जेम्स वेब टेलेस्कोप: सृष्टीची नवी दृष्टी
जेम्स वेब टेलेस्कोप: सृष्टीची नवी दृष्टी
कोsहम..
मी कोण आहे? मी कुठून आलो आहे? माझा आणि या सृष्टीचा निर्माता कोण? मानवी बुद्धीला पडलेला हा आदीम प्रश्न. प्रत्येक संस्कृतीमध्ये त्याची वेगवेगळी उत्तरं शोधली गेली. ईश्वर संकल्पना निर्माण करण्यात आली. अध्यात्म आणि वेगवेगळी ग्रंथसंपदा तयार झाली आणि या काल्पनिक आधारांच्या बळावर मानवाने स्वतःची समजूत करून घेतली की तो निर्माता नक्की कोण असावा. या निर्मात्याची काल्पनिक जन्मकथा जन्माला आली. विज्ञानाच्या या जगात आता आपल्याला कोणत्याही काल्पनिक आधाराची गरज राहिली नाही.
गेल्या दीडदोन शतकात उत्क्रांतीचे सिद्धांत तसेच बिग बँग, सृष्टीच्या निर्मितीचे, ताऱ्यांच्या जन्माचे सिद्धांत मांडण्यात आले. या सिद्धांताचे समर्थन करणारे नवे नवे पुरावे समोर येत गेले, अजूनही रोज नवे पुरावे समोर येत आहेत..
आता तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे विज्ञानाची दृष्टी एवढी विकसित झाली आहे की अब्जावधी वर्षांचा कालखंड ओलांडून मानव त्या काळात डोकावून पाहू शकेल. तेजातच जनन मरण, तेजातच नवीन साज अर्थात ताऱ्यांच्या जन्माचा मरणाचा सोहळा आपल्याला पाहता येऊ शकतो. विश्वाच्या निर्मितीचे क्षण देखील टिपण्याची आशा पल्लवित झाली आहे.
तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? अब्जावधी वर्षापूर्वी घडलेल्या घटना मानव आज कसा पाहू शकेल? आकाशातील एखादी वस्तू आपल्याला दिसते याचा अर्थ त्या वस्तूपासून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोचतो. ज्यावेळी आपण चंद्र पाहतो, तेव्हा तो दीड सेकंद शिळा असतो, ज्यावेळी आपण सूर्य पाहतो तेव्हा तो साधारण साडे आठ मिनिटे जुना असतो. ज्यावेळी आपण चित्रा नक्षत्राचा तारा पाहत असतो तेव्हा आपण २५० वर्षापूर्वीचा तारा पाहत असतो. कारण त्यांच्यापासून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोचायला तेवढा काळ लागलेला असतो. त्यांचा प्रकाश पोचतो म्हणून तर ते आपल्याला दिसतात.
कॅसीओपिया हा उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसणारा सगळ्यात दूरचा तारा. हा आपल्यापासून सोळा हजार प्रकाशवर्ष लांब आहे. म्हणजे जेव्हा आपण त्याला आज पाहणार, तेव्हा तो सोळा हजार वर्ष जुना असेल. कॅसीओपिया ही मानवी दृष्टीच्या क्षमतेची मर्यादा. मात्र विश्व हे त्यापुढे देखील खूप मोठं आहे, अफाट आहे, अनंत आहे. मानवी दृष्टीआड खूप मोठी सृष्टी आहे. आपल्याकडे सुमारे चौदा अब्ज प्रकाशवर्ष दूरची वस्तू पाहण्याची क्षमता विकसित करता आली तर आपण प्रत्यक्षात बिगबँग वेळी काय घडले ते पाहू शकू.
आज जेम्स वेब दुर्बिणीने बिगबँग झाल्या अवघ्या २३ कोटी वर्षांपूर्वीचं दीर्घीकेचं चित्र मिळविण्यात यश मिळवलं आहे. म्हणजेच बिग बँगचा क्षण अनुभवणं हेदेखील मानवाच्या आवाक्यात आलं आहे. विज्ञानाची ही झेप मानवी इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे. गॅलिलिओने जेव्हा त्याची दुर्बीण आकाशाकडे रोखली आणि नवा इतिहास घडवला, त्यानंतरची खगोल शास्त्रातील ही सर्वात महत्त्वाची घटना असेल.
दुर्बिणीच्या साह्याने आपण आपल्या दृष्टीची क्षमता वाढवू शकतो. स्वतःला मिळालेल्या निसर्गदत्त शक्तींमध्ये वाढ करण्याचा मानवाचा पुरातन ध्यास. १६०७ मध्ये हान्स लीपर्शे या डच व्यक्तीने पहिली दुर्बीण बनवली, ज्यातून तीनपट मोठी प्रतिमा दिसायची. याच काळात अनेक संशोधक त्यांचे प्रयत्न करत होतेच. डोंगर, इमारती, सैन्यदलं यासारख्या दूरच्या गोष्टी जवळ दिसतील, स्पष्ट दिसतील असा त्यामागचा उद्देश होता.
१६०९ मध्ये गॅलिलिओने वीस पट मोठी प्रतिमा दाखवू शकेल अशी दुर्बीण बनवली. त्यातून गुरूचे उपग्रह नोंदवले गेले, चंद्राची कुरूपता जगासमोर आली. आणि अंतराळाकडे मानव नव्या दृष्टीने पाहू लागला. त्यानंतर दुर्बिणीच्या अनेक आवृत्त्या येऊन गेल्या. हबलची निर्मिती होण्यापूर्वी ३६ इंची दुर्बिणीने आपण विश्वाचा वेध घेत होतो.
१९७७ पासून हबलची निर्मिती सुरू झाली आणि १९९० पासून ती काम करू लागली. हबल आल्यापासून आपल्या दृष्टीची क्षमता प्रचंड वाढली. हबलने टिपलेले जिलेबीच्या आकाराचे आकाशगंगेचे चित्र आपल्या परिचयाचे असेल.
हबलच्या साह्याने आपण आकाशगंगेची (आकाशगंगेचे शास्त्रीय नाव दीर्घिका आहे बरं का) प्रतिमा टिपू शकलो, हबलच्या साह्याने इकारस हा पाच अब्ज प्रकाशवर्ष दूर असलेला तारा शोधण्यास आपल्याला यश आलं होतं. मात्र गेल्या तीस वर्षात तंत्रज्ञान खूप पुढं गेलं आहे. हे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून नव्या दुर्बिणीची निर्मिती करणं गरजेच होतं. खरं तर हबलकडून केवळ पंधरा वर्षांची सेवा अपेक्षित होती, मात्र आता दुप्पट काम केल्यानंतर आता तिची जागा घ्यायला तिच्यापेक्षा शक्तिशाली, साडे सहा मीटर व्यासाची जेम्स वेब ही दुर्बीण आली आहे.
या नव्या दुर्बिणीच्या निर्मितीला २००४ मध्ये सुरुवात झाली. या निर्मिती प्रक्रियेत १४ देशांमधील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचं योगदान लाभलं आहे. यावर काम केलेल्या सर्व व्यक्तींच्या कामाचे तास एकत्र मोजले तर हा आकडा एकूण चार कोटी तासांपेक्षा अधिक मोठा होईल. हबलपेक्षा निम्मे वजन आणि आकारमान असले तरी तिची क्षमता हबलपेक्षा सहापट अधिक आहे. जेम्स वेब टेलिस्कोप उभारणीचा एकूण खर्च सुमारे १० अब्ज डॉलर्स इतका आला आहे, जो तीस वर्षापूर्वी हबल बनवताना १६ अब्ज डॉलर्स आला होता. फ्रेंच गयाना येथील अवकाश प्रक्षेपण केंद्रवरून २५ डिसेंबर २०२१ रोजी सुमारे ६२०० किलो वजनाच्या या टेलिस्कोपचं प्रक्षेपण एरियन-५ या रॉकेटच्या साह्यानं झालं. आता गेली ३२ वर्षे मानवाची सेवा करणाऱ्या हबल टेलिस्कोपला रजा घेता येणार आहे.
नासासोबत कॅनडा आणि युरोपीय अंतराळ संशोधन संस्थांनी एकत्र येऊन जेम्स वेब नावाची एक दुर्बीण अंतराळात सोडली आणि मानवाला नवी दृष्टी प्राप्त झाली. आजपर्यंत सोडण्यात आलेली सर्वांत मोठी आणि सर्वात शक्तिमान अशी दुर्बीण आहे. पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर म्हणजेच पृथ्वी आणि चंद्र यांच्यात असलेल्या अंतराच्या साधारणतः चौपट अंतरावर ही दुर्बीण सूर्याभोवती फिरणार आहे. अंतराळात असे पाच बिंदू आहेत, जिथं एखाद्या वस्तूवर सूर्य आणि पृथ्वी यांचं गुरुत्वाकर्षण बल समान असू शकेल. अश्याच एका बिंदूवर, लॅग्रेंज पॉइंटवर, ही दुर्बीण स्थिर झाली आहे. आता इथून जेम्स वेब टेलिस्कोप ना सूर्याकडे सरकणार, ना पृथ्वीकडे सरकणार, पृथ्वीसोबत सूर्याची परिक्रमा करणार आहे.
हबल असो अथवा जेम्स वेब, या दुर्बिणींची नावं ठेवताना काय विचार केला जातं असेल? एडविन हबल हा खगोल शास्त्रज्ञ जगप्रसिद्ध होता, मात्र जेम्स वेब बद्दल परदेशातील सामान्य नागरिकांना माहित असणे अवघड बाब आहे. कोण होता हा जेम्स वेब? ज्याचं नाव जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बिणीला आज देण्यात आलं आहे. जेम्स वेब हा नासाच्या इतिहासातील दुसरा संचालक.१९६१ ते १९६८ ही त्याची नासाच्या संचालकपदाची कारकीर्द. राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी चंद्रावर अमेरिकन माणूस लवकरच उतरणार याची घोषणा केल्यानंतर त्या दिशेने नासाची वाटचाल करण्यात जेम्स वेबचं मोठं योगदान होतं.
तो काही शास्त्रज्ञ वगैरे नव्हता बरं का.. जेम्स वेब हा एक सनदी अधिकारी होता!
एका खेडेगावात जन्माला आलेला, शाळा मास्तरचा हा मुलगा, टप्प्याटप्प्याने महत्त्वाची पद मिळवत आणि त्यावर चांगली कामगिरी करत राष्ट्राध्यक्षांच्या गळ्यातील ताईत होतो आणि त्याला ही अशी नासाच्या संचालकपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येते, ही देखील एक अद्भुत गोष्ट आहे. त्याच्या संचालकपदाच्या काळातच नासाने अपोलो, जेमिनी आणि मर्क्युरी या मोहिमा राबविण्यात आल्या. मोहिमेत यश आलं की ते यश पूर्ण संघाचं असायचं, मात्र अपयश आलं की त्याची जबाबदारी जेम्स वेब स्वतःवर घेत असे.
शीतयुद्धाच्या काळात रशिया आणि अमेरिकेत प्रचंड मोठी स्पर्धा सुरू होती. सीआयए या गुप्तहेर संघटनेकडून जेम्स वेबला अशी माहिती मिळाली होती किंवा रशिया लवकरच चंद्रावर मानव पाठवण्याच्या योजना राबवीत आहे.
अमेरिकेने यामध्ये मागं पडू नये यासाठी जेम्स वेब शासनाकडं निधी आणि इतर गोष्टींची जोरदार मागणी करू लागला. मात्र असं रॉकेट हे केवळ जेम्स वेब याच्या डोक्यातील भूत आहे अशी राजकारणी आणि प्रसारमाध्यमांनी त्याची खिल्ली उडवली. आता सोव्हिएत संघराज्याच्या विघटनानंतर समोर आलेल्या कागदपत्रातून जेम्स वेबच्या या दाव्याचे पुरावे दिसून येतात. त्याने पिच्छा पुरवला म्हणूनच केनेडीचं स्वप्न वेळेत पूर्ण होऊ शकलं. त्यासाठी त्याने देशातील इतर संशोधनसंस्थांची मोट बांधून त्यांच्यात समन्वय साधला, त्यामुळे नासा अधिक चांगली कामगिरी करू शकली. चांद्रमोहिमेची तयारी पूर्ण करून मानवाचे चंद्रावर पाऊल पडायच्या काही दिवस आधीच नासामधून जेम्स वेब निवृत्त झाला होता. अशा व्यक्तीचं नाव या शक्तिशाली दुर्बिणीला देऊन नासानं चांगलं पाऊल उचललं आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये जेम्स वेबचं प्रक्षेपण झालं. प्रक्षेपणानंतर महिनाभरात पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किमी अंतरावर असणाऱ्या लॅग्रेंज पॉइंट-२ वर प्रस्थापित केल्यानंतर या दुर्बिणीला निरीक्षणासाठी सज्ज करण्यात आलं आहे. पुढची किमान वीस वर्षे जेम्स वेब दुर्बीण मानवासाठी काम करणार आहे. या दुर्बिणीला जोडण्यात आलेल्या चार वैज्ञानिक उपकरणांच्या साह्यानं संपूर्ण विश्वाच्या विविध भागांकडून येणाऱ्या अवरक्त (इन्फ्रारेड) लहरींची नोंद आपल्याला घेता येईल. या नोंदींमुळे खूप दूर अंतरावर असलेले तारे, त्यांच्यावर होणारी सौरवादळे, दीर्घिका, क्वेसार, पल्सार या सर्व बाबींचं निरीक्षण तपशीलवार करणं शक्य होणार आहे.
आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करण्याची या टेलिस्कोपची क्षमता असेल. त्या वातावरणातील घटकांवरून संबंधित ग्रहांवर जीवसृष्टीची शक्यता असेल का, याबाबतचा अंदाज शास्त्रज्ञांना लावता येईल.
डेक्कन जिमखान्यावर श्रमसाफल्य वगैरे नावाच्या बंगल्याला लागते तेवढी, म्हणजे अवघी तीन गुंठे जागा अवकाशात ही दुर्बीण व्यापते. जेम्स वेबचा मुख्य अंतर्वक्र आरसा ६.५ मीटर व्यासाचा असून, सुवर्णलेप दिलेल्या १८ षटकोनी भागांपासून तयार केला आहे. जेम्स वेब टेलिस्कोपच्या साह्याने दृश्य, कमी तीव्रतेच्या इन्फ्रारेड लहरी तसेच मध्यम तीव्रतेच्या इन्फ्रारेड लहरींची नोंद यातून करता येईल. ०.६ ते २८.५ मायक्रोमीटर तीव्रतेची तरंगलांबी नोंदविण्याची क्षमता या दुर्बिणीत आहे. ही क्षमता हर्षल वेधशाळेपेक्षा शंभर पट अधिक आहे. गम्मत म्हणजे हर्षल वेधशाळा जेम्स वेबशेजारी आहे. त्यांचा अंतराळातील पत्ता एकच, एल २ लॅग्रेंज पॉइंट, हाच आहे.
निरीक्षण घेत असताना सूर्यप्रकाश आणि उष्णतेचा अडथळा येऊ नये, यासाठी टेलिस्कोपच्या एका बाजूला पाच थरांचा पडदा जोडला आहे. दीर्घिकांच्या केंद्रभागात कृष्णविवरं असतात. या कृष्णविवरांच्या ईबाह्यभागांत घडणाऱ्या घडामोडी या दुर्बिणीने नोंदवता येतात.
११ जुलै २०२२ रोजी नासाने जेम्स वेब दुर्बिणीतून काढलेला विश्वाचा फोटो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या हस्ते प्रकाशित केला. कोणत्याही शास्त्रज्ञाच्या, हौशी अंतराळ निरीक्षकाच्या आणि विज्ञानावर प्रेम असलेल्या कोणत्याही सामान्य माणसाच्या अंगावर काटा उभा राहील आणि छातीत धडधड वाढेल असा सुंदर फोटो होता. हा विश्वाचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्पष्टता असलेला (हाइयेस्ट रिझॉल्युशन क्षमतेचा) रंगीत फोटो आहे.
या फोटोत निळ्या, नारंगी आणि पांढऱ्या रंगाच्या हजारो दीर्घिका आपण पाहू शकतो. याशिवाय इतर काही चित्रं देखील प्रदर्शित करण्यात आली ज्यात आपण पाहू शकतो की हे विश्व किती अफाट आहे. एका गावखेड्यात, शहरातील एका भागात राहणाऱ्या मर्त्य मानवाचे, संपूर्ण मानववंशाचे, साऱ्या पृथ्वीचे, आपल्या सौरकुलाचे आणि आपल्या सूर्यासारखे अब्जावधी सूर्य सामावून घेणाऱ्या, मिल्की वे असे लाडाचे नाव दिलेल्या आपल्या दीर्घिकेचे अस्तित्व या अफाट विश्वात किती नगण्य आहे याची प्रचिती या छायांचित्रातून आपल्याला येते.
अंतराळ हे वक्र असू शकते असं आइन्स्टाइनने सांगितले होतं. जेम्स वेबने पाठवलेल्या पहिल्या फोटोत अनेक दीर्घिकांच्या एकत्रित वस्तुमानाच्या प्रभावामुळे अवकाशाला वक्रता प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहता येईल. जसजसा आपण या विश्वाचा आकार समजून घेत आहोत, या अनंत विश्वात आपल्याला असा ग्रह मिळेल का, जिथं जीवसृष्टी अस्तित्वात असेल? हा प्रश्न आपल्याला भेडसावत आहे. आपली जीवसृष्टी जगू शकेल असे अनुकूल वातावरण असलेली एखादी बाब या विश्वात शोधण्याचा आपला प्रयत्न सुरू आहेच. आजवर आपण या शक्यता ५००० ग्रहांवर तपासल्या आहेत. अद्याप आपल्या हाती काही लागले नसले तरी जेम्स वेबमुळे असा ग्रह शोधणं सोपं जाणार आहे. कारण अशा ग्रहावरून येणाऱ्या इन्फ्रारेड लहरींना जेम्स वेब टेलेस्कोप सहज पकडू शकेल.
सध्या आपल्या पृथ्वीपासून ५० प्रकाश वर्ष दूर असलेल्या दोन ग्रहांचा अभ्यास जेम्स वेब करत आहे. हे दोन्ही ग्रह त्याच्या ताऱ्याच्या एवढे जवळ आहेत की ते स्वतःभोवती फिरू शकत नाहीत. चंद्र जसा पृथ्वीभोवती फिरताना त्याची एकच बाजू आपल्याला दिसते, तसेच या ग्रहांचे त्यांचा सूर्याभोवती फिरताना होत असते. या दोन्ही ग्रहांची त्यांच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा अवघ्या ११ आणि १८ तासात पूर्ण होते. सूर्याकडे असलेल्या बाजूवर तर एवढी उष्णता आहे की तिथे जीवन शक्य नसेल, मात्र अंधाऱ्या बाजूवर ते शक्य असेल. या दोन्ही ग्रहांवर ऑक्सीजन आणि नायट्रोजन असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटत असून त्या अनुषंगाने पुढील संशोधन सुरू आहे.
जेम्स वेबने पाठवलेला पहिला फोटो (smacs ०७२३ हे या फोटोचे अधिकृत नाव) खूपच महत्त्वाचा आहे. त्या फोटोसाठी विविध तरंगलांबीच्या लहरींच्या तब्बल साडेबारा तासांच्या नोंदी एकत्र करून त्यातून हा फोटो साकारला आहे. त्या फोटोत असलेली अंतराळात रंगाची उधळण पाहून थक्क व्हायला होते. हायड्रोकार्बनचं प्रमाण जास्त असलेल्या दीर्घिका हिरव्या रंगाच्या, तारे जास्त आणि धूलिकण कमी अश्या दीर्घिका निळ्या रंगाच्या तर धुलिकणांचे प्रमाण जास्त असलेल्या दीर्घिका लाल रंगाच्या असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. इथे आपल्याला काही ठिपके दिसतात. या प्रत्येक मोठ्या ठिपक्यात शेकडो दीर्घिका दडल्यात, ज्यामध्ये अब्जावधी तारे आहेत. या फोटोमुळे संधीची नवी दारे उघडी झाली आहेत. दीर्घिका आणि त्यामधील ताऱ्यांची निर्मिती कशी होते, दीर्घिका कशी प्रसरण पावते यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आता शास्त्रज्ञांना लवकरच मिळू शकतील.
सोमवारी ११ जुलैला हा smacs ०७२३ प्रसिद्ध केल्यावर दुसऱ्याच रात्री, मंगळवारी नासाने आणखी चार फोटो प्रकाशित केले. या फोटोंच्या प्रकाशन कार्यक्रमात इस्रोच्या मदतीने बेंगळुरूमधील शालेय विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन पद्धतीने सहभागी करून घेतलं होतं. हे चारही फोटो एकसे बढकर एक अश्या प्रकारचे आहेत. वास्प ९६ बी असं नाव असलेला एक वायुरूप ग्रह त्याच्या ताऱ्याभोवती फिरतो. साधारण आपल्या गुरूच्या पेक्षा थोडा मोठा, मात्र घनता खूपच कमी असल्यानं त्याचं वस्तुमान गुरूच्या निम्मं भरेल असा हा ग्रह त्याच्या ताऱ्याच्या खूप जवळून फिरतो. जवळून फिरत असल्याने आपल्या ३.४ दिवसात त्याची सूर्यप्रदक्षिणा पूर्ण होते. या ग्रहाचे निरीक्षण करत असताना त्याच्या वातावरणात पाणी असल्याचं जेम्स वेबला आढळून आलं. पाणी शोधण्याचं जेम्स वेब टेलिस्कोपचे हे प्रावीण्य लक्षणीय आहे. अर्थात या पाण्याचा आपल्याला काही उपयोग नाही, कारण प्रकाशालाच तिथून आपल्यापर्यंत यायला ११५० वर्ष लागतात.
सदर्न रिंग नेब्युला हा दुसऱ्या फोटोचा विषय. कमी तीव्रतेच्या इन्फ्रारेड लहरी तसेच मध्यम तीव्रतेच्या इन्फ्रारेड लहरींचा वापर करून दोन वेगवेगळे फोटो काढले आहेत. या फोटोंमध्ये सदर्न रिंग नेब्युला या तेजोमेघात मृत्यू पावलेल्या ताऱ्याभोवतीचे वायू आणि धुळीच्या ढगांना आपण अगदी स्पष्ट पाहू शकतो. एखादा तारा मरतो तेव्हा तो त्याच्या वायूंचे उत्सर्जन करतो, हे वायू या ताऱ्याच्या भोवती वलय करतात. असे वलय म्हणजेच रिंग नेब्युला. याच वायूच्या ढगांची विविध थरांची तबकडी ताऱ्याभोवती निर्माण होते. वायूच्या या तबकडीला रिंग नेब्युला म्हणतात. दोन्ही फोटोतला फरक शोधताना लक्षात येते की अरे इथे एकच तारा नाही. जोड तारा आहे. आणि कदाचित एक तारा दुसऱ्याचं वस्तुमान ओढून घेत आहे. ताऱ्यांच्या आंतरसंबंधांबाबत, त्यांच्यातील देवाणघेवाण व्यवहारांबाबत अधिक माहिती लवकरच समोर येईल.
तिसऱ्या फोटोमध्ये पाच दीर्घिकांच्या समूहांमधील आंतरप्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. स्टिफन्स क्विंटेट हा मानवाला सापडलेला सर्वांत पहिला लहान दीर्घिकांचा समूह होता. पृथ्वीपासून जवळजवळ २९ कोटी प्रकाशवर्षं दूर असलेला दीर्घिकासमूह पेगासस या राशीसमुहात आहे. हबलने या दीर्घिका समुहाचे फोटो याआधी काढले होते. मात्र नवीन दुर्बिणीच्या अद्ययावत इन्फ्रारेड सेन्सरने या दीर्घिका समूहाची अधिक स्पष्ट ओळख झाली आहे. १००० स्वतंत्र फोटो आणि १५ कोटी पिक्सेल एकत्रित करून या फोटोची निर्मिती करण्यात आली आहे. दुसऱ्या दीर्घिकांच्या प्रभावामुळे एखाद्या दीर्घिकेत ताऱ्यांची निर्मिती होण्यासाठीची अनुकूल स्थिती कशी बदलते तसेच कृष्णविवराच्या प्रभावामुळे दीर्घिकेमधील वायूंमध्ये काय हालचाली होतात याचा आता अभ्यास करता येणार आहे.
त्यादिवशी नासाने प्रसिद्ध केलेल्या शेवटच्या फोटोत कॅरीना नेब्युला या तेजोमेघामध्ये नवीन तारे तयार होण्याआधीच्या अनुकूल स्थितीचं दर्शन घडत आहे. अवकाश हे जणू प्रसुतीगृह असून तिथं निसर्गाला प्रसववेदना सुरू आहेत, लवकरच, अवघ्या काही लाख वर्षात तिथं ताऱ्यांचा जन्म होणार आहे. हो, काही लाख वर्षं ही या ताऱ्यांच्या जन्मप्रक्रियेत अवघी, चिमुकली ठरत असतात. ७६०० प्रकाशवर्ष दूर असलेला कॅरीना नेब्युला हा तेजोमेघ आकाशातील सर्वात तेजस्वी नेब्यूला म्हणता येईल. दीर्घिकांमधील हायड्रोजन वायूच्या ढगांच्या एकत्रीकरणातून हळूहळू, टप्प्याटप्प्याने ताऱ्यांची निर्मिती होत असते. ही प्रक्रिया शास्त्रज्ञांना या फोटोच्या साह्याने जाणून घेता येणार आहे.
हबलला जे शक्य झालं नव्हतं, ते जेम्स वेबच्या साह्याने आता शास्त्रज्ञांना उपलब्ध झालं आहे.
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या पहिल्या पाच प्रतिमांमधूनच भविष्यात ती काय काय करू शकेल याचं दर्शन घडतं. "आगाज ही इतना शानदार हो, तो अंजाम कैसा होगा?" बिग बँगच्या आधी काय होतं हा आजवर शास्त्रज्ञांना निरुत्तर करणारा प्रश्न होता. त्याआधी काहीच नव्हतं, बिंदुतून विश्व जन्मलं, वस्तुमान तयार झालं अशी मांडणी आजवर केली जात आहे. मात्र आता या मांडणीला पूरक पुरावे देखील लवकरच उपलब्ध होतील.
विश्वाची निर्मिती बिग बँग किंवा महास्फोटातून झाली असं मानलं, तर त्यानंतर दीर्घिकांची आणि ताऱ्यांची निर्मिती कशी झाली? दीर्घिका आणि ताऱ्यांच्या निर्मितीची प्रक्रिया ही विश्वाच्या अगदी सुरुवातीच्या काळातच झाली असल्यानं ही प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर विश्वातील सर्वात आधी जन्माला आलेले तारे तपासावे लागतील. आणि हे थोरले तारे अभ्यासायचे असतील, तर तेवढा जुना प्रकाश अभ्यासायची सोय असायला हवी. आज जेम्स वेब दुर्बिणीतून आपण तेवढा जुना प्रकाश तपासू शकतो.
विश्वाच्या प्राथमिक अवस्थेत जन्माला आलेले थोरले तारे आणि दीर्घिकांकडून निघालेल्या दृश्य किंवा अल्ट्रा व्हायोलेट लहरी आता दीर्घलांबीच्या इन्फ्रारेड लहरींमध्ये रूपांतरीत झाल्या आहेत. कारण विश्व हे सातत्यानं प्रसरण पावत असतं.
या दीर्घलांबीच्या इन्फ्रारेड लहरींचं अध्ययन जेम्स वेबनं केलं की आजपर्यंत कधीही पाहता न आलेला विश्वाचा भूतकाळ खगोलशास्त्रज्ञांना अभ्यासता येणार आहे. हिंदी सिनेमात जसं फ्लॅशबॅक दाखवला जातो, तसा फ्लॅशबॅक वापरून आपण खरंच त्या काळातील घडामोडी पाहणार आहोत. आपण प्रकाशाचा वेग साध्य करू शकत नसलो तरी प्रकाशाचा वेग आपल्यासाठी वापरणार आहोत.
जेम्स वेबने आतापर्यंत अंतराळाच्या एका लहानशा भागाचाच वेध घेतलाय. स्काय इज द लिमिट हा शब्द इथं अक्षरशः खरा होणार आहे. आणि समोर येणार आहेत अगणित शक्यता!
जेम्स वेब दुर्बिणीचं काम आताशा सुरू झालं आहे. ती निदान पुढची दोन दशकं कार्यरत राहील, अशी अपेक्षा आहे. या काळात काही जुनी कोडी सोडविण्यास जेम्स वेब मदत करील आणि कदाचित नवीन कोडीही आपल्या समोर मांडील. मानवाचा स्वभाव बघता ही कोडी देखील नव्या उपकरणाच्या साह्यानं सोडवण्याच्या प्रयत्न केला जाईल.
जागतिक तापमान वाढ, अनियमित ऋतुचक्र, हरितगृहवायूंचं वाढतं प्रमाण यासारख्या अनेक अडचणीमुळे आपल्या पुढच्या पिढ्यांना या पृथ्वीवर जगणं अवघड होणार आहे. त्यामुळेच दुसरी संभाव्य जीवसृष्टी शोधण्यासाठी मानवाची धडपड सुरू आहे.
हबलवर खर्च केलेले १६ अब्ज आणि जेम्स वेबवर खर्च केलेले १० अब्ज डॉलर्स रक्कम कदाचित आपल्याला अशी दुसरी पृथ्वी शोधून देईल. कदाचित यामध्ये जेम्स वेब अयशस्वी देखील होईल. यश मिळो अथवा अपयश, या प्रक्रियेमध्ये विज्ञान पुढं गेलेलं असेल. सृष्टीकडे पाहण्याची नवी दृष्टी यामधून मानवाला मिळेल, आपल्याला कुठेच थारा नाही.. जीना यहा मरना यहा, त्याशिवाय कोठेच गत्यंतर नाही, आहे हीच वसुंधरा वाचवण्याचं आणि पुन्हा फुलवण्याचं मानवाला करावं लागेल. आपण सारे मिळून ते करूच!
जय विज्ञान! जय तंत्रज्ञान!!
Comments
Post a Comment