सूर्य आणि सनसनी

सूर्य आणि सनसनी
१४ डिसेंबर २०२१ रोजी नासाकडून एक सनसनी बातमी आली. नासाने सोडलेल्या पार्कर या सोलर प्रोबने सूर्याला स्पर्श केला.‌ आजवर केवळ 'जला के राख कर दूंगा' हा डायलॉग मारणाऱ्या सूर्याला स्पर्श करणं ही अवकाशशास्त्रज्ञांच्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे. इथे एक गोष्ट आधीच स्पष्ट केली पाहिजे, हा नेहमीचा स्पर्श नव्हता. सूर्य हा तर वायूचा गोळा आहे. गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय बल यामुळे त्याच्याभोवती तेजोवलय किंवा दीप्ती (कोरोना) आहे. (ग्रहणकाळामध्ये हे तेजोवलय अधिक चांगल्या पद्धतीने दिसतं.) सूर्याच्या पृष्ठभागापासून ४० लाख मैल दूरपर्यंत पसरलेल्या या वातावरणामध्ये एका मोटारीच्या आकाराच्या पार्कर या प्रोबनं प्रवेश केला, आणि सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास त्याने सुरू केला आहे. आता आपण म्हणू शकतो "सूरज अब दूर नही." सूर्यमालेतील सर्व ग्रहांची माहिती आपण मागे घेतली होती. मात्र चंद्र आणि सूर्य राहून गेले होते. "पुरे झाले चंद्र सूर्य" ओळीचा प्रभाव असेल कदाचित.😂 या उपग्रहाबद्दल आणि या ताऱ्याबद्दल एवढी माहिती उपलब्ध आहे की, त्यातील काही निवडावी हा प्रश्नच. आजवरच्या सर्व संस्कृतीमध्ये सूर्याचं महत्त्व होतं आणि आहे. आपल्या या अन्नदात्याबद्दल सर्व संस्कृतीमध्ये कृतज्ञता व्यक्त केली गेली आहे, त्याला देवाचं प्रतीक समजण्यात आलं आहे. जगातील सर्वच भाषेत या लाडक्या सूर्याला तीनचार नावं तरी आहेत. आपल्या मराठीमध्येच त्याला रवि, दिनकर, प्रभाकर, आदित्य, भास्कर, दिवाकर, भानु, सविता, मार्तण्ड यासारखी कितीतरी नावं आहेत. ४६० कोटी वर्षांपूर्वी जन्माला आलेला आपला सूर्य. या विश्वातील अब्जावधी आकाशगंगापैकी एक असलेली मिल्कीवे ही आपली आकाशगंगा. या मिल्कीवे मधील अब्जावधी ताऱ्यांपैकी एक छोटासा तारा म्हणजे आपला सूर्य. त्यापेक्षा खूप मोठेमोठे तारे आपल्या आकाशगंगेत आहेत. आपला सूर्य छोटा जरी असला तरी त्याच्या पोटामध्ये १३ लाख पृथ्व्या बसू शकतील बरं का.. याचा व्यास पृथ्वीच्या १०९ पृथ्वी पट, साधारण १३ लाख ९२ हजार कि.मी. एवढा आहे. आपल्या सूर्यमालेतील ९९.८६ टक्के वस्तुमान एकट्या सूर्याचं आहे. बाकी मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी आदी सर्व ग्रहांचं एकत्रित वस्तुमान ०.१४ टक्के फक्त. सत्ते पे सत्ता सिनेमामध्ये रवि एक छोटं ताट सर्व भावांना एकत्र खायला देतो, आणि बाकी सर्व जेवण स्वतःला घेतो..अगदी तसं😀 सूर्य हा वायुंचा पेटता गोळा आहे. त्यात हायड्रोजन (७३.५%) आणि हिलीयम (२५%) हे दोन मुख्य घटक आहेत. प्रत्येक सेकंदाला ६० कोटी टन हायड्रोजन वायू जळून त्याचं रुपांतर हिलीयम वायूमध्ये होत असतं. आणि प्रचंड उष्णता निर्माण होत असते. खरतर जळत वगैरे नसतं, दोन हायड्रोजन अणुंचं मिलन होत असतं, मात्र या प्रक्रियेत तयार होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे सूर्य ही आगीची धगधगती भट्टी बनते. सूर्याच्या केंद्रभागी १,६०,०००°C सेल्सिअस आणि त्याच्या पृष्ठभागावर तापमान ६,०००°C असते. मात्र त्याच्या कोरोनाचं तापमान एक ते दहा लाख °C असू शकते. म्हणजे "चायसे ज्यादा किटली गरम" आहे इथं. 😀 म्हणूनच या कोरोनाला स्पर्श करण्याची पार्कर सोलर प्रोबची कामगिरी महत्त्वाची ठरते. पुरातन काळापासून सूर्याचे महत्व भारतात आहेच. तसं आमचा हनुमान सूर्याला गिळायला गेला होता म्हणा.. इंद्र मध्येच आला नायतर आज सूर्यपण नसता राहिला, आणि जीवसृष्टी पण😂 शनिला तसंच कर्णाला सुर्यपुत्र (सन ऑफ सन😂) समजण्यात आलं. कोणार्कचं सूर्यमंदिर प्रसिद्ध आहेच. पुराण आणि महाकाव्यात सूर्याला स्थान दिलं आहे. सूर्य हा सात घोड्यांच्या रथावर बसून अवकाशात फेर्‍या मारत असतो असा आपला समज. गंमत म्हणजे नॉर्स पुराणकथांमध्ये देखील सूर्य हा देव असून या "सोल" देवाला फिरायला रथ आहे. (सोलर शब्द या सोलमुळे आला आहे बरं का) मात्र इथं त्याच्या दावणीला दोनच घोडे दिले आहेत. ग्रीक संस्कृतीमध्ये हेलियस हा सूर्यदेवता.. त्याच्या रथाला जुंपलेल्या घोड्यांना संध्याकाळी सूर्यास्त झाला की पुन्हा रथ वेगाने सूर्योदयाच्या स्थानी पार्क करून रात्री विश्रांती करायची परवानगी आहे😀 इंका संस्कृतीत सूर्यदेवास सर्वांत अधिक मान दिला जाई. चंद्र, तारे, पर्जन्य, वीज, वायू, जमीन यासारख्या बाकीच्या देवांना एकदम दुय्यम स्थान ..एकदम साईडहिरो. इंकाराजा हा स्वतःला सुर्यवंशी समजत असे. चांगलं पीक यावं, चांगली संतती जन्माला यावी, रोगराई दूर व्हावी यासारख्या प्रत्येक गोष्टीसाठी सूर्य प्रसन्न झाला पाहिजे. सुर्याला प्रसन्न करण्यासाठी बळी दिला पाहिजे अशी या संस्कृतीतील मान्यता होती. बाबिलोन संस्कृतीमध्ये स्वतः पापाचा मुलगा असलेला सूर्य "शमाश" हा न्यायदेवता बनला आहे. शमाशने अंधारावर विजय मिळवला आणि समता, न्याय प्रस्थापित केला अशी त्यांची धारणा होती. जगप्रसिद्ध हम्मुरब्बी कोड तयार होण्यामागे शमाशची न्यायसंहिता होती.❤️ शुक्राधारीत अचूक कॅलेंडर बनवणाऱ्या माया संस्कृतीमध्ये शुक्राबरोबर चंद्र आणि सूर्याचादेखील अभ्यास झाला होता. चंद्र आणि सूर्य रात्रभर पृथ्वीखालून फिरत असतात, आणि त्यावेळी दुष्टशक्ती त्यांना त्रास देत असतात असं या संस्कृतीमध्ये मानलं जायचं. जपानी शिंतो संस्कृतीत तर सूर्याचं लिंग बदलून त्याला अमेटरसु देवी करण्यात आलं आहे. या देवीला चंद्र (सुकुयोमी) आणि समुद्र (सुसानु) हे दोन भाऊ. या पोरांचे आईबाप असलेल्या इसानागी आणि इजानामी यांच्यापासून हे विश्व तयार झाले आहे. एकदा अमेटरसु म्हणजे सूर्यदेवी आपल्या भावाला, चंद्राला अन्नदेवतेला भेटायला पाठवते. त्याचं आदरातिथ्य करताना अन्नदेवता त्याला उष्टं अन्न वाढते. चंद्राला राग येऊन तो निघून जातो. बैठक निष्फळ झाल्यानं सूर्यदेवीलादेखील राग येतो. तेव्हापासून ते दोघे आकाशात वेगवेगळे फिरत आहेत.😭 चंद्र आणि सूर्य सूर्यग्रहणाच्या वेळेस आकाशात एकत्र येतात या बाबीला देखील शुभ अशुभ प्रतीकं जगभरातील संस्कृतीत जोडली गेली. खरंतर चंद्र आपल्यापासून केवळ तीन लाख किमी लांब आहे तर सूर्य त्यापेक्षा पाचशे पट.. म्हणजे पंधरा कोटी किमी दूर.. मात्र त्यांच्या कक्षांच्या काल्पनिक छेदनबिंदूला आपल्याकडे राहू-केतू सारख्या राक्षसांची कल्पना चिकटवण्यात आली. खरंतर सूर्य, चंद्र, पृथ्वी हे आकाशात आपआपल्या गतीने फिरत असतात, आणि आपण विनाकारण त्याला शुभ अशुभ शकुन जोडतो. पहा ना, परवा १४ जानेवारीला सूर्याने राशीत प्रवेश केला म्हणून आपण मकरसंक्राती साजरी केली. याच मकरराशीत शनीचा अडीच वर्ष मुक्काम आहे. सूर्य देखील तिथं आल्यामुळे शनी आपल्याला २४ जानेवारी पासून पुढं ३३ दिवस दिसणार नाही. साधी खगोलीय घटना आहे, मात्र याचंही भांडवल करून जोतीषी मंडळी भीतीचा धंदा सुरू करतील. 😔 आपल्याला चंद्राचा डाग ठाऊक असतो, मात्र सूर्यावर देखील डाग आहेत. त्यातील काही डाग तर पृथ्वीएवढे मोठे असतात. चुंबकीय क्षेत्राचा प्रभावाखाली येऊन छोटे डाग एकमेकात सामील होतात आणि मोठा सौर डाग तयार होतो. सूर्यावरील चुंबकीय क्षेत्रातील या अनियमिततेमुळे सौर डाग अधिक मोठा होत जातो आणि सौरवादळ तयार होतं. आता आपल्याला या सौरवादळाचं चक्र देखील ठाऊक झालं आहे. दर ११ वर्षांनी हे वादळ येत असतं. या वादळाची संहारक क्षमता एवढी मोठी आहे, की अशा एखाद्या भीषण वादळामध्ये वाढलेल्या चुंबकीय शक्तीमुळे पृथ्वीवरील सर्व दळणवळण यंत्रणा ठप्प होऊ शकते. मानवी जीवनाला मात्र तसा या वादळाचा धोका नाही. आकाशगंगेमध्ये ताऱ्यांचे स्फोट होत असतात. असाच एकदा एक मोठा तारा अब्जावधी वर्षापूर्वी फुटला, आणि त्यातून आपला सूर्य आणि सूर्यमाला तयार झाली असावी. सूर्यमालेचे पालकत्व सूर्याने स्वीकारलं, आणि सर्व भावांना आपल्याभोवती फिरायला लावलं. पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अन्नदाता म्हणून देखील सूर्य अब्जावधी वर्षापासून भूमिका बजावत आहेच, मात्र आता आपण सौर ऊर्जेच्या माध्यमातून सूर्यापासून ऊर्जादेखील मिळवत आहोत. सूर्यापासून आपल्या पृथ्वीला मिळणारी केवळ ३०% उष्णता वातावरणात शोषली जाते, तर राहिलेली ७० टक्के उष्णता परावर्तीत होत असते. हजारो वर्षापासून सूर्याच्या या उष्णतेचा वापर व्यवहारात कसा करता येईल यावर प्रयोग सुरू आहेत.🔥 १७६७ मध्ये होरास सॉसर या शास्त्रज्ञाने एका लाकडी खोक्यांमध्ये आरशांचा वापर करून उष्णता एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. प्रयोग यशस्वी झाला आणि त्याला त्या पेटीमध्ये अन्न शिजवता आलं. तेव्हापासून सौर ऊर्जेचे हे दालन शास्त्रज्ञांच्या कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय झालं आहे. आज पृथ्वीवरील जीवाश्म इंधनाचे साठे संपत आले आहेत, आपल्याला सौर उर्जेसारख्या अक्षय ऊर्जेचा पर्याय निवडणं अपरिहार्य झालं आहे. भारतात दरवर्षी लागणाऱ्या सुमारे ४ लाख मेगावॉट विजेपैकी ४० हजार मेगावॉट म्हणजे १० टक्के वीज आपण सौर उर्जेमार्फत मिळवत आहोत. दरवर्षी एकूण ऊर्जेतील सौर ऊर्जेचे प्रमाण वाढत आहे, २०२२ या वर्षाखेरीपर्यंत १ लाख मेगावॉट ऊर्जा सौरउर्जेमार्फत मिळवण्याचं भारताचे लक्ष्य आहे. ✊ शून्य प्रदूषण हा या सौर ऊर्जेचा सर्वात महत्त्वाचा फायदा. औष्णिक वीज प्रकल्पांत प्रमाणे इथं धूर तयार होत नाही की जलविद्युत प्रकल्पांप्रमाणे इथं पर्यावरणाची हानी देखील होत नाही. घरगुती पातळीवर अन्न शिजवणे, विद्युत पंप चालवणे, पाणी शुद्ध करणे, सौर घट आदी साधनांमध्ये वीज निर्मिती करणे यासारखी कामे तर सौर ऊर्जा करत असतेच, शिवाय १० मेगावॉटचे लहान लहान प्रकल्प देखील सध्या अनेक ठिकाणी खाजगी कंपन्यांमधून सुरू आहेत. ही ऊर्जा कधी ना संपणारी म्हणजे अक्षय आणि नूतनीकरण होऊ शकणारी आहे, पेट्रोल-डिझेल प्रमाणे या ऊर्जेचा स्त्रोत संपायची शक्यता नाही, किमान पुढील चार अब्ज वर्ष तरी😀 आपला सूर्य आता साधारण अर्ध्या वयाचा झाला आहे. ज्या वेळी त्याच्या पोटातील हायड्रोजनचा साठा संपेल त्यावेळेस त्याचा मृत्यू होईल. अजून किमान चार अब्ज वर्ष तो जिवंत राहील, आणि नंतर मरेल. ताऱ्यांच्या मरणात कृष्णविवराचा जन्म असतो. जेव्हा हायड्रोजनचा साठा संपतो तेव्हा तो तारा आकुंचन पावू लागतो. सुरुवातीला लाखो किमी मोठा असलेला तारा हळूहळू एका शहराएवढा छोटा होतो. हा तारा अजून आकुंचन पावून शेवटी कृष्णविवर तयार होतं. सगळ्याच ताऱ्यांचं कृष्णविवर होत नाही. त्यासाठी मुळातच ताऱ्याचं वस्तुमान खूप जास्त असावं लागतं. आपल्या सूर्याचं रूपांतर कृष्णविवरात होणार नाही, त्याचं केवळ श्वेतबटूमध्ये रुपांतर होणार आहे. आपल्या सूर्यापेक्षा तिप्पटीपेक्षा मोठा असलेलाच तारा कृष्णविवर बनू शकतो. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोचायला ५०० सेकंद, म्हणजे आठ मिनिटे आणि २० सेकंद लागतात. सूर्यप्रकाशामुळे वस्तूची पडणारी लहान मोठी सावली कालमापन करण्यासाठी उपयोगात आणण्याची कल्पना मनुष्याला प्रथम किमान ५५०० वर्षांपूर्वी सुचली असावी. आहाझच्या सन-डायलचा उल्लेख जुन्या करारात असल्याचं दिसून येतं. ईजिप्तमधील प्रख्यात पिरॅमिडमध्येदेखील सनडायल सदृश्य कालमापक यंत्र म्हणून वापरलं आहे. पण सन-डायलच्या साह्याने अचूक कालमापन करण्याचं श्रेय खाल्डियन धर्मगुरू आणि खगोलशास्त्रज्ञ बेरोसूस यांना जातं. ख्रि.पू. तिसऱ्या शतकात त्यानं बनवलेली तबकडी बऱ्यापैकी अचूक कालमापन करत असे. एखाद्या बाऊलप्रमाणे असलेली ही तबकडी अंतराळाची उलट प्रतिकृती होती. आपल्या भारतातदेखील सुर्यतबकडीचा उपयोग केलेल्याचे पुरावे आहेत. साहित्य, लोकभाषा आणि कवितेत सूर्य प्रकर्षाने दिसत असतो. "पाठच्या दळणाला शेजी कशाला हसली, चांद सूर्व्याची ववी माझ्या मनाला ठसली" असं म्हणत दळण दळताना "सकाळी उठूनी गाते सूर्व्या नारायणा, मावळाया जातो देतो मुंगीच्या तोंडी दाणा" अशी ओवी गायली जाते. कोणाचा कोंबडा आरवला नाही तर सूर्य उगवायचा राहत नाही, आज सूर्य काय पश्चिमेला उगवला आहे का? हा सूर्य आणि हा जयद्रथ, जे न देखे रवि, ते देखे कवी यासारख्या अनेक म्हणीमध्येदेखील सूर्य चमकत असतो. सॉक्रेटिसला सूर्य पाहिलेला माणूस असं संबोधण्यात येतं. नामदेव ढसाळ यांचा विद्रोह "मी मारले सूर्याचे रथाचे सात घोडे" म्हणताना व्यक्त होतो. भाऊसाहेब पाटणकर आपल्या शेरामधून सूर्याची खिल्ली उडवू पाहतात. भास्करा येते दया मला तुझी आधीमधी आहेस का तू पाहिली रात्र प्रणयाची कधी?😭 यावर सूर्यदेखील अतिशय कडक उत्तर देतो - आम्हासही ह्या शायराची कीव केऊ लागते ह्याच्या म्हणे प्रणयास ह्याला रात्र यावी लागते!🥳🤣 सूर्याची एक गोष्ट मला आवडत नाही, त्याने त्याच्या जवळच्या बुध आणि शुक्र यांचे उपग्रह खाऊन टाकले आहेत. त्यामुळे बिचाऱ्यांना आता एकदेखील चंद्र नाही. मोठे राजकीय पक्ष छोट्या पक्षांशी युती करून हळूहळू त्यांना संपवतात तसच काहीतरी इथ पण दिसते. राजकारण जाऊद्या चुलीत. तसेही आपल्या राजकारण्यांना विज्ञानाच्या नावाने किती आस्था आहे आपल्याला ठाऊकच.. परत विज्ञानाकडे वळू.. एकेकाळी आपण सूर्याच्या वातावरणात आपली एखादी वस्तू पाठवू अशी कल्पना देखील करू शकत नव्हतो, मात्र तीन वर्षाचा प्रवास करून पार्कर प्रोब तिथं पोचला आहे. अजून चार वर्ष तो तिथं संशोधन करेल.. सात लाख किमी प्रती तास वेगाने सूर्याभोवती फिरेल, त्याच्या तेजोवलयाचा अभ्यास करेल.. आणि त्या तेजातच त्याच जीवन संपून जाईल. चार अब्ज वर्षानंतर सूर्याचे तरी वेगळे काय होणार आहे.. तेजातच जनन मरण.. तेजातच नवीन साज.❤️ जय विज्ञान ✊✊✊ #richyabhau #geetanjali_rao #sunny आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव