डॉ. वामन कोकटनूर : शास्त्रज्ञ की कन्फर्मेशन बायसचा पीडित?

डॉ.
वामन कोकटनूर : शास्त्रज्ञ की कन्फर्मेशन बायसचा पीडित? विज्ञान म्हणजे चिकित्सा.. त्यामुळे प्रत्येक वैज्ञानिक, शास्त्रज्ञ हा त्याच्या आयुष्यात चिकित्सक असेल अशी किमान अपेक्षा असते. मात्र काही शास्त्रज्ञ याला अपवाद ठरतात. तुफान हुशार पण सैतानी पूजा करणाऱ्या जॅक पार्सन या शास्त्रज्ञाची आपण ओळख करून घेतली होतीच. (कुणाला माहिती हवी असेल तर https://richyabhau.blogspot.com/2021/02/blog-post_14.html इथे उपलब्ध आहे.) आज ज्या शास्त्रज्ञाची ओळख करून घेणार आहोत त्यांनी ३० पेक्षा अधिक पेटंटवर आपले नाव कोरले होते, मात्र त्यांची पूर्वग्रहदूषित विचारशैली हीच त्यांची मर्यादा ठरली. पुराणातील भाकडकथा खऱ्या ठरवण्यासाठी त्यांनी प्रचंड आटापिटा केला, त्यामुळे त्यांच्याकडून अधिक महत्त्वाचं संशोधन होऊ शकलं नाही. 😭 वामन कोकटनूर, रसायनशास्त्रात अतिशय हुशार असलेला हा माणूस कन्फर्मेशन बायसमध्ये अडकला आणि त्याची प्रगती थांबली. " माझ्या धर्मग्रंथात जे लिहिले आहे, मला माझ्या बापजाद्यांकडून जे समजले आहे, तेच अंतिम सत्य आहे, आणि ते मी तपासून पाहणार नाही, उलट तेच खरे कसे हे सिद्ध करण्यासाठी लंगडे पुरावे मांडणार. "हे प्राचीन ग्रंथ कदाचित कविकल्पना असतील" ही शक्यता पूर्णपणे नाकारणार." या वृत्तीने या वामनाच्या विज्ञानाला पाताळी गाडले. आपल्याला हवं ते उत्तर मिळवण्यासाठी मधल्या स्टेपमध्ये खाडाखोड करायची.. याचं वामन कोकटनूर हे चपखल उदाहरण. असा वामन परतून ना यावा..यासाठी या वामनाची आज माहिती घेऊ. कोकटनूर हे बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात असलेलं लहानसं गाव. आडनाव म्हणून गावाचं नाव वापरण्याची पद्धत अनेक ठिकाणी असते, तसंच इथं कोकटनूर हे नाव १८८७ मध्ये जन्मलेल्या वामनला मिळाले. आणि त्याचं नाव वामन रामचंद्र कोकटनूर असन नोंदवलं गेलं. त्याच्या अचूक जन्मतारखेची, लहानपणाची किंवा आई-वडील बाबतची अधिक माहिती उपलब्ध नाही. १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठातून बीएससी पदवी प्राप्त केल्यानंतर या भाऊचा पिक्चर सुरू होतो. अतिशय हुशार असल्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळते आणि हा वामन अमेरिकेमध्ये मिनेसोटा विद्यापीठात एमएससी करण्यासाठी दाखल होतो. ❤️ १९१४ मध्ये एमएससी पूर्ण होत असतानाच युरोपमध्ये पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलेला असतं. १९१६ मध्ये पीएचडी पूर्ण करून रसायनशास्त्रात आपले प्रावीण्य दाखवत तो तिथंच स्थायीक होतो, १९२१ मध्ये त्यांना अमेरिकन नागरिकत्व देखील बहाल केलं जातं. हेलेना ग्रॅब्बर या युवतीशी लग्न करून न्यू जर्सी राज्यामधील आर्लिंगटन या शहरात त्यांचा संसार सुरू होतो. तिथं अध्यापकाची नोकरी मिळते. लवकरच या जोडप्याच्या संसारात उर्मिला नावाच्या मुलीची भर पडते. मात्र या अध्यापकाला शिकवण्यामध्ये अजिबात रस नव्हता, भारतातील जातिव्यवस्थेची सोपान परंपरा मनामध्ये भिनलेली असताना इथं अमेरिकेत कोणीही शिक्षण कसं घेऊ शकतं ही बाब त्यांना भेडसावत होती.‌☹️
परदेशात गेलेल्या व्यक्ती आपल्या संस्कृती आणि मायभूमीबद्दल जरा जास्तच अभिमानी असतात. संकुचित विचारांच्या कोकटनूर यांचदेखील तसंच होतं, त्यांचा आपल्या भारतातील ढोंगी संस्कृतीबद्दल दुराग्रह होताच. जाती धर्माचे संस्कार त्यांच्या बालमनावर एवढे घट्ट रुजले होते की विज्ञानाचे शिक्षण हे सर्वांसाठी नसलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. केवळ ते विचार करून थांबले नाहीत तर त्यांनी चक्क याबद्दल लिखाण देखील केलं आहे. त्यात ते म्हणतात की प्रत्येकाला शिक्षणाचा जन्मसिद्ध अधिकार देणारी अशी "टू मच डेमोक्रसी" विज्ञानाला मारक असून प्रत्येकाने त्याच्या बौध्दीक कुवतीनुसारच काम केलं पाहिजे, आणि त्यासाठी आवश्यक असलेलंच शिक्षण घेतलं पाहिजे, रसायनशास्त्र हा विषय सर्वांसाठी खुला नसावा." हुशार परंतु विचारांची दिशा चुकलेल्या या तरुण शास्त्रज्ञाला नायगारा अक्लकी कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळते. स्वस्त वीजेचा मुबलक पुरवठा तसेच जवळपासच्या खाणीमधून मिळणारे खनिज आणि क्षार यांमुळे ही कंपनी जगप्रसिद्ध नायगारा धबधब्याजवळ १९०३ मध्ये स्थापन झाली होती. तिचं मूळ नाव हूकर केमिकल कंपनी असलं तरी नायगारा केमिकल कंपनी या नावाने ती अधिक प्रसिद्ध होती. सेंद्रिय पदार्थांच्या संश्लेषणात विविध उत्प्रेरकांचा वापर कसा करायचा, कपडे धुताना क्लोरीन आणि कॉस्टिक सोडा यांचा वापर कसा करायचा यात त्यांनी संशोधन केलं. ॲल्युमिनियम क्लोराईड हे त्यांचं संशोधनाचं आवडतं संयुगं. त्यावर त्यांनी सखोल संशोधन करून अनेक पेटंट आपल्या नावावर केली. १९२८ मध्ये त्यांना रशियामध्ये बोलावलं जातं. तिथं त्यांनी डिटर्जंट पावडरवर संशोधन केलं. दुसरं महायुद्ध जेव्हा सुरू झालं, तेव्हा अमेरिकन सरकारने त्यांची नौदलात कॅप्टन या पदावर सैन्यदलाचे विशेष सल्लागार म्हणून नेमणूक केली. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेला त्यांच्या रसायनशास्त्रातील ज्ञानाची महत्त्वाची मदत झाली. आणि हा माणूस भविष्यात खूप मोठा रसायनशास्त्रज्ञ होईल असं वाटत असतानाच १९४८ मध्ये या कहाणीत क्लायमॅक्स आला. प्राचीन भारतातील अगस्त्य मुनीने मांडलेलं, अगस्त्य संहितेवरील लिखाण त्यांच्या वाचनात आलं आणि त्याने त्यांना झपाटून सोडलं. धर्माची आणि संस्कृतीची अस्मिता जागी झाली, आणि तिने मेंदूवर ताबा मिळवला. सप्तर्षीपैकी एक अगस्ती मुनी आपल्याला परिचित असेलच.. तोच तो… राग आला म्हणून सारा समुद्र पिऊन टाकला होता तोच. आता जो समुद्र पिऊ शकतो तो तर काय पण करू शकतो म्हणा.. (शिवाजी महाराजांना हा अगस्ती भेटला असता, तर समुद्र पिऊन जंजिरा सोपा केला असता एखाद्याने😀😀) आकाशात सप्तर्षी रुपात दिसणाऱ्या या अगस्तीला विसाव्या शतकात वर आणलं गेलं, आणि पुराणातल्या शिळ्या कढीला पुन्हा उत आला☹️
उज्जैनमध्ये रावसाहेब वझे नावाच्या इंजिनिअर व्यक्तीने १९२४ दावा केला की अगस्त्य ऋषींच्या संहितेची काही पाने मिळाली असून १५५० मध्ये लिहिलेलं ते हस्तलिखित आहे. हीच पाने कोकटनूर यांच्या वाचनात आली. पण इथे एक गोम होती, ही माहिती फर्स्ट हॅण्ड नव्हती, मात्र पूर्वग्रह दूषित असल्यावर, आपल्या सोयीच्या माहितीची शहानिशा का करावी? ☹️ जोशी नावाच्या एका व्यक्तीने गाडगीळ नावाच्या व्यक्तीमार्फत ही माहिती मिळवली होती. या जोशीचा दावा होता की त्याने ओरिजनल संहितेवरून कॉपी केलं आहे. वझे यांनी डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवला.. आणि कोकटनूर यांनी वझे यांच्या खांद्यावरचे ओझे आपल्या खांद्यावर घेतले आणि आयुष्यभर वाहिले.🤪 वेदिक संस्कृतीचे गोडवे गाणारे लेखक परशुराम थत्ते यांनीदेखील या प्रकरणाला भरपूर हवा दिली. त्यांनी दावा केला की ही अगस्त्य संहिता ७००० वर्षापूर्वीची आहे. प्रत्येकाने आपल्याला सोयीचा अर्थ लावला. (ऑगस्ट महिन्याच्या नावात अजून या अगस्तीला कसं घुसवला नाही, नवलच आहे😭😂) कोकटनूर यांच्या मते भारतामध्ये वीजनिर्मिती आणि विद्युतघटाचा शोध हजारो वर्षांपूर्वी लागला होता. मित्र आणि वरूण हे देव कॅथोड आणी ॲनोडचे काम करत होते. पाण्याचे पृथक्करण करून त्यातून प्राणवायू आणि उदानवायू म्हणजेच ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे वेगळे करता येण्याचे तंत्र प्राचीन ऋषींना अवगत होतं.‌ अमेरिकन केमिकल सोसायटीमध्ये त्यांनी रिसर्च पेपर वाचला ज्यामध्ये त्यांनी दावा केला की कॅव्हेंडिश आणि प्रीस्टले हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा शोध लावणारे नसून याचा शोध भारतात शेकडो वर्षांपूर्वी लागलेला आहे. दुसऱ्या रिसर्च पेपर मध्ये त्यांनी दावा केला की रसायनशास्त्र ही ज्यू धर्माची आणि ग्रीक साम्राज्याची देणगी नसून भारतात आर्यन वंशामध्ये या शास्त्राचा विकास झाला होता. तांब्याच्या १०० पेक्षा अधिक भांड्यात कॉपर सल्फेट, मोराच्या मानेसारख्या रंगामुळे ज्याला मोरचुद असे नाव देखील आहे त्याला ओल्या लाकडी भुश्याने झाकून ठेवायचे आणि त्यावर जस्त पारा यांना एकत्र करून टाकायचे म्हणजे त्यातून विद्युत निर्मिती होते. अश्या १०० पेक्षा अधिक घटांची जोडणी केली तर इलेक्ट्रोप्लॅटिंगसाठी वापरले जात होते. 🤭
कोकटनूर यांच्या मताला तेव्हा तीव्र विरोध झाला नाही. त्यामुळे त्यांचा समज अधिक दृढ होत गेला की रामाने पुष्पक विमान वापरून श्रीलंका ते अयोध्या प्रवास पाच दिवसात केला.. आणि हे विमान हायड्रोजन गॅसवर उडत होते. त्या काळात आपल्या भारतात क्षेपणास्त्रं होती, आणि त्यावर वायूअस्त्र फिट केलं की शत्रूच्या अड्ड्यावर विषारी वायू पसरणार, हजारो लोकं मरणार. पर्जण्यास्त्र ऐकून मला लहानपणी गम्मत वाटायची. शत्रूने आपल्या टीमवर हे अस्त्र सोडलं तर लोक मस्त रेनडान्स करतील असं वाटायचं.. पण हा पाऊस साधासुधा नाही, इथे आम्लवर्षा होणार आहे बाबा🤭 कोकट नूर यांचा १८ एप्रिल १९५० रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युनंतर हे सिद्ध झाले की ते ज्या हस्तलिखिताचा आधार घेऊन दावा करत होते, ते १५५० चे नसून नजीकच्या काळातील, विसाव्या शतकातील आहे. अर्थात अजूनही तो दावा खरा आहे असे म्हणणारे वेळोवेळी पुढं येत असतात. पू ना ओक, राजीव दीक्षित यांसारखी मंडळी शिकल्या सवरल्या लोकांच्या मेंदूचा ताबा घेत असतात. आजही प्रवीण मोहन सारखे युट्युबर लक्षावधी लोकांना उल्लू बनवत असतातच.. आणि त्यांना मोठं मोठी टीव्ही चॅनल्स आपला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असतातच. लोकांसमोर खरं येईपर्यंत खोट्याने गावभर चक्कर मारलेली असते. त्यात सध्या शेठच्या काळात छदमविज्ञान जोरावर आहे. त्यामुळेच वरील प्राचीन शोधांचा जन्म भारतात झाल्याचे भारतीय विद्या भवन प्रकाशनने प्रकाशित केलेल्या भारतीय विद्या सार या नावाच्या पुस्तकात मांडले होते, आणि हे पुस्तक ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या संस्थेकडून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना देण्यात येणार होतं. मात्र देशातील शास्त्रज्ञांनी या विरोधात एकमुखाने आवाज उठवला आणि हे पुस्तक विद्यार्थ्यांना देऊ नये यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेत काम करणारे शास्त्रज्ञ अनिकेत सुळे यांनी याबाबत पुढाकार घेतला होता, ७५० पेक्षा अधिक शास्त्रज्ञांनी या याचिकेवर सह्या केल्या आहेत. "सर्फराज धोका देगा" कन्फर्मेशन बायस हा एक अतिशय घातक प्रकार. आपल्याला हवा असलेला निष्कर्ष काढण्यासाठी जिथे तथ्यांची मोडतोड केली जाते, खोटी मांडणी केली जाते किंवा तथ्यातील एकच सोयीची बाजू मांडली जाते. (काश्मीर फाईल्सच्या दिग्दर्शकाने केलं तसं) अश्या कन्फर्मेशन बायस असलेल्या अनेक व्यक्ती आपल्या आसपास आढळतील. आपले देखील कुणा व्यक्तिबाबत ठाम मत असेल, जे कदाचित चुकीचे असेल. आपले आईवडील, आपला जोडीदार यांच्या आपल्याबद्दलच्या कन्फर्मेशन बायस असण्याचा आपल्याला वैताग येत असतोच. लहानपणी शाळेत असल्यापासून अगदी नोकरी करताना बॉसकडून देखील आपल्याला हा प्रत्यय येतो. विज्ञान असो अथवा विवेकी,परिवर्तनाची चळवळ.. बदल स्वीकारणे अपेक्षित असते. नवी माहिती समोर आली तर ती तपासून घेऊन खरी ठरल्यास स्वीकारण्याचा मोकळेपणा असावा लागतो. हा मोकळेपणा होता, म्हणूनच आजवर विज्ञान विकसित होत गेले आहे. मात्र हा मोकळेपणा नाहीसा होत चालला आहे, विरोधी मत ऐकून त्याचा मुद्देसूद प्रतिवाद केला जात नाही. या प्रकारची समाजात कन्फर्मेशन बायस असलेल्या लोकांची वाढती संख्या धोक्याची घंटा ठरतो. त्यामध्ये अंधभक्त तर आहेतच पण काहीवेळा अंधभक्तांना विरोध करणारे देखील कन्फर्मेशन बायस असण्याच्या आजाराचे बळी असल्याचे दिसून येते. त्या सर्वांसाठी सांगावे वाटते. गेट वेल सून.. डोळे उघडून पाहा, कसलीही झापडे लावू नका. #richyabhau #kokatnur आपला ब्लॉग : richyabhau.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव