जानकी अम्मल : विज्ञानाची गोडी देणारी माऊली

जानकी अम्मल : विज्ञानाची गोडी देणारी माऊली



विज्ञानक्षेत्रात पहिली डॉक्टरेट मिळवणाऱ्या कमला सोहोनी यांची माहिती आपण घेतली, मात्र त्यांच्याआधी एका भारतीय महिलेला अमेरिकन विद्यापीठाने विज्ञान क्षेत्रात मानद डॉक्टरेट बहाल केली होती. अमेरिकन विद्यापीठास या व्यक्तीचा सन्मान करावा वाटला अशी कोण ही महिला होती? लंडनमधील जॉन इनिस संस्थेला वाटले की या व्यक्तीच्या नावे शिष्यवृत्ती द्यावी, सी वी रामन यांना वाटते की त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेत या व्यक्तीने फेलो म्हणून यावं. पंडित नेहरूंना वाटत होत की या व्यक्तीने नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतात यावं. इंडियन ॲकाडमी ऑफ सायन्स मधील पहिली स्त्री संशोधिका असलेली ही व्यक्ती म्हणजे "जानकी अम्मल". 


वनस्पतीशास्त्रातील आपल्या कामातून जगभर दबदबा निर्माण करणाऱ्या तरीही आयुष्यभर अगदी जमिनीवर राहून साधे जीवन जगणाऱ्या जानकी.. उसाची गोडी वाढवणारी एक शास्त्रज्ञा म्हणून ती भारतात प्रसिद्ध (?) असली तरी (जरा शंका आहे, प्रसिद्ध आहे की नाही, भारतात कुठे हो शास्त्रज्ञांना प्रसिध्दी मिळते, मात्र ज्यांना माहीत त्यांना ती उसाची गोडी वाढवणारी म्हणून माहित असण्याची जास्त शक्यता.) जानकी होती एक बंडखोर महिला, जात आणि लिंग यांचे बंधन नाकारत, त्यामुळे येणारे अडथळे पार करत आपली कारकीर्द घडवणारी, संशोधन करताना अपार कष्ट उपसनारी, आपल्या तत्वासाठी म्हातारपणात पर्यावरणरक्षण मोहीम हाती घेऊन सरकारशी चार हात करणारी रणरागिणी.. जानकी एडावलेठ कक्कट उर्फ डॉ. जानकी अम्मल


जानकीचा जन्म ४ नोव्हेंबर १८९७ रोजी केरळमधील थलासरी शहरातील एका खूप मोठ्या घरात झाला. मोठे घर दोन्ही अर्थानं, तिचे वडील दिवाणबहादूर एडावलेठ कक्कट कृष्णन, हे ब्रिटिश आमदनीतील मद्रास प्रेसिडेन्सीचे उपन्यायाधीश होते. त्या काळात दिवाणबहादुर, रावबहादुर मंडळी खूप रुबाबात राहायची. तिला किती भावंडं असतील विचार करा.. आजवरचे ऐकलेले सगळे आकडे कमी पडतील. (कौरव सोडून बरं का) ती १९ भावंडं होती🤭

आपण आजवर मोठ्या कुटुंबाला क्रिकेट टीम म्हणून चिडविले असेल. इथे दिवाणबहादुर, त्यांच्या दोन बायका आणि १९ पोरं.. २२ झाले.. म्हणजे मॅच खेळायची असेल तर दोन टीम घरातच.. बाहेरचे कोणी बोलवायची गरज नाही😂


वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करण्याचा वारसा जानकी यांना त्यांच्या आजोबा आणि वडिलांकडून मिळाला. इथे त्यांची पार्श्वभूमी देतो जरा. (केरळमधील तत्कालीन कुटुंबव्यवस्था जरा मुक्त स्वरूपाची वाटली म्हणून इथे तपशील देतो.) जॉन चाईल्ड हॅनिंगटन हे ब्रिटिश आमदनीत एकामागे एक बढती मिळवत रेसिडेंट पदावर पोचलेले अधिकारी. एलिझाबेथ ओंस्लोशी लग्न करून पाच मुलांचा संसार वाढविण्याआधी त्यांचे भारतातील कुन्ही कुरुंबी कुरुवयी नावाच्या स्त्रीशी संबंध होते, त्यातून मार्था आणि देवी कुरुवयी दोन पोरी जन्माला आल्या. कुन्हीचे नायर नावाच्या गृहस्थाशी लग्न झालेलं, त्यातून त्यांना कल्याणी कुरुवयी नावाची मुलगी होतीच. कुन्हीचे कर्नल वॉल्टर किंग यांच्याशी देखील संबंध होते, त्यातून त्यांना गोविंदन किंग कुरुवयी नावाचा मुलगा होता. 


किती मोकळं ढाकळं आहे ना.. उगाच योनिशुचीतेचा बाऊ नाही. आणि विशेष म्हणजे आपल्या अपत्याची काळजी प्रत्येक बाप घेत होता. (किंवा त्यांना जबाबदारी घ्यायला कुन्ही भाग पाडत होती) कुन्हीचा जन्म थिया या मागासलेल्या जातीत. शेकडो वर्ष माडी काढून विकणे हा त्यांचा खानदानी धंदा. मात्र ब्रिटिश काळात सर्व जातींना शिक्षणाची संधी मिळाली, आणि अनेक वर्ष मागास समजलेली मंडळी स्वकर्तृत्वावर मोठी झाली. दिवाणबहादूर एडावलेठ कक्कट कृष्णन हे त्यापैकीच एक. दिवाणसाहेबांचे निसर्गावर, वनस्पतीशास्त्रावर खूप प्रेम. उत्तर मलबार प्रदेशात आढळणाऱ्या पक्षांवर त्यांची दोन पुस्तके देखील प्रसिद्ध झाली आहेत. 


जॉन चाईल्ड हॅनिंगटन यांना देखील वनस्पतीशास्त्राचा अभ्यास आणि प्रयोग करण्याचा नाद. त्यानिमित्ताने या दोघांची गट्टी जमली. आणि हॅनिंगटन साहेबांनी त्यांना आपला जावई करून घेतले. दिवाणसाहेबांची पहिली पत्नी पदरात सहा पोर टाकून निर्वतली होती, देवी कुरुवयी घरात आली आणि घराचे शब्दशः गोकुळ झालं. त्यांना तब्बल तेरा पोर झाली, विशेष म्हणजे सर्व दीर्घायुषी ठरली. या तेरापैकी आपल्या जानकीचा नंबर दहावा. तिच्या पाठीवर अजून एक भाऊ झाला. तरी दिवाण साहेबांची दिवानगी काही कमी होईना. शेवटी निसर्गच म्हणाला.. ऐसी दीवानगी देखी नही कही.. आणि एकदाच पोरगा पोरगीचे जुळे होलसेल मध्ये देऊन त्यांच्यापुढे हात टेकले. 🙏😂 


दिवाणसाहेबांची लायब्ररी भरपूर मोठी होती, तसेच त्यांचे प्रयोग देखील सुरू असायचे. त्यामुळे लहानपणीच झाडं, फुलं, प्राणी, पक्षी अशा जीवसृष्टीतील सर्वच घटकांबद्दल जानकीच्या मनात कुतूहल निर्माण झालं. तेव्हा मुलींचे शिक्षण सर्रास सुरू झाले नसले तरी कक्कट यांचे विचार सुधारलेले होते. त्यामुळे बाकीच्या समावयीन मुलींप्रमाणे घरकाम, बागकाम, शिवणकाम, भरतकाम इत्यादी कला शिकण्यासोबतच शाळेत जाऊन विद्या प्राप्त करायची संधी या कक्कट भगिनींना होती. थलासरी मधील सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेन्टमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करून जानकीने मद्रासमधील क्वीन्स मेरीज कॉलेज वनस्पतीशास्त्रात पदवी घेतली. नंतर मद्रासमधीलच प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तिने ऑनर्स पदवी मिळवली. वर्ष होतं १९२१.


आता जानकी २४ वर्षाची झाली होती. किती पुढारलेलं असलं तरी घरच्यांना वाटत होतं तिने आता लग्न करून टाकावं. मात्र जानकीला अजून खूप शिकायचं होतं, संशोधन करायचं होतं. तिने ख्रिच्चन वुमन कॉलेजमध्ये नोकरी स्वीकारली. तिथे शिकवत असतानाच संशोधनाची संधी शोधत होती. वय वाढत होते, जानकी २७ ची झाली, त्यात तिला मामेभावाचे स्थळ सांगून आले. सांगून काय आले.. मागेच लागले.😬 आता सगळीकडून प्रेशर तयार व्हायला लागले. कदाचित जानकीचे रूपांतर नेहमीच्या गृहिणीमध्ये झाले असते आणि आपण ग्रेट इंडियन किचन सिनेमात पाहिले तसे पुढील आयुष्य गेले असते. ☹️


परंतु बार्बोर शिष्यवृत्ती तिला संधीचे नवे द्वार उघडणारी ठरली. आशियाई महिलांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठामार्फत ही स्कॉलरशिप दिली जायची. जानकीने त्यांच्याशी संपर्क केला होता, त्यांचे उत्तर ऐन मोक्याच्या वेळी आले. आता जानकीला घरून कुणी अडवणार नव्हते. पैश्याचा तर प्रश्न नव्हताच.. संपूर्णपणे मोफत शिक्षण घेण्याची संधी देणारी ही शिष्यवृत्ती होती. जानकी मिशिगन येथे पोचली. तिथे मन लावून अभ्यास करत तिने प्लान्ट सायटोलॉजीचा अभ्यास करून मास्टर पदवी मिळवली. 


प्लान्ट सायटोलॉजीमध्ये वनस्पतीतील पेशींचा अभ्यास केला जातो. जसे प्राण्यांमध्ये संकर घडवून आणताना कोणत्याही प्राण्याच्या मादीचे कोणत्याही प्राण्याच्या नराशी मीलन घडवून नवीन प्रजाती निर्माण करता येत नाही. ते प्राणी किमान एका प्रवर्गातील हवे असतात, तसेच संकर शक्य होईल की नाही हे गुणसूत्रं ठरवत असतात. , त्याच प्रमाणे वनस्पतीमध्ये कलम करणे, संकर घडवून आणणे यामागे देखील विज्ञान असते. शेतीचा शोध लावल्यानंतर मानवाने ट्रायल अँड एरर तत्वावर संकराचे अनेक प्रयोग केले. नंतर मेंडेलने अनुवांशिकता तत्व स्पष्ट केलं, आता तर जेनेटिक्स तंत्रज्ञानाने मोठी भरारी घेतली आहे. 


पदवी मिळल्यावर जानकी ख्रिच्चन वुमन कॉलेजमध्ये अध्यापनासाठी काही काळ परत आली. मात्र पुन्हा फेलोशिप मिळवून पुढील संशोधन करण्यास पुन्हा मिशिगन विद्यापीठात रुजू झाली. तिथं आशियाई देशातून आलेल्या अनेक मुलींशी तिची मैत्री झाली. तिने त्यांची संघटना बांधली. त्याबद्दल ती पत्रामध्ये लिहिते, "इथे दुसऱ्या खंडामध्ये आल्यावर मला कळतंय की आपल्या आशियामधील सगळे देश एका धाग्याने जोडलेले आहेत, चिनी जपानी विद्यार्थिनीशी गप्पा मारताना समजतं की आपल्यामध्ये अनेक गोष्टी सारख्याच आहेत. मी या सर्वांची एक संघटना तयार केली आहे, भविष्यात भारतीय मुलींना चीन आणि जपानमध्ये, आणि तेथील मुलींना आपल्या देशात शिकण्यासाठी पाठवण्याचे माझं स्वप्न आहे."


जानकीने तिथं शिकत असताना वेगवेगळ्या जातींच्या वनस्पतींचा संकर आणि एकाच कुळातल्या पण वेगळ्या पोटजातीच्या वनस्पतींचा संकर यावर प्रभुत्व मिळवलं. तिच्या मौलिक संशोधनामुळे तिला डॉक्टर ऑफ सायन्स ही पीएचडीशी समकक्ष असलेली मानद पदवी बहाल करण्यात आली. आता जानकी डॉ. जानकी झाल्या. १९३२ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी त्रिवेंद्रम येथील महाराजा कॉलेज ऑफ सायन्समध्ये प्राध्यापकी सुरू केली. तीन वर्ष त्यांनी प्राध्यापकी केली खरी तरी त्यांचा मूळ पिंड संशोधकाचा होता. ती संधी त्यांना लवकरच मिळाली.  


कोईमतुर येथे इम्पीरियल शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्यूट सुरू झाली होती. सी ए बार्बर हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ तिचे नेतृत्व करत होते. भारतात खासगी साखर कारखाने १९०४ मध्ये सुरू झाले होते, मात्र भारतीय वंशाच्या ऊसामध्ये उतारा कमी मिळायचा. म्हणून ते कारखाने ऊस बाहेर देशातून आयात करायचे. बाहेर देशातील बियाणे भारतीय वातावरणात टिकायचे नाही, रोपं जगायची नाहीत. या समस्येवर मात करण्यासाठी संस्थेमध्ये संशोधन सुरू होते. थोडक्यात भारतीय वातावरणात जगेल अश्या उसाची गोडी वाढवण्याचं काम सुरू होत. जानकी यांनी अनेक क्रॉस ब्रीड करताना कोणत्या संकरामध्ये सुक्रोजचं प्रमाण सगळ्यात मिळते याचे निरीक्षण केले. शेवटी ऊसाचा गवताशी केलेला संकर सर्वात जास्त यशस्वी झाला आणि १९३८ मध्ये एस स्पोंटेनियम (S. Spontaneum) हा वाण तयार झाला, ज्यातून साखरेचं प्रमाण वाढलं..  


साखर हा जगभरातील सन- संस्कृतीचा अविभाज्य भाग.. शेतीचे प्रयोग करत असताना मानवाला कधीतरी गोड गवत हाती लागले.. आणि त्यावर अजून प्रयोग करत करत ऊस विकसित झाला. त्यातून तयार झाले गूळ साखर आणि दारू. किमान मागील ३००० वर्षापासून भारतात ऊस असल्याचे संदर्भ मिळतात. अथर्ववेदामध्ये, कौटिलिय अर्थशास्त्रात तसेच पतंजलीच्या ग्रंथांमध्ये साखरेचे उल्लेख आढळतात. (ही आपण आता पाहतो तशी पांढरी साखर नाही बर का) कौटिल्याचा समकालीन अलेक्झांडर (आपण ज्याला सिकंदर म्हणतो) याच्या आक्रमणाच्या काळात त्याचा सेनापती लिहीतो की "भारतातील लोकांकडे असा बांबू आहे ज्यातून मधमाशीशिवाय मध मिळवता येते, आणि कोणत्या फळाशिवाय दारू बनवता येते."


तैवानमधून कधीकाळी भारतात पहिल्यांदा आलेला हा ऊस. नंतर त्याचा जगभर प्रवास झाला.. जाताना तो आपले भारतीय नाव देखील सगळीकडे घेऊन गेला. संस्कृत शब्द शर्करा ज्याचे मराठीत झाले साखर, हिंदीत झाले शक्कर, पुढे अरबीमध्ये झाले सुख्खर आणि इंग्रजीत झाले शुगर. उसाचा रस उकळून कच्ची साखर तयार करण्याचे तंत्र गंगेच्या खोऱ्यातील लोकांकडून चिनी संशोधक प्रवाशांनी त्यांच्या देशात नेले. मात्र ऊस हा साखरेचा एकमेव स्त्रोत नाही बरं का.. जगातील सुमारे ८० टक्के साखर ऊसापासून बनते, उर्वरित २० टक्क्यांमध्ये बहुतांश वाटा शुगरबीटचा आहे. उत्तर अमेरिकेतील वातावरणात शुगरबीट चांगल्या प्रमाणात उगवते. त्यात देखील साखरेचा उतारा ७-१५ टक्के एवढा असतो. लिटिलबीट विषयांतर झालं..चला, पुन्हा आपल्या विषयाकडे जाऊ.


कोईमतूर येथे काम करत असताना डॉ जानकी यांना विषमतेला सामोरे जावे लागले. तिथे जानकी या एकमेव महिला. त्यात अविवाहित असल्यामुळे "उपलब्ध आहे" असा पुरुषी गैरसमज. त्यात त्या थीया या तथाकथित खालच्या जातीच्या.. त्यामुळे हाताखालच्या लोकांकडून हवे तसे सहकार्य मिळत नसे. सी वी रामन यांनी स्थापन केलेल्या नव्या संस्थेत त्यांना आमंत्रित केलं होत, मात्र संशोधन महत्त्वाच्या टप्प्यावर आलेले असल्याने त्यांनी संशोधन मध्येच सोडले नाही. सहकारी लोकांचे, प्रचलित व्यवस्थेचे विचार बुरसटलेले.. त्यामुळे मानसिक हल्ले तर होतच राहणार.. या हल्ल्यांना घाबरून घरी बसलं की सगळंच संपलं. डॉ जानकी लगेच हार मानणाऱ्या नव्हत्याच... अगदी फौलादी होत्या✊✊



अशीच चिकाटी बॉम्बहल्ले पचवून संशोधनावर लक्ष केंद्रित करताना डॉ. जानकी यांनी दाखवली होती. एडिंबर्ग येथे ऑगस्ट १९३९ मध्ये येथे अनुवंशशास्त्राची सातवी परिषद आयोजित केली होती. या परिषदेला हजर राहण्यासाठी जानकी इंग्लंडला गेल्या होत्या. सप्टेंबरमध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि जर्मनीने तुफान बॉम्ब हल्ले सुरू केले. भारतात परत येणं तर शक्य नव्हतं. लंडन येथील ‘जॉन इनिस हॉर्टिकल्चर इन्स्टिट्यूशन’ येथे सहाय्यक पेशीशास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. ती नोकरी करत असतानाच एक दिवस घरावर जर्मन विमान भिरभिरू लागली. त्यांच्या बॉम्ब हल्ल्यांनी घरातील वस्तू इकडे तिकडे पडल्या. खिडक्या, कपाटे, आरशाच्या काचा फुटल्या तरी त्यांनी विचलित ना होता रात्र बेडखाली झोपून काढली. आणि दुसऱ्या दिवशी आपले संशोधनाच्या कामात स्वतःला पुन्हा वाहून घेतले. 😍.  


प्रसिद्ध जनुकीयतज्ञ डार्लिंग्टन हे या संस्थेचे संचालक होते. दोघांनी एकत्रितपणे संशोधन करून ‘क्रोमोझोम अ‍ॅटलास ऑफ कल्टीवेटेड प्लॅन्ट्स’ या नावाचे पुस्तक प्रकाशित केलं. आजही हे पुस्तक वनस्पती शास्त्रात महत्त्वाचे मानले जाते. १ लाखाहून जास्त औषधी, शोभेच्या वनस्पतींच्या गुणसूत्रांची नोंद या पुस्तकात केलेले आहे. डार्लिंग्टन यांनी त्यांना पुढील आयुष्यात देखील वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे. भारतात परतल्यावरही जानकी आणि डार्लिंग्टन यांच्यामध्ये ते करत असलेल्या नवनव्या प्रयोगाची आणि त्यातील निष्कर्षाची देवाण घेवाण होत असे. त्याच काळात त्यांनी मॅग्नोलीया फुलाच्या प्रजातीवर संशोधन केलं.आज त्यातील एका प्रजातीला त्यांचे नाव देण्यात आले आहे.



१९४६ ते १९५१ या काळात डॉ. जानकी यांनी विस्ले येथील ‘रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटी’ या संस्थेत काम केलं. याबाबत थोडक्यात सांगायचे तर जर्मन बॉम्ब हल्ल्याने बेचिराख झालेल्या इंग्लंडला पुन्हा सुंदर करण्याचे काम डॉ. जानकी यांनी केलं. शिवाय फळभाज्या तसेच काळी तुतीसारख्या अनेक फळे, फुलझाडांच्या गुणसूत्रांचा अभ्यास केला. वांग्याच्या प्रजातीवर त्यांनी केलेलं संशोधन देखील खूप महत्त्वाचे आहे. त्याच काळात आपला देश स्वतंत्र झाला. आणि देशाला लाभले विज्ञानाची आवड असलेले पंतप्रधान पंडित नेहरू. डॉ. जानकी यांचे नाव तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ संशोधक म्हणून सर्वत्र गाजत होते. त्यांनी भारतात परत येऊन देशाच्या उभारणीसाठी मदत करावी असे पंडित नेहरू यांनी त्यांना कळवले आणि त्या आल्या देखील. ❤️


नेता चांगला असेल तज्ञ लोक देशात परततात, आणि बोगस नेता असेल तर तज्ञलोक पळून जातात.. आपण मागील काही वर्षात त्याचा अनुभव घेतला असेलच. पंडित नेहरूंनी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची जबाबदारी डॉ. जानकी यांना दिली. भारतात आढळणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती ओळखून त्यांचे दस्तावेजीकरण करण्याचे काम या संस्थेचे होते. या संस्थेसाठी संशोधन करताना डॉ. जानकी यांनी प्रचंड पायपीट केली. कोलकात्यामध्ये जरी संस्थेचे ऑफिस असले तरी त्यांनी संपूर्ण भारत आणि त्याच्या पर्वतराशी, दर्या खोऱ्या पालथ्या घातल्या. हे करत असताना त्यांचा संपर्क आदिवासी जनतेशी आला. आणि त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली. अन्नधान्य जास्त उगवण्याचा प्रयत्न करताना, कृषिक्षेत्र वाढवताना वारेमाप जंगलतोड झाली. आणि त्यात सर्वात जास्त नुकसान आदिवासी लोकांचे झाले आहे, मात्र त्यांच्याकडे कुणाचे लक्षच नाही. 😬


आदिवासी विभागांत फिरून त्यांनी त्यांचे औषधी वनस्पतींबाबत पारंपरिक ज्ञान एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच पुढाकाराने अलाहाबाद येथील भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाच्या मध्यवर्ती वनस्पती प्रयोगशाळेत १९६० मध्ये लोकवनस्पती विषयाचा स्वतंत्र कक्ष निर्माण केला झाला. लोकवनस्पतिविज्ञान विषयाच्या जननी डॉ. जानकी अम्मल या समजल्या जातात. या लोकवनस्पतिविज्ञान विषयामध्ये आदिवासींचे राहणीमान, वनस्पतींवर असलेली त्यांची उपजीविका यांचा समावेश असतो. अलाहाबाद येथे नव्याने स्थापन झालेल्या ‘सेंट्रल बोटॅनिकल लॅबोरेटरी’ च्या पहिल्या संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. 


नंतर त्यांनी अनेक ठिकाणी आपली सेवा दिली. जम्मूमधील रिजनल रिसर्च लॅबोरेटरी असो किंवा भाभा अणुसंशोधन केंद्र.. आपल्या विद्वत्तेचा, शिस्तप्रियतेचा ठसा त्या जाईल तिथे उमटवत असत. भाभा अणुशक्ती केंद्रात त्यांनी अन्नतंत्रज्ञान विभागात अन्न प्रक्रिया आणि धान्य टिकवण्यासाठी प्रयोग केले. वय हा त्यांच्यासाठी मुद्दा नव्हताच. म्हणून तर वयाच्या ७३ व्या वर्षी १९७० मध्ये मद्रास विद्यापीठातील सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्सड स्टडीज इन बॉटनी या केंद्रामध्ये एमेरेटस सायंटिस्ट म्हणून जबाबदारी स्वीकारली, संशोधन सुरू ठेवलं आणि अनेक शोधनिबंधही प्रकाशित केले. आणि त्याच सुमारास शासनाशी संघर्ष करायला ही अम्मा पदर खोचून उभी राहिली. 



केरळमध्ये सायलेंट व्हॅली नावाचं सदाहरित जंगल आहे, तिथं सरकारने जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याचा घाट घातला. नेहमीप्रमाणे स्थानिकांना रोजगार मिळेल, विकास होईल अशी गाजरे दाखवण्यात आली. मात्र या प्रकल्पामुळे तेथील जैवविविधता नष्ट होणार होती. शेकडो दुर्मिळ जातीच्या वनस्पती आणि पशुपक्षी यांच्या मोबदल्यात विकास ही कल्पना डॉ. जानकी यांना सहन झाली नाही. तेथे सुरू असलेल्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. आणि आंदोलनाला यश आलं, प्रकल्प रद्द करण्यात आला. आज सायलेंट व्हॅलीला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. जानकी म्हणायच्या "कळत्या वयात गांधी नावाच्या जादुगारामुळे निर्भयतेची देणगी मिळाली.. जी आयुष्यभर पुरली."


त्यांनी गांधीवाद केवळ समजावलं घेतला नाही तर अंगीकारला देखील होता. तरुणपणी त्या आपल्या भावाला पत्रामध्ये लिहितात, "मला तुला सांगायला आनंद वाटतो की मला एक दिवस गांधींचे व्याख्यान ऐकायला मिळालं. तू कधी त्यांना पाहशील तर चकित होशील.. अगदी साधा माणूस आहे हा. पक्का भारतीय." जानकी यांचे राहणीमान अगदी साधे असायचे. मूलभूत गरजा अगदीच कमी. साधीशी साडी (बहुतेक वेळा पिवळ्या रंगाची) आणि लांबसडक केसाचे दोन सैलसर फुगे बांधलेले. थंड वातावरण असेल तर पिवळे जाकीट किंवा स्वेटर. स्वतःबद्दल जास्त काही बोलायचं नाही जणू काही मौन घेतलेली एक संन्यासीनच वाटावे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. 


त्यांना मांजरांची खूप आवड. संशोधन करता करता लग्न आणि संसार करायला मिळाला नाही, त्यामुळे त्यांची ममता ते घरात असलेल्या डझनवारी मांजरांना देत असाव्यात. मांजराचा खुप मोठा परिवार होता त्यांच्याकडे. अर्थात त्या मांजरांवर देखील त्यांनी संकराचे अनेक प्रयोग केले, त्यांच्या नोंदी ठेवल्या. संशोधन हे त्यांच्या जीवनाचा भागच होते. त्यांचा पहिला शोधनिबंध १९३१ मध्ये तर शेवटचा शोधनिबंध १९८४ मध्ये प्रसिध्द झाला होता. अगदी शेवटचा शोधनिबंध त्यांनी मृत्यूपूर्वी काही दिवस आधी लिहिला होता. ४ फेब्रुवारी १९८४ रोजी त्यांना अगदी सुखासुखी मरण आले. आणि संशोधन थांबले. तोवर त्यांना कोणताही गंभीर आजार जडला नव्हता. मोजक्या आहार आणि योग्य जीवनशैली यामुळे त्यांना छान स्वास्थ्य लाभले. शारीरिक आणि मानसिक देखील. 

भारत सरकारने त्यांचा १९७७ मध्ये ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. त्यांना हयातीत तसेच मृत्युनंतर देखील अनेक मानसन्मान मिळाले. सी. व्ही. रामन यांनी स्थापन केलेल्या ‘इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स’ मध्ये त्यांना संस्थापक सदस्य म्हणून मान देण्यात आला. १९५७ मध्ये ‘इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमी’च्या सभासदपदी त्या निवडून आल्या. १९५६ मध्ये मिशिगन विद्यापीठाने त्यांना मानद एलएलडी पदवी देखील प्रदान केली. लंडनमध्ये त्यांनी काम केलं होतं त्या जॉन इनिस सेंटर मध्ये विकसनशील देशातील संशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आता जानकी अम्मल यांच्या नावाने शिष्यवृत्ती दिली जाते. त्यांनी सांभाळलेल्या जम्मू येथील बोटानिकल गार्डनला "जानकी अम्मल" नाव देण्यात आले आहे, जिथे २५००० वनस्पतींच्या प्रजाती जतन केल्या आहेत. 


वनस्पतिशास्त्र संशोधनातील उत्कृष्ट कार्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने भारत सरकारने ‘ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार’ १९९९ पासून सुरू केला आहे. जानकी अम्मल यांच्या ‘सायटोटॅक्सोनॉमी’ (जीवांच्या वर्गीकरणाचे पद्धतिशास्त्र) या क्षेत्रात केलेल्या कार्याला मानवंदना म्हणून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. दरवर्षी ‘ई. के. जानकी अम्मल राष्ट्रीय पुरस्कार’ जागतिक पर्यावरणदिनी दिला जातो. देशपातळीवर दिला जाणारा हा पुरस्कार २०१८ मध्ये कोल्हापूर विद्यापाठातील डॉ. श्रीरंग यादव यांना मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे डॉ. यादव हे आजवरचे एकमेव महाराष्ट्रीय आहेत. डॉ. श्रीरंग यादव यांनी ३० वर्षे संशोधन करून वनस्पतींच्या ७० नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. शिवाजी विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख म्हणून यादवसर २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत.. 


गोकुळाची परंपरा असलेल्या घरात जन्मलेल्या जानकी अम्मल या स्वतः संसारात पडल्या नाहीत, मात्र आज सारे जग त्यांना जानकी अम्मल या नावाने ओळखत. अम्मल म्हणजे आई, जे विशेषण कधीकाळी त्यांना लावले गेले आणि आज त्यांच्या नावाचा भाग झाले आहे. आयुष्याची इतिकर्तव्यता वेगळी काय असते. ❤️ त्यांची कहाणी सर्वच स्तरावरील स्त्री पुरुष सर्वांना प्रेरणादायी आहे. जात लिंग यांचे बंधन त्यांनी झुगारून लावले, मोडून पडल्या नाहीत, म्हणून यशस्वी झाल्या.. म्हणूनच आज आपण आज त्यांची कहाणी इथं मांडत आहे, वाचत आहे. पण ज्या ज्या जानकी मोडून पडल्या असतील त्यांचे काय???😔 जे झाले ते आपण बदलू नाही शकत, जे होणार आहे ते तर नक्कीच बदलू शकतो ✊✊


जय समता जय विज्ञान.✊✊ 

#Richyabhau

#janaki_ammal





Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव