एक एप्रिल च्या निमित्ताने : लोच्या झाला रे
एक एप्रिलच्या निमित्ताने : लोच्या झाला रे
एक एप्रिल हा लोकांना मूर्ख बनवायचा दिवस. "बुरा ना मानो होली है" या टाईपमध्ये या दिवशी मूर्ख बनवले तरी लोकं हसण्यावारी नेतात. माणसं खोटे बोलतात..सर्रास खोटं बोलतात.. कदाचित उत्क्रांतीमध्ये मानवाला भेटलेली ही देणगी असावी, फलनासाठी किंवा भोजनासाठी सजिवांमध्ये आपल्या प्रजातीबाहेरील प्राणी, कीटक यांना फसवण्याचे प्रकार संशोधनातून समोर आले आहेत. मात्र आपल्याच प्रजातीला फसवण्याचा मार्ग इतर सजीव सहसा अवलंबत नाहीत. मात्र काही लोकं खोटे बोलण्यात एवढे सराईत होतात, की आपण खोटे बोलत आहोत हे देखील त्यांना लक्षात येत नाही. राजकारणात तर लोक अपरिहार्यपणे खोटं बोलत असतात, प्रत्येकालाच सत्याचे प्रयोग करायला जमत नाही.. परंतु सर्रास खोटं बोलण्यासाठी, किंबहुना असत्य हेच हत्यार म्हणून वापरण्यासाठी निबर काळीज आणि पाठीमागे आयटीची फौज लागते. 😀
जेव्हा मोबाईल आले नव्हते आणि गावातील मोजक्याच लोकांकडे लँडलाईन असायची तेव्हा एप्रिल फुल करणं खूप सोप्प जायचं. माणसं सहज फसायची. अर्थात तो काळ वेगळा होता, ज्या काळात केवळ सणवार असतानाच ताटात श्रीखंड दिसायचं, मात्र आता कधी पण, काही विशेष नसेल तरी ताटात श्रीखंड दिसते. त्याच पद्धतीने लोकांना मूर्ख बनवायचे असेल तर त्याला मुहूर्त लागत नाही. कदाचित लोकांना देखील पुन्हा पुन्हा मूर्ख व्हायला आवडतं. आपल्या प्रधानसेवकाने तर लोकांची ही सवय चांगली ओळखली आहे. आज आपल्या चोर सॉरी 😬 थोर प्रधानसेवकाशी स्पर्धा करेल अश्या व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून घेणार आहोत. संपुर्ण देशाला भिकेला लावणाऱ्या जॉन लॉ आणि त्याने केलेल्या लोच्याची माहिती घेणार आहोत.
"झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये" ही याचा प्रत्यय देणारा जॉन लॉ. त्याचा फ्रेंच उच्चार "लाज" शी साधर्म्य साधणारा असला तरी आपण त्याची लाज जास्त नको काढायला, म्हणून इंग्लिश उच्चार लॉ हेच वापरू. 😂तर हा जॉनराव.. एकेकाळी मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर तिची अंमलबजावणी व्हायच्या आधी जेलमधून पळून गेलेला हा व्यक्ती, ज्याला जुगाराचा एवढा नाद होता की खानदानाच्या इज्जतीसोबत संपत्तीदेखील त्याने मातीला मिळवली. हा जॉन १६७१ मध्ये कधीतरी जन्माला आला, त्याच्या जन्मदिवसाची नोंद नसली तरी त्याचा बाप्तिस्मा कधी झाला याची अधिकृत नोंद आहे. २१ एप्रिल १६७१ मध्ये त्याचा बाप्तिस्मा झाला.
स्कॉटलंड मधील एका श्रीमंत घरामध्ये जन्माला आलेला हा जॉन, ज्याच्या बापाच्या भरपूर जमिनी होत्या, शिवाय सावकारी आणि सोन्याची पेढीदेखील होती.
"लॉरीस्टनचे लॉ" असं प्रसिद्ध तालेवार घराणं, त्यातील हे लाडात वाढलेलं खुशालचेंडू पोरगं. एडिनबरा हायस्कूलमधून त्याचं शालेय शिक्षण झालं. त्याने गणित कॉमर्स आणि राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला, मात्र शाळेत काही विशेष हुशार नव्हताच. चौदाव्या वर्षी वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाला, पैसा हातात खेळू लागला आणि त्याची उधळपट्टी सुरू झाली. तो जुगाराच्या व्यसनात अडकला. १६८८ मध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यावर तीन वर्षातच त्याने घरचा धंदा बसवला, सगळे पैसे उडवले, जमिनी विकल्या, आणि लोकांच्या एवढ्या उधाऱ्या केल्या की त्या चुकवता न आल्यामुळं त्याला पळून जावं लागलं. त्यावेळी तो अवघा वीस वर्षाचा होता.
त्याने युरोपभर भटकंती केली. "ए बाबा, पचास आयडिया हे दिमाग मे." टाईप त्याला कल्पनाशक्तीची अफाट देणगी मिळाली होती. तो जगात कुठेही, काही विकू शकत होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु ज्या लॉटरीच्या तिकिटांना बक्षीस लागत नाही, त्यांना विमा संरक्षण देण्याची आयडिया देखील त्याने शोधून काढली होती आणि त्यातून त्याने भोळ्या भाबड्या डच जनतेकडून ८० हजार पौंड कमावले होते. हे सगळं करत असताना त्याने चौकसपणे अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं सुरू केलं. भटकंती करत जॉन लॉ लंडनमध्ये पोचला होता. इथेच त्याला त्याची प्रेयसी एलिझाबेथ भेटली.
एलिझाबेथ एक उमराव घराण्यातील मुलगी होती, जी याच्या दिखाऊपणाला भाळली. या दोघांना काही मुलंबाळ देखील झाली, मात्र त्यांनी अधिकृतरित्या लग्न केलं होतं की नाही याची नोंद नाही.
लंडन मध्येच ९ एप्रिल १६९४ रोजी जॉनने एका तलवारबाजाला सामना खेळायचे आव्हान दिलं. एडवर्ड विल्सनशी द्वंद्वयुद्ध सुरू झालं आणि काही सेकंदातच ते संपलं देखील… कारण तलवारीच्या एका वारानेच जॉन लॉने विल्सनला ठार मारलं होतं. लॉवर गुन्हा दाखल झाला त्याला मृत्युदंडाची शिक्षा देखील झाली. मात्र हा गब्बरसिंग जेल फोडून पळून गेला.. तो हॉलंडला पोचला, जिथं ब्रिटिश बेटावरचे पोलीस त्याला पकडू शकणार नाही. १६९५ मध्ये तो स्कॉटलंडला परत आला आणि त्याने अर्थशास्त्रात काम चालू केलं.
१७०४ मध्ये त्याने अर्थशास्त्रावरील आपला पहिला निबंध प्रसिद्ध केला, ज्यामध्ये शासनाने कसं धोरण अवलंबलं पाहिजे यावर विचार केला होता.
१७०७ मध्ये त्याने स्कॉटलंडमधील मंत्रिमंडळासमोर कागदाच्या नोटा छापण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र त्याच्या या प्रस्तावावर कुणीही सकारात्मक व्यक्त केलं नाही. त्यामुळे त्याला त्याच्या कल्पना राबवण्यासाठी इतर देशांचा आधार घ्यावा लागला. त्यांनी फ्रान्स आणि हॉलंडमध्ये दहा वर्ष भ्रमंती केली आणि "हाताच्या कोपराने खणण्यासाठी कुठे जमीन मऊ सापडते का?" याचा अभ्यास केला. तेव्हा फ्रान्समध्ये चौदावा लुई राज्य करत होता. चौदाव्या लुईने केलेल्या युद्धांमुळे फ्रेंच अर्थव्यवस्था अगदी तळागाळात गेली होती.
अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी. या लुईपुढे १७०८ मध्ये लॉने कागदी नोटांचा प्रस्ताव मांडला मात्र त्याची डाळ इथे देखील शिजली नाही.
त्यावेळी फ्रान्समध्ये सामंत शाही होती, ठिकठिकाणी असलेले जमीनदार छोटे राजा असायचे, सर्व जमीन त्यांच्या मालकीची असून त्यातील उत्पन्न देखील त्यांनाच मिळायचे, ज्याचा काही भाग कररूपाने फ्रान्सच्या राजाला पाठवला जायचा. लॉने छोटी छोटी मक्तेदार मोडून काढणारा नवा प्रस्ताव १७१५ मध्ये सरकार पुढं ठेवला. जमीनदारांकडून कर घेण्यापेक्षा सरकारी बँकेने पैसा कमवावा. व्यापार आणि बँक व्यवसाय हा फक्त आणि फक्त राजाच्या मालकीचा असेल. थोडक्यात अनेक लहानसहान मक्तेदारी मोडून एक मोठी मक्तेदारी लॉ स्थापन करून पाहत होता. मात्र त्याचा हा प्रस्ताव देखील फेटाळण्यात आला. तसेच लॉ हा अतिशय बदमाश व्यक्ती असल्याचं राजा लुईच्या गुप्तहेरांनी त्याला सांगितलं होतं, त्यामुळे शांत बसण्यावाचून लॉला पर्याय नव्हता.
लॉला केवळ दीड वर्ष शांत बसावं लागलं, कारण चौदावा लुई मृत्य पावला, आणि त्याचा अल्पवयीन मुलगा पंधरावा लुई हा गादीवर बसला. त्याच्या वतीने ड्यूक ऑफ ऑर्लीन्स हे राज्याचे प्रभारी म्हणून कारभार हाकणार होते. त्याने खोटंनाटं बोलून राजा पंधरावा लुई यासोबत परिचय करून घेतला. अतिशय उंची कपडे, उंची राहणीमान आणि शाही रितीरिवाजांचे काटेकोरपणे पालन यामुळे लॉ हा अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचा फील सगळ्यांना येत होता. आणि अशा गोष्टीसाठी कितीही पैसे खर्च करायची लॉची तयारी होती. अशाप्रकारे त्याने फ्रान्सच्या राज्य परिवाराशी सलगी वाढवली. राजपरिवाराची ओळख ही त्या काळात "लाईफमध्ये लिफ्ट" मिळण्यासाठी एकमेव निर्णायक बाब होती.
त्या काळात कशाला, आज देखील आहेच की "ज्याच्या वशिला, त्याचं कुत्रं देखील काशीला".. हे आपण पाहत आहोतच की.
त्या काळात जॉन लॉचा प्रभाव एवढा वाढला होता की त्याचा पुतण्या जीन लॉ याला भारतातील पाँडिचेरी या तत्कलिन फ्रेंच वसाहतीचा गवर्नर म्हणून पाठवण्यात आलं होतं. आपल्या मधाळ बोलण्यानं लॉने सर्व अधिकाऱ्यांसोबत ड्यूक ऑफ ऑर्लीन्सला देखील खिशात घातलं होतं. लॉने त्यांना पटवून दिलं की फ्रान्सवरील प्रचंड कर्जावर मात करण्याचा उपाय त्याच्याकडे आहे. एक प्रिंटिंग प्रेस भाड्याने घेऊन कागदाचे पैसे छापायचे, हा लॉच्या मते फ्रान्सचं कर्ज फेडण्यासाठी रामबाण उपाय होता.
जरी कागदाच्या नोटा अगदी सातव्या शतकापासून चीनमध्ये छापत असल्याचे पुरावे मिळत असले, तरी युरोपमध्ये कागदी नोटा यायला सतरावं शतक उजेडावं लागलं होतं. त्या काळात कागदाच्या नोटा ही अगदी युरोपात नवीनच संकल्पना होती, आणि नुकतेच १६६१ मध्ये स्वीडनने कागदी चलनाचा वापर सुरू केला होता.
नंतरच्या काळात स्कॉटलंड, इंग्लंड यांनी आघाडी घेतली असली तरी फ्रेंच सरकारने मात्र कागदाच्या नोटा अद्याप वापरल्या नव्हत्या. जॉन लॉ याने दाखवलेल्या स्वप्नांमुळे ड्यूक ऑफ ऑर्लीन्स अतिशय प्रभावीत झाला. सगळे कर्ज फिटणार, आणि इतिहासात आपलं नाव अजरामर होणार या विचारानेच ड्यूक ऑफ ऑर्लीन्स एवढा प्रभावीत झाला की त्याने या स्कॉटलंडच्या नागरिकाला १७१६ मध्ये रॉयल बँक ऑफ फ्रान्सवरील तसेच रॉयल प्रिंटिंग प्रेसवरील सर्व नियंत्रण बहाल केलं.☹️
झालं, कावळ्याच्या हातात कारभार आणि हागुन ठेवला दरबार. एका अट्टल जुगारी माणसाला एका संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा नियंत्रण देण्यात आलं होतं..
तुम्ही लोक शेठला नाव ठेवता आणि त्याने अनिल बोकीलचे ऐकून नोटाबंदी केली म्हणून हसता, परंतु सत्ताधाऱ्यांना अक्कल नसते हेच खरं. जेव्हा त्यांना देशाचा प्रश्न कसे सोडवावेत हे समजत नसत, (आणि आसपासचे तज्ञ लोक तुमच्या तुघलकी कारभाराला वैतागून दूर निघून गेलेले असतात) त्यावेळेस सत्ताधारी कोणत्याही खुळचट कल्पनेला डोक्यावर घेतातच. आणि काडीचा आधार शोधता शोधता बुडत्याचा पाय अधिक खोलात जातो. इथं देखील तेच होणार होतं, मात्र त्याआधी या फुग्यामध्ये भरपूर हवा भरली जाणार होती. 🥳
लॉने तयार केलेल्या कागदाच्या नोटा सर्वत्र वितरीत करण्यात आल्या. या देशामध्ये काही दिवसापूर्वी अनोळखी असलेली ही व्यक्ती एकाच रात्रीमध्ये फ्रेंच अर्थव्यवस्थेचा अनभिषिक्त राजा बनली होती. फ्रान्सच्या राजानंतरची देशातील दुसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनली होती. नेहमीची तांब्याची चांदीची आणि सोन्याची नाणी वागवण्यापेक्षा जनतेला या कागदाची चलनं वापरणं सोयीचं वाटत होतं. देशातील सोन्याच्या साठ्याच्या पाचपट किंमतीच्या नोटा छापून वितरीत करण्यात आल्या होत्या, बाजारात पाचपट अधिक चलन पुरवठा झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला गती आली होती. आजच्या काळामध्ये आपण जसं ओपिनियन पोल घेतो, “देशातील सर्वात आवडती व्यक्ती कोण?” यासाठी मतदान घेतो, तसं जर तेव्हा घेतलं असतं तर नक्कीच लॉ विजेता ठरला असता. 😂
प्रसिद्धीच्या प्रचंड मोठ्या लाटेवर असतानाच त्याने त्याचा दुसरा मोठा प्रकल्प जाहीर केला "द मिसिसिप्पी कंपनी". अमेरिकेचा शोध लागल्यापासून युरोपीय लोकांना असं वाटत होतं की तिथं जणू काही खजिना दडला आहे. या नव्या जगाबाबत अनेक अफवा युरोपमध्ये पसरल्या होत्या आणि या अफवा कॅश करून घेण्यासाठी अनेक संधीसाधू पुढे देखील आले होते. जॉन लॉ हा देखील त्यापैकी एक. लॉने द मिसीसीपी कंपनीची घोषणा १७१८ मध्ये केली, मिसिसिप्पी नदीच्या खोऱ्यामध्ये दडलेला खजिना मिळवणं आणि फ्रान्समध्ये घेऊन येणं हा या कंपनीचा हेतू असल्याचं सांगण्यात आलं.
या कंपनीमध्ये फ्रेंच जनतेला शेअर विकत घेऊन स्वतः या कंपनीचे मालक होण्याची संधी होती. ५०० लिरा किमतीचा एक असे २ लाख शेअर विकून दहा कोटी लिराचे भांडवल उभारून ही कंपनी दर्यावर्दी मोहिमांना पाठबळ देणार होती. या मोहिमातून होणारा नफा आपल्या समभागधारकांना देणार होती.
लुसियाना राज्यांमधून मिसीसीपी नदी वाहत जाते, जिथं सर्वात प्रथम फ्रेंच दर्यावर्दी (कोल्बर्ट, जुलीएट, मार्क्वेट) हे पोचले होते, त्यामुळे नंतर तो भाग "फ्रेंच" असल्याचा दावा केला होता. "जो जिथे आधी जाईल त्याला ती जमीन" असा अजब कायदा त्या काळात युरोपमध्ये होता आणि ब्रिटिश, डच, फ्रेंच, पोर्तुगीज हे आपापसात हा अलिखित नियम मान्य देखील करत होते. (त्यामुळेच त्या काळातील राजे त्यांच्या खलाशांना भरपूर पैसे देऊन समुद्रावर पिटाळत होते.)
फ्रेंच दर्यावर्दी जेव्हा परत फ्रान्समध्ये आले, तेव्हा त्यांनी सांगितल की लुसियानादेखील मेक्सिकोप्रमाणेच समृद्ध प्रांत आहे, जिथं सोनं आणि चांदीचे मोठमोठे साठे केवळ कुणीतरी लुटून घेण्याची वाट पाहत तसेच पडून आहेत. त्यांनी तिखटमीठ लावून केलेल्या वर्णनामुळे लुसियाना ही जणू सोन्याची भूमी असल्याची अफवा फ्रान्समध्ये पसरली होती.
लॉ हा स्वतः कधीच मिसिसिप्पीला किंवा अमेरिकेतील इतर कोणत्याही ठिकाणी देखील गेला नव्हता. मात्र एखादा कुशल सेल्समन सांगतो त्याप्रमाणे या अतिरंजित कथा खऱ्या असल्याबाबत त्यानं जनतेला पटवून दिलं.
लॉची पुंगी वाजली आणि तिची मोहिनी पसरली. लॉच्या बंगल्यासमोरील छोट्या छोट्या रस्त्यावर प्रचंड गर्दी उसळली. सर्वांना शेअर विकत घेण्यासाठी अर्ज करायचा होता. आपल्या हातात नव्याने पडलेल्या कागदी नोटा फडकावत ही सर्व मंडळी लॉच्या प्रतिनिधीचं लक्ष आपल्याकडं कसं जाईल आणि आपला अर्ज कसा स्वीकारला जाईल यासाठी जनतेची धडपड सुरू होती, ओरडाआरडा कडून लक्ष वेधून घेत होती.
ज्याच्या हातामध्ये शेअरचा कागद पडेल तो स्वतःला धन्य म्हणून घेत होता, घरी जाऊन मेजवानी देत होता. ज्याला दिवसभर उभा राहून देखील शेअर मिळणार नाही, त्याची बायको त्याला घरात देखील घेत नव्हती.🤭
लॉने उडवलेल्या धूरळ्याकडे या सरकारने चक्क डोळेझाक केली होती. लॉ ने अधिकाऱ्यांची तोंड अनधिकृतपणे पैसे चारून बंद केली होती, तर सरकारला उघड उघड आर्थिक मदत केली होती. पुढे अजून ३ लाख शेअर्स बाजारात आणण्याची परवानगी लॉ ला मिळाली, आणि लॉच्या कंपनीने दीड अब्ज लिरा, वर्षाला केवळ तीन टक्के व्याजाने, सरकारला वापरायला दिले. आणि स्वतच्या लोच्यावर पांघरून घालून घेतलं.
फ्रान्समध्ये तेव्हा आबाल वृद्धांपासून प्रत्येक व्यक्तीला “मिसिसिप्पी ज्वरानं” ग्रासलं होतं. कुठंही अस्तित्वात नसलेलं, कुणीही कधीही न पाहिलेलं मिसिसिप्पी सोनं मिळवणं हे प्रत्येकाचं सोनेरी स्वप्न झालं होतं. लॉची कंपनी नक्की काय आहे, याबद्दल लॉ वगळता इतर कुणालाही काहीही माहिती नव्हती, लॉ किंवा त्याच्या कंपनीबद्दल क्वचित कुणी जर प्रश्न विचारला तर अशी व्यक्ती शहराबाहेर तडीपार केली जायची. (मग काय.. देशद्रोही कुठले..😀)
नशीब त्या काळामध्ये गोदी मीडिया नव्हता, नाहीतर त्यांनी देखील अशा योजनेचे स्टिंग ऑपरेशन करण्यापेक्षा लॉने फेकलेले तुकडे चघळत दिवसभर लॉ महती गायली असती, आणि देशद्रोह्यांना कसं ठेचून मारलं पाहिजे हे देखील सांगितलं असतं.
अशा हवेच्या फुग्यावर, खोटी आश्वासन देणाऱ्या या वेडपट योजनेवर, सर्व लोकांनी आपल्या आयुष्याची संपूर्ण कमाई लावली होती. त्याकाळात डाऊन पेमेंट करून शेअर उचलायची देखील सोय होती.
५०० लिराच्या शेअर साठी तुम्ही आता केवळ ७५ लिरा भरा, आणि उरलेली रक्कम सुलभ १७ हप्त्यात द्या. (अर्थात तेवढ्या रकमेचे तारण ठेवायचे आहे बरं का) त्यामुळे झाले काय, की ५००० लिरा खिशात असलेली व्यक्ती आता ४९५० लिरा मध्ये ३३००० लिरा दर्शनी मूल्याचे ६६ शेअर विकत घेत होती, अन ५० लिराचे पेढे वाटत होती. त्याच वेळी तिच्या डोक्यावर २८०५० लिराचे कर्ज होत होतं. पण मुळात एका शेअरची किंमत तरी एका ५०० रुपये कायम होती का..
ज्या लोकांनी सुरुवातीला शेअर विकत घेतले, त्यांनी दुसरा हप्ता देईपर्यंतच शेअरचे भाव दुप्पट झाले, आणि शेअर विकत घेण्यासाठी लोकांच्या उड्या पडू लागल्या. दोनच वर्षात ५०० लिराच्या शेअरची किंमत १०००० लिरा झाली. आणि त्यातील १५ टक्के म्हणजे १५०० लिरा भरून आणि ८५०० लिराचे कर्ज घेऊन लोक ५०० लिराचा शेअर विकत घेऊ लागले. 😬
गम्मत लक्षात घ्या.. शेअरचे दर्शनी मूल्य ५०० लिरा, विकत केवढ्याला घेतलं तर १५०० लिरा देऊन आणि तरीही कर्ज किती ८५०० लिराचे.. काय म्हणणार याला.🤭
समभागाची किंमत अगदी क्षणाक्षणाला वाढत चालली होती. फ्रान्स राज्यामध्ये असलेल्या एकूण सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त किंमत लॉच्या कंपनीची झाली, तरीदेखील खरेदीदारांची गर्दी कमी होत नव्हती. नफ्याच्या नशेमध्ये झिंगलेले गुंतवणूकदार अशा संधी प्राप्त करण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतात. मात्र लवकरच किंमती धडाधड कोसळतात. इथंदेखील तेच झालं. मिसिसिप्पीचा आभासी फुगा जेव्हा फुटला, आणि जेव्हा लोकांना कळलं की लॉची कंपनी हे केवळ एक ढोंग आहे, लॉ हा उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या शहाण्यापेक्षा जास्त हुशार नाही, तेव्हा लोकांनी आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली.
दर्शनी मूल्याच्या ४० पट म्हणजेच २०००० चा उच्चांक गाठलेले मिसिसिप्पी शेअर्सचे भाव अनेक महिने १०००० वर कायम होते, मात्र मे १७२० मध्ये ते ९००० पेक्षा खाली आले. तशी ही पडझड छोटीच होती, मात्र ज्यांनी कर्जाने पैसे काढून शेअर्स विकत घेतले होते, ती लोक घाबरली, त्यांनी त्यांचे शेअर्स विकायला सुरुवात केली आणि बघता बघता भाव ४००० वर आला. शेअर्सचे भाव अचानक कोसळायला लागल्यावर लॉचे धाबं दणाणलं. चलन नियंत्रणात यावं आणि बाजारात उठलेली धूळ शांत व्हावी यासाठी त्याने ६ दिवस बँक आणि शेअरबाजार बंद ठेवायचा निर्णय घेतला. मात्र लोक त्यामुळे जास्तच घाबरले. त्यांनी आपले शेअर्स विकण्याचा प्रयत्न केला, मात्र ते घेण्यासाठी एकही व्यक्ती उत्सूक नव्हता. शेअर्सचा भाव कवडीमोल झाला होता.😔

लोकांनी आपली आयुष्यभराची कमाई गमावली, शिवाय डोक्यावर कर्ज झालं, फ्रेंच अर्थव्यवस्था कोसळली आणि त्यासोबत बँकिंगप्रणाली देखील कोसळली. रातोरात हिरो ठरलेला लॉ हा त्याच पद्धतीने रातोरात खलनायक म्हणून बदनाम झाला. जरी त्याने लोकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेतला असेल तरी लोकांची पण त्यात तेवढीच चूक होती. लॉ ची मूळ कल्पना चुकीची नव्हती असं आज अनेक अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, आणि त्याची तुलना ॲडम स्मिथशी करतात. त्याच्या काळातच फ्रान्सच्या सरकारची व्यापारी जहाज ६० वरून ३०० एवढी वाढली होती हे अधोरेखित करतात. मात्र आज जरी त्याची भलामण कोणी किती करत असेल, तरी त्या काळात त्याला जीव वाचवत फ्रान्स सोडून परागंदा व्हावं लागलं होतं.
फ्रान्स सरकारने त्याची सर्व मालमत्ता जप्त केली आणि निघून गेला. पुढे काही दिवस त्याने कोपनहेगन, व्हेनिस आणि रोम इथं जुगार खेळण्यात घालवला, मात्र त्याला त्याचं वैभव पुन्हा प्राप्त करता आलं नाही. त्याला पुन्हा फ्रान्समध्ये कधीच परतता आलं नाही. १७२९ मध्ये अत्यंत कफलक अवस्थेमध्ये जगत असताना न्यूमोनियानं त्याला गाठलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचं थडगं व्हेनिसमध्ये बांधण्यात आलेलं आहे. या जुगारी माणसाच्या प्रवृत्तीमुळे एक संपूर्ण देश भिकेला लागला होता हे विसरून चालणार नाही. असत्याच्या आधारावर तुम्ही काहीही उभं केलं तरी ते शाश्वत नसतं हे यातून पुन्हा सिद्ध झालं.
असे म्हणतात की सत्य चप्पल घालेपर्यंत असत्य गावभर हिंडून येते. इथे माजी प्रधानसेवक दोन वाक्य बोलेपर्यंत आजी प्रधानसेवक दहा देश हिंडून येतात. खोटं बोलणं हा कदाचित एकेकाळी वाईट संस्कार असेल, मात्र आता खोटं बोलणं हेच न्यू नॉर्मल म्हणून स्थापित झाले आहे. आणि या न्यू नॉर्मल श्रेय निश्चितपणे मोदी यांनाच गेले पाहिजे. असा व्यक्ती हजारो वर्षाच्या इतिहासातून एकदाच होत असतो. किमान या गोष्टीमध्ये आपण संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करू शकू. अशी क्षमता असलेला विश्वगुरू आपल्याकडे आहे ही सर्व भारतीयांसाठी आनंदाची, कौतुकाची, अभिमानाची आणि अस्मितेची बाब असली पाहिजे. नमो नमो 🙏🏾
भक्तो.. बूरा ना मानो, एक एप्रिल है❤️
#richyabhau
#april_fool
आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com/
Comments
Post a Comment