पॉल डिरॅक आणि त्याची अद्भुत यामिकी

पॉल डिरॅकआणि त्याची अद्भुत यामिकी. . 


मागील शतकामध्ये होऊन गेलेल्या सर्वात प्रतिभावान शास्त्रज्ञांमध्ये जे नाव आईन्स्टाईनसोबत मानानं घेतलं जातं असा हा पॉल डिरॅक. रिचर्ड फाईनमनसारखा शास्त्रज्ञ ज्याला आदर्श, आपला हिरो मानत होता.. २८ व्या वर्षी रॉयल सोसायटीचे सदस्यत्व, वयाच्या ३० व्या वर्षी न्यूटनने भूषवलेल्या लुकासीयन अध्यासनावर बसण्याचा मान, तर वयाच्या ३१ व्या वर्षी पूंजयामिकी विषयामध्ये श्रॉडिंजर या शास्त्रज्ञासोबत नोबेल पारितोषिकावर आपले नाव कोरणारा असा हा पॉल डिरॅक… नास्तिकवादाचा कडवा प्रचारक.. केवळ शास्त्रज्ञ म्हणूनच तो महान नाही तर शास्त्रज्ञ घडवणारा प्राध्यापक म्हणून देखील त्याची ओळख सांगता येईल. 


ज्या केंब्रिज विद्यापीठात पॉल डिरॅकच्या अबोलपणाची खिल्ली उडविली गेली, "डिरॅक म्हणजे नवे एकक आहे. एका तासाला एक शब्द म्हणजे डिरॅक." अशी थट्टा केली गेली, त्याच विद्यापीठात चमकणाऱ्या इतर शेकडो ताऱ्यांमध्ये आपले अढळ ध्रुवस्थान निर्माण करणारा हा प्राध्यापक. आपल्या लाडक्या होमी जहांगीर भाभा यांचे ते गुरू. तसेच नारळीकर यांना देखील त्यांनी शिकवले होते. नारळीकर यांची PhD ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली त्या फ्रेडरिक हॉयल सरांची PhD पॉल डिरॅक याच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. काही कलाकार प्रचंड लोकप्रिय बनतात, त्यांच्यापेक्षा जास्त गुणवत्ता असलेले दुसरे कलाकार मात्र केवळ कलेच्या क्षेत्रातच आणि दर्दी लोकांनाच माहिती असतात. आपला पॉलभाऊ हा असा दुसऱ्या प्रकारातला.. ❤️


त्याला लोकप्रियता मिळालेली नाही, कारण प्रसिद्धीपासून दूर राहायला त्याला आवडायचं. मात्र काळाच्या ओघातही टिकलेले त्याचे नाव पुंजभौतिकी क्षेत्रात आजही आदराने घेतलं जातं आहे. या मुलूखावेगळ्या पॉल डिरॅकचे बालपण मात्र खूप तणावात गेलं. खर तर त्यांच्या मुलूखावेगळ्या स्वभावाचं मुख्य कारण तेच असावं. पॉल ॲड्रिएन मॉरिस डिरॅक असे संपूर्ण नाव असलेल्या पॉलचा जन्म इंग्लंड मधील ब्रिस्टॉल शहरात ८ ऑगस्ट १९०२ रोजी झाला. एक थोरला भाऊ आणि एक धाकटी बहीण, त्यांच्यामध्ये हा.  त्याचे वडील चार्ल्स ॲड्रिएन लॅडिस्लास डिरॅक हे स्वित्झर्लंडमधून इंग्लंडमध्ये स्थायीक झाले होते. ब्रिस्टॉलमधील एका विद्यालयात फ्रेंच भाषा शिकवायचे. त्याची आई फ्लोरेन्स हॅना डिरॅक ही त्याच शहरातील सेन्ट्रल ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून काम करायची.


पॉलचा बाप पक्का हिटलरी वृत्तीचा. त्याच्या भांडकुदळ स्वभावाला भाषेच्या अस्मितेची जोड होती. जेवताना डायनिंग टेबलवर सगळ्यांनी फ्रेंचच बोलली पाहिजे असा वडिलांचा आग्रह असायचा, मात्र आई आणि तिच्या गटातील बहीण या दोघी मुद्दाम इंग्लिश बोलायच्या… मग त्यांनी किचनमध्येच जेवायचे, डायनिंग टेबलवर यायचे नाही. लहानग्या पॉलला तर अनेक वर्ष वाटायचं की पुरुषांनी फ्रेंच बोललं पाहिजे आणि स्त्रियांनी इंग्लिश. वडिलांची साध्या साध्या गोष्टी वरून किरकिर चालायची. अबोल स्वभावाची आई प्रतीउत्तर देत नसे. मात्र त्याचा विपरीत परिणाम पॉलवर झाला. आपली आई शोषित आणि बाप शोषक अशी प्रतिमा त्याच्या मनावर ठसली.😬  


आपला बाप हा एक राक्षस असून त्याला खुश ठेवलं तर घरातील वातावरण ठीक राहील, म्हणून वडिलांना शक्य तेवढं खुश ठेवायचा प्रयत्न पॉल करायचा. भावाने लवकर हार मानली होती. किचनमध्ये जेवणे त्याने पण सुरू केलं. आता बाबा आणि पॉल, दोघेच डायनिंग टेबलवर.  फ्रेंच व्याकरणातील एक लहानशी चूक..आणि पॉलला त्याचा दंड मिळाल्याशिवाय राहायचा नाही. त्यामुळे आपली चूक होण्यापेक्षा गप्प बसलेले बरे असा विचार करत करत पॉल अंतर्मुख होत गेला. आई तिच्या स्वतच्याच कोशात.. पोरांच्या मानसिकतेची काळजी तिने देखील केली नाही. परिणामी पॉल आणि इतर भावंडांचे बालपण भेदरलेल्या अवस्थेत गेलं. 😔 नाही म्हणायला पॉलमध्ये गणितची आवड विकसित व्हायला देखील वडीलच कारणीभूत होते. 


आपल्या पालकांबद्दल पॉल म्हणतो की "पालक मुलांवर प्रेम करतात हे मला मोठे झाल्यावर, आसपासची कुटुंबे पाहिल्यावर समजलं." पॉलच्या भावाने तरुणपणी आत्महत्या केली त्यामागे देखील "घरातील तणावग्रस्त वातावरणात जडणघडण" हेच कारण. थोडक्यात सांगायचं तर त्याचं बालपण हिरावून घेतलं गेलं होतं. पॉल कधीच शाळेत एक शब्द बोलत नसे, त्यामुळे त्याचे जास्त मित्र पण नव्हते. त्याने बालपणी केवळ कर्ट हॉफर नावाच्या एका मुलाजवळ आपलं मन मोकळं केल्याचं बोलण्यात येतं. त्या कर्टशी एक दिवस पॉल बोलायला लागला आणि सलग दोन तास न थांबता बोलला होता. त्या दिवशी कदाचित त्याच्या भावनांचे धरण फुटले असावं.🤔 


पॉलचे प्राथमिक शिक्षण बिशप रोड प्रायमरी स्कूलमध्ये झालं. १२ व्या वर्षी शाळा बदलली. वडील फ्रेंच शिकवायचे त्या मर्चंट व्हेन्चरर्स टेक्निकल कॉलेजमध्ये पुढील शिक्षण झालं. तेव्हा इंग्लंडमध्ये असलेल्या पारंपरिक शाळांपेक्षा ही शाळा वेगळी होती, इथं पदवीपर्यंत तांत्रिक शिक्षण देखील दिलं जायचं. त्यासाठी ब्रिस्टॉल विद्यापीठातून शिक्षक आणि कर्मचारी पुरवले जायचे. आधुनिक भाषाशिक्षण देतानाच सोबत वीटकाम, बूट शिवणे, धातुकाम, अभियांत्रिकी यांसारख्या तांत्रिक विषयांचं शिक्षण दिलं जायचं. पॉल इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग शिकला. १९२१ मध्ये पॉलने पदवी प्राप्त केली. आणि केंब्रिजची प्रवेश परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. प्रवेश परीक्षा पास झाला,सेंट जॉन्स कॉलेजची ७० पौंड स्कॉलरशिप देखील मिळाली.😇 


मात्र तेव्हा नुकत्याच संपलेल्या पहिल्या महायुद्धाने इंग्लंडमध्ये महागाईचा भडका उडाला होता. सत्तर पौंडमध्ये केंब्रीज विद्यापीठात शिकणं, जगणं मुश्कील होतं. वडील ब्रिटिश नागरिक नसल्याने पॉलला इतर कोणतीच सवलत मिळत नव्हती. शिक्षण नाही मिळत तर नोकरी करावी ना.. खिशात पदवी असली तरी अभियंता म्हणून नोकरी देखील मिळत नव्हती. अखेरीस त्याने आपल्या ब्रिस्टॉल विद्यापीठातच गणित विषयात बी ए करायचे ठरवलं. अभियांत्रिकी पदवी असल्याने पहिले वर्ष माफ एवढाच काय तो आधीच्या पदवीचा फायदा. अर्थात पुढे संशोधक झाल्यावर पॉल कबूल करतो की त्याला अभियांत्रिकी ज्ञानाचा फायदा संशोधनात झाला. ज्ञान कधीच वाया जात नसते❤️


हा नवा पदवी अभ्यासक्रम विनामूल्य होता. मोकळे राहण्यापेक्षा बीए गणित ची पदवी काय वाईट. १९२३ मध्ये डिरॅक पुन्हा एकदा पदवीधर झाला. आता मात्र त्याला इंग्लंडच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभागाकडून १४० पौंडची शिष्यवृत्ती मिळाली. त्याशिवाय आधीची सत्तर पौंडची सेंट जॉन्स कॉलेजची शिष्यवृत्ती होतीच…  बोले तो अब जरा हिसाब जमरेला था. भाऊने बॅग भरायला घेतली.🚶केंब्रिजमध्ये गेल्यावर पॉलने त्याच्या आवडीच्या  सापेक्षतावाद आणि पुंजभौतिकी या विषयांमध्ये राल्फ फॉवलर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू केलं. राल्फचे तेव्हा नील्स बोहरसोबत काम सुरू होतं. 


आठवड्यातील सहा दिवस मान मोडेपर्यंत पॉलने गणितावर काम करायचं. कुणाशी एक शब्द बोलायचा नाही. रविवारी एकटेच मन वाटेल तिथं फिरायचं.. कला क्रीडा संगीत,प्रेम,पार्टी असल्या बाबींना थारा नाही. १९२५ ते १९२८ या कालावधीसाठी त्याला रॉयल कमिशनची फेलोशिप देखील मिळाली होती. आपण भले आणि आपले काम भले. जून १९२६ मध्ये त्याने पीएचडी पदवी पूर्ण केली, आणि त्याने सादर केलेला प्रबंध हा पुंजयामिकी अर्थात क्वांटम मेकॅनिक्स या विषयामधील जगातील पहिला प्रबंध ठरला. ते म्हणतात ना .. मेरा खानदान मेरे नाम सेही शुरू होता है. तसेच आपल्या भाऊचे..  ❤️ 


घरी देखील त्याला वडिलांचे नाव पुसून स्वतचं स्वतंत्र आयुष्य सुरु करायचं होतं. पुढे वडील मेल्यावर पॉल म्हणतो, " मला आता मोकळे वाटत आहे, स्वतंत्र वाटत आहे." केंब्रिजमध्ये शिकत असतानाच भावाच्या आत्महत्येची बातमी त्याला मिळाली होती. भाऊ फेलिक्स याला डॉक्टर व्हायचे होतं, मात्र बापाने त्याला इच्छेविरुद्ध इंजिनिअरिंग मध्ये टाकलं. तो तिथे थर्ड क्लास मध्ये कसाबसा पास झाला, आणि एका कंपनीत कामाला लागला. मात्र स्वतच्या आयुष्याबद्दल फेलिक्स समाधानी नव्हता. शेवटी वयाच्या २४ व्या वर्षी त्याने आत्महत्या केली. त्याच्यापेक्षा एक वर्षानेच लहान असलेल्या पॉलसाठी हा मोठा धक्का होता. बापाचे पुन्हा तोंड पाहायला लावू नये अशी खूणगाठ त्याने मनी बांधली आणि अभ्यासावर जोर दिला होता✊✊


पॉल २८ वर्षाचा असताना त्याचे नाव रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वासाठी सुचवले गेलं. आणि पहिल्याच झटक्यात त्याला मान्यता देखील मिळाली. याच सुमारास त्याने "प्रिन्सिपल्स ऑफ क्वांटम मेकॅनिक्स" हा ग्रंथ लिहिला. ज्याने प्रचंड खळबळ माजवली, त्याची तुलना आयझॅक न्यूटनशी होऊ लागली, त्याला विसाव्या शतकातील न्यूटन असं म्हटलं जाऊ लागलं. म्हणूनच की काय न्यूटनने भूषवलेल्या केंब्रीज विद्यापीठातील लुकासीयन अध्यासनावर बसण्यासाठी वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी पॉल डिरॅक पात्र ठरला, पुढे ३७ वर्ष त्याने हे पद भूषविले, त्याच्यानंतर या पदावर स्टीफन हॉकिंग हा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ विराजमान झाला होता.❤️

 

त्यांचा प्राध्यापकीचा काळ सर्व विद्यार्थ्यांसाठी पर्वणीचा काळ होता. जयंत नारळीकर त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हणतात: "आम्हाला अप्रूप असलेली आणि आख्यायिका वाटावी, अशी पॉल डिरॅक सारखी जिवंत माणसे केम्ब्रिजमध्ये आमच्या आजूबाजूला होती. मी केंब्रिजमध्ये शिकत असताना लुकासीयन अध्यासनावर पॉल डिरॅक होते. ते आम्हाला पुंजयामिकी शिकवायचे. मी थेट या क्षेत्रातील उस्तादांकडून शिकलो. अतिशय मुद्देसूद आणि नेमके, अगदी त्यांच्या पुस्तकासारखे. ते अजिबात विनोद करायचे नाहीत. परंतु गंभीर वातावरणात देखील ते विषय अतिशय प्रभावी पोचवायचे." 


पुंजयामिकी या विषयाला सध्याचे निश्चित व सुविकसित स्वरूप देण्याचं श्रेय हायझेनबर्ग, श्रोडिंजर आणि पॉल डिरॅक या त्रिकुटाला जाते. या विषयात अणूरेणूंची वर्तणूक, अल्फा व बीटा कणांचे अणूकेंद्रातून उत्सर्जन, इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन यांची निर्मिती यांसारख्या घटना अभ्यासल्या जातात. पॉल डिरॅकने स्वतः पुंजविद्युतगतिकी अर्थात "क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स" या शास्त्राला जन्म दिला, परंतु त्याची मांडणी ही काळाच्या ओघात सदोष ठरली. मात्र या शास्त्रात रिचर्ड फाईनमन आणि इतर शास्त्रज्ञांनी मोलाची भर टाकून त्यातील दोष काढून टाकले. पीएचडीनंतर पॉल डिरॅक कोपनहेगन आणि गटिंगन या ठिकाणी संशोधन करत होता. पॉलने पाऊलीच्या सिद्धांताला गणितात बसवायचा प्रयत्न केला.. त्यातील फर्मिऑन्सचे अचूक वर्णन करण्यासाठी डिरॅक समीकरण तयार झाले.. जे १९३३ साली नोबेल पारितोषिक मिळवून देण्यास पात्र ठरलं. 😍


डिरॅकला गणितात सौंदर्य दिसायचं.. आजचं आपले गणित सुंदर का होत नाही? याचा विचार करताना त्याला हा शोध लागला. त्याला सुचलं, अणूमध्ये देखील प्रत्येक घटकाला प्रतिघटक असेल. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन न्युट्रोन यासर्वांना प्रतिघटक असेल. इलेक्ट्रॉन हे दोन प्रकारचे असणार. यातील एक इलेक्ट्रॉन हा नेहमीचा ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन असेल तर दुसरा इलेक्ट्रॉन हा धन प्रभारित पॉझीट्रोन असेल. डिरॅकने आपले संशोधन १९३१ साली प्रसिद्ध केलं.. 

लक्षात घ्या तेव्हा त्याने केवळ गणितीय पातळीवर ही शक्यता मांडली होती. मात्र पुढच्याच वर्षी १९३२ मध्ये  पॉझीट्रोनचे अस्तित्व अमेरिकन शास्त्रज्ञांनी शोधून काढले, आणि आपल्या पॉलभाऊचे संशोधन खरे ठरले.😇 ग्रॅज्युएट फेलोशिपसाठी अर्ज करणारा एक होतकरू तरुण नंतर दहा वर्षातच अणूमधील नवे तत्व शोधून काढलं म्हणून वयाच्या ३१ व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवतो.. अद्भूत, केवळ अद्भुत. 


असं म्हणतात की अलेक्झांडर फ्लेमिंग किंवा मेरी क्युरी यांनी अनुक्रमे पेनिसिलीन किंवा रेडियमचा शोध लावला नसता तरीदेखील कालांतराने कुणीतरी हे शोधून काढलं असतंच. कारण त्यांचा शोध हा विज्ञानाचा, माहितीचा प्रवाह होता. तो प्रयोगाचा इतिहासातील एक अपरिहार्य टप्पा होता. मात्र पॉल डिरॅक याने जे शोधून काढलं होतं ती केवळ अभूतपूर्व कल्पना होती आणि विज्ञानाचा इतिहास बदलणारी होती. ❤️ या शोधापूर्वी धातूंमधील इलेक्ट्रॉनची तापमानाशी वागणूक समजून येत नव्हती. मोठ्या विद्युतक्षेत्रात धातूंमधून बाहेर येणाऱ्या इलेक्ट्रॉनांची संख्या धातूंच्या तापमानावर अवलंबून राहत नव्हती. इथे भौतिकशास्त्राचे प्रचलित नियम मार होते. या इलेक्ट्रॉनांच्या धातूंमधील वागणुकींचे आडाखे फेर्मी-डिरॅक सांख्यिकीच्या वापराने मांडता येणं शक्य झालं. 


प्रत्येक घटकाचा प्रटिघटक असेल तर पॉलचा पण एक प्रतिघटक होता. मॅन्सी नावाची प्रेमळ आणि लाघवी हंगेरियन तरुणी.. जी पुढे त्याची बायको झाली. एका कार्यक्रमात त्या दोघांची भेट झाली. हा भाऊ नेहमीप्रमाणे एकटाच बसला होता, कार्यक्रमाचा आयोजकाला माहित होतं, हा भाऊ काय कुणाशी स्वतः बोलणार नाही. तो आपल्या बहिणीला त्याच्याशी गप्पा मारायला पाठवतो. ती तरुणी त्याला बोलते करते, दोघांचे सुर जुळतात. दोन मुलांची आई असलेली घटस्फोटिता मॅन्सी आपल्याला सांभाळून घेईल याची पॉलची खात्री पटली आणि दोघे १९३८ मध्ये विवाहबद्ध झाले. आधीची दोन आणि लग्नानंतरची दोन अशी चार मुले घरात गोंधळ घालू लागली. 


हा माणूस एवढा नीरस होता की हनीमूनला गेलेली मॅन्सी जेव्हा त्याला विचारते की "तुला माझ्या बद्दल काहीच भावना नाहीत का.?" तेव्हा देखील हा कोरडेपणाने बोलला, "का नाही, थोड्या आहेत ना!" जिथे तिथे गणितीय भाषा नसते चालत बाबा.. पण मॅन्सीला खात्री होती की ह्याचे उत्तर प्रामाणिक आहे. शिवाय तिला ही पण खात्री होती की याच्या आयुष्यात दुसरं कोणी कधीच येणार नाही, कारण त्याला वेळच नाही, आवड पण नाही, आणि हिम्मत तर त्याहून नाही.. मग काय.. पदरी पडलं आणि पवित्र झालं (गाऊन असेल नाही का तिथं) 😀 मॅन्सीने या नीरस माणसाचा संसार सुखाचा केला, आत्ममग्न असलेल्या या व्यक्तीला सांभाळून घेतले. त्यांचा पत्रव्यवहार पाहिला की या व्यक्तीच्या नीरसतेची मात्र तरीही दोघांच्या नात्याची ओळख पटू शकेल. ❤️


असं म्हणतात की  पॉल डिरॅकने आयुष्यात दोनच चांगली कामं केली, एक विज्ञान क्षेत्रातील योगदान आणि दुसरं योग्य व्यक्तीशी लग्न. पॉलचा चाहता असलेला किम नावाचा कोरिअन भौतिकशास्त्रज्ञ म्हणतो, ” मॅन्सीने आमचे आदरणीय पॉल डिरॅक यांची चांगली काळजी घेतली हे भौतिकशास्त्राचे भाग्य आहे. त्या जागी दुसरी कुणी असती तर पॉल डिरॅक भौतिक शास्त्रामध्ये एवढे योगदान देऊ शकले नसते." 


पॉल डिरॅक हा गडी लयच भोळा, त्यामुळे त्याच्या नकळत अनेक वेळा विनोद निर्मिती होत असे. एकदा टोरंटो विश्वविद्यालयातील त्याच्या एका व्याख्यानानंतर त्याने श्रोत्यांना काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारायला सांगितले. तेव्हा श्रोत्यांमधून एका कॅनेडियन प्रोफेसरने उठून म्हटले, “डॉ. डिरॅक, फळ्याच्या डाव्या कोप-यातील सूत्र मला समजत नाही.” डिरॅकने ताबडतोब म्हटले, “हा प्रश्न नाही, साधं वाक्य आहे. बरं आता पुढचा प्रश्न?” 


नील्स बोहर एकदा त्याला म्हणला "यार हे वाक्य कसे पूर्ण करू समजत नाहीये." पॉल शांतपणे म्हणाला, "वाक्य कसे संपवायचे हे माहीत असल्याशिवाय सुरू करू नये असे आमच्या शाळेत शिकवले आहे."  एका शास्त्रज्ञाने पॉलला रहस्यकथा कादंबरी वाचायला दिली. काही दिवसांनी अभिप्राय विचारला. पॉल बोलला, "बाकी सगळे ठीक आहे पण लेखकाची एक चूक झाली, एकाच दिवशी त्याने दोन सूर्योदयाचे वर्णन केलं आहे."🤣 


एकदा शास्त्रज्ञांच्या एका पार्टीमध्ये विषय निघाला की स्त्रीचा चेहरा किती अंतरावरून छान दिसतो. एक जण गमतीने म्हणाला.. अनंत अंतरावरून.. लोक हसायला लागले. पण आपला भाऊ भाबडेपणाने म्हनला की "अनंत अंतरावरून चेहरा दिसणारच नाही." सगळे हसले. एकाने मुद्दाम विचारले "पॉल, तू किती अंतरावरून पाहिला आहेस स्त्रीचा चेहरा?" त्यावर देखील चेहऱ्यापुढं अंदाज घेत साधारण एक फुटावर हात धरत पॉल उद्गारला, "या एवढ्या अंतरावरून." सगळे लोक हसून बेजार झाले, पॉलला समजले नाही, ते का हसत आहेत. पॉलचा नास्तिक वाद हा देखील त्यांच्या चेष्टेचा विषय असायचा. ते म्हणायचे, "जगात देव नाही, मात्र नास्तिक नावाचा नवीन धर्म आहे, आणि पॉल डिरॅक त्याचा प्रेषित आहे." 


त्याचे सहकारी जगदीश मेहरा एक आठवण सांगतात. ते म्हणतात की इंग्लंडमध्ये हवामान अनिश्चित असते, त्यामुळे कोणत्याही ब्रिटिश व्यक्तीशी बोलताना हवामान हा विषय उपयोगी ठरतो. मी देखील एकदा सहज बोलायचे म्हणून पॉल डिरॅक यांना बोललो, "आज खूप हवा सुटली आहे ना प्रोफेसर?" डिरॅक काहीच बोलले नाही..आणि खोलीतून बाहेर पडले.. मला समजेना सर काय नाराज झाले की काय, आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतला की काय… पण सरांनी दरवाजा उघडला, आणि पुन्हा लावला. आत पुन्हा येऊन बसले अन् म्हणाले "होय.. आज हवा खूप सुटली आहे."


एकदा एका परिषदेसाठी डिरॅक व  हायझेनबर्ग जपान ला निघाले होते. दोघे एकाच बोटीत होते, दोघांचे अद्याप लग्न व्हायचे होते. मात्र डिरॅक आपला शांतपणे प्रवास करत होता तर  हायझेनबर्ग रोज नव्या नव्या मुलींशी ओळख करत, त्यांच्यासोबत नाच करत आनंद घेत होता. एकदा डिरॅकने  हायझेनबर्ग याला विचारलं की तू रोज वेगवेगळ्या मुलींसोबत कसं काय नाचू शकतो? हायझेनबर्गने त्याला प्रश्नरुपी उत्तर दिलं, "अरे चांगल्या मुलींसोबत नाचण्यामध्ये हरकत ती काय?" पाच मिनिट थांबून, विचार करून डिरॅकने पुन्हा विचारलं, " त्या मुली चांगल्या आहेत हे तुला आधीच कसे समजते?"🤭🤭🤭🤭 


रॉबर्ट ओपनहायमर या शास्त्रज्ञाला कविता आवडते हे समजल्यावर तर आपला पॉल थक्कच झाला..अवघड गोष्ट सोपी करून सांगणाऱ्या शास्त्रज्ञाला सोपी गोष्ट अवघड करून सांगणारी कविता कशी आवडू शकते. हे काही भाऊला समजले नाहीच. 😭 एकदा पॉलची मजा झाली. एका मित्राच्या घरी गेला असताना त्याची पत्नी लोकरीचे विणकाम करीत होती. पॉलने ते टक लावून पाहिले, घरी आला. त्या विणकाम कलेत आणखी काय करता येईल यावर विचार सुरू. अचानक युरेका… त्याला डोक्यात एक आयडिया आली, तसचं त्या बाईच्या घरी गेला .. आणि तिला उत्साहाने सांगायला लागला तेव्हा त्या बाईने त्याला शांत केलं आणि म्हणाली तुम्ही म्हणता ती उलट्या टाक्यांची पद्धत शेकडो वर्षापासून वापरात आहे.🤣🤣

 

पॉल डिरॅक हा समजायला अशक्य माणूस आहे असे आईन्स्टाईन म्हणतो. तो म्हणतो पॉल डिरॅक हा वेडेपणा आणि जीनियस या दोन्ही स्वभावाचा अर्क आहे. प्रिन्सटन विद्यापीठात आईन्स्टाईन आणि पॉल यांची कार्यालये समोरासमोर होती. मात्र तरीही या दोघांमध्ये कधीच गप्पा झाल्या नाहीत. आईन्स्टाईन मेल्याची बातमी देखील पॉल याला अनेक वर्षानंतर समजली. मोठा झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात हा माणूस तेव्हा एकदाच रडला. पॉल डिरॅक हा मानसिकरित्या आजारी असून तो "आत्ममग्न" आहे असे खुद्द त्याचा चरित्रकार ग्रॅहम फर्मेलो त्याच्या " द स्ट्रेंजेस्ट मॅन, द हिडन लाईफ ऑफ पॉल डिरॅक, मिस्टीक ऑफ द ऍटॉम्स" या पुस्तकात म्हणतो. 


जर्मन, रशियन, फ्रेंच, इंग्रजी यासारख्या अनेक भाषावर हुकूमत असलेला हा गणपत बोलायचाच नाही. नील्स बोहरने पॉलची ओळख रुदरफोर्डशी करून देताना वाक्य वापरलं, "हा डिरॅक, त्याला भौतिक शास्त्राबद्दल खूप माहिती आहे पण तो काहीच सांगणार नाही 😂 " नील्स बोहरला एखादा माणूस बोर वाटेल.म्हणजे तो नक्कीच बोर असेल ना.. (जिज्ञासू वाचकांनी नील्स बोहरच्या बोर स्वभावाबद्दलचे किस्से त्याच्या पोस्टमध्ये वाचावे. ) कधी कुठे ग्रुप फोटो काढला जात असेल तर हा पॉल दिसणार नाही अश्या ठिकाणी थांबायचा. बहुतेक वेळा फोटोग्राफर मागे लपायचा. फोटो धुवून आल्यावर लोक विचारायचे.. पॉल त्यादिवशी गैरहजर होता का?


त्याने फोटो काढताना आयुष्यात एकदाच महत्त्वाचे स्थान मिळवायचा यशस्वी प्रयत्न केला. जेव्हा तो २० वर्षाचा विद्यार्थी होता, त्याने ग्रुप फोटो काढताना तेव्हा फेमस आइन्स्टाइन शेजारी जागा मिळवली होती. नंतर मात्र तो स्वतः जाणीव पुर्वक प्रसिध्दीपासून दूर राहिला. पॉल भाऊ एवढा प्रसिद्धीपरामुख की नोबेल पारितोषिक मिळाल्यावर प्रसिद्धी मिळेल म्हणून त्याने नोबेल पारितोषिक नाकारायचे ठरवलं. मात्र नोबेल समितीमध्ये कोणी तरी हुशार माणूस बसला असणार.. त्यांनी सांगितले की भावड्या तू नोबेल नाकारले तर जास्त प्रसिद्धी होईल, स्वीकारले तर कमी होईल. आणि आपला भाऊ नोबेल घ्यायला तयार झाला. मात्र त्याने पारितोषिक स्वीकारताना केवळ आईला सोबत घेतलं, वडलांना बोलवले देखील नाही. 👍


बोलण्यात मागे असलेला पॉल जेव्हा लिहायला लागे, तेव्हा त्याचा मसुदा पाहण्यासारखा असे. अतिशय मुद्देसूद आणि अचूक. त्याने २०० पेक्षा जास्त संशोधन पेपर प्रसिद्ध केले, ज्यातील ९० पुंजयामीकी वर आहेत. प्रत्येक पेपरमध्ये संशोधन तर जबरदस्त आहेच. पण त्याची मांडणी देखील अतिशय सुरेख आहे. बोहर म्हणतो, " जेव्हा त्याचे हस्तलिखित तपासायला यायचे, तेव्हा लिखाण एवढे सुंदर असू शकते याचा मला प्रत्यय यायचा. गम्मत म्हणजे मला तपासायला द्यायचा..मात्र मी बदल सुचवला की त्याला आवडत नसे.. 🤭 अर्थात् त्याचे लिखाण वाचायला मिळणे ही माझ्यासाठी पर्वणी असे."


भारताशी त्याचा ऋणानुबंध अनेक प्रकारे आला. अणूपेक्षा लहान कणांना "बोसॉन" हे नाव सत्येंद्रनाथ बोस यांच्या स्मुतीप्रित्यर्थ पॉल डिरॅकनेच सुचवले होते. प्रिन्सटन विद्यापीठात न्यूमन प्रोफेसरपदी काम केलेले डॉ. हरिश्चंद्र यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम पॉल डिरॅकने केलं. डिरॅकच्या प्रिन्सिपल्स ऑफ क्वांटम मेकॅनिक्स या पुस्तकावर भाळून हरिश्चंद्र भौतिकशास्त्राकडे वळू पाहत होते. मात्र पॉल डिरॅकला भेटल्यावर त्याच्या सूचनेनुसार ते गणिताकडे वळले. पुढे त्यांनी गणितात प्रचंड यश मिळवलं. इ.स. १९७४ मध्ये डॉ. हरिश्चंद्र यांचा इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीने श्रीनिवास रामानुजम पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तसेच त्यांना अमेरिकेच्या नॅशनल अ‍ॅकॅडमीचे आणि इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे सदस्यपद भूषवण्याचा मान मिळाला आहे.  


३७ वर्ष केंब्रीज मध्ये काढली मात्र १९७० मध्ये त्याला फ्लोरिडा विद्यापीठातील बोलावण्यात आले. पुढे मृत्यूपर्यंत तो याच विद्यापीठात शिकवत होता. मात्र इथे त्याचा स्वभाव बदलला. आता तो विद्यार्थ्यांत बसून डबा खाऊ लागला होता. अखेरीस इथचं  पॉल डिरॅकने २० ऑक्टोबर १९८४ रोजी शेवटचा श्वास घेतला. त्याच्या शोकसंदेशाचे वाचन स्टीफन हॉकिंग याने केलं. एका गणितज्ञ, शास्त्रज्ञ, नास्तिकवादाच्या प्रचारकाकडून दुसऱ्या गणितज्ञ, शास्त्रज्ञ, नास्तिकवादाच्या प्रचारकाला अभिवादन करण्यात आलं ❤️ 


अगदी डाऊन टू अर्थ जगणारा हा व्यक्ती ज्याला थ्री पीस कपड्यात झाडावर चढण्यात काही गैर वाटले नाही. रशियन शास्त्रज्ञांशी, साम्यवादाशी त्याचे सख्य असले, रशिया भेट घेतली असली तरी दुसऱ्या महायुद्धकाळात त्याच्यावर कोणी हेरगिरीचा संशय घेतला नाही. तसेच बॉम्ब बनवण्याच्या प्रकल्पात त्याने सहभाग घेतला नाही. डोक्याला ताप असलेला बाप, गळचेपी झालेली आई, आत्महत्या केलेला भाऊ, नाझींचा चढता आणि उतरता काळ, अणुबॉम्ब, आणि त्यानंतरचे शीतयुद्ध.. ८२ वर्षाच्या आयुष्यात काय काय अनुभवलं. मात्र त्या सर्वांना तो स्थितप्रज्ञ असल्याप्रमाणे सामोरा गेला. सामोरा गेला की आत्ममग्न राहिला… स्थितप्रज्ञ आणि आत्ममग्न एकच असते🤔


एक असा शास्त्रज्ञ, ज्याला प्रयोगासाठी कोणत्या उपकरणाची, प्रयोगशाळेची गरज नव्हती, त्याने कोणती निरीक्षणे नोंदवली नाहीत, खरं तर प्रयोग देखील केला नाही. मात्र तरीही त्याला नोबेल पारितोषिक मिळते. कारण त्याने मांडलेला असतो मूलभूत सिद्धांत. जो काळाच्या कसोटीवर खरा देखील उतरतो. मात्र त्यासाठी मिळणारे बक्षीस तो शास्त्रज्ञ प्रसिध्दी नको म्हणून नाकारतो. आज ना केलेल्या कामाचे श्रेय घेताना राजकीय नेते पाहतो, किंबहुना काही चेहरे तर जिथे तिथे पाहून पाहून नकोसे झाले आहेत. प्रसार माध्यम ताब्यात घेऊन स्वतःला मिरवणे तर दूर राहो.. मिळणारी फुकटची प्रसिध्दी नको म्हणून नोबेल पारितोषिक नाकारणारा वेडाच म्हणावा लागेल. मात्र या असल्या वेड्यांमुळे जीवन हे सुंदर आहे. विज्ञानाची बाग अश्याच फुलांनी बहरत राहिली पाहिजे. लव्ह यू पॉल डिरॅक 😘


जय गणित ✊ जय विज्ञान ✊✊


#richyabhau 

#paul_dirac


आपला ब्लॉग : https://drnitinhande.in/


















Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव