राहू केतू आणि बुद्धीला ग्रहण

राहू केतू आणि बुद्धीला ग्रहण
सूर्यग्रहण असो अथवा चंद्रग्रहण, त्यांच्या निमित्ताने जेवढी अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा भारतात सर्व भाषेतील न्यूज चॅनल्स मनोभावे करतातच. काही महिन्यांपूर्वी एका न्यूज चॅनलला तर असं दाखवलं की एका इंग्रजी महिन्यामध्ये दोन चंद्रग्रहणे येत आहेत, तर नक्कीच अशुभ काळ सुरू होणार आहे. खरंतर अंधश्रद्धा आणि दहशत पसरवल्याबद्दल अशा चॅनलवर कारवाई व्हायला हवी. सूर्यग्रहण असो अथवा चंद्रग्रहण, त्यामागे केवळ गणित असते. आणि ते गणित आपल्या पूर्वजांना हजारो वर्षापूर्वीच चांगले माहीत झाले होते. मात्र आज एकविसाव्या शतकात जेव्हा प्रसिध्दीमाध्यमातील प्रतिनिधी त्यांचे अज्ञान प्रदर्शित करत असतात, तेव्हा त्यांची कीव येते. राहू केतू हे राक्षस असून खरच सूर्य चंद्राला गिळतात असेही कदाचित त्यांना भविष्यात वाटेल.. खरं तर त्यांच्या बुद्धीला ग्रहण लागलेलं असतं.😭😭 आकाशस्थ ग्रहगोलांचा अभ्यास अगदी अचूकपणे करण्याची परंपरा हजारो वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे भविष्यातील ग्रहणे कोणत्या तारखेला किती वाजता येणार आहेत, ती कुठून दिसणार आहेत हे आपण अगदी अचूकपणे सांगत असतानाच न्यूज चॅनलवाले मात्र मूर्खपणे दहशतीचा बाजार मांडत आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी तर एक वृत्तनिवेदक ठामपणे म्हणत होती की चंद्राची सावली सूर्यावरती पडते. अरे चंद्राची पात्रता ती काय.. केवळ तो पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येऊन काही काळ सूर्याला झाकू शकतो. तेदेखील पृथ्वीवरील काही विशिष्ट ठिकाणांवरूनच. साधं लॉजिक आहे की आपल्या चंद्राला प्रकाशाचा दुसरा कोणता स्त्रोत नाही, ज्यामुळे त्याची सावली सूर्यावर पडू शकेल. 😳
सूर्याभोवती पृथ्वी एका कक्षेत फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरण्याची देखील निश्चित कक्षा आहे. हे आपापल्या कक्षेत फिरत असतानाच कधी तरी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो. त्यामुळे पृथ्वीवरील काही भागावरून सूर्य काही काळ संपूर्ण किंवा अंशत झाकला जातो. अर्थात खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती या अवस्था आपल्याला भूगोलात शिकवल्या आहेतच, त्या पुन्हा इथं सांगत बसत नाही. चंद्राची सावली सूर्यावर पडत नाही एवढेच लक्षात घ्या..चंद्रग्रहणाच्या वेळी मात्र पृथ्वीची सावली चंद्रावर पडत असते. अर्थात चंद्र काही झाकला जात नाही, कारण मध्ये काही माध्यम आलेलं नसतं. त्यामुळे सावलीमध्ये आलेला चंद्र पूर्ण गायब न होता त्याचा ग्रहण लागलेला भाग आपल्याला लालसर दिसतो. 😡 सूर्यग्रहणाची शक्यता चंद्रग्रहणापेक्षा जास्त असते. एका वर्षात जास्तीत जास्त सात ग्रहणे होऊ शकतात, आणि असे झाले तर त्यात केवळ दोनच चंद्रग्रहणं असतील. एका वर्षात किमान दोन ठिकाणी आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळू शकते. तीन वर्षांतून दोन खग्रास सूर्यग्रहणं आपण पृथ्वीवरून पाहू शकतो. आकृती मध्ये आपण पाहू शकतो की ग्रहणाची एक रेषा असते, त्या रेषेत येणाऱ्या सर्व ठिकाणी ग्रहण दिसणार असतं. मात्र एखाद्या ठिकाणाहून खग्रास सूर्यग्रहण दिसलं तर पुन्हा त्याच ठिकाणी सुमारे चारशे वर्षानंतरच सूर्यग्रहण दिसू शकेल. समजा भारतात २००९ साली वाराणसीमध्ये खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळालं होतं. तर आता तिथं २४४६ मध्ये पुन्हा खग्रास सूर्यग्रहण होईल. २००९ मध्ये भारतात इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण दिसलं होतं. मात्र खग्रास तो खग्रास रेहता है ना!! 💃
खग्रास सूर्यग्रहण पाहणं हे अतिशय नयनरम्य असतंच. मात्र शास्त्रज्ञांना या वेळेचा उपयोग संशोधनासाठी करायचा असतो. त्यामुळेच साधारण सहा ते सात मिनिटांचं खग्रास सूर्यग्रहण अनुभवण्यासाठी शास्त्रज्ञ हजारो मैलाचा प्रवास करतात. हिप्पारकस या ग्रीक खगोलतज्ज्ञाने ग्रहणाच्या वेळी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर त्रिकोणमितीच्या साह्याने शोधण्याचा प्रयत्न दोन हजार वर्षांपूर्वी केला होता. १८६८ मध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी हेलियमचा शोध लागला होता. आइनस्टाइनने सिद्धांत मांडला होता की प्रकाश किरणे गुरुत्वाकर्षणामुळे वक्र होतात.‌ मात्र हा सिद्धांत सिद्ध करायचा असेल तर पृथ्वीवरील सर्व प्रकाश नाहीसा करावा लागणार होता. त्यामुळे ब्राझीलमध्ये जेव्हा १९१९ मध्ये सूर्यग्रहण झालं तेव्हा त्याच्या सिद्धांताची पडताळणी झाली, आणि विज्ञानाच्या अवकाशात आइन्स्टाइनला सूर्य समजलं जाऊ लागलं. 🥳
बाबिलोयिन आणि चिनी संस्कृती खगोलशास्त्रात आघाडीवर होत्या. मात्र बाबिलोयिन जनता ग्रहणाला घाबरायची. याकाळात आपला राजा मरू नये, यासाठी तोतया राजा सिंहासनावर बसवला जायचा. ही अंधश्रद्धा बाराव्या शतकात पुन्हा वाढीला लागली. कारण पहिला हेन्री हा ग्रहणानंतर काही दिवसातच मेला. चिनी राजा एवढा कमकुवत नसतो, तो मरत नाही तर मारतो! चिनी राज्याच्या दरबारात एकेकाळी जोतिषविषयक सल्ला द्यायला खास तज्ञ माणसाची नेमणूक केलेली असायची. मात्र इ.स. पूर्व २१३७ मध्ये ग्रहणाचे भाकीत आधीच करता न आल्याने दोन जोतिषांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे कदाचित गणितावर अधिक लक्ष दिलं गेलं असावं. कारण इ.स. पूर्व सहाव्या शतकात ग्रहणाच्या अचूक भाकिताची पहिली नोंद सापडते. ❤️ "ग्रहण" शब्द आपल्याकडे एरवी खाणे या अर्थानं वापरला जातो, पण इथं ग्रहणकाळात खायचे प्यायचे वांदे होतात राव! ग्रहण असेल तर आपल्याकडे अशी अनेक बंधनं पाळायचं सुचवलं जातं. या काळात स्वयंपाक करू नये, घराच्या बाहेर पडू नये, झोपू नये, प्रेम करू नये असे एक ना अनेक निर्बंध भारतीय लोक स्वतःवर लादून घेत आहेत. याकाळात रुग्णांना औषधे देखील घेऊ दिली जात नाहीत. स्वयंपाकामध्ये तसेच पिण्याच्या पाण्यात काही लोक तुळशीची पाने टाकतात. एकवेळ हे परवडले, काही ठिकाणी तर ग्रहणामुळे अशुद्ध झाले आहे, असे म्हणत घरातील संपूर्ण पाणी फेकून दिले जाते. माणसाचे सोडा हो, देवांना देखील कुलूपबंद केलं जातं. सर्व मंदिरे बंद केली जातात, आणि बिचारे देव ग्रहण सुटायची वाट पाहत जीव मुठीत घेऊन बसतात. 😨 काही ठिकाणी ग्रहणकाळात गर्भवती स्त्रीला एकाच जागी, काही न खातापिता बसायला सांगितलं जातं. या काळात नैसर्गिक विधी देखील करायला देखील तिला मनाई केली जाते. खरं तर यातून गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. मात्र निर्बंध लादणारे "काही शास्त्रमार्ग चुकायला नको" असं वाटून नवनव्या अंधश्रध्दा जोपासत असतात. ग्रहणकाळात गर्भवती स्त्रीने काही चिरलं किंवा काही शिवलं तर तिच्या होणाऱ्या बाळाचे ओठ दुभंगतात ही देखील एक अंधश्रद्धा. खरं तर आजवर अनेक तरुणींनी त्यांच्या गर्भारकाळात या अंधश्रद्धेला आव्हान दिलं. त्यांनी ग्रहण सुरू असताना जाहीररीत्या भाजी चिरून दाखवली, त्यांची बाळं छान, चांगल्या ओठांनी जन्माला आली आहेत.🥳 अर्थात ग्रहणविषयक अंधश्रद्धा केवळ भारतात नाहीत. जगभरातील संस्कृती आणि लोककथांमध्ये ग्रहणाचे आणि त्या संदर्भातील अंधश्रद्धांचे दर्शन घडते. जगभरातील संस्कृतीत हजारो वर्षांपासून आकाशस्थ ग्रहगोलांचा अभ्यास करून निसर्गाच्या या चमत्काराचा मागोवा घेणं सुरू होतं. सूर्यग्रहण अमावस्येला आणि चंद्रग्रहण पौर्णिमेलाच होतं, मात्र प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण आणि प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. यामुळेच ग्रहणविषयी आपल्या पूर्वजांना गूढ वाटत होतं. त्यांनी यथावकाश गणिताचा वापर करून यामागील कारणं शोधून काढली. मात्र त्यापूर्वी जन्माला आलेल्या प्रथा आणि लोककथा या त्या संस्कृतीमध्ये तश्याच चिकटून राहिल्या. ग्रहणकाळात पाश्चिमात्य देशात लोक आकाशाकडे पाहून ओरडत होते, आकाशाच्या दिशेने बाण मारत होते. सूर्य जर पूर्णपणे गिळला गेला तर तो कधीच बाहेर येणार नाही अशी त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा होती🤪. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहायचं नाही, त्यात आपली दृष्टी गमावली जाण्याची शक्यता असते. मात्र हा धोका वगळला तर ग्रहणकाळात इतर कोणताच धोका नसतो. तरीही अनेक दंतकथा ग्रहणाशी जोडल्या आहेत. ई. स. ६०० पूर्वी ग्रहणानं चांगलं काम देखील केलं होतं बरं का.. भूमध्य सागराजवळील दोन देश सहा वर्षे एकमेकांशी लढत होते, मात्र एक दिवस खग्रास सूर्यग्रहण झालं, आणि दोन्ही सैन्यांना वाटलं की आपण युद्ध थांबवावं म्हणून हा ईश्वरी संकेत आहे. आणि खरच युद्ध थांबवलं गेलं राव! आजही ते युद्ध "ग्रहणयुद्ध" म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. मात्र त्याच्या २५० वर्षानंतर एका रोमन सम्राटानं सूर्यग्रहण पाहिलं, नंतर तो खूपच बैचेन झाला, त्याला अन्नपाणी जाईनासं झालं आणि लवकरच तो उपासमारीने मेला. 🤭 आधी कोलंबियामध्ये असा समज होता की ग्रहणकाळात देव आपली परीक्षा पाहत आहेत. त्यामुळे ग्रहण सुरू झाले की सर्व लोक आपल्या शेतात येऊन खूप कामे करत असत, आपल्या कामावर प्रसन्न होऊन देव सूर्याची सुटका करतो असा त्यांचा विश्वास होता. नंतर त्यांना वाटू लागले की आकाशात सूर्यावर हल्ला झाला आहे, म्हणून ते त्याला मदत करण्यासाठी आकाशात बाण मारू लागले. अगदी १९९५ मध्ये झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी कोलंबियन सैनिकांनी सूर्याची सुटका करण्यासाठी आकाशात बंदुकीच्या फेरी झाडल्या होत्या. १५० वर्षापूर्वी, जेव्हा एडिसन त्याच्या प्रयोगशाळेत ग्रहणविषयक वैज्ञानिक माहिती सांगत होता, तेव्हा देखील अमेरिकेत मिलर नावाच्या एका व्यक्तीला ग्रहण म्हणजे कयामतचा दिवस आहे असं वाटून त्या व्यक्तीनं स्वतःच्या मुलाचे कुऱ्हाडीने तुकडे करून स्वतः आत्महत्या केली होती. किलर मिलर!!😔 खरं तर अमेरिकन मूलनिवासी पूर्वी ग्रहणाला घाबरत नव्हते, मात्र जेव्हा युरोपियांच्या वसाहती अमेरिकन खंडात सुरू झाल्या त्यावेळेस युरोपात असलेल्या अंधश्रद्धांचा प्रसार देखील अमेरिकेन भूमीत झाला. लहान मुलांचं उंदरामध्ये रुपांतर होतं अशी अंधश्रद्धा अनेक वर्षे अमेरिकेत जोपासली गेली होती. नॉर्स संस्कृतीत लॉकीने देवांचा बदला घेण्यासाठी सूर्य गिळणारा प्राणी बनवला होता असे मानले गेले. आर्मेनिया मध्ये ड्रॅगन सूर्याला गिळतो असं मानण्यात यायचं. ग्रहणकाळात विहिरीत विषाचा वर्षाव होतो असं जपानी लोक मानायचे. इंडोनेशियामध्ये असा समज होता की राहू सूर्याला गिळतो, मात्र त्याची जीभ भाजते, आणि तो त्याला परत सोडतो. जर्मन तसेच ऑस्ट्रेलियन मूलनिवासी सूर्याला देवी तर चंद्राला देव मानायचे, आणि ग्रहण म्हणजे त्यांचं मिलन समजलं जायचं ..किती रोमँटिक ना! रोमान्स सुरू म्हणून तर बत्ती गुल. 🤪 आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये राहू आणि केतू हे अजब रसायन निर्माण केलं आहे. सागरमंथनाची कथा तुम्ही ऐकली असेल. एका बाजूला देव आणि एका बाजूला राक्षस अशी टीम बनवून समुद्र घुसळून काढला आणि त्यातून चौदा रत्नं प्राप्त झाली. हलाहल विष, कामधेनू, कल्पवृक्ष, लक्ष्मी, रंभा, कौस्तुभ मणी, ऐरावत हत्ती, चंद्र, पारिजात, शंख, उच्चैश्रवा घोड़ा, मदिरा या बारा रत्नांची विभागणी करताना देवांनी नेहमीप्रमाणे लबाडी केली. मात्र धन्वंतरी जेव्हा अमृत घेऊन बाहेर आला, तेव्हा देवांच्या कपटनीतीने कळस केला. राक्षसांच्या मुखामध्ये एक थेंब देखील अमृत जाणार नाही अशी योजना केली. देव आणि दैत्य यांना वेगवेगळ्या पंगतीला बसवण्यात आलं. भगवान विष्णूनं मोहिनी रूप धारण करून त्यांना पाळीपाळीनं अमृत पाजायचं ठरलं.😳 विष्णू मोहिनीरुपात देवांना खरंखुरं अमृत पाजायचा आणि राक्षसांना मात्र अमृत प्यायला दिल्याचा भास निर्माण करायचा आणि वेगळंच काहीतरी पाजायचा. स्वर्भानु नावाच्या राक्षसाला समोर चाललेल्या प्रकारात काहीतरी गडबड आहे असा संशय आला. मग काय, तो देवांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला. साहजिकच त्याला अमृत प्यायला मिळालं. मात्र लगेचच देवांच्या लक्षात आलं की हा इथे आपल्यामध्ये घुसला आहे. प्यायलेलं अमृत त्याच्या पोटात जाऊ नये यासाठी त्या बिचाऱ्या राक्षसाचं मुंडकं उडवण्यात आलं. मात्र अमृत पिल्यामुळं त्याच्या शरीराचे दोन्ही भाग हे जिवंत राहिले. झाला का लोचा!!🔥
आता तुम्हाला माहित आहे की त्या काळामध्ये प्लास्टिक सर्जरी खूपच जोरात जोरात होती. जवळून चाललेला एक साप मस्तपैकी कापला. या सापाच्या मुंडक्याच्या जागी मस्तपैकी स्वर्भानुचं मुंडकं लावलं आणि त्याचा राहू झाला तसेच स्वर्भानुच्या धडावर सापाचं मुंडकं लावलं आणि त्याचा केतू झाला. अशा रीतीने एका राक्षसाचे दोन राक्षस, राहू आणि केतू असे दोन देह निर्माण झाले. आधी फसवणूक आणि नंतर आपल्यावर केलेला वार हे राक्षस कधीच विसरले नाहीत. ते देवांचे आजन्म दुश्मनच राहिले आहेत. ग्रहण होतं त्यावेळेस हा राहू सूर्य चंद्र गिळतो असा दावा आपल्या पुराणकथांमध्ये केला गेला. हळूहळू कुंडलीमध्ये तसेच नऊग्रहांच्या यादीमध्ये आणि नवग्रह मंदिरामध्ये राहू आणि केतू या दोघांनीही स्थान मिळवलं.🪄 नऊ ग्रह मंदिरात तुम्ही जाता तेव्हा शुक्र, शनि, बुध, राहू, केतू अश्या देवांच्या पाच शत्रूंना पुजत असता. रवी चंद्र मंगळ आणि गुरू ही देवांची फळी अल्पमतात आहे तिथे. चंद्राचा मुलगा बुधला बिघडवण्याचे खापर देखील राहुवर फोडण्यात आले आहे. नवग्रहांचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये केवळ पाचच ग्रह आहेत मंगळ, बुध, गुरु शुक्र आणि शनि हे पाचच ग्रह आहेत, उगाच आपण नऊ ग्रह बोलतो. उरलेल्या चार पैकी एक सूर्य हा तारा आहे, चंद्र हा उपग्रह आहे आणि राहू केतू हे या विश्वामध्ये कुठेच अस्तित्वात नसलेले काल्पनिक पात्र आहेत, ज्याला वरील सागरमंथनाच्या कथेचा संदर्भ आहे बाकी त्यांचं अस्तित्व कुठेच नाही. मात्र आज त्यांचा उपयोग करून कालसर्पयोग सांगितला जातो. कालसर्पयोग आणि नारायण नागबळी हे पूर्णपणे थोतांड आहे. आपल्यापैकी कुणालाच ते करण्याची आवश्यकता नाही. मनातील भीती काढून टाकणे आवश्यक आहे. ❤️ महाभारत ही कथा काल्पनिक न मानता काही क्षण खरंच ते घडलं असं मानलं तर यात एक गोष्ट नक्की लक्षात येते की युद्धामध्ये उपस्थित असलेल्या सर्व सैन्यांमध्ये केवळ कृष्णालाच सूर्यग्रहणाचा वेळ माहीत होता आणि त्यामुळे या ज्ञानाचा वापर करून त्याने जयद्रथची वाट लावली. आजच्या काळात महाभारत लिहिले गेले, तर जयद्रथ असा बिनडोकपणा करणार नाही. खरंतर आजच्या काळात महाभारत लिहिलं तर असंही रंगवता येईल की ग्रहणाकडं उघड्या डोळ्यांनी पाहिलं म्हणून धूतराष्ट्राचे डोळे कायमचे गेले होते. गांधारीने जरी डोळ्याला पट्टी लावली असली तरी मिड ब्रेन एक्टिवेशनमध्ये जशी डोळ्यावर पट्टी बांधून सगळं काही पाहता येतं, तशी गांधारी राजमहालात वावरत होती असंही कथानक रंगवता येईल. 😀 कथा रंगवणं ही मानवाची मक्तेदारी. इतर प्राण्यांना कथा रंगवता येत नाहीत. मानवाला स्वप्ने पडतात, इतर प्राण्यांना पडत नाहीत. मानवाची ही सृजनशिलता आणि कल्पनाशक्ती आजवर त्याच्या वैज्ञानिक प्रगतीचा आधार ठरत आली आहे. मात्र त्याच वेळी मानवानं जुन्या काळात रंगवलेल्या कथा कधीकधी त्याच्या प्रगतीस बाधा देखील ठरतात.‌ नारायण नागबळी सारखी थोतांडं त्याचे शोषण करायला टपून असतातच. अशा वेळी व्यक्तीनं तर्क वापरण्याची गरज असते. मात्र आजच्या काळात तर्क पाहायला देखील मिळत नाही. तर्क खूप महाग होत चालला आहे असं नाही, तर्क विनामूल्य उपलब्ध असतोच, मात्र त्यासाठी डोळे आणि मेंदूची कवाडं उघडी ठेवावी लागतात. आपल्या आसपास कोणी बंद कवाडांची माणसं असतील, तर त्यांची झापडं काढायचा आपण प्रयत्न करूया. ✊

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव