महिन्यांची नावं कुठून आली?

महिन्यांची नावं कुठून आली?
जानेवारी, फेब्रुवारी आणि सोमवारी, मंगळवारी.. लहानपणी दोन्हीचा काही संबंध असेल असं वाटायचं. पण क्रमवार आणि सहावार, नववार यामधल्या वारांचा जसा एकमेकांशी काही संबंध नाही त्याच पद्धतीनं आठवड्याच्या वारांचा जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांच्या नावाशी काहीच संबंध नाही.. खरं तर महिन्याच्या नावांमध्ये जानेवारी फेब्रुवारी हे दोन महिने निर्वासित आहेत, कदाचित म्हणूनच त्यांचं वेगळेपण आहे. त्याआधी, जेव्हा दहा महिन्याचं वर्ष पकडलं जायचं, हे दोन महिने आणि त्यांची नावं अस्तित्वात नव्हती. तेव्हा नवीन वर्ष मार्च महिन्यापासून सुरू व्हायचं. 😳 होय.. मार्च महिन्यापासून सुरू झालेल वर्ष डिसेंबर महिन्यात संपायचं. आणि त्यापुढच्या काळात कडक थंडी असल्यामुळं पुढचे दिवस सोडून दिले जायचे. त्यांच्याकडे आधी ८ दिवसाचा आठवडा होता.. आणि ३८ आठवड्याचे वर्ष. ३८*८ म्हणजे केवळ ३०४ दिवस होते का वर्षात?? नाही... वर्ष ३६५ दिवसाचेच होते, तरी बाकीचे ६१ दिवस हे चक्क सोडून दिलेले असायचे. कारण युरोपात एवढी कडाक्याची थंडी पडायची की दैनंदिन व्यवहार ठप्प झालेले असायचे. आता देखील नाताळ म्हणजे येशूजन्मउत्सव होताना कडाक्याची थंडी असते. (आपली दत्तजयंती पण त्याच सुमारास. दोन्ही देवांचा जन्म अनैसर्गिक होता असं सांगितल जातं. केवळ योगायोग.. तसे सर्वच धर्मातील देवांचा जन्म अनैसर्गिक असतो म्हणा😂) वसंताची चाहूल लागली की, म्हणजे मार्च महिन्यात नवं वर्ष सुरू. नंतरच्या काळात जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने देखील कॅलेंडरमध्ये समाविष्ट झाले. अर्थात हे दोन महिने लेट आले पण थेट आले आहेत. कुटुंबात उशिरा दाखल झालेल्या युरेनस नेपच्यूनप्रमाणे साईडहिरो होऊन दुय्यम भूमिकेत पडले नाही, तर मुख्य हिरो झाले आहेत.. त्यातही फेब्रुवारी हा तर कित्येकांचा आवडता महिना असेल, इतर महिन्यांपेक्षा दोन-तीन दिवस कमी काम करून तेवढाच पगार मिळतो.. शिवाय १४ फेबला आनंदी लोकं प्रेमदिवस साजरा करतात, आणि संस्कारी लोकं मातृपितृदिन.🤭 मला फेब्रुवारी सुरू झाला की वेध लागतात २८ फेबचे, अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे. ❤️ ही जानेवारी फेब्रुवारी ही नावं कशी जन्माला आली असतील? सप्टेंबर, ऑक्टोबर यासारखी नाव घेताना केवळ आकड्यांचा आधार घेतला आहे. सप्टेंबर (मुळ नाव सेप्टीमस) आणि सप्तम, ऑक्टोबर (मुळ नाव ऑक्टोवस) आणि अष्ठ, नोव्हेंबर (मुळ नाव नोनुज) आणि नवम तसेच डिसेंबर (मुळ नाव डेसिमस) आणि दशम यांचा संबंध तर उघडपणे लक्षात येतो. लॅटिन आणि संस्कृत भाषा एकाच भाषेतून जन्माला आल्या असाव्यात. जगभर असं दिसतं की वर्षाच्या बारा महिन्यांची नाव ठेवताना पहिल्या चार-पाच महिन्यांची नावं जरा डोकं चालवून ठेवायची आणि नंतर कंटाळा करायचा आणि सातवा महिना, आठवा महिना म्हणून नाव चिटकवून टाकायचं. ☹️ भारतामध्ये मात्र महिन्याचं नाव देताना आकड्यांचा नाही, नक्षत्रांचा आधार आहे. प्रत्येक महिन्याला नक्षत्राचं नाव आहे. भारतामध्ये चैत्र-वैशाख पासून माघ फाल्गुनपर्यंत सर्व बारा महिन्यांचं बारसं त्या महिन्यातील पौर्णिमेच्या चंद्राच्या स्थितीवरून केलं आहे. मात्र नक्षत्रांच्या स्त्रीलिंगी नावाचं महिन्याच्या नावात रूपांतर करताना त्याचं पुरुषीकरण करण्यात आलं आहे. चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो तर वैशाख पौर्णिमा असते तेव्हा चंद्र विशाखा नक्षत्रात असतो. यावर आपण नक्षत्रांचे देणे या पोस्टमध्ये तपशीलवार लिहिलं आहेच. ज्यांनी नसेल वाचली त्यांनी जरूर वाचा, लिंक देतो https://richyabhau.blogspot.com/2020/10/blog-post_4.html 🙏🏾 जानेवारी नावामध्ये जानुस या देवाचं स्मरण करण्यात आलं आहे. जानुस हा दोनतोंड्या रोमन देव. जसं आपल्याकडे दत्ताला तीन आणि ब्रम्हाला चार तोंड आहेत. (दत्त तयार होताना शंकर आणि विष्णूचं एकेक आणि ब्रम्हाची चार तोंड का नसतील घेतली.. चांगली सहा तोंडं झाली असती की राव. पण सहा तोंडं तर आधीच कार्तिकेयला मंजूर झाली होती ना.. म्हणून असेल कदाचित. 😇) जानुसकडे परत येऊ. ज्यांना परदेशी सिनेमे पहायची सवय आहे, त्यांनी janus films चा लोगो आणि त्यातील दोन तोंडं असलेला माणूस पाहिला असेल. जसं आपल्याकडं कामाचा श्रीगणेशा केला असं म्हणतात, तसं तिकडं चांगलं काम सुरू करायचा देव म्हणजे हा जानुस. सुमारे २१०० वर्षांपूर्वी नववर्षाची सुरुवात करायचा मान या जानुसला देण्यात आला आहे.
मात्र त्याआधी ६०० वर्षापूर्वी राजा पॉम्पिलीअसमुळे कालगणनेमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी जोडले गेले होते. मात्र तेव्हा पहिला महिना मार्च आणि शेवटचा महिना फेब्रुवारी मानला जायचा. फेब्रुआ म्हणजे शुद्धीकरण.. वसंत ऋतुला सामोरं जाण्याआधी शरीराचं आणि मनाचं शुद्धीकरण करून घ्यावं अशी त्याकाळात प्रथा होती, त्यानुसार फेब्रुवारी पौर्णिमेला हा शुद्धीकरण विधी केला जात असे. खरं तर या दोन महिन्यांची नावे जॅन्युअरी, फेब्रूअरी अशी आहेत, मात्र आपल्याकडे त्यांना वारी करून टाकले आहे. मार्च महिना हा खर तर मार्स म्हणजे मंगळाचा महिना. (मग त्याचं नाव पण मंगळवारी करायला हवं होतं की🤪) आपल्याकडं केवळ कुंडलीत अडकून पडलेला कडक मंगळ तिकडं युद्धाचा देवता आहे. या मंगळाचा म्हणजे मार्शसचा अपभ्रंश होऊन मार्चचा महिना तयार झाला आहे. एप्रिल महिना हा शुक्र अर्थात व्हिनस देवीचा. तिची समकक्ष देवी (आपण अवतार म्हणतो तसं) एफ्रिलीसच्या नावावरून एप्रिल हे नाव पडलं आहे. पाश्चात्य संस्कृतीत शुक्र आणि मंगळ यांना स्त्री आणि पुरुषांचे प्रतिक समजलं जातं, त्यामुळे त्यांचे महिने लागोपाठ आले तर त्यात नवल ते काय! 😍 मे महिन्याचे नाव ग्रीक देवता माईया हिच्या नावावरून आलं आहे. संतती प्रदान करणारी ही देवता. प्राचीन काळात अस मानलं जायचं की मे महिना प्रौढांसाठी, आणि जून महिना तरुणांसाठी उत्सवाचा.. खरं तर जून महिन्यात जुनी लोकं टाकायला पाहिजे होती ना☹️ कदाचित मे लाच ती लोक मेली तर सेलिब्रेशन राहून जाऊ नये म्हणून असेल🤭 (आज असेच भिकारी विनोद सुचत आहेत, आईने मोठ्या आवाजात बातम्या लावल्या आहेत, आणि त्यावर नवनीत राणाची वरात सुरू आहे.. त्यामुळे असेल) जून महिन्याचं नाव जुनो या रोमन देवतेच्या सन्मानासाठी. जुपिटर या सर्वोच्च देवाची ही बायको. या दोघांच्या लेकीचं लग्न जून महिन्यात झालं होतं, त्यामुळे जून महिन्यात झालेली लग्न शुभ मानली जायची. जेव्हा वर्षात दहाच महिने होते, तेव्हा पहिल्या चार महिन्यांना नावं देऊन झाल्यावर नंतर लोकांनी कंटाळा केला आणि पुढच्या महिन्यांना क्विंटिलीज (पाचवा महिना) सिक्स्टीलीज (सहावा महिना) सप्टेंबर (सातवा महिना) ऑक्टोबर (आठवा महिना) नोव्हेंबर (नववा महिना) आणि डिसेंबर (दहावा महिना) अशी आकड्यावर बोळवण केली होती. मात्र तिकडं योगी आदित्यनाथ सारखा येडा जन्माला आला आणि क्विंटिलीज महिन्याचं नाव बदललं आणि तो जुलै महिना म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्युलियस सीझर हा योद्धा म्हणून जगप्रसिद्ध असला तरीदेखील कालगणनेमध्ये देखील त्याचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. ❤️ त्याच्या काळातच लीप वर्षाची सुरुवात झाली. त्याआधी असलेल्या सदोष कालगणनेमुळे २१ मार्च रोजी वसंत सुरू व्हायच्या ऐवजी खूप आधी सुरू व्हायचा. दर चार वर्षांनी एक एक दिवस अलीकडे सरकत चालला होता. ज्युलियस सीझरने आधीचा अनुशेष भरून काढण्यासाठी इसवी सन पूर्व ४६ हे वर्ष ४४५ दिवसांचं जाहीर केलं.😳 आणि तिथून पुढं इसवीसन पूर्व ४५ सालापासून चार वर्षांनी एक लीप वर्ष असलेल्या ज्युलियन कॅलेंडरची सुरुवात झाली. तळे राखील तो पाणी चाखील या तत्त्वानुसार सीझरचा जन्म झाला होता तो क्विंटिलीज महिना जुलै नावाने ओळखला जाऊ लागला. ज्युलियस सीझरचा जेव्हा खून झाला, तेव्हा सीझरने आपल्या मृत्युपत्रात अनपेक्षितरित्या आपला वारस म्हणून ऑक्टावियस या नात्यातील एका मुलाला नेमल्याचे आढळले. त्यानं देखील मोठ्या सत्ता संघर्षाला सामोरं जात साम्राज्यावर आपली पकड मिळवली होती. (यावर Hotstar वर roma नावाची भारी सिरियल आहे, नक्की पहा. ❤️) हा ऑक्टावियस पुढं सीझर ऑगस्टस म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानं आपलं नाव सिक्स्टीलीज महिन्याला दिलं आहे. अर्थात त्याचा जन्म काही ऑगस्ट महिन्यात झाला नव्हता. केवळ सीझरशेजारी आपलं नाव देखील अजरामर व्हावं एवढी त्याची इच्छा होती. पण योगायोग पाहा, त्याचा मृत्यू ऑगस्ट महिन्यात झाला. एक दंतकथा सांगितली जाते की ऑगस्ट महिन्यात आधी २९ दिवस होते मात्र आपला महिना देखील सीझर एवढाच मोठा असावा म्हणून ऑगस्टसने त्यात दोन दिवस वाढवण्यासाठी फेब्रुवारी मधले दोन दिवस कमी केले. आणि ऑगस्ट ३१ तर फेब्रुवारी २८ दिवसाचा झाला अशी कथा सांगितली जाते. अर्थात अनेक संशोधकांनी सिद्ध केलं आहे की सिक्स्टीलीज अर्थात ऑगस्ट महिना आधीपासूनच एकतीस दिवसाचा होता, उशिरा घरी परतलेल्या भावंडाला जसं उरलंसूरलं खावं लागतं, फेब्रुवारीला उरलेसुरले दिवस वाट्याला मिळाले आहेत.😭 ३६५ दिवसाचे गणित जगभरातील अनेक संस्कृतीत हजारो वर्ष आधी सोडवलं होतं. हिब्रू कॅलेंडरमध्ये ३५४ दिवसांचं चंद्रवर्ष आणि ३६५ दिवसांचे सूर्यवर्ष यांच्यामधील फरक अचूकपणे शोधून १९ वर्षात ७ अधिक मासाचं नियोजन केलं होतं. मात्र त्यांनी या अधिक महिना असलेल्या वर्षाला "लीप वर्ष" हे नाव दिलेलं असून याला ते प्रेग्नेंट वर्ष म्हणतात. हे नाव भारी आहे राव.. एकच महीन्याच्या पोटात दुसऱ्या महिन्याने जन्म घेतलेला आहे ना इथे. हिब्रू कॅलेंडरमध्ये शेवटचा महिना अदर असतो, त्याआधी हा अधिक महिना पकडला जातो त्याला अदर I असं नाव दिलं आहे. निसान या महिन्याने ज्यू वर्षाची सुरुवात होते, या महिन्यासोबतच अविव ऋतू सुरू होतो. तेल अविव नावामध्ये तोच अविव आहे बरं का..😇
अविव म्हणजे वसंत ऋतू. "वसंत ऋतूपासून नवं वर्ष सुरू" ही संकल्पना जगभराप्रमाणे इथ पण आढळून येते. हिब्रू कॅलेंडरमधील महिन्यांची बहुतेक नावं बाबिलोईन संस्कृतीमधून आली आहेत आणि त्यांचा शेतीशी, पिकाशी संबंध आहे. पहिला महिना "निसान" म्हणजे पहिलं फळ. अयार हा दुसरा हिब्रू महिना, याचा अर्थ होतो प्रकाश. तिसरा महिना सिवन ज्याचा अर्थ आहे पेरणीचा महिना. चौथ्या महिन्याचे नाव आहे तुंमुझ, जे मेसापोटियन देव डूमुझिड याच्या नावाचा अपभ्रंश आहे. पाचवा महिना अव, अबुचा महिना म्हणजे हा पितृमास. (हा महिना साधारण जुलै ऑगस्टमध्ये येतो म्हणजे आपल्या दोन महिने आधी हे लोक पित्रं घालून मोकळे होतात की काय😬)सहावा महिना एलुल, सुगीचा महिना असा या नावाचा अर्थ. सातवा महिना तिशरी, ज्याचा अर्थ आहे सेकंड इनिंग. म्हणजे वर्षाचा उत्तरार्ध नव्या जोमाने सुरू करायचा. आठव्या महिन्यांचं बारस करताना त्यांनी आळस केला आणि शेश्वन म्हणजे आठवा महिना म्हणून त्याला सरळ सोपं नाव दिलं. हा महिना बोरिंग..कारण एकपण सन त्यामध्ये नाही. नववा महिना "कीस्लेव", हा काही कीस (बटाट्याचा🤪) घ्यायचा महिना नाही. हा आहे आशेचा, सकारात्मकतेचा महिना. दहावा महिना तेवेत, ज्याचा शब्दशः अर्थ चिखलाचा महिना असा असला तरी जेव्हा डिसेंबर मध्ये तेवेत हा महिना सुरू असतो, तेव्हा बर्फाचा खच पडलेला असतो, आणि घरातील फायर प्लेस २४ तास तेवत ठेवायला लागते. अकरावा महिना शेवत, ज्याचा अर्थ प्रचंड मोठा पाऊस. बारावा महिना अदर ज्याला अधिक महिन्याचा मान देऊन त्याचा आदर वाढवला आहेच. 😀
चिनी संस्कृती देखील सिंधू आणि बाबीलोईन संस्कृतीप्रमाणे प्रगत होती, जीने सूर्य आणि चंद्र यांचे गणित अचूक सोडवलं होतं. सुमारे तीन वर्षानंतर एका अधिक मासाचं प्रयोजन तिथं देखील होतच. त्यांच्याकडे महिन्यांची नावं देताना राशींचा विचार केला आहे. आपल्याकडे जश्या बारा राशी, तश्या त्यांच्याकडे पण आहेत.. मात्र त्यांना या तारकांमध्ये वेगळे प्राणी दिसले आहेत. सूर्य एखाद्या महिन्यात ज्या राशीत असेल, त्या राशीचं नाव त्या त्या महिन्याला देण्यात आलं आहे. अनुक्रमे वाघ, ससा, ड्रॅगन, साप, घोडा, बकरी, माकड, कोंबडी, कुत्रा, डुक्कर, उंदीर, बैल यांचा एक एक महिना पूर्ण होऊन वर्ष पूर्ण होत असे. मात्र आता ही नावं नव्या पिढीच्या विस्मृतीत जात असून पहिला महिना, दुसरा महिना असं आकड्याशी संबंधित नाव लक्षात ठेवणंच या पिढीला सोपं जात आहे. 😭 रमजानचा सण कधी उन्हाळ्यात येतो कधी हिवाळ्यात.. कारण इस्लाममध्ये केवळ चंद्राधरित कॅलेंडर स्वीकारलं आहे, त्याची सूर्याशी सांगड घातली नाही. इस्लाम स्थापन होण्यापूर्वी तिथं अधिक महिना पकडला जात होता, आणि सूर्य चंद्राचा हिशोब जुळवला जात होता. मात्र प्राचीन काळी प्रगत झालेलं कालमापन पोथीमध्ये बंदिस्त झाल्यामुळं आज त्यांची सांगड आधुनिक कालगणनेशी घालता येत नाही. नव्याने घालून दिलेल्या इस्लामी कालगणनेमध्ये दिवस किंवा महिने वाढविण्याची जुनी रीत पैगंबराने इस्लामबाह्य ठरविली. 😬 मुहर्रम, सफर, रबिलावल, रबिलाखर,जमादिलावल, जमदिलाखर, रजत, साबान, रमझान, शव्वाल, जिल्काद, जिल्हेज असे बारा महिने दर २९.५ दिवसाच्या अंतराने येत राहणार.. पहिला महिना ३० तर दुसरा २९ दिवसाचा.. असा क्रम राहणार आणि ३५४ दिवसानंतर वर्ष पूर्ण होणार.. पुढील इंग्रजी वर्षात हिजरी वर्ष ११ दिवस अलीकडे सरकणार. 😬 पैगंबराने आपल्या अनुयायांसह मक्केहून मदिनेकडे प्रयाण केल आणि तिथं उम्मा म्हणजे मुस्लिम समुदायाची स्थापना केली ह्या घटनेस हिजरा अस म्हणतात आणि ही घटना घडली तेव्हापासून हिजरी कालगणना सुरू झाली. इंग्रजी वर्षानुसार इ.स. ६२२ पासून ही कालगणना सुरू आहे. जसा भारतीय शके आणि इसवीसन यांच्यात ७८ वर्षाचा फरक आहे, जो लाखो वर्षानंतर देखील तसाच राहील. मात्र हिजरी आणि इसवीसनामधील अंतर प्रत्येक वर्षी ११ दिवस याप्रमाणे कमी होत जाणार. जानेवारी २०२२ मध्ये हिजरी १४४३ वर्ष सुरू होतं. म्हणजे सुरुवातीला असलेला ६२२ वर्षाचा फरक आता केवळ ५७९ वर आलेला आहे. अजून वीस हजार वर्षांमध्ये हा फरक शून्य होऊन नंतर हिजरी वर्ष इसवीसनाच्या पुढं ओव्हरटेक करून गेलेलं असेल. (या अतिक्रमणाला कॅलेंडर जिहाद म्हणायचं का😂) हिजरी कालगणना तुम्हाला लवकर म्हातारी करते. 😭तुम्ही जर इंग्रजी किंवा मराठी कालगणनेनुसार ३२ वर्षाचे असाल तर हिजरी कालगणनेनुसार तुम्ही ३३ वर्षाचे झाले असाल.😭 इथं तुमची आयुष्याच्या ९७ व्या वाढदिवसानंतर वर्षी विकेट पडली असेल, तरी हिजरी कालगणनेनुसार तुम्हाला शतकवीर समजण्यात येतं. ❤️ नेहमीच्या ३२ वर्षांमध्ये ३३ हिजरी वर्ष होतात. म्हणजे एक वर्ष जास्त कर भरावा लागतो. 😳 यावर मात करण्यासाठी अकबराने हिजरी ऐवजी ’फसली’ नावाची सौर कालगणना सुरू केली होती, जिचा आधार हिंदू कालगणना पद्धती होती. शहाजहानच्या काळात ही कालगणना दख्खनेत आली आणि त्यानंतर हैदराबादच्या निजामाने देखील वापरली. अजूनही तिचा वापर ठराविक ठिकाणी केला जातो. म्हणजे अकबराने काही तरी चांगलं केलं होतं म्हणा. अर्थात माझा कट्टर हिंदुत्ववादी मित्र यावर म्हणेल, सावन के अंधेको हर तरफ हरियाली दिखती है. आणि त्याला तर हिरव्या रंगाचे वावडे🤪 त्याच्या मते त्याचे विश्वगुरू रात्रंदिवस केवळ देशाचा विचार करत असतील (?) तर देशातील प्रत्येकाने त्यांचेच गुणगान केलं पाहिजे. अर्थात असं गुणगान करणाऱ्या मीडियासमोर बसण्याऐवजी त्याला ही पोस्ट वाचायला आवडणार नाही. एक तर वाचायची क्षमता नाही, त्यात समजून घेण्याची कुवत नाही. म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. 🤪 #richyabhau आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव