हेडी लॅमार : वैज्ञानिक अभिनेत्री

हेडी लॅमार : वैज्ञानिक अभिनेत्री अभिनेत्र्या आणि त्यांची सुमार बुद्धिमत्ता यावर आपण आजवर अनेक विनोद ऐकले असतील. या अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या असतात अशी पुरूषी मानसिकता त्यामागे असेल. काही वर्षांपूर्वी आलिया भटच्या विनोदांचा तर खूपच मोठा ट्रेण्ड चालला. मात्र मला तर ती खूपच समजदार पोरगी वाटत आली आहे. (आताही रणवीर सिंगच्या फोटोशूट प्रकरणात तिने अतिशय विवेकी भूमिका घेतली आहे.) आपल्या सिनेसृष्ठीतील स्मिता पाटील, शबाना आझमी, दीप्ती नवल यांसारख्या सकस अभिनेत्र्या त्यांच्या विद्वत्तेसाठी आणि सामाजिक भानासाठी प्रसिद्ध आहेतच. "बुद्धी असेल तर सौंदर्य नाही, सौंदर्य असेल तर बुद्धी नाही" अश्या पुरूषी म्हणींना चपराक देणाऱ्या या अभिनेत्र्या. 😘 मात्र अभिनय आणि संशोधन या दोन्ही क्षेत्रात अचाट कामगिरी करणाऱ्या हेडी लॅमारने सर्व तारकांपेक्षा आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ❤️ आज वाय-फाय आणि ब्ल्यू टूथ हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचा शोध या अभिनेत्रीने लावला आहे. अशी अभिनेत्री, जिला या पृथ्वीतलावरची सर्वात सुंदर स्त्री असं संबोधलं जायचं. ऑस्कर फॉर इन्वेशन मिळवणारी ही पहिली महिला. आजवर झालेल्या सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये गणना होणाऱ्या या कलंदर व्यक्तिमत्त्वाची शास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि प्रवर्तक असण्याची बाजू बहुतेकांना माहित नसते. आज तिच्या कलंदर व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊ या.✊
"ब्रेन विथ ब्युटी" अशी देणगी लाभलेली हेडी लॅमार ही मूळची ऑस्ट्रियन नागरिक. तिचा जन्म ९ नोव्हेंबर १९१४ रोजी व्हिएन्ना शहरात झाला. "हेडविग इव्हा कायस्लर" हे तिचं जन्मनाव. आर्थिक आणि बौध्दीकदृष्ट्या संपन्न असलेल्या आईवडीलांचं हे एकुलतं एक अपत्य, त्यामुळं खूपच लाडकं. 😍 आईवडिलांचं भरपूर लक्ष असल्यानं तिच्या व्यक्तिमत्त्वाला सर्व बाजूने आकार मिळाला. हेडीची आई गेरट्रूड ही मूळची हंगेरियन रहिवासी. बुडापेस्ट शहरात वाढलेली "गेरट्रूड कायस्लर" ही उत्कृष्ठ पियानोवादक होती. तिने हेडीला कलेबाबत समृध्द करण्यात दक्षता बाळगली. हेडीचे वडील "एमिल कायस्लर" हे लेम्बरब, युक्रेनमधून व्हिएन्नामध्ये आलेले. अनेक बँकांचे व्यवस्थापन करण्याचा त्यांना अनुभव होता, हेडी लहान असताना ते वायनर बँकेचे उपसंचालकपद सांभाळत होते. 😳 घरात पैसापाणी मजबूत होता. वडील चिकित्सक वृत्तीचे असल्यानं प्रत्येक गोष्टीमागचा कार्यकारणभाव तपासायचं बाळकडू तिला घरात मिळालं. बापलेक बाहेर फिरायला गेले तरी त्यांच्या गप्पांचा विषय विज्ञान हाच असायचा. औषधं कशी काम करतात, प्रिंटिंग प्रेस कसं काम करते किंवा रस्त्यातील गाड्या कशा चालतात याविषयी बापलेक गप्पा मारत असत. ❤️ अशा पोषक वातावरणामुळे वयाच्या पाचव्या वर्षी कुतूहल जागं झालेली हेडी घरातील वस्तू उघडून त्या कश्या काम करतात हे पाहू लागली. वस्तू उघडायच्या, मात्र कधी कधी त्या परत जोडता यायच्या नाहीत. 🤪 मात्र तरीही तिला आई-वडिलांकडून बोलणी ऐकावी लागली नाहीत. तिला वयाच्या चौथ्या वर्षापासून घरीच खासगी शिकवणी लावली होती. दहाव्या वर्षी ती चार भाषा बोलू शकणारी, कुशल नर्तक आणि आईप्रमाणे उत्कृष्ठ पियानोवादक म्हणून गणली जाऊ लागली. वयाच्या बाराव्या वर्षी तिने व्हिएन्नामधील सौंदर्य स्पर्धा जिंकली. संगीताच्या, बॅलेनृत्याच्या अनेक कार्यक्रमात हेडीला बोलावलं जाऊ लागलं. आई वडील जन्माने ज्यू असले तरी आईने नंतर ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. मुलीने देखील ख्रिस्ती धर्माचं पालन करावं यासाठी आईचा प्रयत्न होता. मात्र आयुष्यात कोणत्याही धर्माचे बंधन हेडीने स्वीकारलं नाही. ✊ मात्र कलाक्षेत्रात हेडीचा शिरकाव झाला, आणि तिच्यातील शास्त्रज्ञ मागे पडला.
तिनं अभिनयाचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि झेक सिने इंडस्ट्रीमध्ये स्क्रिप्ट गर्ल म्हणून काम करण्यास सुरवात केली, लवकरच ती अभिनेत्री बनली. सोळा वर्षाच्या हेडीला १९३० साली "मनी ऑन द स्ट्रीट" या जर्मन चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली. पुढं पाच सहा चित्रपटात किरकोळ भूमिका करत ती स्ट्रगल करत राहिली. मात्र लवकरच तिची प्रमुख भूमिका असलेला "एक्स्टसी" हा सिनेमा १९३३ मध्ये आला, ज्याने खूपच मोठं वादळ उठवलं आणि हेडीचं नाव संपूर्ण युरोप आणि अमेरिकेत गावागावात पोचलं. उत्कट प्रणय तसेच कामतृप्तीचं पहिलं दृश्य दाखवणारा अशी या चित्रपटाची नोंद करता येईल. अर्थातच या दृश्यांमधून पडद्यावर आग लावणारी १९ वर्षाची हेडी तरुणांची स्वप्नसुंदरी ठरली.😍 एक्स्टसी चित्रपटाचं कथानक तसं साधंच होतं. म्हातारा नवरा, तरुण बायको. त्यामुळे तिचं घरातील नोकरावर प्रेम जडतं. आणि दोघं त्यातून जवळ येतात. आजवर अनेक कथा कादंबऱ्यामध्ये हा विषय हाताळलेला होताच की. मात्र चित्रपटातील हेडीचा नैसर्गिक अवस्थेतील (म्हणजे वस्त्रहीन हो) मुक्त वावर आणि प्रणयदृश्यांमधील उत्कटता ही तेव्हाच्या समाजाच्या पचनी पडणारी नव्हती. अशा चित्रपटांमुळे व्याभिचाराला चालना मिळेल असा आरोप तेव्हाच्या संस्कृतीरक्षकांनी केला. चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी आली म्हणून मग निर्मात्याने रशियामध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला. रशियन लोकांना तेव्हा लय भारी वाटलं, मायला, आमच्या देशात चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्यांनी हा चित्रपट सुपरहिट केला. मग नाईलाज म्हणून युरोप अमेरिकेमध्ये देखील चित्रपट प्रदर्शित करावा लागला. चित्रपटांचं सोवळंपण दूर करण्यात एक्स्टसी चित्रपटाचं खूप मोठं योगदान मानावं लागेल. ❤️ याचदरम्यान १९३३ मध्ये ऑस्ट्रियन सैन्याला दारुगोळा पुरवठा करणाऱ्या फ्रित्झ मॅंडल याच्याशी तिचं लग्न झालं. तिचं एक नाटक पाहताना तो तिच्या प्रेमात पडला होता, तिने भाव दिला नाही तर हात धुवून मागे लागला आणि त्यांचं लग्न झालं. मात्र हे लग्न जास्त वर्षं टिकलं नाही. चार वर्षात घटस्फोट झाला. तेव्हा ती म्हणते की "एकतर मी अभिनेत्री होऊ शकेल किंवा त्याची बायको होऊ शकेल. कारण माझ्यापेक्षा १५ वर्षांनी मोठा असलेला हा नवरा माझ्यावर प्रचंड सत्ता गाजवायचा. त्याच्या दृष्टीने मी एक शोभेची बाहुली होते, जेव्हा त्याचे श्रीमंत मित्र, मोठमोठे अधिकारी घरी येतील, त्यावेळेस त्यांचं हसतमुखाने स्वागत करणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय होतं." 😬 जेव्हा त्याच्या मित्रांसोबत नाझी अधिकारी यायला लागले, त्यावेळेस मात्र हेडी मुळापासून घाबरली. नवरा उघडउघड मुसोलिनी आणि हिटलर यांचं समर्थन करत होता. जन्माने ज्यू असलेल्या हेडीला आणि तिच्या आईवडिलांना याची भीती वाटणं साहजिकच होते. संधी मिळताच हेडी गुपचूप लंडनला पळून गेली आणि पुढं हॉलिवूड गाठलं. नंतर पुन्हा पाच वेळा तिने संसार थाटला आणि पाचही वेळा तिचा संसार मोडला.. 😔 तिसऱ्या नवऱ्यापासून झालेली तीन मुलं हेच काय सर्व संसारांचं फलित. तिचं शेवटचं लग्न झालं तेव्हा ती ४९ वर्षांची होती, आणि दोन वर्षात तिचा घटस्फोट झाला. नंतर वयाच्या ८५ वर्षांपर्यंतचं आयुष्य तिनं एकटेपणानंच काढलं.
हॉलिवूडला आल्यावर तिने आपल्या बालपणाच्या नावाला तिलांजली दिली आणि हेडी लॅमार हे नाव धारण केलं. १९३८ मध्ये तिची पहिली हॉलिवूड फिल्म आली. "अल्जायर्स" या सिनेमाने तिला तुफान प्रसिध्दी मिळवून दिली. नामवंत अभिनेत्यांसोबत काम करण्याची तिला संधी मिळू लागली. आता हॉलिवूडच्या इतर अभिनेत्री हिच्या केशभूषेची, वेशभूषेची नक्कल करू लागल्या. लॅमारला या वृत्तीचं खूप हसायला येई. कारण ती स्वतःला अशा ग्लॅमर पलीकडे पाहू शकत होती. तिचे ग्लॅमरविषयी एक वाक्य प्रसिद्ध आहे, "कोणतीही मुलगी ग्लॅमरस दिसू शकते, त्यासाठी तिने केवळ एका जागी शांत आणि ठोंबीसारखं उभं राहायचं असतं." 🤪 तिला स्वतः अशी शोभेची बाहुली बनण्यात रस नव्हता. तिने फावला वेळ संशोधन करण्यात घालवला. मँडलच्या घरी गृहिणी म्हणून जगत असताना तिचा आधुनिक शस्त्रं आणि त्यांचं तंत्रज्ञान यांच्याशी संबंध आला होता. तिने स्वतः देखील काही प्रयोग करून पाहिले होते. १९४० साली हॉलिवुडमध्ये जॉर्ज अँथिल या संगीतकाराशी तिची एका पार्टीमध्ये भेट झाली त्याच्यासोबत चर्चा करताना तिला असं जाणवलं की आपण सैन्याला मदत करू शकणारं तंत्रज्ञान विकसित करू शकतो. तेव्हा सुरू असलेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये दोस्त राष्ट्रांना मदत करण्याचा त्यांचा उद्देश होता. या दोघांनी मिळून फ्रिक्वेन्सी हॉपिंग स्पेड्रम स्पेक्ट्रमच्या कल्पनेवर काम केलं. यामध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर या दोघांचीही रेडिओ फ्रिक्वेन्सी अनियमित असते, एकाच वेळेस बदलत असते. मार्कोनी, टेस्ला यांनी जरी तोवर वायरलेस तंत्रज्ञानावर काम केलेले असले, तरी इथं त्याचं उपयोजन अगदी वेगळ्या पातळीवर
होत होतं. 😇 टॉरपीडो म्हणजेच पाण्यातून पाण्यात मारा करणाऱ्या विनाशिकेसाठी नाझींच्या रडारमध्ये न येणारी यंत्रणा त्यांनी विकसित केली. (ज्यांनी गाझी अटॅक पाहिला आहे, त्यांच्या डोळ्यापुढे टॉरपीडो आला असेल) शत्रू आता या विनाशिकांचे सिग्नल अडवू शकणार नव्हता. १९४२ मध्ये त्यांनी या हॉपिंग स्प्रेड स्पेक्ट्रम तंत्रज्ञानाचं पेटंट देखील घेतलं. मात्र या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी सैन्याला तेव्हा मिळाली नाही. हेडीच संशोधन सैन्याने तेव्हा वेगळ्या स्वरूपात वापरलं. नाझींच्या गुप्तचरांना चकवू शकतील अशी संदेशयंत्रणा हेडीने विकसित केली. अनियमित रेडिओ लहरींचं प्रक्षेपण करून संदेश पाठवण्याची प्रक्रिया दोस्त राष्ट्रांसाठी खूपच महत्वाची ठरली. हे संदेश नाझींना पकडता आले नाहीत. 😳 आपलं संशोधन जलद गतीनं व्हावं म्हणून तिने काही शास्त्रज्ञांना पगारावर आपल्याकोडं कामाला देखील ठेवलं होतं. तसेच पेटंट दाखल करण्यासाठी तज्ञ लोक देखील तिच्याकडे कामाला होते. तिच्या पेटंटची मुदत संपेपर्यंत तिला जरी त्यातून एक पैशाची अर्थप्राप्ती झाली नसली तरी तिला आणि जॉर्ज अँथिल यांना १९९७ मध्ये पायोनियर अवॉर्ड देण्यात आलं. आजचे वायफाय, ब्लूटुथ आणि जीपीएस यासारख तंत्रज्ञान त्यावरच आधारित आहे. संशोधनासाठी बल्बी ग्नास स्पिरीट ऑफ अचिवमेंट अवॉर्ड मिळवणारी ती पहिली महिला. ❤️ २०१४ मध्ये या दोघांचा समावेश नॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये करण्यात आला. फ्रिक्वेन्सी हॉपिंग टेक्नॉलॉजीचा तिचा हा शोध आज तिला "मदर ऑफ वायफाय" ही बिरुदावली प्रदान करतो. केवळ संशोधनच नाही तर अभिनेत्री म्हणून आपल्या लोकप्रियतेचा वापर देखील तिने देशसेवेसाठी केला. युद्धासाठी आवश्यक निधी उभा करण्यासाठी अमेरिकेने बाजारात युद्धरोखे आणले होते. लोकांनी हे युद्धरोखे विकत घेऊन देशाला मदत करावी असं आवाहन करण्यात हेडी आघाडीवर होती. इथे तिनं एक खट्याळपणा केला होता. जमा झालेल्या गर्दीमध्ये तिचा मित्र एडी ऱ्होडस असायचा आणि रँडमली निवडल्याप्रमाणे ती त्याला स्टेजवर बोलवायची.‌ लोकांना म्हणायची की भरपूर बोंड्स विकत घेतले गेले तर मी या अनोळखी तरूणाचं सर्वांसमक्ष चुंबन घेईल. चेकाळून लोक जास्तीत जास्त बाँड विकत घ्यायचे आणि ती एडीचं जाहीर चुंबन घ्यायची.‌ लोकांना ही मॅचफिक्सिंग कधी समजलीच नाही.🤭 लोकांना उल्लू बनवणं खूप सोपं आहे राव. आपल्या शेठचे तरी गारूड अजून कुठं उतरलं आहे. 🤪 वाहतूक सुरळीत करणारी यंत्रणा तयार करण्याचा तिने प्रयत्न केला. तिने अशा गोळीचा निर्मितीचा प्रयत्न केला, जी पाण्यात टाकली, तर पाण्याच रूपांतर कोकाकोला सारख्या कार्बोनेटेड वॉटरमध्ये होईल. हा तिचा प्रयोग फसला. काही प्रयोग यशस्वी झाले तर काही अयशस्वी, मात्र तिची संशोधक वृत्ती कायमच जागृत राहिली. हेडीने केलेल्या सहा विवाहाव्यतिरिक्त देखील तिची अनेक प्रेम प्रकरणं गाजली.‌ संशोधन हा सामाईक धागा घेऊन शास्त्रज्ञ आणि कुशल उद्योजक हॉवर्ड ह्यूजेस आणि हेडी एकत्र आले. त्यांचं प्रेम हा सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय होता. त्याच्या प्रयोगशाळेमध्ये हेडीला काहीही करण्यास पूर्ण परवानगी होती. एवढंच नाही तर शूटदरम्यान सेटवर वापरता येईल अशी छोटी प्रयोगशाळा देखील त्याने हेडीला उभारून दिली. 😍
कुठलंही औपचारिक प्रशिक्षण न घेता हेडी अगदी शास्त्रज्ञांप्रमाणे काम करू शकत असे. एकदा ह्यूजेस तिला आपल्या विमानांच्या कारखान्यामध्ये घेऊन गेला. तिला विमान उड्डाणाच तंत्रज्ञान समजावून सांगितलं. अमेरिकन सैन्यासाठी जलदगती विमान बनवण्याच्या ह्यूजेसच्या प्रयत्नांनी हेडी प्रेरित झाली. तिने लगेचच वेगवेगळे मासे आणि पक्षी यांची तपशीलवार माहिती देणारी पुस्तकं मागवून घेतली. मासे कसे पोहतात आणि पक्षी कसे उडतात हे तिला जाणून घ्यायचं होतं आणि त्याचा वापर विमानात करायचा होता.😇 सर्वात जलदगती माशाचे कल्ले आणि सर्वात जलदगती पक्षाचे पंख यांची रचना समजावून घेऊन हेडीने ह्यूजेसच्या विमानाच्या मॉडेलसाठी नव्या पंखांची संरचना केली, ज्यामुळे इंधनामध्ये बचत होणार होती. तिची संरचना पाहून ह्यूजेस केवळ एकच वाक्य बोलला. "यू आर जीनियस." 😍 तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र स्त्रीप्रधान सिनेमा हा तिच्या आवडीचा विषय होता. सॅमसन अँड डेलीलाह, झिगफिल्ड गर्ल, द स्ट्रेंज वुमन, डिसहॉनर्ड लेडी यासारख्या यशस्वी चित्रपटांच्या नावामधूनच त्यांची स्त्रीप्रधानता दिसून येते. निर्माता म्हणून देखील तिने काही चित्रपटांची निर्मिती केली मात्र त्यात तिला म्हणावं असं यश मिळालं नाही. तिचा बिगबजेट "लव ऑफ थ्री क्वीन्स" हा चित्रपट सपाटून आपटला आणि तिचं प्रचंड मोठं नुकसान झालं.‌ लवकरच तिने २५ वर्षाच्या आपल्या सिनेकारकिर्दीला अचानक विराम दिला. अवघी ४३ वर्षाची असताना आणि सौंदर्य तसुभर देखील कमी झालेलं नसताना १९५८ नंतर तिने चित्रपट सृष्टीतून संन्यास घेतला. नंतरच्या अगदी मोजक्या चित्रपटात ती काही दृश्यांसाठी पाहुणी कलाकार म्हणून दिसून येते. ❤️ हेडीची काही वाक्यं सुप्रसिद्ध आहेत. "अमेरिकन पुरुषांचा दृष्टिकोन खूपच संकुचित असतो, त्यांना धन आणि स्तन या पलीकडे काही दिसतच नाही."🤪 हेडी म्हणते, "मला कुस्ती किंवा पैसे लावून झुंजवणे अजिबात आवडत नाही, मी असला एकही सामना पाहिला नाही, माझ्या जोडीदाराला असे सामने आवडतं असतील तर मी जोडीदार बदलला आहे." 😀 पुरुषांबाबत आपलं मत व्यक्त करताना हेडी म्हणते, " ३५ ते ५५ वयोगटातील पुरुष जास्त क्रियाशील आणि आकर्षक असतात. पस्तिशीच्या आतील पोरांना काही माहित नसतं, आणि त्यांना शिकवायला मला वेळ नाही." 😂 माझ्यासारख्या अंकलछाप लोकांना लयच आवडणार हे वाक्य🥳🥳 उतारवयात बहुतेक जीनियस मंडळींचं होतं, तसंच हेडीचं देखील झालेलं दिसून येतं. तिचा खटका वेळेअवेळी पडायला लागला होता. "एक्स्टसी अँड मी" या व्यक्तीचरित्रात तिच्या जीवनाचं चुकीचं चित्रण केलं म्हणून तिने सहलेखकावर दावा दाखल केला. 😬 १९७४ मध्ये ब्लेझिंग सडल चित्रपटात पात्राच्या "हेडली लॅमार" या नावाऐवजी चुकुन हेडीचं नाव घेतलं गेलं. आपल्या नावाचा गैरवापर केला म्हणून तिने या चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यामुळे हेडीचे नाव हा अनेक वर्ष चेष्टेचा, विनोदाचा विषय राहिला होता. १९६६ मध्ये तिच्यावर दुकानात चोरीचा आरोप करण्यात आला तसेच १९९१ साली ७७ वर्षीय हेडीवर आयड्रॉप आणि इतर सामान चोरल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र तिची ओळख पटल्यानंतर दोन्ही वेळेस गुन्हा दाखल झाला नाही. 🤭 विक्षिप्त नाही तो शास्त्रज्ञ कसला म्हणा! पण तिने आपल्याला थारा देणाऱ्या अमेरिकेवर मात्र खूप प्रेम केलं. तिची देशसेवा पाहून अमेरिकेने तिला १९५३ साली नागरिकत्व बहाल केलं होतं. १९८१ नंतर तिची नजर कमजोर व्ह्यायला लागली, ती फ्लोरिडामध्ये स्थाईक झाली. रोज पाच सहा तास फोनवरून गप्पा मारणं हा तिचा नवा दिनक्रम झाला. १९ जानेवारी २००० रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी फ्लोरिडामध्येच हेडीचा मृत्यू झाला. तिच्या अंतिम इच्छेनुसार व्हिएन्नामधील दफनभूमीत तिचं पार्थिव शरीर दफन करण्यात आलं. २०१५ मध्ये तिच्या १०१ व्या जन्मदिवशी गूगलने तिला डूडल अर्पण करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. (सोबत जोडले आहे, आवर्जून पाहा… मस्तच आहे) व्हिएन्ना विद्यापिठात बसवलेल्या दुर्बिणीला तिचं नाव देण्यात आल आहे. तसेच २०१९ मध्ये एका ॲस्ट्रॉइडला देखील तिचं नाव देण्यात आलं आहे. ❤️ जिवंतपणी आख्यायिका झालेली, अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकांचा, चित्रपटांचा, लघुपटांचा विषय झालेली हेडी लॅमार. हिमनगाप्रमाणे व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण दर्शन कधी होतच नाही.आपल्या नीतिमत्तेच्या किंवा इतर कोणत्याही चौकटीत न बसणारं तिचं आयुष्य खूपच वेगळं होतं. मात्र आजवरचा इतिहास देखील हाच आहे की, चौकटीत बसणाऱ्या लोकांकडून कधीच विशेष काही घडलेलं नाही. तिच्यातल्या वेगळेपणाला सलाम.. कल्पनाशक्तीला सलाम, सुजनशीलतेला सलाम. अभिनेत्रीला सलाम आणि संशोधिकेला सलाम.

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव