डॉ. शंकर आबाजी भिसे : अफाट, अचाट शास्त्रज्ञ

डॉ. शंकर आबाजी भिसे : अफाट, अचाट शास्त्रज्ञ
एक व्यक्ती.. जी भौतिकशास्त्रात अनेक शोध लावते.. रसायनशास्त्रात नवे फॉर्म्युले शोधून काढते, औषधीविज्ञानात आपली करामत दाखवते, कुशल जादूगाराप्रमाणे दृष्टीभ्रमाचे प्रयोग करते, कुशल उद्योजक आणि उत्कृष्ट व्यवस्थापक.. याशिवाय साहित्यात देखील आपलं योगदान देते. ❤️ त्यांच्या संशोधन कार्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की त्यांना भारताचा एडिसन म्हणण्यात येत. मला मात्र एडिसन ही उपमा त्यांच्या कामापुढे छोटी वाटते. २०० पेक्षा जास्त शोध आणि ४० पेटंट असलेला हा शास्त्रज्ञ.. चक्क आपल्या मराठी मातीत जन्मला आहे. आज बालभारती तिसरीच्या पुस्तकात ज्यांचा धडा आहे … त्यांचे नाव आहे डॉ. शंकर आबाजी भिसे. लहानपणी एका बालकानं एका विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये युरोपीय शास्त्रज्ञांचं भारतीय लोकांविषयी मत वाचलं की "भारतीय लोक केवळ युरोप, अमेरिकेत लागलेल्या शोधांचा फायदा घेऊ शकतात, मात्र नव्याने काही निर्माण करू शकत नाही. भारतीयांची केवळ मशीन पुसायची लायकी आहे" असं विधान वाचलं, त्याचवेळी त्या बालकानं ठरवलं होतं की मी असं मशीन तयार करेल, ज्याची मागणी संपूर्ण जगात असेल आणि युरोप-अमेरिकेतील लोक रोज पुसून स्वच्छ करत त्या मशीनची काळजी घेतील. त्याचं हे मनोरथ त्यानं मोठं झाल्यावर खरंदेखील करून दाखवलं आणि कालांतरानं अमेरिकेतील हुज हु मध्ये सर्वात पहिलं भारतीय नाव नोंदवलं गेलं.. ते नाव होतं "डॉ. शंकर आबाजी भिसे." २९ एप्रिल १८६७ रोजी मुंबई मध्ये शंकरचा जन्म झाला. त्याचे वडील आबाजी भिसे.. ब्रिटिश आमदनीत बढती मिळवत मुंसिफ, शिरस्तेदार आणि त्यानंतर सदरअमीन (त्या काळातील मॅजिस्ट्रेट) या पदावर पोचले होते. "सरकारी नोकरी म्हणजे आयुष्यभर भाकरी" असा समज त्या काळात प्रचलित होता. शंकरच्या घरातदेखील असाच विषय व्हायचा की शंकरने शिक्षण पूर्ण करून मोठा साहेब बनावं. किमान एखादी छोटी मोठी सरकारी नोकरी तरी मिळवावी. मात्र हे बाळ शास्त्रज्ञ होईल याचं स्वप्न त्याच्या घरात काय.. पूर्ण मुंबई इलाख्यात कुणाला पडलं नसेल. 😂 तेव्हा विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी हे विषय आपल्यासाठी नाहीच असा न्यूनगंड भारतीय लोकांनी बाळगला होता. 😔 १८१८ साली कोरेगाव भीमाच्या निर्णायक लढाईमध्ये मराठ्यांचा पाडाव झाला आणि महाराष्ट्रात ब्रिटिश अंमल सुरू झाला.. केवळ राजकीय नाही तर सामाजिक परिवर्तनाची ही सुरुवात होती इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीशी आता या मातीचा संपर्क येणार होता. इंग्रज सरकारला इथं अभियंत्यांची गरज होती, सर्वेयरची गरज होती. १७९४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं मद्रास येथे पहिलं तांत्रिक महाविद्यालय सुरू केलं होतं. मात्र या मद्रास सर्वेयर स्कूलमध्ये केवळ इंग्रज उमेदवारांना प्रशिक्षित करण्यात येत होतं. तेव्हा भारतात फ्रेंच, डच आणि पोर्तुगीज वसाहती देखील होत्या. आपण शिकवायचे आणि त्या लोकांना इतर युरोपियन लोकांनी वापरायचं ही बाब ब्रिटिश व्यापाऱ्यांना मान्य नव्हती. मात्र या खंडप्राय देशाचं कृषी उत्पन्न जास्तीत जास्त वाढविण्यासाठी अधिक सक्षम जलसिंचन व्यवस्था उभारणं गरजेचं होतं. 'जास्त कृषीउत्पन्न तर जास्त व्यापार' असं सोपं गणित. मग नाईलाज म्हणून का होईना अभियांत्रिकी विषयात भारतीय लोकांनादेखील संधी मिळत गेली. अर्थात् भारतीय लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित होताच. हे लोक कमी हुशार आहेत वगैरे.. हा पूर्वग्रह अजून देखील गेला नाही. नुकत्याच आलेल्या डोन्ट लूक अप चित्रपटामध्ये जगाला वाचवण्यासाठी शहीद व्ह्यायला चाललेला अमेरिकन सैनिक जगाला शेवटचा संदेश देताना उगाच भारतीय लोकांना कोपरखळी मारतो, " हत्तीवर बसून धनुष्यबाण चालवणाऱ्या भारतीयांनो.. आमच्याशी बरोबरी करा." 😬 शंकरचा बालपणाचा सुरुवातीचा काळ सुरतमध्ये गेला. सहा वर्षाचा असताना शंकरने एक पुतळा पाहिला.. ज्याच्या मध्यभागी एक घड्याळ बसवलं होतं. त्या पुतळ्याचे डोळे इकडे तिकडे पाहत आहेत असा भास व्हायचा. छोट्या शंकरला प्रश्न पडला.. आणि त्याने त्यामागील गुपिताचा शोध घ्यायचं ठरवलं.. आणि त्याला त्यातील यांत्रिक करामत समजली… घड्याळाच्या दोलकाला डोळे असे जोडले होते की प्रत्येक दोलनानंतर डोळे हालचाल करतील.. छोट्या शंकरला याचं नवल वाटलं आणि त्याला अभियांत्रिकी विषयात रस निर्माण झाला. शंकरचं प्राथमिक शिक्षण धुळ्यामध्ये झालं. पुढे तो १५ वर्षाचा असताना त्याच्या वडिलांची जळगावमध्ये बदली झाली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यानं कोळशापासून गॅस निर्माण करणारं यंत्र शोधून काढलं. १८८८ हे शंकरचं मॅट्रिकचे वर्ष, मात्र त्याला अभ्यासात अजिबात रस नव्हता. त्याला काहीबाही प्रयोग करण्यात रस होता.. पाठांतर अजिबात आवडत नव्हतं. संस्कृतच्या शिक्षकांनी तर शंकरच्या वडिलांना सांगितलं की मी तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही. ☹️ झालं. संस्कृत सोडली, काही दिवस फारसी भाषेशी कुस्ती खेळून पाहिली, मात्र ती देखील फारशी जमली नाही. शेवटी नाईलाज म्हणून इंग्रजी सोबत दुसरी भाषा म्हणून मराठी निवडली, आणि मॅट्रिकची परीक्षा पास करून घेतली. किती गम्मत ना.. ज्या मुलाने नाईलाज म्हणून मराठी घेतली, आज त्याचा धडा मराठी पुस्तकात आहे.🤣 बालभारतीमधील या धड्यात एक किस्सा सांगितला आहे. मला मात्र तो खरा वाटत नाही. खरा असो किंवा खोटा.. प्रेरक मात्र नक्की आहे.. एकदा शंकरला त्याच्या घरच्यांनी साखर आणायला सांगितली. दुकानदाराने साखर दिली.. मात्र त्या वजनाबद्दल शंकरला शंका आली. शंकर म्हणाला, "दुकानदार काका, तुमचा वजनकाटा चुकीचा दिसतोय." दुकानदार म्हणाला, "माझा वजनकाटा बरोबरच आहे, तुला शंका असेल तर तू तुझा वजनकाटा बनव." छोट्या शंकरने हे आव्हान स्वीकारून त्याला सांगितलं, "होय माझा वजन काटा मी बनवेलच." घरी गेल्यावर वडिलांनी ओरडा केला की तूच साखर खाल्ली असशील. झाल्या प्रकाराने शंकरने नव्या पद्धतीचा वजनकाटा तयार करायची पक्की खूणगाठ बांधली.❤️ शाळेत शिकत असताना त्याला सायंटिफिक अमेरिकन हे नियतकालिक वाचायला मिळायचं. त्यामुळं भविष्यात आपणदेखील शास्त्रज्ञ व्हायचं, आणि एडिसनला देखील भेटायचं स्वप्न शंकर पाहत होता. मॅट्रिकनंतर शंकरला पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकायचं होतं, मात्र यासाठी त्याच्या घरच्यांचा प्रचंड विरोध होता. लॉ सोडून तुला काहीपण शिकायचे असेल तर तुला घरातून एक दमडी सुद्धा मिळणार नाही.. 😔 आपण स्वतः कमावून शिकायचं असं २१ वर्षाच्या शंकरने ठरवलं आणि मुंबईमध्ये येऊन अकाउन्टन्ट जनरलच्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून ३० रुपये पगार देणारी नोकरी स्वीकारली. पुढं नऊ वर्ष या रटाळ नोकरीमध्ये काम करत असतानाच त्यांनी त्यांच्या कल्पनेला देखील चालना दिली आणि नवनवीन उद्योग देखील सुरू केले. ✊ १८८९ मधे मुंबई येथे काँग्रेसचं पाचवं अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. सर विल्यम वेडरबर्न हे त्याचे अध्यक्ष असणार होते. अधिवेशनात एका पुतळ्याचे उद्घाटन अभिनव पद्धतीनं करण्यात येणार होतं. आधी तो पुतळा कुणाला दिसणार नाही, पुतळ्यावर हळूहळू प्रकाशझोत टाकून संपूर्ण पुतळा फोकसमध्ये आणायचा.. हे काम एका इटालियन कंपनीला दिलं होतं, मात्र त्यांना हा पुतळा पूर्ण अदृश्य करण्यात यश आलं नाही. भिसे यांनी तो पुतळा पूर्ण गायब करून पुन्हा पूर्ण प्रकाशात आणून दाखवला. पुढील पाच वर्षांत त्यांनी छत्रपती शाहु महाराज, सयाजीराव गायकवाड, राजा रविवर्मा यांसारख्या दिग्गजांसमोर दृष्टीभ्रमाचे अनेक प्रयोग केले. एवढे सफाईदार की त्यांनी केवळ जादूगार म्हणून युरोपला यावं असं अनेक तज्ञ लोकांना वाटत होतं.❤️ १८९३ मध्ये त्यांनी सायंटिफिक क्लबची स्थापन केली तसेच 'विविध कला प्रकाश' या नावाची पत्रिका सुरू केली. दर महिन्याला क्लबची लोकं एकत्र येत, नवनवीन प्रयोग करून दाखवत. पत्रिकेच्या माध्यमातून ही माहिती जगभर जात असे. नवीन संशोधकांना पेटंट घेण्यासाठी आवश्यक बाबी काय आहेत, नवीन औषधाला कोणकोणत्या चाचण्या पास कराव्या लागतील याचं तिथं मार्गदर्शन आणि आवश्यक मदत केली जात असे. या सामाजिक कामामुळे दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता यांसारख्या नेत्यांच्या नजरेत ते भरले. याचा फायदा त्यांना पुढं उद्योग धंदे सुरू करण्यात झाला. भिसे यांनी मुंबई मध्ये काचेचा कारखाना काढला, आग्र्यात चामड्याच्या वस्तूंचा कारखाना काढला. १८९३ मधील शिकागो येथील औद्योगिक प्रदर्शनात भाग घेण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलं.. मात्र त्यांना जाता आलं नाही. १८९५ मध्ये त्यांचा इंग्लंडदौरा पतियाळाच्या महाराजांनी स्पॉन्सर केला. तिथं मॅन्चेस्टरमधल्या फ्री ट्रेड हॉल इथं त्यांचे दृष्टीभ्रमाचे प्रयोग अत्यंत यशस्वी झाले. त्याकाळातील इंग्लंडमधील सर्व आघाडीच्या वृत्तपत्रात त्यांचे नाव चमकले होते. १८९६ मध्ये ते परत आले, मात्र भारतात परत आल्यावर त्यांना जातीकडून वाळीत टाकण्यात आलं. समुद्रउल्लंघनाचा दोष त्यांच्या माथी लावण्यात आला. अर्थात भिसे काही लेचेपेचे खेळाडू नव्हते, त्यांनी कोणतेही प्रायश्चित्त घेतले नाही.✊ कालांतराने भिसे हे खूप मोठं नाव झालं आणि आपल्या जातीत अशी व्यक्ती जन्मली आहे, याचा अभिमान सांगायला हीच वाळीत टाकणारी मंडळी पुढं सरसावली. कारण नंतरच्या काळात त्यांनी संशोधनाचा शब्दशः पाऊस पाडला. पगड्या तयार करण्याचं यंत्र,पिठाच्या चक्क्या, परीटघडी न बिघडवता अंगरख्याची बटणं बसवनारं टिंगी नावाचं यंत्र, बॉडी मसाजर, चटणी वाटायला नव्या प्रकारचा मिक्सर, सौर ऊर्जेवर चालणारी मोटार, समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा, रेल्वेचा सरकरता दरवाजा, ऑटोमॅटिक स्टेशन इंडिकेटर, टॉयलेट फ्लशर, कपडे धुण्यासाठी केमिकल, वातावरणातील विविध वायू वेगळे करणारे यंत्र..असे २०० शोध.. सर्वच शोध अफलातून.. मात्र सगळ्यांची नावं देत बसलो तरी लेख खूप मोठा होईल. आपण केवळ खूप महत्त्वाच्या दोन तीन बाबी पाहू. १८९७ मध्ये ' इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड' या मासिकानं 'स्वयंमापन यंत्र' करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. ऑटोमॅटिक वजन करण्याचं यंत्र..जसं पेट्रोलपंपावर सेट केलं असेल तेवढंच पेट्रोल पडतं, तसं यंत्र.. किराणा माल मोजणारं. या स्पर्धसाठी भिसे यांनी पाठवलेल्या डिजाइनला पहिलं बक्षीस मिळालं.. लहानपणीची प्रतिज्ञा पूर्ण केली म्हणायची. ❤️ यासाठी त्यांना दहा पौंडांचं इनाम आणि लंडनच्या सोसायटी ऑफ सायन्स, लेटर्स अन्ड आर्ट्स या संस्थेकडून मानपत्र, आणि मानद सभासदत्व मिळालं होतं. बालभारती मधील कहानी खरी असेल तर नक्कीच भिसे यांनी हे यंत्र त्या दुकानदाराला दाखवल असणार.👌 प्रिंटिंग क्षेत्रामध्ये भिसोटाईप यंत्र हा सर्वात मोठा शोध मानण्यात येतो. तत्कालीन मोनोटाईप आणि लिनोटाईपच्या बेस्ट मॉडेलपेक्षा पंधरा ते वीस पट अधिक वेगाने, ३००० शब्द प्रति मिनिट, तसंच वेगवेगळे फाँट, चित्र यांचा समावेश शक्य असलेलं हे यंत्र मुद्रणव्यवसायात क्रांती होती. या यंत्राबद्दल रतन टाटा यांना समजलं. ( jrd टाटा यांचे वडील) दादाभाई नवरोजी आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी देखील भिसेंची शिफारस त्यांच्यापाशी केली होती. १९१० मध्ये द टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट ही कंपनी लंडन येथे स्थापन झाली. युरोपात भिसे यांचं यंत्र विकलं गेलं.. युरोपीय कामगारांकडून पुसलं देखील गेलं🤣 संशोधक वृत्ती असेल तर व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा करतो.. आता हेच पहा ना १९१० मध्ये भिसे आजारी पडले. त्यावेळी त्यांना एक औषध देण्यात आले होतं आणि त्यामुळे ते ठीक देखील झाले. आता देवाचे आभार मानायचे सोडून त्यांनी औषधाची चिकित्सा केली. 🤭 त्यावेळी त्यांना कळलं की आयोडीन हा घटक खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी या आयोडीनचा उपयोग करून बेसलीन नावाचं औषध बनवलं. या औषधाचा पहिला महायुद्धामध्ये खूप उपयोग झाला. भिसे यांची आर्थिक बाजू भक्कम झाली. हे बेसलीन बाहेरून लावायचं होतं, पोटात घेण्यासाठी त्याचा उपयोग नव्हता. त्यामुळे यातच पुढं संशोधन करत त्यांनी पोटात घेण्यासारखं ॲटोमिडीन नावाचं औषध बनवलं. रक्तदाब, आतड्याचे आजार, पायारीया, मलेरिया आणि इन्फ्लूएन्झा यासारख्या अनेक रोगांवर गुणकारी असलेलं हे औषध भारतात सर्वत्र स्वस्तात उपलब्ध व्हावं यासाठी भिसे यांनी भारतीय कंपन्यांना देखील त्याचा फॉर्म्युला उपलब्ध करून दिला. १८९६ मधे मुंबईमध्ये प्लेगची साथ थैमान घालत असताना भिसे यांनी स्वयंसेवक म्हणून मोलाची कामगिरी केली. प्लेगची लागण झालेल्या रुग्णांनी वेगळं राहणं अपेक्षित होतं मात्र भीतीपोटी लोक वेगळे राहायला घाबरत होती. अशा लोकांचे भिसे यांनी प्रबोधन तर केलंच, याशिवाय ब्रिटिश सरकारकडून त्यांच्या पुनर्वसनासाठी जागा देखील मिळवून दिली. प्लेगच्या साथीचं निर्मूलन करण्यासाठी सरकारने एक समिती नेमली होती, तिचं प्रमुख म्हणून भिसे यांना नेमण्यात आलं.. त्यांनी या तसंच इतर सामाजिक कामांमध्ये आपल्या पत्नीला देखील सहभागी करून घेतलं. स्त्री विषयक त्यांची पुरोगामी भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडली आहे. भिसे यांनी लिहिलेल्या डिप्लोमॅटिक दुर्गा या नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला आहे, तसेच घरच्यांनी स्थळ बघून देण्याच्या वृत्तीविरोधात त्यांनी आवाज उठवला आहे.. दुर्गा नावाच्या भारतीय मुलीची जॅक या ब्रिटिश पोरासोबत त्यांनी प्रेमकथा रंगवली आहे. एका अर्थाने त्यांनी लव्ह जिहादला पाठिंबा दिला होता म्हणायचा🤣🤣 ते जात धर्म किंवा प्रांत या सर्वापलिकडे गेले होते. त्यांनी वैश्विक मंदिराची कमलाकृती संकल्पना करून त्याचं मॉडेल न्यूयॉर्क म्युजियमकडं सादर केलं होतं. यातील कमळ म्हणजे पृथ्वी आणि कमळाच्या सहा पाकळ्या हिंदू, बौद्ध, कॉन्फ्युशियन, ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम यांचं प्रतिनिधित्व करत होत्या. विश्व मानवतेचं हे सूत्रं नक्कीच जगासाठी अनुकरणीय असेल. त्यांना शिकागो विद्यापीठाची सायको-ॲनॅलिसिस या विषयाची डॉक्टरेट तसेच न्यूयॉर्क विद्यापीठाने त्यांना डी.एस.सी. ही पदवी दिली. म्हणजे मॅट्रिक शिक्षण असलेली ही व्यक्ती डबल डॉक्टरेट झाली. त्यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या दिवशी १०० अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. १९३० मध्ये थॉमस अल्वा एडिसनची भेट झाली आणि लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. जागतिक दर्जाच्या 'हू’ज हू' या संदर्भग्रंथात 'भारताचे एडिसन' असं म्हणून डॉ. शंकर आबाजी भिसे यांना गौरवण्यात आलं आहे. ६८ वर्षाचे सफल आयुष्य जगल्यानंतर ७ एप्रिल १९३५ रोजी हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झालं आणि त्यांची शोधयात्रा थांबली.. संशोधन हे व्रत असतं त्याचप्रमाणे संशोधन ही वृत्ती असते.. डॉ शंकर आबाजी भिसे यांनी हे दाखवून दिलं, त्यांच्या अचाट कल्पनाशक्तीला अभ्यासाची आणि चिकिस्तक वृत्तीची जोड दिली.. त्यामुळे ते एवढे अफाट कार्य करू शकले… असे शेकडो संशोधक नव्या पिढीतून यावेत..भिसे यांनी मनापासून अभिवादन.. जय विज्ञान जय तंत्रज्ञान ✊✊✊ #richyabhau #shankar_bhise आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव