ढेकणाचे संगें.. ढेकणाचे बाजे
ढेकणाचे संगें.. ढेकणाचे बाजे
काही वर्षांपूर्वी स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाच्या संगीताला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. जय हो गाण्यासाठी हा पुरस्कार मिळाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण मी सांगतो हे खोटे असणार… परीक्षकांना त्या चित्रपटातील दुसरे एक गाणे जाम आवडले असणार.. रिंग रिंग रींगा.. या गाण्यात ढेकणाने एका ललनेशी केलेले लगट आणि तेव्हा तिने सोडलेले कामुक सुस्कारे याचे वर्णन गुलझार आणि रेहमान जोडीने असे केले आहे की त्यांना ऑस्कर मिळाले त्यात काहीच नवल नाही… मात्र आपण आंबटशौकीन आहोत असे जगासमोर जायला नको म्हणून परीक्षक मंडळींनी जय हो या गाण्याला पुढे केले अशी ढे कूनकून मला लागली आहे. 😎
ढेकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगे वाढला साधू जैसा ॥
भावे तुका हा सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौर्यांशीचा ॥ झुरळ किंवा मच्छर या प्राचीन किटकांपेक्षा अध्यात्मात ढेकूण बऱ्याच अधिक वेळा दर्शन देतो आणि भाव खाऊन जातो. कारण जगातील सर्वात कठीण पदार्थ असलेल्या हिऱ्याला देखील ढेकूण भंग करू शकतात अशी त्यांची महती आहे. असे म्हणतात की हिरा आणि ढेकूण हे एका डब्यात काही दिवस ठेवले तर त्या काळात ढेकूण हिरा हळूहळू पोखरतो आणि एक दिवस हिऱ्याचे तुकडे होतात. अर्थात कोणी हा प्रयोग करून पाहू नका.. ढेकणासोबत कोंडून ठेवायचाच असेल तर सुर्यवंशम सिनेमातल्या हिरा ठाकूरला ठेवा.. हिरा फुटला तर मी तुम्हाला मिठी भात खायला देईल.🤪
ढेकूण.. सायमेक्स हे त्यांच्या प्रवर्गाचे नाव. इंग्रजीत बेड बग हे त्याचे नाव तसे एकदम सुबोध आहे. खटमल हे त्याचे हिंदी नाव त्याच्या खटपटीपणाशी आणि नटखटीपणाशी जवळीक साधते. जो मल्ल तुम्हाला खाटेवर गारद करतो तो खटमल अशी मी त्याची उकल करतो.. चार पाच मिमी लांब आणि एक दीड मिमी आकाराचा हा जीव.. पंखाची सोय असली तरी अद्याप उडू न शकलेला… आज अनेक कीटकनाशकांना तोंड देऊन जगत आहे. साहित्यात त्याचा उल्लेख साधारण २५०० वर्षांपूर्वी ॲरीस्टोफेंस या ग्रीक नाटककाराच्या अनेक नाटकांमध्ये येतो.
इजिप्तमध्ये जीवाश्माच्या स्वरूपात हजारो वर्षांपूर्वीचा ढेकूण सापडला आहे. मानव जेव्हा गुहांमध्ये वटवाघुळ आणि इतर कीटकांसोबत सहजीवन जगत होता तेव्हा ढेकूण हे देखील त्याचे सहचर असावेत. कोरोनाप्रमाणे ढेकूण देखील वटवाघळाकडून मानवाला सप्रेम भेट आला आहे, कारण आधी ढेकूण केवळ वटवाघळांचे रक्तदान स्वीकारत असत. आज बहुतांश ढेकूण हे मानवी रक्तावर आपले पोषण करत असले तरी त्याला इतर जीवांचे देखील रक्त चालते.. अट फक्त एकच... खून गरम होना मंगता…🔥
गुहा सोडून मानव मस्त घर बांधून राहू लागला.. आणि ढेकूण त्याच्यासोबत रीसिव्हींग गेस्ट म्हणून जॉईन झाले. त्यांच्या रहिवासाची आणि त्यांच्या कुबट वासाची मानवाला सवय झाली. युरोप, मध्य पूर्व आणि आशियामध्ये मर्यादित असलेले ढेकूण नंतर जगभर पसरले. युरोपीय देशांनी नव्या नव्या वसाहती केल्या, तेव्हा ढेकणांनी देखील तिथे नव्या वसाहती केल्या. बदलत्या तापमानाचे तसेही त्यांना टेन्शन नव्हते, १६-४५° मध्ये ते सुखाने जगायचे. तापमान त्यापेक्षा कमी झाले की ते मस्त अर्धझोप घ्यायचे.. म्हणजे हायबरनेट व्हायचे. वातावरण अतिशय उष्ण किंवा अतिशय थंड नसेल तसेच मुबलक रक्तदाते उपलब्ध असतील तर एक मादी साधारण २०० अंडी घालते. रोज थोडीथोडी याप्रमाणे अंडी घालण्याचे काम दीड दोन महिने चालते.. ही अंडी लांबट व पांढरी असतात. एक दोन आठवड्यात पिल्ले अंडी फोडून बाहेर येतात. 😎
आपल्या घरात ढेकूण झाले असले तरी ढेकूण नजरेला पडत नाही.. मात्र त्यांनी केलेली घान दिसते. ती त्यांची कात असते. "एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेल मी" गाणे म्हणत एक ढेकूण प्रौढ होईपर्यंत म्हणजे सहा ते आठ आठवड्यात सहा वेळा कात टाकतो. लाकडी सामानाच्या फटीमध्ये, पलंग, खुर्च्या, टेबले, कपाटे, भिंतीमधील भेगा, शाळांतील बाक ही त्यांची आवडती ठिकाणे. अगदी लहान फटीतही दाटीवाटी करत भरपूर ढेकूण गुण्या गोविंदाने राहत असतात. चपट्या आकारामुळे त्यांना ते शक्य होते.. एकदा एखाद्या व्यक्तीचे रक्त ढेकणांनी पिले, तर पुढील तीन महिन्यात त्या ढेकणांकडे त्या व्यक्तीचे डीएनए सापडू शकतात. पोलिस मंडळींनी गुन्ह्याच्या ठिकाणी गाद्या शोधून तिथल्या ढेकणांना देखील ताब्यात घेतले पाहिजे. 🤔
ढेकूण निशाचर असतो हा एक गैरसमज.. त्याला त्याची कामे अंधारात करायला जास्त आवडते हे खरे असले तरी तो काही त्याच्या या तत्वाला कवटाळून बसत नाही. चार पाच दिवसांत एकदा रक्त प्यायला मिळाले की तो खुश. काम करताना देखील त्याला शांतता आवडते. तो या कानाचे त्या कानाला कळू देत नाही. 😎 त्याच्या तोंडामध्ये दोन नळ्या असतात.. खालच्या नळीतून तो रक्तदात्याच्या त्वचेत लाळ सोडतो..आणि तेवढी जागा बधीर होते. मग तो आपली टाकी फुल करून घेतो. त्याने दिलेली भुल ओसरली की मानवाला झालेल्या प्रकारची जाणीव होऊ लागते. चाव्याच्या ठिकाणी खाज किंवा छोटा फोड येतो. मानव चवताळून उठतो आणि आपल्या झोपेच्या शत्रूला शोधू लागतो. मात्र औरंग्याच्या तंबुचे कळस कापून संताजी धनाजी गायब व्हायचे अगदी तसे ढेकूण पसार झालेले असतात. औरंग्याच्या सैन्याला जळी स्थळी काष्ठी पाषाणी संताजी धनाजी दिसायचे, तसे मानवाला ढेकूण शोधण्याचा मानसिक आजार जडतो.
होय.. ढेकूण चावल्याने वाईट स्वप्न पडणं, वेडेपणा, एन्झायटी, ऑबसेसिव्ह बिहेविअर यासारखे मानसिक आजार झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही व्यक्तींमध्ये पीटीएसडी अर्थात पोस्ट ट्रॉमॅटिक डिसॉडरची लक्षणेदेखील दिसली आहेत. मात्र मानसिक आजारावर उपाय म्हणून देखील ढेकूण वापरल्याची उदाहरणे अठराव्या शतकात आढळतात. गेटार्ड याने हिस्टेरिया झालेल्या रुग्णांवर ढेकूणदंश हा उपाय म्हणून प्रयोग केले होते. तसेच अनेक ठिकाणी सर्पदंशावर तसेच बहिरेपणावर इलाज म्हणून देखील ढेकूण वापरले गेले आहेत. 😳 दुसऱ्या महायुद्धाच्या काळात यूरोप आणि अमेरिकेत ढेकणांनी थैमान मांडले होते. मध्ये काही काळ या राष्ट्रांना ढेकणांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात यश आले. मात्र, १९८० नंतरच्या दशकात पुन्हा ढेकणांनी बाजी मारली. मग पुन्हा युद्ध पातळीवर ढेकूण नियंत्रण सुरू झाले. नियम अधिक कडक करण्यात आले. हॉटेलमध्ये ढेकूण सापडला अशी तक्रार आल्यावर न्यायालयाने हॉटेल मालकांना दंडदेखील सुनावला आहे.
पाल, झुरळ आणि ढेकूण यांच्यात एक काहीतरी निवडायला सांगितले तर तुम्ही काय निवडाल.. काहीच नाही??? अरे यार काही तरी एक निवडले पाहिजे बाबा. यांची अन्नसाखळी आहे. झुरळे ढेकूण खात असतात आणि पाली झुरळांची पार्टी करत असतात. त्यामुळे घरात ढेकूण झाले की पालीला तुम्ही लांब ठेवा. घरात भरपूर झुरळे होऊ द्या. ती ढेकूण खाऊन टाकतील..कशी आहे आयडिया.. तसेही झुरळ काही चावत नसते.. आणि तुमच्या खास एकांत क्षणी मध्येच घुसून चोच मारण्याएवढे चावट देखील नसते. 😎 ढेकणांवर झुरळांचा उपाय चांगला आहे ना.. ढेकूण कसे मारावे यावर आजवर खूप खलबत झाली आहेत.. कोल्हटकरांच्या सुदाम्याचे पोहे मध्ये देखील एक उपाय आहे. अफू, बचनाग व कुचला यांची पूड सापाच्या विषात खलून ढेकणांना चमच्याने भरवावी. आता एवढी सामग्री गोळा करण्यापेक्षा झुरळं परडवतील हो.. करा त्यांची पैदास🤪
कधी कधी ओरिजनल पेक्षा विडंबन अधिक जास्त फेमस होते. धीरे से आजा रे खटियन मे खटमल.. हे किशोर कुमार यांनी गायलेले गाणे वीस वर्ष जुन्या धीरे से आजा रे अखियन मे निंदिया.. या अंगाई गीतापेक्षा अधिक गोड वाटते. हिटलर, चार्ली चॅप्लिन सारख्या मिशीला ढेकूण छाप मिशी म्हणतात. काही श्रीमंत लोक वॅगनार गाडीला ढेकूण म्हणतात..माझ्या सारख्या गरिबाला तर नॅनो पण मरचीडीस वाटते बाबा.. मरचीडीस नाव कसे वाटते.. चिरडल्यासारखे.. जसे उद्धव ठाकरे परवाच्या सभेत म्हणाले होते.. गद्दारांना ढेकणासारखे चिरडले पाहिजे..🤪🤪
ढेकणासोबत अनेक समज गैरसमज जोडले गेले आहेत.
१) एखाद्याला स्वप्नामध्ये ढेकूण दिसला तर त्याने समजावे की त्याचा वाईट काळ जवळ आला आहे. २) अविवाहित व्यक्तीच्या खोलीमध्ये ढेकूण आढळला तर त्याच्या विवाहामध्ये बाधा निर्माण होतात. ३) वृद्ध व्यक्तीच्या खोलीमध्ये ढेकूण आढळला तर समजायचे की त्याचे आजारपण जवळ आलेले आहे. ४) विवाहित जोडप्याच्या खोलीमध्ये जर ढेकूण आढळले तर याचा अर्थ त्या दोघांमध्ये विसंवाद आहे. 🤣 अर्थात यातील पहिले तीन मुद्दे अतिशय मोघम आहेत. वाईट काळ तर व्यक्तीच्या आयुष्यात कायमच पुजलेला असतो, मग ती व्यक्ती अगदी अदानी का असेना..🤪 त्याच पध्दतीने अविवाहिताचे लग्न न जुळणे किंवा वृद्धांनी आजारी पडणे यात नवल ते काय! चौथा मुद्दा मात्र अगदीच कुचकामी आहे. मी तर म्हणेल की विवाहित जोडपे एकमेकात एवढे रममाण झाले असेल, त्यामुळे घरात झालेली ढेकणे त्यांना दिसत नाहीत. कितीही ढेकूण चावले तरी त्यांचा रोमान्स संपत नसेल..
रोमान्सवरून आठवले.. ढेकणांच्या आयुष्यात अजिबात रोमान्स नाही, त्यामुळे मानवाला चावताना ते स्थळ, काळ, वेळ, भावना, परिस्थिती यापैकी कशाचा विचार करत नाहीत. ढेकणांमध्ये पुनरुत्पादन खूपच हिंसक पद्धतीने होते. मादीला योनीमार्ग नसतो.. नर त्याचे जननेंद्रिय मादीच्या पोटात कुठेपण खुपसतो आणि आतील पोकळीत शुक्राणू सोडतो, जे शोध घेत घेत बीजांडापाशी पोचतात आणि फलन होते. या प्रक्रियेत रोमान्स नाही तर हल्ला असतो. नराचे जननेंद्रिय इंजेक्शनप्रमाणे टोकदार असते. नराला मोठे पोट असलेल्या मादीचे आकर्षण असते. मात्र कधी कधी मोठे पोट असलेले इतर नरदेखील या हल्ल्यात शिकार बनतात, आणि शुक्राणूंचा प्रसाद त्यांनादेखील मिळतो.😳
तुमच्या शरीराची ऊब आणि सोडत असलेला श्वास यावर शोध घेत ढेकूण आपले सावज शोधतात. मानवाचे घोरणे हा तर जणू ढेकणांसाठी गजर असावा.., भोंगा वाजला की राशन दुकान सुरू. मम्म्या ढेकूण त्यांच्या पिल्लांना घेऊन लगेच रक्तप्राशन करायला आणि उपवास सोडायला सजग होतात. उपोषणावरून माझ्या डोक्यात एक कीडा आला.. उत्तर द्या.. 🤔 अण्णा हजारे आणि ढेकूण यांच्यात उपोषणाची स्पर्धा लागली तर कोण जिंकेल??? अर्थातच ढेकूणच..एकदा रक्त पिऊन फुगला आणि उपोषणाला बसला तर तो सहा महिने ते एक वर्ष इतका काळ अन्नाविना राहू शकेल. अण्णा मात्र अन्नाविना एवढा काळ काढू शकणार नाहीत.
जेवायची रोज सोय असली तरी ढेकूण चार पाच दिवसातून एकदाच आहार घेतो. यात त्याचा मोठेपणा नाही, त्याची पचनशक्ती मंद असल्याने त्याला पोटाला तेवढा आराम सक्तीने द्यावा लागतो. मात्र हे खरे आहे की स्वतःला गरज असेल तेव्हाच तो रक्त पितो.. कुणी त्याला भरीस घालू शकत नाही.
२०११ साली रामलीला मैदानावर नवे स्वातंत्र्ययुद्ध सुरू आहे असे ज्यांना तेव्हा वाटले होते, अशा लोकांसाठी संत तुकाराम सांगून गेले आहेत.. ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना। मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥ 🤭
ढेकणांनी भरलेल्या बाजेवर ना अच्छे दिन आ सकते है .ना अच्छी राते.. रक्तपिपासू मंडळी तुम्हाला सुखाचे दिवस पाहू देणार नाहीत. आपण २०११ साली कदाचित फसला असाल, मात्र आशा आहे की नंतर तरी शहाणे झाले असाल. अजूनही आपल्यापैकी कोणी या ढेकणांनी भरलेल्या बाजेवर सुखाची कल्पना करत असला तर .. तर .. तर काय.. रिंग रिंग रींगा गाणे म्हणायचे आणि सुस्कारे सोडायचे.. आम्ही तेव्हा म्हणत असू.. हर हर ढेकूण.. घर घर ढेकूण!!😎
#richyabhau
Comments
Post a Comment