आर.के. लक्ष्मण आणि असामान्य लक्ष्मणरेषा

 आर.के. लक्ष्मण आणि असामान्य लक्ष्मणरेषा



रोज सकाळी टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीबाहेर एक काळी एंबेसडर थांबायची, त्यातून एक नाजूक शरीरयष्टीची व्यक्ती उतरायची आणि लिफ्टचा वापर न करता जिन्याने तरातरा चालत जाऊन आपल्या जागेवर बसायची. आखुड बाह्यांचा पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट, अगदी साधारण इसम वाटावा असं रूप, मात्र ती व्यक्ती आपल्या जागेवर बसून जे काम करायची, त्याची मोठमोठ्या राजकीय नेत्यांना धास्ती असायची.. त्या व्यक्तीकडून कॉमनमॅन चितारला जायचा, आणि त्यातून सामान्य व्यक्तींच्या आवाजाला कणखर वाचा फोडली जायची, राजकारण्यांच्या विसंगतीवर मार्मिक बोट ठेवलं जायचं. आपल्या प्रश्नांना व्यंगचित्रातून वाचा फोडली जाईल अशी आशा असल्यामुळे टाईम्समध्ये दिवसभरातून सामान्य जनतेचे शेकडो फोन यायचे, एखाद्या काल्पनिक पात्राविषयी जनतेमध्ये एवढा विश्वास निर्माण होणे, ही कमाल होती त्या चित्रकाराच्या कुंचल्याची. 


मोठे कान, टक्कल असलेला, चौकड्याचा कोट, धोतर, टोपी असा साधा पोषाख घातलेला एक वृद्ध, ज्याच्या चेह-यावर नेहमी गोंधळलेला भाव असायचा. देशातील वाचा नसलेल्या कोट्यावधी जनतेप्रमाणे असहाय वाटावा, असा कॉमनमॅन गेंड्याच्या कातडीच्या राजकीय व्यक्तिमत्वांची झोप उडवून शकत असे. त्यामुळेच पाण्याची समस्या असो किंवा वीज कपात, रस्त्यातील खड्डे असो किंवा भ्रष्ट्राचाराची समस्या, लोकांना या कॉमनमॅनचा आधार वाटायचा. "डोन्ट अंडरइस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमनमॅन" असा संदेश देणारी, सामान्य माणसाचा आत्मविश्वास उंचावणारी ही असामान्य लक्ष्मणरेषा, कॉमनमॅन आणि त्याचा असामान्य जन्मदाता. पद्मभुषण, पद्मविभुषण, रेमन मॅगॅसेसे आणि इतर महत्वाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे आर. के. लक्ष्मण. कॉमनमॅनच्या जन्मदात्याचे जन्मशताब्दी वर्ष संपन्न होत आहे त्यानिमित्त त्यांना या लेखातून मानवंदना. 


२४ ऑक्टोबर १९२१ या दिवशी म्हैसूर येथे एका मुख्याध्यापकाच्या घरात आठवं अपत्य जन्माला आलं. पाच भाऊ आणि दोन बहिणींच्या पाठीवर जन्माला आलेलं हे शेंडेफळ. दक्षिणी परंपरेप्रमाणे रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण असं भलं मोठं नाव असलेलं हे बाळ म्हणजेच आर. के. लक्ष्मण. वडील जरी अतिशय शिस्तप्रिय असले तरी शेंडेफळ असल्याचा पुरेपूर फायदा घेत लक्ष्मणची घरामध्ये प्रचंड मस्ती चालायची. वडिलांची भीती होती त्यामुळे ते घरात असले की लक्ष्मण तेवढ्यापुरता शांत. वडिलांची किंवा शाळेतील शिक्षकांची व्यंगचित्रं फरशीवर, भिंतीवर काढून मुलांच्या घोळक्याचा हशा मिळवणे लक्ष्मणला भारी वाटायचं. बासरीमधून सुर काढून उंदीर भुलवनाऱ्या जादुगाराची उपमा खोडकर लक्ष्मणला दिली जायची, कारण जिथं लक्ष्मण असेल तिथं मुलांचा घोळका असायचाच. 


लक्ष्मणची आई हे देखील विलक्षण व्यक्तिमत्त्व. कायम हसरी आणि उत्साही असलेली त्याची आई अनेक खेळांमध्ये तरबेज होती. टेनिस, ब्रिज आणि बॅडमिंटन या खेळांमध्ये तिचं कसब होतंच, मात्र बुद्धिबळमध्ये तिला कोणीच हरवू शकत नसे. मैसूरची महाराणी बुद्धिबळ खेळण्यासाठी लक्ष्मणच्या आईला बोलावत असे. याशिवाय लक्ष्मणची आई गोष्टीवेल्हाळ देखील होती. अतिशय सुरसपणे कथा रंगवून सांगण्यात ती पटाईत, हा गुण लक्ष्मणचा भाऊ आर के नारायण यांनी उचलला, ज्यांनी "मालगुडी डेज" लोकप्रिय कथासंग्रह लिहिला. घरामध्ये नोकरचाकर असून देखील स्वयंपाकात नवनवे प्रयोग करणारी त्याची आई सर्वांशीच प्रेमाने वागायची. त्यामुळेच केवळ मुलांची नाही तर सूनांची देखील ती लाडकी "आई" होती. 

 

चित्रकलेसाठी लक्ष्मणच्या घरात अतिशय पोषक वातावरण होतं. हार्पर्स, पंच, ऑन पेपर, स्ट्रॅन्ड यांसारखी प्रसिद्ध मासिकं घरातच वाचायला उपलब्ध होती. मात्र लक्ष्मणला वाचण्यात नाही तर पाहण्यात रस होता. या मासिकांमधील विविध चित्र पाहून आपण देखील अशी चित्र काढावी अशी इच्छा लक्ष्मणच्या मनात निर्माण व्हायची आणि तो तसा प्रयत्न देखील करायचा. एकदा एका मासिकातील चित्र हुबेहूब काढण्याचा प्रयत्न करत असताना एका भावाने पाहिलं आणि सांगितलं की कॉपी करू नकोस, वेगळे काहीतरी बनव. मग काय खिडकीतून बाहेर दिसेल ती झाडं, फांद्या, पानं, प्राणी, पक्षी चितारणं त्यानं सुरू केलं. पक्षामध्ये सर्वात जास्त त्याला कावळा आवडायचा. आसपासच्या माणसांची दखल देखील न घेणाऱ्या या बिनधास्त पक्ष्याने त्याला प्रेमात पाडलं. आयुष्यभरात त्यांनी कावळ्याची हजारो चित्र काढली आहेत. 


लक्ष्मणला गणितामध्ये अजिबात गती नव्हती, एकदा तर नापास व्हायची पाळी आली. अर्थात आई वडिलांनी त्याला तसेच कोणत्याही भावाला त्याबाबत कधी दबाव टाकला नाही. म्हणूनच बीए इंग्रजीमध्ये नापास होणारे आर. के. नारायण मालगुडी डेज लिहू शकले. त्यांची इतर भावंडांनी देखील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं आहे. प्रशासकीय सेवा असो किंवा मिनियेचर, संगीत क्षेत्र असो किंवा एफटीआयआय ची जबाबदारी, ही भावंडे भरीव कामगिरी करू शकली, याचे श्रेय त्यांच्या बालपणीच्या जडणघडणीला जाते, आई वडिलांच्या संस्कारांना जाते. शालेय शिक्षण चालू असतानाच वडिलांचे पॅरलसिसच्या ॲटॅकमुळे निधन झालं. मात्र मोठ्या भावांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली, त्यामुळे शिक्षण पूर्ण करण्यामध्ये लक्ष्मणला काही अडचण आली नाही.


एकदा शाळेत सरांनी सर्वांना पानाचे चित्र काढायला सांगितले. लक्ष्मणने काढलेलं चित्र एवढं सुरेख झालं होतं की आधी सरांना विश्वास बसला नाही की हे लक्ष्मणने काढले आहे. त्यांनी दरडावून विचारलं की "खरं सांग हे चित्र तूच काढले का?" तर आपल्या भाऊ घाबरून "नाही सर नाही सर" म्हणू लागला. मात्र सरांना समजलं होतं की चित्र लक्ष्मणनेच काढलं आहे. त्यांनी लक्ष्मणला पैकीच्या पैकी मार्क देऊन सांगितले की तू एक दिवस खूप मोठा चित्रकार होशील. अशी स्तुती शिक्षकांनी केल्यावर लक्ष्मणाला विश्वास आला की "होय आपण देखील चित्रकार आहोतच!!" 


क्रिकेट, बुद्धिबळ आणि टेनिस या सर्व खेळात लक्ष्मण वस्ताद होता. मोठं झाल्यावर क्रिकेटला बोरिंग आणि उगाचच प्रसिद्ध झालेला खेळ समजणारा लक्ष्मण लहानपणी त्याच्या क्रिकेट टीमचे कॅप्टन होता. अकरा वर्षांच्या लक्ष्मणने क्रिकेट टीम बनवून तिचं नाव "रफ, टफ अँड जॉली" असं ठेवलं. आरके नारायन यांनी मालगुडी डेज मध्ये लिहिलेली "द रिगल क्रिकेट टीम" ही कथा लक्ष्मणच्या टीमवरच आधारित होती. लक्ष्मण हे स्वतः एक पात्रच होतं, मग त्याचं प्रतिबिंब मालगुडी डेज मध्ये येणं स्वाभाविक होतं. त्यातील दोडू ही कथा देखील लक्ष्मण यांच्यावर आधारित आहे. नारायण यांच्या या कथेला साहित्य पुरस्कार मिळाला त्यावेळी लक्ष्मणला कळलं की आपला भाऊ लेखक वगैरे आहे. त्याने भावाच्या कथेसाठी चित्र काढणं सुरू केलं. स्थानिक वर्तमानपत्रातून त्याची चित्रं छापून येऊ लागली. त्यांच्या चित्रकलेवर डेव्हिड लो यांच्या शैलीचा प्रभाव होता. गम्मत म्हणजे या cow ला ते आपला आदर्श मानित होते, मात्र त्यांचे खरे नाव low आहे हे लक्ष्मण यांना खूप वर्षानंतर समजले. अर्थात त्यात त्यांची चूक नव्हती, चित्राखाली लो यांची सहीच अशी असायची की ती वाचनाऱ्याला काऊ वाटायची. 


















चित्रकलेतच करियर करायचं लक्ष्मण यांचं ठरलं होतं. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईमधील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌स येथे प्रवेशासाठी अर्ज केला. पण तेथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला, कारण देण्यात आलं की त्यांच्या चित्रकलेचा दर्जा कमी आहे. गंमत म्हणजे त्यानंतर काही वर्षांनंतरच लक्ष्मण यांना तिथं मार्गदर्शनासाठी बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी लक्ष्मण यांनी महाविद्यालयाच्या डीनला चिमटा काढत म्हणलं की "बरे झाले त्यावेळी मला इथं प्रवेश नाकारला गेला, अन्यथा मला इथे मार्गदर्शनासाठी बोलवावं, इतपत दर्जाचा चित्रकार कदाचित मी झालो नसतो. कुठं तरी जाहिरात कंपनीमध्ये बेबी फूडची किंवा एखाद्या लिपस्टिकची जाहिरात करत बसलो असतो." 


लक्ष्मण यांचा हा स्वभाव अतिशय वाखाणण्याजोगा होता. ते कधी कुणी खुशामत केली म्हणून खूष होत नव्हते की कुणी टीका केली म्हणून दुखावले जात नव्हते. समोरची व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याला परखडपणे सुनावण्यामध्ये लक्ष्मण कधीच कचरत नव्हते, बुजत नव्हते. नाहक विनय  त्यांच्याकडे नव्हताच. त्यांचा हा स्वभाव आईकडून मिळाला असावा, कारण मैसूरच्या महाराणीशी बुद्धिबळ खेळताना दरवेळेस आई जिंकायची, मात्र राणीला वाईट वाटेल म्हणून तिने कधी मुद्दाम हार स्वीकारली नव्हती. जेव्हा एका पत्रकाराने लक्ष्मण यांना विचारलं की जगात सर्वात श्रेष्ठ व्यंगचित्रकार कोण आहे असं तुम्हाला वाटतं. तेव्हा ते उत्तरले होते की, "मीच जगात श्रेष्ठ आहे असं मला वाटतं आणि असं प्रत्येक व्यंगचित्रकारालाच वाटत असावं." 


जेजे मध्ये प्रवेश नाकारल्याने लक्ष्मण यांनी मैसुर मध्येच महाराजा महाविद्यालयात बीए करताना राज्यशास्त्र अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास सुरू केला. ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस आणि प्लेटो यांच्या प्रेमात पडले. चित्रकलेचा व्यासंग जोपासला. रोज आपले चित्रकला साहित्य घेऊन बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, बाग यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी जायचे, तेथे दिसणाऱ्या चित्रविचित्र लोकांना, त्यांच्या देहबोलीला, वेशभूषेला आणि हावभावांना कागदावर उतरवणं सुरू झालं. शाळेत जाणारी पोरं, वकील, हमाल, उंडरणाऱ्या गाई, भटकणारी गाढवं, कुत्री. त्यांच्या चित्रांना विषयाचं बंधन नव्हतं. अधिक सरावाने चित्रं अधिक सफाईदार होत गेली. भावासोबत इतर लेखकही त्यांच्याकडून चित्रं काढवून घेऊ लागले. कन्नड मधील विनोदी नियतकालिक कोरावंजीमध्ये त्यांची चित्र प्रसिद्ध होऊ लागली. 


विसाव्या वर्षी पदवीधर झाल्यावर लक्ष्मण नोकरी मिळविण्यासाठी दिल्लीला गेले. हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने लक्ष्मण यांचे वय कमी असल्याचं सांगत नोकरी नाकारली. परत प्रवास करताना मुंबईमध्ये उतरले. आणि ठरवलं, काही झालं तरी काही तरी करून दाखवल्याशिवाय परत घरी जायचे नाही. एक रूम भाड्याने मिळवली. काही काळ ब्लिट्झ या साप्ताहिकामध्ये काम केलं. एक दिवस ते  फ्री प्रेस जर्नलमध्ये जाऊन संपादकांना जाऊन भेटले आणि बोलले "मला काम हवंय." त्यांची जुनी चित्रं पाहून लक्ष्मण यांना काम मिळालं, तिथे बाळासाहेब ठाकरे देखील काम करीत होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान असलेल्या फ्री प्रेस जर्नलमध्ये मात्र आता काहीसा साचेबंदपणा आलेला होता. फ्री प्रेसचे चालक-मालक स्वामीनाथ सदानंद हे काँग्रेसवर टीका करण्यास आघाडीवर असले तरी कम्युनिस्टांची टवाळी करायची नाही असा तिथं नियम होता. आणि अशा बंधनामध्ये लक्ष्मण यांना अडकायचं नव्हतं. त्यांनी लवकरच फ्री प्रेस सोडली. 


लक्ष्मण टाइम्स ऑफ इंडियाच्या कला दिग्दर्शक वॉल्टर लँघमर यांच्यासमोर उभे राहिले. नाव सांगितल्यावर लँघमर यांनी त्यांना ओळखले, कारण फ्री प्रेस जर्नलमधील त्यांची चित्रे या जर्मन माणसाला आवडली होती. काही चित्रे काढून दाखवल्यावर टाइम्स ऑफ इंडियामध्ये लक्ष्मण यांना नोकरी मिळाली.. मात्र ज्याला आपण "लक्ष्मणपर्व" म्हणून ओळखतो ते काही लगेच सुरू झाले नाही. त्यांना आधी टाइम्सच्या सायंआवृत्तीसाठी काम करावं लागलं. मात्र लवकरच त्यांना टाइम्सच्या पहिल्या पानावर स्थान मिळालं आणि ते स्थान पुढील चोपन्न वर्षे टिकून राहिले. त्यांनी सुरू केलेलं यु सेड इट हे सदर लोकप्रिय झालं, दोन बाय तीन इंच एवढ्याश्या जागेतून वादळ निर्माण होऊ लागलं. लक्ष्मण यांच्या नावाची चर्चा देशी-विदेशी होऊ लागली. 


इथे काम करत असतानाच एक दिवस अचानक "पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले." त्यांचे गुरु लो हे स्वतः त्यांना भेटायला टाइम्सच्या कार्यालयात आले. लो आणि त्यांची पत्नी त्यांच्या मुलीला भेटायला हॉंगकॉंगला जात असताना त्यांची बोट मुंबईमध्ये एक दिवस मुक्काम करणार होती, त्यानिमित्ताने हे दांपत्य लक्ष्मण यांना भेटायला आलं, लक्ष्मण यांनी त्या दोघांना मुंबई दाखवली. लक्ष्मण यांना लो यांनी लंडनला बोलवले. कार्यालयाची परवानगी काढून लक्ष्मण हे लंडनला गेले. तिथं गेल्यावर खऱ्या अर्थाने लक्ष्मण यांचा दृष्टीकोन अधिक व्यापक झाला. तेथील हुजूर पक्ष आणि मजूर पक्षातील चर्चिल आणि ॲटली सारख्या मोठ्या लोकांना भेटता आले, बर्ट्रांड रसेल आणि इलियट यांसारख्या नामवंत लेखकांशी संवाद साधता आला. तिथेच  इव्हिनिंग स्टॅंडर्ड या वर्तमानपत्रात डेव्हिड लो यांच्या राजीनाम्यानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर लक्ष्मण यांना नोकरीची संधी देऊ केली गेली. 


मात्र लक्ष्मण यांनी ती नोकरीची संधी स्वीकारली नाही. ते म्हणतात की "भारतामध्ये कार्टून काढण्याची गंमत आहे ती इतरत्र कुठेही नाही. व्यंगचित्रकाराला महान लोकांपेक्षा मोरारजी देसाई यांच्यासारख्या विक्षिप्त लोकांना चित्रबद्ध करण्यात अधिक आनंद मिळतो. जीथं सर्वच राजकारणी तोंडात मिठाची गुळणी घेऊन, सुटाबुटात वावरत असतात, तिथं व्यंगचित्र काढायला काय कन्टेन्ट मिळणार." त्यांनी लंडनमधील सहा महिने वास्तव्यानंतर इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, रशिया, अमेरिका इत्यादी सर्व ठिकाणी दौरा केला. चीन मधील प्रसिद्ध भिंतीवर पाच किलोमीटर चालले. मात्र त्यांनी भारतातच नोकरी सुरू ठेवायचा निर्णय घेतला. भारतात कॉमनमॅन त्यांची वाट पाहत होता..


कॉमनमॅन हे तसे नाइलाजाने जन्माला आलेलं बाळ आहे, कारण जनतेमधील एक दाखवायचं म्हणजे नक्की कुणाला दाखवणार. कन्नड, तमिळ, गुजराती, मराठी, केरळी, बंगाली, पंजाबी, प्रत्येकाची वेगळी वेशभूषा, वेगवेगळया चेहरेपट्टया. त्यापेक्षा या सर्वांचे प्रतिनिधित्व करेल असे पात्र जन्माला घालणं लक्ष्मण यांची गरज बनली. सडपातळ शरीरयष्टी, धोतर, चौकड्यांचा कोट, चष्मा, मिशा आणि डोक्यावर पांढरे विरळ केस असे या कॉमनमॅनचे साधारण रूप..हा कॉमनमॅन गल्ली पासून दिल्लीपर्यंत फक्त ऐकतच असतो. महानगरपालिकेचा शिपाई असो किंवा अगदी पंतप्रधान, आपली बाजू सावरून घेताना शब्दाचे फुगे सोडत असतात, आणि कॉमनमॅन शांतपणे ऐकून घेत असतो. मात्र तो चिवट असला तरी शेळपट नाही, त्याच्या अंगावरील कोटाप्रमाणेच तो दणकट आणि मळखाऊ आहे, कोणत्याही आपत्तीला तोंड देऊन सर्वांना पुरून उरेल असा सामान्य माणूस. 


प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे लक्ष्मण यांना आपला आदर्श मानतात, त्यांचा ब्रश धरूनच मी व्यंगचित्रकलेमध्ये आलो असं ते म्हणतात. ते म्हणतात, "व्यंगचित्र ही लोकशाहीची भाषा देशात रुजवण्याचे श्रेय शंकर पिल्लई आणि लक्ष्मण यांना जातं. राजकीय नेत्यांमध्ये टीका सहन करण्याची क्षमता या दोघांनीच विकसित केली. मात्र शंकर्स वीकलीचे शंकर आणि लक्ष्मण यांच्या स्वभावात फरक होता. हा प्रकार त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये देखील दिसून येतो. शंकर जर व्यंगचित्रकार झाले नसते तर ते माईक टायसन प्रमाणे बॉक्सर झाले असते. त्यांच्या राजकीय कोपरखळ्या प्रचंड शक्तीशाली असायच्या, समोरच्याला चारी मुंड्या चित करणाऱ्या असायच्या. तुलनेमध्ये लक्ष्मण हे थरो जंटलमन होते, ज्याच्यावर व्यंगचित्र केले आहे त्या व्यक्तीला राग ना येता तो विचारप्रवण व्हावा अशी ते नर्मविनोदी थट्टामस्करी लक्ष्मण करत."


दिसणं आणि बोलणं यामध्ये मवाळ वाटणारी लक्ष्मण करारी होते. कुणालाच घाबरायचे नाहीत. "कशाला कुणाला घाबरायचे? जास्तीत जास्त कोणी काय करेल, तर मला ठार मारेल. सर्वाना एक दिवस मरायचे आहेच. मग मी त्यांना कशाला घाबरू?" असं म्हणणारे लक्ष्मण यांनी सत्ताधाऱ्यांशी नेहमी दोन हात केले आहेत, प्रसंगी त्यांना धमक्या देखील मिळाल्या आहेत. मात्र त्यांनी कधीच नमतं घेतलं नाही. महात्मा गांधी यांच्यापासून सोनिया गांधी यांच्यापर्यंत काळाचा मोठा प्रवास त्यांनी पाहिला,आणीबाणी काळात त्यांना देशात काम करणे अशक्य झाले, तेव्हा ते काहीकाळ मॉरिशस मध्ये जाऊन राहिले, मात्र त्यांनी आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही.


देश आणि देशाबाहेरील उच्च पातळीवरील नेत्यांशी लक्ष्मण यांचा भरपूर संपर्क असे. त्यावेळी केलेलं त्यांचं सूक्ष्म निरीक्षण त्यांना व्यंगचित्रं रेखाटताना फायद्याचं ठरत असायचं. व्यंगचित्र काढण्यासाठी माणसामधले शारीरिक नव्हे तर स्वभावाचे व्यंग टिपण्याकडे त्यांचं लक्ष असायचं. इंदिरा गांधींचे लांब नाक, लाल बहादूर शास्त्रींची बटूमूर्ती, चंद्रशेखर यांची अस्ताव्यस्त दाढी हे सारे टिपताना त्या व्यक्तींच्या शरीरासोबत स्वभाव देखील ते अधोरेखित करत होते. सोनियांच्या चेहऱ्यावर नेहमीचा गोंधळ, शरद पवारांच्या चित्रात लोकांना कात्रजचा घाट दाखवणारा बेरकीपणा किंवा मनेका गांधी यांच्या चेहऱ्यावर बारमाही बालिशपणा लक्ष्मण यांनी अगदी अचूक टिपलेला असे. 


बाळासाहेब ठाकरे यांच्यावर काढलेलं व्यंगचित्र तर अर्क म्हणावे लागेल. खुर्चीत बसलेले बाळासाहेब समोर उभ्या असलेल्या प्रमोद महाजन यांना बसा म्हणत आहेत, पण समोरच्या खुर्चीवर ठेवलेले पाय मात्र काढत नाहीत. नाईलाजाने प्रमोद महाजन यांना छोट्याश्या स्टूल वर बसावे लागणार हे उघड आहे. बाळासाहेब ठाकरे आणि लक्ष्मण हे एका अर्थाने गुरुबंधू. कारण डेव्हिड लो हे दोघांचाही आदर्श. दक्षिण मुंबई मधील चेतना हॉटेल हे दोघांचा भेटायचा अड्डा. पुढे बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तरी त्यांची फ्री लान्स जर्नलमध्ये झालेली दोस्ती आयुष्यभर टिकली, चेतना मध्ये त्यांची नियमित भेट व्हायचीच. अर्थात बाळासाहेबांच्या धोरणावर टीका करताना लक्ष्मण यांनी कधीच हयगय केली नव्हती. आपल्यावर काढलेल्या व्यंगचित्राची दखल कशी घ्यावी याची समज बाळासाहेबांना होती. एरवी कुणालाही मातोश्री बाहेर न भेटणारे बाळासाहेब थकलेल्या लक्ष्मण यांना भेटण्यासाठी मात्र पुण्यापर्यंत आले होते. नव्वदीमध्ये पर्दापण केलेल्या लक्ष्मण यांना भेटायला ८५ वर्षांचे बाळासाहेब आले होते. बाळासाहेबांची ही पुणे शहरातील ही शेवटचीच भेट होती बरं का. 


पंडित नेहरूंना अर्धा टक्कल असलेला दाखवणारे लक्ष्मण हे बहुधा एकमेव असावेत. कारण बाकीचे चित्रकार त्यांना देखणा, चिकनाचोपडा दाखवायचे. लक्ष्मण मात्र त्यांना विनाकारण हुशारी करणारी व्यक्ती असे चित्रीत करत. पंडित नेहरूंनी पंतप्रधान पदाबरोबरच अर्थ, गृह, परराष्ट्र अशी अनेक महत्त्वाची खाती स्वतःकडेच ठेवली. लक्ष्मण यांनी त्याच्यावर भाष्य करताना त्यांना असा संगीतकार दाखवला जो एकाच वेळी तबला, पेटी, सतार, मृदुंग अशी वेगवेगळी वाद्ये एकत्र वाजवत आहे. साहजिक यातून संगीत नाही तर केवळ गोंधळ बाहेर येणार हे अधोरेखित केलं होतं. मात्र पंडित नेहरू यांविषयी लक्ष्मण एकंदर आदर व्यक्त करताना आढळतात. पंडित नेहरूंनी भेटीसाठी दहा मिनिट दिलेला वेळ टळून त्यांची भेट एक तासापेक्षा जास्त वेळ कशी रंगली हे ते नेहमी आवर्जून सांगत असायचे. 


यशवंतराव चव्हाण यांना कॉंग्रेस पुनर्प्रवेश हवा होता मात्र बरेच दिवस इंदिरा गांधींनी त्यांना झुलवत ठेवलं होतं. यावर आपल्या कुंचल्यातून भाष्य करताना लक्ष्मण यांनी  चित्रामध्ये यशवंतरावांना कुंपणाच्या भिंतीवर बसल्याचं दाखवलं, ज्यांच्या पूर्ण अंगावर कोळ्यांनी जाळी केली आहेत. इंदिरा गांधींची दहशत एवढी होती की कोणताही सरकारी बाबू त्यांना "त्या चुक आहेत" असं तोंडावर सांगू शकत नसे. यावर भाष्य करताना लक्ष्मण यांनी एक कोरडं धरण दाखवलं. बाबू म्हणतो, "धरणाचे बांधकाम उत्तम झालं आहे, परंतु एकच प्रॉब्लेम आहे, जवळपास कोठेही नदी नाही." इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्यांच्यापेक्षा इंदिराभक्तांची जास्त दहशत असायची. स्वतः इंदिरा गांधी यांनी लक्ष्मण यांना "तुम्हाला हवं ते चित्र करा" असे स्वातंत्र्य दिल्याचं लक्ष्मण सांगतात. 


असाच एक भक्त डी के बरुआ, जे तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी "इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया" अशी घोषणा दिली होती. त्यावर लक्ष्मण यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला. एक दूधपिते बाळ म्हणून त्यांनी डी के बरुआ यांना चित्रीत केलं. त्यावर माहिती आणि प्रसारण मंत्री व्ही सी शुक्ला यांनी हरकत घेऊन लक्ष्मण यांना ताकीद देण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण यांनी इंदिरा गांधींच्या बोलण्याचा संदर्भ देत सांगितलं की त्यांनी मला हवं ते करायची परवानगी दिली आहे. मात्र शुक्ला म्हणाले की "त्यांचं नाव घेऊ नका, जो तो उठतो तो त्यांचं नाव घेतो."  काम करणं अशक्य झाल्यानं लक्ष्मण यांनी मॉरिशस येथे सुट्टीचा आनंद घेतला आणि जेव्हा त्यांना समजलं की भारतात निवडणूक लागली आहे, त्यावेळी ते भारतात परत आले. 


राजबिंड्या राजीव गांधी यांना व्यंगचित्रात बंदिस्त करणं हे सर्वच चित्रकारांना आव्हान असायचं. इथं लक्ष्मण यांचं विशेषपण दिसून येतं. तोंडावर भोळा भाबडेपणा बाळगून फिरणारे राजीव नंतर लक्ष्मण यांनी आधीच चित्रीत केल्याप्रमाणे अधिक टकले, गोबऱ्या गालाचे आणि वाकड्या नाकाचे दिसू लागले. राजीव गांधी यांना कोणी काही प्रश्न विचारला तर त्यांच नेहमीचं वाक्य असायचं "आय वील लूक इनटू द मॅटर" जेव्हा लक्ष्मण आणि राजीव गांधी यांची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा राजीव गांधी त्यांना म्हणाले "तुम्ही मला व्यंगचित्रात फारच जाड केलेत हो." तेव्हा हजरजबाबी लक्ष्मण म्हणाले, "आय वील लूक इनटू द मॅटर." 


एकदा ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर लक्ष्मण यांना व्यंगचित्र कसं काढावं यावर सांगत होत्या, तेव्हा हजरजबाबी लक्ष्मण त्यांना बोलले, "तुम्ही पंतप्रधान होण्यापेक्षा व्यंगचित्रकार झाल्या असता तर बरं झालं असतं." टाईम्स ऑफ इंडिया मधील प्रसिद्ध पत्रकार सुचेता दलाल, ज्यांनी हर्षद मेहता प्रकरण उघडकीला आणले, त्यांनी एकदा लक्ष्मण यांना विचारलं, "तुमचा कॉमनमॅन हा मॅनच का असतो नेहमी? कॉमनवुमेन का नसते?" तेव्हा लक्ष्मण तडक त्यांना म्हणाले, "महिला ह्या कॉमन असुच शकत नाही कारण त्या नेहमीच स्पेशल असतात.". 


त्यांच्या चित्रातील पात्रे देखील अशीच हजरजबाबी. भिकारी, खेडुत यांसारखी आर्थिक आणि शिक्षणाच्या दृष्टीने हे उपेक्षित असलेली पात्रं, मात्र त्यांचे सामाजिक भान अश्या पातळीवर असते की ते अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांना अवाक करतात. त्यांचा कॉमन मॅन स्वतः काही बोलत नाही, आपल्या मोठ्या कानांनी ऐकत असतो. सचिव, अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी शब्दाचे फुगे सोडत असतात. त्यांची भाषा भारदस्त मात्र निरर्थक असते, अशा वेळी त्यांच्या विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवण्याचे काम लक्ष्मण यांच्या काकदृष्टीने केलं आहे. कावळा हा जणू त्यांचा सखाच.. आयुष्यभर साथ देणारा. आपला सहकारी संकटात असताना कावळ्याच्या डोळ्यात दिसणारी तडफड तुम्ही कॉमनमॅनच्या डोळ्यात देखील पाहू शकता. 


अनेक वेळा त्यांच्या व्यंगचित्रांवर तोचतोचपणाचा किंवा गुळमुळीत भूमिका घेतल्याचा आरोप केला जातो. मात्र या आरोपांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. हे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्यावर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप झाला होता. आणि त्याबद्दल त्यांच्यावर नाशिक येथे खटला देखील चालला होता. रथयात्रेच्या वेळी झालेल्या दंगलीच्या संदर्भात लक्ष्मण यांनी एक व्यंगचित्र काढलं होतं ज्यामध्ये बाकीचे लोक बस आणि रेल्वे जाळत असताना एक मुलगा मोटरसायकल जाळण्याचा प्रयत्न करत आहे. आणि कोणीतरी ओरडते, "कसला रामभक्त आहेस तू? तुला साधी मोटरसायकल देखील जाळता येत नाही का?" गंमत म्हणजे विरोधी पक्षाची स्त्री वकील कोर्टामध्ये तावातावाने भांडून सांगत होती की या वाक्यामुळे हिंदू धर्माचा अपमान झाला आहे. मात्र खटल्याचे कामकाज पूर्ण झाल्यावर नंतर लक्ष्मण यांची स्वाक्षरी घेण्यासाठी तीदेखील रांगेत थांबली होती. 


हे खरे आहे की त्यांनी कधी नाहक वाद ओढवून घेतले नाहीत, मात्र सत्यास सत्य म्हणताना ते कधी घाबरले नाहीत. सलग ५४ वर्ष टाइम्समध्ये दिलेले योगदान म्हणूनच अद्वितीय असे आहे. बेस्ट ऑफ आर.के. लक्ष्मण, फेसेस, फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेण्डन्स, थ्रू दी आइज ऑफ आर.के. लक्ष्मण ही त्यांची व्यंगचित्रांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी व्यंगचित्रांशिवाय लिखाण देखील केले आहे. द डीसोर्टेड मिरर, द सर्व्हंट्स ऑफ इंडिया, हॉटेल रिवेरा, द मेसेंजर, द एलोक्युएंट ब्रश इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. द टनेल ऑफ टाइम हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.ज्याचा अनुवाद अशोक जैन यांनी लक्ष्मणरेषा या नावाने मराठी अनुवाद केला आहे. लक्ष्मण यांना आशिया खंडातील नोबेल समजला जाणारा मॅगसेसे पुरस्कार १९८४ मध्ये मिळाला. भारत सरकारने १९७१ मध्ये पद्मभूषण आणि २००५ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरवलं आहे. 

               

त्यांचं वैवाहिक जीवन अतिशय सरळसाधं होते. आधी त्यांनी सिनेकलाकार कमला कुमारीशी विवाह केला. मात्र त्या दोघांचे सुर न जुळल्याने ते लवकरच विभक्त झाले. मग त्यांनी त्यांच्या भाचीशी लग्न केलं. विशेष म्हणजे या दुसऱ्या पत्नीचं नाव देखील कमला होतं. कर्नाटकमध्ये मामा भाची विवाह मोठ्या प्रमाणात होत असतात. छोट्या लक्ष्मण यांना कमला अगदी लहानपणापासून आवडत होती. मोठं  झाल्यावर कमलाशी लग्न करणार असे ते म्हणायचे. आणि मोठं झाल्यावर दोघांचं आयुष्य खरचं एकत्र जोडलं गेलं. आणि दोघांनी एकमेकांना छान साथ दिली. 


कमला लक्ष्मण यांनी बालसाहित्यकार म्हणून चांगले योगदान दिलं आहे. त्यांच्या पुस्तकात देखील चित्रांचे रेखाटन लक्ष्मण यांनी केलं आहे. पुलंच्या आयुष्यात सुनीताबाईंचे योगदान जितकं महत्वाचं आहे, तितकंच लक्ष्मण यांच्या आयुष्यात कमलाबाई यांचं. लक्ष्मण यांचा दिनक्रम लिहून ठेवणे आणि त्याचं पालन करणे याची जबाबदारी त्यांनी घेतली होती. लक्ष्मण गमतीने म्हणायचे की,"तिला सर्व काही ठाऊक असतं." या दोघांचा मुलगा श्रीनिवास लक्ष्मण हे देखील टाइम ऑफ इंडिया मध्ये काम करत आहेत, अंतरिक्ष विज्ञानाची माहिती सोप्या भाषेत प्रसारित करत आहेत. काही वर्षांपूर्वी रिमानिका लक्ष्मण या लक्ष्मण यांच्या नातीने कॉमनवुमनवर काम करण्याची घोषणा केली आहे.


लक्ष्मण हे कधीच मनगटी घड्याळ वापरत नसत. ते म्हणतात की, "मला जर वेळ विचारायची असेल तर मी कोणाला पण विचारेल ना.. त्यासाठी घड्याळ कशाला हवं."  आपले काम करताना त्यांनी वेळेचे विचार कधीच केला नाही, आणि आपले लक्ष पुन्हा पुन्हा घड्याळाकडे जाऊ नये म्हणून ते घड्याळ वापरणं टाळत असावेत. त्यांना वस्तू दुरुस्त करण्याचा छंद होता. फावल्या वेळात भिंतीवरचे घड्याळ, घरातील नळ, विजेचे सामान दुरुस्त करायचा छंद त्यांनी जमेल तोपर्यंत जोपासला. ३० ऑगस्ट २००३ रोजी सकाळी ८ वाजता आर. के. लक्ष्मण यांना पक्षघाताचा झटका आला आणि त्यांची डावी बाजू निकामी झाली. यातून लक्ष्मण सावरले देखील. अगदी नव्वदीमध्ये येईपर्यंत ते चित्र काढू शकत होते. लक्ष्मण यांचे २००५ पासून पुण्यात औंध येथे वास्तव्य होते. २६ जानेवारी २०१५ ला काही अवयव निकामी झाल्यामुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये त्यांचे निधन झाले अन कॉमनमॅन पोरका झाला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 


आज लक्ष्मण यांचे शरीर आपल्यात नसले तरी त्यांनी केलेलं काम एवढं मोठं आहे की त्यांनी केलेलं आभाळाएवढे काम आपल्यापाशी आहे, पुढील शेकडो वर्ष सत्ताधाऱ्यांच्या पोटात धडकी भरवेल असा कॉमनमॅन आपल्याकडे आहे, आपली जबाबदारी आहे त्याचे जतन करायची, संवर्धन करायची. त्यांनी केलेल्या कामाचे जिवंत स्मारक उभारण्याचे काम बालेवाडी,पुणे इथे सुरू आहे, सर्व लक्ष्मण कुटुंबीय त्यासाठी जातीने लक्ष देत आहेत, केवळ उमेदवार व्यंगचित्रकारांनाच नव्हे तर सामान्य जनतेला प्रेरणेचा स्त्रोत देणारे हे स्मारक लवकरच पूर्ण झालेलं असेल. याशिवाय देशभरात कॉमनमॅनचे उभारलेले अनेक पुतळे देखील नव्या पिढीचे कुतूहल जागृत करत आहेत. माझ्या वडिलांच्या पिढीची लक्ष्मण यांच्याशी ओळख कॉमन मॅनच्या व्यंगचित्रातून झाली, माझ्या पिढीने आर के लक्ष्मण हे नाव मालगुडी डेजच्या शीर्षकगीतामध्ये सर्वप्रथम पाहिले, आता माझी मुलं सिम्बॉयसिस येथील कॉमनमॅनचा पुतळा पाहून मला विचारतात हे कोण बाबा आहेत… आणि मी उत्साहाने कॉमन मॅन आणि त्याची अफाट सुप्त शक्ती याबद्दल पोरांना सांगतो.  


लक्ष्मण यांना जर कोणी विचारलं की, "मला पण कार्टूनिस्ट व्हायचं आहे तर मी काय करू". तर त्यावर ते म्हणतात कार्टूनिस्ट असं होता येत नसतं ती तुम्हाला जन्मजात देणगी असावी लागते. तुमच्या आत छुपा व्यंगचित्रकार दडला असेल तरच त्याला प्रशिक्षण देऊन अधिक सफाईदार करता येते. मात्र तीन गोष्टी तुम्हाला लागतातच, चांगलं शिक्षण, चांगली चित्रकला आणि चांगली विनोदबुद्धी." राजकीय परिस्थिती पाहून ते उद्वेगाने म्हणतात की "मी राजकारण्यांचे खूप उपकार मानले पाहिजेत, कारण त्यांनी जनतेचे पोट भरेल की नाही याची काळजी न करता केवळ या आरके लक्ष्मणचं पोट कसं भरेल याचीच काळजी केली."


लक्ष्मण आज आपल्यात असते तर त्यांनी काय राजकीय भूमिका घेतली असती ते पाहणे उत्सुकतेचे ठरले असते. मात्र आजच्या सत्ताधाऱ्यांना जरासुद्धा विनोदबुध्दी नाही हेच व्यंगचित्रकार तसेच स्टँडअप कॉमेडीयन यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यातून दिसून येतं. देशाचे पंतप्रधान एका बाजूला म्हणतात की टीका झाली पाहिजे मात्र दुसऱ्या बाजूला कोणत्याही टिकेचे ते उत्तर देत नाहीत की पत्रकार परिषद घेत नाहीत. त्यामुळे असं वाटत आर के, तुम्ही योग्यवेळी एक्झिट घेतली, कारण आजचा काळ तुम्हाला पाहावला नसता. कदाचित तुम्ही उद्वेगाने म्हणाला असता, "डोन्ट अंडरइस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमनमॅन"


#richyabhau


आपला ब्लॉग https://drnitinhande.in/


कॉमन मॅन च्या जन्मदात्याची ही पोस्ट जरूर शेअर करा🙏

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव