महाकवी वामनदादा कर्डक : एक वादळवारा


 महाकवी वामनदादा कर्डक : एक वादळवारा


"माणसा इथे मी तुझे गीत गावे,

असे गीत गावे तुझे हित व्हावे..

असे तुझे माझे नाते जडावे

तुझ्या संकटाशी इथे मी लढावे..‌

माणसा इथे मी तुझे गीत गावे...." आपली प्रतिभावंत लेखणी आणि आपली धारदार वाणी माणसाच्या कल्याणासाठी झिजवणाऱ्या वामनदादा कर्डक यांचं जन्मशताब्दीवर्ष येत्या १५ ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. शाहिरी जलसा हे आंबेडकरी चळवळीच महत्त्वाचं अंग. नव्या युगाचे नवे विचार गावागावात पोचवण्याचं काम महाराष्ट्रातील लोकशाहीरांना जाईल.. आणि या शाहिरी परंपरेचा मानबिंदू म्हणून वामनदादा यांचं नाव आदराने घेतले जाईल...फक्त शाहीर नाही तर महाकवी उपाधीने गौरवण्यात येणारे वामनदादा एकमेवच..‌ 


बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या दहा भाषणाचे काम शाहीरांचे एक गाणे करते.. दलीत, श्रमिक, शेतकरी वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडत.. समतेचा, जातीवर्गदास्यअंताचा, स्त्रीस्वातंत्र्याचा प्रचार करत आणि संयुक्त महाराष्ट्राचा जागर करत शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर यांच्या डफांनी महाराष्ट्रात रान पेटवलं. वामनदादा कर्डक हे देखील त्यात आघाडीवर होते. दुर्दैवाने अमर शेख, गवाणकर, अण्णाभाऊ यापैकी कुणालाच दीर्घायुष्य लाभले नाही. सत्तरीच्या दशकापूर्वी वामनदादा वगळता इतर सर्व तोफा कालवश झाल्या. मात्र त्यानंतर तीनचार दशकं वामनदादा यांची मुलुखमैदान तोफ धडधडत  होती.. इतरांना प्रेरणा देत होती. नवी पिढी घडवत होती.


नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील देशवंडी नावाच्या छोट्या खेड्यात १५ ऑगस्ट १९२२ रोजी तबाजी आणि सईबाई कर्डक या जोडप्याच्या पोटी वामनदादांचा जन्म झाला. घरामध्ये एक मोठा भाऊ, एक धाकटी बहीण.‌ सर्व घर शेतीवर अवलंबून, मात्र शेती कोरडवाहू आणि केवळ उदरनिर्वाह  प्रकारची. शेतीवर घरचेच भागायचे नाही, विकून चार पैसे मिळवणे दूरच. त्यामुळे आईसोबत तीनही पोरं रानात जाऊन, लाकडे गोळा करून, त्यांच्या मोळ्या बांधून, सिन्नरच्या बाजारात विकायचे आणि त्यातून तेल, मीठ मिरचीचे पैसे मिळवायचे. वडील देखील बिड्या वळायचं काम करायचे. तरीही पाऊसकाळात घरात खायला दाणा असेल त्याची शाश्वती नाही. 


पोटापाण्याची लढाई सुरु असताना साहजिकच या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे परवडणारं नव्हतं, आणि तेव्हा शिक्षणाचे महत्त्व वाटलं देखील नव्हतं. वामनदादा दोन-तीन वर्ष  शाळेमध्ये गेले परंतु तिथं काय त्यांचं मन रमलं नाही की त्यांना तिथं काही गमलं नाही. शिक्षणाला रामराम केला गेला.‌ गुरं राखायचं काम करता करता कुठे जत्रांमध्ये कुस्त्या मारुन चार पैसे मिळवायचे. गावात मिळेल ते मजुरीचे काम सुरू केलं.‌ त्या काळातील प्रथेप्रमाणे विसाव्या वर्षीच त्यांचं लग्न देखील झालं.‌ मात्र पहिली पत्नी पदरात एक पोरगी टाकून सोडून गेली, आणि आजारपणात मुलीचं देखील निधन झालं. दुःखाचा डोंगर एकापाठोपाठ एक.. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी वामनदादांनी गाव सोडलं आणि ते आईला सोबत घेऊन मुंबईला आले.


मुंबईत आल्यावर नाना प्रकारची कामं करून पाहिली, कधी कोळसा वखारीमध्ये मजुरी केली, कधी चिक्की, आईस्क्रीम विकायचं काम केलं. काही दिवस टाटा ऑईल मिल्समध्ये तर काही दिवस शिवडीमध्ये गिरणी कामगार म्हणून काम केलं. बीडीडी चाळीमध्ये एक खोली मिळाली, तिथं पथारी पसरली होती. तिथे त्यांची ओळख झाली समता सैनिक दलासोबत, आणि विश्वसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत. समता सैनिक दलामार्फत बाबासाहेबांच्या सभेचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असे. आजच्या काळात अक्षरओळख असलीच पाहिजे हे समजल्यामुळे ते लिहायला, वाचायला शिकू लागले. 


मायानगरी मुंबईमध्ये तेव्हा चित्रपटसृष्टीचं खूप आकर्षण होतं. तालीम खेळून कसलेलं शरीर असलेले वामनदादा रूपाने देखील देखणे. त्यांना वाटायचं की हीरो म्हणून भूमिका भेटली पाहिजे. यासाठी अनेक स्टुडिओमध्ये हेलपाटे मारले. एक्सट्रा किंवा मॉब सीनमधील भूमिका मिळायच्या, पण त्याने ना पुरेसे पैसे मिळायचे ना समाधान. एक दिवस असेच फावल्या वेळात राणीच्या बागेमध्ये बसले असताना त्यांना एका हिंदी गीताचे विडंबण करावं वाटलं. एकामागोमाग एक ओळी सुचत गेल्या आणि गाणे तयार देखील झालं. वामनदादांनी कुणाचीही भीड न बाळगता लगेच राणीच्या बागेमध्येच पूर्णतः अनोळखी गर्दीसमोर ते सादर देखील केलं. विशेष म्हणजे लोकांना ते प्रचंड आवडलं. अशा रीतीने राणीच्या बागेमध्ये १९४३ साली एका २१ वर्षाच्या कवी आणि गायकाचा जन्म झाला. पुढे हा कवी दहा हजारांहून अधिक गाणी, गझल, पोवाडे आणि कविता लिहिणार होता.


त्यांच्या या प्रतिभेचा आंबेडकरी जलशांमध्ये लवकरच वापर होऊ लागला. आणि हा हिरा अधिकच तेजाने चमकू लागला. बाबासाहेबांच्या भाषणाआधी वामनदादा यांचं गाणं असा प्रयोग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाला.‌ बाबासाहेबांनी त्यांच्या गाण्याची स्तुती अनेकवेळा भाषणातून केली आहेच. वामनदादांची संपूर्ण कारकीर्द ही एका विशिष्ट दिशेने झालेली दिसते. एक विचार मांडायचा होता, लोकांना आवडेल असं गाण्यापेक्षा वेळप्रसंगी कडू औषध पाजायची त्यांची भावना होती. आंबेडकरांकडे देव म्हणून न पाहता आदर्श म्हणून पाहावं, भक्त नाही तर अनुयायी बनावं असा त्यांचा प्रयत्न होता.


त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात कोणत्याही देवाला न वंदन करता केवळ मानवाला वंदन करून व्हायची...  

"वंदन माणसाला, वंदन माणसाला

दे कायेचे अन मायेचे चंदन माणसाला ..‌"

वामनदादांच्या लेखणीमध्ये प्रचंड धार होती. व्यवस्थेला प्रश्न विचारताना ते कुणाची हयगय करत नसत. "ये आझादी झुठी है, अभी देश कि जनता भुकी है" असे म्हणणारे अण्णाभाऊ आणि उद्योगपतींप्रमाणेच सामान्य जनतेला देखील वाटा मागणारे वामनदादा, दोघांची एकच नाळ...  वामनदादा म्हणतात

"सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?

सांगा धनाचा साठा अन् आमचा वाटा कुठाय हो?

घाम शेतात आमचा गळे, चोर आयतच घेऊन पळे

धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठाय हो? सांगा धनाचा....

इथ बिऱ्‍हाड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर

या दुबळीचं धुडकं-फडकं धाटा कुठाय हो? सांगा धनाचा....

शोधा सारे साठे चला, आज पाडा वाडे चला

वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठाय हो?

सांगा धनाचा साठा अन् आमचा वाटा कुठे आहे हो."


असा कडक जाब विचारणारे वामनदादा प्रसंगी अगदी साध्या सोप्या शब्दांमधून डोळ्यापुढे चित्र उभं करत श्रोत्यांच्या काळजामध्ये हात देखील घालू शकतात. 

"पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं

लयी नाही मागत भर माझं, इवलंसं गाडगं

पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं...... 

काळानं केलं काळं, जातीचं विणलं जाळं

पाण्याचा घोटासाठी तळमळतय माझं बाळं

पाज आम्हाला पाणी, नंतर डोळं फाडं गं

पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं..... "

हे गाणे ऐकताना श्रोते, मग ते कोणत्याही जातीचे असेनात, आसवांनी चिंब भिजून गेल्याशिवाय राहत नसत.


समता सैनिक दलामधून त्यांच्या अभिनयाची हौस भागली गेली. ललाट लेख नावाच्या नाटकामध्ये घुमा नावाच्या पात्राची त्यांनी भूमिका केली होती. मात्र त्यांना तरी ओळख आणि लोकप्रियता मिळाली ती जलश्यामध्येच..  वामनदादांचे कार्यक्रम एवढे हिट होऊ लागले की कधीकाळी संघर्ष करायला लावणारे सिनेजगत आता त्यांना मानाने बोलावू लागले. सांगते ऐका मधील सुप्रसिद्ध गाणं "सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला" हे वामनदादांनी लिहीलं आहे. याशिवाय "चल गं हरणे तुरू तुरू", "ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा" यांसारखी प्रसिद्ध चित्रपटगीते वामनदादांच्या लेखणीतूनच उतरली आहेत.


अर्थात तळागाळातील लोकांमध्ये काम करायची सवय लागल्यावर वामनदादा चित्रपटाच्या जगात जास्त दिवस रमले नाहीत. त्यांनी चळवळीवर आपला जोर लावला. वामनदादा आपल्या गाण्यातून दुर्दम्य आशावाद प्रकट करतात, ज्यातून चळवळीत काम करणाऱ्या युवकांना आजही प्रेरणा मिळते. 

"तुफानातले दिवे हो आम्ही तुफानातले दिवे

तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे.

हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा

ह्या वाऱ्‍याने मावळणारी जात आमुची नव्हे.

तुफानातले दिवे हो आम्ही तुफानातले दिवे"

हे गाणे असो किंवा 

"काल भीमाने तुकडे केले मनुस्मृतीच्या सापाचे

उगीच आता भिऊ नका या सापाच्या कातीला." 

चळवळीला बळ देण्याचं, धीर देण्याचं काम वामनदादांची गाणी करत असतात. 


गेल्या काही दशकात आंबेडकर चळवळीची जी अवस्था झाली ती पाहून त्यांच्यातील कार्यकर्ता व्यथित होत होता.. मात्र निराश ना होता ते स्त्रीवर्गाला ही चळवळ हातात घ्यायचं आवाहन करतात. 

"तरुण आपले बसू लागले लपून लुगड्यामधी गं

केस तयांचे फसू लागले बाळ्या बुगड्यामधी गं

जोम तयांचा झाला शिळा, कुठे दिसेना झेंडा निळा

मंजुळा, पाजळ आपुला विळा चल गं रणामधी. "


बाबासाहेबांचे नाव घेऊन स्वतःची पोट भरणाऱ्या राजकारणी मंडळींवर वामनदादांचा चाबूक त्वेषाने चालतो. 

"भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते

तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.

वाणीत भीम आहे, करणीत भीम असता

वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते"


काम कमी मात्र श्रेय घ्यायला पुढे असणाऱ्या बोगस नेत्यांना वामनदादा अप्रत्यक्षपणे सुनावतात. इथे भीम हा भीमाई ..माता माऊली बनते. 

"तुझीचं कमाई आहे गं भीमाई

कुणाचेच काही इथे कष्ट नाही

लाभले ना जेथे प्यावयास पाणी, ज्ञानाची धारा अशा माळरानी

तुझ्याच प्रतापे आणलीस आई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही

कालचे रिकामे, आताचे निकामे, जगतात आई तुझियाच नामे

इथे गीत वामन खरे तेच गाई , कुणाचेच काही इथे कष्ट नाही"


वामनदादांना कार्यक्रमांमध्ये बोलवण्यात राजकीय लोकांची पंचायत होऊ शकत असे. कारण त्यांच्या या खऱ्या गाण्यातून कधी आपल्यालाच फटके मिळू शकतील हे सांगता येणं अवघड.

"तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, 

समाजाचं काय रे गड्या ह्या देशाचं काय.."

गाताना वामनदादा आपल्याला चारचौघात असा प्रश्न विचारू शकतील ही भीती.


निवडणुका आल्या की पैश्याचा बाजार सुरू होतो, तेव्हा वामनदादांचा डफ बोलू लागतो 

"अशा दीड दमडीच्या पायी

माझा समाज विकणार नाही"

एकदा तर चक्क विधानसभा निवडणूक आखाड्यामध्ये देखील वामनदादांनी उडी घेतली. पैशाची अर्थातच बोंब होती, प्रचारासाठी कुठून तरी एक जीप उपलब्ध झाली. मात्र त्यांचे कार्यकर्ते सायकलवर फिरून त्यांचा प्रचार करत होते. प्रचार सभेमध्ये देखील भाषण कमी आणि गाणी जास्त असायची. प्रस्थापित व्यवस्थेमध्ये वामनदादा निवडून येणे अशक्य होतं आणि झालंही तसंच. डिपॉझिट पण जप्त झाले.  


अश्या अवलिया फकिरासोबत संसार करणे किती अवघड.. घरात तव्यावर शब्द टाकता येत नाहीत, पीठ लागतं.  साहजिक त्यांची पत्नी शांताबाई कर्डक या संसारगाडा रेटताना मेटाकुटीला आल्या असणार. मात्र त्यांची नाराजी दूर करणे वामनदादा संख्या अवलियाला काय अवघड असणारं. वामनदादा त्यांना "खडमी" या नावाने हाक मारायचे. एकदा त्यांच्याच वस्तीत कार्यक्रम सुरू होता, वामनदादांनी त्यांच्याकडे पाहून गाणे म्हणले.

"असेच एकाकी गेले सासूचे डोळे, 

अशीच वामनची सून पलंगी लोळे. 

सासूची गादी आता आली पलंगाखाली, 

अन् सूनबाई हसली गाली, 

सासूबाई म्हातारी झाली."

हे म्हणत असताना त्यांच्या नेहमीच्या फुल टू फिल्मी स्टाइलने एका गुडघ्यावर बसलेल्या वामनदादांनी पत्नीच्या दिशेने इशारे केले आणि  त्या चारचौघात गोऱ्यामोऱ्या झाल्या होत्या.


वामनदादांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात डॉ. रविचंद्र हडसनकर यांनी त्यांची एक आठवण सांगितली. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील एकतरी गाणे लता मंगेशकर यांनी गावे, अशी वामनदादांची खूप इच्छा. त्यासाठी वामनदादा आणि हडसनकर लता मंगेशकर यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. तिथं त्यांचं जेवण झालं. मात्र गाणे मिळाले नाही. "तुम्ही दगडांचीच गाणी गा, माणसाची गाणी नका गाऊ." अशा स्पष्ट शब्दात वामनदादांनी लता मंगेशकर यांना तोंडावर सुनावले होते.


मानधन ठरल्याशिवाय कार्यक्रम ना करणारे, स्वतःला चळवळीचे शाहीर म्हणवून घेणारे अनेक आपल्याला माहीत. मात्र त्यांची गुणवत्ता वामनदादांच्या पासंगाला देखील पुरणार नाही. बिदागी न ठरवता हजारो कार्यक्रम करणारे वामनदादा. त्यांच्या अहमदनगरच्या कार्यक्रमाचा किस्सा आहे. कार्यक्रम रंगात आला होता, तेव्हा वामनदादांचा कार्यक्रम सुरू आहे हे ऐकून तिथं कार्यक्रमाला दोन भंते मोठ्या आशेने उपस्थित झाले. त्यादिवशी कार्यक्रमातून गोळा झालेले सर्वच्या सर्व ३००० रुपये त्यांनी भंतेंना देऊन टाकले. विशेष म्हणजे त्यादिवशी परत जाण्यासाठी बसभाड्यापुरते देखील पैसे वामनदादांकडे नव्हते. तरी मनाची ही दिलेरी... आम्हा घरी धन.. शब्दांचीच रत्ने


ही रत्ने उधळताना त्यांनी गझलचा देखील चांगला वापर केला. वामनदादा हे उत्कृष्ट गझलकार होते. त्यांनी २५० पेक्षा जास्त हिंदी, मराठी गझल लिहिल्या आहेत. 

"कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले, 

तन मन तुलाच माझे आले शरण म्हणाले." 

या सारखी भावुक गझल असो किंवा

"सर झुकानेवाले तेरा सर क्या है

सर में तेरे भीम का असर पैदा हो

मारनेवालो के हाथ रोक सके

हो तो ऐसा जानेजिगर पैदा हो

पैदा हो तो भीमसा नर पैदा हो

एक नया आंबेडकर पैदा हो" 

यासारखी आक्रमक.. त्यांनी गझल हा प्रकार लीलया हाताळला. मात्र त्यांचे नाव गझल निर्मिती क्षेत्रात काहीसे उपेक्षित राहिले आहे.


"चांदण्याची छाया कापराची काया,

माऊलीची माया होता माझा भीमराया"

असं बाबासाहेबांचं वर्णन अतिशय तरल काव्यात्मक शब्दांमध्ये वामनदादा करतात. त्याच वेळी

"भीम हा सात ठीगळाच्या बंडीचा खिसा होता" असं वास्तववादी वर्णन देखील त्यांच्याकडून येतंच. त्यांचा हा हिरो मार खाणारा देखील असतो. ते म्हणतात. 

"पाहिला भीम आम्ही रामरथ ओढताना

पाहिला गुलामीची बेडी तोडतांना

पाहिला गोदातीरी मार खाणाऱ्यामधी

पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यामधी." 

त्यांच्या नायकाचे हे मोठेपण आहे की तो मार खाऊन देखील लहान होत नाही.. उलट संकटात असलेल्या प्रत्येकाला आपला साथीदार वाटतो. 

"जरी संकटाची काळरात होती

तरी भीमराया तुझी साथ होती."


आज त्यांची गाणे गाऊन अनेक कलाकार चरितार्थ चालवत आहेत. 

"पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली

चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली"

हे गाणे किंवा

"जखडबंद पायातील साखळदंड

तडातड तुटले तू ठोकताच दंड 

झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे 

उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे" 

ही गाणे झाल्याशिवाय एकही भीमजयंती पूर्ण होत नाही. "जिथं जातो तिथं पेरीत जातो चिल्यापिल्यांना चारा" म्हणणारे वामनदादा आज खरच अनेक पिलांना चारा पुरवत आहेत.‌


वाटचाल, मोहळ, हे गीत वामनाचे हे वामनदादांचे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत तर 'माझ्या जीवनाचं गाणं' या नावाने आत्मवृत्त देखील प्रकाशित झालं आहे. आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी लेखन आणि गायन सुरू ठेवलं.  १९९३ मध्ये वर्धा इथं झालेल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्षपद भूषवण्याचा सन्मान वामनदादांना मिळाला आहे. १५ मे २००४ साली त्यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १५ मे २००८ रोजी पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलं होतं. नाशिक येथे त्यांच्या नावाने स्मारक विकसित करण्यात येत आहे. औरंगाबाद विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन सुरू आहे.


"कोपी कुपी सोडून साऱ्या माड्या लोळविणारा

मी वादळ वारा..मी वादळ वारा.."

वादळवाऱ्याप्रमाणे उभं आयुष्य जगलेल्या वामनदादांना अभिवादन करताना आजच्या काळात त्यांची कमतरता खूप भासते. आज कोपी कुपींना कोणी वाली नाही. माड्यांना मात्र संरक्षण मिळत आहे. विस्थापितांचे नेते म्हणून घेणारे ल़ोक प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.. तूप साय खात आहेत आणि त्यांच्या समर्थकांना हा विश्वासघात वाटत नाही, चीड देखील येत नाही. आपण जिवंत असू तर चीड आली पाहिजे..  वामनदादा म्हणतात,

तुम्हाला चीड यावी, तिची ठिणगी उडावी

भुकेल्या माणसाची भूक जाळीत जावी

कविता हीच आता जगाचे गीत व्हावी

कविता हीच आता जगाचे गीत व्हावी.


#richyabhau

#vamandada

आपला ब्लॉग : drnitinhande.in

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव