भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या 



आज १५ सप्टेंबर.. ही पोस्ट वाचायच्या आधी सकाळीच तुम्हाला "हॅपी इंजिनिअर्स डे" चा msg पण आला असेल, अनेक इंजिनिअर मंडळींना आज प्राऊड वगैरे देखील वाटत असेल. (तसेही त्यांच्या आयुष्यात प्राउड फील करायचे दिवस खूप कमी येतात.) मात्र बहुतेकांना आज मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा वाढदिवस आहे एवढेच माहीत असते, त्यांनी केलेलं डोंगराएवढं काम फार कमी लोकांना माहित असते, म्हणून आजची पोस्ट. एक अशी व्यक्ती जिला भारतातील आठ विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट दिली आहे, ब्रिटिश काळामध्ये सर हा किताब मिळाला होताच, भारत सरकारने देखील भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. 


ही अशी विलक्षण व्यक्ती, जिला भारतरत्न या पुरस्कारासाठी विचारले असता ती म्हणते "हा पुरस्कार घेऊन पुढं भविष्यात मी सरकारविरोधी बोलू नये अशी तुमची अपेक्षा असेल तर हा पुरस्कार मला नको." मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना या व्यक्तीचे महत्त्व पटलेलं असतं, सरकारवर टीका करण्याचा अधिकार अबाधितच असल्याचं खुद्द पंतप्रधानांनी कळवल्यानंतर ही व्यक्ती पुरस्कार स्वीकारते. असा पंतप्रधान आणि असा अभियंता वर्तमानकाळाच्या पार्श्वभूमीवर जास्तच उठून दिसतात.. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या.. केवळ अभियंता म्हणूनच नाही तर या देशाच्या उभारणीत त्यांच्या योगदानाला अनेक पैलू आहेत. 


आयुर्वेदिक वैद्य म्हणून उपजीविका करणाऱ्या मोक्षगुंडम श्रीनिवासशास्त्री आणि व्यंकटलक्षम्मा या दाम्पत्याच्या सहा मुलांपैकी विश्वेश्वरय्या हे दोन क्रमांकाचे.. कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी हे लहानसे खेडे, जिथे हे कुटुंब आपली उपजीविका भागवत होते. कोलार जिल्हा हा सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध. (kgf मुळे तेव्हढे तर सगळ्यांना माहीत झाले असेलच) तिथेच आपला सोन्या, छोटा विशु जन्माला आला. दिवस होता १५ सप्टेंबर १८६०. विशुला एक मोठा भाऊ होताच, नंतर पाठीवर दोन भाऊ आणि दोन बहिणी देखील जन्माला आल्या. 


मुद्देनहळ्ळीमध्ये हे मोक्षगुंडम कुटुंब उपरं होतं, काही पिढ्याआधी त्यांचे पूर्वज तिथे स्थलांतरित झालेले. मूळ गाव "सिद्दनॊर" हे एक आंध्र प्रदेशातील तीर्थक्षेत्र. तिथल्या कुंडात स्नान केल्यास सर्व पापे धुतली जाउन मोक्ष मिळतो असा तिथं समज असल्यानं त्या गावाला मोक्षगुंडम हे नाव पडलं होतं, तेच नाव या कुटुंबाला चिकटलं आहे. वडील श्रीनिवासशास्त्री हे संस्कृतमधील मोठे विद्वान असले तरी त्यांचा वैद्यकीचा व्यवसाय जेमतेमच चालायचा. मात्र त्यांना शिक्षणाचे महत्व समजले होते. याशिवाय मामा एच. रामय्या यांचं देखील भाचेमंडळींच्या शिक्षणावर लक्ष होतं. 


छोट्या विशुचे चिक्कबल्लापूर या खेड्यात प्राथमिक शिक्षण सुरू झालं. काही वर्षांनी श्रीनिवासशास्त्री यांनी रामेश्वरची पायी यात्रा सहकुटुंब करायचं ठरवल. याच यात्रेतून परतताना श्रीरंगम या तीर्थक्षेत्री विशुची मुंज पण उरकण्यात येणार होती. श्रीनिवासशास्त्री यांची आई तामिळनाडूमधील श्रीरंगम येथील. त्यामुळे असा हा यात्रेचा घाट घातला गेला. मात्र यात्रेवरून परतताना श्रीनिवासशास्त्री यांचा मृत्यू झाला. त्यावेळी विशुचं वय होतं अवघं १५ वर्ष. त्या वयात घरातील धाक नाहीसा झाला की पोर बिथरतात, अगदी तसंच विशुचं पण झालं, तो काही आईला जुमानेसा झाला. ☹️


मात्र एकदा मामा त्याच्या बहिणीच्या चौकशीला आला असता समजले की विशु गेल्या दोन महिन्यात शाळेला गेलाच नाही.. मग मामाने विशुची अशी खरडपट्टी काढली की बासचबास. "त्याला शाळेत जायचे नसेल तर मी त्याला गुरे राखायला नेतो, नाहीतरी त्याची तीच लायकी आहे वगैरे वगैरे…" मामाने शिस्तीचं असं इंजेक्शन दिलं की नंतर आयुष्यालाच शिस्त लागून गेली. पुन्हा कॉलेज जीवनात आणि संपूर्ण नोकरीत विश्वेश्वराने विनाकारण एकही दांडी मारली नाही की कधी उशीर केला नाही. 😇


मामाने त्याचं नाव बेंगलोर येथील मिशनरी शाळेत घातलं. मात्र बेंगलोरला जायला खिशात पैसे नव्हते. मामाकडे पुन्हापुन्हा हात पसरायला नको असा विचार विश्वेश्वराने केला. पायी मजल दरमजल करत, वाटेत मंदिरात सेवा करून भोजन मिळवत बेंगलोर येथे पोचला.. मात्र त्याची पायपीट इथेच संपली नव्हती. माध्यमिक शाळेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विश्वेश्वराने मामाच्या मदतीने बंगलोरच्या सेन्ट्रल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजचा खर्च स्वतः उचलायचा, यासाठी त्याने शिकवणी सुरू केली. 


मैसूर संस्थानचे (कुणी म्हणालं स्पेलिंग चुकले, मात्र म्हैसूर म्हणायला मला जीवावर येत..लयच रुक्ष.. रेड्याला हाक मारल्यासारख वाटत) मंत्री मुड्डय्या यांच्या मुलांना शिकवायचं काम मिळालं. राहायची पण सोय झाली. सकाळी स्वत:चं सगळं आवरून शिकवणी घ्यायची, नंतर दोन किमी अंतरावर राहत असलेल्या मामाकडे जेवायला यायचं. अजून पुढं सात किमी अंतरावर आपल्या कॉलेजला जायचं. कॉलेज संपलं की परत मामाकडे जेवण आणि रात्री मुड्डय्या यांच्याकडे मुक्कामी. रोज १८ किमी चालणं. त्यांची ही चालण्याची सवय आयुष्यभर टिकली आणि कदाचित तेच त्यांच्या १०१ वर्षाच्या दीर्घायुष्याचे रहस्य असावं. 🚶


कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती मिळवणारा, सर्वात हुशार विद्यार्थी विश्वेश्वर हाच असायचा. एवढा हुशार की शिक्षकांच्या गळ्यातील ताईत. तेव्हा चार्ल्स वाटर हे त्याच्या कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांना हा तरुण एवढा आवडायचा की अनेक वेळा त्यालाच वर्गात शिकवायला लावायचे. त्यांनी भेट म्हणून विश्वेश्वराला वेब्स्टरची डिक्शनरी तसेच कोटाला लावायची सोन्याची बटणे दिली होती. १८८१ साली विश्वेश्वर विशेष प्राविण्यासह बी ए पास झाला. सरांच्या सल्ल्याने विश्वेश्वरने पुण्यात अभियांत्रिकी शिकायचे ठरवलं. यासाठी मैसूर संस्थानाने शिष्यवृत्ती देखील देऊ केली. पुण्याच्या coep कॉलेजमध्ये १८८३ साली विश्वेश्वर अभियांत्रिकी परीक्षा पास झाला. केवळ पास नाही तर संपूर्ण मुंबई प्रांतांमध्ये पहिला आला आणि मानाचे जेम्स बर्कले पदक देखील मिळवलं. ❤️


त्याकाळात जो संपूर्ण प्रांतात पहिला येईल त्याला सरकारी नोकरी दिली जायची. सहाय्यक अभियंता म्हणून विश्वेश्वरय्या यांची धुळे येथे नेमणूक झाली. आजवर अधिकार गाजवायची सवय नसलेल्या विश्वेश्वरय्या यांना प्रशासनाचा पहिला धडा इथेच मिळाला. पांजरा या नदीवर पोवळी बांधण्याच काम विश्वेश्वरय्या यांच्यावर सोपविण्यात आलं. मात्र धो धो पाऊस पडत असल्याने काम पुढे सरकत नव्हतं, मटेरियल वाया जात होतं. पालीसार नावाच्या त्यांच्या वरिष्ठांनी दमच दिला की "अशी कारणं सांगून तुम्ही काम लांबल तर तुमच्या सीआर ची वाटच लावतो." 🤥


विश्वेश्वरय्या यांनी धास्तीने ते काम पूर्ण केलं. ते करत असताना तीन दिवस पावसात अडकून पडल्याने शेजारील गावात आश्रय घ्यावा लागला. चौथ्या दिवशी देखील भर पुरात पोहत जाऊन कामाच्या ठिकाणी पोचले.. त्यांची हिम्मत पाहून सगळ्यांनीच कामाला जोर लावला आणि अशक्य वाटणारे काम पूर्ण झालं. विश्वेश्वरय्या यांची चिकाटी आणि गुणवत्ता पालीसार यांच्या लक्षात आली. पुढे सी आर मध्ये "उत्कृष्ट" असा शेरा गेला हे सांगायला नकोच. पालीसार यांनी विश्वेश्वरय्या यांना खात्याअंतर्गत विविध परीक्षांना बसण्यासाठी सुचवलं. विश्वेश्वरय्या या परीक्षा देखील विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आणि क्लास वन अधिकारी म्हणून बढती मिळवली. ❤️


१८८६ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी अधिकारी बनून विश्वेश्वरय्या पुण्यात परत आले. आता पर्यंत त्यांनी मराठी देखील शिकून घेतली होती. याच वेळी त्यांना सिंध प्रांतात अधिक भत्ता देणारी ऑफर आली. तिथल्या वातावरणात कोणता गोरा अधिकारी टिकत नसे म्हणून २५०/- रुपये दरमहा अधिकचा भत्ता दिला जायचा. (साधारण १५ तोळे सोने दरमहा आले असते एवढ्या पैश्यात.. करा हिशोब मग) लहानाचे मोठे होत असताना प्रचंड गरिबी सोसलेली होती आणि प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आले होते. त्यामुळे त्यांनी सिंध प्रांतात नोकरी विनासंकोच स्वीकारली. 


सक्कर शहराला सिंधू नदीतून पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी नवी यंत्रणा सुरू केली. तिथं सिंधू नदीचं पाणी खूपच गढूळ होतं. पाणी उपसून आधी फिल्टर करायला लागत असे, जे खूप खर्चिक होतं. विश्वेश्वरय्या यांनी नदीतच विहीर खोदून तिच्या वाळूत नैसर्गिक शुध्दीकरण घडवून आणलं. त्यांची शक्कल पाहून मुंबई प्रांताचा लॉर्ड सँडहर्स्ट वेडाच झाला (सँडचा उपयोग पाहून असेल कदाचित) त्याने विश्वेश्वरय्या यांना संपूर्ण प्रांतात अक्षरशः नाचवलं. विश्वेश्वरय्या यांनी याच पद्धतीने तापी नदीच्या पाण्यातून सुरत शहराची तसेच नर्मदेतून भडोच शहराची तहान भागवली. 


पुण्यात परत आल्यावर त्यांनी स्वयंचलित दरवाज्याचा यशस्वी प्रयोग केला. ज्यामुळे खडकवासला धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ८ फुटांनी (आधीपेक्षा २५% अधिक) वाढली. त्यांचं स्वतचं काम पाहायला नंतर ते ५० वर्षांनी गेले तेव्हा पण हे दरवाजे उत्तम स्थितीत काम करत असल्याचं त्यांना आढळलं. हाच प्रयोग पुढे राधानगरी, कृष्णराजासागर तसेच ग्वाल्हेर येथील धरणांवर केला. एमव्ही सर हा आता एक ब्रँड झाले होते. खर तर हे मूलभूत संशोधन होत, त्याचे पेटंट घेतले असते तर त्यांना लक्षावधी रुपये कमावता आले असते. मात्र हे काम मी सरकारी वेतन घेऊन नोकरीच्या वेळेत केलं होतं त्यामुळे पेटंट घेऊ शकत नाही असं प्रामाणिक उत्तर त्यांनी सरकारला दिलं. 


त्यांच्या प्रामाणिकपणाचा अजून एक किस्सा सांगितला जातो. त्यांच्या घरात दोन मेणबत्या असायच्या.. एक सरकारी पैश्यातून विकत घेतलेली तर एक खासगी पैश्यातुन. जेव्हा सरकारी काम असेल तेव्हा पहिली मेणबत्ती वापरायची, तर खासगी कामासाठी दुसरी. अर्थात त्यांना खासगी आयुष्य किती होते हा प्रश्नच.. कॉलेजमध्ये असताना त्यांचं लग्न झालं, मात्र बायको प्रसूती दरम्यान मृत्यू पावली, दुसरी बायको केली, तिचं पण तसंच.. आता त्यांनी आशा सोडली, मात्र त्यांच्या आईने आशा सोडली नव्हती, तिसरे लग्न लावले, मात्र तिसरी बायको यांना सोडुन निघुन गेली. कामाचा व्याप एवढा वाढला होता की त्यांना कुटुंबाला वेळ देणं कितपत शक्य होतं हा प्रश्नच आहे. काम आणि तत्वापुढे सर्व काही गौण…❤️


पुण्यात काम करताना तर त्यांनी मोठा पंगा घेतला. सुजलाम सुफलाम पुणे विभागातील पाटबंधारे खाते मूठभर मोठ्या जमीनदारांच्या दावणीला बांधले होते. त्यांच्या वावरात कायम पाणी, मात्र गरिबाला कोणी वाली नाही. यावर उपाय म्हणून विश्वेश्वरय्यांनी पाण्याची पाळी सुरू केली. सर्वांच्याच पिकांना आता पाणी मिळणार होते. पिके आलटून पालटून घ्यायची होती. अर्थात जमीनदार लोकांच्या पोटात गोळा उठणे साहजिक होते. त्यांनी लॉबी तयार करून केसरीचे सर्वविषयतज्ञ संपादक बाळ टिळक यांना विश्वेश्वरय्या यांच्यावर सोडले. दर आठवड्याला केसरी मधून पाण्याच्या पाळीपद्धती विरुद्ध आगपाखड होऊ लागली. मात्र सरकार विश्वेश्वरय्या यांच्यामागे ठाम उभे होते. विश्वेश्वरय्या यांनी देखील कुशलतेने परिस्थिती हाताळत जमीनदार गटाशी संवाद साधत ही योजना सर्वसंमत करून घेतली. आज हीच पद्धत देशभर वापरली जात आहे. 


विश्वेश्वरय्या यांची भूमिका धोरणासाठी असे, त्यात व्यक्तिगत हेवेदावे, फायदा नुकसान नसे. म्हणून तर गांधीच्या कुटिरोद्योग चळवळीला विरोध करत त्यांनी मोठ्या उद्योगांचे तत्व मांडले असले तरी गांधींसोबत त्यांचे मतभेद नव्हते. म्हैसूरच्या वडियार राजांनी जेव्हा संस्थानातील नोकरीत आरक्षण लागू केलं तेव्हा त्यांनी आरक्षणविरोधी भूमिका घेतली होती. संस्थानातील नोकरीमध्ये इतर जातीचे प्रमाण फारच कमी आहे हे सत्य त्यांना मान्य होते, मात्र आधी मागासवर्गीयांना शिक्षित करणेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले पाहिजेत. नाहीतर आरक्षण घेऊन खूपच कमी क्षमता असलेला नोकरी मिळवेल आणि त्यामुळे कामाची गुणवत्ता ढासळेल असे त्यांना वाटायचं.🤔


त्यांच्या वरील दोन्ही भूमिकेची आपण समीक्षा करू शकतो, मात्र त्यामध्ये विश्वेश्वरय्या व्यक्तिगत आकसातून नाही तर धोरण म्हणून या गोष्टीकडे पाहत होते हे विसरून चालणार नाही. ते स्वतः खालच्या अधिकाऱ्याशी त्याची जात पाहून वागत नव्हते. मागासवर्गीयांचा दीर्घकालीन विकास शक्य करायचा असेल तर शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोचवली पाहिजे हा त्यांचा विचार होता आणि त्यासाठी त्यांनी मैसूर संस्थानचे दिवाण असताना भरपूर प्रयत्न केले. ते लिहीतात "मैसूर येथील बहुसंख्य जनतेत शिक्षण, महत्त्वाकांक्षा आणि संघटन यांचा अभाव आहे. कसलेही नियोजन नाही, नेतृत्व नाही, आर्थिक स्थिती नाही त्यामुळे विकास नाही. येथील सर्व जनतेला उत्तम शिक्षण देणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. त्यानंतर सरकारी नोकरीत त्याचसोबत व्यापार आणि उद्योगात देखील त्यांचे प्रमाण वाढेल."👍


विश्वेश्वरय्या यांची १९०६ मध्ये भारत सरकारने वरिष्ठ इंजिनिअर म्हणून एडन बंदरावर शहरात नियुक्ती झाली. व्यापारी महत्व असलेल्या सुवेझ कालव्यावरील हे बंदर. जिथे पिण्याचे पाणी सोन्याच्या भावात विकत घ्यायला लागायचे. विश्वेश्वरय्या यांनी या बंदरापासून १६ किमी अंतरावरील एका रेताड नदीत संधी शोधली. अर्थात त्यांची कल्पना ऐकून स्थानिक अडाणी राजा बुचकळ्यात पडला. मात्र त्याने परवानगी दिली. त्या नदीत विहीर खोदून वर डोंगरावर पाणी चढवून एडनला पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा सुरु करण्यात आला. त्यासाठी जेव्हढा खर्च आला तेवढा तर एडन मधील लोक दरवर्षी पिण्याचे पाणी विकत घ्यायला घालवत होते. ❤️


ब्रिटिश सरकार खुश.. विश्वेश्वरय्या यांना कैसर ए हिंद हा किताब दिला. मात्र सरांना वेगळा बहुमान अपेक्षित होता. त्यांची योग्यता असून देखील त्यांना १९०७ पर्यंत मुख्य अभियंता हे पद मिळालं नव्हतं. 😔(कारण तोवर ते कोणत्याही भारतीय व्यक्तीला मिळाले नव्हतं) तत्वापुढे नोकरीचा विचार का करायचा? त्यांनी सरळ राजीनामा दिला. खरतर १९०९ मध्ये त्यांची २५ वर्ष सर्व्हिस पूर्ण झाली असती, अजून दोन वर्ष काम केलं असत तर पूर्ण पेन्शन मिळणार. मात्र एमव्ही सरांना पेन्शनचा मोह नव्हता. तेव्हा लॉर्ड सिडनहेम हे मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांनी एमव्ही सरांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र एमव्ही सरांच्या दृढ निश्चयापुढे त्यांनी हात टेकले. मात्र त्यांच्या अधिकारात एक काम केलं. सर्विस दोन वर्ष कमी असली तरी एमव्ही सरांना पूर्ण पेन्शन लागू केली. ❤️


१९०९ साली हैदराबाद संस्थानात विशेष सल्लागार अभियंता म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. हैदराबाद शहराची पुनर्रचना करण्यात आणि त्याला पुर मुक्त करण्यात एम व्ही सरांचे मोठे योगदान आहे. खवळलेल्या समुद्रापासून विशाखापट्टणम बंदराला वाचवण्यासाठी एमव्ही सरांनी यंत्रणा तयार केली. नंतर त्यांना मैसूर संस्थानाने बोलावले. तिथे शिक्षण, उद्योग,कृषी या सर्व क्षेत्रांत त्यांनी लक्षणीय कामगिरी केली. कृष्णराजसागर धरण असो किंवा मैसूर बँक, मैसूर विद्यापीठ, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार, मुलींचे पहिले वसतिगृह, शेतकी महाविद्यालय, वृंदावन गार्डन… एम व्ही सरांनी कामाचा धडाका उडवला. रेशीम उत्पादन, चंदनतेल साबण (दिवाळीत मैसूर सँडलचा गोटा वापरला असेल तर आठवेल लगेच), धातू उद्योग, सिमेंट, साखर कारखाने आणि त्यांना पूरक लघू उद्योग, हॉटेलींग व्यवसाय, मुद्रणालये यांच्या निर्मितीस त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांना मैसूरचे शिल्पकार म्हणून ओळखले जाऊ लागले. 🤠


त्यांच्यात एक निपुण अभियंता तर होताच शिवाय कुशल अर्थतज्ञ देखील होता. भद्रावती स्टील हा दिवाळे वाजलेला कारखाना भंगारात विकून टाकावा, असा सल्ला परदेशी तज्ञ सल्लागारांनी दिल्यानंतर एमव्ही सरांनी सूत्रं हातात घेतली . सर्वप्रथम त्यांनी त्या कारखान्यामधून सर्व अमेरिकन तंत्रज्ञांना काढून टाकलं, केवळ स्थानिक कामगारांच्या सहकार्याने फक्त साडेपाच वर्षांत सर्व तोटा भरून काढून त्यांनी कारखाना फायद्यात आणून दाखवला. ❤️ विकणे सोपे असते हो.. उभे करणे करणे अवघड.. स्वतःला उभारता येत नसेल तर किमान आहे ते तरी विकू नये.. खरं बोलतोय ना.. 🤭


दि हिंदुस्थान एरॉनॉटिक्‌स, जमशेटपूर टाटा लोखंड व पोलाद कारखाना स्थापन करण्यात, पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात एमव्ही सरांच मोठं योगदान होतं. याशिवाय कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड व विजापूर या शहरांची पाणीपुरवठा योजना त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झाली. पुणे, हैदराबाद व मैसूर येथील भुयारी गटार योजना त्यांच्या कारकीर्दीत सुरू झाल्या. एवढंच नाही तर नियोजन आयोगाच्या पहिल्या समितीत देखील त्यांचं योगदान महत्त्वाचं होतं. आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुंबई, कराची, बडोदा, सांगली, भोपाळ, पंढरपूर, अहमदनगर, नागपूर, भावनगर,राजकोट, गोवा या नगरपालिकांना कररूपाने स्वावलंबी करण्यास देखील त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. 


त्यांच्याबद्दल एक आख्यायिका अशी आहे की त्यांनी रात्री रेल्वेतून प्रवास करताना रुळांच्या बदललेल्या आवाजावरून पुढे रेल्वे रूळ उखडले आहेत असा अचूक निष्कर्ष काढून चैन ओढली आणि गाडी थांबवली होती. गाडी थांबल्यावर त्यांनी पुढे रूळ तपासायला सांगितले, आणि खरचं साधारण एक किमी अंतरावर रूळ उखडले होते. हजारो प्रवाशांचे प्राण या घटनेत वाचले होते. (मला तरी ही घटना काल्पनिक असल्याचं वाटतं. आपल्याकडे चमत्काराशिवाय नमस्कार नसतो, म्हणून कदाचित हा किस्सा जोडला गेला असेल, कदाचित खरा पण असेल) एमव्ही सर म्हणायचे कोणत्याही धार्मिक कर्मकांडात, देव दर्शनात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ कामात घालवला तर देवाला जास्त आवडेल. 


एमव्ही सर लेखक होते. आत्मचरित्राशिवाय रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया (१९२०), प्‍लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया (१९३४), प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.त्यांनी अनेक संस्थांना लाखो रूपयांच्या देणग्या दिल्या. मृत्युसमयी त्यांच्याकडे केवळ ३६०००/- रुपये शिल्लक होते. हे पैसे त्यांच्या माळी आणि आचारी यांना देण्यात यावे असे त्यांनी निर्देश दिले होते. बंगलोर येथे भारतातील सर्वांत मोठे सायन्स म्युझियम आहे त्याला सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम असं नावं दिलं आहे. विश्वेश्वरय्यांनी आपल्या जन्मगावी स्वतः बांधलेल्या सुंदर घराचा आता राष्ट्रीय स्मारकात समावेश केला गेला आहे. 


अतिशय नियोजित दिनचर्या असल्याने त्यांनी वयाची १०० अगदी विनाआजार गाठली. त्याबद्दल ते गमतीने म्हणत, "मृत्यु कदाचित मला शोधत माझ्या घरी आला पण असेल पण मी घरी निवांत बसलेला आढळलेला नसेल.. त्यामुळे आमची चुकामूक झाली असेल." १४ एप्रिल १९६२ रोजी वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आज त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाने सन १९९७ पासून ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे. एमव्ही सरांनी अभियांत्रिकी बरोबरच अर्थशास्त्र, आरोग्य, कृषी, शिक्षण इत्यादी बाबीमध्ये जेवढं काम केलं आहे तसे काम पुन्हा क्वचितच एखादा व्यक्ती करेल. अर्थात ते नेहमी कामाचे श्रेय त्यांचा सहकाऱ्यांना देतं. ❤️


त्यांच्यासोबत काम करणे तारेवरची कसरत असे. कारण त्यांच्या स्वतच्या कार्यक्षमतेला मर्यादा नव्हत्या की सांसारिक पाश नव्हते. अमुक वेळेत काम झालच पाहिजे यासाठी त्यांचा दट्या असायचा.. मात्र आपल्या हाताखालील स्टाफ वेळेवर जेवला आहे की नाही याची पण ते खात्री करून घेत. कामचुकार लोकांना शिक्षा आणि काम करणाऱ्या लोकांची प्रशंसा करताना कोणताही भेदभाव केला जात नसे. त्यांनी स्वतः कुणाची खुशमस्करी केली नाही, आणि कुणी त्यांची केलेली त्यांना आवडत नसे. त्यांच्या आयुष्यात वैयक्तिक बाबींना थारा नव्हता. म्हणूनच Memoirs of my Working Life या आपल्या आत्मचरित्रात ते स्वत:बद्दल, कुटुंबाबद्दल काहीच लिहीत नाहीत. दिलेल्या शेकडो व्याख्यानांत देखील स्वतःचा डंका त्यांनी कधीच पिटला नाही. ज्यांचे काम बोलते त्यांना मी हे केलं, मी ते केलं..मी.. मी.. मी असे सारखं सांगाव लागत नाही.


जो मी पना सोडून काम करतो.. त्यांचीच जयंती साजरी होते..खरं आहे ना शेठ. 😉


#Richyabhau

#mokshagundam_vishweshwaraia


आपला ब्लॉग : https://drnitinhande.in/


पोस्ट आवडली तर नक्की शेअर करा 🙏

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव