मिलेव्हाा मारीक (आईन्स्टाईन) : कालसापेक्ष उपेक्षित अबोली

 मिलेव्हाा मारीक (आईन्स्टाईन) : कालसापेक्ष उपेक्षित अबोली.



कहाणी १. एकोणीसावं शतक संपत असताना एका संस्थेमध्ये एक मुलगी गणित आणि शास्त्र शिकण्यासाठी दाखल होते. संपूर्ण वर्गामध्ये ती एकमेव महिला असते. शिक्षण घेत असताना एका सहाध्यायाच्या प्रेमात पडते, गर्भवती होते, त्यामुळे शिक्षणाकडं दुर्लक्ष होतं, आणि पदविका न मिळवता तिला बाहेर पडावं लागतं. ती त्या सहाध्यायाशी लग्न करते.. तिच्या आयुष्यात ती कधीच चमकलेली दिसत नाही, मात्र तिचा नवरा खूप मोठा शास्त्रज्ञ होतो. त्याच्यापासून वेगळे झाल्यानंतर पंधरा वर्षांनी ती दावा करते की नवऱ्याच्या संशोधनामध्ये माझंदेखील महत्त्वाचं योगदान आहे. मात्र तिचं बोलणं कोणीही गंभीरपणे घेत नाही..


कहाणी २. एक दिलफेक स्वभावाचा देखना, हुशार आणि व्हायलीन वगैरे वाजवणारा मुलगा.. थोडक्यात डीडीएलजे मधील आपला शाहरुख.. नुकतचं ब्रेक-अप झाल्यामूळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी धडपडणारा… शिक्षण घेण्यासाठी संस्थेमध्ये दाखल होतो, वर्गामध्ये असलेल्या एकमेव मुलीच्या मागे लागतो. ती मुलगी दिसायला साधारणच, मात्र प्रचंड बुद्धिमान. कदाचित या बुद्धिमत्तेच्या तेजानेच त्याचे डोळे दिपले असावेत. मात्र आपली काजल काही या शाहरुखला दाद देत नाही. पण म्हणतात ना.. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे. 😀( कधी गळले होते काय माहित)


छान छान कविता लिहून तिला इम्प्रेस करतो. याच्या कल्पनाशक्तीची तिला भुरळ पडते. दोघांचं प्रेम जमतं आणि त्यानंतर हा भाऊ तिच्या रूमवरच पडीक. तिलाही लेक्चरला जाऊ द्यायचा नाही आणि स्वतः देखील जायचा नाही.. निसर्ग त्याची किमया दाखवतो आणि ती गर्भवती होते, मात्र जबाबदारी घ्यायची याची तयारी नाही. तिचं शैक्षणिक वर्ष वाया जातं. पुढे तिला कधीच पदवी मिळत नाही. मात्र या दोघांचं लग्न होतं आणि ती नवऱ्याला संशोधनात मदत करते, नवर्याला नोबेल पारितोषिक मिळतं, नवरा नोबेल पारितोषिकाची संपूर्ण रक्कम तिला देतो, मात्र संशोधनातील तिचं योगदान उघडपणे मान्य करत नाही.


दोन्ही कहाण्या एकाच जोडप्याच्या आहेत… इतिहासाच्या अनेक बाजू असतात, इतिहास व्यक्तिसापेक्ष, पतसापेक्ष, लिंगसापेक्ष लिहिला जातो… आणि जे नाणं चालणारं असतं, त्याची दुसरी बाजू पाहिली जात नाही…. हजारो प्रतिभावान स्त्रियांच्या अव्यक्त अबोल कहाण्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात असलेली ही मिलेव्हाची कहाणी. सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडून संपूर्ण जगाला चकित करणाऱ्या अल्बर्ट आईन्स्टाईनच्या संशोधनात त्याच्या पत्नीची देखील भूमिका असल्याचं अनेक वर्षं नाकारलं गेलं आहे. “जगातील सर्वात मोठा शास्त्रज्ञ” अशी आईन्स्टाईनची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून त्याचे भक्त हिरिरीने प्रचार करताना करताना मिलेव्हा मारीकवर पुन्हा अन्याय करत आहेत…‌ खरंच मिलेव्हा मारीक ही रिलेटीव्हीटी थियरीशी रिलेटेड असेल का.


१९ डिसेंबर १८७५ मध्ये आज सर्बियामधील टीटेल या छोट्या शहरात एका सुखवस्तू घरामध्ये मिलेव्हाचा जन्म झाला. तिच्या पाठीवर एक छोटा भाऊ आणि एक बहीण. वडील “मायलोस मारीक” हे सैन्यातून निवृत्त होऊन महत्त्वाच्या सरकारी पदावर कार्यरत होते. हे कुटुंब आता नोव्हीसाद या शहरात स्थलांतरित झालं होतं.‌ या तीनही मुलांच्या शिक्षणाबाबत आईवडील अतिशय दक्ष होते. जवळच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करताना मिलेव्हाची हुषारी तिच्या शिक्षकांच्या निदर्शनास आली. त्यांनी पालकांना बोलावून सांगितलं की मिलेव्हाला मोठ्या शाळेत टाका.. तिथेच तिच्या हुशारीचे चीज होऊ शकेल.


१८९२ मध्ये तिच्या वडिलांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी अशी शाळा निवडली जिथे केवळ मुलांनाच प्रवेश होता. आपलं राजकीय वजन वापरून त्यांनी प्रवेशासाठी प्रयत्न केले. झग्रेब शहरातील रॉयल क्लासिकल हायस्कूल मधील शिक्षकांनी प्रवेश परीक्षेमधील तिची चमकदार कामगिरी पाहून तिला दहावीला प्रवेश तर दिलाच, परंतु भौतिकशास्त्राच्या व्याख्यानांना उपस्थित राहण्याची विशेष सवलत देखील दिली. १८९४ मध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होत मिलेव्हाने शालेय शिक्षण पूर्ण केलं. आता पुढं काय हा प्रश्न होताच.. कारण गणित,विज्ञान ही क्षेत्रं अजून पुरुषांच्या मक्तेदारीखाली होती.


त्या वर्षी मिलेव्हा प्रचंड आजारी पडली, आणि त्याचं पर्यवसन पाठीच्या आजारात झालं. या आजाराने तिला पुढं आयुष्यभर त्रस्त केलं. याच वेळी तिच्या छोट्या बहिणीला स्किझोफ्रेनियाने ग्रासलं. या दोघींच्या आजारामुळे सर्व कुटुंब स्विझर्लंड येथे काही काळ स्थायिक झालं. मिलेव्हाने तिथल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला खरा, पण सहा महिन्यात ती कंटाळली. कारण गणित आणि भौतिकशास्त्र हाच तिचा श्वास होता. झुरिक येथील पॉलीटेक्निक कॉलेज मधील गणिताची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन तिने डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. वर्ष होतं १८९६


या संस्थेत प्रवेश मिळवणं अवघड होतं. जीनियस आईन्स्टाईन सुद्धा पहिल्या वेळी अपयशी ठरला होता.‌ मुलींना तर प्रवेश नव्हताच. पहिल्या प्रयत्नातच प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली असली तरी संचालकांशी संघर्ष करूनच मिलेव्हाला प्रवेश मिळवावा लागला. मिलेव्हा तेव्हा २१ वर्षाची झाली होती. वर्गामध्ये तिच्यासोबत एकही मुलगी नव्हती. त्यामुळे प्रागतिक विचारांच्या वडिलांनादेखील चिंता वाटू लागली होती. शेवटी “इस बाप की पगडी को नीचे मत होने देना” वगैरे ताकीद देऊन मिलेव्हाला तिथं एकटं राहून शिकण्याची परवानगी मिळाली. आणि संपूर्ण कुटुंब पुन्हा नोव्हीसाद येथे परतलं.


वर्गामध्ये पाच मुलं. त्यात अल्बर्ट आईन्स्टाईन सर्वात छोटा, १७ वर्षांचा… मिश्कील स्वभावाचा.‌ स्वतःला अतिहुशार समजणारा. वेबर नावाचे अतिशय चाकोरीबद्ध शिक्षक त्यांना शिकवायला होते. या गुरुजींचे आणि अल्बर्टचे सारखे खटके उडायला लागले.‌ अफाट कल्पनाशक्ती लाभलेला अल्बर्ट वेबरगुरुजींच्या चाकोरीमध्ये बंदिस्त होत नव्हता. त्यामुळे गुरुजींजा तो अतिशय नावडता विद्यार्थी.‌ संपूर्ण जगात आपण हुशार असल्याचा अल्बर्टचा समज लवकरच दूर झाला, जेव्हा त्याला न सोडवता आलेलं गणित मेलिव्हाने सोडवून दाखवलं. ❤️


अल्बर्टचा स्वाभिमान दुखावला गेला खरा, मात्र त्याला मिलेव्हाचं आकर्षण देखील वाटू लागलं. खरंतर त्याच्यापेक्षा चार वर्षाने मोठी, शिवाय दिसायलाही अतिशय साधारण.. तरीही अल्बर्ट तिच्यासाठी ठार वेडा झाला (असा ठार वेडा तो याआधी देखील झाला होता, आणि नंतरही अनेक वेळा 🤣) मिलेव्हाने आपल्या तारुण्यसुलभ भावनांना कुलूपबंद करून डोळ्यांना झापडं लावून घेतली होती. त्यामुळे अल्बर्टला भरपूर गूळ पाडायला लागला. अखेर कुलपाची चावी सापडली. अल्बर्टच्या कविता तिला आवडल्याच, शिवाय त्याचं व्हायलिन वाजवणं देखील.‌ तिला गाण्याची आवड होती त्यामुळे या दोघांची संगीत मैफिल जमायला लागली. आणि मने जवळ यायला लागली. ❤️


अल्बर्टचे वर्गामध्ये खटके उडायचे, त्यामुळे अल्बर्ट तासाला बसण्यास अनुत्सुक असायचा. गप्पा मारायला जोडीदार हवा म्हणून मिलेव्हाला देखील तो तासाला जाऊन द्यायचा नाही. दोघं तिच्या रूमवर गप्पा मारत बसायचे. अल्बर्ट तिला लाडाने डॉली म्हणायचा. इथं डार्लिंग साठी डॉली बदनाम झाली. वेबरगुरुजींनी आता तिलादेखील धारेवर धरायला सुरुवात केली. त्याआधी आपल्या मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रामध्ये मिलेव्हा म्हणाली होती, “माझ्या कामगिरीवर शिक्षक समाधानी असून लवकरच मला तिथेच सहाय्यकाची नोकरी देखील मिळेल.” मात्र नंतर गाडीने ट्रॅक बदलला. एकेकाळी वर्गामध्ये सर्वात पुढे असलेली ही मुलगी चक्क नापास करण्यात आली. “करण्यात आली” कारण तिला तोंडी परीक्षेत सर्वात कमी मार्क्स दिले गेले.‌😞 आणि आपला रॅंचो अल्बर्ट सगळ्यांमध्ये पहिला आला.🤔


१९०० साली अल्बर्टला डिप्लोमा मिळाला, मात्र मिलेव्हाची गाडी तिथंच अडकली. आणि त्यातच तिला अल्बर्टपासून दिवस गेले. परीक्षेचा दुसरा प्रयत्न करताना ती तीन महिन्याची गर्भवती होती. याही वेळेस ती अयशस्वी ठरली,‌ वेबर गुरुजी काही पाठ सोडत नव्हते. गर्भवती असल्याने लवकर निर्णय घ्यायला लागणार होता. तिने अल्बर्टला लग्न करण्यासाठी विचारलं, आणि अल्बर्टने घरी. घरातून कशातच संमती मिळणार नव्हती. मुलीचं रूप, पाठीचा आजार, वयाने मोठं असणं यासोबत सर्वात मोठं कारण होतं तिचं “ज्यू” नसणं. त्याची आई स्पष्ट म्हटली की, जेव्हा तू तिशीमध्ये असशील, तेव्हा ती म्हातारी झाली असेल.‌ (फक्त चार वर्षांनी, अधिक नेमकेपणानं सांगायचं तर फक्त पावणेचार वर्षांनी मोठी होती बरं का) अल्बर्ट स्वतःच्या पायावर उभा नव्हता, त्यामुळे तो घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नव्हता.😬


मिलेव्हा वडिलांच्या घरी परतली. आईवडिलांनी तिला खूप झापलं मात्र तिला अल्बर्टवर विश्वास होता, आणि त्याची अडचण ती समजून घेत होती. तिने घरच्यांना समजून दिलं की अल्बर्ट खूप चांगला मुलगा आहे, हुशार आणि कर्तबगार आहे आणि ते दोघं लग्न नक्की करतील. जानेवारी १९०२ मध्ये तिने त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. कुमारी मातांची मुलं सांभाळण्यासाठी असलेल्या संस्थेमध्ये सहा महिन्यानंतर त्या बाळाला देण्यात आलं‌.. पुढं त्याचं काय झालं, माहित नाही. (कारण आइन्स्टाइनला अशी मुलगी होती, हेच मुळात १९८७ नंतर प्रकाशात आलं) मात्र अल्बर्ट त्या बाळाला पाहायला देखील आला नाही. कधीकाळी एका शहरात राहून तो मिलेव्हाला भाराभर पत्र लिहायचा. मात्र मिलेव्हा वडिलांच्या घरी आल्यापासून त्यांचा पत्रव्यवहार देखील खूपच कमी झाला होता.


अल्बर्ट, मिलेव्हा यांच्यासोबत शिकलेले सर्व सहाध्यायी त्याच संस्थेमध्ये कामाला लागले होते. मात्र बंडखोर अल्बर्टला कोणीही नोकरी देत नव्हतं. त्यातील एका मित्राच्या वशिल्याने अल्बर्टला कशीबशी पेटंट ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. आजारी वडिलांनी अल्बर्टच्या लग्नाला होकार दिला, आणि ही जोडी १९०३ मध्ये विवाहबद्ध झाली. अल्बर्टचा पीएचडीसाठी अभ्यास देखील सुरू होता, त्या कामात आता मिलेव्हाची मदत होणार होती. आठ तास काम करून घरी आल्यानंतर अल्बर्ट आणि मिलेव्हा तासन तास विज्ञानाची चर्चा करत बसायचे. खूपच आनंदाचे क्षण होते ते… आणि हा आनंद द्विगुणित करत पुढच्या वर्षी त्यांच्या संसारात पहिल्या मुलाची, हान्सची भर पडली. ❤️




हान्सच्या निमित्ताने अल्बर्टची आई त्यांच्या घरात राहायला आली. “नावडतीचे मीठ अळणी” या प्रकारे मिलेव्हा सर्व कामातील चुका ती काढायला लागली. अल्बर्टचा प्रबंध पूर्ण करायचा होता. मात्र आठ तासाच्या ड्युटीमुळे त्याला वाचनालयात जायला वेळ मिळत नसे. त्याच्यासाठी वाचनालयात जाऊन आवश्यक संदर्भ शोधणे, ते उतरवून घेणे इत्यादी मिलेव्हा करत असलेली कामं किती महत्वाची आहेत हे तिच्या सासूला कळत नव्हतं. त्यामुळे तिचा तोंडाचा पट्टा सुरूच. “मोठी आली मॅडम, बाळाला उपाशी ठेवून गावभर हिंडत बसते.” याप्रकारचे टोमणे ऐकून घ्यायला लागायचे. आणि आपला अल्बर्ट आईपुढं एक शब्ददेखील बोलू शकत नव्हता😬 तीन-चार महिने नातवाचे कौतुक आणि सुनेचे कोडकौतुक 🤣करून म्हातारी परत तिच्या घरी गेली.


मिलेव्हाचा अल्बर्टच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. १९०५ मध्ये वडिलांना भेटायला गेली असताना तिने सांगितलं होतं की माझा नवरा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होणार आहे. झालंही तसंच.. हे वर्ष काळाने अल्बर्ट आईन्स्टाईन साठीच बनवलेलं असावं.‌ अल्बर्टला पीएचडी मिळालीच, शिवाय या वर्षी त्याच्या प्रसिद्ध झालेल्या पाच निबंधांनी जगभर खळबळ उडवली..‌ फोटोईलेक्ट्रिक इफेक्ट हे आईन्स्टाईनला नोबेल मिळवून देणारं संशोधन तसेच E = MC^2 हे विज्ञानाचा इतिहास बदलणार संशोधन देखील.. मिलेव्हाच्या मदतीशिवाय हे अशक्य होतं.‌


मिलेव्हाचा भाऊ मिलोस जुनियर हा त्यावेळी शिक्षण घेत असताना बहिणीकडे राहायला आला होता. तो सांगतो की हे जोडपं अगदी पहाटेपर्यंत जागत लिखाण आणि चर्चा करत बसलेलं असायचं. मिलोस जेव्हा त्याच्या मित्र मैत्रिणींना घरी पार्टीला बोलवायचा, तेव्हादेखील अल्बर्टने अनेक वेळा कबूल केलं आहे की मिलेव्हा त्याला गणित सोडवायला मदत करते. सलग पाच आठवडे अल्बर्ट,मिलेव्हा या दोघांनी रात्रं-दिवस मेहनत घेतली आणि संशोधन पेपर लिहून पूर्ण केल्यानंतर आईन्स्टाईनने दोन आठवडे बिछान्यातच दडी मारली. मात्र या काळात आपण तयार केलेल्या संशोधन पत्रिकेमध्ये काही त्रुटी राहिल्या नाहीत ना? हे मिलेव्हा पुन्हा पुन्हा तपासत होती.


विज्ञान क्षेत्रामध्ये या संशोधनानं खळबळ उडवून दिली. अल्बर्ट आईन्स्टाईन हे नाव मोठं होत चाललं होतं. मात्र मिलेव्हाला त्यामध्ये कसलीही असुरक्षितता किंवा असूया वाटत नव्हती.‌ १९०८ मध्ये या जोडप्याने कॉनरॅड हॅबीट्श या शास्त्रज्ञ समवेत एक वोल्टमीटर बनवला. मात्र त्याचं पेटंट घ्यायची वेळ आली तेव्हा अल्बर्ट आईन्स्टाईन आणि कॉनरॅड हॅबीट्श या दोघांची नावं देण्यात आली.‌ हॅबीट्शने मिलेव्हाला विचारलं देखील की तुझं नाव नको का.. मिलेव्हा बोलली, “अल्बर्ट आणि मी काही वेगळे नाही आहोत.” दो जिस्म एक जान है हम😂 हिंदी पिक्चर जास्त पाहिले असावेत तिने🤭 विनोदाचा भाग सोडला तर मिलेव्हाची समर्पणाची आणि प्रेमाची पातळी यातून दिसून येते.


त्या दोघांनी मिळून लिहिलेला पहिला संशोधन पेपर १९०० मध्ये प्रसिद्ध झाला. मात्र त्यावर देखील केवळ आईन्स्टाईन हे एकच नाव आहे. तेव्हा आईन्स्टाईनचा डिप्लोमा पूर्ण झाला होता, मिलेव्हाचा नाही, हे त्यामागील कारण असू शकेल. तसेच त्या काळात महिला संशोधिका पचनी पडणं खूपच अवघड होतं. आपलं नाव टाकल्यामुळे संशोधनपत्रिकेचं वजन कमी होऊ नये अशी मिलेव्हाची इच्छा असावी. नावासाठी ती कधीच धडपडली नाही, मात्र ती ज्याला मदत करत होती, त्याचं मन देखील तेवढं मोठं असायला हवं होतं. प्रसिद्धी मिळाल्यानंतर आईन्स्टाईनने मिलेव्हाचं योगदान जाहीरपणे कधीच मान्य केलं नाही. मात्र आता या दोघांमधील ५४ पत्रांचा पत्रव्यवहार समोर आला आहे, आणि बर्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.👍




१९०८ मध्ये बर्न विद्यापीठात प्राध्यापकी करायची संधी अल्बर्टला आली. तिथं त्याने दिलेलं पहिलं व्याख्यान देखील मिलेव्हाच्या हस्ताक्षरात आहे, याशिवाय नोकरी संदर्भातील प्रस्तावाबाबत मॅक्स प्लॅंक यांना लिहिलेलं उत्तर देखील… १९१० मध्ये त्यांच्या कुटुंबात, त्यांचं दुसरं बाळ, एडवर्ड, या चिमुकल्याने प्रवेश केला होता… मात्र त्याच वेळेस एल्सा नावाची दोघात तिसरी व्यक्ती देखील प्रवेश करत होती. एल्सा आईन्स्टाईन- लोवेंथाल ही अल्बर्टची सख्खी मावस बहीण. शिवाय दोघांचे वडील हे सख्खे चुलत भाऊ.


अल्बर्टपेक्षा एल्सा देखील तीन वर्षाने मोठी होती बरं का. (अर्थात यामध्ये अल्बर्टच्या आईला काही वावगं वाटलं नसणार) दोन मुलींना घेऊन नवऱ्यापासून एल्सा वेगळी राहत होती. १९०९ पासून तिचा अल्बर्टशी पत्रव्यवहार सुरू झाला.. आणि अल्बर्ट तिच्या प्रेमात पुन्हा एकदा ठार वेडा झाला.🤭 शिवाय या नात्याबद्दल मिलेव्हा वगळता आईन्स्टाईन कुटुंबात इतर कुणालाही हरकत असण्याची शक्यता नव्हती. अल्बर्टला जर्मनीमध्ये नोकरी मिळणं एल्साच्या पथ्यावर पडलं. दोघांच्या भेटी सुरू झाल्या. अल्बर्ट घरांमध्ये वेळ कमी देऊ लागला. मिलेव्हा याबाबत आपल्या मैत्रिणीला पत्रामध्ये लिहिते, “संसार म्हटला की असं चालायचंच,एकाच्या हाती मोती येतो तर दुसऱ्याच्या हाती मोकळा शिंपला.”😞


एल्सा आणि अल्बर्ट यांची गावभर चर्चा होऊ लागली. याबाबत मिलेव्हा खडसावयाला गेली त्यावेळी अल्बर्ट कडून अनपेक्षित उत्तर आलं. पटत नसेल तर सोडुन जा😞 ज्याच्यासाठी संपूर्ण करिअरची वाट लागली, ज्याची दोन पोरं पदरामध्ये आहेत, तो व्यक्ती तिला शांतपणे म्हणत होता सोडून जा.‌ तिने सपशेल माघार घेतली.. मात्र अल्बर्टने त्या संधीचा फायदा घेऊन तिच्यावर काही अटी लादल्या. एकत्र राहायचं असेल तर १) माझ्याकडे वेळ मागायचा नाही २) माझ्या सोबत बाहेर यायचा आग्रह करायचा नाही. ३) मी थांबवेल त्यानंतर एक शब्ददेखील बोलायचा नाही ४) मी बाहेर जायला सांगेल त्यानंतर बेडरूम किंवा स्टडीरूम मध्ये एक क्षणदेखील थांबायचं नाही.


अशा गुलामीमध्ये देखील काही दिवस मिलेव्हाने संसार गाडा हाकू पाहिला.. मात्र अशक्य झाल्यावर तिने वेगळं व्हायचा निर्णय घेतला. १९१४ मध्ये महायुद्ध सुरू झालं. आइन्स्टाइन बर्लिन येथे रुजू झाला आणि मिलेव्हा दोन्ही मुलांना घेऊन झुरिक येथे परतली. एक दहा वर्षाचा आणि एक चार वर्षाचा मुलगा घेऊन मिलेव्हा झुरीकला परतली खरी.. पण संसाराचा गाडा हाकणे अवघड झालं. शिकवण्या घेऊन घर चालवू पाहत होती, मात्र पुरेसे पैसे मिळत नव्हते. १९१४ मध्ये एल्साला तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट मिळाला‌ होता, अल्बर्टला देखील घटस्फोट हवा होताच. मात्र यावेळी आपल्या अबोलीने ठाम भूमिका घेतली. जेव्हा कधी तुला नोबेल पारितोषिक मिळेल त्या वेळेस ती संपूर्ण रक्कम मला मिळेल अशी अट तिने घातली.‌ या अटीमधून दोन गोष्टी स्पष्ट होतात. १) संशोधनामध्ये मिलेव्हाचे योगदान होते २) आपण केलेलं संशोधन नोबेल पारितोषिकाच्या लायकीचं आहे, त्याला कधीनाकधी नोबेल मिळणार आहे हे तिला आधीच ठाऊक होतं.


१९१९ मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला आणि लगेच चार महिन्यात अल्बर्ट एल्साचा विवाह झाला. १९२२ मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईनला नोबेल देखील मिळालं. १९२३ मध्ये आईन्स्टाईन “बेट्टी” नावाच्या आपल्या सेक्रेटरीच्या प्रेमात पुन्हा ठार वेडा झाला. मात्र त्याचं हे प्रकरण एल्साने अतिशय मुत्सद्दीपणे हाताळलं. अल्बर्टच्या या रंगेल स्वभावाचा तिने स्वीकार केला आणि त्याला पुरेसं स्वातंत्र्य दिलं. तिला शास्त्रामधील काहीच कळत नव्हतं तरीसुद्धा अल्बर्टसाठी मोठमोठे कलाकार वाट पाहतात हे तिला खूप आवडायचं.‌ “मिसेस अल्बर्ट आईन्स्टाईन” या नावामुळे मिळणारा मोठेपणा तिला गमवायचा नव्हता. कुटुंबवत्सल, हसरी, आणि मुख्य म्हणजे “संस्कारी” ज्यू असल्यामुळे आईन्स्टाईनच्या घरच्यांना देखील ती खूप आवडायची. थोडक्यात आईन्स्टाईनसाठी ती आदर्श पत्नी ठरली.. आदर्श देखील व्यक्तीसापेक्ष ठरत असत ना..🤔


ज्या वेळेस नोबेल पारितोषिकाचे पैसे मिलेव्हाला द्यायची वेळ आली, तेव्हा आईन्स्टाईनने अट घातली की हे पैसे मी मुलांच्या नावावर सुरक्षित ठेवेल आणि त्याच्या व्याजावर या मायलेकरांनी जगावं. थोडक्यात या पैशाला तो पोटगीचं रूप देऊ पाहत होता. मात्र मिलेव्हाला पोटगी नाही, तिच्या संशोधनातील योगदानाचं स्वरूप म्हणून ते पैसे हक्काने हवे होते.‌ मिलेव्हाचं म्हणणं मान्य करण्यात आलं. मिळालेल्या पैशांमधून तिने एक घर आणि दोन चाळी खरेदी केल्या. घरामध्ये स्वतः राहून, चाळी भाड्याने देऊन मिळतील पैशात जगायची. शिवाय शिकवण्या सुरू होत्याच.


१९२५ मध्ये मिलेव्हाने संशोधनामध्ये माझी देखील भूमिका आहे हे मी जगभर सांगेल असं कळवलं. अल्बर्ट तिला उत्तर देतो, “तुझी धमकी वाचून मला हसायला आलं, कितीही बोंब मारली तरी तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यापेक्षा शांत बसणे फायद्याचं ठरेल.” १९२९ मध्ये मैत्रिणीच्या आग्रहाखातर तिने वर्तमानपत्रातील मुलाखतीत आईन्स्टाईनच्या संशोधनातील आपल्या योगदानाबद्दल सांगितलं देखील.. मात्र आईन्स्टाईन म्हणाला होता त्याप्रमाणे तिला कोणी गंभीरपणे घेतले नाही.😔


एडवर्ड वीस वर्षाचा झाला आणि त्याचा स्किझोफ्रेनियाचा आजार बळावला. त्याला घरी ठेवणं अशक्य झालं, प्रसंगी तो मिलेव्हावर शारीरिक हल्ला देखील करू लागला. त्याला उपचारगृहात ठेवावं लागलं. त्याच्या उपचारावर खर्च करता करता मिलेव्हाला सर्व विकावं लागलं. मात्र या काळात आईन्स्टाईन या तिघांशी कोणतेही संबंध ठेवले नाहीत. आर्थिक वंचनेमध्येच पुढील दिवस काढायला लागले. हान्स कमावता झाल्यानंतर या कुटुंबाला जरा बरे दिवस आले. ४ ऑगस्ट १९४८ रोजी मिलेव्हाने शेवटचा श्वास घेतला आणि अबोली कायमची अबोल झाली. तिच्या मृत्यूनंतर अल्बर्ट मिलेव्हा यांचा पत्रव्यवहार त्यांची सून, म्हणजे हान्सची पत्नी प्रसिद्ध करू पाहत होती. मात्र आइन्स्टाइन ट्रस्टने त्यावर आक्षेप घेतला होता.


मात्र आज मिलेव्हाला न्याय मिळवून देण्यासाठी महिला संघटना पुढं सरसावल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आइन्स्टाईनचे जीभ बाहेर काढलेलं जगप्रसिद्ध चित्र वापरून, मात्र आईन्स्टाईन ऐवजी मिलेव्हाचा चेहरा वापरून चित्र काढली जात आहे आणि या अशा लिंगभेदाधारीत अन्यायाविरुद्ध “जबान खोलो” अर्थात उघडपणे बोला असं आवाहन केलं जात आहे. त्या काळामध्ये अबोली मिलेव्हा उपेक्षित ठेवली असली तरी तिचा हा उपेक्षितपणा कालसापेक्ष ठरावा, आजच्या काळात तिला न्याय मिळावा हीच अपेक्षा..




तिला न्याय देणं म्हणजे आईन्स्टाईनवर अन्याय असं समजणं चुकीचं होईल.. कोणत्याही व्यक्तीला देवत्वाच्या भूमिकेत पाहिले की त्याची चिकित्सा करणं टाळलं जातं. आईन्स्टाईन ग्रेट आहेच आणि विज्ञानातील त्याच्या योगदानामुळे, अणूयुद्ध टाळण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नांमुळे ग्रेटच राहणार.. मेरी क्युरीवर जेव्हा अनैतिक संबंधाचे आरोप झाले तेव्हा आईन्स्टाईनने तिच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. लिझ माईटनर सारख्या शास्त्रज्ञेला आधार देण्यात देखील त्याची महत्त्वाची भूमिका होती. मात्र जगासाठी झटणारा हा माणूस वैयक्तिक आयुष्यात काही चुका करू शकतो.. आपण त्याच्या मर्यादा मान्य केल्या पाहिजेत. एडिसन, आईन्स्टाईन यांसारखे जीनियस देखील आपल्याप्रमाणेच मानव होते, आपल्याप्रमाणेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपुंनी त्यांना ग्रासलं तर त्यात काही नवल नाही.‌ यामध्ये टेस्ला किंवा मिलेव्हा यांच्यावर झालेला अन्याय दूर करणं, किमान त्याला वाचा फोडणं हे तर आपल्या हाती आहे ना.


आजची पोस्ट जरा जास्त लांबली आहे.. मात्र कधीकधी अस्वस्थता व्यक्त करताना शब्दांचे भान राहत नाही. सर्बीयामध्ये जन्मलेल्या अबोलीला भविष्यात न्याय मिळेल.. पण आपल्या देशातील कोट्यावधी अबोलींनी बाप, नवरा आणि मुलगा यांच्या आज्ञेत अजून किती वर्षे राहायचं आहे?? आज आपण अशा देशात राहत आहोत, ज्या देशात राज्य महिला आयोगाची सदस्य म्हणते की “मुलींनी मोबाईल नाही वापरले पाहिजे, त्यामुळे त्या पळून जातात.” ज्या देशातील न्यायाधीशाला बलात्कार पीडितेशी लग्न करशील का असं आरोपीलाच विचारताना काहीच वैषम्य वाटत नाही.. 😡 एक ना दोन.. हजारो उदाहरणे आहेत..‌ आज आहेत पण उद्या निश्चित नसणार.‌.. त्यासाठी जबान खोलो.. बोलत राहीलं पाहिजे.. कृती करत राहीलं पाहिजे👍


हे असे आहे तरी पण.. हे असे असणार नाही

दिवस आमचा येत आहे.. तो घरी बसणार नाही. ✊

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव