गीतांजली राव : 🧚 द लिटिल जिनियस🧚

 गीतांजली राव : 🧚 द लिटिल जिनियस🧚


आज बालदिनानिमित्त आपण एका बाल वैज्ञानिकेची माहिती घेणार आहोत. तुमच्या आमच्या आसपास असलेल्या लहान मुलांप्रमाणेच तिचा दिवस सुरू असतो. सकाळी उठलं की आवरून शाळेला जाणं, घरी आलं की गृहपाठ आणि शाळेचा अभ्यास करणं, मित्रमैत्रीणींसोबत खेळायला जाणं, थोडसं सोशल मीडियावर चक्कर टाकून येणं. मात्र यासोबत ही १५ वर्षांची गोड मुलगी स्वतः संशोधन करत असते, तसेच तिने सुरू केलेल्या प्रकल्पांतर्गत जगभरातील इतर ३०००० मुलांना मार्गदर्शन करत असते, त्यांच्या कार्यशाळा घेत असते. यासोबत ती शिकत असलेल्या स्टेम या अभ्यासक्रमाची ब्रँड ॲम्बेसिडर देखील आहे. Science, Technology, Engineering, and Mathematics (STEM) या विषयाचा समावेश या अभ्यासक्रमात असतो.


"आम्ही तर लहान मुले आहोत, आम्ही काय बदल घडवू शकतो?" या नेहमीच्या वाक्याऐवजी  "आम्ही तर लहान मुले आहोत, आम्हीच बदल घडवू शकतो" या वाक्यावर विश्वास असणारी ही मुलगी वैज्ञानिक, लेखिका, व्याख्याती, प्रशिक्षक आणि कुशल उद्योजक आहे. ती म्हणते की "जगभरातील आजच्या बालकांमधूनच उद्याचे संशोधक उदयाला येणार आहेत, हे जग तेच सुंदर, समृध्द करणार आहेत. संशोधन करण्यासाठी पीएचडी असणं गरजेचं नाही, हवी फक्त शोधक वृत्ती आणि समस्या समजून घेऊन तिच्या मुळापर्यंत जाण्याची‌ चिकाटी. येणारी नवी पिढी त्यासाठी नक्कीच सक्षम असेल" ही मुलगी आहे भारतीय वंशाची अमेरिकन रहिवासी "गीतांजली राव." टाईम या नियतकालिकानं २०२० मध्ये जिचा गौरव "किड ऑफ द इयर" असा केला आहे. ❤️





मूळचं हैद्राबाद येथील, मात्र आता अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या भारती आणि राम राव या जोडप्याच्या पोटी १९ नोव्हेंबर २००५ साली कॉलेरेडो इथं गीता जन्माला आली. तिच्या चौथ्या वाढदिवसाला तिच्या काकांकडून भेट म्हणून तिला विज्ञानाचं किट भेटलं. "त्यावेळी मला बार्बीहाऊस मिळालं असतं तर कदाचित जास्त आनंद झाला असता, मात्र या भेटीमुळे मला लहानपणापासूनच विज्ञानाची गोडी लागली. त्यासाठी काकांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत." असे गीता म्हणते. भारती आणि राम हे दोघेही गीता आणि तिचा छोटा भाऊ अनिरुद्ध या मुलांशी त्यांच्या वयानुसार समजेल अशी चर्चा रोज खेळाच्या माध्यमातून करायचे. मुलांनी चांगलं उत्तर दिलं की आईसक्रीम बक्षीस ठेवलेलं असायचं. 😋



या चर्चेतून अनेक नव्या बाबी मुलांना समजत. रोगराई, बेघर मुलांची समस्या, जलप्रदूषण, हवाई प्रवासातील धोके, पुलबांधणी, थ्रीडी पेंटिंग.. रोज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा.. रोज नव्या समस्या आणि त्यावर पर्यायी उपाय यांवर चर्चा करणं यामुळे ही मुलं लवकर प्रगल्भ होऊ लागली. शाळेतील स्टेमस्काऊट टीममध्ये असल्याने तिथे देखील अनेक विषय चर्चेला घेतले जायचे, त्यामुळे गीता अनेक विषयात पारंगत होत होती. अभियांत्रिकी विषय असो अथवा सामाजिक समस्या, त्यांचा खूप विचार तिनं केलेला असे. गीतांजली सांगते की, "अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित रेस्टॉरंट कसं असेल या यावर चर्चा करताना डोक्याला सर्वात जास्त खुराक भेटला… अशा अद्ययावत रेस्टॉरंटमध्ये जेवण करायचं माझं स्वप्न आहे." 😍


तिचा लहान भाऊ अनिरुद्ध उर्फ अनु हा अतिशय सृजनशील, अफाट कल्पनाशक्ती‌ असलेला. तो समस्येकडे पाहताना त्यातील सांस्कृतिक बाजू पाहायचा, तर गीता अतिशय चिकित्सक.. ती समस्येतून तांत्रिक चूक शोधून काढायची, त्यावर तंत्रज्ञानावर आधारित उपाय सुचवायची. आपल्या या छोट्या भावाच्या करामतींवर "बेबी ब्रदर वंडर्स" हे गीतांजलीने लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा तिचं वय अवघं दहा वर्ष होतं. टेथीस हा गीतांजलीनं लावलेला हा पहिला शोध. ग्रीक पुराणकथातील जलदेवता टेथीसचं नाव या उपकरणाला तिनं दिलं. भूगोल पक्का असलेल्या व्यक्तींना ठाऊक असेल की पूर्वी आपल्या पृथ्वीवर लॉरेशिया आणि गोंडवाना यांचे विभाजन करणारा एक समुद्र होता, त्याला देखील टेथीस हेच नाव देण्यात आलं आहे. गीतांजलीने बनवलेल्या टेथीस उपकरणाच्या जन्माची कथा.. म्हणजे "गरज ही शोधाची जननी" याचे उत्तम उदाहरण. 👍




गीतांजली दहा वर्षाची असताना मिशिगन राज्यातील फ्लिंट या शहरात उद्भवलेल्या पाण्याच्या प्रश्नाबाबत तिला बातमी कळाली. फ्लिंट शहराला पाणीपुरवठा करणार्या खासगी कंपनीचं देयक थकल्यामुळे तिने पाणीपुरवठा करायचं थांबवलं. मग शहराची तहान भागवणाऱ्या ह्युरन तळ्यातील पाणी सरकारी खर्चाची पाइपलाइन वापरून शहरात आणायचं ठरलं, काम सुरू देखील झालं. मात्र त्याला काही वर्ष लागणार होती. तोवर शहरातील नदीतलं पाणी वापरून पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र या पाण्याचा रंग, गंध आणि चव वेगळी होती. अनेक लोकांच्या तक्रारी आल्या. कालांतराने चाचणी केली असता या पाण्यात शिशाचे प्रमाण नियमापेक्षा खूपच अधिक होतं. ☹️


शिसं जर अधिक प्रमाणात शरीरात गेलं तर हृदय, किडनी तसेच चेतासंस्थेला बाधक असतं. अनेक शारीरिक आणि मानसिक आजार त्यातून उद्भवत असतात. 😔 दूषित जलाचं हे प्रकरण खूप चिघळलं. जनतेच्या आरोग्यासोबत हलगर्जी करण्याप्रकरणी सरकारवर गुन्हे दाखल झाले. यातील बहुतेक खटल्यांमध्ये जनतेच्या बाजूने निकाल लागून सरकारला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागली. पाण्याच्या एक अब्ज रेणुमध्ये शिश्याचे जास्तीत जास्त १० कण असे पिण्यायोग्य पाण्याचे मानक ठरलेले आहे. गीतांजलीने पाण्यातील शिश्याचं प्रमाण शोधून कसे काढता येईल यावर विचार सुरू केला. आपल्यासारखी हजारो लहान लहान मुलं नकळत अशी शिसं असलेलं पाणी पीत असतील या कल्पनेनं तिला कसंसच वाटलं. तिने या समस्येला भिडायचं ठरवलं. ✊



हवेतील शिश्याचे प्रमाण शोधणाऱ्या कार्बन नॅनोट्युबबाबत तिला एमआयटी संस्थेच्या वेबसाईटवर माहिती मिळाली होती. जर हवेतील शिसं शोधून काढता येतं तर पाण्यातील का नाही येणार.. कल्पना डोक्यात आली...👼 मात्र प्रयोग करायला नेहमीच्या घरातील वस्तू उपयोगी पडणार नव्हत्या, तसेच शिसं, क्लोराइड सारख्या विषारी वस्तूंचा देखील वापर करायचा होता. तिनं आईला विचारलं, "मला प्रयोगशाळा लागेल, कुठे मिळेल?" आई म्हणाली, "तुझी तू शोध." एक वर्ष तिने वेगवेगळ्या प्रयोगशाळांना फोन केले, ई मेल पाठवले…  मात्र कुठूनच होकार मिळाला नाही. अखेर शाळेतील शिक्षिकेच्या मदतीनं अनेक अपयशी प्रयत्न केल्यावर  तिला पाण्यातील शिश्याचं प्रमाण मोजण्यात यश आलं. आणि जन्म झाला टेथीस या उपकरणाचा. ❤️


टेथीस.. एक नऊ वोल्टची बॅटरी, शिसं शोधणारी नॅनोट्यूब, ब्ल्यू टूथ जोडणी आणि प्रोसेसर एवढं साधं उपकरण. मात्र याच्या साह्याने पाण्यातील शिश्याची तपासणी अतिशय कमी पैशात शक्य झाली. कार्बन नॅनोट्युबचा वापर करून बनवलेल्या या टेथीस उपकरणात पाण्यातील शिश्याची अभिक्रिया बुडवलेल्या स्ट्रीपवरील कार्बनशी व्हायची आणि त्यातून शिश्याचे प्रमाण आपल्याला तत्काळ आपल्या मोबाईलमध्ये ब्लूटूथद्वारे समजत असे. ॲपमध्ये सर्व माहिती साठवली जायची. २०१७ मध्ये बालशास्त्रज्ञांसाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. डिस्कवरी एज्युकेशन 3M यंग सायंटिस्ट चॅलेंज या स्पर्धेत तिनं बनवलेलं हे उपकरण विजेता ठरलं, तिला २५०००/- डॉलर्सचं भरघोस बक्षीस मिळालं. आता हे उपकरण सर्वसामान्य लोकांना परवडेल एवढ्या किमतीत उपलब्ध करून द्यायचे तिचे प्रयत्न सुरू आहेत. ❤️




फोर्ब्सने जाहीर केलेल्या तिशीच्या आतील ३० शास्त्रज्ञांच्या यादीत तिनं स्थान पटकावलं तेव्हा ती केवळ सातवीमध्ये शिकत होती. अगदी लहानपणापासूनच तिची अभ्यासामध्ये प्रगती होती. २०१२ साली म्हणजे वयाच्या सातव्या वर्षी तिने डेव्हिडसन यंग स्कॉलर होण्याचा बहुमान पटकावला. त्यानंतर कॉलेराडो येथील हायलँड रेंच हायस्कूल मध्ये ती स्टेम अभ्यासक्रम शिकायला रुजू झाली. कॉलेराडो विद्यापीठात तिचं संशोधन सुरू आहे. मागील वर्षी २०२० मध्ये तिचं " यंग इनोव्हेटिव्ह गाइड टू स्टेम" हे दुसरं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. इंटरनॅशनल एव्हिएशन आर्ट कॉन्टेस्टमध्ये देखील तिनं पहिला क्रमांक पटकावला. लवकरच तिला विमान उडवायचा परवाना देखील मिळेल. ती गमतीनं म्हणते की "मला गाडी चालवण्याच्या परवान्याआधी विमान चालवण्याचा परवाना मिळेल." 😂

 

नुकतंच तिनं कृत्रिम प्रज्ञेवर आधारित "काईंडली" नावाचं संकेतस्थळ बनवलं आहे. इंटरनेटवरून विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं, धमक्या देण्याचं प्रमाण वाढलं आहे. इंटरनेटचा वापर करताना आपल्याकडून कळत-नकळत चुकीचे शब्द, म्हणी वापरल्या जातात, जे आपल्याला भविष्यात गोत्यात देखील आणू शकतात.. मात्र आपल्याला इंटरनेटवर काही नवीन शब्द वापरायचा असेल तर आपण तो काईंडलीमध्ये तपासून घेऊ शकतो. त्या शब्दाचा काही आक्षेपार्ह अर्थ निघत असेल तर आपल्याला आधीच समजतं, आपण योग्य वेळी एडिट करू शकतो. सभासदांसाठी ही सेवा सशुल्क आहे. गीतांजली म्हणते, "किशोरवयीन मुलामुलींमध्ये, विशेषत: समाजमाध्यमांचा वापर करताना शिव्या देण्याचं प्रमाण खूप असतं. इथं तुम्हाला एक संधी मिळते, तुम्हाला जे मांडायचं आहे, त्याचा तुम्ही पुनर्विचार करू शकता." सुमारे २० टक्के विद्यार्थ्यांना इंटरनेटवर त्रास दिला जातो, कधी कधी त्याचं पर्यवसान आत्महत्या करण्यात देखील होतं. सायबरबुलिंग वेळीच थांबवलं तर आपण अश्या मोठ्या घटनांना अटकाव करू शकतो.👍


राव कुटुंबाचे फॅमिली फ्रेंड असलेल्या एका कुटुंबाचा कारअपघात झाला, वेदना कमी व्हाव्या म्हणून त्यांना अफूचं सेवन करायचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला. मात्र अपघातग्रस्तांना अफूचं व्यसन लागलं. गीतांजलीने व्यसन आणि त्याचे निदान याकडे आपला मोर्चा वळवला. वयाच्या १३ व्या वर्षी डेनवर विद्यापीठातील पेशिय जीवशास्त्र विभागात संशोधन करताना २०१९ मध्ये गीतांजलीने एक असं ॲप बनवलं आहे की अफूचं व्यसन लागत असल्यास योग्य वेळी ओळखता येतं. अफूच्या व्यसनामुळे व्यक्तीच्या पेशींमध्ये असलेल्या प्रथिनांमध्ये होणारे बदल तिने अभ्यासले. अत्याधुनिक जेनेटिक इंजिनीअरिंगचा वापर करून शरीरात होणाऱ्या या बदलांचा अभ्यास करत व्यसनाधिनतेचे योग्य वेळी निदान करता येते हे तिने शोधून काढले. व्यक्तिला, त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या शरीरातील बदल आणि व्यसनाधीनतेचे प्रमाण मोबाईल ॲपवर समजते, तसेच जवळच्या व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता देखील मिळतो. या शोधासाठी तिने बनवलेल्या ॲपने "टीसीएस इग्नाईट इनोव्हेशन स्टूडेंट पारितोषिक" पटकावलं आहे. ❤️


आजवरच्या अवघ्या १५ वर्षाच्या आयुष्यात तिच्यावर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे.  २०२० मध्ये टाइम्स कडून तिला युवा उद्योजक पुरस्कार देखील मिळाला आहे. २०१८ मध्ये अमेरिका पर्यावरण संरक्षण समिती कडून दिला जाणारा मानाचा पुरस्कार तिला मिळाला आहे. तिला आजवर तीन वेळा TEDx स्पीकर म्हणून बोलण्याचा सन्मान मिळाला आहे. टाइम्सने आयोजित केलेल्या किड ऑफ द यिअर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या ५००० बालकांमध्ये तिने पहिला क्रमांक पटकावला. प्रश्नांना मुळापासून समजून घेण्यासाठी ती समाजातील वेगवेगळ्या घटकात फिरत असते.‌ काईंडली बनवत असताना तिने अनेक विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तिने निर्वासितांच्या छावण्या धुंडाळल्या होत्या. ✊


विज्ञानाच्या, संशोधनाच्या विश्वात रमणारी ही मुलगी कलाक्षेत्रात देखील आपली आवड जोपासते. तिला भारतीय संस्कृती आणि शास्त्रीय नृत्य आणि संगीत यांची विशेष आवड आहे. तिला गायला, पियानो वाजवायला तसेच कथक नृत्य करायला आवडते. गेली दहा वर्षे ती भारतीय शास्त्रीय संगीताचे जाहीर कार्यक्रम देखील सादर करत आली आहे. कोरोनाच्या काळात तिने किचनमध्ये अनेक प्रयोग करून पाहिले आहेत. तेव्हा घरामध्ये कधी अंडी नसायची तर कधी साखर. मात्र अशावेळी इंटरनेटवर शुगरलेस, एगलेस पर्याय शोधून तिने पाव, केक, कुकीज यासारखे पदार्थ तयार केले. कोरोना साथीचा अपवाद वगळता दरवर्षी आपल्या हैदराबादच्या आजोबांना भेटायला ती भारतात येत आली आहे. तिला पोहायची आणि तलवारबाजीची देखील आवड आहे..मात्र तिला सर्वात जास्त आवडतं भावासोबत मस्ती करायला.. (या भावंडांचा रंगपंचमीचा फोटो इंस्टा वरून उचलला आहे)


समाजात आनंद आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी विज्ञानाचा वापर व्हावा असं ती मानते. दर वेळी संशोधनामध्ये मोठं यश येईलच असं नाही, त्यासाठी आग्रही देखील असू नये. मात्र अगदी लहान-सहान शोधांनाही महत्त्व असते, अशा शोधांमधूनच आजवर मानवजातीचं भलं होत आलं आहे. एक एक खडा टाकूनच घडा भरला, आणि कावळा पाणी पिऊ शकला हे आपण विसरता कामा नये असं ती म्हणते. तिची व्याख्याने अतिशय सुंदर असतात आणि तिचे शिकवणं देखील. समोरच्या वयोगटाला समजेल याप्रमाणे बोलायचं तिचं कसब आहे. कधी ती ७ वर्षाची खेळकर मुलगी देखील बनू शकते आणि ७० वर्षाची अनुभवी शास्त्रज्ञ देखील. ❤️


Gen Z या कार्यक्रमांतर्गत ती कार्यशाळा घेऊन जगभरातील मुलांशी संवाद साधत असते. आजवर ३०००० बालकांना तिनं मार्गदर्शन केलं आहे. बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन विज्ञानात वापरता येतील अशा नव्या कल्पना शोधण्याचा हा प्रयत्न आहे. ती म्हणते, "आजवरचा अनुभव असा आहे की मुलांना सुरुवात कशी करावी हे समजत नाही, इथे त्यांना थोडं प्रोत्साहन द्यावं लागतं. मात्र एकदा प्रकल्पाला सुरुवात केली की मुलं त्यांची कल्पना नंतर तडीस नेतात. मुलांनी बनवलेले प्रकल्प अद्भुत असतात. एका मुलाने असा बुट बनवला आहे की काही गंभीर प्रसंगी तो बुट आलेले संकट ओळखून पोलिसांना फोन करेल"🤭


जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ मेरी क्युरी या तिच्या आदर्श आहेत. त्यांच्याबद्दल जे काही साहित्य मिळेल ते ती वाचत असते. ती म्हणते "मला संशोधनासाठी त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळत असते." त्यांच्याकडूनच गीता शिकली की केवळ संशोधन करून भागत नाही तर त्याचं उत्पादन देखील तयार व्हायला लागतं. दोन पावले पुढे जात त्याचं उत्पादन आणि मार्केटिंग देखील आज‌ गीता करत आहे. ती म्हणते, "संशोधन करताना तुमचा निश्चय दृढ असेल तर तुमचं वय, तुमचं लिंग, त्वचेचा रंग, तुमचं जन्मस्थळ, तुमचा देश याबाबी तुम्हाला अडवू शकत नाहीत.. केवळ तुमची स्वप्न मोठी असावीत, आणि ती वास्तवात साकार होण्याजोगी असावीत." 👍



भारतात जेव्हा ती येते तेव्हा तिचे आजोबा पिण्याचे पाणी उकळून घेतात तेव्हा तिला प्रश्न पडतो की सगळ्यांना स्वच्छ पाणी का नाही मिळत..गरीब देशांमध्ये भेडसावणाऱ्या दूषित पाण्याच्या समस्येवर मात कशी करता येईल यावर सध्या तिचं संशोधन सुरू आहे. भविष्यात ती जनुकीय रचना आणि साथीचे आजार यावर पुढील संशोधन करणार आहे. 💐 ती म्हणते "जगात हजारो समस्या आहेत आपण प्रत्येकावर उपाय शोधत बसण्यापेक्षा एका समस्येला मिळून तिच्यावर सखोल संशोधन करून मात करता येईल.  जर मला शक्य आहे तर जगातील कोणत्याही बालकाला हे शक्य आहे. मी काही वंडरगर्ल नाही."  👌 खरं आहे..‌ABCD.. any body can discover. ✊


जगप्रसिद्ध अवेंजर सुपरहिरो मालिका देणाऱ्या मार्वल स्टुडिओने २०१९ मध्ये खऱ्याखुऱ्या आयुष्यातील हिरोंवर कॉमिक्स आणि माहितीपट बनवला होता. जग बदलणाऱ्या वीस बालकांचा त्यामध्ये समावेश होता, त्यात देखील गीतांजलीवर एक भाग केला आहे. डिस्नी हॉटस्टारवर आपण Marvel's hero project असं सर्च केलं तर आपल्याला हा माहितीपट पाहायला मिळेल. नक्की पहा, आणि आपल्या आवडत्या लहानग्यांना देखील पाहायला सांगा..  खूपच प्रेरक आहे.. ❤️ शोधायला सोपं जावं म्हणून लिंक देतो. 

https://www.hotstar.com/1260022768


येत्या १९ ला तिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिला मनापासून सदिच्छा.💐 प्रसिद्ध अभिनेत्री आणि कार्यकर्ती "अँजलिना जोली" हिने तिची मुलाखत घेतली होती आणि तिला सदिच्छा देताना ती म्हटली "तू अजून खूप यशस्वी हो म्हणजे मी सांगू शकेल की होय, मी तिला एकदा भेटले होते!" याच धर्तीवर सदिच्छा देताना मी देखील म्हणेल की "भविष्यात गीतांजली एवढं नाव कमावेल, तेव्हा मी इतरांना सांगेन की होय मी तिच्यावर २०२१ मध्येच लेख लिहिला होता." असं म्हणायची संधी

पुन्हा पुन्हा येवो.  ❤️❤️❤️


नव्या पिढीचा विजय असो✊✊✊

जय विज्ञान जय तंत्रज्ञान ✊✊✊

#richyabhau

#geetanjali_rao


आपला ब्लॉग : https://drnitinhande.in/






Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव