रुचिराम साहनी : "द नेटिव्ह" शास्त्रज्ञ

रुचिराम साहनी : "द नेटिव्ह" शास्त्रज्ञ
. वैज्ञानिक झालं म्हणजे वैज्ञानिक दृष्टी लाभली असं नाही, त्यामुळेच विज्ञानाच्या क्षेत्रात देखील गुणी शास्त्रज्ञांवर वेळोवेळी अन्याय करणारा लिंगवाद, वंशवाद, प्रांतवाद आपल्याला पाहायला मिळतो. एक शास्त्रज्ञ अहवालात आपले काही निष्कर्ष ठामपणे मांडतो, ज्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचतात. मात्र नेटिव्ह लोकांना श्रेय कशाला द्यायचे? वरिष्ठांकडून त्यांचं श्रेय हिरावून घेतलं जातं, त्या घटनेच्या अहवालामध्ये रुचिराम साहनी यांचं नावदेखील नसतं. कारण ते नेटीव्ह असतात. अर्थात या बाबीकडे दुर्लक्ष करून साहनी आपलं काम सुरू ठेवतात.. आणि काळाला या नेटिव्ह शास्त्रज्ञाच्या बुद्धीमत्तेची दखल घ्यावीच लागते.✊ एक भारतीय व्यक्ती भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र यांसारख्या विषयांवर आपला ठसा उमटवते. पुरावनस्पतीशात्राचा पाया घालते, अणूशास्त्रामध्ये महत्वाचं योगदान देणाऱ्या रुदरफोर्ड सोबत संशोधन करून संशोधनपत्रिका प्रसिद्ध करते.‌ भारतातील डायनोसोरच्या जीवाश्मावर संशोधन करते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेते, त्या सोबतच विज्ञानाच्या प्रसाराची चळवळ हिरीरीने चालवते. शेकडो पैलू असलेला हा हिरा प्रसिध्दीबाबत काहीसा अंधारात आहे मात्र भारतात विज्ञान रुजवण्याच श्रेय देण्याचा विषय असेल तेव्हा जगदीशचंद्र बोस, आशुतोष मुखर्जी यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत साहनी यांचंदेखील नाव घ्यायलाच लागेल.‌❤️ ५ एप्रिल १८६३ रोजी करमचंद साहनी आणि गुलाबदेवी या दांपत्याच्या कुटुंबात रुचिरामचा जन्म झाला. फाळणीपूर्व भारतातल्या डेरा इस्माईल खान हे त्यांचं जन्मगाव आता पाकिस्तानामध्ये आहे. एकेकाळी लढाऊ म्हणून प्रसिद्ध असलेलं साहनी घराणं आता व्यापारात उतरलं होतं. गुलाबदेवी यांच्या माहेरी सावकारीचा धंदा होता. घरी उत्तम आर्थिक स्थिती असल्याने रुचिरामचं बालपण अगदी मजेत गेलं. तेव्हा लहान मुलांना पाढे शिकवण्यासाठी घरी पंडे मंडळी येत. एक पाढा शिकविण्याचे या पंड्यांना चार आणे मिळत. साहजिक मुलांनी अधिकाधिक पाढे लवकरात लवकर शिकावे यासाठी पंड्यांची घाई असायची.😀 गावातील चर्चमधील शाळेत रुचिरामचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं. त्यावेळी व्यवहारज्ञान यावं म्हणून गावातील शेठ कल्याणदास यांच्या पेढीवर रुचिराम बसू लागला. आपल्या वडिलांच्या व्यापारात देखील लक्ष देऊ लागला. पत्र वडिलांचा व्यवसाय हळूहळू तोट्यामध्ये चालला होता. एकेकाळचं तालेवार घर आता हळू हळू बसू लागलं होतं. इथं आजवर ऐटीत जगलो तिथं काबाडकष्ट करून पोट भरायची कल्पना कुटुंबाला अपमानास्पद वाटू लागली आणि त्यांनी स्थलांतर केलं. शिक्षणात खंड पडणं रुचिरामला मान्य नव्हतं. त्याने मिळेल ते काम करत शिक्षण सुरू ठेवलं.👍 रुचिराम पंधरा वर्षाचा असताना त्याचे वडील वारले. एकामागून एक संकट कोसळत असताना देखील रुचिरामचं अभ्यासातून लक्ष अजिबात विचलीत झालं नाही. संपूर्ण जिल्ह्यामध्ये पहिला येऊन तो शालांत परीक्षा पास झाला. पुढील शिक्षणासाठी तब्बल २०० कि.मी. पायपीट करत, आपल्या पुस्तकांचं गाठोडं पाठीवर घेऊन रुचिराम आडिवाल या गावी पोचला. त्याने कलकत्ता बोर्डाची परीक्षा देताना बोर्डात सातवा क्रमांक मिळवला. लाहोरमधील सरकारी महाविद्यालयात त्याचं उच्च शिक्षण सुरू झालं. १८८४ मध्ये विद्यापीठामध्ये पहिला क्रमांक पटकावत रुचिराम बीए पास झाला. ❤️ लहानपणी शाळेत शिकत असतानाच त्याचा संबंध ब्राह्मो समाजाची आला होता त्यावेळी ब्राह्मो समाजाबाबत मिळालेली माहिती तो घरी सांगत असे. जुन्या रुढींची चिकित्सा त्याच्या आईला अजिबात पसंत नव्हती.‌ दोघांच्यात वाद होई. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना रुचिरामच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक पैलू पडले. इथे त्याचा संपर्क आर्य समाजाशी आला. आर्य समाजाचे पंजाबमधील प्रमुख प्रचारक पंडित गुरुदत्त हे त्याचे स्नेही होते. त्यांच्याशी वादविवाद करता करता रुचिराम प्रगल्भ होऊ लागला. इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान याबाबत त्याचं ज्ञान चौफेर वाढलं. महाविद्यालयातील वादविवाद स्पर्धांमध्ये रुचिरामची चमक दिसू लागली.‌ 🌟 पदवीनंतर अर्थातच रुचिरामला पदवीत्तर शिक्षण पूर्ण करायचं होतं, संशोधन करायचं होतं. लाहोर विद्यापीठ त्याला ३५ रुपये शिष्यवृत्ती देत देखील होतं. मात्र कुटुंबाचा पोटापाण्याचा प्रश्न त्यातून सुटत नव्हता. तसंही पदव्युत्तर शिक्षण केल्यानंतर त्याला प्राध्यापक म्हणून नोकरी मिळेल याची शाश्वती नव्हतीच कारण त्या काळात नेटिव्ह लोकांना अशी पदं कधी देण्यात आली नव्हती. नाईलाज म्हणून रुचिरामने हवामान खात्यामध्ये "सेकंड असिस्टंट रिपोर्टर" म्हणून नोकरी स्वीकारली.‌ अवघे दोन वर्ष त्यांनी या सेवेमध्ये घालवली असली तरीदेखील याकाळात त्यांच्याकडून अतुलनीय कामगिरी झाली आहे.❤️ हवामान खात्यामध्ये सेकंड असिस्टंट रिपोर्टर एक जागा होती. अलाहाबादमधील (मी नाही म्हणत प्रयागराज.. जा.. 🤣) भौतिकशास्त्राचे प्राध्यापक ए एस हिल यांनी देशभरातून आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. लहानपणी चिनाब नदी पार करताना भोवऱ्यामध्ये अडकलेल्या रुचिरामने स्वतःची सुटका करून घेतली होती त्यापुढे ही मुलाखत काहीच नव्हती..सटासट उत्तरे दिली. हिलसाहेब प्रचंड इम्प्रेस झाले आणि सेकंड असिस्टंट रिपोर्टरची जागा भरली गेली. पुढील आयुष्यात या हिलसाहेबाला काय मिरची लागली होती काय माहीत.. पण त्याने रुचिरामशी खूप खुन्नस घेतली. 😬 कोलकात्याला आल्यावर रुचिरामला खूप सुखद अनुभव आला.. इथे प्रत्येकजण त्याला मदत करत होताच, शिवाय नोकरी सांभाळून त्याला शिक्षणदेखील पूर्ण करता येणार होतं.‌ शासकीय चौकट नसल्यामुळे कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये रुचिरामला चार ते पाच तास रोज अभ्यास देखील करता येत होता.‌ कामाचा विशेष ताण नसल्यामुळं आपलं काम सांभाळून रुचिराम कम्प्यूटरचे काम देखील करत असे.‌ (रिच्या काय आम्हाला वेड्यात काढायला लागला काय? सव्वाशे वर्षांपूर्वी कुठं कम्प्युटर आले होते?) एक मिनिट.. हवामानखात्यात त्या काळात अनेक कम्प्युटर्स होते.. त्याकाळात आकडेमोड करणार्‍या माणसांना कंप्यूटर म्हणायचे. 🤣 विज्ञान विषयातला अभ्यासू, लुकडासुकडा शीख बंगाली माणसांना पचनी पडेना. सर आशुतोष मुखर्जी हे त्यापैकी एक. त्यांनी आजवर केवळ शीख समुदायाचे लढाईचे किस्से ऐकले होते. त्यामुळे "मला लढाईमधील काही येत नाही." असं रुचिरामचं म्हणणं त्यांना खोटं वाटायचं. दास नावाचा मित्र तर रुचिरामकडं "बंदूक चालवण्यास शिकवा" अशी मागणी करू लागला. बंदूक बाळगण्यास परवानगी नव्हती हे रुचिरामच्या पथ्यावर पडलं! आणि काठीच्या साह्याने "बंदूक कशी चालवायची" याची कवायत अक्षरशः एक आठवडाभर रोजच रंगू लागली. आठवड्याच्या प्रशिक्षणानंतर "दास हे बंदुक चालवण्यात तरबेज जाहीर झाले आहेत" असं रुचिरामनं जाहीर देखील करून टाकलं.🤭 कोलकात्यामध्ये पेडलर यांच्या मार्गदर्शनाखाली रुचिरामचं एम.ए चं शिक्षण सुरू होतं.‌ सर अलेक्झांडर पेडलर हे मोठं नाव होतं. त्यांना रासायनिक विश्लेषण करण्याची बरीच कामं असायची. स्थानिक कारखान्यातून तयार झालेली दारू असो अथवा नगरपालिकेनं पुरवलेलं पाणी, त्यांची शुद्धता तपासण्याचं काम पेडलर करायचं. पेडलर साहेब इतर कामात देखील व्यस्त असल्यामुळे सहाजिकच ही जबाबदारी त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांकडून रुचिरामकडं सोपवली जायची. या जबाबदारी वाटपात सगळ्यांचाच फायदा होता. रुचिरामला शिकायला मिळायचं, पेडलर यांना काही न करता प्रत्येक विश्लेषणासाठी ३२ रुपये मिळायचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना बाटलीतील राहिलेली दारु. 🤣🤣 विश्लेषणासाठी आवश्यक असलेली १०-२० मिली रुचिरामकडे देऊन राहिलेली बाटली त्यांच्या घरी जायची. 🥳 सिमल्यामध्ये हवामानखात्याचं प्रमुख कार्यालय सुरू झालं. इथूनच देशभरातील तसेच ब्रह्मदेशातील हवामानाचा दैनिक अहवाल प्रसिद्ध होणार होता. रुचिरामला दहा बंगाली कम्प्युटर्स घेऊन सिमल्यामध्ये दाखल व्हावं लागलं. ब्लॅनफोर्ड हे येथील प्रमुख, त्यांच्या अधिनस्त रुचिराम आणि त्याचे कम्प्युटर्स. तारयंत्रणेमार्फत देशभरातून हवामानाचे अहवाल या कार्यालयाकडे येत असत. या सर्वांचा मिळून एक अहवाल बनवण्याचं काम रुचिरामकडं असायचं. रोज साडेचार वाजता एकत्रित अहवाल तयार होऊन देशातील वर्तमानपत्रांकडं जाणं अपेक्षित असायचं. ब्लॅनफोर्डचा रुचिरामवर एवढा विश्वास बसला की रुचिरामनं तयार केलेला अहवाल ब्लॅनफोर्ड कधी कधी न वाचताही पुढे प्रसिद्धीसाठी पाठवत असतं. ❤️ मात्र एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने एका नेटिव्ह अधिकार्‍यावर एवढा विश्वास टाकावा ही बाब हिलसाहेबाला खटकू लागली. त्यानं पायोनियर या वर्तमानपत्रात लेख लिहिला, "वैज्ञानिक क्षेत्रातल्या जबाबदारीच्या जागेवर नेटिव्ह माणसाची नेमणूक करण्याची वेळ अजून आलेली नाही, भारतातील हवामानाचा अहवाल एक नेटिव्ह माणूस करतो असं समजलं, तर त्याची बाहेरदेशात काहीच विश्वासार्हता राहणार नाही." हा लेख वाचून रुचिराम व्यथित जरूर झाले, मात्र जेव्हा त्यांना या लेखाच्या लेखकाचं नाव समजलं तेव्हा ते फारच चकित झाले. याच माणसानं एक वर्षापूर्वी माझी निवड केली होती, मग आता मी त्यांचं काय घोडं मारलं ☹️ अर्थात ब्लॅनफोर्ड साहेबांनी या लेखाला खरमरीत उत्तर लिहिलं होतं. २२ सप्टेंबर १८८५.. डायमंड हार्बर या बंदरावरून आलेल्या हवेच्या कमी दाबाच्या अहवालामुळं रुचिराम हादरून गेले, वादळाची ही पूर्वसूचना असावी असं त्यांना वाटलं. वरिष्ठ अधिकारी मुख्यालयात नव्हते, त्यांनी डायमंड हार्बरचे अधिक ताजे मागवले, प्रत्येक तासाला अहवाल देण्याची सूचना केली. ताज्या अहवालानुसार एक खूप मोठं वादळ येऊ घातलंय याची रुचिराम यांना खात्री पटली. त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर सर्व तटवर्ती भागाला वादळाच्या धोक्याच्या सूचना दिल्या. ताशी २५० किमीचा भयानक वेग आणि सात मीटर उंच लाटा उसळवत हे वादळ किनाऱ्यावर धडकलं. रुचिराम यांनी स्वतःच्या जबाबदारीवर धोक्याचे संदेश पाठवले होते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली होती. ❤️ खरं तर या वादळाचे निदान पेडलर साहेबांनी करायला हवं होतं. मात्र त्यांच्या सरकारी आणि खासगी कामाच्या व्यग्रतेमुळं त्यांना कदाचित या अहवालाकडं एवढ्या बारकाईनं पाहण्यासाठी वेळ मिळाला नसावा. रुचिराम यांचा जेव्हा ब्लॅनफोर्ड यांच्याशी संपर्क झाला, तेव्हा त्यांनी सर्व अहवालाच्या प्रती पेडलर साहेबाकडे पुन्हा पाठवल्या, मात्र त्यांनी निरीक्षणांवरून अनुमान काढेपर्यंत वादळ किनाऱ्यावर धडकले देखील होतं. रुचिराम यांच्या समयसुचकतेमुळं जीवितहानी टळली होती. मात्र या घटनेचं सर्व श्रेय पेडलर साहेबांनी स्वतःला घेतलं. एवढंच नाही तर या घटनेच्या अहवालामध्ये त्यांनी रुचिराम यांचं नावदेखील कुठंच टाकलं नाही.😡 दोन वर्षे हवामानखात्यात काम केल्यानंतर रुचिराम साहनी लाहोरमधील महाविद्यालयात रसायनशास्त्र शिकवण्यासाठी सहाय्यक प्राध्यापक पदावर रुजू झाले. या जॉब ची ते उत्कटतेने वाट पाहत होते, आणि त्यांनी अतिशय निष्ठेने अध्यापन कार्य केलं. वर्षातील ३६५ दिवस रोज दहा तास ते अध्यापनासाठी आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी देत होते. प्रत्येक प्रयोग करताना त्यांची विद्यार्थ्यांकडून विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांची यादी आणि त्याची उत्तरं देखील तयार असायची.‌ त्यांनी कोणताही प्रयोग विद्यार्थ्यांना दाखवण्याआधी साहनी यांनी तीन वेळा केलेला असे. तीन वेळा अचूक निष्कर्ष आले तरच तो प्रयोग विद्यार्थ्यांना शिकवला जायचा. 👌 त्या काळात एक अलिखित नियम होता, ब्रिटिश अधिकाऱ्यांना पुढे जाताना नेटिव्ह अधिकाऱ्यांनी त्यांचे बूट बाहेर काढून ठेवले जायचे. मात्र रुचिराम यांनी अशा अपमानजनक नियमाचं पालन कधीच केले नाही, आणि विशेष म्हणजे त्यांच्या या बंडखोरीमुळे नेटिव्ह सहअधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या जायच्या. सहायक प्राध्यापक म्हणून जरी नेटिव्ह लोकांना संधी मिळाली असली तरी त्यांना प्राध्यापक पदापर्यंत जाण्यासाठी अनंत अडचणी होत्या. किंबहुना त्यांनी प्राध्यापक पदापर्यंत जाऊच नये यासाठी विशेष नियम केले जायचे. मात्र या अन्यायाविरुद्ध रुचिराम यांनी आवाज उठवला. ✊✊ अर्थात त्यामुळे ते अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या डोळ्यात सलु लागले. 😬 महाविद्यालयामध्ये परीक्षा सुरू होणार होत्या. एक विद्यार्थी रुचिराम त्यांच्याकडे एक प्रश्न घेऊन आला, रुचिराम यांनी त्याला छान चित्र काढून समजावून दिलं.‌. आणि नंतर परीक्षेलादेखील तोच प्रश्न आला. काही लोकांना वाटलं की रुचीराम यांनीच पेपर फोडला.‌ मात्र रुचिराम यांना दुसऱ्या कुणी पेपर फोडला आहे अशी शंका वाटली. झालेली घटना त्यांनी जशीच्या तशी प्राचार्यांच्या कानावर घातली. प्राचार्यांनी या योगायोगाकडे कानाडोळा करण्याचा सल्ला दिला. पुढच्या वर्षी तर पेपरफुटीचं प्रकरण अगदी ऐरणीवर आलं. विद्यापीठातून चौकशी समिती आली. नेटिव्ह प्राध्यापकाला पेपरफुटीच्या प्रकरणात दोषी पकडता येईल अशा अपेक्षेनं आलेल्या या समितीला मात्र अखेरीस एका ब्रिटिश प्राध्यापकाला दोषी ठरवावं लागलं. हे प्राध्यापक गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना परीक्षेला आलेले प्रश्न पुरवत होता.🤭 २७ वर्ष प्राध्यापकी करताना महाविद्यालयात कायम नेटिव्ह म्हणून दुजाभाव केला जात असताना साहनी यांचे मन उबले, त्यांनी युरोपात जायचे ठरवलं. नव्यानं खुल्या झालेल्या किरणोत्सार क्षेत्रात अमाप संशोधन संधी उपलब्ध होत्या. जर्मनी हे संशोधनाचे केंद्र म्हणून उदयाला येत होतं. युरोपाच्या जहाज प्रवासात त्यांनी जर्मन शिकून घेतलं. मात्र लवकरच महायुद्ध चालू झालं आणि त्यांना जर्मनी सोडून इंग्लंडमध्ये जावं लागलं. तिथं विक्टोरिया विद्यापीठात त्यांना नोबेलविजेते शास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या दोघांचे सामायिक दोन संशोधन पेपर प्रसिद्ध झाले. साहनी यांचा मुलगा बिरबल साहनी तेव्हा तिथंच शिकत होता. त्याच्या मदतीने साहनी यांनी फोटोग्राफिक प्लेट्स तयार केल्या. भारतात येऊन त्यावर पुढील संशोधन अपेक्षित होतं. मात्र परतीच्या प्रवासात बोटीमध्ये त्या प्लेट खराब झाल्या. 😔
साहनी यांचं वैवाहिक आयुष्य खूप सुखी समाधानी असं म्हणावं लागेल. त्यांचं ईश्वरीदेवी यांच्याशी लग्न झालं होतं. त्या जोडप्याला पाच मुलं आणि चार मुली झाल्या. या सर्व मुलांना त्यांनी अतिशय दर्जेदार शिक्षण दिलं आणि भविष्यात ही मुलं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चमकली. साहनी यांची मुलगी लीलावती ही पंजाब विद्यापीठातील पहिली महिला पदवीधर. मोठा मुलगा विक्रमजीत यानं केंब्रिजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलं. दुसरा मुलगा बिरबल यानं विज्ञान क्षेत्रामध्ये संशोधन केलं. तिसरा मुलगा वकील बनवून लंडनमध्ये स्थायिक झाला. चौथ्या मुलाने रबरतंत्रज्ञ बनून इंग्लंडमध्ये आपला उद्योग टाकला. तर पाचव्या मुलाने पंजाब विद्यापीठात जिओलॉजी हा विभाग सुरू केला. त्यांची तिसरी, चौथी पिढीदेखील संशोधनामध्ये अग्रेसर आहे. ❤️ गुरुद्वाऱ्यासाठी जरी रुचिराम यांनी भरपूर कारसेवेचं काम केलं असलं तरी ते धार्मिक शीख कधीच नव्हते. रुचिराम हे बंडखोर वृत्तीचे, धर्माच्या कुंपणापलीकडे त्यांचे विचार होते. त्यांनी तरुणपणातच ब्राह्मो समाजाची दीक्षा घेतली होती. जातीमधून वाळीत टाकण्यात आलं, मात्र त्यांनी त्यांची प्रागतिक विचारसरणी सोडली नाही. सामाजिक काम करत असतानाच त्यांची राजकीय कारकीर्द देखील जोरात सुरू होती. १९२३ मध्ये त्यांनी स्वराज्य पार्टीचे सभासद म्हणून पंजाब विधानसभेमध्ये प्रवेश केला होता.त्यांनी विज्ञान प्रसारासाठी जे काम केलं ते केवळ अद्वितीय असं होतं. त्यांच्या पंजाब विज्ञान सभेच्या मार्फत केलेल्या कार्यक्रमांमुळे विज्ञान लोकप्रिय होऊ लागले होते. विज्ञानाची व्याख्यानं ऐकायला लोक तिकीट काढत असत.😍 त्यांच्या दोन व्याख्यानांना न्या. रानडे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांच्या श्रोत्यांमध्ये बंगाली तरुण जास्त असत. एका व्याख्यानात साहनी न्या. रानडे यांच्याकडे पाहून म्हणाले, "मुंबईवरून येणारे मोसमी वारे अरवली पर्वतापाशीच अडवले जातात. त्यामुळे मुंबईचा तसा आम्हाला उपयोग नाही. पंजाबमध्ये मुख्यत पाऊस पडतो तो बंगालमधून येणाऱ्या परतीच्या पावसामुळे. एक वेळ बंगालहून येणाऱ्या कम्प्युटरांशिवाय सिमला ऑफिस चालू शकेल, मात्र बंगालवरून येणाऱ्या वाऱ्याशिवाय उत्तर हिंदुस्थान चालू शकणार नाही." श्रोत्यांनी हसून सभागृह डोक्यावर घेतलं होतं.🤣 १८९३ मध्ये पुण्यामध्ये औद्योगिक अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. त्यात सहभागी होताना साहनी यांनी त्यांच्या कार्यशाळेत तयार केलेली उपकरणं मांडली होती. मात्र ती उपकरणं लाहोर किंवा भारतात कुठेही बनली आहेत यावर आयोजन समितीचा विश्‍वास बसतच नव्हता. विदेशातून आयात करून त्याला थोडासा खराब रंग देऊन "भारतीय बनावट" आहे असं भासवण्याचा हा प्रयत्न आहे असं त्यांचं मत होतं. तिथं साहनी यांनी जाहीर आव्हानं दिली. १) लाहोरमध्ये येऊन तुम्ही आमची कार्यशाळा तपासून पाहा.. समाधान झालं नाही तर जाण्यायेण्याचा खर्च आम्ही देऊ. २) आमच्या मिस्त्रीला आवश्यक साधनं इथं उपलब्ध करून द्या, इथं तुमच्यासमोर ही उपकरणं बनवू.. ही आव्हानं ऐकून त्या समितीच्या अध्यक्षांनी आनंदाने साहनी यांना मिठीच मारली.❤️
सरकारी नोकर असल्यामुळे १९१८ पर्यंत साहनी यांना काँग्रेसच्या अधिवेशनात उघडपणे सक्रिय सहभाग घेता येत नव्हता, मात्र कॉंग्रेसच्या स्थापनेपासून शक्य तेवढ्या अधिवेशनाला ते उपस्थित होतेच. काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयात त्यांना आपले योगदान देता आलं आहे. हंटर कमिशन समोर झालेल्या जबाबांचे प्रश्न निर्धारित करण्यात त्यांचादेखील वाटा आहे. खिलाफत चळवळीला गांधीजींनी दिलेला पाठिंबा साहनी यांच्या दृष्टीने अनाकलनीय होता. मात्र तरीही गांधींच्या आग्रहाखातर त्यांनी खिलाफत चळवळीला पाठिंबा म्हणून सरकारकडून मिळालेला किताब परत केला होता. असहकार चळवळीला पाठिंबा दिला होता. 🤔 आयुष्याच्या अखेरच्या वर्षात त्यांना स्वातंत्र्याचा सूर्य पाहायला मिळाला आणि सोबतच फाळणीमध्ये झालेला नरसंहार देखील.. आवडतं लाहोर त्यांना सोडावे लागले. त्यांनी या काळात आपले लिखाण सुरू ठेवलं होतं. "ट्रूथ अबाऊट काश्मीर" ही काश्मीर विषयी पुस्तिका ही त्यांच्या अखेरच्या लिखाणापैकी एक. ३ जून १९४८ रोजी त्यांची जीवनज्योत मालवली. कोणता मोठा शोध लावला तरच शास्त्रज्ञ "महान" ठरत नसतो. साहनी यांनी अनेक यंत्रं आणि उपकरणं यामध्ये आधुनिकता आणली, अध्यापनातून नवे शास्त्रज्ञ तयार केले, विज्ञानाचा प्रचार प्रसार करून अनुकूल वातावरण तयार केलं. आणि वंशभेदग्रस्त युरोपियनांना दाखवून दिलं की "डोन्ट अंडरइस्टिमेट द पॉवर ऑफ नेटिव्ह्ज" ✊✊ आपले राज्यकर्ते गटारमधून गॅस काढण्याचा प्रयत्न करत राहतील, एक्सट्रा 2ab चे कोडे सोडवत राहतील. मात्र आपल्याला, सामान्य जनतेला त्यांच्याप्रमाणे कॅज्यूअल राहून नाही चालणार. विज्ञानाची, तंत्रज्ञानाची कास धरली तरच आपल्याला भविष्यातील आव्हानं पेलता येणार आहेत. यासाठी जनचळवळीची गरज आहे. लोकविज्ञान सारख्या अस्त होत चाललेल्या चळवळीला बळ देण्याची गरज आहे… आणि या चळवळीचा नवा केंद्रबिंदू शहराकडून गावाकडे हलवला गेला पाहिजे. रुचिराम साहनी यांसारख्या महान शास्त्रज्ञाच्या चरित्रातून आपण हेच लक्षात घेऊ की विज्ञान ही कोणत्या लिंग, प्रांत आणि वंशाची जहागीर नाही.. सकलांसी येथे आहे अधिकार!!! जय विज्ञान जय समता ✊✊ #richyabhau #ruchiram_sahni आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव