मित्रतारा आणि ब्रेकथ्रू स्टारशॉट मिशन

मित्रतारा आणि ब्रेकथ्रू स्टारशॉट मिशन
आज राष्ट्रीय विज्ञान दिवस.. विज्ञानधर्म मानणाऱ्यांचा आज सण. विज्ञान हाच खरंतर निसर्गनिर्मित धर्म आहे.. (बाकीचे सगळे धर्म मानवनिर्मित आहेत) फेब्रुवारी महिना सुरू झाला की विज्ञानधर्मियांना २८ फेब्रुवारीचे वेध लागतात. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी सी. व्ही. रामन यांचा प्रकाशाच्या विकिरणाचा शोधनिबंध "नेचर" या विज्ञानविषयक मासिकात प्रसिद्ध झाला, पुढं रामन यांना त्यामुळं नोबेल पारितोषिक देखील मिळालं. रामन हे नोबेल पारितोषिक मिळालेले पहिली भारतीय व्यक्ती ठरले. १९८७ पासून २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा होतो आहे. या विज्ञानाच्या सणानिमित्ताने होतो विज्ञानाचा जागर, प्रचार-प्रसार. ✊ अखिल मानवजातीवर उपकार केलेल्या या विज्ञानधर्माचे गोडवे गावे तितके थोडेच आहेत, तुम्ही विज्ञानधर्म मानत असाल किंवा नसाल, परंतु विज्ञानाला टाळून तुम्हाला जगता येणार नाही. विज्ञानाने निर्माण केलेली एकही गोष्ट न वापरता एक दिवस जगण्याची कल्पना करून पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही अतिशय अवघड बाब आहे. उत्क्रांतीमध्ये मानवाला काही विशेष देणग्या भेटल्या, त्यातील एक म्हणजे चिकित्सक वृत्ती. निसर्गाने त्याच्या उदरात अनेक कोडी लपवून ठेवली होती, मात्र मानवाने त्यातील काही शोधून काढली, काही शोधून काढत आहे. निसर्गाने सर्व प्राण्यांना काही मर्यादा घातल्या होत्या, मात्र आजवर मानव हळूहळू त्या मर्यादांवर मात करीत आला आहे. असाच एक मोठा, महत्वकांक्षी प्रयत्न आहे ब्रेक थ्रू शॉट मिशन. 🌟 सूर्यमाला कशी जन्माला आली, सूर्यावर नक्की काय क्रिया सुरू आहे याविषयी व्याख्यानातून किंवा पोस्टमधून सांगितलं जातं तेव्हा श्रोत्यांचं, वाचकांचं कुतूहल जागं होतं. आपल्या सूर्याचं इंधन कधी संपेल का? किंवा संपलं तर पुढं काय होईल? या जोडप्रश्नांची विचारणा होतेच. आणि हे प्रश्न जगभरात अनेक शास्त्रज्ञांना देखील पडले. आणि त्यांनी त्यावर उपाय शोधायला देखील सुरुवात केली. एक गोष्ट तर नक्की आहे की आपल्या सूर्याचे वय साडेचार अब्ज वर्ष असले तरी तो अजून म्हातारा झाला नाही. अभी तो वो जवान है.. अजून किमान पाच अब्ज वर्ष तरी सूर्य आग ओकत राहणार आहे… आपल्या पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता मिळतच राहणार आहे.🔥 शास्त्रज्ञांनी जेव्हा चंद्रावरून काही खडक गोळा करून आणले, त्यावरून सूर्य आणि सूर्यमाला यांचं वय निश्चित करणं सोपं झालं. हो, सूर्यमालेतील बहुतेक सर्वच घटक एकाच वेळी जन्माला आले आहेत. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पासून आपला सूर्य हा तेजोनिधी लोहगोल आकाशात झगमगत आहे. अजून पाच अब्ज वर्षानंतर सूर्याचं इंधन संपेल आणि त्याचं रूपांतर लाल राक्षसी ताऱ्यांमध्ये होईल. त्याचा आकार वाढू लागेल, कालांतरानं तो आजच्यापेक्षा २००० पट मोठा झाला असेल, त्याचा प्रकाश वाढू लागेल मात्र तो थंड होऊ लागेल. सूर्याच्या मृत्यूची आपल्याला काळजी करायची गरज नाही. सूर्य मरण्यापूर्वीच आपल्याला या पृथ्वीला बायबाय करून नव घर शोधावं लागणार आहेच. 🥳 आपण तंत्रज्ञानात नव्या नव्या शिड्या चढत असतानाच आपली पृथ्वी जगण्यासाठी प्रतिकूल बनत चालली आहे. जे पर्यावरण तयार व्हायला अब्जावधी वर्ष लागली होती, आपण गेल्या शे - दोनशे वर्षांत त्याचा प्रचंड वेगाने नाश केला आहे. ग्लोबल वॉर्मिगमुळे आणि बदलत्या ऋतूचक्रामुळे आपल्याला जर पृथ्वीवर राहणे अशक्य झालं तर???? आज रशिया युक्रेनचा घास गिळू पाहत आहे, अणुबाँब हल्ल्याची शक्यता वाटत आहे. या युद्धांनी आपण पृथ्वीला नापीक करत आहोत. आपल्याला या ग्रहावर जगणे मुश्किल होणार आहेच. अशा वेळी आपल्याला पर्याय असावा यासाठी अनेक शक्यतांचा विचार शास्त्रज्ञ करत आहेत. आणि आपल्या शेजारी असलेल्या ताऱ्याकडे आपण आशेने पाहत आहोत. आपल्याला सर्वात जवळ असलेल्या या ताऱ्याचे नाव आहे अल्फा सेंटोरी. मराठीत मात्र आपण त्याला मित्रतारा असं छान नाव देऊन अधिक जवळचा केला आहे. ❤️ लॉस्ट इन स्पेस या गाजलेल्या काल्पनिक वेबसिरीजमध्ये शास्त्रज्ञ मंडळी अल्फा सेंटोरीवर जाण्यासाठी धडपडत असलेली दाखवली आहेत… आजची विज्ञानकथा ही उद्याचे विज्ञान असते.. आपण लवकरच आपले काही दूत आणि गुप्तहेर अल्फा सेंटोरी सौरमालेच्या दिशेने रवाना करणार आहोत. आणि त्यानंतर २५ वर्षांत अल्फा सेंटोरीवर जीवसृष्टीला अनुकूल परिस्थिती आहे की नाही याचा आपल्याला ठाव लागला असेल. अर्थात तिथं अनुकूल परिस्थिती नसेल तरी शास्त्रज्ञ हताश होणार नाहीत.. इतर पर्यायांची शक्यता देखील तपासली जाईल.. मात्र सध्या तरी मित्रताऱ्यापासून आपल्याला आशा आहे.😍 सूर्यापासून अवघे ४.३७ प्रकाशवर्ष दूर असणारा अल्फा सेंटोरी तारा हा सर्वात जवळचा तारा म्हणून ओळखला जातो. आकाशातल्या सर्वात तेजस्वी ताऱ्यांच्या यादीत हा तिसऱ्या स्थानी आहे. मृग नक्षत्रातील व्याध किंवा सायरस, करीना नक्षत्रातील कॅनोपस यांच्यानंतर अल्फा सेंटारी ताऱ्याचा नंबर लागतो. हा तारा खरं तर तीन ताऱ्यांचा तारासमूह आहे. त्यामध्ये अल्फा सेंटोरी "ए" आणि अल्फा सेंटोरी "बी" असे जोडतारे आहेत. एकाच नाळेने जोडलेली ही भावंडं, प्रॉक्सीमा सेंटोरी किंवा "सी" या तिसऱ्या ताऱ्यासोबत समान अंतर राखत एकत्र नांदतात. अल्फा सेंटोरी ए आणि बी यांच्या जोडीला एकत्र गुरूत्वीय शक्ती असलेले एबी असे नाव दिले जाते, या एबीचे सीशी अंतर स्थिर असते. 😇 या प्रॉक्सीमा सेंटोरी ताऱ्याच्या "प्रॉक्सीमा सेंटोरी बी" नावाच्या ग्रहावर मानवी वस्ती होऊ शकेल का याची चाचपणी करण्यासाठी ब्रेकथ्रू स्टारशॉट मिशन राबवण्यात येणार आहे. २०१६ मध्ये जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, आपल्या गल्लीतला लाडका मार्क झुकेरबर्ग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरघोस गुंतवणूक करणारे युरी मिलनेर यांनी मिळून २०१६ मध्ये ब्रेकथ्रू इनिशिटिव्ह हा प्रोजेक्ट सुरू केला आहे.‌ साधारण १० अब्ज डॉलर्स खर्च असलेल्या या प्रयोगातून २०३६ या वर्षात एक सेंटिमीटरपेक्षा छोटे आणि एक ग्रॅमपेक्षा हलके असलेल्या स्टारचीप नावाच्या तबकड्या प्रकाशाच्या वेगाच्या २० टक्के वेग साध्य करत २०-२१  वर्षात तिथे पोचणार, तिथले फोटो काढून, माहिती गोळा करून प्रकाशाच्या वेगाने आपल्या पृथ्वीवर पाठवणार आहेत. ✊ स्टारचीप पाठवण्यासाठी हाच ग्रह का निवडला असावा? आजवर शास्त्रज्ञांना अनेक तारे आणि त्या भोवती फिरणारे ग्रह सापडले आहेत ज्यामध्ये जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. मात्र तिथं पोचणं अवघड आहे. सर्व मंडळी आपल्यापासून शेकडो हजारो प्रकाशवर्षे दूर आहेत. आपल्या हातात न येणारी ही द्राक्षे सध्या तरी आपल्याला आंबट आहेत. त्यामुळे सर्वात जवळची शक्यता तपासणे गरजेचे ठरते. प्रॉक्सीमा सेंटोरी बी या ग्रहाची निवड केली कारण जवळचा आहे तसेच त्याचा तारा आणि आपला सूर्य यामध्ये कमालीचं साम्य आहे. प्रॉक्सीमा सेंटोरी हा तांबडा (म्हणजे थंड पडत चाललेला) तारा जवळजवळ आपल्या सूर्याएवढाच आहे, फक्त त्यापेक्षा १२.५ टक्के मोठा आहे. ❤️ प्रॉक्सीमा सेंटोरीला दोन ग्रह आहेत. (आजवर माहित असलेले.. मुळात हा तारा अतिशय फिकट आहे, त्यामुळे त्याचे दर्शन मानवाला खूप उशिरा झाले, कदाचित भविष्यात त्याचे इतर ग्रह सापडू शकतील.) प्रॉक्सीमा सेंटोरीबी आणि प्रॉक्सीमा सेंटोरी सी. प्रॉक्सीमा सेंटोरी बी हा ग्रह देखील जवळजवळ आपल्या पृथ्वीएवढाच आहे, तिच्यापेक्षा फक्त १७ टक्के मोठा आहे. ताऱ्याभोवती फिरताना ग्रहाची कक्षा जर ग्रहावरील जीवसृष्टीला पोषक असेल, प्रवाही पाण्याची शक्यता असेल तर त्या कक्षेला "वसाहतयोग्य कक्षा" म्हणतात. प्रॉक्सीमा सेंटोरी बीची कक्षा वसाहतयोग्य आहे. अर्थात आपला कयास किती बरोबर आहे, ते स्टारचीपकडून संदेश आल्यावर समजेल. 👍 अल्फा सेंटोरी कुटुंबाची पहिली अधिकृत नोंद १६०३ मध्ये घेतलेली आढळते. पुढे आपल्याला हे बायनरी म्हणजे जुळे आणि एकाच नाळेला बांधले गेलेले दोन भाऊ आहेत हे समजले. दोन्ही तारे ८० वर्षात एकमेकाभोवती एक फेरी पूर्ण करतात. प्रॉक्सिमा सेंटोरी तारा हा त्यांचा तिसरा पडद्यामागे राहणारा लाजाळू भाऊ रॉबर्ट इंन्स या स्कॉटिश खगोल शास्त्रज्ञाने १९१५ मध्ये शोधला. आधीच्या दोन ताऱ्यांपेक्षा नवीन शोधलेला तारा जवळ असल्याने त्याने त्याला 'प्रॉक्सिमा' असं नाव दिलं. प्रॉक्सिमा या लॅटिन शब्दाचा अर्थ जवळ असा होतो. प्रॉक्सिमा सेंटौरी आपल्या दोन भावंडांपेक्षा तब्बल १००० अब्ज किलोमीटर जवळ आहे. म्हणजे त्याच्या भावांच्या तुलनेत त्याच्यापासून आपल्याला प्रकाश सुमारे ३७ दिवस आधी पोचतो. 😇 आपल्या सूर्याचे तापमान पृष्ठभागावर सुमारे ६०००°C असते, मात्र प्रॉक्सीमा सेंटोरी या ताऱ्याचे केवळ १५०० ते १८००°C आहे. म्हणजे हा आपल्या सूर्यापेक्षा म्हातारा तारा आहे. ( हे बरे आहे आपला सूर्य म्हातारा होतो आहे म्हणून आपण जीवसृष्टीला नवा दादला शोधत आहे, पण सूर्यापेक्षा म्हाताऱ्या दादल्याचे स्थळ सांगून आले आहे. 😀) हा तारा थंड पडत चाललेला असला तरी प्रॉक्सीमा सेंटोरी बी हा ग्रह त्याच्याजवळ असल्याने (केवळ ७५ लाख किमी. सूर्य आणि पृथ्वीमधले अंतर याच्या वीसपट आहे.) इथे जीवसृष्टीला तग धरता येईल असं वातावरण असण्याची शक्यता आहे. साधारण इथे उणे ४०°C तापमान असण्याची शक्यता आहे. म्हणजे ध्रुवीय प्रदेशात आपण राहतो त्याप्रमाणे इथे राहू शकू 🔥 प्रॉक्सीमा सेंटोरी बी हा ग्रह त्याच्या सूर्याच्या अधिक जवळ असल्यामुळे ताऱ्याभोवती त्याची एक प्रदक्षिणा  लवकर पूर्ण होते. त्याचे वर्ष केवळ ११.२ दिवसाचे असते. 😇 २०१६ मध्ये हा ग्रह शोधून काढला आणि लगेच त्याच्यावर मोहीम करण्याची योजना सुरू झाली. प्रॉक्सीमा बीच्या घरात पण आपल्या युरेनससारखा भाऊ आहे. प्रॉक्सिमा सेंटौरी सी हा ग्रह युरेनससारखाच मोठा आहे. मात्र तो त्याच्या ताऱ्यापासून सुमारे साडे बावीस कोटी किमी अंतरावर आहे. आणि त्याचे वर्ष (ताराप्रदक्षिणा) हे पृथ्वीवरील सव्वा पाच वर्षांचे असते. त्याच्या थंड ताऱ्याची उष्णता त्याच्यापर्यंत पोचत नाही त्यामुळे तो अतिशय थंड आहे. त्याच्यावरील तापमान युरेनस इतकेच म्हणजे सुमारे उणे २३४°C असते. म्हणजेच इथे जीवसृष्टी असू शकत नाही. 👍   प्रकाशापेक्षा जास्त वेग मानवाला शक्य झाला तर कदाचित आपण अधिक जीवसृष्टी शोधू शकू परंतु आजवर आपल्याला एवढा वेग साधता आला नाही. (अपवाद फक्त कल्पनाशक्तीचा बरं का🥳)  आपण पाठवलेले वोयाजर या यानाचा स्पीड एका तासाला सुमारे ६०००० किमी आहे. ६० किमी स्पीडने दुचाकी चालवताना हा स्पीड खूप जास्त वाटतो, मात्र अंतराळात प्रवास करताना अंतरे खूप लांबलांब असतात. त्यामुळे ६०००० चा वेग असला तरी मित्रताऱ्याजवळ पोचायला सुमारे ७०००० वर्षे लागतील. 🤭 आता आपण पाठवणार आहोत त्या स्टारचीप साधारण वीस वर्षात तिथं पोचतील. विज्ञानाच्या इतिहासात तेव्हा ती खूप मोठी घटना असेल.  कोणतेही इंधन जाळून किंवा तासाला ६०००० किमीचा स्पीड निर्माण करणाऱ्या रॉकेट तंत्रज्ञानाला वापरून हा वेग मिळवणे अशक्य आहे. इथे प्रकाशकणांचा दाब वापरून बनवलेले लेझर सेल्स हे नवे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. आणि तासाला नाही तर सेकंदाला ६०००० किमीचा स्पीड मिळवण्याचा प्रयत्न होणार आहे. हे प्रकाशकण आपल्या चीप्सला गती देणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एखाद्या वस्तूला ढकलण्यासाठी प्रकाशाची शक्ती कितपत काम करणार.. मात्र या चीप्स बनवताना नॅनोटेक्नोलॉजी वापरून एवढ्या हलक्या बनवल्या जाणार आहेत की प्रकाशकण त्यांना ढकलू शकतील, आणि प्रकाशाच्या वेगाच्या २० टक्क्यांपर्यंत वेग त्या चीप्स मिळवतील.. आहे ना धमाल❤️ या चीप्स नॅनोटेक्नोलॉजीचा उत्कृष्ट आविष्कार असणार आहेत. १०० गिगावॉट शक्ती एकत्रित करून एकाच वेळी १००० चीप्स सोडण्यात येणार आहेत. लेझर सेल्स त्यांना वेग पुरवत राहणार आहे. चीप्सवर सुकाणू (स्टिअरिंग) बसवले आहे, त्यामुळे वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना चुकवत त्या प्रवास करतील. कदाचित यातील काही चीप्स काही कारणांमुळे खराब होतील, मात्र त्यातील काही चीप्स प्रॉक्सीमा सेंटोरी बीच्या कक्षेत प्रवेश करतील, तिथे त्या चीप्सवर बसवलेले कॅमेरे फोटो काढतील, प्रत्येक चीप्सवर २ मेगापिक्सलचे पाच कॅमेरे बसवलेले असतील. पृथ्वीशी संपर्क साधणारी यंत्रणा देखील प्रत्येक चीप्सवर असेल. 😇  ब्रेकथ्रू स्टारशॉट ही मोहीम खूपच उत्साहवर्धक आहे. अगदी एखाद्या चित्रपटात क्लायमॅक्स शोभावा अशी ही घटना असेल. मात्र चित्रपट हिट करण्यासाठी ओढूनताणून हॅपी एंडिंग दाखवला जातो, तसे विज्ञानात शक्य नसते  कदाचीत ही मोहीम अपयशी होईल, आणि १० अब्ज डॉलर्स वाया जातील, मात्र शास्त्रज्ञ आणि उद्योजकांना असले नकारात्मक विचार शिवत नाहीत. त्यांनी या शक्यतेचा नक्की विचार केला असेल, आणि तरीही त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले असतील, कारण त्यांची विज्ञानावर निष्ठा आहे. ❤️  साधारण २०६० पर्यंत आपल्याला समजेल की प्रॉक्सीमा सेंटोरी बीवर आपण राहायला जाऊ शकतो की नाही. कदाचित आपल्यापैकी अनेकजण या जगात तेव्हा नसतील, म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात याच ग्रहावर राहायचे आहे. इथे हिजाबसारख्या अर्थ नसलेल्या मुद्द्यावर आपण वाद पाहत बसायचे आहे, विज्ञानाला रद्दीत काढणाऱ्या नेत्यांना सहन करायचे आहे. विज्ञान हा जोवर सर्वसामान्यांचा धर्म होत नाही, तोवर इतर मानवनिर्मित धर्माचे ठेकेदार असेच स्वत:च्या फायद्यासाठी तुम्हाला झुंजवत राहतील. म्हणून म्हणतो विज्ञानाची कास धरा.. विज्ञान हाच धर्म माना. गंमत म्हणजे तुम्ही विज्ञानधर्म मानत असाल किंवा नसाल, तरीही विज्ञान तुमच्यावर निरपेक्ष प्रेम करते आणि भविष्यात देखील करत राहील. माझा विज्ञानधर्म सर्वात जास्त सहिष्णू आहे❤️ जय विज्ञान ✊ जय तंत्रज्ञान ✊✊ #richyabhau #scienceday आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com/

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव