निकोलाय वाविलोव्ह

निकोलाय वाविलोव्ह आणि त्याचे विज्ञाननिष्ठ सहकारी
जेव्हा सत्तेवर मूर्ख व्यक्ती बसलेला असतो, त्यावेळी शास्त्राचे, विज्ञानाचे संदर्भ बदलले जातात.. आणि त्या नेत्याला सोईस्कर बोलणारे चमचे "तज्ज्ञ" म्हणून गणले जातात, सत्यापेक्षा सत्तेला प्रिय असलेली मांडणी केली जाते. सत्तेला अप्रिय ठरेल अशी शास्त्रीय परखड मांडणी करणारे लोक खड्यासारखे बाजूला केले जातात, प्रसंगी त्यांचा जीव घेतला जातो. मात्र विज्ञानासाठी जीवाची बाजी लावणारे अनेक वीर मानवी इतिहासात होऊन गेले, म्हणून तर आजवरचे विज्ञान विकसित होऊ शकले. ज्याप्रमाणे गॅलिलिओ, ब्रुनो यांनी विज्ञानाची कास न सोडता तत्वासाठी मरण पत्करले, त्याच पंक्तीत निकोलाय वाविलोव्ह तसेच त्याच्या सहकाऱ्यांचं नाव देखील घ्यावे लागेल. ✊ मानवाच्या इतिहासात दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्तींना अनेकवेळा सामोरं जावं लागलं.. मात्र अश्या आपत्तींना तोंड देतच कणखर व्यक्तिमत्वाची घडण होत असते. २७ तारखेला आपल्याला सोडून गेलेले सर्वांचे लाडके लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अनिल अवचट यांची जडणघडण सत्तरीच्या दशकातील बिहारमधील दुष्काळ निवारण करतानाच झाली होती. निकोलाय वाविलोव्ह यांनी लहानपणी रशियमधील दुष्काळ अनुभवला.. आणि त्यांनी जिद्दीनं ठरवलं की या जगातील उपासमारी संपवली पाहिजे. त्यांनी या उपासमारीविरुध्द संशोधन करताना पाच खंडं पालथी घातली, लक्षावधी वाणं अभ्यासासाठी जमा केली.. मात्र सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेता ना आल्यानं त्यांना कैदेत उपासमारीमध्ये आयुष्य संपवावं लागलं.. निकोलाय वाविलोव्ह आणि त्याचे विज्ञाननिष्ठ सहकारी.. तत्वासाठी ज्यांनी मरण पत्करलं.😔 २५ नोव्हेंबर १८८७ रोजी मॉस्कोमधील इव्हानविच वाविलोव्ह या कापड व्यापाऱ्याच्या घरात निकोलायचा जन्म झाला. मात्र त्याचं बालपण जवळच्या खेडेगावात गेलं, जिथं दुष्काळात प्रत्येक माणसाला रेशनवर मोजून अन्न मिळत असे, ज्यात कदाचित चिमणीचं पोट भरू शकेल.😔 १८९१ मध्ये रशियात प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. दोन वर्ष सलग कडाक्याची थंडी.. उन्हाळ्यात भर दिवसा देखील तापमान शून्य अंशाखाली.. त्यामुळं धान्य उगवायची शक्यताच नाही.. अन्नटंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. पाच लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले होते. देशात अन्न टंचाई असताना श्रीमंत रशियन व्यापारी धान्यसाठा निर्यात करत होते, झारने त्यांच्यावर कोणताच लगाम घातला नाही पुढं झारशाहीच्या पतनामध्ये हे महत्त्वाचं कारण आहे. ✊ श्रीमंत घरात जन्माला येऊन देखील निकोलायनं दुष्काळ अनुभवला. इव्हानविचच्या घरात जन्माला आलेल्या सात पोरांपैकी, आणि जगलेल्या तीन पोरांपैकी निलोकाय सर्वात मोठा. त्याच्या पाठचा भाऊ सर्जी यानं भौतिकशास्त्रात मोठी कामगिरी केली. या दोघांच्या धाकट्या बहिणीनं पुढं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. 👍खरंतर निकोलायला देखील डॉक्टर व्हायचं होतं, आवड असल्यामुळे त्यानं लहानपणीच घराजवळ औषधी वनस्पती वाढवल्या होत्या. मात्र वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या लॅटिन भाषेचा समावेश निकोलाय शिकला, त्या प्राथमिक शाळेत नव्हता. त्यामुळं वैद्यकीय शिक्षणाची दारं त्याच्यासाठी बंद झाली होती. 😭 त्यानं १९०६ मध्ये मॉस्को कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. खिशामध्ये पाल घेऊन येणारा 😬 हा विक्षिप्त विद्यार्थी संशोधनात मात्र प्रचंड रस घेत असे. त्याची पाळीव पाल बिचारी बोर होऊन जायची, चुळबुळ करायची, मात्र निकोलाय संशोधनात गर्क. गोगलगायीमुळे पिकावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत त्यानं केलेल्या संशोधनाला आणि प्रबंधाला गोल्डमेडल मिळालं होतं. ❤️ १९१० मध्ये झाडांची वाढ आणि सूक्ष्मजंतुशास्त्र या विषयात त्यानं पदवी मिळवली. दिमित्री प्र्यानिशनिकव या मातीशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली निकोलायनं पुढील अभ्यास सुरू केला. बुरशी आणि वनस्पतींना होणारे इतर रोग हा त्याचा अभासाचा विषय होता. प्र्यानिशनिकव यांनी स्थापन केलेल्या महिला कृषी महाविद्यालयात काही काळ अध्यापन देखील केलं. या काळात निकोलायचा मुख्य रोख अश्या बियाणांचं वाण शोधण्यात होता, जे बुरशी आणि इतर रोगांना चांगला प्रतिकार करू शकतील. या संदर्भात गुणसूत्रशास्त्राचा अभ्यास करायला तो युरोपमध्ये गेला. तिथं त्याने डार्विनच्या लायब्ररीत बसून अभ्यास केला..डार्विनला मनोमन गुरू मानू लागला. मात्र हेच शिष्यत्व त्याला पुढं त्याला मृत्यूच्या दाढेत घेऊन गेलं😔 आणि मृत्यूच्या दाढेत देखील त्याने घेतलेला विज्ञानाचा वसा सोडला नाही, म्हणून तर आज रिच्या त्याच्यावर पोस्ट लिहीत आहे❤️ युरोपमध्ये निकोलायचा दौरा खूपच अभ्यासपूर्ण झाला. फ्रान्समधील विलमोरीन संस्थेत त्याने अभ्यास केला, जर्मनीमध्ये अर्नेस्ट हॅकेल या उत्क्रांतीवादी शास्त्रज्ञाशी त्याला चर्चा करता आली. इंग्लंडमध्ये रेगीनाल्ड पूनेट यांची व्याख्यानं ऐकली. केंब्रिज विद्यापीठातील हॅरी बाइफन आणि जॉन इनेस संस्थेतील विल्यम बेटसन अशा दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली त्याला संशोधन करता आलं. मात्र पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि त्याला रशियात परतावं लागलं. रशियात आल्यावर त्याने आपली मास्टर पदवी मिळवली. १९१७ मध्ये जेव्हा रशियात क्रांती होत होती, तेव्हा निकोलायच्या आयुष्यात देखील क्रांती घडली. येकॅटरीना नावाच्या युवतीसोबत त्याचं लग्न उरकून टाकलं. परंतु हनिमूनला गेल्यावर देखील या बाबाचं लक्ष संशोधनात अडकलं होतं😂 नव्या रशियात १९१७ मध्ये निकोलायला प्राध्यापकी करायची संधी मिळाली. मात्र त्याआधी त्याच्या ज्ञानाचा फायदा त्यानं रशियन सैन्याला मिळवून दिला होता. लहान भाऊ सैन्यात गेला होता, मात्र निकोलायची दृष्टी उत्तम नसल्यानं त्याला सैन्यात प्रवेश मिळाला नाही. जेव्हा अनेक रशियन सैनिक डोळ्यांच्या आजाराचे बळी पडू लागले तेव्हा निकोलायची सैन्याला मदत झाली. रशियन सैन्याला पुरवण्यात येणाऱ्या ब्रेडमधून ही विषबाधा होत होती. हा ब्रेड तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या धान्यावर रोग पडला होता. त्यावर संशोधन करत असताना निकोलाय वाविलोव्हची हुशारी प्रसिद्धीत आली. वाविलोव्हनं गव्हावर संशोधन करण्यासाठी इराण, अफगाणिस्तान आणि तेव्हाचा ब्रिटिश भारत या भागात बीजसंकलन केलं. बीजासंदर्भात वाविलोव्हची एक वैशिठ्यपुर्ण मांडणी होती. "आपण जर मुळबीजं शोधली तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकू शकणारी ही बीज वापरून उपासमारीवर आपल्याला मात करता येईल." या भूतलावर शेती सर्वप्रथम सुरू झाली असेल, अशी पाच ठिकाणं त्यानं निवडली. नैऋत्य आशिया, आग्नेय आशिया, भुमध्य सागराचे किनारी प्रदेश, दक्षिण अमेरिका आणि मेक्सिको. त्याने या ठिकाणची बीजं अभ्यासून जी निरीक्षणं नोंदवली आहेत, त्याचा आजच्या संशोधकांना देखील फायदा होतो.💐 संशोधनासाठी त्यानं भरपूर भ्रमंती केली. आजवर आपण हेच वाचत आलो असेल की, शेतीची सुरुवात मैदानी प्रदेशात झाली. मात्र वाविलोव्ह म्हणायचा "सुरक्षेचं कारण पाहता शेती ही डोंगराळ प्रदेशात सुरू झाली असेल."😇 उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आशिया, युरोप आणि आफ्रिका या पाच खंडातून फिरताना त्यानं २,५०,००० पेक्षा जास्त बीजांचे नमुने गोळा केले. त्यावर त्यानं छानसं पुस्तक देखील लिहिलं आहे. अतिशय दुर्गम भागात त्याने भ्रमंती केली. त्यावेळी ना नकाशा सोबत होता, ना संवादाची इतर साधने, तरीदेखील ६४ देशामध्ये तो वणवण फिरला, तिथल्या वातावरण, अधिवास, खानपानाशी जुळवून घेतलं. जिथं जाईल तिथल्या शेतकऱ्यांसोबत स्थानिक भाषेत तो बोलत असे हेदेखील विशेष. ❤️ वाविलोव्हच्या संशोधनाला राष्ट्रप्रमुख लेनिनचा पूर्ण पाठिंबा होता. १९२३ मध्ये वाविलोव्हला सोव्हिएत विज्ञान अकादमीचं सदस्यत्व देण्यात आलं. तोवर तो पेट्रोगार्ड वनस्पतीशास्त्र संस्थेच्या प्रमुखपदी पोचला होतो. (याच संस्थेचे नाव नंतर वाविलोव्हच्या नावावर ठेवलं गेलं.) १९२४ ते १९३५ या काळात त्यानं लेनिन कृषी अकादमी संस्थेचा प्रमुख म्हणून देखील जबाबदारी पार पाडली. १९२६ मध्ये त्याची पहिल्या पत्नीपासून फारकत झाली. त्याच्या आयुष्यात त्याची माजी विद्यार्थिनी येलेना आली होती. या दोन्ही बायकांपासून त्याला एक एक मुलगा झाला. मोठा मुलगा ओलेग आणि छोटा मुलगा युरी हे दोघंही पुढं भौतिकशास्त्रज्ञ बनले. वाविलोव्हनं गोळा केलेल्या बीजांचं प्रदर्शन १९२७ मध्ये भरवलं. "एकाच पिकामध्ये स्थळानुरुप कसा हळूहळू बदल होत जातो, मात्र त्यांची मूळ जनुकं सारखीच असल्याने त्यांचा संवर्ग एकच राहतो" अशी त्यानं मांडणी केली. पुढील काही वर्षात त्यानं जगभरातील शास्त्रज्ञांना वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून रशियामध्ये निमंत्रित केलं आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला करून दिला. गुणसूत्रशास्त्राची सातवी परिषद रशियामध्ये व्हावी यासाठी त्याने प्रयत्न केले. रशियाच्या पॉलिट ब्यूरोने १९३७ साली ही परिषद आयोजित करायचं मान्य केलं. मात्र नंतर ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. एवढंच नाही, जेव्हा ती परिषद १९३९ मध्ये एडीनबर्ग इथं संपन्न झाली, तेव्हा या परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी वाविलोव्हला मज्जाव केला गेला. का??? कारण मधल्या काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलं होतं. 😔 १९२४ मध्ये व्लादिमीर लेनिनचा मृत्यू झाला होता, आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवत, विरोधक बाजूला सारत जोसेफ स्टॅलिन सत्तेवर आला होता. १९२७ मध्ये दुष्काळ पडला आणि आधीच्या वर्षीपेक्षा धान्य उत्पादन ४१ टक्के कमी झालं. रशियाच्या लोकसंख्येला पुरेसा अन्नपुरवठा करणं गरजेचं होतं. झारचं झालं तशी स्वतची गत होऊ नये हे स्टॅलिनसमोर सर्वात मोठं आव्हान होतं. साम्यवादाचा पडदा वापरून जमीनदार वर्गाकडे धान्यसाठा होता, तो जप्त करण्यात आला.. जमीनदारांची जमीन देखील जप्त करण्यात आली. अठरा लाख कुटुंब यातून बाधित झाली, सरकारला विरोध करेल त्याच्या नशिबी छळछावणी होतीच.. तिथं मरण्यापेक्षा लोकांनी घरात मरणं पसंद केलं. सुमारे सहा लाख लोक या चार वर्षात मृत्यमुखी पडले. 😔 स्टॅलिनवरील या बिकट परिस्थितीमध्ये ट्रोफिम लायसेंको हा एक छद्मविज्ञानी धावून आला. १९२७ मध्ये लायसेंकोने दावा करायला सुरुवात केली की वाढत्या अन्नटंचाईवर त्याच्याकडे उपाय आहे आणि अगदी खडकाळ, बर्फाळ प्रदेशात देखील उगवू शकतील असं बियाणं तो तयार करू शकतो. "वर्नलायझेशन" करून तयार केलेली बीजं कडक हिवाळ्यात देखील उगवू शकतात. त्याच्या या दाव्याला वर्तमानपत्रं तसंच शासनाकडून भरपूर प्रसिद्धी मिळत गेली. खरं तर लायसेंकोचं शास्त्राच कोणतही औपचारिक शिक्षण झालं नव्हतं आणि त्याला गुणसूत्र विषयातील अद्ययावत माहिती देखील नव्हती. तो कोणतीही वैज्ञानिक प्रक्रिया राबवत नव्हता किंबहुना आपल्याला हवे तसे निष्कर्ष येण्यासाठी तो प्रयोगातील नोंदी देखील बदलत होता. लायसेंको करत असलेले दावे उत्क्रांतीच्या नियमाविरुद्ध होते. मात्र आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी लायसेंकोने उत्क्रांतीवाद्यांना खोटं ठरवून उत्क्रांतीविरोधी मत मांडणाऱ्या लामार्कवादाचा आधार घेतला. लामार्कवाद आणि लायसेंको दोघे स्टॅलिनसाठी सोयीचे होते, कारण लायसेंको झटपट यश देण्याचं बोलत होता, वाविलोव्हचं संशोधन मात्र दशकांचा कालावधी मागत होतं. लायसेंकोला वाढती प्रसिध्दी मिळत असताना वाविलोव्ह मात्र स्वतच्या संशोधनात मग्न राहिला. अशा छद्मविज्ञानाला वेळीच उघडं पाडलं नाही तर ते लोकांना पटू लागतं. वाविलोव्ह गाफील राहिला, सुरुवातीच्या काळात त्यानंदेखील लायसेंकोचं आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक केलं होतं.😬 मात्र जेव्हा वाविलोव्हनं नियंत्रित परिस्थितीमध्ये या दाव्यांची चाचणी करायची मागणी केली, त्यावेळेस लायसेंकोनं त्याचा खरा रंग दाखवला. वाविलोव्ह म्हणत होता तुझे दावे आपण तपासू, तेव्हा त्यात वैज्ञानिक निकषांवर खरं ठरण्यात काही त्रुटी असतील तर मी तुला मार्गदर्शन करतो. मात्र लायसेंको चाचणीसाठी तयार झालाच नाही. कारण त्याला मनातून माहीत होतं की "आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार." सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनीवर वर्नलायझेशनचे प्रयोग सुरू झाले. प्रसारयंत्रणा दिमतीला होतीच, त्यामुळे त्या प्रयोगाचं कौतुक देखील होऊ लागलं. वाविलोव्हला शांत बसवण्यासाठी त्याला देशद्रोही ठरवण्यात आल, त्याच्या श्रीमंतीवर आणि परदेशी संपर्क असण्यावर बोट ठेऊन त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. 😡 १९३७ मध्ये रशियात मेंडेल-डार्विनवाद्यांची धरपकड सुरू झाली, वाविलोव्हने परदेशातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु स्टॅलिन कुणालाही जुमानत नव्हता. वाविलोव्हचे अनेक सहकारी पकडले गेले, काहीतर मारलेदेखील गेले. १९३८ मध्ये वाविलोव्हची लेनिन अकादमीच्या प्रमुख पदावरून गच्छंती करण्यात आली आणि त्याच्या जागी लायसेंकोला बसवण्यात आले. लायसेंकोने स्वतःच्या दाव्यांना "मार्क्सवादी विज्ञान" असं नाव देऊन वाविलोव्ह गटाला पाश्चात्य विज्ञानवादी ठरवलं. अनेक वर्ष संशोधन करून देखील रशियाच्या अन्नटंचाईवर मात करता आली नाही, याचा अर्थ वाविलोव्ह हा परदेशी हेर असून रशियाशी गद्दारी करत आहे अश्या बातम्या पेरल्या गेल्या. खापर फोडायला व्यक्ती सापडली. 😡 अध्यक्ष असलेल्या वाविलोव्हविना १९३९ ची एडीनबर्ग परिषद पार पडली. वाविलोव्हच्या सन्मानार्थ स्टेजवरील अध्यक्षाची खुर्ची रिकामी ठेवली होती. लवकरच दुसरं महायुद्ध सुरू झालं. १९४० मध्ये वाविलोव्ह बीजसाठा रशियात आणण्यासाठी युक्रेनला जाऊ पाहत होता, तेव्हा त्याला कैद करण्यात आलं, तुरुंगात टाकण्यात आलं. त्याने गुन्ह्याची कबूली द्यावी म्हणून त्याचा छळ करण्यात आला. तब्बल ४०० वेळा जवळजवळ १७०० तास त्याची चौकशी करण्यात आली. कधी कधी तर सलग दहाबारा तास ही सुनावणी चालायची.. ज्यात वाविलोव्ह उपाशीपोटी तीच उत्तरं पुन्हापुन्हा देत असायचा. अखेर त्याचा संयम सुटला.. आणि त्यानं न केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.😔 त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि त्याला मृत्युदंड सुनावण्यात आला. त्याचे वृद्ध गुरू प्र्यानिशनिकव यांनी आपले राजकीय वजन खर्ची घातले. त्यामुळं नंतर त्याची शिक्षा २० वर्ष कैद एवढी करण्यात आली. तसंही वाविलोव्हला तीळतीळ मारण्यात सरकारला मजा वाटणार असावी. २६ जानेवारी १९४३ रोजी त्याचा कारागृहातील रूग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूचं कारण जरी हृदयरोग असं लिहिलं असलं तरी तुरुंगातील प्रतिकूल परिस्थितीनं, उपासमारीनं त्याचा जीव घेतला होता. 😔 त्याच्यानंतर त्याच्या संशोधनाचे पुढं काय झालं, त्याच्या बीजसाठ्याचे काय झालं?? वाविलोव्हने जगभरातून गोळा केलेल्या लक्षावधी बीजांची हिटलरला माहिती होती. तो बीजसाठा ताब्यात घेण्याच्या सूचना सैन्याला दिल्या होत्या. युक्रेन आणि क्रिमिया मधील बीजसाठा हिटलरच्या हाती लागला.. तो जर्मनीमध्ये पुढील संशोधनासाठी पाठवण्यात आला. स्टॅलिनला मात्र त्या बीजसाठ्याचं काहीच कौतुक नव्हतं. त्याने वाविलोव्हच्या सहकाऱ्यांना लेनिनग्राडमधील प्रयोगशाळेची इमारत मोकळी करून द्यायला सांगितली. मात्र या टीमला त्या बीजसाठ्याचं महत्त्व माहित होतं. त्यांनी सर्व साठा तळघरात हलवून पाळीपाळीने पहारा देत जतन केला. लेनिनग्राडचा लढा तब्बल २८ महिने चालला. या काळात त्या टीममधले नऊ जण उपासमारीने मेले, मात्र त्यांनी समोर असलेल्या कित्येक टन धान्याला हात लावला नाही.. त्यांनी दाखवलेल्या या असीम मनोधैर्याला तोड नाही. 🙏🏾 मृत्यूनंतर अनेक वर्ष वाविलोव्हबद्दल फारसं बोललं गेलं नाही. मात्र स्टॅलिनचा १९५३ मध्ये मृत्यू झाला आणि रशियन आभाळ स्वच्छ होऊ लागलं. १९५५ मध्ये रशियन सर्वोच्च न्यायालयानं वाविलोव्हला दिलेल्या चुकीच्या शिक्षेबद्दल जाहीर माफी मागितली. बोलावत्या धन्याचा आधार गेल्यावर लायसेंकोची सद्दी हळूहळू कमी होत गेली. नवा नेता कृश्चेव याच्यापुढं लांगूलचालन करून त्यानं आपल पद १९६५ पर्यंत कसंबसं टिकवून ठेवलं. मात्र त्याने मांडलेले दावे मोडीत निघाले होते, त्याच्या दाव्यांचा जाहीर पंचनामा सुरू होता. तो मेल्यानंतर त्याची बातमी देखील दोन दिवस दडवून ठेवण्यात आली होती. 🥳 याच काळात वाविलोव्ह बद्दल मात्र आदर वाढत जाताना दिसत आहे. आज सेंट पिटरबर्गमधील "वाविलोव्ह वनस्पती संस्था" ही वनस्पती जनुकीय साठा असलेली जगातली सर्वात मोठ्या संस्थांपैकी एक समजली जाते. १९७७ मध्ये सापडलेल्या एका छोट्या ग्रहाला वाविलोव्हचं नाव देण्यात आलं आहे. नास्तिक विचारसारणीचा वाविलोव्ह प्रचंड वाचन असलेला, अथक मेहनत घेताना देखील अजिबात चिडचिड न करणारा, सर्वांचे मत ऐकून घेणारा सर्व सहकाऱ्यांचा लाडका होता. तल्लख स्मरणशक्ती आणि कायम प्रचंड उत्साह असलेला निकोलाय वाविलोव्ह हा "सरातोव" इथं चिरनिद्रा घेत आहे, तिथंच त्याचं स्मारकदेखील उभारलं आहे. "कामाचा डोंगर आहे आणि वेळ खूप कमी आहे" असं नेहमी म्हणणारा वाविलोव्ह त्याच्या ५५ वर्षाच्या आयुष्यात मानवतेला भरपूर काही देऊन गेला आहे❤️ वाविलोव्ह मिमिक्री हा एक रंजक विषय… उत्क्रांतीमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तणवनस्पती मुख्य पिकाची कशी नक्कल करू पाहतात, आणि नक्कल करता करता हजारो वर्षाच्या कालखंडात मुख्य पिकाप्रमाणं दिसू लागतात, कालांतरानं त्याचं मुख्य पीक होतात याला "वाविलोव्ह मिमिक्री" म्हणतात. यासाठी तो "राय"चं उदाहरण देतो. राय हा तणप्रकार गव्हाची नक्कल करत आपलं अस्तित्व टिकवून राहिला. जे तण गव्हाप्रमाणं अधिक दिसत होतं, ते मानवाकडून उपटले गेले नाही, आणि त्याच्या पुढच्या पिढ्या येत गेल्या.👍 आज परिस्थिती अशी आहे की राय हे गव्हापेक्षा मजबूत पीक आहे. ते खडकाळ जागी देखील उगवू शकते, किडीविरुध्द लढण्याची त्याची क्षमता चांगली आहे. आज अनेक ठिकाणी गव्हाऐवजी रायची शेती केली जाते, त्याचा ब्रेड बनवला जातो. एकेकाळी तण असलेले राय आता पीक बनले आहे, आणि त्याच्याभोवती असलेलं तण काढलं जाते. गम्मत म्हणजे लायसेंकोसुद्धा त्याचा दावा सिद्ध करण्यासाठी रायचं उदाहरण द्यायचा. म्हणायचा, माझ्या प्रयोगामुळे राय कुठं पण उगवू शकेल. म्हणजे या म्हातारीचा कोंबडा आरवणार म्हणून सूर्य उगवणार🤣 अशा खोटारड्या लोकांची लाट काही वर्षात ओसरते.. मात्र तोवर अपरिमित नुकसान करू शकते. माकडाच्या हाती तलवार दिल्यावर नाक कापलं जाणारच.. निकोलाय वाविलोव्हची कहाणी आपल्याला सांगते की विज्ञानात कोणता शॉर्टकट नसतो, जिथं चाचण्या नाकारल्या जातात, तिथं विज्ञान नसते. छद्मविज्ञान अल्पजीवी असते, मात्र काही काळासाठी संपूर्ण देशाला भुरळ घालू शकते. जिथं एका नेत्याच्या माणसाच्या तालावर राष्ट्र फिरते, संपूर्ण यंत्रणा त्याच्या तालावर नाचते, विरोधकांची गळचेपी केली जाते, अश्या देशाची वाट लावायला बाहेरचे कोणी यायची गरज नसते… काळाच्या मोठ्या पडद्यावर नंतर अश्या नेत्याला खलनायकच ठरवलं जातं. बरोबर आहे ना मित्रो.. #richyabhau #Vavilov आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव