चंद्र आहे साक्षीला

चंद्र आहे साक्षीला
आज सोमवती अमावस्या.. सोमवार हा चंद्राच्या वाट्याला आलेला वार आहे, त्या दिवशी जर अमावस्या असेल तर तिला सोमवती अमावस्या म्हणतात. यादिवशी अनेक ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. मात्र चंद्राचा वार असून चंद्राचाच पत्ता नाही, त्याचा उत्सव का साजरा करायचा.. 😭 खरं तर सोमवती पौर्णिमा साजरी केली पाहिजे. आजवरच्या ग्रह, तारे, नक्षत्र, अधिक महिना,आठवड्याचे वार या सर्व पोस्टमध्ये चंद्र हा अविभाज्य भाग होताच आणि त्याच्या संदर्भातील पौराणिक कथांचा आपण उल्लेख केलेला आहेच. आज थोडी वेगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करू या🙏🏾 चंद्र.. आपल्याला आकाशात दिसणारी सूर्यानंतरची सर्वात तेजस्वी वस्तू.. आणि आपल्या सूर्यमालेत आकाराने पाचव्या क्रमांकाचा असलेला उपग्रह. केवळ ३४७४ किमी व्यासाचा, म्हणजे ऑस्ट्रेलियापेक्षा लहान. काही शास्त्रज्ञांच्या मते हा आपल्या पृथ्वीचा जन्म झाला तेव्हापासूनचा जोडीदार.. तर काही शास्त्रज्ञ म्हणतात कि पृथ्वीला एका मोठ्या अंतरिक्षवस्तूची धडक झाली आणि त्यातून पृथ्वीचा हा टवका उडालेला आहे. चंद्र.. विविध संस्कृतीमधील पुराणकथांमध्ये अविभाज्य घटक, जगातील सर्व धर्मातील अनेक सण उत्सवांचा आधार असलेला.. अनेक कवी मंडळींच्या काव्यात रमलेला, प्रसंगी प्रेमभंग झालेल्या लोकांच्या शिव्या खाणारा चंद्र.. भारतीय संस्कृतीमध्ये मामाच स्थान पटकावणारा. चंद्र.. चांदोबा.. चन्दामामा❤️ चंद्र.. काही संस्कृतीमध्ये त्याला पृथ्वीचा भाऊ मानण्यात येतं, काही संस्कृतीमध्ये त्याला पृथ्वीचा मुलगा तर काही संस्कृतीमध्ये पृथ्वीचा प्रियकर असल्याचं मानण्यात येतं. अंतरिक्षातून येणारा कचरा चंद्र स्वतः ओढवून घेत एखाद्या बापाप्रमाणे किंवा भावाप्रमाणे पृथ्वीचे रक्षण करत असतोच.. मात्र पृथ्वीभोवती तो फिरत असल्याने मला तर प्रियकराचं रूपक थोडं जास्त जवळच वाटत. 😍 चंद्राची पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा २७.३ दिवसात पूर्ण होते, मात्र या काळात पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करताना पुढे सरकलेली असल्याने २९.५ दिवसात एक चांद्रमास पूर्ण होतो. दोन पौर्णिमेमधील अंतर म्हणजे एक चांद्रमास. Month आणि Monday या नावांचा जन्म Moon या शब्दातून झालेला आहे. प्रकाशाच्या वेगाचा विचार केला तर आपल्या पासून केवळ सव्वा सेकंद दूर असलेला हा आपला चंद्र.. आता पृथ्वी अवघा पासून ३,८८,००० किमी दूर आहे. मात्र चंद्राचं पृथ्वीवरील प्रेम हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे पृथ्वीची ऊर्जा शोषून घेत तो पृथ्वीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत आहे. चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी ३.८ सेंटिमीटर दूर जात आहे. म्हणजे दर सत्तेचाळीस वर्षांनी चंद्र पृथ्वीपासून "दो गज की दुरी" करणार.. आणि दर सव्वीस हजार वर्षांनी चंद्र पृथ्वीपासून एक किलोमीटर दूर गेलेला असेल. तो जेवढ्या लांब जाणार, त्याचा पृथ्वीभोवती फिरण्याचा काळ वाढणार. 😇 आपला सूर्य हा अजून पाच अब्ज वर्षापेक्षा जास्त काळ टिकणार नाही.. त्यामुळे जीवसृष्टीचे तेव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. मात्र अजून पन्नास अब्ज वर्षांनंतर जीवसृष्टी असेल तर त्यावेळेस चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ४७ दिवस लागतील, आणि एक चांद्रमास ५२ दिवसांचा झालेला असेल. म्हणजे दर सव्वीस दिवसांनी पौर्णिमा आणि सव्वीस दिवसांनी अमावस्या. 🤭 रमजानमध्ये बावन्न दिवस रोजे.. आणि दिवाळीच्या नरकचतुर्दशी ते बलिप्रतिपदा या दिवसांमध्ये तेरा दिवस असणार.. अर्थात एवढ्या प्रचंड कालावधीमध्ये मानववंश टिकला असेल तरी कदाचित हे धर्म नामशेष झाले असतील. आपण उलट देखील म्हणू शकू कि, हे धर्म नाहीसे झाले असतील तरच मानववंश टिकला असेल. ❤️
आज चंद्रोदय किती वाजता आहे बघा रे.. असं चतुर्थी असेल त्यादिवशी घरामध्ये अनेक वेळा ऐकलेलं असेल. आणि साधारण साडेआठ ते अकरा या वेळेमध्ये चंद्रोदय असेल. तुम्ही कधी विचार केला आहे का की एका महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात, मात्र केवळ संकष्टी चतुर्थीचा उपवास का पकडला जातो.. विनायकी चतुर्थीचा का नाही? कारण विनायकी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय पाहून सोडता येणार नाही. त्या दिवशी चंद्र सकाळी उगवलेला असतो आणि संध्याकाळी साधारण साडेआठ ते अकरा या वेळेत मावळत असतो. उन्हाळयात सूर्यास्त उशिरा होत असतो त्यामुळे साहजिकच चंद्र त्याचे तोंड दाखवायला लय टाईम घेतो. जस यावर्षी १९ मे रोजीच्या चतुर्थीला चांदोबारावांनी पावणेअकरा पर्यंत उपवासवाल्यांना टांगून ठेवलं होतं. 😭 बरं आहे ते करवा चौथ हिवाळ्यात असतं बाबा😂🥳🥳 पौर्णिमेच्या दिवशी साधारणतः जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा चंद्र उगवतो, म्हणून तर त्याचे पूर्णबिंब दिसते ना.. अगदी त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्य हे साधारणतः एका वेळेसच उगवत असतात म्हणूनच पृथ्वीवरून दिसत असलेल्या चंद्राच्या बाजूवर अजिबात प्रकाश नसतो.. म्हणूनच आपण त्याला अमावस्या म्हणतो. पौर्णिमा ते अमावस्या असं साधारणता साडेचौदा दिवसाचे चक्र पूर्ण करताना चंद्र रोज पन्नास मिनिटे उशिरा उगवतो असतो. समुद्राच्या भरती ओहोटीचे वेळापत्रक देखील यामुळे निर्धारित होत असतं.. भरती आणि ओहोटीमध्ये सहा तास साडेबारा मिनिटाचं अंतर असतं तसेच दोन भरती किंवा दोन ओहोटीमध्ये बारा तास पंचवीस मिनिटांचं अंतर असतं. भरती ओहोटी व जीवनशैली अवलंबून असलेल्या लोकांना याच गणित चांगल ठाऊक असत.👍 आपल्या सौर कुटुंबातील सर्व उपग्रहांच्या आकारामध्ये आपल्या चंद्राचा पाचवा क्रमांक लागतो. गुरूचे गॅनीमीड, कॅलीस्टा आणि आयो‌ हे तीन गॅलिलियन उपग्रह तसेच शनीचा टायटन हा उपग्रह आपल्या चंद्रापेक्षा मोठा आहे. चौथा गॅलिलियन उपग्रह युरोपा हा चंद्रापेक्षा थोडासा लहान आहे. गॅलिलिओने हे उपग्रह शोधून काढले होते म्हणून त्यांना गॅलिलियन उपग्रह म्हणतात. गॅलिलिओने सर्वात प्रथम चंद्राचा पृष्ठभाग खडबडीत असल्याचे दुर्बिणीतून पाहिले. तिथून पुढच्या काळात एखाद्या सौंदर्यवतीला चंद्राची उपमा द्यावी की नाही हा प्रश्न पडू लागला असेल.‌ एखादी ललना भूगोलाची विद्यार्थिनी असायची आणि तिचा प्रियकर तिला हे चन्द्रवदने म्हटला तर तिचा ज्वालामुखी भडकायचा😀
चंद्रावर देखील ज्वालामुखी झाले आहेत. त्याला आपण भूकंप म्हणायचं की चंद्रकंप? जसं पृथ्वीवर भरती ओहोटी होण्यासाठी चंद्राचं बल कार्य करत असतं, त्याचप्रमाणे चंद्रावर भूकंप होण्यासाठी पृथ्वीचे बल कार्य करत असतं. चंद्रावर कोणतेही चुंबकीय क्षेत्र आज दिसून येत नाही मात्र चंद्रावरून आणलेल्या दगडांमध्ये काही प्रमाणात चुंबकत्व असल्याचे दिसते. (आजवर चंद्रावरील दगडांचे लहान-मोठे सुमारे बावीसशे नमुने आणून आपण चंद्राचे वजन सुमारे चारशे किलोने कमी केल आहे.) कदाचित एकेकाळी चंद्रावर चुंबकीय क्षेत्र असेल देखील. जसे एकेकाळी चंद्रावर पाणी असल्याचे देखील पुरावे मिळतात. आजही शास्त्रज्ञांना आशा आहे की चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशांवर गोठलेल्या अवस्थेत पाणी असू शकेल. चंद्रावर पृथ्वीपेक्षा सहापट कमी गुरुत्वाकर्षण आहे म्हणजे जी व्यक्ती इथं दोन मीटर उडी मारू शकेल, ती चंद्रावर बारा मीटर उडी मारू शकेल. चंद्रावर गेल्यावर कल्पनाशक्तीची झेप पण वाढेल का?🤔 एखाद्याला मधुचंद्रासाठी चंद्रावर जावसं वाटलं ते किती रोमँटिक कल्पना असेल ना.. पण कल्पना रंगवण्याआधी चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करा. चंद्राचं तापमान दिवसा १०७° सेल्सियस तर रात्री -१५३° सेल्सिअस असतं. दिवसा तुम्ही करपून जाल, आणि रात्री गोठून जाल. 😨 तिथे तुम्हाला श्वास घेण्यासाठी वातावरण तर नाहीच आहे, शिवाय अतिनील किरणांपासून वाचवणार ओझोनच छत्र देखील नसेल. पिण्याचे पाणी देखील इथून घरूनच न्यावे लागेल😀 चंद्रावर पर्वत देखील आहे बरं का. चंद्रावर असलेला हायगेंस हा पर्वत सुमारे ४७०० मीटर उंच आहे.. म्हणजे आपल्या एव्हरेस्टच्या निम्म्या उंचीचा आहे! आजवर चंद्राने अंतराळातून आलेल्या अनेक अशनिंचा (ॲस्ट्रॉईडचा )मारा झेलला आहे त्यामुळे चंद्रावर खाचखळगे निर्माण झाले आहेत. आणि गेल्या कोट्यावधी वर्षांमध्ये ते तसेच आहेत. चंद्राला सर्व पाउलखुणा जपण्याची आवड दिसते..‌ चंद्रावर वातावरण नाही, हवा नाही त्यामुळे अगदी आपल्या अंतराळवीरांनी पन्नास वर्षांपूर्वी चंद्रावर उमटवलेले पावलाचे ठसे देखील आजही तसेच पाहायला मिळू शकतात.😇 एका वेळेस आपल्याला चंद्राचा ५० टक्के भाग दिसत असतो. वर्षभरात आपण चंद्राचा आपण एकूण ६० टक्के भाग पाहू शकतो. त्यापलिकडे असलेला ४० टक्के भाग आपल्याला दिसत नाही, आपल्या भोवती एखादी गाडी एकाच दिशेने गोलगोल फिरत असेल तर आपल्याला त्या गाडीची एकच बाजू असू शकते ना? अगदी तसं!😇 चंद्राच्या ५० टक्के भागावर नेहमी सूर्यप्रकाश असतोच मात्र त्यापैकी किती भाग आपल्याला त्या दिवशी पृथ्वीवरून दिसतो याला आपण चंद्राची कला असं म्हणतो. आणि त्यावरूनच तिथी आणि २९.५ दिवसाचा चांद्रमास जन्माला येतो. चंद्राला आपल्या भारतीय संस्कृतीत पक्का पुरुष करून टाकले आहे. शशी, रजनीकांत, सुधाकर, निशाकांत, मयांक, हिमांशू, शशांक, सारंग, राकेश, सुधांशु अशी ज्याची शेकडो पुरुषी नावं. नाही म्हणायला चंदा हे एक स्त्रीलिंगी नाव आढळते. बाकी चंद्रकला, चंद्रावती, चंद्रभागा, चंद्रमुखी ही चंद्राची नावे नाहीत, चंद्रापासून तयार झालेली नावे आहेत. ग्रीक संस्कृतीत सेलेना, रोमन संस्कृतीत लूना, चीनी संस्कृतीत चांगई ही स्त्रीलिंगी नावं चंद्राला देण्यात आली आहे. २९.५ दिवसांचा चांद्रमास आणि स्त्रियांचे मासिकपाळी चक्र यांच्यात साम्यता असल्याने चंद्राला अनेक संस्कृतीत स्त्रीशी जोडण्यात आलं आहे, स्त्री देवतेची जोडण्यात आलं आहे. ❤️ आपल्याकडे २७ नक्षत्रांचा दादला म्हणून चंद्राला एक निवांतपणा दिला आहे. खाओ, पिओ, मजा करो.. विदेशी संस्कृतीमध्ये केवळ शोभेची देवता म्हणून चंद्राला स्थान नाही, ही देवता भरपूर पॉवरफुल देखील असते.
सेलेना, लुना असो अथवा चीनी देवता चांगई, ज्या संस्कृतीत देवीच्या रूपात चंद्र वापरला आहे, त्यांनी त्या देवतेला खूप शक्ती असल्याच मानल आहे. पुरुष देवाच्या रुपात मात्र चन्द्र त्यात्या संस्कृतीत साधीच भूमिका बजावताना आढळतो. मेसोपोटेमियन संस्कृतीमध्ये चंद्राला पापाचा देव म्हटले आहे. जपानमध्ये चंद्र म्हणजे सुकोयोमी नावाचा देव. त्यांच्या कल्पनेनुसार "ईझानागी" या तिकडच्या ब्रह्मदेवाने सृष्टी बनवली होती बरं का.. या ईझानागीने जेव्हा अंघोळ करून आपली पापं धुवायची ठरवलं, त्यावेळेस त्याच्या उजव्या डोळ्यातून या सुकोयोमीचा जन्म झाला होता.🤭 अशा कथा सर्वच संस्कृतीत जन्माला येतात आणि त्यांना आव्हान न दिल्यामुळे त्या अनेक पिढ्या जिवंत राहतात. मात्र आता विज्ञानयुगामध्ये प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागितला जातो. अगदी अमेरिकेने जेव्हा नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाय ठेवला अशी बातमी जाहीर केली, तेव्हा देखील अनेक लोकांनी त्यांना आव्हान दिलं. चंद्रावर मुळात कोणी गेलेच नाही, नील आर्मस्ट्रॉंग याचं एखाद्या सिनेमाच्या सेटवर शूटिंग काढून ते चंद्रावरचं असल्याचं भासवलं आहे असा दावा अनेक वर्षे केला गेला होता. मागील पन्नास वर्षात म्हणजे १९७२ नंतर चंद्रावर कोणताही मानव गेला नसल्याने या दाव्याला सामान्य माणसांमध्ये पाठिंबा देखील मिळत होता. अगदी अमेरिकेत देखील सर्वेक्षण गेलं तेव्हा सुमारे वीस टक्के लोकांनी असं सांगितलं की "होय, चंद्रावरील मानवी पाऊल हा फेक दिखावा असू शकतो." 🤭 यासाठी इतिहासाची पानं उलटून थोडंसं मागे जावे लागेल. ४ ऑक्टोबर १९५७ रोजी रशियाने स्पुटनिक नावाचं यान अंतराळात पाठवलं, आणि अंतरिक्ष मोहिमेत अमेरिकेपेक्षा आघाडी घेतली. आजवर साम्यवादाला कस्पटासमान लेखणा-या अमेरिकेसाठी तो खूप मोठा धक्का होता. 🤭 साम्यवादी देश काहीच निर्माण करू शकणार नाही अशी धारणा अमेरिकन प्रसारमाध्यमांनी जनतेमध्ये पसरवली होती, त्यांना ही रशियन चपराक खूपच जोरात लागली. इतकी जोरात की लगेचच राष्ट्राध्यक्ष केनेडी यांना जाहीर करावे लागले की "चंद्रावर उतरणारा सर्वात पहिला व्यक्ती अमेरिकनच असेल." तेव्हापासून खडबडून जाग येणाऱ्या, अचानक भानावर येणाऱ्या प्रसंगाला इंग्रजी भाषेत "स्पुटनिक मोमेंट" हा वाक्यप्रचार रुजू झाला आहे. स्पुटनिकने भाजलेल्या अमेरिकन भावनांवर रशियाच्या लुना मोहिमेने अक्षरशः मीठ चोळलं. १९५९ साली रशियाने चंद्राच्या दिशेने लुना २ हे यान सोडलं, जे चंद्रापासून सहा हजार किलोमीटर अंतरावरून निरीक्षण करत पुढे गेलं. १९६६ मध्ये चंद्रावर उतरणारे लुना ९ हे पहिलं मानवरहित यान देखील रशियाचंच. अशा वेळी आपले शास्त्रज्ञ काय नासामध्ये जाऊन गोटया खेळत आहेत का? असा प्रश्न अमेरिकन जनतेला पडला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकन अपोलो ११ हे यान २१ जुलै १९६९ मध्ये चंद्रावर उतरले, पुढील तीन वर्षात अपोलो मालिकेतील अजून पाच यशस्वी मोहिमा झाल्या आणि बारा अंतरीक्ष यात्री चंद्रावर पोचले. हे सर्व अमेरिकन होते आणि सर्व पुरुष होते. आजवर चंद्राला स्त्रीपावलांच स्पर्शसुख लाभलं नाही बरं का.. ☹️ आपली अस्मिता जपण्यासाठी अमेरिका आहे खोटे दावे करत आहे असा आक्षेप अनेक शास्त्रज्ञ घेऊ लागले. केवळ कॅमेरॅची करामत करून व्यक्ती चंद्रावर पोचला आहे हे दाखवण्याचा आभास निर्माण केला आहे असा त्यांचा आक्षेप होता. अमेरिकन नौदलाचे अधिकारी "बिल केसिंग" याने १९७६ मध्ये एक पुस्तक लिहिलं, ज्याचा विषय होता की आम्ही कधी चंद्रावर गेलोच नाही, केवळ अमेरिकन जनतेची ३० अब्ज डॉलरची फसवणूक केली आहे. रशियासोबत अंतरिक्ष स्पर्धा जिंकण्यासाठी हा अमेरिकन दिखावा आहे असं त्यात म्हटलं होतं. हे पुस्तक प्रचंड गाजलं. २००१ मध्ये फॉक्स टेलीविजन नेटवर्कने देखील एक माहितीपट बनवला होता ज्यात त्यांनी अमेरिकन व्यक्ती कधी चंद्रावर पोचला नसल्याचा दावा केला होता. 😳 चंद्र आहे साक्षीला.. चंद्राला पाउलखुणा जपण्याची सवय असल्यामुळे आता अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या साह्याने घेतलेले फोटो हे सिद्ध करत आहेत की अमेरिकेने खरच चंद्रावर माणूस उतरवला होता. तेव्हाच्या खुणा आजही चंद्रावर आहेतच. स्वतः चंद्रच साक्ष देत असेल तर दुसरा कोणी हरकत घ्यायचा आता प्रश्नच नाही. मात्र आता अनेक त्रयस्थ देशातील संशोधकांनी देखील अमेरिकन व्यक्तीची चंद्रावरील पावलं पडल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे. नील आर्मस्ट्राँग जेव्हा चंद्रावर उतरला होता त्यावेळेस तो म्हटला होता "हे एका मानवाचं जरी छोटे पाऊल असलं तरी हे विज्ञानाचे खूप मोठं पाऊल असेल." ❤️ गेल्या पन्नास वर्षात चंद्रावर मानवाची एकही मोहीम झाली नाही, कारण मानव असलेलं यान पाठवण्यासाठी प्रचंड खर्च येत असतो. भारत देखील अंतरिक्ष विज्ञानात उशिरा का होईना भरारी घेत आहे. नोव्हेंबर ८, २००८ रोजी चांद्रयान १ हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त होऊन चंद्राभोवती फिरू लागले. आणि चंद्राच्या कक्षामध्ये पोहोचणारा भारत हा रशिया, अमेरिका चीन आणि जपान या नंतर पाचवा देश बनला. मात्र जपानला देखील शक्य झालं नव्हतं, ते भारताने करून दाखवलं. १४ नोव्हेंबर २००८ रोजी भारतीय तिरंगा चंद्रावर लागला. (मुद्दाम नेहरूंचा जन्मदिवस निवडला असेल, मला माहित आहे 🤪) सिनेमा बनवल्यानंतर मंगलयानचे यश आपल्या सर्वांना ठाऊक झालं असेल, मात्र किती जणांना चांद्रयान २ चे अपयश ठाऊक आहे. ७ सप्टेंबर, २०१९ रोजी चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असताना या लॅंडरशी संपर्क तुटला. ऑर्बिटरने चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला, मात्र चंद्रावर उतरणारे हे लॅंडर कोसळल. दुसऱ्या दिवशी हे विक्रम लॅंडर (विक्रम साराभाई यांच नाव या लॅंडरला दिलं आहे ❤️) चंद्राच्या पृष्ठभागावर आढळून आलं असलं तरी त्याच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. भविष्यात कदाचित तो संपर्क पुन्हा साधला जाईल ✊✊ अर्थात चांद्रयान २ अपयशी का झालं यातून धडा घेत शास्त्रज्ञ चांद्रयान ३ ची तयारी करत आहेत. विज्ञानाचे हेच विशेष असते कि तो स्वतःच्या चुका मान्य करत असतो, आणि इतिहासात काय घडलं यावर रडत न बसता त्यातून धडा घेत पुढे जात असतो. २०२३ मध्ये चांद्रयान ३ पाठवण्याची तयारी सुरू आहे. चार वर्षापूर्वी पाठवलेलं ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे कार्यरत आहेच. आता फक्त लॅंडर आणि ते वाहून नेणारे रोव्हर यावर काम करावं लागणार आहे. इस्रो ही मोहीम नक्कीच यशस्वी करेल. ✊ वाटल्यास ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून आपण सगळे संकष्टी चतुर्थीचा कडक उपवास करू🤪 कारण विज्ञानाने प्रगती केली तरी आपली काय ह्या संकष्टी बिंकष्टीच्या फेऱ्यातून बाहेर पडत नाही. ☹️
यार आपण कोणत्या जगात, कोणत्या युगात वावरत आहोत.. आपण शाळेमध्ये विज्ञानाचे साधे नियम शिकलो असतो मात्र त्याचा अंतर्भाव आपल्या दैनिक जीवनात कधी करणार आहोत? आपण विश्वगुरू व्हायचे स्वप्न पाहतो आहे, मात्र साधा कार्यकारणभाव आपल्या लक्षात येत नाही. अर्थात आपले प्रधानसेवक ढगाळ हवामानाचा फायदा घेऊन रडारला फसवू शकत असतील, तर आपल्या देशात तरी विज्ञानाला चांगले दिवस लवकर येणार नाहीत. आपण पण जय विज्ञानच्या फक्त घोषणा देत राहू. आणि प्रत्यक्षात मात्र छदमविज्ञानाचा अंगीकार करत राहू. विज्ञानाची भाषा वापरून अंधश्रद्धेचा पसरवत राहू. चंद्र आणि मनाच्या आजाराबाबत अशीच धादांत खोटी मांडणी केली जाते. चंद्र हा मनाचा कारक आहे, पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी मनाला उधाण येते, आणि मनाचे आजार देखील बळावतात असे सांगितले जाते. ज्याप्रमाणे पृथ्वीवर 70 टक्के पाणी आहे त्याप्रमाणे मानवाच्या शरीरात देखील आहे. समुद्राला भरती ओहोटी येत असेल तर मनाला का नाही येणार असं त्यांना सुचवायचं असत. 🤭 मात्र ही मांडणी अतिशय चुकीची आहे समुद्राचे वस्तुमान आणि मानवी शरीर यांची तुलना होऊच शकत नाही. समुद्राच्या काठावर १०००० लिटर चा पाण्याचा टँक भरून ठेवला तर त्या पाण्याला उधाण येत नाही, मग मानवाचे शरीर तर किती पट लहान आहे. केवळ चार पाय आहेत, रंग काळा आहे म्हणून हत्ती आणि उंदराची तुलना होऊ शकेल का..?🤪 अमावस्या-पौर्णिमेला हायपर होणाऱ्या किंवा अंगात येणाऱ्या व्यक्तींना कॅलेंडर दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवलं तर त्यांना पौर्णिमा अमावस्या आलेली कळत नाही आणि स्वयंसूचना द्यायला त्यांना वेळ न मिळाल्यामुळे त्यांना पौर्णिमा अमावस्या यांचा त्रास होत नाही. स्वयंसूचनांचा हा सारा खेळ आहे ज्याप्रमाणे भक्तांनी स्वतःला सूचना दिली आहे की देशाचा विकास होत आहे आणि त्यांना सर्वत्र विकास दिसतो.😂 तुमच्या मानसिक आजारासाठी चंद्राला बदनाम करणे थांबवले पाहिजे. आधीच तो पृथ्वीपासून दूर जात आहे, त्याला जर या बदनामीचे कळलं तर समनापुरमधल्या नसीब वडापावचे अन्सारचाचा म्हणतात त्याप्रमाणे महा प्रचंड वेगाने चंद्र दूर निघून जाईल. 😀 भारतीय जनतेला बधीर करण्याचं काम टीव्ही मालिका करत आहेत. करवा चौथचे प्रस्थ वाढविण्याचे काम असो अथवा इतर अंधश्रद्धा.. स्वतःच्या फायद्यासाठी प्रसारमाध्यम श्रोत्यांच्या डोळ्यांमध्ये हवं ते घालत आहेत. मात्र जेव्हा मी "चांद का तुकडा" या मालिकेमधला हा सीन बघितला (सोबतचा व्हिडिओ पहा) तेव्हा ही मालिका बनवण्याचा राग आणि कीव आली. जो व्यक्ती चंद्राचा तुकडा आणून देईल त्याच्याशी मी लग्न करेल अशी अट व्हॅम्प दिसणारी नायिका घालते आणि नायक चक्क चंद्रावर रस्सी टाकून त्याला ओढून पाहतो. त्याचे सर्व कुटुंबीय त्याला मदत करतात, तरी चंद्र ओढला जात नाही. मग तो चक्क गाडी घेऊन चंद्रापाशी जातो आणि हातातील चाकूने चंद्राचा तुकडा तोडून खाली पाडतो. 🤭 यार हे पाहून तर चंद्र कायमचा पळून जात असतो किंवा लाज वाटून जीव तरी देत असतो. 😂😂 "विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला, अंधश्रध्देतून परी मुक्त नाही झाला" हे गीत अजूनही खरे आहेच.. आणि अजून एक पण महिला चंद्रावर आपण पाठवली नाही. भविष्यात "विज्ञानाने बाई चंद्रावर गेली, अंधश्रद्धेतून तिची पिढी मुक्त झाली" असे गाणे गायला निश्चित आवडेल. आजची पोस्ट जरा लांबली असली तरी चंद्राला तेवढा न्याय द्यायला पाहिजे ना. पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा.. तुमच्या खास माणसाला पाठवून सांगा.. हा चंद्र तुझ्यासाठी❤️ #richyabhau #चांद्रयान आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव