असीमा मुखर्जी चॅटर्जी

असीमा मुखर्जी चॅटर्जी : आणि त्यांची असीम कामगिरी
xx गुणसूत्रे घेऊन जन्म झालेली व्यक्ती असो किंवा xy.. व्यक्तीच्या कर्तुत्वाला या गुणसूत्रावरून निसर्गानं बंधनं घातली नाहीत, समाजानं घातली आहेत. हे आजच्या काळातही खरे आहे की xy गुणसूत्रे घेऊन तुम्ही जन्माला आला असाल, तर तुम्हाला तुमचे कर्तुत्व दाखविण्याची अधिक संधी मिळते, अजूनही xx गुणसूत्रे असलेल्या बहुतेक व्यक्तींना आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची लढाई करावी लागते. त्यातील काहीच ही लढाई जिंकतात. अशा या लिंगभेद करणाऱ्या समाजात शंभर वर्षापूर्वी जन्मलेल्या स्त्रीची कहाणी जाणून घेऊ, विज्ञानाच्या पुरुषप्रधान क्षितिजावर महिलांचं वेगळं स्थान निर्माण करून जी अजरामर झाली आहे. जी भारतीय विज्ञान काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष होती. भारतीय विद्यापीठामध्ये विज्ञान क्षेत्रात डॉक्टरेट मिळवलेली ही पहिली महिला. पद्मभूषण असीमा मुखर्जी चॅटर्जी, सेंद्रिय रसायनशास्त्रात केलेल्या असीम करणारी ही विदुषी, ज्यांनी शोधलेली औषधे कर्करोग, फिट येणे, हिवताप यावरील उपचारासाठी वापरली गेली, काही आजही वापरली जातात. भारताचं नोबेल पारितोषिक समजलं जाणारं शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक ज्यांना मिळालं आहे. "जिवंत असेतो माझी काम करण्याची इच्छा आहे" असे म्हणणाऱ्या डॉ. असीमा यांनी आपले शब्द खरे करून दाखवले. असीमाचा जन्म २३ सप्टेंबर १९१७ रोजी कोलकाता इथं झाला.. नारायण मुखर्जी आणि कमलादेवी या दाम्पत्यांचे हे पहिले अपत्य. वैद्यकीय व्यवसाय करणारे नारायण मुखर्जी हे पुरोगामी विचारांचे होते. हम दो हमारे दो हा नियम त्यांनी त्या काळामध्ये "नसताना" पाळला होता. अतिशय सुसंस्कृत असलेल्या या घरात कला आणि विद्या यांना समसमान महत्त्व होतं. घरामध्ये संस्कृत महकाव्यांवर चर्चा व्हायची. असीमाला लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताची तालीम सुरू झाली. धृपद आणि खयाल गायकीची तिने चौदा वर्ष तालीम घेतली. पुढं १९३३ मध्ये तिने अखिल बंगाल प्रांत संगीत स्पर्धेत दुसरा क्रमांक देखील मिळवला होता. समाजात इतरत्र स्त्री शिक्षणाविषयी प्रतिकूल परिस्थिती असताना मुखर्जी यांच्या घरात तिच्या लहान भावाइतकच असीमाच्या शिक्षणाला देखील महत्त्व दिलं होतं. वनस्पतीशास्त्राविषयी प्रेम असीमाला तिच्या वडिलांकडून वारशाने मिळालं होतं. या वनस्पतींचा वैद्यकीय वापर कसा होतो याचं कुतूहल असीमाच्या मनात बालपणीच जागृत झालं आणि पुढे तिने त्यातच संशोधन केलं. असीमाचं शालेय शिक्षण कोलकात्यामधील बेथून कॉलेजीएट स्कूल या विद्यालयात पूर्ण झालं.अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या असीमाने पंधराव्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास करताना बंगाल सरकारची स्कॉलरशिप मिळवली. नंतर दोन वर्षांनी इंटरची परीक्षा उत्तीर्ण होत असताना देखील बंगाल सरकारची स्कॉलरशिप, कलकत्ता विद्यापीठाची फादर लॅफनॉट स्कॉलरशिप आणि हेमपोर्व बोस पदक पटकावले. रसायनशास्त्रातील पदवीसाठी ती स्कॉटिश चर्च महाविद्यालयामध्ये दाखल झाली. त्याकाळात रसायनशास्त्राला अच्छे दिन आले नव्हते, केवळ तीनच विद्यार्थी रसायनशास्त्र शिकण्यासाठी उत्सुक होते, आणि त्यामध्ये असीमा ही एकमेव महिला होती.आई-वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे असीमा तिच्या आवडीचे विज्ञानाचे शिक्षण घेऊ शकत होती. १९३६ मध्ये पदवी मिळवताना देखील तिने विद्यापीठाचं बसंतीदास सुवर्णपदक पटकावलं. दोन वर्षांनी तिने सेंद्रिय रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण देखील पूर्ण केलं. विद्यापीठाचं रजतपदक आणि जोग्रनायादेवी पदक पटकावून तिने एमएससी पूर्ण केली. १९३८ मध्ये पदव्युत्तर शिक्षण.. त्या काळाच्या मानाने हेच शिक्षण प्रचंड मोठं झालं होतं मात्र असीमाच्या स्वप्नांना पंख फुटले होते, आता कोणतीही सीमा असीमाच्या स्वप्नांना बंदिस्त करू शकत नव्हती. आता तिला डॉक्टरेट करायची होती. महाविद्यालयातील तिच्या हुशारीची चुणूक बघून अनेक तज्ञ मंडळी तिला स्वतःहून मार्गदर्शन करत होते, त्यामध्ये आचार्य प्रफुल्लचंद्र रे, सत्येंद्रनाथ बोस यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. वनस्पतीजन्य रसायन आणि कृत्रिम सेंद्रिय रसायनशास्त्र यामध्ये तिने संशोधन केलं. आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांनी खास तिच्यासाठी एक शिष्यवृत्ती सुरू केली. स्वतःच्या पगारातून त्यांनी दरमहा ७५ रुपये देणं सुरू केलं. पुढं आपल्या विद्यार्थ्यांवर स्वतःच्या उत्पन्नातील रक्कम खर्च करण्याचा वारसा प्राध्यापिका झाल्यावर असीमाने देखील जपला. (हल्लीची प्राध्यापक मंडळी अर्थातच या लोकांनां मूर्ख समजतील) डॉक्टरेट करायला तिने तब्बल सहा वर्ष घेतली. याचा अर्थ असा नाही की संशोधन करण्यात तिने टाळाटाळ केली असेल, तिने खूप सखोल संशोधन केलं. (सखोल!! इथं आजच्या काळात phd करणारी मंडळी तिला मूर्ख समजतील) १९४० मध्ये सर्वोत्कृष्ट संशोधनासाठी विद्यापीठाचे सुवर्णपदक आणि नागार्जुन पारितोषिक असीमाला मिळाले. १९४२ मध्ये प्रेमचंद रॉयचंद स्कॉलरशिप आणि मानाचं मौट गोल्ड पदक देखील तिला मिळाले. १९४४ मध्ये कलकत्ता विद्यापीठाने तिला डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली. पुढच्या वर्षी डॉ असीमाला बरदनंदा चॅटर्जी यांचे स्थळ सांगून आले आणि लवकरच त्यांचे लग्न देखील झालं. लग्नाच्या वेळी रेल्वेमध्ये अभियंता असलेले बरदनंदा लवकरच हावडामधील अभियांत्रिकी कॉलेजात उपप्राचार्य म्हणून रुजू झाले. भूशास्त्र, रसायनशास्त्र शिकवणारे बरदनंदा आणि सेंद्रिय रसायनशास्त्रातील डॉक्टरेट असीमा यांचे रसायन चांगले जुळले. एकमेकाच्या विद्वत्तेचा सन्मान करत तसेच संशोधनाला वेळ देत त्यांचे सहजीवन सुरू झालं. या जोडप्याला ज्युली नावाची एक गोड मुलगी झाली. (ज्युली चॅटर्जी या नंतर ज्युली बॅनर्जी बनल्या. पती अद्वैत सोबत त्यादेखील रसायनशास्त्रातच संशोधन करत आहेत.) विद्यार्थ्यांवर खर्च करण्यासाठी असीमाला बरदनंदा मदत करत असत. कोलकाता विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून त्यांनी अध्यापन सुरू केलं मात्र त्यांना पोस्टडॉक्टरल संशोधन करायचं होत. भारतात अर्थातच सुविधांचा अभाव होता. त्यांनी अमेरिकेला जायचे ठरवले. एल. एम. पार्कस्, एल्. झेक मैस्टर या शास्त्रज्ञांनी त्यांना संशोधनाचं आमंत्रण दिलं. विद्यापीठात शैक्षणिक रजा टाकून डॉ चॅटर्जी १९४७ मध्ये अमेरिकेला कॅलटेक विद्यापिठात गेल्या, तिथं काही काळ अल्कलॉइडमध्ये संशोधन करून त्या युरोपात, स्विझरलँड मध्ये आल्या. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ पॉल करीट यांच्या सोबत झुरिक विद्यापीठात त्यांनी संशोधन केलं. संश्लेषणात्मक सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ या शाखेचा त्यांनी अभ्यास केला. १९५० मध्ये त्या कोलकाता विद्यापीठात परतल्या. इथे त्यांचे अल्कलॉइडवर संशोधन आणि मार्गदर्शन सुरू राहिले. सर्व प्राणी आणि वनस्पतींच्या शरीरात विविध स्वरूपात नायट्रोजनचे घटक कार्यरत असतात त्यांना अल्कलॉइड म्हणतात. औषधी वनस्पतींमध्ये असणारे हे घटक मिळवून त्याचा विविध आजारावर कसा वापर करता येईल यावर त्या संशोधन करत. हे संशोधन खूपच खर्चिक होतं. रसायनांच विश्लेषण करण्याची सोय भारतात नसल्यामुळे त्यांना परदेशी पाठवायला लागायचं. शिवाय त्यांच्या विद्यार्थ्यांचेही काही प्रकल्प चालू असायचे जे सरकारी निधीअभावी बंद पडतील की काय असं वाटायचं. बरदनंदा यांनी इथं मोलाची मदत केली. डॉ चॅटर्जी यांनी सेंद्रिय रसायनशास्त्रात तब्बल ४० वर्ष आपले महत्त्वाचे योगदान दिले आहे. रोझ्या स्ट्रिक्टा या वनस्पतीपासून जैसोसेहीझिन नावाचा रासायनिक पदार्थ वेगळे करून त्याचे गुणधर्म शोधून काढले. तसेच अज्मॅलीसिन व सर्पाजीन या रसायनांवर संशोधन करून त्यांची रचना स्पष्ट केली. अल्कालॉईड्स सोबतच कौमरीन्स आणि टर्पिनॉईड्स हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. सुपारी तंबाखू यांसारख्या वनस्पतींमध्य असणारी अल्कालॉईड्स औषधासाठी वापरता येऊ शकतात. सुगंधी द्रव्यांमध्ये वापरली जाणारी रसायने म्हणजेच कौमरीन्स आणि वनस्पतीपासून मिळणारे तेल म्हणजेच टर्पिनॉईड्स ही देखील औषधीदृष्ट्या गुणकारी असतात. निसर्गात मिळणारे विविध वनस्पती आणि घटक दडलेली रसायने शोधून ती मानवाच्या कल्याणासाठी वापरावी हा त्यांच्या संशोधनाचा हेतू होता. आपल्या ऋषी-मुनींनी देखील आयुर्वेदात अशी अनेक गुणकारी औषधे शोधून काढली होती. मात्र आयुर्वेदाचा आग्रह करणारे अनेकवेळा चाचण्यांपासून पळ काढताना दिसतात. इथे तसे घडले नाही. चॅटर्जी यांची मांडणी शास्त्रीय होती, तपासणी करण्यासाठी खुली होती. म्हणूनच आपल्या अनेक संशोधनाचे पेटंट त्या मिळवू शकल्या, त्यांनी शोधून काढलेली औषध अखिल मानवजातीसाठी उपलब्ध झाली. संशोधन करताना आकडी किंवा फिट येणे रोखणारे औषध डॉ चॅटर्जी यांनी शोधून काढले. सुनिष्णक आणि जटमानसी या वनस्पतीपासून तयार केलेलं आयुष ५६ हे औषध त्यांचे सर्वात मोठे यश समजले जातं. हे औषध आजही वापरले जाते. याशिवाय चार वनस्पतींपासून त्यांनी हिवतापविरोधी औषध तयार केलं. कर्करोगावर केमोथेरपीचे उपचार करताना अल्कालॉईड्स चा वापर प्रभावी असल्याचे त्यांनी शोधून काढले. या अल्कालॉईड्समुळे कर्करोगग्रस्त पेशींची वाढ थांबते. हे देखील तेव्हा अतिशय महत्त्वाचे संशोधन होत. आता डॉ. चॅटर्जी यांनी तयार केलेल्या औषधापेक्षा प्रभावी औषधे केमोथेरपी मध्ये वापरली जातात. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून सुमारे ४०० शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५९ विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी संपादित केली आहे. विद्यार्थ्यांना समजून घेत, प्रसंगी त्यांना आर्थिक मदत करत त्यांनी संशोधनाला प्रोत्साहन दिलं त्यामुळेच त्या "टिपिकल मॅडम" न बनता "दीदी" म्हणून ओळखल्या जायच्या. विद्यार्थ्यांकडून नवीन गोष्टी शिकायला शिकण्यात त्या कमीपणा मानत नसत. संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी तेव्हा एका विद्यार्थ्यामागे केवळ ३०० रुपये वार्षिक अनुदान मिळायचे. त्यापेक्षा जास्त विद्यावेतन तर विद्यार्थ्यांना मिळायचं. मात्र शास्त्रविषयक सामग्री अतिशय महागडी असल्यामुळे विद्यार्थ्यांना पैसे पुरायचे नाहीत. अशा वेळी दीदी मदतीला यायच्या. स्वतः संशोधन करीत असताना देशभरात संशोधनाला पूरक पार्श्वभूमी तयार करण्याचे काम देखील डॉ. चॅटर्जी यांनी केलं आहे. भारतात औषधी वनस्पतींवर अधिक संशोधन व्हावे व त्यातून आयुर्वेदिक औषधे निर्माण केली जावीत यासाठी ‘रिजनल रिसर्च सेंटर’ उभारण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डॉ विश्वास लिखित भारतीय वनौषधी (मूळ नाव भारतेर बनौशधी) या बंगाली ग्रंथाच्या सहा खंडांचे संपादन आणि इंग्रजी अनुवाद त्यांनी केला आहे. तब्बल ७०० औषधी वनस्पतींची माहिती त्यामध्ये आहे.त्याशिवाय चॅटर्जी यांनी लिहिलेलं सरल माध्यमिक रसायन हे पुस्तक बंगालमध्ये पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं जातं. १९६७ मध्ये या झुंजार बबल डोंगराचा पहाड कोसळला, आणि त्या शब्दशः उन्मळून पडल्या. त्यांच्या जीवनाला आधार आणि आकार देणारे वडील आणि पती या दोघांचेही चार महिन्याच्या अंतरातच निधन झाल. आतां सहन न होऊन त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि मृत्यू यामध्ये त्यांनी अनेक दिवस येरझाऱ्या केल्या. तीन महिन्यांनी त्या शरीराने बऱ्या झाल्या तरी मनाने मात्र खचल्या होत्या. अशा वेळी रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठातील डॉ चॅटर्जी यांचे गुरू आणि महाविद्यालयातील सहकार्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. लवकरच डॉ चॅटर्जी नव्या जोमाने संशोधन आणि अध्यापनात कार्यरत झाल्या. १९६८ मध्ये झालेल्या ऐतिहासिक सल्फा ड्रग खटल्याच्या डॉ चॅटर्जी या साक्षीदार. सल्फा ड्रगच्या पेटंट हक्कावरून बंगाल केमिकल आणि फार्मासिटिकल कंपनी आणि होईचेस्ट कंपनी यांचा वाद न्यायालयात गेला होता. बंगाल सरकारसाठी हा खटला इज्जतका सवाल होता. (लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी हा खटला लढवला होता.) रसायनशास्त्रातील आपल्या ज्ञानाच्या आधारे डॉ. चॅटर्जी यांनी विटनेस बॉक्स मधून हा खटला बंगाल केमिकल आणि फार्मासिटिकल कंपनीला जिंकवून दिला. विदेशी कंपनीचे विदेशी वकील, त्यातही ते पेटंट या विषयातील तज्ञ होते. रोज शेकडो प्रश्नांची सरबत्ती डॉ. चॅटर्जी यांच्यावर केली जायची आणि त्या शांतपणे त्यांना उत्तर देत असत. हा खटला एवढा गाजला की अनेक न्यायाधीश हा खटला पायला उपस्थित राहत असत. १९७५ साली भारतीय विज्ञान काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवताना त्या हा मान मिळवणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ ठरल्या. त्याच वर्षी त्यांना भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केलं. १९८२ पासून पुढं आठ वर्ष राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांना आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले. सेंद्रिय रसायनशास्त्रात त्यांचा शब्द प्रमाण म्हणून जगभर मानला जात असे म्हणूनच त्यांना व्याख्यान मार्गदर्शन किंवा पदवी दानासाठी जगभर बोलवण्यात येत होतं. अमेरिका, झेक गणराज्य, मलेशिया, हॉंगकॉंग, ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, इंग्लंड, पोलंड, जर्मनी, बल्गेरिया यांसारख्या देशात त्या अनेक वेळा मार्गदर्शन करून आलेले आहेत. १९८७ मात्र त्यांना प्रवास थांबवावा लागला.‌ सत्तरीमध्ये आल्यानंतर त्यांना अनेक औषधे घ्यावी लागत होती त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. आता त्यांना केवळ कोलकातामध्येच फिरण्याची मुभा होती.‌ सुदैव म्हणजे विद्यापीठ आणि त्यातील प्रयोगशाळा त्यांच्या घराजवळ होती. त्या आयुष्याच्या अगदी अखेरपर्यंत प्रयोगशाळेत संशोधन व मार्गदर्शन करीत होत्या. आजार हा मुद्दा त्यांनी जणू कालबाह्य ठरवला होता. मात्र ९० वे वर्ष सुरू झाले आणि त्यांचा आजार बळावू लागला. त्या कोमामध्ये गेल्या. या अवस्थेशी हॉस्पिटलमध्ये झुंजत असतानाच २३ नोव्हेंबर २००६ रोजी जगाचा निरोप घेतला. आणि एक झुंजार व्यक्तिमत्व हरपलं.‌ आजही भारतात वैज्ञानिकांमध्ये महिलांचे प्रमाण कमी असलं तरी परदेशात मात्र संशोधनामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे. भारतामध्ये देखील ही परिस्थिती लवकरच यावी, जानकी अम्मल, कमला सोहोनी, असीमा चॅटर्जी यांसारख्या स्त्रियांनी जेव्हा विज्ञानात आपला पाय ठेवला तेव्हा कित्येकांच्या भुवया उंचावल्या होत्या.. मात्र या विज्ञान तपस्विनींनी आपल्या कर्तृत्वाने हे दाखवून दिले की xx हे गुणसूत्र हे कशात कमी नाही. लहानपणी पंख छाटले नाहीत, पिंजऱ्यात कोंडले नाही तर त्यांची भरारी असीम असते. भविष्यात अश्या कोट्यावधी भराऱ्या पाहायला मिळो या सदिच्छा. 💐

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव