नरिंदर सिंह कपानी : फायबर ऑप्टिकचे जनक

नरिंदर सिंह कपानी : फायबर ऑप्टिकचे जनक




आज संपूर्ण जग आणि त्यातील लोक, त्यांचा व्यापार इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेला आहे. लोकांचे शिक्षण, मनोरंजन, एवढंच काय, रोजचं जगणं देखील इंटरनेटवर अवलंबून आहे. गॅस बुकिंग असो अथवा विद्युतबिल भरणा, प्रवासाचे नियोजन असो अथवा वस्तूंची खरेदी..  सर्वकाही घरबसल्या.. एकेकाळी या बाबींसाठी लाईन लावावी लागत होती, प्रचंड वेळ जात होता असं पुढच्या पिढीला सांगितलं तर त्यांना कदाचित खरं देखील वाटणार नाही. इंटरनेटमुळे आपल्या या अनुत्पादक दैनंदिन कामांमध्ये बदल झाला, या कामासाठी पूर्वी लागणाऱ्या वेळेत प्रचंड बचत झाली. आता हा वेळ अधिक सर्जनशील कामासाठी वापरता येऊ शकतो. (बहुतांश लोक सर्जनशील कामासाठी वापरत नाही हा भाग वेगळा😂)


एकविसावं शतक हे वेगाचं शतक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एके काळी डायलअप कनेक्शनने ६४ kbps पेक्षा कमी इंटरनेटच्या वेगावर भागवायला लागायचं.. आता हा इंटरनेटचा वेग सामान्य ग्राहकाला देखील ३०० Mbps पर्यंत वेग उपलब्ध आहे. अमेरिकेतील ग्राहकांना तर इंटरनेटचा वेग Gbps मध्ये मिळू शकतो.. ही किमया साधली आहे फायबर ऑप्टिक या तंत्रज्ञानाने, आणि आपल्यासाठी आनंदाची बाब म्हणजे जगाला या तंत्रज्ञानाची देणगी दिलेला शास्त्रज्ञ भारतीय आहे.. नरिंदर सिंह कपानी. आणि त्यांनी शोधलेलं फायबर ऑप्टिक तंत्रज्ञान केवळ इंटरनेटच नाही तर मेडिकल क्षेत्रामध्ये देखील अतिशय मोलाचं ठरलेलं आहे. याशिवाय सौर ऊर्जा, प्रदूषण नियंत्रण यांसारख्या विषयात त्यांचं काम मोलाचं आहे. 


पंजाबमधील एका छोट्या शहरात एक मुलगा जन्मतो, आणि लहानपणापासून पडलेल्या प्रश्नाचा ध्यास घेत अमेरिकेला पोचतो, तिथं पुढचं संशोधन करतो, आणि जगाचा वेग बदलणारं तंत्रज्ञान त्याच्या हाती लागतं. केवळ शास्त्रज्ञ नाही तर कुशल उद्योजक असलेल्या या व्यक्तीने व्यापारात भरपूर पैसे कमावले, तेवढेच समाजकार्यावर खर्च केले.  त्यांच्या नावावर एकूण १२० पेटंट आहेत. ४ पुस्तके आणि १०० संशोधन पत्रिका लिहिणारा, भारताचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार "पद्मविभूषण" ( मरणोपरांत 😭) मिळालेला हा शास्त्रज्ञ फारसा कुणाला माहित नाही. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांची माहिती घेऊ. 


पंजाब मधील मोगा या तालुक्याच्या शहरात (आता तो स्वतंत्र जिल्हा झाला आहे) एका सधन शीख कुटुंबात ३१ ऑक्टोबर १९२६ रोजी नरिंदर जन्माला आला. घरामध्ये भरपूर सुबत्ता.. आजोबांनी पटियाला मध्ये न्यायाधीश म्हणून काम केलेलं. नारिंदर आजीचा लाडका, आजी रोज  त्याला गुरुनानक यांचे चरित्र असलेल्या "जनमसखी" मधील गोष्टी रंगवून सांगायची.  त्यांच्याकडे जनमसखीचे २०० वर्ष  जुने हस्तलिखित होते. पटियालाचे महाराज भूपिंदर सिंग यांच्या शाही बागेतून संत्री चोरायचा उद्योग आपल्या बाल नरिंदरने केला आहे. त्याचे  शालेय शिक्षण सुरू झालं तेव्हा  हे कुटुंब  डेहराडून मध्ये स्थाईक झालं होतं. इथेच त्याच्या विचारांना आणि कल्पकतेला हिमालयाची उंची लाभली. 


त्याच्या शालेय जीवनात त्याला अनेक साधू फिरताना दिसायचे. हिमालयात हिंडणारा या साधूंची भटकी वृत्ती नरिंदरला देखील आवडायची. तो देखील वेळ मिळेल तेव्हा त्यांच्यासारखा मनमुराद… पाय नेतील त्या अनोळखी ठिकाणी भटकत रहायचा. उंच उंच हिमशिखरे न्याहाळत असताना त्याच्या लक्षात आलं की सूर्य जर या शिखरांच्या मागे आहे तर मग प्रकाश पोचतो कसा?? शाळेत गुरूजी सांगतात, प्रकाश एका सरळ रेषेमध्ये प्रवास करतो, मग असं होतं कसं?.. (त्याच्या शालेय शिक्षणाचा १९४० चा कालावधी लक्षात घ्या बरं का इथं.) 

 

लहान असताना जन्मदिवसानिमित्त वडिलांनी कोडॅकचा कॅमेरा भेट म्हणून दिलेला असतो. त्या काळात अतिशय महागडा आणि केवळ श्रीमंतांनाच परवडेल असा हा कॅमेरा. मात्र आपल्या या बाळाला त्याच्या प्रश्नांचं उत्तर हवं असतं, मग काय.. तो नवा कोरा कॅमेरा नक्की कसं काम करतो, त्यात प्रकाशाची भूमिका नक्की काय असते हे पाहण्यासाठी छोट्या नरिंदरने कॅमेरा खोलून पाहिला. अर्थात कॅमेरा नंतर वापरता येण्याजोगा राहिला नसला 😭 त्याच्या वडिलांना मात्र त्याच्या उत्सुकतेचं आणि चिकित्सक वृत्तीचं कौतुक वाटलं. "छड यार, कोई गल नही" म्हणत नरिंदरचा पाप्पे कुल राहिला. (असाच आमच्या बाप असता, तर आम्हीही शास्त्रज्ञ झालो असतो 😂)


नरिंदरने या प्रकाशाच्या प्रश्नाचा ध्यास घेतला‌ होता. आपल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होता.. "याचा अर्थ प्रकाश वाकला जाऊ शकतो" हे त्याला लहानपणी उमजलं.. फाळणीचे दुष्परिणाम नरिंदरने जवळून पाहिले. शाळेच्या बाहेरच शालेय मुलींची प्रेतं पाहून तो कळवळून गेला होता. त्यांचा कुटुंबाने घरातील मुस्लिम नोकरांचे रक्षण केलं. आग्र्यातील महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त करून नरिंदर जेव्हा रायपूर मधील ऑर्डीनन्स फॅक्टरीमध्ये कामाला लागला, तेव्हा प्रिझमचा वापर करून प्रकाश वाकवता येतो हे त्याला समजलेच. १९५२ मध्ये पुढील शिक्षणासाठी तो लंडन मधील इंटरिकल कॉलेजमध्ये दाखल झाला. इथं त्याला त्याच्या जीवनाला आकार देणारा शिक्षक भेटला..डॉ हॉपकिन्स. जे प्रकाशाचा वापर करून चित्र पाठवायचा प्रयत्न करत होते.  आपल्या नरिंदरचा‌ हा जिव्हाळ्याचा विषय  त्याने या संशोधनात भाग घेतला.. शिवाय phd साठी देखील हाच विषय निवडला. 


प्रतिमा पाठवता येईल का यावर अनेक दशकांपासून संशोधन सुरू होतं. काचेचे तंतू वाकवले असता त्यातील प्रसारणक्षमता ९९.९९% संपत होती. प्रतिमा दूर पोचवायची असेल तर वायर तर वाकणारच. म्हणजे अशी काच हवी होती, ज्यामध्ये प्रकाश वाकवता येईल, मात्र त्याची प्रसारण क्षमता नष्ट होणार नाही. पिल्किंगटन ग्लास कंपनी या कारखान्यात जाऊन कपानी यांनी आपली ऑप्टिकल ग्लासची मागणी सांगितली. प्रकाश पुढे पाठवता येईल अशी ऑप्टिकल ग्लास.. जीचा नमुना देखील त्यांनी कारखान्यात दिला. आधी तर कामगार आणि मालक सगळे त्यांना हसायला लागले. आणि त्यांनी जी काच मागितली होती ती न देता त्यांना बियरच्या हिरव्या बाटल्यांची काच पाठवून दिली. सहाजिकच पुढचा प्रयोग फसणार होताच. असे अनेक ट्रायल अँड एरर प्रयोग झाले. मात्र अखेरीस आपण हल्ली इमारतींना आच्छादित करताना वापरतो ती अपारदर्शक निळी काच उपयोगी ठरली. 


१९५३ मध्ये हॉपकिन्स- कपानी यांना प्रकाशाच्या साहाय्याने प्रतिमा पाठवण्यात यश आलं. त्याच वर्षी डच शास्त्रज्ञ ब्राम हिल याने देखील तसाच प्रयोग केला होता. मात्र कपानी यांचा प्रयोग अधिक यशस्वी झाला.. १०००० काचेचे धागे वापरून ७५ cm लांब प्रतिमा पाठवण्यात त्यांना यश आले होते. संशोधनासाठी आता नवे क्षेत्र खुलं झालं होतं. एका जर्मन शास्त्रज्ञाने पुढे १९६५ मध्ये फायबर ऑप्टिकमध्ये पेटंट देखील मिळवलं. फायबर ऑप्टिक हा शब्द कपानी यांचाच बर का.. १९६० मध्ये त्यांनी सर्वप्रथम हा शब्दप्रयोग केला होता. मात्र ऑप्टिकल फायबरचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये करता येईल का? याकडेच कपानी यांच्या संशोधनाचा रोख सुरुवातीला होता. 


सिख्ख आदमी क्या करेगा.. फौजमे जायेगा, गड्डी चलायेगा या धंदेविच आयेगा. हे संशोधन वगैरे काय मध्येच.. कपानी हे व्यवसायात उतरले. १९७३ साली त्यांनी कॅपट्रोन नावाची कंपनी टाकली.. कालांतराने १९९० मध्ये भरपूर पैसा कमवून ती विकली, बरं पुढं त्याच कंपनीत नऊ वर्ष पगार घेऊन काम देखील केलं. 😂 विसाव्या शतकात मानवी जीवन अमुलाग्र बदलणाऱ्या ७ लोकांची यादी फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाने नोव्हेंबर १९९९ मध्ये जाहीर केली, ज्यामध्ये आपल्या नरिंदरप्राजींचा समावेश होता. २००० साली या ७४ वर्षाच्या तरुणाने पुन्हा k२ ऑप्ट्रोनिक्स नावाची कंपनी टाकली. K२ हे कपानी यांना प्रेरणा देणाऱ्या हिमालयाचे भारतातील सर्वोच्च शिखर (पाक व्याप्त काश्मीर मध्ये आहे सध्या). कपानी यांच्या या नव्या कंपनीने देखील यशाची शिखरे पार केली.  


लय पुढं पळालो.. परत मागे येऊ..  १९५५ साली कपानी यांना phd प्रदान झाली. त्याच वर्षी फेब्रुवारी मध्ये ‘Optica Acta’ या मासिकात त्यांनीं Transparent Fibres for the Transmission of Optical Images’ या नावाने रिसर्च पेपर प्रकाशित केला. आता कपानी यांना भारतात जाऊन स्वतःची कंपनी सुरू करायची होती. मात्र याच वेळी इटलीमध्ये भरलेल्या एका विज्ञान परिषदेमध्ये त्यांना एक अमेरिकन प्राध्यापक भेटले, ज्यांनी त्यांना अमेरिकेत बोलवले. तिकडे त्यांनी काही काळ रोचेस्टर विद्यापीठात शिकवलं. मात्र लवकरच ते शिकागो मधील इलीनॉइस तंत्रज्ञान संस्थेतील ऑप्टिक विभागात रुजू झाले. सोबतच आपला व्यवसाय देखील सुरू केला.


याच काळात त्यांना पंडित नेहरू भारतात बोलवत होते, संरक्षण मंत्री मेनन आणि स्वतः नेहरूंसोबत त्यांची भेट झाली. संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांना नोकरी देऊ केली गेली. कपानी यांनी नोकरी स्वीकारली देखील असती,  मात्र सरकारी बाबु लोकांकडून लवकर सूत्रे हलली नाहीत. शेवटी जेव्हा नियुक्तीपत्र तयार झालं, तोवर कपानी यांचा त्या नोकरीतील रस संपला होता. त्यांनी अमेरिकेतच स्थायीक व्हायचे ठरवलं. त्यांनी शिकागो सोडले आणि कॅलिफोर्निया मध्ये स्थायीक झाले  शिकागो मधील चार वर्ष हा आपल्या आयुष्यातील सर्वात सोनेरी कालखंड होता असे कपानी म्हणतं. अनेक संशोधन पेपर प्रसिद्ध झाले, अनेक पेटंट नावावर झाले आणि फायबर ऑप्टिक क्षेत्रात त्यांच्या शब्दाचं महत्त्व वाढू लागलं.


हे फायबर ऑप्टिक नक्की आहे काय? फायबर ऑप्टिक म्हणजे माहिती प्रसारित करणारे एक तंत्रज्ञान. माहितीचे वहन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी करणारे तंत्रज्ञान. माहितीचे वहन दोन प्रकारे होते. वायरच्या साह्याने आणि वायरलेस तंत्रज्ञान वापरून. पैकी ट्विस्टेड पेअर तारेच्या साह्याने सुरुवातीला दूरध्वनी सुरू झाले, टीव्ही अँटेनासाठी देखील अशीच साधी वायर होती.  कालांतराने आपण आता जी वापरतो केबल टीव्हीसाठी कोॲक्सिल तार वापरली जाऊ लागली, जिची प्रसारण क्षमता स्टेट ट्विस्टेड पेअरपेक्षा ८० पट अधिक होती. दूरध्वनीसाठी फायबर ऑप्टिक वापरले जाऊ लागले, ज्याचा वेग स्टेट ट्विस्टेड पेअरपेक्षा २६००० पट अधिक होता. वेग तर होताच शिवाय या केबलवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक दुष्परिणाम होत नव्हता. पाण्यात देखील या केबलला काही फरक पडत नव्हता. टेलिकॉम क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत गेले आणि फायबर ऑप्टिकने पारंपारिक वायरला बाहेर फेकून दिलं. 


हे तंत्रज्ञान नक्की काम कसं करतं..?? एका फायबर ऑप्टिक केबलमध्ये काचेचे अनेक तंतू असतात. प्रकाशकण किंवा फोटॉनच्या स्वरूपात माहिती प्रसारित केली जाते. तीदेखील प्रकाशाच्या वेगाच्या ७० टक्के इतक्या प्रचंड गतीने. एका ठिकाणी उपकरणांच्या मदतीने माहितीचं कोडींग होऊन फोटॉनमध्ये रुपांतर होतं, येणारा प्रकाश एका विशिष्ट कोनातून वाकवला जातो… माहिती पाठवली जाते, दुसऱ्या ठिकाणी फोटॉनरुपी माहितीचे डिकोडिंग होतं. अशी साधी सोपी वाटणारी यंत्रणा. मात्र एवढं सोप नसतं. 😭 आपल्या अर्थव्यवस्थेप्रमाणे हा फोटॉन देखील खूप आळशी असतो.‌ 😂 या फोटॉनला पुन्हा पुन्हा पुढं ढकलायला लागतं, त्यासाठी पुनरावृत्ती यंत्र वापरली जातात. प्रकाशरुपी माहितीचे रूपांतर विद्युतरुपात केलं जातं, त्याचं पुन्हा आवश्यक त्या ठिकाणी प्रकाशरुपात रूपांतर केलं जातं. तुम्हाला म्हणायला काय जातंय. आज नेट स्लो आहे. त्यासाठी बिचारे फोटॉन आपल्यासाठी किती राबत असतात बघा जरा😀


आता तुम्ही म्हणाल की आम्ही वायर्ड नाही, वायरलेस कनेक्शन वापरतो. पण तुमच्या वायफायसाठी किंवा तुमच्या मोबाईलसाठी देखील कुठंतरी वायर्ड कनेक्शन हे वापरले गेलेलं असतंच.. फायबर ऑप्टिकचा उपयोग केवळ इंटरनेटसाठी नाही‌ बरं.. विविध वैद्यकीय उपकरणांमध्ये फायबर ऑप्टिक्सचा वापर वारंवार केला जातो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक परिणाम होत नसल्यामुळे एमआरआय स्कॅनसारख्या विविध चाचण्यांसाठी फायबर ऑप्टिक आदर्श आहे. एक्स-रे इमेजिंग, एंडोस्कोपी, लाइट थेरपी आणि सर्जिकल मायक्रोस्कोपी यासारख्या अनेक तपासण्या आणि शस्त्रक्रिया फायबर ऑप्टिकमुळे सुलभ आणि अचूक झाल्या आहेत. 🦹🏽‍♂️


संशोधनासोबतच त्याचं उपयोजन करण्यामध्ये आवश्यक असलेली कल्पकता कपानी यांच्याकडे होती. सौरघटांची क्षमता वाढवताना, खिडकीवर तसेच भिंतीवर वापरल्या जाऊ शकतील अश्या सौरपटलांची त्यांनी निर्मिती केली, ज्यामुळे सूर्याची उष्णता शोषली जाऊन आतील वातावरण थंड राहते म्हणजेच नवीन विजेची निर्मिती होत‌ असतानाच आतील कार्यालयात पंखे किंवा वातानुकूलनसाठी वीज लागत नव्हती. १९६० साली जेव्हा लेजरचा शोध लागला, तेव्हा त्याचा वापर करून डोळ्यातील फाटलेला रेटिना जोडण्याची शिफारस सर्वप्रथम कपानी यांनी केली होती. कोविडच्या काळामध्ये ऑक्सीजन पातळी तपासण्याचे प्रमाण खूप वाढले, त्यावेळेस आपल्यापैकी अनेकांनी त्याचे यंत्र पहिल्यांदा पाहिल असेल. त्यामध्ये एक लाल लाईट असते, जी आपल्या बोटातील रक्तामधील ऑक्सीजनची पातळी सांगते. त्या यंत्राचं आजचं रूप घडविण्यात कपानी यांचे मोलाचे योगदान आहे.❤️


आपण ऐतिहासिक कालखंड लक्षात घेऊ. १९४५ मध्ये सर्वात आधी आंतरखंडीय दूरध्वनी यंत्रणा सुरू झाली आणि अमेरिका आणि युरोप पहिल्यांदा जोडलं गेलं होतं. त्यानंतर विज्ञानाने फारच झपाट्याने वेग घेतला. किमान शहरात तरी आज इंटरनेट स्पीड ही मानवी गरज झाली आहे. मला आठवतं आहे २००८ साली मी जेव्हा जॉबनिमित्त ब्रॉडबँड लाईनचे मार्केटिंग करत होतो, तेव्हा ५१२ kbps चे वर्णन करताना "तुफान स्पीड" असे करायचो..आणि तेव्हा हा तुफान स्पीड हवा असेल तर महिना १४९९/- + सर्व्हिस टॅक्स द्यावा लागत असे. तेव्हा थोड्या गरीब लोकांसाठी महिना ४९९/- + st. मध्ये ६४ Kbps स्पीड मिळायचा. आज जर कुणाला ६४ kbps साठी ५०० रुपये महिना मागितला तर धरून हानतील 😂😂 आजमितीला इंटरनेटचा जगातील सर्वात जास्त वेग  ३२९ Tbps एवढा  जपानमध्ये नोंदवला गेला आहे. अर्थातच ऑप्टिकल फायबर मधूनच.. हा वेग मी १४ वर्षापूर्वी विकत असलेल्या ५१२ Kbps च्या "तुफान स्पीड"च्या ६७ कोटी पट अधिक आहे राव😂 thanks to latest technology ❤️ 


२००९ मध्ये नोबेल समितीने चार्ल्स काओ या चीनी शास्त्रज्ञाला फायबर ऑप्टिक्स या क्षेत्रातील कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार जाहीर केला आणि भौतिकशास्त्रातील शास्त्रज्ञ मंडळींमध्ये नाराजीचा खूप मोठा सूर उमटला. कारण काओच्या किमान एक दशक आधी कपानिया यांनी फायबर ऑप्टिकचे तत्त्व मांडलं होतं. काओने निश्चितच कपानी यांच्या संशोधनाचा आधार घेऊन त्यामध्ये अधिक सुधारणा केली. मात्र तरीही हा पुरस्कार दोघांना विभागून द्यायला पाहिजे होता असं तज्ज्ञ मंडळींचं म्हणणं पडलं. मात्र विभागून देणं दूरच राहो, कपानी यांचा साधा नामोल्लेख देखील टाळला गेला. मात्र यावर जास्त नाराजी व्यक्त न करता कपानीप्राजी "खलनायक" चित्रपटातील "रोशी महांताच्या" पात्राला शोभेल अशा शांतपणे व्यक्त झाले.. "होता है, चलता है, दुनिया है" 😎

महान शास्त्रज्ञ, उद्योजक आणि लेखक असण्यासोबतच कपानी एक कुशल संघटक होते. त्यांनी शीख साहित्य आणि कलेचा अमेरिकेमध्ये भरपूर प्रसार केला. या कामात त्यांची पत्नी सतींदर कौर यांनी त्यांना मोलाची साथ दिली. १९५४ साली विवाह करून सतींदर कौर नरिंदरप्राजींच्या जीवनात आल्या. संसाराची आघाडी सांभाळत त्यांनी भरपूर सामाजिक काम केलं आहे.या जोडप्याच्या संसार वेलीवर मुलगा राज आणि मुलगी निक्की यांच्या रूपाने दोन फुले उमलली होती. २०१६ साली निधन होईपर्यंत सतींदर कौर सामाजिक जीवनात कार्यरत होत्या. या दोघांनी मिळून १९६७ मध्ये कॅलिफोर्निया इथं शीख फाउंडेशनची स्थापना केली. त्यामध्ये स्वतःचा भरघोस निधी टाकला.

शीख विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, शीख शिकवणीचा प्रचार करणे यासारखे काम आहे फाउंडेशन करत असे. विज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी एक अध्यासनं सुरू करण्यासाठी विद्यापीठाला निधी दिला. याशिवाय शीख पंथाचा अधिक अभ्यास व्हावा म्हणून कॅलिफोर्निया विद्यापीठात कपानी यांनी आपल्या आईच्या नावाने अध्यासन स्थापन केलं. कपानी यांच्या वाढदिवशीच म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी त्यांच्या आईचे निधन झालं. वर्ष होतं  १९८४.. ज्या दिवशी इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. आणि पंजाब मध्ये संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे आईचे अंत्यविधी उरकते घ्यावे लागले, ज्याची कपानी यांना कायम खंत वाटत असे.  इंदिरा गांधीहत्येनंतर जगभर सुरू झालेल्या शीखविरोधी मतप्रवाह सुरू झाला होता, ज्याचा प्रतिवाद करण्यासाठी कपानी यांनी अमेरिकेत वर्तमानपत्र चालू केलं होतं. 

कपानी यांनी ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स या विषयावर त्यांनी जवळपास १०० रिसर्च पेपर्स आणि ४ पुस्तकं लिहिली आहेत, याशिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायंटिफिक सोसायटी मध्ये अनेक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन अमेरिकेतील  MIT संस्थेने त्यांना फायबर ऑप्टिक्सचे जनक असं संबोधलं होतं. अनेक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी कपानी यांचा वेळोवेळी सल्ला घेतल्याचा आढळतो. कपानी यांची जीवनज्योत वयाच्या ९४ व्या वर्षी रेडवूड सिटी, कॅलिफोर्निया येथे ४ डिसेंबर २०२० रोजी मावळली. तत्पूर्वी मार्च २०२० मध्ये त्यांनी आपले आत्मचरित्र पूर्ण केलं होतं. त्यांना भारत सरकारने यावर्षी मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे. कपानी यांनी लावलेला फायबर ऑप्टिकचा शोध विज्ञानाच्या क्षेत्रात विजेच्या शोधाएवढा महत्त्वाचा नक्की असेल. 

इंटरनेटमुळे जग जवळ येऊन त्याचं एकच ग्लोबल गाव झालं आहे. आज कॅलिफोर्नियातील व्यक्ती कोकणातील व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण घेऊ शकते. सिंगापूरमध्ये बसलेली व्यक्ती शिंगणापुरच्या व्यक्तीला अर्थशास्त्र शिकवू शकतो. कोल्हापूरमध्ये बसलेली व्यक्ती क्वाललंपूरमधून कपडे मागून घेऊ शकते. एका अर्थाने देशांच्या सीमा आता पुसट होत चालल्या आहेत. मात्र असे असले तरी याच इंटरनेटचा वापर करून जाती धर्माच्या भिंती मात्र अधिक बळकट केल्या जात आहेत. इंटरनेटवरून केलेल्या अपप्रचाराला मस्तकांच्या झुंडी बळी पडत आहेत,‌ रंगा बिल्ला त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत‌ आहे.. रोज मिळणाऱ्या दीड जीबी चाऱ्याचा वापर खोट्या बातम्या पसरवण्यासाठी होत आहे.

खर तर माहितीचा प्रचंड साठा आज आपल्याला फायबर ऑप्टिकच्या अतिवेगवान तंत्रज्ञानामुळे अगदी चुटकीसरशी उपलब्ध होत आहे. या सुविधेचा अधिक सर्जनशिलतेने वापर केला तर प्रत्येकाला आपल्याला आवडत्या विषयातील सर्वोत्तम माहिती वापरून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवता येईल. आपले सांस्कृतिक भावविश्व अधिक समृध्द करता येईल. पुढच्या पिढीला अधिक चांगला मानव म्हणून घडवता येईल. अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलेले "भारतीय" शास्त्रज्ञ हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आहेत.. त्यात वाढ करता येईल..अजून बऱ्याच काही चांगल्या बाबी शक्य आहेत.. बस गरज आहे स्वतःचा मेंदू वापरणाऱ्या पिढीची आणि तंत्रज्ञान साक्षरतेची.

जय विज्ञान जय तंत्रज्ञान.✊✊✊


#richyabhau 

#kapany


आपला ब्लॉग : https://drnitinhande.in/

Comments

  1. आजवर माहीत नसलेली अप्रतीम माहिती दिलीत भाऊ.... धन्यवाद 🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव