बाप रे बाप.. 😬
बाप रे बाप.. 😬
उद्या जगासाठी व्हॅलेंटाईन डे असेल.. मात्र आम्हा सनातनी मंडळीसाठी मातृपितृ दिवस आहे..🚩 कारण आमच्या संस्कृतीनं आम्हाला शिकवलं आहे की आईबापासाठी पोरानं त्याग करायचा असतो… आज आमचे पूज्य आसाराम बापू जरी कारागृहात आहेत, तरी त्यांची सेवा करायला नारायण साई स्वतः कारागृहात गेले आहेत. याला म्हणायंच बापावर प्रेम.. बापाचं ऐकून वनवासात गेलेल्या रामापेक्षा बापासोबत जेलमध्ये जाणारा नारायण साई हा पितृभक्तीचं आदर्श उदाहरण आहे.🥳 धन्य तो बाप आणि धन्य तो पुत्र.. आज या निमित्तानं जगभरातील पुराणकथात अजरामर झालेल्या पितापुत्रांची ओळख करून घेऊया. 😇
असं म्हणतात की मुलाचा जीव त्याच्या आईवर असतो आणि मुलीचा जीव तिच्या बापावर… आई आणि मुलीमध्ये सुप्त स्पर्धा असते तर बाप आणि मुलांमध्ये देखील चुरस सुरू असते. याला ओडीपस कॉम्प्लेक्स असंही म्हणतात. (काही लोक इडीपस असं देखील म्हणतात) किशोरवयीन मुलांना बाप हा डोक्याला ताप वाटत असतो. तरी हल्ली बापमंडळी खूप खेळकर झाली आहेत. पोरांना समजावून घेणं आणि त्यांचे हट्ट पुरवणं किती शांतपणे करत असतात.. कुटुंबं छोटी होत चालली आहेत, बहुतेक घरात एकच किंवा जास्तीत जास्त दोन मुलं.. त्यामुळे मुलांचे हट्ट पुरवणं बऱ्यापैकी शक्यदेखील होतं. ❤️
माझ्या पिढीने आणि त्या आधीच्या पिढ्यांनी असा हट्ट पुरवणाऱ्या, संवाद साधणाऱ्या बापाची कल्पना तेव्हा देखील केली नसेल. तेव्हा बाप म्हणजे केवळ डोक्याला ताप वाटायचा. असा हुकूमशहा, जो घरात असेल तर बाकी सर्वांनी शांतच बसायचं. मी पण वडीलांना खूप घाबरायचो, शीघ्रकोपी आहेत म्हणून वडील आवडायचे नाहीत. मात्र आता स्वतःच्या मुलांचं संगोपन करताना जाणवतं, की बाप बनणं सोपं नसतं. स्वत:च्या हौसमौजीला बाजूला ठेऊन मुलांच्या भविष्यासाठी पै पै साठवणारा माझा बाप चांगला, की ज्याच्या भीतीमुळे कधी बालहट्ट करू शकलो नाही तो माझा बाप वाईट.. 🤔
पोरगा आठ वर्षाचा होईपर्यंत त्याचा लाड करायचा.. नंतर सोळा वर्षाचा होईपर्यंत यथेच्छ बडवायचं.. 😬 मात्र नंतर, म्हणजे बापाची चप्पल पोराच्या पायाला यायला लागली की समजायचं "तो मोठा झाला." त्यानंतर त्याला मारायचं, किंवा त्याचा जाहीर अपमान करणं थांबवायचं असं आपल्या संस्कृतीत सांगितलं आहे..😭 मुलाला चांगलं वळण लागावं असा त्यामागचा अर्थ अभिप्रेत असावा. याच संस्कृतीचा पगडा आमच्या बापावर त्या काळातील इतर बापांप्रमाणे असावा. दुर्दैवाची गोष्ट ही की त्यांची चप्पल आमच्या पायाला येईल असा काळ पाहायला ते हयात नव्हते. 😔
आता मुलांना शिस्त लावताना जेव्हा मी कठोर होत असतो तेव्हा मनात प्रश्न येतो.. या पोरांच्या मनात देखील "बाप हा डोक्याला ताप" असा विचार येत असेल का.. सोबतच्या फोटोमध्ये असलेल्या धाकट्या, धनुषच्या मनात तर नक्कीच येत असेल असं वाटतं. 🤣 पण काय करणार? किती सांगितलं तरी हे साहेब ऐकतच नाहीत… आपल्या जुन्या काळात कसलं भारी होते ना.. बापाचा शब्द पडून दिला जात नव्हता.. बाप बोलला वनवासाला जा, तर पोरगं निमूटपणे जायचं🤣🤣
बापाने एखादया गायबकरी सोबत लग्न लावून दिले तरी मुलाने हरकत घ्यायची नाही.. बापाचे ऐकेल तोच मुलगा सरळ वळणाचा. 🤭
बाप हा नेहमीच बरोबर असतो, त्याला प्रश्न विचारायचे नाहीत अशी आपली "गप्पबसा" संस्कृती.. या संस्कृतीआड बापलोकांनी पोरांचं शोषण केल्याचे अनेक दाखले पाहायला मिळतात.. काहीकाही बाप तर एवढे निष्ठुर झाले होते, की आपल्या क्षणिक सुखासाठी मुलाच्या आयुष्याची वाट लावायला ही मंडळी अजिबात कचरली नाहीत. ☹️
बापाच्या बेजबाबदारपणाला, स्खलनशीलतेला झाकण्यासाठी पोरांच्या त्यागाचा उदोउदो केला गेला आहे. रामायणामध्ये आपण ते पाहिलंच, परंतु महाभारतात देखील याची अनेक उदाहरणं आहेत.
शेकडो स्त्रियांचा उपभोग घेऊन देखील ययातीला अधिकाधिक शरीरसुख हवं होतं. त्याच्या या वृत्तीचा राग येऊन शुक्राचार्य जेव्हा त्याला जरावस्थेचा शाप देतात.. म्हातारा बनवतात.. तेव्हा तो गयावया करून उशाप मिळवतो. शुक्राचार्य म्हणतात, "तुझं वृद्धत्व घेण्यास तुझा कोणताही मुलगा तयार असेल तर तुला तारुण्य पुन्हा मिळवता येईल." 😬
राणी देवयानी आणि दासी शर्मिष्ठा पाच पोरं होती मात्र मोठ्या चार पोरांनी जेव्हा या गोष्टीला नकार दिला.. तेव्हा सर्वात लहान पुरुला ययातीभाऊने इमोशनल केलं. तूच माझी शेवटची आशा आहे.. नाही म्हणू नको, बापाच्या ऋणातून मुक्त हो.. असं भावूक बोलून स्वतःच्या जरावस्थेला त्याच्या गळ्यात टाकून ययाती स्वतः तरुण झाला. पुरूपाशी काहीच पर्याय नव्हता.. 😔
भीष्माची तऱ्हा अजून वेगळी, त्याला तर तरुणपणीच ब्रह्मचर्य स्वीकारावे लागलं. कदाचित त्याने स्वतःला खच्ची देखील केलं असावं.. कारण नंतर नियोग पद्धतीसाठी व्यासाला बोलवायची गरज पडली नसती.😇
शंतनु राजाचं मन जेव्हा धीवरकन्या सत्यवतीवर जडतं, तेव्हा ती आणि तिचा बाप शंतनुपुढं पेच निर्माण करतात.. तिचा बाप म्हणतो, मी माझी मुलगी तुला देईल, पण तिच्या होणाऱ्या पोरांचे काय?? तुला आधीच एक मुलगा, भीष्म, आहे.. मग हिच्या होणाऱ्या पोरांनी काय त्याचे सेवक बनायचं का.. भीष्म तिथं प्रतिज्ञा करतो की मी कधीच लग्न करणार नाही.
शंतनु सत्यवतीचं लग्न होतं, दोन पोरं होतात. मात्र त्यांचा एक मुलगा लग्नाआधी युद्धात मारला जातो, एक मुलगा निपुत्रिक मरतो. त्या निपुत्रिक मुलाच्या दोन राण्यांना गर्भधारणा करण्यासाठी "व्यास" हा सत्यवतीला लग्नाआधी झालेला मुलगा बोलावला जातो. भीष्मबाबा या सर्व प्रसंगात केवळ मुकदर्शक बघून राहतात 😔
शंतनुला सत्यवतीची एवढी भुरळ पडली होती की, आपण आपल्या मातृछत्रापासून वंचित असलेल्या तरुण पोराच्या आयुष्याची वाट लावतो आहे, याचं अजिबात वैषम्य वाटलं नाही. खरं तर भीष्माने तिथं केलेला त्याग वाया गेला.. बापाला त्याचं काहीच कौतुक वाटलं नाही. नंतर काळाच्या पटलावर भीष्म नायक ठरवला गेला, जशी त्याग करणारी इतर मंडळी जाणीवपूर्वक नायक ठरवली गेली.
बापाशी पंगा घेणारे देव, नायक आपल्याकडे दिसत नाहीत. उग्रसेनाला कारागृहात टाकणारा कंस खलनायक असतो, किंवा प्रल्हादाचे बापाविरुद्धचे बंड, त्याच्यासमोर बापाची झालेली हत्या विष्णूभक्तीचं नाव देऊन गोड केलं जातं. परशुरामानं बापाचं ऐकून जन्मदात्या आईचं मुंडकं उडवलं, त्याचं पण समर्थन केलं जातं😡
आईचं ऐकून बापाचं मुंडकं उडवलं असं उदाहरण आपल्या पुराणकथात, महाकाव्यात असल्याचं मला तरी ठाऊक नाही. आईच्या डोक्याला ताप देणाऱ्या बापमंडळींना अद्दल घडवणारी मुलं जगभरातील इतर संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात. ग्रीक संस्कृतीमध्ये युरेनस हा या विश्वाचा स्वामी. नावडती पत्नी गाययाशी त्याचं कडाडून वैर.. तिची पोरं त्याने कोंडून ठेवली होती. गायया तिच्या पोराला, क्रोनसला बापाविरुद्ध लढाईला प्रवृत्त करते. क्रोनस त्याच्या बापाचा खून करतो.. आणि विश्वाची सत्ता ताब्यात घेतो. झेऊस हा पराक्रमी वीर या क्रोनसचाच मुलगा.. जो बापाची चाल पुढं ठेऊन क्रोनसचा खुन करून सत्ता मिळवतो.
क्रोनसचे रियाशी लग्न होते, आणि भविष्यवाणी होते की क्रोनसचा मृत्यू त्याच्या मुलाकडून होईल. झालं.. मूलं जन्माला आलं की त्याला मारायचा सपाटा सुरू.
इथं तुम्हाला कदाचित वाटेल की मुलं होऊच का द्यायचा.. पण मुलं तर देव देतो ना😂 म्हणून तर वासुदेव देवकीला वेगवेगळ्या कोठडीत बंद करायची आयडिया कंसाला देखील नव्हती आली. 🥳😂 तर पाच पोर मेल्यावर रिया सासूच्या संगनमताने सहाव्या बाळाला गुप्तपणे एका गुहेत जन्म देते. ते बाळ परमशक्तिशाली झेऊस बनतं. आणि भविष्यवाणी खरी ठरवत क्रोनसला मारून टाकतं.
कृष्णजन्मकथा आणि झेऊसजन्मकथा यात कमालीचं साम्य आहे राव.. दोन्हींमध्ये आकाशवाणी आणि बालहत्या हा धागा आहे. तेव्हा होत असलेल्या व्यापारी संबंधांतून असे सांस्कृतिकबंध देखील तयार झाले असावेत. दोन्ही कथांमध्ये लहान, नुकत्याच जन्मलेल्या मुलांचे वाईट वाटते राव. मुलं जन्माला येऊ द्यायची आणि मग मारायची याला काय अर्थ आहे. खर तर मातृ किंवा पितृहत्या यासारखे दुसरे भयंकर पाप नाही असं जगभरातील संस्कृतीत समजलं जातं, तसं स्वतःच्या मुलांच्या हत्येला का नाही? हा तर जास्त मोठा गुन्हा समजायला हवा ना.. तसं असतं तर सर्वात पहिला गुन्हा शंकरावर दाखल झाला असता. अटेंप्ट ऑफ मर्डर.. 🤣
चिनी संस्कृतीमध्ये पितृहत्या या पापाला डायरेक्ट विजेच्या देवतेकडून शिक्षा देते. एकदम हाईव्होल्टेज शॉक. 🌩️ आपल्याकडे मोगल, तसेच राजपूत घराण्यात बापाचा खून करून पोराने सत्ता हस्तगत करायची अनेक उदाहरणं आहेत. मोगल आणि राजपूत या सख्ख्या शेजाऱ्यांमध्ये देखील या बाबतीत सांस्कृतिकबंध तयार झाला असावा. मात्र त्याआधी, सुमारे २५०० वर्षांपूर्वी मगध सम्राट बिंबिसार याला त्याच्या मुलाने, अजातशत्रूने मारून सत्ता हस्तगत केली तर अजातशत्रूला त्याचा मुलगा उदयभद्र याने ठार करून मगध सत्ता मिळवली होती.
बाबीलोनियन संस्कृतीतील "इनुमा इलिष" ही पुराणकथा.. ज्यात "आप्सू" हा जलदेवता. सर्व गोडे पाणी त्याच्या ताब्यात.. "तीयमात" ही त्याची पत्नी खाऱ्या पाण्याची मालकीण. दोघं मिळून जगाचं राज्य करतात. मात्र मुलं मोठी होऊ लागतात तेव्हा राजा घाबरतो. ही पोरं आपल्या सत्तेला आव्हान देणार याची भीती वाटते. तो मुलांना ठार मारायचे प्लॅन करतो. त्याची बायको मात्र आपल्याच पोरांच्या हत्येच्या प्लॅनला विरोध करते. भेदरलेला आप्सू त्याचा प्लॅन अमलात आणायला जातो, तेव्हा त्याचा मुलगा "इंका" हा त्याच्यावर निद्रास्त्र चालवतो. झोपलेल्या आप्सूला ठार करतो, त्याला गाडून त्याच्या कबरीवर त्याचेच मस्त मंदिर बांधतो.😬 गम्मत म्हणजे हा इंका त्याकाळी मानवतेचा निर्माता समजला जाई..🤣
सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी तुर्कस्थानच्या आसपास उदयाला आलेल्या हिटाईट संस्कृतीमध्ये आपल्या तक्षक नागाची आठवण होईल अशी कथा आहे. "कुमार्बी" या राजपुत्राने आपल्या वडील "अनुष" याचं विश्वराज्यपद मिळवताना त्याचं लिंग कुरतडले आणि खाल्लं. स्वतः राजा झाल्यावर त्याला समजतं की आपला मुलगा "टेशब" याच्या हातून आपला मृत्यू आहे, तेव्हा तो दुसऱ्या मुलाची मदत घेतो. दुसरा मुलगा "उलिकुम्मी" त्याला राहायला प्रचंड उंच आणि प्रचंड मोठी टॉवर बांधून देतो. मात्र इंकादेव टेशबला असा मोठा चाकू देतो, ज्याच्या साह्याने पूर्वी स्वर्ग आणि पृथ्वी कापून वेगळे काढले होते.🤭 असा चाकू भेटल्यावर टेशबकडून कुमार्बीचा अंत होतो.
पेलियास नावाच्या ग्रीक राजाची तर त्याच्या मेडी या शत्रूने डेंजर वाट लावली, तिने त्याच्या मुलींना समजूत घालून दिली की या उकळत्या द्रवात म्हातारा माणूस टाकला तर तो तरुण होतो.. मुलींनी हौसेने त्यात वडिलांना टाकलं.. आणि पेलियास बिचारा भाजून मेला.. 😭
नॉर्स कथेनुसार ह्रेडमार या जादूगाराच्या सोन्याचा महाल होता, ज्याचं रक्षण त्याचा बुटका मुलगा फाफनिर करायचा. ह्रेडमारकडे एक शापित अंगठी होती, लोकीने अनेकवेळा सांगून देखील ह्रेडमार ती अंगठी फेकून देत नव्हता. शेवटी फाफनिर त्याला मारून टाकतो, आणि वाड्याचा मालक बनतो.. आपलं सोनं कुणी चोरून नेऊ नये यासाठी साप बनतो आणि विषारी फुत्कार सोडत राहतो 🤭
केवळ पुराणकथाच नाही तर नाटकात, साहित्यात देखील बाप आणि पोराचे वैर अधोरेखित केलं आहे. आपलं नटसम्राट नाटक आधारित आहे, अशा शेक्सपिअरच्या "किंग लिअर" नाटकात मुलं बापाचे हाल करतात, त्याला राजवाड्यातून हाकलून देतात. जंगलात त्याला एक समदुःखी भेटतो, ड्यूक ऑफ ग्लूकस्टर, ज्याचे डोळे फोडून पोरांनी आंधळे केलं आहे. 😔
सुमारे २५०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ओडीपस या ग्रीक नाटकातील हिरो मात्र नकळत काही बाबी करतो. या हिरोच्या जन्माच्या वेळी भविष्यवाणी होते की हे पोरं बापाचा खून करून आईशी लग्न करणार आहे.. राजा असलेला बाप त्या नवजात अभ्रकाला दूर खेडेगावात एका पर्वताजवळ ठेवून देतो, पुढं ते धनगराच्या घरात पोर मोठं झाल्यावर नकळत बापाचा खून करतो, आणि आईशी लग्न करतो. मानसशास्त्रातील ओडीपस कॉम्प्लेक्सचा जन्म इथं झाला आहे. 😇
वेस्टर्न वेबसिरीज पाहताना लक्षात येतं की, जगभरातील पितापुत्राचं नात बरंचसं औपचारिक असतं. मुलं १८ वर्षांचं झालं की त्याचं ते पाहत असतं, स्वतःच्या पायावर उभं राहून शिक्षण पूर्ण केलं जातं, आयुष्याचे निर्णय त्यांचे तेच घेत असतात. भारतात मात्र अगदी चाळिशीत पोचलेली व्यक्ती देखील आईवडिलांच्या प्रभावातून मुक्त नसते. इथलं वातावरण काही औरच असते. व्यक्तीची ओळख त्याचा बाप कोण आहे यावरच ठरते.. गृहमंत्र्यांचा मुलगा असल्यामुळे जय शहाला बीसीसीआय चालवायला मिळते तर माणसे चिरडून मारणारा व्यक्ती गृहराज्यमंत्रांचा मुलगा असल्याने लगेच जामिनावर सुटतो. अश्या पोरांचे बाप हे त्यांच्या नाही, जगाच्या डोक्याला ताप बनत असतात😡
आपण पाहिलं की आपली संस्कृती कशी जगभरातील संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्याकडे त्यागाचं महत्त्व आहे, म्हणून उद्या तरुणांनी मनावर दगड ठेऊन मातृपितृदिन साजरा केला पाहिजे. आपले पूज्य आसाराम बापू जरी आज जेलमध्ये असले, आणि तुम्हाला आदर्श म्हणून दुसरे कोणी पाहिजे असेल तर रामरहीम बाबाला पॅरोलवर सोडला आहेच. त्यांच्या अवतार लीला पू. आसाराम बापूंपेक्षा कमी नाहीतच..
तुम्ही मातृपितृदिनच साजरा करा, व्हॅलेंटाईन डे नको. भले या जन्मात सिंगलच मराल.. मात्र संस्कृती आणि आपला धर्म यांचं रक्षण तुम्ही नाय करणार तर कोण करणार???
धर्मो रक्षति रक्षितः तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. सनातन धर्म की जय 😀🙏🏾🚩🚩
#richyabhau
#मातृपितृदिन
आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com
Comments
Post a Comment