मोटिवेशनल स्पीकर आणि त्यांचा उच्छाद.

 मोटिवेशनल स्पीकर आणि त्यांचा उच्छाद.



मोटिवेशनल स्पीकर हा एक नवा व्यवसाय आज तेजीमध्ये आहे.. एका अर्थाने हा बिनभांडवली धंदा… हा.. ब्लेजर वगैरे लागतं, मात्र ते विकत घ्यावं असं काही नाही. शादी का लड्डू खाल्लेल्या अनेक जणांकडे धूळ खात पडलेले असतंच. दुसऱ्याला मोटिवेशन देण्यासाठी आपण आपल्या क्षेत्रामध्ये काही तरी उत्तुंग कामगिरी केली पाहिजे असं अजिबात नाही.. किंबहूना यातील अनेक लोक असे असतात जे आयुष्यात काहीच करू शकलेले नसतात आणि मग मोटिवेशनल स्पीकर झालेले असतात. 😂

तुमच्याकडे असावी लागते जेमतेम वकृत्व शैली.. (हो प्रभावी असावी असे मी अजिबात म्हणणार नाही कारण मी असे अनेक वक्ते पाहिले आहेत.. ज्यांच्या वक्तृत्वाचा अजिबात प्रभाव पडत नाही मात्र शासन दरबारी त्यांचं सेटिंग असल्यामुळे त्यांना शासकीय कार्यक्रमांमध्ये नेहमी बोलावलं जातं.) वाचनदेखील चांगल्या पातळीचं असावं असंही काही नाही.. अडचणीचे प्रश्न आल्यावर आपण पुढच्या भेटीमध्ये याच्यावर बोलू असं म्हणून भागत असतं.

तुमचं व्यक्तिमत्त्व दिसायला खूप छान असायला हवं असं देखील काही नाही.. अनेक तुपकट चेहऱ्याचे वक्ते तोंडावर अजून पावशेर तूप चोपडून त्याच्यापेक्षा जास्त गिळगिळीत हसत आपली बोलंदाजी चालू ठेवतात.. तर काही वक्ते आपला आधीच उग्र असलेला चेहरा हावभावांमुळे अधिक भयानक करत लोकांचे लक्ष खेचत राहतात. आपले लक्ष जरासं विचलित झालं तर कदाचित हा राक्षस आपल्याला खाऊन टाकेल या भीतीने लोकही त्याच्याकडे एकटक पाहत राहतात.‌ अर्थात स्त्री वक्ता असेल तर एकटक पाहण्यामागे माझ्यासारख्याचं वेगळं देखील कारण असू शकतं.‌❤️

वक्ता पुरुष असेल तर त्याने दाढीचा फ्रेंच कट ठेवणे, किंवा डोक्याचा संपूर्ण टक्कल करणे गरजेचं असल्याबाबत जणू काही अलिखित नियम झाला आहे.‌ जणूकाही त्याशिवाय प्रेरणेचं संक्रमण होणारच नाही. जुन्या काळात त्या बिचाऱ्यांचा एक हात कॉर्डलेस माईक पकडण्यामध्ये व्यग्र असायचा. त्यामुळे त्यांच्या अभिनय क्षमतेवर काही मर्यादा यायच्या.. मात्र आता आलेल्या नवीन हँड्स फ्री माईक मुळे त्यांच्या अभिनयाचा वारू मोकाट सुटतो.. आणि त्या माईकमुळं अजागळ ध्यानदेखील थोडीशी प्रोफेशनल वगैरे दिसतात. प्रभू दयाळू आहे सांगताना हालेलुया करणाऱ्या पाद्र्यापेक्षा यांचं एकपात्री रंगलेलं असतं😂

आवाजाचा चढ-उतार करताना परिणाम साधावा म्हणून इतका आक्रस्ताळेपणा करतात की जणूकाही रेडबुलचे दोन कॅन पिऊन आले आहेत. सकारात्मक विचारांचा डोस पाजताना बहुतेकांचा एकच डायलॉग असतो.. ज्यावेळी तुम्हाला प्रेरणेची गरज वाटेल त्यावेळी तुम्ही आरशासमोर जा आणि त्या आरशामध्ये दिसणाऱ्या माणसाला म्हणा.. होय तूच आहेस तो माणूस जो हे जग बदलू शकतो. आजवर अनेक ठिकाणी “थोबाड बघ आरशात” असं ऐकलेल्या इसमांना देखील.. अंदाज आयुष्याचा वाटे खरा असावा.. असं काही क्षण वाटू लागतं 😂.

मोटिवेशनल स्पीकर म्हणजे आमच्याकडे ऑर्डरनुसार बुंदी पाडून मिळेल या स्वरूपाचं काम. इथे वयाची अट नसते.. आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं यावर व्याख्यान द्यायला बावीस ते वीस वर्षाची मुले देखील चालू शकतात.. किंवा पुलंचा हरितात्या देखील यशस्वी उद्योजक कसं व्हायचं यावर आता बोलू शकेल. वक्त्यांना भरपूर मानधन दिले तर ते लग्नामधील आहेराची पाकीट पुकारायचं काम देखील करतील. देणाऱ्याचे हात हजारो वगैरे लिबलिबीत बोलून ऐकणाऱ्यांना वीट आणतील. इथं तत्व वगैरे अशी काही भानगड नसते. दुपारी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चार्जिंग करताना अपयशाने खचून जायचं नसतं हे सांगताना कदाचित तुम्हाला बेडकाची खालील गोष्ट सांगणार..‌ (तुम्ही पण नीट वाचा.. तुम्हाला पण उपयोगी पडेल 😂)

एक बेडकांचं गाव असतं, त्या गावामध्ये प्रमुख कुणाला नेमावं यावर चर्चा होते.. आणि असं ठरतं की गावाबाहेरील डोंगरावर जो बेडूक सर्वात प्रथम चढून जाईल त्याला आपण प्रमुख नेमू.. गावामध्ये ठिकठिकाणी या स्पर्धेची पत्रकं लावली जातात..‌. ठरलेल्या दिवशी धावण्याची स्पर्धा सुरू होते. पन्नास साठ बेडकांनी स्पर्धेत भाग घेतलेला असतो. काही अंतर पुढे गेल्यावर जे म्हातारे बेडूक असतात ते थकून जातात.. आणि बोलू लागतात.. आपण कधीच बेडकाला डोंगरावर चढताना पाहिलं नाही, आज काय जमणार.. त्यांचं बोलणं ऐकून धावणारे इतर काही बेडूक देखील तिथंच थांबतात..

मात्र वीस-पंचवीस बेडूक अजून धावत असतात. चढ सुरु होतो.. काही जाड्याजुड्या चरबीयुक्त बेडकांना धाप लागते.. ते मोठ्याने बोलू लागतात.. हा डोंगर चढणं हे शक्यच नाही..‌ त्यांचं बोलणं ऐकून धावणारे इतर काही बेडूक देखील तिथेच थांबतात.. शेवटचे पाच बेडूक उरलेले असतात.. आणि खडी चढण सुरु होते.. एक बेडूक म्हणतो खड्ड्यात गेले ते नेतृत्वपद.. अशा खड्या चढणीवरून पाय घसरला आणि जीव गेला तर काय फायदा.. तो तिथेच थांबतो आणि त्यांचं बोलणं ऐकून धावणारे इतर तीन बेडूक देखील तिथेच थांबतात.. मात्र एक बेडूक तो डोंगर चढून जातो.. त्याला प्रमुख पद मिळते..

तुम्हाला माहित आहे का तो डोंगर चढून का गेला.. (मोठा नाटकीय पॉज) कारण….(आता सर्वात जवळ बसलेल्या दोघातिघांच्या डोळ्यात डोळे घालायचे) कारण.. तो बहिरा होता.. इतका वेळ जे काही नकारात्मक बोललं गेलं ते त्याला समजलं नव्हतं.. त्यामुळे त्याचं मनोधैर्य टिकून होतं. त्यामुळेच तो जिंकू शकला.. आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर इतरांच्या बोलण्याकडे असंच दुर्लक्ष करावे लागेल आणि आपली वाट चालत राहावी लागेल. ✊✊ व्याख्यान समाप्त.. टाळ्यांचा कडकडाट होतो.. स्पर्धापरीक्षा उमेदवार फुल टू चार्ज झालेले असतात.. व्याख्यान संपल्यानंतर देखील त्यांचा गराडा आपल्या वक्त्याभोवती असतो.

(पूर्वी कधी माझ्या व्याख्यानानंतर माझ्याभोवती असा गराडा पडला तर मला वाटायचं की आपलं व्याख्यान यशस्वी झालं आहे.. पण मोटिवेशनचे फसलेले दोन-तीन प्रयोग पाहिल्यानंतर आता लक्षात येते की समाजात अशा प्रकारची काही लोकं असतात जे व्याख्यान कितीही रटाळ झालं तरी नंतर वक्त्यासोबत सेल्फी घ्यायला गर्दी करतात. कदाचित त्यातच त्यांचे समाधान होत असावे.. 😂 थोडक्यात माझं विमान जमिनीवर आणण्याचं एकतरी चांगलं काम या मोटिवेशनल स्पीकर कडून झालं आहे.🙏)

ऑर्डरप्रमाणे बुंदी.. हेच स्पीकर संध्याकाळी एखाद्या परिसंवादात भाग घेताना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी आपली कुवत ओळखून लवकर बाहेर पडावे यासाठी पुन्हा बेडकाचीच गोष्ट सांगणार. बेडूक कितीही फुगला तरी बैल होऊ शकत नाही या प्रकारची नकारात्मक पण थेट भाषा वापरायची त्यांना सोय नसते. मात्र बेडकाची दुसरी एक खरीखोटी गोष्ट त्यांच्यासाठी धावून येते.‌ आणि मग यांचं हावभाव नाट्य सुरू होतं. (ही गोष्ट पण तुम्हाला उपयोगी पडू शकते बरं का)

एका शास्त्रज्ञाने प्रयोग केला.. गॅसवर एक मोठं घमेलं ठेवलं त्यात पाणी ठेवलं आणि त्यात दोन बेडूक ठेवले आणि गॅस चालू केला. पाणी तापताना दिसताच एका बेडकाने लगेच उडी मारली आणि पळून गेला.. मात्र दुसर्‍या बेडकाने लगेच उडी मारली नाही.. बेडकामध्ये एक विशेष क्षमता असते. ते आपल्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानाशी विशिष्ट मर्यादेपर्यंत जुळवून घेऊ शकतात.. पाणी अधिक तापत होते आणि बेडूक अधिक जुळवून घेत होता..

मात्र एका मर्यादेनंतर बेडकाची शक्ती संपली. यापेक्षा जास्त तो वाढत्या तापमानाशी जुळवून घेऊ शकत नव्हता.‌ त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र तो उडी मारू शकला नाही.. वाढत्या तापमानाशी जुळवून घेता घेता त्याने त्याची सर्व शक्ती गमावली होती.. अखेर त्याचा मृत्यू झाला.. या गोष्टीचं तात्पर्य असं की आपल्याला आपली क्षमता समजली पाहिजे आणि आपली शक्ती शिल्लक असतानाच आपण योग्य वेळी बाहेर पडलं पाहिजे.. 😫 आपली भूमिका सोयिस्करपणे बदलायला मोदी कदाचित यांच्याकडूनच शिकले असावेत.. 😂😂 दोन्ही व्याख्याने ऐकली असतील तो विचार करेल ही साला.. स्पर्धा परीक्षा देऊ की नको?

आमच्या एका प्रशिक्षणामध्ये तणावमुक्त कसं जगायचं या विषयावर व्याख्यान द्यायला एक महाशय आले होते (यांचे पण सेटिंग असणार हं नक्की) त्यांच्याकडं तणावावर मात करण्याची केवळ एकच युक्ती होती ते म्हणजे खळखळून हसणे.. त्यांनी आम्हाला काही विनोद सांगितले.. ते एवढे सुमार दर्जाचे होते, किंवा इतक्यावेळा ऐकलेले होते की प्रशिक्षणार्थ्यापैकी केवळ सुमार बुद्धीचे लोकंच त्यावर हसू शकले..(आणि व्याख्यान संपल्यावर सेल्फी घ्यायला गेले) मात्र सर्वात जास्त आणि सर्वात मोठ्याने हसण्यात वक्ते महोदयांचा पहिला क्रमांक होता.. आम्हाला हसवण्यासाठी विनोद सांगताना त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेपेक्षा जास्त हावभाव केले, मात्र तरीही त्यांना अपेक्षित परिणाम साधेना… त्यांचे एकामागून एक हुकमी विनोद आज अपयशी ठरत आहेत हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावरच तणाव जाणवू लागला होता 😂😂

तुम्हाला मोटिवेशनल स्पीकर म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला खोटं बोलता आलं पाहिजे. आपल्या बोलण्याने आयुष्यात बदल झालेली खोटी उदाहरणं तुम्हाला देता आली, तर त्याचा श्रोत्यांवर चांगला परिणाम होतो..‌ आणि भविष्यात त्यातूनच एखादी सक्सेस स्टोरी जन्माला येऊ शकते 😂 आपल्या व्याख्यानांमध्ये तुम्हाला जर इंग्रजी किंवा इतर भाषांमधील म्हणींचा किंवा गोष्टींचा वापर करता आला तर बेस्टच.. पण एवढा अभ्यास नसला तरी अकबर-बिरबलाच्या, इसापनीतीच्या गोष्टी योग्य ठिकाणी सांगता आल्या तरी काम होतं..‌ व पु काळे यांची वाक्यदेखील याबाबत हुकमी एक्का पडतात.. 😂

व्याख्यानांमध्ये स्लाईड शोचा वापर करण्याची सोय असेल (हल्ली मोस्टली असतेच) तर काम अधिक सोपं होतं. जगात कुणी तरी बनवलेल्या चांगल्या व्हिडिओंचा अनधिकृत वापर तुम्हाला इथं करता येतो.. याशिवाय खानदानी जडीबुटीवाले दवाखान्यामध्ये जसे वैदू मंडळींनी सिने कलाकारांसोबत, सेलिब्रिटींसोबत, राजकीय व्यक्तींसोबत फोटो काढून मांडलेले असतात, तसे आपले फोटोदेखील वेळोवेळी काढून घ्यावेत. प्रसंगी गयावया करून आपण मिळवलेले हे फोटो नंतर आपण त्यांचे मार्गदर्शक कसे आहोत हे सांगण्यासाठी उपयोगी पडतात 😂

आजवर मी अनेक मोटिवेशनल स्पीकर पाहिले. त्यातील बहुतांशी अंकशास्त्र किंवा अक्षर शास्त्र यावर विश्वास ठेवणारे मला आढळले.. आपल्या नावामध्ये त्यासाठी त्यांनी बदल देखील करून घेतला आहे. म्हणजे यांचा स्वतःच्या मन, मनगट, मस्तक यावर विश्वास नाही, हे तुम्हाला काय प्रेरणा देणार… आणि यांच्या पोपटपंची मधून काही क्षणांसाठी मिळालेली प्रेरणा तुम्हाला किती पुरणार.. पण सध्या प्रेरणेचे मार्केट तेजीमध्ये आहे.. आणि लोकांना खरी प्रेरणास्थान माहीत नाही तोवर हे असेच चालू राहणार..

माझी एक मैत्रीण रोज अग्निहोत्र करते. मी तिला नेहमी चिडवत असतो म्हणून तिने एक दिवस मला ऑनलाइन मीट मध्ये सहभागी व्हायला सांगितलं. एकदा येऊन तर बघ टाईप नेहमीचं.. साधारण नऊशे ते साडेनऊशे लोक त्यामध्ये सहभागी होते. मला अर्थातच तिथे सुरु असलेल्या भोंदूगिरीमध्ये रस नव्हता मात्र मैत्रिणीच्या धाकामुळे मीट मधून बाहेर देखील पडता येत नव्हतं. म्हणून मी सहभागी व्यक्तींचे निरीक्षण करायला लागलो.. आणि डॉ. दाभोलकर नेहमी मंगेश पाडगावकर यांची एक कविता म्हणायचे त्याची मला आठवण आली..

माणसे खपाट खंगलेली
आतून आतून भंगलेली
अदृश्य शक्तीने तंगलेली
आधार पाहिजे

मीट संपल्यानंतर मैत्रिणीने मला विचारले कसं वाटलं तुला.. मी तिला तासभर काय निरीक्षण केलं ते सांगितलं.. अग हे सगळी आत्मविश्वास गमावलेली माणसं आहेत, कदाचित त्यांना गरज असेल अशा आधाराची, मला नाही.. (खूप शहाणा आहेस एवढ्या वाक्यावर सुटका झाली नशीब 😂) पण आता त्या सर्व लोकांचे चेहरे डोळ्यासमोर आले तर लक्षात येते की प्रेरणेचे मार्केट दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आणि असे गल्लाभरु वक्ते त्यांचा गल्ला भरत राहणार.

थोरा मोठ्यांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी, निसर्गातून प्रेरणा घ्यावी.. पण नाही.. आम्हाला सगळं पॉलिश लागतं.. आणि ते ही विनासायास😫 शिवाय अशी सत्रं कार्यालयात आयोजित करताना ५० टक्के सेटिंग ठरलेली असते. कर्मचाऱ्यांना प्रेरणा पाजताना अधिकाऱ्यांना लाभ होत असतो. किमान त्यांना तरी त्या दिवसापुरती प्रेरणा मिळत असेल. 😂 आत तुम्ही एवढी पोस्ट वाचली आहे तर माझ्याकडून फ्री प्रेरणा.. तुम्हाला स्वतचं प्रेरणास्थळ स्वतः बनायचं आहे.. आणि तुम्ही हे करू शकता.. होय.. तुम्ही हे करू शकता.. नक्कीच करू शकता.. मला पूर्ण खात्री आहे की तुम्हीच हे करू शकता.. आणि तुम्ही ते करणारच.. आत्मनिर्भर बना हो…‌ 

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव