डास दडूनी राहतो

डास दडूनी राहतो
कामावरून दमून आल्यानंतर रात्री तुम्हाला कधी एकदा पाठ टेकवता असं झालेलं असतं. घशाखाली कसेबसे दोन घास टाकून तुम्ही बेडरूममध्ये प्रवेश करता. मोठा दिवा बंद करून छोटा दिवा लावता आणि आपल्या पलंगावर जाता. अशावेळी आपल्या जोडीदाराने काय तरी रोमँटिक गुणगुणावं असं तुम्हाला वाटत असतं.😍 तुम्हाला गुणगुण ऐकू येते मात्र ती रोमँटिक नसते तर धडकी भरवणारी असते. काही सेकंद आधीच तुम्ही बेडरूममध्ये "मच्छर नाही ना" हे पाहिलेलं असतं तेव्हा तो दिसलेला नसतो. कारण "डास दडूनी राहतो, वाट संधीची पाहतो." आणि आता त्याला वाटते हीच ती वेळ, हाच तो क्षण.. चलो पार्टी करे 🤪 

तुम्ही या गुणगुणीकडे दुर्लक्ष करण्याचं नाटक करता. तुम्हाला माहित असतं, की बेडरूममध्ये आणखी एक व्यक्ती आहे, कदाचित डास तिकडं जाईल. किंबहुना तो डास तिकडं जावा अशी तुम्ही मनापासून प्रार्थना करत असता. तुम्ही स्वतःच्या मनाची समजूत काढत असता की हा मच्छर तुम्हाला चावणार नाही. मात्र हे खोटं ठरतं. तुमच्या जोडीदाराकडं ढुंकून देखील न पाहता हा मच्छर तुमच्या शरीराचा ताबा घेतो आणि आपलं प्रेमपत्र तुम्हाला पोचवतो. आता त्याचा राग आल्याने त्याच्या चाव्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायचं ठरवता. पण शरीर साथ देत नाही, आणि त्याच्या या मिडास स्पर्शाच्या आठवणीत तुम्ही खाजवत राहता. मलाच का चावला? हा प्रश्न तुम्हाला पडलेला असतो, मात्र त्यावेळी तुमच्या खोलीत दहा लोक जरी असते, तरी मी खात्रीने सांगतो, चावण्यासाठी त्याने तुम्हालाच निवडलं असतं, तुम्ही आहातच तेवढे भाग्यवान. 🤪 

बेडरूममधला हा हल्ला एकवेळ तुम्ही खिलाडूवृत्तीने पचवू शकता. मात्र या मित्राचा टॉयलेटमधला हल्ला खूपच त्रासदायक असतो. आपली कार्यसिद्धी राहिली बाजूला, आपल्याला संडासात डास मारत बसावं लागतं. (ज्यांनी टॉयलेटला जाळ्या बसवल्या आहेत, त्यांना हा सं. डास नाटकाचा प्रयोग पाहायची संधी मिळाली नसेल. 😭) आपल्या शत्रूला बिकट पेचप्रसंगी पकडून त्याच्या नाजूक, हळव्या क्षेत्रांवर हल्ला करायचा असला गनिमी कावा डास कधी शिकले असतील काय माहित. उत्क्रांतीमध्ये डास झपाट्याने शिकत आहेत हे मात्र खरं.‌ माणूसच डासांना उत्क्रांत होण्यासाठी भाग पाडत आहे. डासांना मारण्यासाठी मानव नवीन नवीन उपाय शोधत आहे, मात्र त्यावर डास कॅपिटल आणि त्याचे चक्रवाढ व्याज यशस्वी मात करत आहेत.  

 आजवर मानवी लोकसंख्येची सर्वात जास्त हानी डासांमुळे झाली आहे. आजवर या पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या सुमारे १०० अब्ज मानवांपैकी निम्म्या लोकसंख्येचा फडशा डासांपासून झालेल्या रोगांमुळे झाला आहे असं काही शास्त्रज्ञ म्हणतात. आताही दरवर्षी जगभरातील सुमारे ८ लाख लोक डासांपासून झालेल्या रोगांमुळे मृत्युमुखी पडतात. या धरतीवर डासांच्या ३५०० पेक्षा जास्त प्रजाती असल्या तरी त्यातील केवळ ६% प्रजाती मानवाला चावतात. डासांच्या वेगवेगळ्या प्रजातीने त्यांचा वेगवेगळ्या रक्तदाता प्राणी, पक्षी निवडला आहे. काही डास केवळ माकडांना चावतात. या ६ टक्के प्रजातीतील केवळ मादी डास रक्तपिपासू असतात, नर नाही 😳
डास घराण्यातील पुरुष पूर्ण शाकाहारी असतात. मादी देखील केवळ नाइलाज म्हणून तुमचे रक्त पितात. कारण त्यांना अंडी घालण्यासाठी अधिक प्रोटीन्सची आवश्यकता असते. मानवी जन्माची आपण किती तयारी करतो, गर्भवती स्त्रियांनी आवश्यक आहार घ्यावा यासाठी आपण किती आग्रही असतो. मग बिचाऱ्या डास मादीने तिच्या होणाऱ्या बाळांसाठी तुमचे थोडे रक्त पिले तर काय फरक पडतो. तुमच्या शरीरातील एकूण रक्तावर १२ लाख डास पोसले जाऊ शकतात. मग होऊ द्या की थोडा खर्च. 🤪 आधीच सर्व डासांचे पुल्लिंगी उच्चारण करून तुम्ही त्यातील स्त्री जातीचं आस्तित्वच नाकारलं आहे. आता जरा परतफेड करा की😀 सर्वात जुना, १० कोटी वर्षापूर्वीचा डास जीवाश्म स्वरूपात म्यानमारमध्ये सापडला आहे. त्याला आपण आदीडास म्हणू शकतो. 🤭  

मानववंशाच्या इतिहासात त्यातही मानवाने शेती करायला सुरुवात केली तेव्हापासून डास आणि मानव हे रक्ताचं नातं अगदी घट्ट आहे.. अगदी बोरिंग लोकांना सुद्धा एकटेपणाची जाणिव ही डास मंडळी होऊन देत नाहीत. "तुमची माझी जुनीच ओळख, तुमचे माझे जुनेच नाते. कुणी ना मजला म्हणे आपले, तुम्हीच होता एक चाहते" या सुरेश भट यांच्या ओळी या नात्यासाठी लागू होतील. 🤪 डास आणि त्याची गुणगुण हा खरं तर महाकाव्याचा विषय. आजवर पुराणकथात, तत्वज्ञानात, इतिहासात, युद्ध आणि शांतीमध्ये डासाची भूमिका वेळोवेळी अधोरेखित झाली आहे..  

 बायबल आणि कुराणात डासांचा उल्लेख आहे. मानवाला त्याच्या पापाची शिक्षा देण्यासाठी डासांची निर्मिती झाली आहे असे वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरू सांगत असतात. श्रीमद् भागवतामध्ये शुकमुनी परिक्षिताला जेव्हा विविध पापं आणि त्यातून मिळणारी शिक्षा भोगायला असलेले नरकांचे विविध प्रकार सांगतात, तेव्हा त्यात डासांचा उल्लेख आहे. आधीच दुःखात असलेल्या मित्राचं जो व्यक्ती शोषण करतो, त्याला मृत्यूनंतर एका अंधाऱ्या विहिरीमध्ये स्थान मिळतं. ही विहीर मच्छरांनी गच्च भरलेली असते. मच्छर या पापी माणसाला फोडून खातात. (म्हणून दोस्तीत कुस्ती नाय करायची) 😂
एका पुराणकथेमध्ये अरूनासुराची कहाणी सांगितली आहे, ज्याचं निर्दालन करण्यासाठी पार्वतीने भ्रमरीदेवीचे रूप घेतलं. अरूनासुराच्या सैन्यावर तिने भुंगे, माश्या, डास आणि कीडे यांचं सैन्य धाडलं. अरूनासूराच्या सैन्याचा पाडाव झाल्यावर ही फौज अरूनासुराच्या देहावर चढली आणि त्याचा फडशा पाडला.😳 सर्बियामध्ये डासांबद्दल एक लोककथा आहे. तिकडच्या आटपाट नगरात एक नरभक्षक राक्षस राहत होता. जनता त्याच्या त्रासाला कंटाळून गेली होती. मात्र जनतेमधून एक नायक जन्माला येतो आणि तो या नरभक्षकाला मारून आणि नंतर जाळून टाकतो. परंतु अमरत्वाच वरदान लाभलेल्या या नरभक्षकाच्या राखेमधून डास जन्माला येतात. आणि तेव्हापासून ते मानवजातीचा बदला घेत आहेत. मोराल ऑफ द स्टोरी : डास अमर आहेत. 😭 

 पाप आणि डास या दोन्हीचा जन्म दलदलीमध्ये, पाणथळ जागेत होत असतो. बायबल म्हणते त्याप्रमाणे "मृत्यू ही पापाची शिक्षा असते. जे डासांना देखील लागू आहे. पाप आणि डास दोन्ही तुमच्या शरीराचा ताबा घेतात. आणि त्यावेळी तुम्ही बेसावध असता, तुम्हाला ही बाब जास्त गंभीर वाटत नाही." 🤔 डासांचा संबंध असा पापाशी जोडणे मला तरी मान्य नाही. माझे डासांवर प्रेम आहे. या डासवेडास तुम्ही काही पण नाव द्या.. पण धार्मिक संघर्ष कमी केल्यामुळे मला डास आवडतात. कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट यांचा संघर्ष तुम्हाला माहित असेलच. मात्र या दोन्ही बाजू एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभ्या असताना डासांनी आपली निर्णय भूमिका बजावली. मच्छरांच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे प्रोटेस्टंट मंडळींनी कॅथोलिक बेटावर शरणागती मागितली आणि शेकडे वर्ष सुरू असलेला झगडा संपला.❤️ 

डासापासून होणाऱ्या मलेरियाची दहशत हजारो वर्षापासून आहे. मात्र डास चावल्यामुळे मलेरिया होतो हे समजायला १८९७ हे वर्ष उजाडावं लागलं. आरोग्यशास्त्राचा जनक हिपॉक्रेट्सने मलेरियाचा संबंध नक्षत्रांशी जोडला होता. मल एअर अर्थात अशुद्ध हवा अशी मलेरिया या नावाची व्युत्पत्ती सांगता येते. डासी चावल्यानंतर तिथे सूज का येते तुम्हाला ठाऊक आहे का? कारण रक्त पिताना त्याची गाठ होऊन स्ट्रॉ जाम होऊ नये म्हणून डासी आधी आपल्या त्वचेमध्ये त्यांची लाळ सोडतात. त्यामुळे रक्त थोडं पातळ होतं आणि डासींना तो ज्यूस सहज पिणे शक्य होतं. आजार देखील डासी या लाळेमधूनच आपल्याला नकळत देत असते. पण तिचा उद्देश खरंच तसा वाईट नसतो.‌ मायला पोरांसाठी करावे लागते. मिलन झाल्यावर नर काही दिवसात मेलेला असतो, ही बिचारी सिंगल मदर असते, घ्याकी थोडं समजून तिला. 😀 

 फुलपाखराप्रमाणे डासांच्या जीवनचक्रामध्येदेखील अंडी, डिंभ, कोश आणि पूर्ण वाढ झालेला अशा चार अवस्था असतात. पोषणासाठी अनुकूल असलेल्या ठिकाणी अंडी घातली जातात. नर डासाचं आयुष्य कमी असतं. जास्तीत जास्त दोन महिने तो जगतो, मिलन झाल्यानंतर तर तो केवळ पाच-सहा दिवसच जगतो. 😭 मादी डास साधारणतः तीन महिने जगते आणि दर २१ दिवसांनी अंडी घालते. एका वेळेस साधारणता ३०० अंडी घातली जातात. बहुतेक प्रजाती या मध, पराग आणि फळांच्या रसावर जगतात. दहा दिवसात डासाचं पिल्लू पाण्याबाहेर येऊन उडायला शिकतं. तोवर त्याचे अनेक भाऊ बहीण मासे, बेडूक यांनी खाल्लेले असतात. 😭 

 डास हा अन्नसाखळी मधील महत्त्वाचा भाग आहे. वनस्पतीतील रस शोषून गुजराण करणाऱ्या डासांच्या जाती परागीभवन करत असतात. अनेक पक्षी, वटवाघळ या प्रौढ डासांवर आपली गुजराण करत असतात. डिंभ स्वरूपात ते मासे, बदक आणि बेडकांचे खाद्य असतात. मलेरिया, पिवळा ताप, हत्तीपाय, चिकन गुनिया, झिका, डेंग्यू यासारखे आजार देणारे डास हे १०° पेक्षा कमी तापमानात जिवंत राहू शकत नाहीत. १५-२५° हे त्यांच्यासाठी आदर्श हवामान. ( तरीच ऋषी लोक तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात जायचे, साला तिकडे मच्छर येणारच नाही ना.. म्हणून तिकडे तपोभंग करण्यासाठी रंभा मेनका पाठवायला लागायची. इकडे महाराष्ट्रात तर केवळ दहा मच्छर पाठवून पण तपश्चर्या मोडता येईल🤪)  

 डास हे अगदी लहान मुलाप्रमाणे असतात. जेव्हा घरात असून त्यांचा आवाज येत नसेल तर समजून चला, नक्कीच ते काहीतरी उद्योग करत आहेत. 🤪 तुमचे कार्यालयीन सहकारी आणि डास यांच्यात एक साम्य असते.. दोघेही तुमचे रक्त प्यायला टपलेले असतात… मात्र एक झापड ठेऊन दिली तर किमान डास तरी तुमचे शोषण थांबवतात, सहकारी मात्र खूपच निबर असतात, त्यांचा मेंदू काय लगेच हार मानत नाही. 🤪 डासांच्या मेंदूमध्ये केवळ दहा पेशी असतात. त्यांची दृष्टी देखील अतिशय कमजोर असते. दोन्ही बाजूला शंभर डोळे असूनदेखील (किंवा कदाचित त्यामुळेच) डासांची नजर अतिशय कमजोर असते. त्यामुळे आपल्या तीव्र घ्राणेंद्रियाचा वापर करून ते आपले सावज शोधत असतात. 

 मानवाच्या श्वासामधून कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जीत होत असतो, ज्यासाठी डास अतिशय संवेदनशील असतात. ७५ फुटांवरून देखील त्यांना जाणीव होते, की मला आवश्यक असलेली रक्तपेढी जवळ आहे. दोन व्यक्तींपैकी ज्याचा शरीराचा, घामाचा वास जास्त येत असेल, त्याला डास चावण्याची शक्यता अधिक असते. (आता समजले का, डास तुम्हाला का चावला, तुमच्या जोडीदाराला का नाही. 🤭) डास उष्णतेचे देखील चांगले शोधक असतात, मानवी शरीराच्या तापमानावरून त्यांना मानवी अस्तित्व लक्षात येते. गर्भवती अवस्थेत महिलांच्या शरीराचे तापमान काहीसं जास्त असल्यानं, तसेच हार्मोनल बदल झाल्याने शरीराला येत असलेल्या वेगळ्या गंधामुळे गर्भवती महिलांना डास अधिक चावू शकतात. 😡 

 जागतिक तापमानासोबत मलेरियाचे प्रमाण देखील वाढत आहे. पूर्वी मलेरियाचा प्रादुर्भाव नसलेल्या थंड हवेच्या भागात देखील मलेरियावाहक डासांची वाढ होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. वाढते तापमान सहन न झाल्याने हे कीटक विषुववृत्तापासून दूर जाऊ पाहत असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर मलेरियाचे प्रमाण कमी होत असले तरी टांझानिया केनिया यांसारख्या देशात हे प्रमाण वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २०२१ मध्ये आफ्रिकन देशात मलेरियाची सुमारे २५ कोटी प्रकरणे नोंदवली असून त्यातील निम्म्यापेक्षा जास्त प्रकरणे नायजेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि मोझांबिक या देशांमधून समोर आली आहे. 

केवळ मानवच नाही तर स्थानिक हवाईयन पक्षी देखील यामुळे त्रस्त झाले असून डासांच्या घुसखोरीमुळे त्यांनी आपले क्षेत्र बदलले आहे. डास प्रतिवर्ष सुमारे साडेसहा मीटर उंच प्रदेशात स्थलांतरित होत आहेत मात्र तापमान वाढ हे डासांच्या स्थलांतराचे एकमेव कारण नाही. कारण सामान्यतः उबदार वातावरणात मच्छरांचे प्रजनन झपाट्याने होते. कीटकनाशकांचा, मच्छरदाण्यांचा वाढता वापर हे देखील यामागे कारण आहेच, याशिवाय डासांमधील उत्क्रांती देखील झपाट्याने होत आहे. एकेकाळीच्या प्रबळ प्रजाती आता लुप्त पावत आहेत. मानवनिर्मित हवामान बदलापुढे डास हार मानणार नाहीत. खूप दिवस पाऊस पडतो, तिथे डासांची संख्या वाढतेच, पण दुष्काळी भागात, जिथे पाणी साठवून ठेवले जाते, तिथे देखील डासांना प्रजननासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. 

२००४-०५ मध्ये केनियामध्ये झालेल्या चिकन गुनियाच्या प्रादुर्भावाचा संबंध तत्कालीन दुष्काळाशी जोडता येतो. जिथे पाण्याची साठवणूक करून ठेवावी लागते तिथे गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा हा मंत्र ध्यानी धरावा लागणार आहे. कारण डासांनी पाण्यात घातलेली अंडी गप्पी मासे खाऊन टाकतात. एक मच्छर आदमी को.. या फालतू डायलॉगमध्ये तसा काही दम नाही. मात्र इंग्लंडला "ग्रेट ब्रिटन" बनवण्यामध्ये या मच्छर मंडळीची भूमिका महत्त्वाची आहे. इंग्लंडचे ग्रेट ब्रिटन होण्यामध्ये एक अडचण होती, स्कॉटलंडला स्वतःची स्वायत्तता गमवायची नव्हती. 

१६९८ मध्ये स्कॉटलंड वरून पाच जहाजे अतिशय महागडा व्यापारी माल आणि हजारो प्रवासी घेऊन अमेरिकेला निघाली. हे प्रवासी तिथं जाऊन आपली वसाहत निर्माण करणार होते आणि स्कॉटलंडसाठी पैसा कमावणार होते. मात्र तिथं त्यांच्या स्वागताला मच्छर तयार होते. मलेरियाने रोजच डझनावारी लोक मरू लागली. सहा महिन्यात निम्मे लोक मेले. त्यांना वाचण्यासाठी बचावपथक जेव्हा पोचलं तेव्हा केवळ काही लोकच परत मायदेशात येऊ शकले आणि त्यांच्याकडे काहीही पैसा नव्हता. स्कॉटलंडचं दिवाळं वाजलं आणि त्यांच्यापुढे इंग्लंडमध्ये विलीनीकरण करून घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.😭
ज्याप्रमाणे अमेरिकन डासांचा त्रास युरोपियन लोकांना झाला त्याच पद्धतीने युरोपामधून गेलेले डास हे अमेरिकेतील लोकांसाठी कर्दनकाळ ठरले. कोलंबसने जेव्हा हिस्पानिओला बेटावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हा तिथल्या मूलनिवाश्यांची संख्या सुमारे ८० लाख होती. पुढील बावीस वर्षातच तिथं केवळ २६००० मूलनिवासी जिवंत उरले होते. ही सर्व कत्तल युरोपामधून अमेरिकेत गेलेल्या डासांनी पसरवलेल्या आजाराने केली होती. त्याआधी देखील अनेक लढाया निर्णायक करण्याची भूमिका डासांनी बजावली आहे.. जेव्हा रोमन आपलं साम्राज्य वाढवू पाहत होते, तेव्हा स्कॉटलंड मोहिमेमध्ये मलेरियाने त्यांचं ऐंशी हजारपैकी चाळीस हजार सैन्य गारद केलं होतं. 😬 

 चंगेजखानाच्या आक्रमणाला त्याच्या सैन्यातील एक तृतीयांश सैन्य खल्लास करून मच्छरांनी मोठं आव्हान दिलं आणि त्यामुळे युरोपचं संरक्षण झालं होतं. दक्षिण अमेरिकन देशांच्या बंडाच्या काळात देखील मच्छरांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.😳 थोर चिनी तत्वचिंतक लाओ ट्सू म्हणतो, "डास हा जेव्हा पुरुषाच्या वृषणावर (तोच तो, अध्येमध्ये कपाळात जाणारा अवयव) बसलेला असतो, तेव्हाच त्याला समजतं की सर्वच प्रश्न हिंसेने सुटत नाहीत." 🤭 (हाच विनोद कंफ्युशियसच्या नावाने देखील खपवला जातो बरं का. कोण म्हणालं यापेक्षा काय म्हणालं हे इथं महत्त्वाचं 😂)  

 रोबोट १ सिनेमातील सर्वात आवडता सीन. जेव्हा ऐश्वर्या रायला एक मच्छर चावून जातो तेव्हा त्याला शोधून आणण्याचं काम रोबोट करतो. रंगुस्की नावाच्या बदमाश मच्छराने सुंदर ऐश्वर्याला चावलेलं असतं. रोबोट त्याला म्हणतो की तू माझ्यासोबत येऊन तिची माफी माग. अर्थातच रंगुस्की आधी नखरे करतो, रंगुस्की तीन अटी घालतो. रक्ताचे चांगले अड्डे दाखव, ओडोमॉस गूडनाईट वर बंदी (कदाचित तेव्हा गूड नाईटने मच्छर मरत असावेत) आणि शेवटची मागणी आम्हाला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित कर.🤪 रोबोट बोलतो पहिली अट पूर्ण करणं माझ्या हातात, इतर दोन नाही. चिडलेला रंगुस्की रोबोटवर हल्ला करतो. चावून पण रोबोटवर परिणाम होत नाही हे पाहून तो शरण येतो. 

कदाचित त्याने रजनीकांत आणि मच्छरचा जोक ऐकला असेल. आता तो जोक सांगणं पण क्रमप्राप्त आहे. एकदा रजनीकांत, जॅकी चॅन आणि अरनॉल्ड एकत्र जमलेले असतात. कोण किती भारी आहे यावर चर्चा सुरू असते. जॅकी चॅन एक झुरळ टेबलवर ठेवतो आणि त्याला एक फाईट मारतो, ते झुरळ थोडसं पुढं जातं आणि नंतर त्याचे दोन तुकडे होऊन ते खाली पडतं. अरनॉल्ड बंदूक घेतो आणि घड्याळावर बसलेली माशी बंदुकीच्या गोळीने मारून दाखवतो. रजनीकांत काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष असतं. समोरून एक मच्छर येतो, रजनीकांत त्याचा चाकू मच्छरच्या दिशेने फेकतो. मच्छर उडून जाताना सगळे पाहतात, आणि बोलतात. अरे काय भाऊ मच्छर तर जिवंत आहे. रजनीकांत बोलतो, होय तो जिवंत आहे परंतु तो आता कधीच बाप बनू शकणार नाही. 🤪 

अजून एक पीजे. पण आता जरा बाळबोध हा काय.. लगेच अपेक्षा वाढतात लोकांच्या 😂काय आहे, उगाच एकटे काय वाचून हसता असे कोण्या लहान पोराने विचारले तर हा पुढचा जोक सांगता येईल. एका मच्छराचं बाळ पहिल्यांदा उडून चक्कर मारून आलं. घरी परत आल्यावर आईने विचारलं कसं वाटले रे.. तो म्हणाला… खूपच छान, सगळ्या माणसांनी माझं टाळ्या वाजवून स्वागत केलं. 😬 

 विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे, अनेक ठिकाणी जेनेटिकली जुगाड केलेले डास वापरून त्यांची लोकसंख्या नियंत्रणात आणत आहेत. पण मला तर वाटते, डास हे आपले मित्र कसे होतील यावर शास्त्रज्ञांनी भर दिला पाहिजे. विशेषतः अश्या मच्छरची प्रजाती शोधून काढायची, जी चरबीचं शोषण करेल, रक्ताचं नाही. आणि चरबीचं शोषण करताना व्यक्तीला कळायला पण नको. मग काय राव.. जीमला जायला नको, डाएट करायला नको, घरात कोणती कॉईल लावायची नाही की मच्छरदाणी लावायची नाही. रात्री मस्त झोपायचं, मच्छर त्यांचे काम करतील. कशी वाटली आयडिया 🤪 इती डासबोध ग्रंथ संपन्न

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके

ऑनलाईन गणित शिकवणी

दृष्टी तशी सृष्टी