव घराण्यातील देखणा तरुण लंडनमधील हजारो मुलींचा क्रश होता. आपल्या काव्यप्रतिभेने त्यानं हजारो मुलींना अशी भूल घातली होती की, त्या त्याच्या पायाची दासी व्हायला देखील तयार होत्या. अतिशय दिलफेक, चंचल वृत्तीच्या लॉर्ड बायरॉनची लफडी मोजताना लोकांच्या हाताचीच नव्हे तर पायाची बोटं देखील कमी पडायची. मात्र या भाऊचं मन जडलं त्याच्याच एका प्रेयसीच्या नणंदेवर. गणितज्ञ असलेली ही नणंद प्रचंड हुशार. मुख्य म्हणजे याच्या पुढे ढुंकून देखील न पाहणारी.😭


इथं नेहमीची गुळपाडी फ्लर्टिंग करून चालणार नव्हतं.. त्याने रीतसर मागणी घातली. याचा इतिहास जगजाहीर असल्यामुळे सहाजिकच ती नाकारली गेली. दुनिया है मेरे पीछे लेकिन मे तेरे पीछे… असल्या प्रियाराधनेला ही गणितज्ञ बळी पडणार नव्हती. मात्र इथं देव धावून आला. मध्यस्थी करणाऱ्या बाईने तिला पटवलं की “बायबल नुसार प्रत्येकाला सुधारण्याची संधी दिली पाहिजे.” आणि मासा गळाला लागला. 😞 लग्न केल्यावर लोक सुधारतात या अंधश्रद्धेपायी किती जनींचे आयुष्य बरबाद झालं आहे राव.😬


जानेवारी १८१५ मध्ये लग्न करून अॅनाबेलाची लेडी बायरॉन झाली. आणि लवकरच तिला कळून चुकले की लाॅर्ड बायरॉन बद्दल जे ऐकले होते ते हिमनगाचे टोक होते. मागच्या वर्षी सावत्र नणंदेला झालेल्या मुलीचा बापदेखील आपला नवराच होता हे देखील समजलं. मात्र आता घर सोडून चालणार नव्हतं.. कारण आता तिच्या पोटातही एक जीव वाढत होता. १० डिसेंबर १८१५ रोजी तिच्यापोटी कन्यारत्नाने जन्म घेतला. सावत्र नणंदेच्याच नावावर बाळाचं नाव देखील ऑगस्टा ॲडा ठेवण्यात आलं. लाॅर्ड बायरॉनला मुलगा व्हायला हवा होता. ऐकून तुम्हाला नवल वाटेल पण इंग्लंडच्या या उमराव घराण्यामध्ये सव्वा महिन्याचं बाळ आणि ओली बाळंतीन यांचा जाच सुरू झाला. बडा घर पोकळ वासा.😞


लेडी बायरॉन लाख तिच्या माहेरी पाठवण्यात आले. तिच्या माहेरी सुबत्ता होती, त्यामुळे तान्ही ॲडा हलाखीचे जीवन जगली असं नाही म्हणता येणार, मात्र ममतेचा अनुभव तिला बालपणी आलाच नाही. लॉर्ड बायरॉन आणि त्याची सावत्र बहीण यांच्या प्रेम प्रकरणाचा गवगवा होऊ लागला, आणि लॉर्ड बायरॉनला इंग्लंड सोडून पळून जावं लागलं. त्यानंतर आठ वर्षांनी त्याचा मृत्यू देखील झाला. बापाचे प्रेम तर सोडा, बापाचा चेहरा पाहणं देखील ॲडाच्या नशिबात नव्हते. नाही म्हणायला आईजवळ होती, पण… पण.. आई कोरडी पडली होती.😔


झाल्या प्रकाराचा लेडी बायरॉन यांच्या मानसिकतेवर एवढा गंभीर परिणाम झाला होता की माझ्या मुलीमध्ये तिच्या बापाचा कोणताही गुण यायला नको, यासाठी ती खूपच दक्ष राहू लागली. लहान मुलाला शिस्तीची नाहीतर प्रीतीची गरज असते हे लेडी बायरॉन पूर्ण विसरून गेली. चार वर्षाच्या ॲडाला गणित आणि विज्ञान शिकवण्यासाठी खासगी शिक्षक नेमण्यात आले. उच्चभ्रू लोकांचे लक्षण म्हणून फ्रेंच भाषा आणि संगीत याचा अभ्यास देखील ॲडाने करायचा होता. बाकीचे विषय पूर्णपणे वर्ज्य. मनावर ताबा राहावा यासाठी रोज तासन्तास शवासन करायला भाग पाडलं जायचं. मनाचं रबर दाबून ठेवलं तरी उसळणारच ना… या सर्व प्रकारामुळे ॲडाच्या मनात आईबद्दल घडी बसली आणि बापाबद्दल कुतूहल निर्माण झालं.


लहानपणी अनेक आजारांचा सामना ॲडाला करावा लागला. मात्र त्यावर मात करत, आईला अपेक्षित अशी आज्ञाधारक मुलगी बनण्याचा ॲडा पूर्णपणे प्रयत्न करत होती. तिला वडिलांकडून कल्पनाशक्तीची देणगी मिळाली होतीच. त्यावेळी इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीने वेग घेतला होता. त्यातील यंत्र आणि गिअर्स पाहून बारा वर्षाच्या ॲडाला कल्पना सुचली. वाफेच्या शक्तीवर उडू शकेल असा, पोटात गिअर असलेला लाकडी घोडा बनवायचा. जो पंख हवेत ऊडेल आणि तोंडातून वाफ सोडेल. भारी ना.😘 तिने आपली ही कल्पना आईला पत्र पाठवून कळवली होती.


हो.. तिला आईशी संवाद साधण्यासाठी पत्र पाठवायला लागायचं. लहानपणापासून तिचा सांभाळ तिच्या आजीने केला होता. सात वर्षाची असताना तिची आजी पण मेली नंतर ॲडाचं संगोपन नोकरचाकरांनी केलं.आई तिच्या कामांमध्ये व्यस्त असायची. केवळ मुलीला योग्य शिस्त आणि शिक्षण मिळते का याचीच ती काळजी करायची. त्या काळात घटस्फोटीतेला अपत्याची कस्टडी मिळत नसे. इथं ॲडाचा बाप बेजबाबदार होता, त्याने खुशीखुशी कस्टडी दिली असली, तरी समाजासमोर ॲडाच्या आईला आदर्श माता असल्याचं ढोंग करावं लागत असे. वयात येणाऱ्या ॲडाला या सर्व गोष्टी समजून येत होत्या.


ॲडा पंधराव्या वर्षी आजारी पडली. गोवरने एवढी जाम झाली की पुढील एक वर्ष ती चालू शकली नाही. मात्र या काळात तिने अधिक चिकाटीने गणित आणि विज्ञान समजून घेतलं. आजारपणातून उठली आणि कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागली. तिच्यासोबत नृत्य करण्याची संधी मिळेल का या आशेवर अनेक तरुण टपून बसायचे. ॲडाचं तिच्या शिक्षकासोबत प्रेम प्रकरण जमलं. दोघांनी पळून जायचा प्रयत्न केला, मात्र अयशस्वी झाला. शिक्षकाची हकालपट्टी झाली, आणि आई या लेकीकडं अधिक लक्ष पुरवू लागली.


त्यांचे फॅमिली डॉक्टर तसेच, सामाजिक कार्यकर्ते विल्यम फ्रेंड यांच्याकडून ॲडाला भरपूर शिकायला मिळालं. तिचं गणित प्रचंड पक्क झालं. तिला गणित आणि विज्ञानाच्या नवीन शिक्षिका म्हणून मेरी समरविल्ले भेटल्या. रॉयल एस्ट्रोनॉटिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्यामुळे ॲडाची अनेक शास्त्रज्ञांची ओळख झाली. चार्ल्स बॅबेजच्या पार्टीमध्ये ॲडा त्यांच्या ओळखीनेच गेली होती.


आज आपण संगणकाचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये उपयोग करतो्. मात्र संगणक संकल्पनेचा जन्म केवळ गणितीय क्रिया सोडवण्यासाठी झाला होता. त्याच्या नावातून देखील आपल्याला त्याचा हेतू कळतो. हजारो वर्षापूर्वी चीन मध्ये अबॅकसचा प्रयोग यशस्वी झाला होता मात्र त्याला मर्यादा होत्या. नंतर लॉग टेबल्सचा वापर होऊ लागला. मधल्या काळात जगाच्या कक्षा रुंदावल्या आणि सागरी वाहतूक वाढली. या वाहतुकीदरम्यान बरीच आकडेमोड करावी लागत असे. आणि ही गणित सोडवत असताना चुकीला माफी नसते. 🤭


नुकतीच नेपोलियनची सोबतची युद्धं संपली होती. ब्रिटिश आरमार जगामध्ये सर्वोत्तम गणलं जाऊ लागलं होतं. बॅबेजने जेव्हा संगणकाचा प्रस्ताव दिला तेव्हा त्याला ब्रिटिश नेवी कडून भरपूर निधी मिळाला होता. हे यंत्र वाफेच्या शक्तीवर काम करणार होत, किंवा हाताच्या साह्याने त्याचा क्रँक हँडल फिरवावा लागणार होता. माहितीच्या आदान प्रदानासाठी पंच कार्डचा वापर करण्यात येणार होता. या प्रकारच्या पंच कार्डचा वापर जॅकवार्ड यंत्रमागांमध्ये देखील करण्यात येऊ लागला होता.


१८०१ मध्ये जोसेफ जॅकवार्ड याने पंच कार्डचा वापर करून यंत्रमागाच्या प्रगतीला नवी दिशा दिली होती. हे मशीन छिद्रअन्वेशी असायचं. आपल्याला जशी रचना हवी आहे त्याप्रमाणे पंच कार्डमध्ये छिद्र बनवायची. त्यांचा अभ्यास करून यंत्रमाग सूचना पाळणार आणि त्यानुसार कापड आणि त्यावरील डिझाईन तयार होणार. ॲडाची आई तिला हे यंत्रमाग कसं काम करतं हे बघायला देखील घेऊन गेली होती. त्या काळात राजघराण्यातील महिलांसाठी हे खूपच धाडसाचं होतं. बॅबेजच्या यंत्रामध्ये देखील माय-लेकी दोघींना रस होता.


वीस आकडी संख्यांची आकडेमोड करता येईल असं बॅबेजला यंत्र बनवायचं होतं. मात्र त्याला ते शक्य झालं नाही शेवटी दुधाची तहान ताकावर भागवत त्याने छोट्या स्वरूपात यंत्र बनवलं. त्याचं हे डीफरेन्शियल यंत्र सहा आकडी संख्यांचं गणित अचूकपणे सोडवत असे. हे यंत्र कसं काम करतं याबद्दल ॲडाला कुतूहल होतं. तिने पत्र पाठवून या यंत्राच्या ब्ल्यू प्रिंटची मागणी केली आणि यातून सुरू झालेली ॲडा आणि बॅबेजची दोस्ती पुढे आयुष्यभर टिकली. बॅबेज यांच्या सल्ल्याने ॲडा लंडन विद्यापीठामध्ये ऍडव्हान्स मॅथेमॅटिक्स शिकू लागली. संगीत असो वा रंग अथवा जगातील इतर कोणतीही गोष्ट, तिला संख्येच्या माध्यमातून मांडायला ॲडा शिकली.


मात्र याच काळात तिला संसार मांडायची देखील संधी मिळाली. १९ वर्षाच्या ॲडाला चांगलं स्थळ सांगून आलं. लवलेस परगण्याच्या सरदार (स्पेलिंग lovelace अस आहे बर का, ते loveless ची टुकार शब्दकोटी आता विसरून जा😂) विल्यम किंग या सरदारासोबत तिचं लग्न झालं. विल्यम देखील साहित्यिक, गणितज्ञ, शास्त्रज्ञ इत्यादींचा चाहता होता. त्यामुळे तिला संसारामध्ये तडजोड करावी लागली नाही. विल्यममुळे चार्ल्स डिकन सारख्या लेखकासोबत तसेच मायकेल फॅरेडे सारख्या जीनियस शास्त्रज्ञासोबत ॲडाची ओळख झाली. ॲडा आणि विल्यम या दोघांनाही घोड्यांचा आणि घोडेस्वारीचा खूप नाद. भारीच की राव… आम्हाला तर सरदारनी म्हटलं की पिंगा ग पोरी पिंगा गाणं आठवतं 😂


या जोडीच्या संसार वेलीला चार वर्षांमध्ये तीन गोजिरी फुले लागली. दोन मुलं आणि एक मुलगी. मुलीचं नाव ॲनाबेला ठेवताना ॲडाला आई आठवली तर मुलांची नावं लॉर्ड बायरॉनच्या नावावर बायरॉन अन् गॉर्डन अशी ठेवली. बेजबाबदार बापाचं विनाकारण कौतुक. जसं अंधभक्तांना शेटजीचं असतं तसं..😂 झालं असं की ॲडाला कुठून तरी तिच्या बापाने तिच्यावर लिहिलेली कविता मिळाली. अतिशय भावूक तरल सुंदर असलेली ही कविता तिच्या मनात बापासाठी जागा निर्माण करून गेली. म्हणूनच तिच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर तिचं पार्थिव तिच्या वडिलांच्या शेजारी पुरण्यात आलं.


चार्ल्स बॅबेज यांनी काही वर्षानंतर डिफरेन्शीअल इंजिनच्या पेक्षा सुधारित अश्या ॲनालिटिकल इंजिनवर काम करणं सुरू केलं.३१ आकडी संख्यांची आकडेमोड ज्यामध्ये शक्य होणार होती. प्रोग्रॅम करता येईल असा हा पहिला संगणक असणार होता. (पुढे शंभर वर्षानंतर ॲलन ट्युरिंग यांनी हीच संकल्पना पुढे नेली होती) १८४२ मध्ये एका इटालियन अभियंत्याने चार्ल्स बॅबेजची व्याख्याने ऐकून त्याच्या या यंत्रावर फ्रेंच भाषेत संशोधन पत्रिका प्रसिद्ध केली. (हा अभियंता लुईगी मेनाब्रीया पुढे जाउन १८६७ मध्ये इटलीचा पंतप्रधान बनला बरं का) पत्रिकेचा इंग्रजी अनुवाद ॲडाने केला. चार्ल्स बॅबेजने तो अनुवाद वाचला आणि ॲडाला खडसावलं. “तुझी क्षमता अनुवाद करण्यापेक्षा खूप अधिक आहे तू या संशोधनामध्ये मोलाची भर टाकू शकते. तू तुझा स्वतंत्र संशोधन पेपर प्रसिद्ध कर.”


ॲडाने नव्याने संशोधन पत्रिका लिहिली. या पत्रिकेमध्ये आज्ञावलींचा संपूर्ण क्रमच देऊन टाकला. पहिला, अगदी अचूक संगणकीय प्रोग्रॅम जन्माला आला होता. अंकांबरोबरच तिने अक्षर आणि चिन्ह यांचादेखील कोडींग कसे करता येईल याची मांडणी केली तसेच संगणक आज्ञावलीमध्ये महत्त्वाचा भाग असलेलं लूपिंग म्हणजे एक कमांडची दुसऱ्या कमांडशी जोडणी ही देखील तिने अगदी अचूकपणे केली. वडिलांचा कवितेचा आणि आईचा गणिताचा वारसा एकत्र करत तिने अतिशय कल्पकतेने हा प्रोग्रॅम बनवला होता. तिचं हे संशोधन १८४३ मध्ये स्वीस जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं. मात्र तिच्या हयातीत तिला जास्त प्रसिद्धी मिळाली नाही. कदाचित चार्ल्स बॅबेज यांचं यंत्र यशस्वी झालं असतं, तर ॲडाचं नाव देखील तेव्हा जगभर गाजलं असतं.


पुढे तिने गणिताचा आणि अल्गोरिदमचा वापर जुगारात कसा करता येईल यावर बराच वेळ आणि पैसा खर्च केला. घोड्यांच्या शर्यतीमध्ये तिने प्रचंड पैसा गमावला. बॅबेज यांच्या प्रयोग यशस्वी होत नसल्याने ब्रिटिश नेव्हीने त्यांचा निधी थांबवला होता. त्यामुळे यंत्र अर्धवट स्थितीमध्ये पडून राहिलं होतं. ते पूर्ण करण्यासाठी निधी उभा करण्याच्या प्रयत्नात बॅबेज आणि ॲडा प्रचंड गाळात गेली. गणिताचा वापर करून दर आठवड्याला भाकीत काढली जायची, पैसा लावला जायचा आणि डब्बा गुल व्हायचा. कवीच्या अंत: प्रेरणेवर पोसलेला फाजील आत्मविश्वास गणिती बुद्धीवर मात करून गेला.


चांगलं आरोग्य मिळण्याच्या बाबत देखील ॲडा कमनशिबीच म्हणावी लागेल. लहानपण देखील आजारपणाने ग्रस्त होतं, आता तारुण्य देखील. २२ वर्षाची असताना तिला कॉलरा झाला. त्यानंतर तिचा दमा बळावला. पुन्हा पुढे पोटाचा त्रास. वेदनाशामक घेऊन घेऊन तिला अफूची सवय लागली. तिला वेगवेगळे भास होऊ लागले. मूड स्विंगचा देखील तिला त्रास होऊ लागला. त्याचा परिणाम तिच्या वैवाहिक नात्यावर देखील झाला. त्यात भरीस भर म्हणून तिला कॅन्सरनं ग्रासलं. वयाच्या चौथ्या वर्षापासून आकड्या मध्येच खेळणारी, लोळणारी ही मुलगी वयाच्या चाळीशीचा आकडा देखील नाही गाठू शकली.


ॲडाचं आजारपण वाढलं तेव्हा तिची काळजी घ्यायला तिची आई हजर झाली. अर्थात तिथेही तिची हुकूमशाही सुरू होतीच, ॲडाला कोणी भेटायचं, कोणी नाही हे तिचं ठरवत असे. ॲडालाआजारपणात चार्ल्स डीकनची तिला खूप छान साथ मिळाली. डीकन त्यांच्या घरी नेहमीचा पाहुणा होता. महिन्यातून एकदा तरी तो जेवायला आणि गप्पा मारायला यायचाच. ॲडाच्या आजारपणात चार्ल्स रोज तिच्या उशाशी बसून तिला आपल्या कादंबरीतील कथा वाचून दाखवत असे. अल्कोहोल आणि इतर वेदनाशामक यांचा मारा सुरू होताच माचवे कॅन्सरवर विजय मिळणार नव्हताच. अखेरीस २७ नोव्हेंबर १८५१ रोजी तिची प्राणज्योत मालवली त्यावेळी तिचं वय अवघं छत्तीस वर्ष होतं.


एक सरदार घराण्यातील मुलगी नाइलाजानं गणिताच्या प्रेमात पडली. नंतर लग्न झालं आणि तीन मुलं झाली तरी ती तिच्या पहिल्या प्रेमाला विसरू शकली नाही. आणि या प्रेमातून ती या जगाला सर्वात पहिला संगणक प्रोग्रॅम देऊन गेली. संगणक केवळ गणनक्रियेतच नाही तर इतर अनेक गोष्टींमध्ये उपयोगी येईल हे तिने तेव्हाच ओळखलं होतं. प्रत्येक गोष्टीचं रूपांतर कोड्स किंवा डिजिट्स मध्ये करता येईल हे तिच्यातील कवी ओळखू शकला होता.‌ अमुक शास्त्राचा जनक, तमुक शास्त्राचा बाप अशी विशेषणे आपण आजवर अनेक वेळा पाहिली, त्या अर्थाने ॲडा लव्हलेस संगणक प्रोग्रॅमची जननी होती.


तिच्या कार्याची दखल घेत १९७९ मध्ये अमेरिकन संरक्षण खात्याने विकसित केलेल्या संगणकीय भाषेला ॲडाचे नाव देण्यात आले आहे. २००९ पासून इंग्लंडमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या मंगळवारी “ॲडा लव्हलेस दिवस” साजरा केला जातो. नाही… हा दिवस तिचा जन्मदिवस देखील नाही की स्मृति दिवस देखील नाही. मात्र तरीही मुद्दाम ठरवून ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी गणित आणि विज्ञान या सारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना यानिमित्ताने मानवंदना दिली जाते. शेतीचा शोध लावणारी स्त्री होती, आणि संगणक प्रोग्रॅम बनवणारी देखील.. हा केवळ योगायोग नाही. नवनिर्मितीची देन लाभलेल्या स्त्रीला त्रिवार वंदन🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव