धूमकेतू : जाळ आणि धूर संगटच

धूमकेतू : जाळ आणि धूर संगटच डावकिनाचा रिच्या
धूमकेतू.. अवकाशातील एक आकर्षक मात्र दुर्मिळ आविष्कार. धूळ आणि बर्फाचा बनलेला एक मोठा आकार जो सूर्याभोवती फिरतो. लांब आणि प्रकाशमान शेपटामुळं धूमकेतू अतिशय सुंदर दिसतात. आणि ते क्वचितच दिसतात म्हणून त्यांना भाव मिळतो. जसं आमिर खान वर्षा-दोन वर्षांतून एकच चित्रपट काढतो तर लोक उत्सुकतेनं वाट पाहतात, तोवर अक्षय कुमारचे पाच सहा चित्रपट कधी येऊन जातात ते पण कळत नाही.😭 या आकाशस्थ हिरोला भाव देत आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून धूमकेतूंचं निरीक्षण नोंदवलं आहे. लांब पांढरे केस मोकळे सोडून फिरणाऱ्या झिपऱ्या म्हातारीप्रमाणे त्यांना धूमकेतू वाटला. अर्थात त्यांच्या काळात हॅरी पॉटर सिरीज आली असती तर त्यांनी हॅरीच्या झाडूची उपमा धूमकेतूला दिली असती.🤔 आकाशात आपल्या नेहमीच्या ग्रहताऱ्यांपेक्षा काही वेगळे घटक देखील फिरत असतात. अशनी किंवा ॲस्ट्रॉईड हे देखील त्यापैकी एक. आपल्या सौरमालेत मंगळानंतर आणि गुरुपूर्वी ॲस्ट्रॉईडचा मोठा पट्टा आहे, ज्यामध्ये लाखो अशनी देखील सूर्याभोवती फिरत आहेत. याशिवाय भरपूर लहानमोठे घटक अंतराळात फिरत असतात, कधीकधी ते गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येऊन एखाद्या ग्रहावर आदळत असतात. धूमकेतूदेखील अशनी प्रमाणेच अंतराळात फिरणारे लहान घटक आहेत. मोदी ज्या प्रमाणे जग फिरतात, पण देशाला त्याचा उपयोग होत नाही, तसेच या अशनीचे फिरणे.🤣 २०१३ मध्ये आयसॉन नावाचा धूमकेतू आपल्याला दिसणार म्हणून खूपच चर्चा झाली होती. मात्र तो आपल्या सूर्याच्या जवळ आला आणि त्याच्या ठीकऱ्या उडाल्या. कारण मुळातच धूमकेतूचे शरीर तसे नाजूक आणि अस्थिर असते. कार्बनडाय ऑक्साइड, अमोनिया, मिथेन व गोठलेले पाणी यांपासून धूमकेतू बनलेले असतात. धूमकेतूचे दोन मुख्य भाग असतात, डोके आणि पिसारा. धूमकेतूचे डोके तयार होताना त्यात पुन्हा गाभा आणि शिखा असे दोन घटक असतात. गाभा किंवा न्यूक्लियस हे बर्फ आणि खडकाळ पदार्थांनी बनलेले असते. बहुतेक धूमकेतूंचा गाभा दहा ते शंभर किमी व्यासाचा असतो. त्याभोवती वायूंचे तयार झालेले ढग म्हणजे शिखा किंवा कोमा हा भाग असतो. हे वायू सहसा पाण्याची वाफ, अमोनिया, कार्बन डायऑक्साइड यांचे मिश्रण असतात. धूमकेतूच्या शरीरातील सर्वात आकर्षक भाग म्हणजे त्याची शेपूट. शेपटाचे देखील धूळ आणि आयन असे दोन भाग असतात. धुळीचे शेपूट हा पहिला भाग वायू आणि धुळीच्या लहान कणांनी बनलेला असतो. 😳 धूमकेतूच्या प्रवासात डोकं गरम होतं आणि त्यातून काही बर्फाळ भागाचे पाणी आणि वाफ होते. डोक्यातून हे वायू बाहेर पडत असतात, जे आपल्याला धूमकेतूची शेपूट वाटतात. त्यासोबतच आयनीकृत शेपूट देखील असते. सौरवाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे धूमकेतूने सूर्यापासून काही वायू ओढून घेतलेले असतात, जे पिसाऱ्याप्रमाणे धूमकेतू मागे फिरत असतात. धूमकेतूची शेपूट ही कायम सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते. धूमकेतू सूर्याच्या मागे असतो तेव्हा धूमकेतूची शेपूट डोक्याच्यामागे असते. मात्र जेव्हा धूमकेतू सूर्याच्या पुढे येतो तेव्हा ही शेपूट पुढे आलेली असते. त्यांना मिळालेल्या प्रकाशापैकी केवळ ४ टक्के प्रकाश ते परावर्तित करतात, बाकीचा शोषून घेतात.🤔 साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सौरमंडळाची निर्मिती झाली, तेव्हा जे तुकडे उरले, त्यातूनच धूमकेतूंची निर्मिती झालेली आहे असं काही शास्त्रज्ञ पूर्वी मानायचे. धूमकेतूंचं आयुष्य अवकाशातील ग्रहगोल किंवा तारे यांच्या तुलनेत खूपच कमी असतं. त्यांचे अस्तित्व सरासरी दहा लाख वर्षे असते. प्रत्येक वेळी सुर्याजवळ येताना त्यांच्या गाभ्याचे नुकसान होते. त्यातून द्रव्य बाहेर पडतं, जे आपल्याला उल्कावर्षावाच्या स्वरूपात दिसतं. प्रत्येक सूर्यफेरीमध्ये त्यांचं सुमारे ०.१ टक्के वस्तूमान कमी होतं. याचाच अर्थ कोणताच धूमकेतू आठ कोटी वर्षापूर्वी जन्माला आलेला नसणार. मात्र सौरमंडळाचं वय तर साडेचार अब्ज वर्षे आहे. म्हणजेच हे धूमकेतू नव्यानं तयार होत असणार. गेल्या काही वर्षात आपण क्युपर बेल्ट आणि द ऑर्ट क्लाउड या धूमकेतूंच्या दोन जन्मभूमी शोधण्यात यश मिळवलं आहे. 🥳 चिनी वाङ्‌मयात गेल्या पाच हजार वर्षापासूनच धूमकेतूंचे उल्लेख आलेले आहेत. मात्र तेव्हा धूमकेतूंच्या आगमन आणि प्रस्थानाचं गणित सुटलं नसावं. ग्रीक व रोमन संस्कृतीत देखील धूमकेतूची नोंद आहे. धूमकेतूंचा उल्लेख बॅबिलोनियन, जपानी आणि कोरियन प्राचीन ग्रंथांतही मधूनच एखाद्या धूमकेतूप्रमाणे दिसून येतो. भारतामध्ये वराहमिहीर आणि भद्रबाहू या खगोलतज्ञांनी सहाव्या शतकात धूमकेतूच्या नोंदी ठेवल्याचं आढळतं. दहाव्या शतकातील भट्टोपाल यांनी काही धूमकेतूंना नावे देण्याचा प्रयत्न केला होता. आजवर शास्त्रज्ञांनी ३००० धूमकेतूंची नोंद केली आहे. मात्र या विश्वात अब्जावधी धूमकेतू असण्याची शक्यता आहे. साधारण प्रत्येक दहा वर्षांनी आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकेल असा मोठा धूमकेतू दर्शन देत असतो. ❤️
इसवीसनाच्या साडेतीनशे वर्षांपूर्वी अपोलोनियस म्हणायचा की धूमकेतू हेदेखील ग्रहांप्रमाणं फिरत असतात. त्याचा समकालीन असलेल्या ॲरिस्टॉटलने धूमकेतूंचे निरीक्षण करून असा निष्कर्ष काढला होता की चंद्र आणि स्वर्ग यांच्यामध्ये हे धूमकेतू असणार, राशींभोवती ते फिरत असणार. 🤣 ॲरिस्टॉटलच्या या मांडणीवर पुढील चारशे वर्षे शतकं कुणीच शंका घेतली नाही, मात्र सेनेका या खगोलतज्ञानं इसवीसनाच्या पहिल्या शतकात अतिशय तर्कशुद्ध मुद्द्यांचा आधार घेऊन अपोलोनियस आणि ॲरिस्टॉटल यांच्या सिद्धांतावर प्रश्न उपस्थित केले. काही काळ यावर चर्चा देखील झाली. मात्र हे प्रश्न ग्रंथाच्या स्वरूपात जतन करण्यात आले नाहीत. त्यामुळे सेनेकाच्या मृत्यूनंतर त्याच्या शंका पुन्हा अडगळीमध्ये गेल्या आणि पुढील दीडहजार वर्षे ॲरिस्टॉटलवर कुणी शंका उपस्थित केली नाही.😔 आपल्या पूर्वजांनी तेव्हाच्या त्यांच्या आकलनानुसार धूमकेतू भोवती भीतीचे वलय निर्माण केलं. धूमकेतू दिसला की नक्कीच प्रचंड मोठं संकट आपल्यावर कोसळणार असा समज पूर्वीच्या काळात होता. आपल्या राजाचा मृत्यू होईल, दुष्काळ किंवा रोगराई येईल अश्या गैरसमजातून धूमकेतूला खलनायक ठरवल्याचं वेगवेगळ्या संस्कृतीत आपल्याला पाहायला मिळतं. २३०० वर्षापूर्वी चीनमध्ये लिहिल्या गेलेल्या पुस्तकात धूमकेतूचा अशुभ म्हणून उल्लेख आढळतो. धूमकेतू आला की लवकरच देशावर आपत्ती येऊन भात, मीठ आणि मासे यांची कमतरता पडणार असं त्यांना वाटायचं. भारतात धूमकेतूंना कधी शुभ तर कधी अशुभ मानण्यात आलं आहे. पुराणकथांत धूमकेतूला अग्निचा अवतार समजण्यात आलं, जो मानवावर जरब बसवण्यासाठी आकाशात जाळ आणि धुराचा खेळ खेळतो. शैव संप्रदायात धूमकेतूला गणपतीचा अवतार मानण्यात येतं. गणपतीने धूमासुर या राक्षसाचा वध केला म्हणून त्याला धूमकेतू नाव पडलं. पराशर संहितेत धूमकेतूला अशुभ मानण्यात आलं, एकाच वेळी आकाशात दोन धूमकेतू आले आणि पृथ्वीवर मोठा जलप्रलय झाला. तेव्हा विष्णूनं मत्स्यअवतार धारण करून वेदांचे रक्षण केलं होतं.🤭 चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला इटालियन चित्रकार जिओटो यानं सर्वप्रथम धूमकेतूचे अचूक चित्र काढलं आहे. एवढी अचूकता नंतर केवळ आधुनिक कॅमेऱ्याच्या सहाय्यानं शक्य झाली आहे. म्हणून जिओटोचं चित्र महत्त्वाचं ठरतं. धूमकेतूंचा अचूक अभ्यास पंधराव्या शतकात झपाट्यानं पुढं गेला. मात्र त्याच वेळी धर्मगुरू देखील आपलं नाक मध्येमध्ये खुपसत होते. "आकाशातील बाप आपल्या पापांना पाहत आहे, आणि आपली पापं पाहून तो रागाने पेटला आहे" असं जर्मन लुथेरन बिशप आंद्रियास सेलिचियस यांनी ठोकून दिलं.🤪 मात्र "मानवी पापं वाढली म्हणून धूमकेतू येत असते, तर ते आकाशातून कधीच गायब झाले नसते." असं जोरदार तर्कशुद्ध उत्तर अँड्रियास डुडिथ या मानवतावाद्यानं तेव्हा दिलं होतं. ❤️ १६१८ मध्ये आलेल्या धूमकेतूच्या दर्शनानंतर गोथार्ड आर्थसियस या शिक्षकांनी जाहीर केलं की "कयामतचा दिवस" जवळ आला आहे. त्यानं दहा पानांचं पत्रक काढलं, ज्यात भूकंप, पुर, दुष्काळ, नवीच्या प्रवाहात बदल, युद्धं, रोगराई यासारख्या सर्व संकटांचा समावेश केला होता. हे बरे आहे, यातील काही जरी झालं असतं तरी गोथार्ड किती हुशार आहे यावर शिक्कामोर्तब झालं असतं. जोतिषांचा धंदा हा असाच शक्याशक्यतेवर आधारित असतो. गोथार्डने इथे सर्वच संकटाचा समावेश आपल्या यादीत केला होता. धूमकेतू आला काय किंवा गेला काय, वरील संकटाचा सामना मानवाला नेहमी, वारंवार करावा लागला आहे. मात्र गोथार्ड कमनशिबी ठरला आणि नजीकच्या काळात मानवजातीवर कोणतंही मोठं संकट आलं नाही. गोथार्ड मात्र त्यानंतर लवकरच मृत्यू पावला. 🤣
विज्ञान प्रगत होण्यासोबत धूमकेतूची भीती कमी झालेली आहे. धूमकेतूमुळे आपल्याला उल्कावर्षाव दिसतो. जेव्हा धूमकेतू सूर्यप्रदक्षिणा करून जातो, तेव्हा तो आपल्या मागे वायू आणि धूळ सोडतो. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना या धुळीच्या मार्गातून जाते. तेव्हा ही धूळ; ज्यात खडक, धातू, वायू, बर्फ हे सर्व पदार्थ असतात; पृथ्वीच्या गुरुत्वामुळे आकर्षित होऊन जमिनीकडे खेचले जाते. या धुळीचे रूपांतर उल्केत होऊन या उल्का सरासरी ताशी ५० हजार किलोमीटरच्या गतीने वातावरणातून प्रवेश करतात. पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर त्यातील खडकाळ भाग घर्षणामुळे जळायला सुरवात होते आणि आपल्याला उल्कावर्षाव दिसतो. इकडे निब्बानिब्बी लोक लगेच काहीतरी विश मागतात, कारण कोणत्या तरी टुकार सिनेमात दाखवलेले असते की तुटता तारा दिसला तर आपली इच्छा पूर्ण होते. एकेकाळी फिलिपाईन्सपुरती मर्यादित असलेली ही अंधश्रद्धा आता ग्लोबल झाली आहे. 😨 हॅलीचा धूमकेतू आपल्याला शाळेत शिकवला जातो. एडमंड हॅलीने याचं अचूक गणित मांडलं म्हणून त्याचं नाव धूमकेतूला देण्यात आलं. त्याने तोपर्यंतच्या नोंदी पाहून भाकीत केलं की दर ७५-७६ वर्षांनी तो दिसणारच. या धूमकेतूची नोंद इ.स. पूर्व २४० पासून उपलब्ध होती. ज्याअर्थी तो १५३१ आणि १६०७ मध्ये दिसला होता, १६८२ मध्येही तो दिसणार असं साधं गणित होतं. १६८२ मध्ये हा धूमकेतू आला आणि यावेळी मात्र त्याचं बारसं झालं आणि त्याला "हॅली" नाव मिळालं. मरावं परी नामरुपी उरावं. आता हॅली अनेक वर्षे जिवंत राहील. हा धूमकेतू आधी नष्ट होईल की मानवजात स्वत:चा विनाश आधी करून घेईल काय माहित! १९८६ मध्ये हॅलीबाबा दर्शन देऊन गेले आहेत, आता आपल्यापैकी जे २०६१ पर्यंत टिकतील त्यांना हॅली पाहता येईल. ❤️
पृथ्वीवरील डायनासोरचं जग संपुष्टात आणण्यासाठी धूमकेतू कारणीभूत ठरला होता. सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी अंतरिक्षातून आलेला सुमारे पंधरा किलोमीटर लांबीचा दगड मेक्सिकोमध्ये आदळला. तो इतक्या प्रचंड वेगानं समुद्र किनाऱ्यावर आदळला होता की, तो पृथ्वीचं कवच फाडून त्यामध्ये १०० किलोमीटरपर्यंत आत घुसला. आजही तिथं जवळजवळ १८० किलोमीटर लांबीचा खड्डा आपण पाहू शकतो. अंतरीक्षातून आलेला हा पदार्थ एखादा लघुग्रह असावा असा शास्त्रज्ञांचा पूर्वी कयास होता. मात्र आता तो धूमकेतूच असेल यावर शास्त्रज्ञांचं एकमत होत आहे. सुमारे ६५००० किमी प्रती तास वेगाने झालेल्या या धडकीमुळे अणुबॉम्बपेक्षा २० लाख पट ऊर्जा निर्माण झाली.🤔 या धूमकेतूनं मेक्सिकोच्या समुद्र उथळ असलेल्या भागात धडक दिल्यानं हजारो टन सल्फर बाहेर पडून वातावरणात मिसळला. पृथ्वीचे संतुलन बिघडलं. भूकंप, त्सुनामी यांची मालिका सुरू झाली. धूळ आणि धुरानं आकाश गच्च भरलं. ही अवस्था खूप मोठ्या काळात कायम राहिली. आता सूर्यकिरणं जमिनीपर्यंत पोचू शकत नव्हती. साहजिकच तापमान झपाट्यानं कमी होऊ लागलं आणि पृथ्वी गोठू लागली. सर्वत्र अंधाराचं आणि थंडीचं साम्राज्य. समुद्रातील तसेच जमिनीवरील अनेक प्राणी मरू लागले, अन्नसाखळी उध्वस्त झाली. सागरातील अठ्यान्नव टक्के तर जमिनीवरील सत्तर टक्के प्रजाती नष्ट झाल्या, ज्यामध्ये तेव्हाचे भूपती डायनासोर देखील नष्ट झाले. झुरळासारखे काही जीव मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून, आपलं अस्तित्व टिकवून राहिले. "प्रलयकाले डायनासोर जाती, तिथं झुरळे वाचती!"🤪 पुन्हा आपल्या पृथ्वीवर एखादा धूमकेतू किंवा अशनी येऊन धडकला तर?? गणितीय शक्यता असं सांगते, की यासाठी अजून किमान पंचेचाळीस वर्षे जावी लागतील. आपल्या गणिताला चुकवून एखादा आगंतुक धूमकेतू पृथ्वीच्या अंगावर येऊ लागला तरी आता घाबरायचं कारण नाही. नासानं ऑक्टोबर २०२२ मध्ये एक चाचणी घेतली, ज्यामध्ये आकाशस्थ घटकावर धडक घडवून आणून त्याची दिशा बदलण्याची किमया मानवाला साध्य झाली आहे. या डार्ट मिशनमध्ये (DART : Double Asteroid Redirection Test) १९ मीटर लांबीचे अंतराळयान वापरले गेले. डिमॉर्फोस या लहान लघुग्रहावर आपण चाचणी केली❤️
प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि लेखक जयंत नारळीकर यांनी अनेक वर्षापूर्वी अश्याच आशयाची एक विज्ञानकथा लिहिली होती, जिचा आता प्रत्यय आला. "आजची विज्ञानकथा ही उद्याचं विज्ञान असते" असे म्हणतात ते उगीच नाही. आपल्या यानाने धडक दिली त्या डिमॉर्फोसचा व्यास सरासरी १६० मीटर आहे आणि तो एका ७८० मीटर व्यासाच्या डीडीमॉस नावाच्या लघुग्रहाभोवती फिरतो. या दोन्हींचा तसा आपल्याला काही धोका नव्हता. मात्र आपण भविष्यात आपल्यावर चालून आलेल्या आकाशस्थ संकटाला तोंड देऊ शकतो का हे पाहायचं होतं. हा प्रयोग यशस्वी झाला. ९०००० किमी ताशी वेगानं यानाची धडक देऊन आपण डिमॉर्फोसची दिशा बदलण्यात यश मिळवलं. मानवानं एकदा ठरवलं तर तो असाध्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतो. मात्र गरज असते ती विज्ञाननिष्ठेची.. एकदा विज्ञानाची ज्योत पेटली, की पिढ्यानपिढ्या जोपासलेल्या खुळ्या समजुती भस्मसात होऊन जातात जाळ आणि धूर संगटच निघतो मग तेव्हा..🔥❤️ #richyabhau #धूमकेतू आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव