एकांकिका : विज्ञानशलाका कमला



 एकांकिका : विज्ञानशलाका कमला



एकांकिका विज्ञान शलाका कमला

पात्रे : 

१) कमला भागवत सोहोनी 

२) नारायणराव भागवत

३) सी वी रमण

४) श्रीनिवासय्या

५) स्वामी (शिपाई)

६) गुप्ता (आस्थापना अधिकारी)

 ७) डॉ सरस्वती

८) निवेदक : स्त्री असल्यास उत्तम. 



प्रवेश पहिला 


(प्रकाश व्यवस्था करणे शक्य असल्यास रंगमंचावर मध्यभागी प्रकाश पडतो.. आणि निवेदक दिसू लागते.)



निवेदक : नमस्कार मंडळी.. आज आपण एका विज्ञानशलाकेची गोष्ट ऐकणार आहोत. कमला भागवत सोहोनी यांची... काय म्हणता… यांचे नाव कधी ऐकले नाही.. अहो या कमलाबाई म्हणजे विज्ञानात PhD मिळवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला. अर्थात आपल्याकडे सिनेजगतातील तारकांना प्रसिध्दी मिळते, विज्ञानातील तारकांना नाही.  कमलाबाईंचे स्थान तर सर्व तारकांमध्ये ध्रुवाप्रमाणे अढळ…  तरीही आज नव्या पिढीला त्यांची माहिती नाही. म्हणून तर त्यांची कहाणी नव्याने सांगणे गरजेचे झाले आहे.


आपण म्हणतो की सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची दारे खुली केली.. आणि स्त्रियांनी त्यांचे क्षितिज रुंदावत गगनी झेप घेतली. खरेच आहे.. मात्र आजही आपण एक गोष्ट विसरतो, भारतात जन्मलेल्या एकाही महिलेला अद्याप नोबेल पारितोषिक मिळाले नाही. तशी क्षमता महिला तर भरपूर आहेत, मात्र पूरक व्यवस्था नाही. कधी विचारले की "पहिली भारतीय महिला अंतरिक्षयात्री कोण" की हमखास उत्तर येते " कल्पना चावला" हे उत्तर चूक आहे असे सांगितले तर मग उत्तर येते, " सुनिता विल्यम्स" हे उत्तर देखील चूक असते..  या दोघी भारतीय वंशाच्या असल्या तरी त्यांचे नागरिकत्व अमेरिकन आहे. म्हणजे अजूनही पहिली महिला भारतीय अंतरीक्ष यात्री झालेली नाही…


म्हणजेच ती होण्याची संधी अजूनही प्रत्येकाला आहे. ही यात्री कुणीही असू शकते.. मी, तुम्ही.. तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची पत्नी.. तुमची सून..  कोणीही… मात्र यासाठी तिच्यात हवी विज्ञानावर अपार निष्ठा आणि व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्याची जिद्द.. कमलासारखी.... 

आता मी तुम्हाला ८८ वर्ष मागे घेऊन जाते. (रंगमंचावरील सर्व भाग उजळतो) आपण पाहत आहात ते आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोरच्या संचालकांचे कार्यालय.. ज्याला आता आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असे म्हणतो. नोबेल पारितोषिक विजेते सी वी रामन हे पहिले भारतीय संचालक म्हणून आता या संस्थेला लाभले आहेत. आधीचे तीनही संचालक ब्रिटिश होते. एरवी शांत असलेल्या या कार्यालयात आज वादळ येणार आहे.. चला बघुया कोणते वादळ येत आहे ते.


(निवेदक विंग मध्ये निघून जाते.)

काळ: १९३३

स्थळ : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संचालकांचे दालन. रंगमंचावरील मधील अर्धा भाग संचालकांचा कक्ष आणि अर्ध्या भागात बाहेरचा प्रतीक्षाकक्ष. दोन्हीमध्ये दरवाजा. (आभासी असेल तरी चालेल.) संचालकांच्या कक्षात एक टेबल, त्यावर ऑफिससंबंधित फाईल्स आणि इतर साहित्य, ब्रिटिशकालीन भारताचा नकाशा असल्यास उत्तम. संचालकांसाठी एक खुर्ची, अभ्यागतांसाठी दोन खुर्च्या.. एक बेल. प्रतीक्षाकक्षात एक बाकडे आणि पिण्याच्या पाण्याचा माठ.


(मध्यमवयीन स्वामी शिपाई प्रवेश करतो. खांद्यावर फडके..  लगबगीने संचालक कक्षात जातो, आणि कन्नड उडत्या चालीचे गाणे म्हणत साफसफाई सुरू करतो. त्यात तो मग्न असताना प्रतीक्षा कक्षात एक बाप लेकीची जोडी येते. नारायणराव आणि कमला भागवत. नारायणराव पन्नाशीच्या घरातले, व्यवस्थित सूट बुटात, रुबाबदार व्यक्तिमत्त्व. कमला २० वर्षाची, दोन वेण्या घातलेली, नववारी नेसलेली. अतिशय तरतरीत, आत्मविश्वास पूर्ण देहबोली असलेली.)

 

नारायणराव : कोणी आहे का आत?

(स्वामी फडके झटकत बाहेर येतो. त्याचे बोलणे कानडी हेलाचे.)

स्वामी : इंटहा केलसा? काय काम आहे?

नारायणराव : मी नारायणराव भागवत, मुंबईवरून आलो आहे. आपल्या संचालक साहेबांना भेटायचे आहे. 

स्वामी : सायब आलं नाही की अजून, येतीलच की आता. बसून राव्हा जरा.

नारायणराव : ठीक आहे. पाणी मिळेल का जरा?

स्वामी : घ्या की त्या माटातलं.. 

कमला बाकावर बसते, नारायणराव पाणी पितात, कमलाला खुणेने विचारतात, कमला खुणेनेच नाही म्हणते.

स्वामी : सायबाकडं काय काम आणलं की?

नारायणराव : एमएससीच्या ॲडमिशन संदर्भात भेटायचं होत.

स्वामी : भेटायचं असल तर भेटा, पण सायब नियम सोडून काम करत नाही. आधीचे गोरे सायब परवडले, लय कडक कारभार ह्या सायबाचा. बरं ते जाऊ द्या..  पोरगा नाय आला का ज्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तो.

नारायणराव : मुलाला नाही प्रवेश घ्यायचा. मला मुलगा नाहीच, तीन मुली आहेत फक्त. ॲडमिशन तर हिला हवंय (कमलाकडे बोट करतात)

स्वामी : काय मस्करी करता का राव.. मुलगी कशी काय इथ शिकणार.. 

नारायणराव : अहो मस्करी नाही, खरचं हिला ॲडमिशन घ्यायचे आहे. खूप हुशार आहे आणि विज्ञानाची प्रचंड आवड आहे. 

स्वामी : ओ सायब, ते आवडबिवड समध ठीक, पण आजवर एकबी मुलगी आमच्या संस्थेत शिकलेली नाही.

कमला ताडकन उठत बाणेदारपणे उद्गारते

कमला : आजवर कोणी स्त्री इथंवर पोचली नाही कारण स्त्रियांना विज्ञान शिकण्यासाठी व्यवस्थाच नाही, प्रोत्साहन नाही. चूल आणि मूल यातच तिला आजवर कोंडण्यात आले. याला माझे सुदैव म्हणा की दुर्दैव.. पण माझ्यासमोर मळलेली पायवाट नाही.. माझा रस्ता मला स्वतः बनवायला लागेल. 

स्वामी : बगा बा तुमीच .. मला अडाण्याला काय कळतं.. रामन सायब आले की सांगा तुमचं तुमीच. 

(आतल्या कक्षात निघून जातो. कमला आणि नारायणराव बाकावर बसतात.)


नारायणराव : बाळा, सकाळपासून काहीच खाल्ले नाहीस, एखादा लाडू तरी खाऊन घेते का.. 

कमला : नको बाबा, माझी काहीच खायची इच्छा नाही. ॲडमिशन होईपर्यंत मला काहीच गोड लागणार नाही. नारायणराव : ॲडमिशन झाल्यावर इकडे एवढ्या लांब तू एकटी कशी रे राहशील.

कमला : का?  तुम्ही आणि काकांनी इथेच शिक्षण घेतले ना.. मग मला काय धाड भरली आहे.

नारायणराव : तसे नाही रे बाळा, माझी किंवा माधवची गोष्ट निराळी होती. तुझ्यासारखी शहाणीसुरती मुलगी अशी परमुलुखात एकटी...

(त्यांचे बोलणे मध्येच तोडत, उभे राहत)

कमला : केवळ मुलगी आहे म्हणून..  बाबा तुम्ही हे बोलताय.. केवळ मुलगी आहे म्हणून मला या संस्थेत प्रवेश नाकारला, तेव्हा माझ्या पाठीशी उभे तुम्हीच राहिलाय ना…  माझ्या तीन मुली याच माझे सर्वस्व आहे, मला मुलाची गरज नाही असे म्हणुन आजवर आम्हाला मुलांसारखं वाढवलं, पुरेपूर स्वातंत्र्य दिलं, आम्हाला हवं ते शिकू दिलं,आत्मविश्वास दिला. आणि आज माझ्यावर अविश्वास दाखवता आहात?

नारायणराव : (उभे राहत) तुझ्यावर अविश्वास नाही रे बाळा, नाहीतर इथं आलोच नसतो ना आज. पण बापाचे काळीज आहे, काळजी वाटणारच.. माझे वडील राजारामशास्त्री, प्रकांड पंडित, लेखक आणि प्रसिद्ध वक्ते. संपूर्ण देशात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते असे तर्ककठोर व्यक्तिमत्त्व. मात्र आम्हाला स्वत:पासून दूर ठेवताना त्यांच्या डोळ्याच्या कडादेखील ओल्या व्हायच्याच. साहजिक आहे...  काळजाच्या तुकड्याबाबत काळजी तर वाटणारच. 

(स्वामी बाहेर येत.)

स्वामी : अहो बसून राव्हा ना एका बाजूला, सायब यायची टाइम झाली… हे काय सायब आलच की.

(रुबाबदार सी व्ही रामन प्रवेश करतात. स्वामी त्यांच्या हातातील कातडी बॅग घेऊन त्यांच्या मागे मागे जातो. बॅग ठेवतो आणि बाहेर येऊन थांबतो.

रामन काही क्षण रिलॅक्स होतात आणि मग बेल वाजवतात. स्वामी आत जातो) 

रामन : बाहेर कोण लोक आलेत रे? 

स्वामी : (चाचरत, मान वर न करता) मला नाही माहित, आत पाठवू का?

रामन : अरे काय काम आहे ते तरी विचारायचे ना.

स्वामी : (अधिक चाचरत) नाही विचारलं, आत पाठवू का?

रामन : बरं पाठव. 

(स्वामी उसासा सोडत बाहेर येतो, आणि खुणेने त्या दोघांना आत जायला सांगतो. दोघे आत येतात. रामन त्यांना बसायची खूण करतात. दोघे बसतात.)

नारायणराव : गूड मॉर्निंग सर, मी नारायणराव भागवत, आपल्या संस्थेचा माजी विद्यार्थी. 

रामन : लेट मी गेस.. आय थिंक १९११ च्या पहिल्या बॅचमधून बाहेर पडणारे तुम्ही.. राईट?

नारायणराव : अरे वा.. तुम्ही इथं संचालक म्हणून नुकतेच रुजू झाला आहात, तरीही संस्थेची इत्यंभूत माहिती घेतली, माझे नावदेखील लक्षात राहिले तुमच्या. 

रामन : संस्थेतून शिकून गेलेल्या सर्व हुशार विद्यार्थ्यांची माहिती मी मागवून घेतली आहे मुद्दाम. आपण सर्व एकाच "विज्ञान धर्माचे" पाईक. 

नारायणराव : सर, तुम्ही एवढे नोबेल पारितोषिक मिळवून जगप्रसिद्ध झाला आहात, तरीसुद्धा आम्हाला तुमच्या पंगतीला बसवता, हा तुमच्या मनाचा मोठेपणा. 

रामन : लहान मोठे असे काही नसते, विज्ञान सागरात डुबक्या मारणे हे महत्त्वाचे, भले मोती क्वचित एखाद्याला मिळत असेल. पण प्रयत्न करतात ते सर्वच तेवढेच महत्त्वाचे… 

बरं हे सांगा आज काय काम काढले. 

नारायणराव : सर, आज मी इथं एक पालक म्हणून आलो आहे. माझ्या मुलीला, कमलाला..

रामन : (आश्चर्याने) कमला भागवत.. ओह कमला नारायण भागवत.. हीच का ती.. (कमला कडे बोट दाखवत)

नारायणराव : होय सर.. अतिशय हुशार मुलगी आहे. बीएससी परीक्षेत सत्यवती लल्लुभाई श्यामळदास स्कॉलरशिप मिळवून मुंबई विद्यापीठात ती पहिली आली आहे. 

रामन : आय सी.. तिचा अर्ज आला तेव्हा मी उत्सुकतेने अतिशय काळजीपूर्वक वाचला, त्यामुळे ही माहिती मला आधीच आहे. मला खूपच अभिमान वाटतो आहे कमलाचा. 

कमला : तरीही तुम्ही माझा एमएससी साठी प्रवेश अर्ज नाकारला?

रामन : हे बघ बेटी, तुझ्या कामगिरीचा अभिमान असला तरी मलादेखील काही बंधने आहेत. संस्था चालवताना काही नियम पाळावे लागतात. आजवर एकही स्त्री इथं शिकायला आली नाही. 

कमला : आजवर आली नाही, याचा अर्थ कधीच येणार नाही असा नाही ना होत. आज मी या संस्थेची पहिली विद्यार्थिनी ठरले तर नंतर शेकडो, हजारो स्त्रिया विज्ञानाच्या क्षेत्रात उतरतील.. परदेशात मेरी क्युरी, लिझ माईटनर यांनी स्त्री वैज्ञानिकांची नवी परंपरा सुरु केली आहे. आणि आपल्या भारतात देखील त्रिवेंद्रम येथे जानकी अम्मल वनस्पतीशास्त्र शिकवत आहेत. आता काही दशकात हजारो स्त्रिया विज्ञान क्षेत्रात उतरलेल्या असतील. 

रामन : बेटी, भविष्यात असे आपल्याकडे झाले तर मला पण खूप आनंद झाला असेल पण…  पण आज तरी इथं सर्वच पुरुष असणार, शिकवायला आणि सोबत शिकायला देखील, त्या सर्वात एकच स्त्री असेल तर गैरसोयीचे नाही का होणार. तिच्यासाठी पण आणि सर्वांसाठी पण. 

कमला : केवळ स्त्री म्हणून डावलले जाणे मला मान्य नाही. 

रामन : बेटी, हट्ट करू नको, नारायणराव तुम्ही तरी सांगा तिला समजाऊन. 

नारायणराव : मी तिला कोणत्या तोंडाने सांगू.. आजवर माझ्या कोणत्याच मुलीला मी मुलगी म्हणून बंधन घातले नाही. मला असं वाटतं की मुलींना प्रवेश देऊच नये असे कुठे नियमावली मध्ये नसेल, तर तिला तिचा हक्क मिळावा. 

रामन : असा कुठे नियम नाही, कारण अशी वेळ येईल असे कुणाला वाटलेच नव्हते. मात्र तरीही संस्थेची शिस्त सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी आज घडीला तरी कोणत्या स्त्रीला या संस्थेत प्रवेश देऊ शकत नाही. 

कमला : तुमचे म्हणणे ठाम असेल तर माझे म्हणणे देखील ठाम आहे. (आवाज हळूहळू चढत जातो.) केवळ स्त्री असल्यामुळे तुम्ही मला डावलता आहात हे मला मान्य नाही, हा केवळ माझ्यावर नाही तर संपूर्ण स्त्री जातीवर अन्याय आहे, गांधीजींच्या सत्याग्रह तत्त्वावर माझा विश्वास आहे. मी वडिलांसोबत परत मुंबईला जाणार नाही. जोपर्यंत मला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या दारात बसणार आहे. 


(वातावरण तणाव पूर्ण.. काही क्षण सर्व निश्चल.. घड्याळाची टिकटिक ऐकू येते आहे फक्त..  बाप लेक पुन्हा बाकड्यावर येऊन बसतात. 

आत गडबड सुरू.. बेल वाजवली जाते, स्वामी आत जातो)


रामन : रसायनशास्त्र विभागप्रमुख श्रीनिवासय्या यांना घेऊन ये पटकन.

(स्वामी तडक बाहेर पडतो, आणि विंग मधून बाहेर जातो.)


(इकडे बाकावर बसलेले असताना)

कमला : बाबा तुम्ही दुपारची गाडी पकडून मुंबईला परत जा.. मी इथे प्रवेश मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

नारायणराव : बाळा, ही तुझी एकट्याची लढाई नाही, मीदेखील तुझ्यासोबत सत्याग्रह करायला इथ बसणार आहे.

कमला : बाबा तुम्ही काही काळजी करू नका. हा माझा लढा मला एकटीलाच लढला पाहिजे. आणि तुम्ही मला तेवढं सक्षम बनवलं आहे.. तुम्ही अगदी बिनघोर जा.

(एक पन्नाशी जवळ ठेपलेला माणूस लगबगीने त्यांच्या समोरून जातो, रामन सरांच्या कक्षात घुसतो. बाप लेक पुन्हा बाकडावर बसतात)


श्रीनिवासय्या : तुम्ही बोलावलं सर

रामन : अय्या.. आज न भूतो असा पेच निर्माण झाला आहे. तुमच्या विभागात एक मुलगी प्रवेश घेऊ इच्छित आहे

श्रीनिवासय्या : हे कसे शक्य आहे सर.. एक मुलगी...

रामन : (त्यांचे बोलणे मध्येच तोडत) बाहेर ती आणि तिचे वडील सत्याग्रहाला बसले आहेत. मुलींना प्रवेश देता येणार नाही असा लेखी नियम दाखवा नाहीतर प्रवेश द्या अशी त्यांची मागणी आहे, तुम्ही अनुभवी, अनेक वर्ष तुमची इथं सेवा झाली आहे, शिवाय एकदा प्रवेश दिला की तिचा संबंध तुमच्या विभागाशीच येणार आहे.. काय करावे हे आता तुम्हीच सांगा.

(इथून पुढे एक मिनिट दोघांचा काथ्याकुट सुरू आहे.. मात्र संवाद ऐकू येत नाहीत, केवळ हावभाव दिसत आहेत. घड्याळाची टिकटिक तेवढी ऐकू येते. बाहेर नारायणराव बैचेन होऊन येरझारा घालत आहेत. कमला मात्र शांत आहे. 

श्रीनिवासय्या छातीवर हात ठेऊन रामन यांना मी पाहून घेतो अशा आविर्भावात आश्वस्त करतात आणि बाहेर येतात.)


श्रीनिवासय्या : मी श्रीनिवासय्या, रसायनशास्त्र विभाग प्रमुख. रामनसरांनी मला सर्व परिस्थितीची कल्पना दिली. नारायणराव, संस्थेची अडचण तुम्हालाही समजत असेलच. यातून मार्ग काढणे आवश्यक आहे, मी काही सुचवतो, पाहा तुम्हाला दोघांना पटते का. खालील तीन अटींवर कमलाला संस्थेत प्रवेश दिला जाईल. या अटींचे तिला एक वर्ष काटेकोर पालन करावे लागेल तरच तिला नियमित विद्यार्थिनी म्हणून समजण्यात येईल.

१) रोज सकाळी पाच ते संध्याकाळी दहा एवढा वेळ तिला संशोधनासाठी द्यावा लागेल. 

२) इतर पुरुष संशोधकांपासून तिला लांब राहावे लागेल, याबाबत संस्थेची शिस्त बिघडणार नाही याची काळजी तिलाच घ्यावी लागेल.

३) मी सांगेल ते काम वेळेत पूर्ण करावेच लागेल.


नारायणराव : अश्या जाचक अटींचे पालन तर कोणीच करू शकणार नाही. 

कमला : थांबा बाबा! मला या तीन ही अटी मान्य आहेत. 

श्रीनिवासय्या : नीट विचार करून सांग बेटा

कमला : होय सर.. माझा निर्णय झाला आहे, मी तुमच्या या अटी मान्य करते. मात्र तुम्हाला पण माझी एक अट मान्य करायला लागेल.

श्रीनिवासय्या : ती कोणती

कमला : रोजच्या बौध्दीक ताणातून मुक्त होण्यासाठी मला संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत टेनिस खेळण्यासाठी सुट्टी मिळावी. 

श्रीनिवासय्या : अरे पण अट क्र २ नुसार तुला इतर पुरुषांसोबत खेळता येणार नाही, आणि आपल्या कॅम्पसमध्ये तुझ्याशी टेनिस खेळू शकेल अशी कोणीच महिला नाही. 

कमला : त्याची चिंता नको, मी भिंतीसोबत टेनिस खेळेल. मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ मात्र गरजेचा आहे. तेवढी सवलत मला मिळावी बाकी तुमच्या सकाळी ५ ते रात्री १० या वेळापत्रकाचे काटेकोर पालन होईल. तुम्ही सांगाल ती जबाबदारी वेळेआधीच पूर्ण केली जाईल

श्रीनिवासय्या : आजवर मी शेकडो विद्यार्थी पाहिले, पण अशी विज्ञानावर विलक्षण प्रेम असलेली पहिल्यांदाच पाहत आहे, नारायणराव तुम्ही पोरीची काळजी करू नका, मी माझ्या परीने सर्व ती मदत तिला करेल.

नारायणराव : सकाळी ५ ते रात्री १० वेळ जर ती संशोधनाला देणार असेल तर तिच्या स्वयंपाकाचे काय.. ती खाणार काय

श्रीनिवासय्या : मी बोललो ना तुम्ही आता चिंता सोडा, कमलासाठी रोज माझ्या घरून डबा येत जाईल. 

(नारायणराव श्रीनिवासय्या यांचे हात कृतज्ञतेने हातात घेतात.) 


(पडदा)





प्रवेश दुसरा..

एक वर्ष उलटून गेलं आहे. 

स्थळ : रामन यांचाच कक्ष


श्रीनिवासय्या : सर आपण सांगीतलेल्या अटीनुसार कमलाने एक वर्ष पूर्ण केलं आहे, आता तिला नियमित विद्यार्थिनी म्हणून प्रवेश दिला पाहिजे.

रामन : तिची प्रगती कशी आहे.

श्रीनिवासय्या : तिने मी सांगितलेल्या जबाबदाऱ्या तर पूर्ण केल्याचं, शिवाय त्यातून वेळ काढून स्वत:चं संशोधन देखील केलं, दूध आणि कडधान्यावर तिने रिसर्च पेपर देखील प्रकाशित केले आहेत. 

रामन : असे असेल तर तिचा प्रवेश नियमित केला पाहिजे. (बेल वाजवतात, स्वामी येतो.) कमला भागवत यांना बोलावं

(स्वामी जातो)

रामन : ते पेपर लिहिण्यात आणि प्रकाशित करण्यात तुम्ही केलेली मदत माझ्या कानावर आली आहे.

श्रीनिवासय्या : नाही सर, पेपर कसा लिहावा यावर जरी मी तिला मार्गदर्शन केलं असलं तरी संशोधन तिनेच एकटीने पूर्ण केलं आहे. निश्चितच तिची कामगिरी अतिशय चमकदार आहे.

(कमला येते)

रामन : अभिनंदन बेटा, तू कसोटीला पूर्ण उतरली आहेस, तुझा प्रवेश नियमित करण्यात येत आहे.

कमला : धन्यवाद सर.. श्रीनिवासय्या सर आणि आपण केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. 

रामन : मी ऐकले आहे की तू रोज दोन तास टेनिस खेळतेस

कमला : होय सर, माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहे.

रामन : अरे मग एक दिवस माझ्याशी दोन सेट खेळशील का.

कमला : ही तर माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असेल. माझे स्त्री असणे आपणास गैर वाटत नसेल तर मला आपल्याशी टेनिस खेळायला आनंदच होईल.

रामन : हो, माझा चुकीचा समज दूर झाला आहे. मागच्या वर्षी मी तुझ्यावर अन्याय केला होता.. मात्र या वर्षी या अन्यायाची भरपाई करणार आहे.. दोन मुलींना आपल्या संस्थेत प्रवेश देऊन.

(कमलाचा चेहरा आनंदाने उजळतो. ती पटकन रामन यांच्या पाया पडते.)

रामन : खूप मोठी हो बेटा… खूप मोठी हो.


(पडदा)



प्रवेश तिसरा 

(रंगमंचावरील इतर दिवे बंद. केवळ मध्यभागीचा दिवा सुरू)


निवेदक : १९३६ साली एमएससी पूर्ण करून कमला phd करण्यासाठी केंब्रिजला गेली. तिने शिष्यवृत्तीसाठी अमेरिकन महिला विद्यापीठात अर्ज केला, मात्र अर्ज पोचायला उशीर झाला म्हणून तो स्वीकारला गेला नाही. मात्र  स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप’ आणि ‘सर मंगलदास नथुभाई फॉरिन स्कॉलरशिप’ या मुंबईच्या विद्यापीठातील दोन्ही शिष्यवृत्त्या घेऊन कमला केंब्रिजमध्ये रुजू झाली. पुढच्या वर्षी अमेरिकन महिला विद्यापीठाने कमलाला स्वतः हुन शिष्यवृत्ती देऊ केली, मात्र "मी दोन शिष्यवृत्ती मिळवून संशोधन करत आहे" असे उत्तर कमलाने दिले. . पुअर हंग्री इंडियन उमेदवाराकडून असे उत्तर त्या विद्यापीठाला अगदीच अनपेक्षित होते. त्यांनी तिची केंब्रीज विद्यापीठात चौकशी केली.. आणि मिळालेल्या माहितीमुळे प्रभावित होऊन तिला खास प्रवासी शिष्यवृत्ती प्रदान केली. केवळ १४ महिन्यात phd पूर्ण करून डॉ कमलाबाई भारतात आल्या. त्यांच्यासाठी अनेक सुखासीन नोकऱ्या उपलब्ध होत्या, मात्र त्यांनी संशोधन करायला संधी मिळेल अश्या खडतर नोकऱ्या स्वीकारल्या. आयुष्याचा जोडीदार निवडताना देखील त्यांनी संशोधनात तडजोड केली जाणार नाही अशी अट घातली, आणि विशेष म्हणजे त्यांना तसा जोडीदार मिळाला सुद्धा.. माधवराव सोहोनी..... मधल्या काळात देश स्वतंत्र झाला..मात्र पुरुषी मानसिकतेमधून समाज स्वतंत्र झाला नव्हता. 


(निवेदक विंगेमध्ये जाते)

 

(दिवे उजळतात.. एका सरकारी कार्यालयातील आस्थापना विभाग दिसू लागतो. ब्रिटिश भारताचा नकाशा जाऊन तिथे गांधींचा फोटो आला आहे. प्रतिक्षाकक्ष आणि बाकडा हटवून बाकीचे साहित्य तसेच असेल तरी चालेल. प्रकाश पडतो तेव्हा एक अधिकारी आरामात खुर्चीवर शब्दकोडे सोडवत बसला आहे. 


गुप्ता : आडवे चार.. माकड.. माकड..वानर.. नाही..  दोन अक्षरात काय म्हणत असतील माकडाला.. मंकी एन्ह.. हुपय्या.. अन्ह.. काय असेल????  ( ते डोकं खाजवत असतानाच कमलाबाई तावातावाने प्रवेश करतात, त्यांचे वय साधारण ५० जवळ आलेले. हातातील पत्र मिरवत त्या गर्जतात)

कमलाबाई : गुप्ता साहेब या पत्राचा काय अर्थ आहे?

गुप्ता : शांत व्हा, कमलाबाई... बसा ना.. 

कमलाबाई : बसायला माझ्याकडे मोकळा वेळ नाही.. हे पत्र.. याचा अर्थ सांगा आधी मला.

गुप्ता : (त्यांची नजर चुकवत) मॅडम, यात स्पष्ट लिहिले आहे की कार्यालयाची वेळ ११ ते पाच अशी असताना तुम्ही नेहमी ४.४५ ला ऑफिसमधून बाहेर पडता.. 

कमलाबाई : अच्छा.. मी रोज पंधरा मिनिटे लवकर जाते ते दिसते, मात्र रोज सकाळी आठ वाजता येते, ते नाही का दिसत, गेली दहा वर्ष संशोधनासाठी नीरा संकलित करायला पहाटे तीन वाजता उठून जात असते ते नाही का दिसत.

गुप्ता : मॅडम तुम्ही म्हणता ते काम कोणाला दिसत नाही, सगळे अकरा वाजता येतात. मात्र तुम्ही रोज सगळ्यांसमोर लवकर जाता आणि टेनिस खेळता. लोक बोंब मारतात ना मग. 

कमलाबाई :हे बोंब मारणारे कोण आहेत. आणि त्यांचे कामावर किती प्रेम आहे चांगलेच ठाऊक आहे. निम्म्यापेक्षा अधिक वेळ कॅन्टीन मध्ये घालवतात. केवळ एक महिला म्हणून तुम्ही मला छळू पाहता आहात काय? (आवाज वाढत जातो) गेल्या कित्येक वर्षांत मी एकही रजा घेतली नाही. सर्वात जास्त रिसर्च पेपर्स मी प्रसिद्ध केले आहेत. माझ्या हाताखाली अधिकाधिक विद्यार्थ्यांना एम.एस्सी., पीएच.डी. पदव्या मिळाल्या आहेत. तरीही माझी १५ मिनिटं दिसली? आता यापुढे या पत्राचा निषेध म्हणून रोज संध्याकाळी ४ वाजताच मी जाणार आहे.  तुम्हाला जे पाहिजे ते करा.


(कमलाबाई टेबलवर पत्र फेकून ताडकन बाहेर पडतात. गुप्ता हतबल होऊन कपाळाला हात लावतात.)

(पडदा)



प्रवेश चौथा : 

(रंगमंचावरील इतर दिवे बंद. केवळ मध्यभागीचा दिवा सुरू)


निवेदक : संशोधक म्हणून कमलाबाईंची कामगिरी अतिशय प्रशंसनीय आहे. बटाट्यातील  सायट्रोक्रोम ‘सी’ चा शोध लावला. हरभऱ्यातील जीवनसत्त्वे शोधून काढली. आहारात हरभऱ्यातील व लिंबूरसातील जीवनसत्त्वे एकत्र दिली तर रक्तवाहिन्यांचे आवरण मजबूत होते, रक्तस्राव होत नाही, हिरड्यांतून येणारे रक्त देखील थांबते हे त्यांनी प्रयोगातून सिद्ध केले. शेंगदाणा पेंड लहान मुलांचे कुपोषण कमी करायला उपयोगी पडते हे शोधून त्या पेंडेला छान खाऊचे रूप दिले, शिवाय त्यांच्यासाठी सुकडी बनवली. याशिवाय यीस्टचा वापर करून दुसऱ्या महायुध्दात लढणाऱ्या सैनिकांसाठी गोळ्या बनवल्या. आपण नीरा विक्री केंद्रावर नीरेचे फायदे लिहिलेले बोर्ड वाचले असतील. ते फायदे डॉ. कमलाबाई यांनी शोधून काढले आहेत. भारतभर सर्वत्र उपलब्ध असलेले हे पेय क, ब  जीवनसत्त्वे, फॉलिक आम्ल आणि फॉस्फरसासारखे क्षार असे कुपोषणविरोधी संपूर्ण पॅकेज असते. निवृत्तीनंतर देखील त्या सामाजिक काम करत कार्यरत राहिल्या. विज्ञानाचा वापर करून अन्नातील भेसळ कशी ओळखावी याची प्रात्यक्षिके दाखवत त्या फिरत असतात. त्यांचे संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी अर्पण केले आहे. म्हणूनच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सत्यवती आल्या तेव्हा त्यांनी डॉ. कमलाबाई यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविले. 

(निवेदक विंगेमध्ये जाते)


रंगमंचावर प्रकाश.. रंगमंचावर सत्कार समारंभ सुरू आहे. दोन तीन खुर्च्या ठेवलेल्या आहेत. कमलाबाई बसलेल्या आहेत तर सत्यवती उभ्या राहून भाषण करत आहेत. डॉ सत्यवती साठीच्या तर तर डॉ कमलाबाई नव्वदीच्या जवळ पोचल्या आहेत. 


सत्यवती: आज डॉ कमलाबाई यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले, याचा खूपच आनंद होत आहे. ज्यांच्याकडे पाहून माझ्यासारख्या हजारो महिलांना विज्ञान क्षेत्रात यायची प्रेरणा मिळाली, असे थोर व्यक्तिमत्व.. सर्व सुखसुविधांनी युक्त नोकऱ्या उपलब्ध असताना त्यांनी निवडलेला संघर्षाचा मार्ग इतर कोणी निवडलेला मला तरी माहित नाही. देशभरातील अनेक विद्यापीठात जीवरसायनशास्त्र विभाग सुरू करण्यात त्यांचा असलेला पुढाकार आणि मार्गदर्शन सर्वश्रुत आहे. अश्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा आम्ही कृतज्ञतेपोटी जो अल्पसा सत्कार करत आहोत तो त्यांनी स्वीकारावा. आणि या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी त्यांना विनंती करते.  

(कमलाबाई उठतात.. सत्कार होतो.) 

कमलाबाई : खर तर माझ्या सारख्या नव्वदीच्या जवळ पोचलेल्या म्हातारीचा सत्कार करायची काही गरज नाही.. मात्र तुम्ही लोकांनी एवढ्या प्रेमाने हा सत्काराचा घाट घातला.. ते पाहून भरून आले. संशोधकांना उमेदीच्या काळात असे प्रेम मिळाले पाहिजे, नक्कीच त्यातून त्यांच्याकडून भरीव कामगिरी घडून येईल. माझ्या संघर्षाचा उल्लेख आता डॉ. सत्यवती यांनी केला. पण एका अर्थाने माझा संघर्ष काहीच नाही. माझा जन्म तथाकथित उच्च जातीत आणि त्यातही पुढारलेल्या घरात झाला.. मला घरातील संघर्षाला सामोरे जावे लागले नाही.. की समाजात जातिभेदाचे चटके सोसावे लागले नाहीत. घराबाहेर पडल्यावर लिंगभेदाधारीत विषमता जरी मी सोसली, तरी ती सोसण्याएवढी मी तेवढी खमकी होते. पण अश्या किती जणींची प्रतिभा वंश, लिंग, जाती, धर्म, रूढी यांच्या कुंपणात कैद होत असतील? मला वाटते आपण ही कुंपणे उध्वस्त केली पाहिजेत.(आवाज वाढवत) समूळ उध्वस्त केली पाहिजेत.. नष्ट केली पाहिजेत.  

(बोलता बोलता त्या अचानक खाली कोसळतात..)

सर्व दिवे विझतात.. केवळ निवेदकाचा आवाज ऐकू येतो

निवेदक: या कार्यक्रमानंतर दहाच दिवसात डॉ कमलाबाई यांचे निधन झाले. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांनी केलेलं मौलिक संशोधन आपल्यासोबत आहे. आणि त्याहून महत्त्वाची .. महिलांना विज्ञान क्षेत्रात मिळालेली संधी.. कमला नावाची शलाका त्यांच्यासाठी हा विज्ञानाचा रस्ता उजळून गेली. तिला भारताची मेरी क्युरी म्हणले तर वावगे ठरणार नाही… निश्चितच .. वावगे ठरणार नाही..


(पडदा)


समाप्त.


#richyabhau

आपला ब्लॉग : www.drnitinhande.in/

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव