स्त्री आणि धर्म

 स्त्री आणि धर्म



"स्त्रियांचे हक्क आणि स्वातंत्र्य यांना सर्वात मोठा विरोध धर्माचा असतो, जगातील सर्वच समाजात धर्माचा आधार घेऊन स्त्रियांचे शोषण होत असते." असे प्रसिद्ध साहित्यिका तस्लिमा नसरीन म्हणतात. उत्क्रांती नंतर जगभरात मातृसत्ताक पद्धती असल्याचे सांगण्यात येते, मग असा पूर्णतः उलट बदल कसा झाला? कारण नंतरच्या काळात धर्म निर्माण होत गेले सर्वच धर्म स्त्रियांना दुय्यम स्थान देणारे आहेत.. कारण.. कारण सर्वच धर्मसंस्थापक पुरुष होते, धर्मग्रंथांची रचना त्यांनी केली, आणि स्वतःला सोईस्कर अशी व्यवस्था तयार केली आहे. धर्मरक्षण करण्यासाठी, खरतर धर्म बंदिस्त करण्यासाठी योनीशुचीता हेच माध्यम निवडले गेले. आणि त्यास अनुसरून स्त्रियांच्या हक्क आणि स्वातंत्र्यावर मर्यादा आणणाऱ्या भाकडकथा रचल्या गेल्या.


हिंदू धर्म आणि त्याचा पाया असलेली मनुस्मृती स्त्रीविरोधी असल्याचं स्पष्ट दिसून येतं. सगळे कायदे, सगळ्या रुढी या पुरुषांना मोठेपणा देणाऱ्या आहे. या धर्मात गरोदर बायकोला एकटी जंगलात सोडून देणारा नवरा आदर्श मर्यादापुरुषोत्तम मानला जातो. बायकोला जुगारात डावावर लावणारा धर्मराज म्हणवला जातो. इस्लाममध्ये सगळं किती पुरुषप्रधान आणि पुरुषकेंद्रित आहे हे आपण सगळे जाणतोच, बुरख्यामध्ये स्त्रीला बंदिस्त करून टाकलं आहे. मदर मेरीचा अपवाद वगळता बायबलमध्ये किंवा ख्रिस्ती धर्मात कुठेही महिलांना प्रमुख भूमिका नाही. धम्मामध्ये पुरुष भिक्षुंपेक्षा जास्त नियम भिक्षुनींना लावण्यात आले आहेत. आपल्यामुळे कुणा पुरुष भिक्षुचे चित्तभंग होऊ न देण्याची जबाबदारी त्यांनी घ्यायची आहे. म्हणजेच बौद्ध धर्म देखील पुरुषप्रधान आहे. विनयपिटकामध्ये समलैंगिकतेवर देखील टीका केलेली आहे.


बंद घड्याळ सुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर आहे असं वाटतं. तसे धर्मग्रंथांचे पण असतं. चुकून कधी तरी ते स्त्रियांबरोबर असल्याचं भासू शकतं, त्याचा दाखला देत "आमचा धर्म किती समतेचे तत्व मांडतो" हे त्या धर्माचे ठेकेदार गर्जून सांगत असतात. आणि त्यांचा प्रतिवाद करायला कोणी सरसावत नाही. बर्ट्रांड रसेल म्हणतो "तरुण पिढीतील फारच थोड्यांना "धर्म" पटत असतो. आणि ज्यांना पटत असतो ते बहुतेक वेळा "सामान्य बुद्धिमत्तेचे" आणि "अत्यंत संभ्रमितच" असतात." मात्र ज्यांना धर्म पटत नाही, ते पुढे येऊन बोलायची हिम्मत करू शकत नाही. चिकिस्ता करायची सोय नसते. इस्लामी देशात तर चिकिस्ता होण्याची शक्यता शून्य होते.


इस्लाममधील मुर्खपणावर नवीन लिहण्याची गरज नाही.. आपला मूर्खपणा ते वेळोवेळी जगजाहीर करत असतात. खर तर जगातल्या सर्व मोठ्या धर्मांचा विचार केला तर इस्लाम सगळ्यात नवीन, एकदम ताजा.. त्यात या धर्मात एकच देव आणि एकच धर्मग्रंथ.. म्हणजे हा धर्म सगळ्यात आधुनिक आणि स्वच्छ असायला पाहिजे होता.. पण इस्लामला कुराणमध्येच बंदिस्त केले आणि धर्म गतिशून्य बनून कट्टर व रानटी अनुयायी तयार होऊ लागले. आणि अशा अनुयायांना धर्मप्रसार कार्यात मरण आले, तर मृत्युपश्चात आयुष्यामध्ये त्यांना प्रलोभन काय. तर जन्नतमध्ये प्रत्येकाला ७२ हूर (अप्सरा) मिळणार, किती पण भोग घेतला तरी त्या नेहमी कुमारीच असणार.. भारी ऑफर दिली आहे राव..


आसपास सर्व बुरखाधारी मुली बघून ज्यांचे डोळे निसर्गसुलभ इच्छेने आसुसले आहेत, त्यांच्यासाठी ही प्राणापेक्षा प्रिय गोष्ट असणार, ही बाब दहशतवादी मुल्लामौलवी बरोबर ओळखतात. वसवसलेले हे तरुण जिहाद करताना दुसऱ्याला मारणंच काय, स्वतच्या बुडाखाली सुद्धा बाँब फोडून घेतील. तुम्ही म्हणाल की ७२ हूर एकदम भेटून काय उपयोग आहे.. पण त्याचे उत्तर पण मौलानाकडे आहे... नो शिलाजीत, नो व्हायग्रा.. कशाची गरज नाही. इथे १०० पुरुषांची ताकद आपोआप मिळून जाते.. ऑफर सॉलिड ना....यार एवढी मोठी ऑफर कोणत्याच धर्मात नाही.. मात्र मुस्लिम महिलांना मात्र अशी काहीच ऑफर नाय.. त्यांनी जिहादमध्ये भाग घेतला किंवा नाही घेतला, त्यांना कुणी राजकुमार मिळणार नसतो. सगळा खेळ, सगळी मांडणी पुरुष आणि पुरुषत्व यांच्याभोवती. महिलांचे स्थान तर केवळ एक भोगवस्तू म्हणून… बुरखा, इद्दत, तिहेरी तलाख.. एक ना अनेक बाबी.


"मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका, स्वतः तपासून बघा" असे सांगणारा तथागत गौतम बुद्धासारखा धर्मसंस्थापक विरळाच. इतर ठिकाणी मी सांगेल तोच शेवटचा शब्द असाच प्रकार. मात्र बुद्धाने सांगितलेला चिकित्सेचा भाग अनुयायांना समजला नाही. "यशोधरेच्या नाईलाजाला "त्यागाचे रूप" दिले गेले आहे" असं म्हणलं की बुद्धाची चिकित्सा करायची नाही असे सांगितलं जातं. वैराग्याला अवाजवी महत्त्व दिलं गेलं. आणि स्त्रिया याच जणू पापाला कारणीभूत आहे अश्या दृष्टीनं त्यांच्याकडं पाहिलं गेलं. गौतम बुद्धांला जेव्हा आनंद विचारतो की स्त्रियांसोबत कसं वागायचं, तेव्हा बुद्ध त्यांना म्हणतात की त्यांच्याकडे पाहू नका. आनंद विचारतो की पाहायची वेळ आली तर? तेव्हा बुध्द म्हणतात "अशा वेळी अत्यंत सावध राहावे." ज्या बुद्धाने चिकित्सेचा आग्रह धरला, त्याचे अनुयायी त्याचीच चिकित्सा टाळतात.


धर्मांतराने मानसिकता बदलली नाही. उपासनापद्धती चालूच राहिली फक्त समोरची मूर्ती बदलली, आणि दिव्याऐवजी मेणबत्ती आली. एका पिढीने देव नदीत बुडवले मात्र पुढच्या पिढीने परत आणले आणि कर्मकांडाला आळा बसला नाही. सत्यनारायणाच्या निमंत्रण पत्रिकेवर गौतम बुद्ध आणि बाबासाहेब दिसायला लागलेत. नवीन धम्मात प्रतीकं वापरायचा सोपस्कार आलाच.. फक्त प्रतीके बदलली. साडी, मंगळसूत्र यांचा रंग बदलला.. चि.सौ.का. ची उपासिका झाली. सगळी वरवरची रंगसफेदी झाली.. आतला माणूस तसाच... ना दैववादातून बाहेर पडला ना जातीवादातून. जातीच्या भिंती तर धर्मांतर केल्यावर पण शाबूत राहिल्या. आजही नागपूरमधली बौद्ध मुलगी पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध मुलाशी लग्न करू इच्छित असेल तर पोटजातीय अस्मिता आडव्या येतात. इथं केवळ जातीअंताची लढाई करायची नाही तर लिंगाधारित वर्चस्व देखील मोडून काढावं लागणार आहे.


हिंदूंच्या पुराणात आणि धार्मिक पुस्तकांत तर स्त्रियांचं शोषण ठासून भरलं आहे. "ढोर गवार पशू और नारी, ये सब ताडण के अधिकारी" असं सांगणारा तुलसीदास स्त्रियांना देखील वंद्य असतो. वादविवाद सभेमध्ये निरुत्तर केल्यामुळे गार्गीला, "अजून एक शब्द उच्चारलास तर.. ची जाहीर धमकी दिली जाते." रामाच्या एकपत्नीव्रताचे कौतुक सगळेच करतात, मात्र सीतेच्या एकपतीव्रताचे का नाही केलं जात? म्हणजे पुरुषांना परवानगी होती, मात्र स्त्रियांना गृहीत पकडलं होतं हे उघडच आहे. हिंदू संस्कृतीच्या महानतेचे ढोल बसवणाऱ्या ठेकेदारांनी या गोष्टीचे उत्तर द्यावं की हिंदू मुलगी घरात तरी सुरक्षित होती का? नवनाथ कथांमध्ये तर असे उल्लेख आहेत की ब्रम्ह आपल्या पोटच्या पोरीवर अनुरक्त होतो, त्याचे वीर्यपतन होते. (पुढे काय घडते सांगत नाही.. आंबट शौकीन लोकांनी स्वतः वाचावे..) अर्थात या कथा काल्पनिक आहेत, मात्र कथा लिहिणाऱ्याची आणि तत्कालीन समाजाची मानसिकता यातून उघड होते.


अनेक भाकडकथांमध्ये स्त्रीचं शील हे सॉफ्ट टार्गेट केलेलं आहे.. एखादी स्त्री जास्त पुढे जात असेल तर तिच्या शीलावर हल्ला केला पाहिजे याच सरंजामी वृत्तीचे समर्थन सर्रास केलं जातं. अनुसूयाची कथा याचं उत्तम उदाहरण. अत्रिमुनीची पत्नी अनुसूया हीचे नांव 'साध्वी व पतिव्रता स्त्री' म्हणून सर्वतोमुखी झाले. नारदामार्फत ही बातमी ब्रम्हा विष्णू महेश यांच्या पत्नींना समजली. तेव्हा त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसूया यःकिंचित् मानव व आपण तर देवी. तेव्हा या अनुसूयेचे पातिव्रत्य आपल्यापेक्षा सरस कसे? या विचाराने चरफडून उठत तिचे आपल्या नवऱ्यामार्फत सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार येतो. अशा वेळी त्रिदेव त्वरित उठले आणि "ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पहातो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो." अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्युलोकात यावयास निघाले.


आता काही प्रश्न उपस्थित होतात..

१) एखादी स्त्री खूप चांगली पतिव्रता असेल तर देवी मंडळींना इर्षा का होते.

२) आणि अश्या स्त्रीचे पातिव्रत्य भंग करण्यासाठी त्या चक्क त्यांच्या नवऱ्यालाच का सांगतात..

३) तिन्ही देव सुद्धा पृथ्वी वरील मर्त्य माणसाप्रमाणे लगेच मिळालेली संधी कॅश करायला तयार का होतात, भाजी आणायला सांगितले तरी लवकर न उठणारी नवरेमंडळी अशा कामाला तत्परतेने तयार कशी झाली. अर्थात धार्मिक लोकांना हे प्रश्न विचारलेले आवडणार नाहीत. पण जे विचार करू शकतात त्यांनी यावर नक्की विचार करावा की या कथा रचनाऱ्यांना स्त्रीचे शील, पातिव्रत्य आणि योनीशुचिता यातून नक्की कोणती मूल्य समाजात रूजवयची होती. अश्या वेळी "बलात्काराचा एक हत्यार म्हणून वापर केला पाहिजे" असं हिंदू महासभेचे विनायक सावरकर म्हणतात तेव्हा देखील हीच वृत्ती अधोरेखित होते.


"मुक्तपणे बोलणं, मुक्त विचार करणं आणि बंधनमुक्त महिला असणं या तीन बाबींची धर्माला भीती वाटत असते.. तिन्ही बाबी आपण एकत्र आल्या तर तुम्हाला अशी सॉलिड महिला दिसेल.. जी बिंदास तिचे म्हणणं मांडू शकेल" असं अयान हिरसी अली सांगते. युरोप अमेरिकामध्ये काहीसे खुलं वातावरण आहे, मात्र स्त्रिया स्वतःच स्वतःला पापपुण्याच्या संकल्पनेत स्वतःला अडकवून घेत आहेत. अशा वेळी अमांडा डोनोही सारखी कलाकार जेव्हा सिनेमामध्ये येशूवर थुंकण्यांचा सीन देते, तेव्हा तिच्यावर महिलांकडूच प्रचंड टीका केली जाते. मात्र यावर नास्तिक विचारसरणीची अमांडा म्हणते, "हजारो वर्षांपासून स्त्रियांची लैंगिकता ताब्यात ठेवणारे, त्यांचा छळ करणारे पुरुषदेव मी मानत नाही... त्यामुळे येशूवर थुंकायचा सीन शूट करताना मला भीती वाटली नाही.. उलट मी त्याचा आनंद घेतला."


अमांडाप्रमाणे कृती करायची गरज नाही, गरज आहे आपल्या धर्मात आपले स्थान शोधण्याची, आपल्याला आपला धर्म किती स्वातंत्र्य देतो हे तपासण्याची. हे खरे आहे की जोवर महिलांमधून एखादी धर्म संस्थापक येत नाही किंवा धर्मग्रंथांचे लेखन एखादी महिला करत नाही तोवर तिला धर्माधारीत स्वातंत्र्य मिळणार नाही..अशा वेळी तिच्यासाठी एकच पर्याय सर्वोत्तम आहे.. धर्म नाकारून, केवळ "माणूस" म्हणून जगणे.. ना कोणी धर्म संस्थापक ना कोणता धर्म ग्रंथ.. जातीधर्माच्या भीती पाडून, वंश आणि लिंगाचे बंधन मोडून माणूस बनून मोकळेपणाने जगायचे. कोणतेही कर्मकांड करायचे नाही. मुक्त.. मस्त बिंदास जगायचे. ❤️


#richyabhau


आपला ब्लॉग : https://drnitinhande.in/

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके

ऑनलाईन गणित शिकवणी

दृष्टी तशी सृष्टी