गॅरी कास्पारोव्ह: ६४ घरांपलीकडचे व्यक्तिमत्त्व

गॅरी कास्पारोव्ह: ६४ घरांपलीकडचे व्यक्तिमत्त्व
. १३ एप्रिलला गॅरी कास्पारोव्हचा साठावा वाढदिवस झाला.. या बुद्धिबळ खेळातील जागतिक विश्वविजेत्याची ओळख ६४ घरांमध्ये त्याने केलेल्या पराक्रमापुरती मर्यादित नाही, किंबहुना तसे असते तर त्यावर लेख लिहायची मी तसदी देखील घेतली नसती. आपण कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या वर थोडीच लिहीतो, मग या ग्याऱ्या वर आज का लिहीत असेल? कारण बुद्धिबळातील जागतिक अव्वल स्थानावर तब्बल २५५ महिने राहण्याचा विक्रम करणारा गॅरी त्याच्या लोकशाही, मानवी अधिकारांसाठी झपाटून काम करत आहे, प्रसंगी पुतीनसारख्या हुकुमशहाशी पंगा घेत आहे. रशियन हुकूमशाहीला विरोध करणाऱ्या अनेक विचारवंतांचा गूढ मृत्यू कसा होतो हे आपण वर्तमानपत्रात नेहमी वाचत असतो. अशा पार्श्वभूमीवर बुद्धिबळ खेळात अफाट पैसा कमावून सुखाचे आयुष्य जगण्यात ऐवजी गॅरी का विनाकारण सत्ताधीशांना आव्हान देत असतो हे समजावून घ्यायला हवे ना!! सोव्हिएत संघराज्यातील अझरबैस्तान राज्याच्या राजधानीमध्ये, बाकू या शहरामध्ये गॅरी चा जन्म १३ एप्रिल १९६३ रोजी झाला. वडील किम वेनस्टेन हे ज्यू तर आई क्लारा कास्पारोव्हा ही आर्मेनियन. दोघेही इंजिनिअर. एकत्र काम करताना ओळख झाली. पुस्तके, संगीत, सिनेमा,नाटके आणि बुद्धिबळ हे दोघांचे आवडीचे विषय. त्यामुळे ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात आणि लग्नात झाले. या जोडप्याचे गॅरी हे एकमेव अपत्य.. किमला स्वतःचे नाव आवडायचे नाही, खूपच मिळमिळीत वाटायचे, उच्चारलेले कळायचे नाही, जणू काही मांजर म्याव म्याव करत आहे असे त्याला वाटायचे. म्हणून उच्चारताना नावाचे वजन पडेल याची काळजी त्याने गॅरीचे नाव ठेवताना घेतली.. अर्थातच त्याचा उद्देश सफल झाला.. गॅरीच्या नावाने नंतर जगभरातील ग्रँडमास्टर गुरगुरताना पूर्ण जगाने ऐकले आहे. एकुलता एक असल्यामुळे लहानपणी एकट्याने खेळायची त्याला सवय लागली. वाळूच्या ढिगाऱ्यात बसवून त्याला एक छोटे फावडं आणि बादली दिली, तर तो तासनतास तिथे खेळत असे.तो बोलायला लागला तेव्हा त्याला का हा प्रश्न विचारण्याची सवय लागली.. आणि या प्रश्नाला अंत नसतोच. कुणी काही बोलत असेल तर हे दीड दोन वर्षाचे बालक मध्ये घुसून का? या प्रश्नाची सलग सरबत्ती लावत असे. समोरील व्यक्ती तीन चार वेळा उत्तर द्यायचा..मात्र नंतर वैतागून सोडून द्यायचा. समोरच्याला भंडावून सोडण्याची ही सवय त्याने बुद्धिबळात देखील वापरलेली दिसून येते. चार वर्षाचा असताना त्याला अक्षरओळख झाली. आता खेळण्यांची जागा पुस्तकांनी घेतली होती. एक एक अक्षर जोडत गॅरी काही महिन्यातच मोठे शब्द वाचायला शिकला. पाच वर्षाच्या गॅरीला Po-lo-zhe-ni-evKa-i-re' सारखा मोठा शब्द वाचताना पाहून आईला नवल वाटले, मात्र गॅरीने पूर्ण लेख वाचला आहे, आणि त्याला तो समजला देखील आहे हे समजल्यावर ती थक्कच झाली. बापाचा लहरीपणा, सृजनशीलता आणि आईचा व्यवहारीपणा याचे अद्भुत मिश्रण गॅरीकडे होते. गॅरीचे दोन्हीकडचे आजोबा कट्टर साम्यवादी, मात्र किम आणि क्लारा दोघेही त्यांच्या प्रभावातून मुक्त होते. किमच्या घरात संगीताचे वातावरण. आई वडील आणि भाऊ सगळे संगीतात नावाजलेली नावं होती. किमने काही दिवस व्हायलिन शिकून नंतर अभियांत्रिकी वाट जोखळली होती. आता गॅरीने तरी संगीत साधना करावी अशी आजीआजोबाची इच्छा होती, मात्र किम-क्लाराने गॅरीला जाणीवपूर्वक संगीतापासून दूर ठेवले. गॅरीचे विश्लेषण करण्याचे कौशल्य पाहता त्याने बुद्धिबळ शिकावे असे आईवडिलांचे मत होते. किम आणि क्लारा दोघेही बुद्धिबळाचे चाहते. तसे रशियामध्ये बुद्धिबळासाठी पोषक वातावरण असतेच. भारतात जसे गल्ली बोळात क्रिकेट खेळले जाते, तशी लोकप्रियता रशियात बुद्धिबळाला लाभली आहे. तान्हं बाळ जसं विनासायास मातृभाषा शिकतं, त्या पद्धतीनं गॅरी बुद्धिबळ शिकला.
गॅरी नेहमी म्हणतो: "मी बुद्धिबळ निवडले नाही तर बुद्धिबळाने मला निवडले होते." सहा वर्षांचा असताना त्याने बाकू वैश्का या वर्तमानपत्रातील बुद्धिबळाचं कोडं सोडवून मायबापाला बुचकळ्यात टाकलं होतं. तेव्हा त्याला बुद्धिबळाचे सर्व नियम माहीतदेखील नव्हते. त्यांच्या घरी बाकू वैश्का मधील अवघड कोडे सोडवण्यात आईवडिलांमध्ये चुरस लागायची. मात्र त्या दिवशी दोघांनी कोड्यापुढे हात टेकले असताना गॅरीने हा चमत्कार करून दाखवला होता. खुश होऊन किम म्हणाला, "हा खेळ संपवायचा कसा तुला ठाऊक आहे, मात्र खेळ सुरू कसा करायचा हे मी तुला शिकवतो." त्याने दुसऱ्याच दिवशी गॅरीसाठी बुद्धिबळाचा नवा संच आणला आणि कसं खेळायचं हे शिकवलं, नियम आणि चाली शिकवल्या. एकच वर्षात गॅरी त्याच्या बापापेक्षा तरबेज झाला. गॅरीला वडिलांचे छत्र फार काळ लाभले नाही. तो सात वर्षाचा असताना त्याच्या वडिलांना लिमफोसरकोमा आजार झाला. (तोच तो. राजेश खन्नाचा आनंद सिनेमात जीव घेणारा आजार) वडिलांचे छत्र हरपले आणि गॅरीलासोबत घेऊन क्लारा माहेरी राहायला आली. तेल उद्योगात काम करणाऱ्या आजोबा शागन कास्पारोव्ह यांनी निवृत्ती घेतली आणि गॅरीकडे लक्ष दिले, साम्यवाद आणि इतर तत्वज्ञानाची ओळख करून दिली. आपले ज्यू असणे लपवण्यासाठी गॅरीने त्यांचेच आडनाव पुढे घेतले. गॅरीच्या चिकित्सक बुध्दी पुढे आजोबांचा कडवा साम्यवाद अनेक वेळा निरुत्तर होत असे. अफगाणिस्तानमध्ये रशियाने अतिक्रमण करण्याची गरज काय? या प्रश्नापुढे आजोबा अवाक होत असत. इतिहास आणि राजशास्त्र यात गॅरीने लहानपणापासून रस घेतला होता. त्यामुळेच तो नंतर प्रसिद्ध झाल्यावर मुलाखती, पत्रकार परिषदा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देत स्वतःला एक "६४ घरांपलीकडे असलेली अष्टपैलू व्यक्ती" असं सादर करू शकला. गॅरी पहिलीमध्ये गेल्यावर काही महिन्यातच क्लाराला शाळेत बोलाविण्यात आले. कारण काय? तर गॅरी शिक्षिकेच्या चुका काढत होता. गॅरी म्हणतो, "त्या दिवसानंतर त्या शिक्षिकेसोबत माझे सुर कधीच जुळले नाहीत." वादिम मिनासायन हा त्याचा बेस्टी. दोघांनी मिळून इतरांशी खूप भांडणे केली, रस्त्यात राडे घातले आहेत. एकदा तर शाळेत मोठी आग पेटवली. "काय पेटते आहे" पाहायला मुली आल्या तर त्यांना इंप्रेस करायला यांनी चक्क आगीत नाच केला. मात्र खरे सांगायचे तर गॅरी मुलींशी बोलायला भ्यायचा. त्याला तिसरीत असताना पहिले लव्हलेटर आले होते, तेव्हा आता या प्रसंगाला कसे सामोरे जायचे याचा विचार करून ग्याऱ्याभाऊची धांदल उडाली. त्याने हिम्मत करून विनम्र नकार कळवला.. मात्र त्याचे पत्र योग्य व्यक्तीच्या हाती पडण्याऐवजी शिक्षकांच्या हाती पडले. गॅरी म्हणतो.. हे एका अर्थाने बरेच झाले.
मात्र जेव्हा गॅरी स्वतः प्रेमात पडला तेव्हा त्याने फुल्ल फिल्मी स्टाईल वापरत पोरीला इंप्रेस केले. त्याच्याच मित्रांनी पोरीची छेड काढायची आणि त्याने हिरोगीरी करत तिची सुटका करायची आणि मन जिंकायचे हा घिसापिटा पॅटर्न. भाऊचे एवढ्यावरच थांबले नाही तर त्या पोरीला खुश करत त्याने फटाके देखील उडवले होते. एवढे कीडे करणाऱ्या गॅरीला नवव्या वर्षी अपेंडिक्सला सामोरे जावे लागले. रुग्णालयात असताना डॉक्टर मंडळी कामधाम सोडून यासोबत बुद्धिबळ खेळत बसायची. कारण गॅरी त्यांच्यासोबत डोळ्यावर पट्टी बांधून खेळायचा. दहा वर्षाचा असताना त्याला हृदय विकार असल्याचे निदर्शनास आले. आता त्याने आयुष्यभर स्वतःला थंडी पासून दूर ठेवायचे होते. मात्र वय वाढत गेले तसे त्याचे हृदय मजबूत होत गेले आणि सर्व विकार देखील मागे पडले..पोहणे, बॅडमिंटन आणि सायकल रेसिंगचा त्याला आनंद घेता आला. शाळेत त्याला गणित विषय खूपच आवडीचा होता. कितीही अवघड प्रश्न असेल, गॅरीने तो सोडवला असे, बुद्धिबळातील विश्लेषण करण्याचे प्रावीण्य त्याला इथे कमी येत असे. त्याच्या गणिताच्या शिक्षकांनी क्लाराला सांगितले की याची गणितात चमक खूपच चांगली आहे, त्याला गणिताचे खास कोचिंग लावले पाहिजे. मात्र क्लाराने यास नकार दिला. तिच्या मते बुद्धिबळ आणि गणित या एकसारख्याच बाबी शिकत राहिला तर गॅरीचे व्यक्तिमत्त्व सर्व अंगांनी फुलणार नाही. त्यापेक्षा गॅरीने साहित्य शिकले पाहिजे, त्याला काव्याचा रसास्वाद घेता आला पाहिजे. किती भारी आहे ना हे!! "अशीच आमची आई असती" हा विचार तुमच्यापैकी बहुतेकांच्या मनात आला असेल, विशेषतः गणितावर प्रेम नसलेल्या मंडळींना तर नक्कीच!! गॅरी नऊ वर्षांचा होत असतानाच रशियन अस्मितेवर मोठा हल्ला झाला. १९७२ मध्ये बॉबी फिशर या अमेरिकन ग्रँडमास्टरने विश्व विजेतेपद जिंकले. त्याच्यापुढे एकामागून एक रशियन ग्रँडमास्टर नामोहरम झाले होते. १९६९ मध्ये एका अमेरिकन व्यक्तीने चंद्रावर पाऊल ठेवले याचा धक्का बसला नसेल, एवढा मोठा धक्का या प्रसंगात रशियन लोकांना बसला. विश्वविजेतेपदाचा मुकुट पुन्हा रशियात आणण्यासाठी खेळाडू प्रशिक्षित करणं हा देशासाठी प्राधान्याचा पहिला मुद्दा झाला. त्याचा फायदा गॅरीला झाला. मिखाईल बॉटविंनिक यांच्या सारखा गुरू लाभणे ही गॅरीसाठी जमेची बाब ठरली. जन्मजात लाभलेली देणगी, कठोर परिश्रम, आईकडून आणि बॉटविंनिक सरांकडून रक्तात भिनलेली शिस्त यामुळे गॅरी तयार झाला. १९७६ मध्ये तेरा वर्षाच्या गॅरीने नऊ सामन्यात सात गुण घेत सोव्हिएत ज्युनिअर चॅम्पियनशिप जिंकली आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. आता अलेक्झांडर शाकारोव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली गॅरीची घौडदौड सुरू झाली होती. पुढच्या वर्षी त्याने आठ सामने जिंकून एक बरोबरी साधत नऊ पैकी साडे आठ पॉइंट कमावले आणि चॅम्पियनशिप आपल्याकडे कायम राखली.
१९७८ मध्ये बेलारूस मधील स्पर्धा जिंकताना सोळा वर्षांचा गॅरी बोलला होता की लवकरच मी विश्वविजेता होईल.🎉 आणि नऊ वर्षात त्याने ते खरे देखील केले. बोस्निया मध्ये एक स्पर्धा होती, तिथे बदली खेळाडू म्हणून जाण्याची संधी गॅरीला मिळाली. त्या संधीचे सोने करत गॅरी ने आपला खेळ उंचावला. त्याला जागतिक क्रमवारीत पंधरावे स्थान मिळाले. त्याने १९८० मध्ये जागतिक ज्युनिअर विजेतेपद मिळविले. १९८२ मध्ये स्पास्की, पेट्रोस्यान यांसारख्या माजी विश्वविजेत्या खेळाडूंना गॅरीने धूळ चारली तेव्हाच लोकांना समजले होते की गॅरी लवकरच कार्पोव्हकडून विश्वविजेतेपद मिळवणार. आणि अखेर तो दिवस आलाच… त्याचा कार्पोव्हबरोबरचा पहिला सामना सप्टेंबर १९८४ मध्ये सुरू झाला, पाच महिने आणि ४८ डावांचा समावेश असलेला हा लांबलचक सामना होता. लागोपाठ दोन डावांमध्ये विजय मिळवत गॅरीने विजेतेपदामधलं अंतर कमी करत असतानाच जागतिक बुद्धिबळ परिषदेने हा सामना रद्द केला. १९८५ मध्ये नव्यानं सामना खेळताना त्याने कार्पोव्हला हरवून विजेतेपद काबीज केलंच. अवघ्या २२ वर्षाचा.. गॅरी इतिहासातील सर्वात कमी वयाचा विश्वविजेता ठरला. तेव्हा जगभरातील पत्रकारांना उत्तरे द्यायच्या ऐवजी त्यानेच प्रश्न विचारले होते.. त्याने काय प्रश्न विचारले असतील…. फ्रान्समध्ये स्पर्धा जिंकली असेल तर मी माझ्या बक्षिसातील बहुतांश रक्‍कम सोव्हिएत क्रीडा समितीला का द्यायची? जगात इतर खेळल्या जाणाऱ्या खेळांचे स्टार खेळाडू ज्याप्रमाणे परदेशी कंपन्यांबरोबर करार करतात तसा फायदेशीर करार करण्यास मला बंदी का? जर्मनीमध्ये नेत्रदीपक यश मिळवून मी जर ती स्पर्धा जिंकली असेल, तर बाकूमधल्या रस्त्यांवर मर्सिडीज कार चालवायला मला बंदी का? तत्कालीन रशियात असे प्रश्न विचारणे खरेतर देशद्रोहीपणाचे लक्षण होते. मात्र तेव्हा रशियन सरकार स्वतःची लक्तरे सांभाळण्यात गर्क होती. एक गोष्ट मात्र निश्चित होती. गॅरीचा लढा फक्त वैयक्तिक नसून सोव्हिएतच्या सगळ्याच खेळाडूंसाठी होता. तेव्हा खेळाडूंना खरच विशेष काही मिळत नव्हते. गॅरी एक गंमत सांगतो. तो म्हणतो: " माझा जन्म तेरा एप्रिलला रात्री पावणेबारा वाजता झाला. तेव्हा तिथे उपस्थित लोकांना वाटत होते की माझा जन्म मध्यरात्री नंतर व्हावा.. कारण तेरा तारीख अशुभ मानली जाते, मात्र माझा जन्म तेरा तारखेचा.. एप्रिल ६३ मधला ४+६+३ केले तर तो पण आकडा तेरा येतो. ८५ साली मी विश्वविजेतेपद मिळवले तेव्हा मी तेरावा विश्वविजेता ठरलो. विशेष म्हणजे ८५ मधील आकड्याची बेरीज केली तरी ती तेराच येते." विरोधकांचे तीन तेरा वाजविणारा गॅरी अजिबात अंधश्रद्ध नव्हता बरं का.. किंबहुना त्याचे प्रतिस्पर्धी जेव्हा त्याला हरवण्यासाठी अंधश्रद्धांचा आधार घेत असत, तेव्हा तो मनोमन त्यांना हसत असे. खेळाडूंना अधिक चांगले मानधन देता यावे यासाठी त्याने फिडे या जागतिक बुद्धिबळ संघटनेसोबत बंड करत नवीन संघटना काढली होती. मात्र ही संघटना तीन चार वर्षात बंद पडली. याच संघटनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी गॅरी ने आयबीएम च्या महासंगणकाशी, डीप ब्ल्यू शी दोन हात केले होते. १९९६ मध्ये त्याने या महासंगणकाला हरवल्याचे जास्त कुणाला माहीत नसते, मात्र १९९७ मध्ये डीप ब्ल्यूने त्याला हरवल्याची प्रचंड प्रसिध्दी झाली, ज्याचा फायदा आयबीएमला झाला. या सर्व प्रक्रियेत त्याचे ज्याप्रकारे मानसिक शोषण झाले, त्याचे वर्णन डीप थिंकींग या पुस्तकात त्याने केले आहे. बुद्धिबळ खेळात समोरच्याचे प्रचंड मानसिक शोषण करायचे असते. त्यामुळेच निसर्गतः हळव्या मनाचा स्त्रियांपेक्षा पुरुषांना या खेळात अधिक संधी आहे असे गॅरीला वाटते. मात्र गॅरी स्वतः अतिशय हळवा होता. रशियातील अनागोंदीच्या काळात विमान भाड्याने घेऊन गॅरीने आपल्या प्रशिक्षकाला आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले होते. गॅरीने त्याच्या कारकीर्दीत वेळोवेळी प्रखर राजकीय भूमिका घेतली गेली. निवृत्ती नंतर तो सातत्याने आंदोलन करताना रस्त्यावर दिसला. राजकीय मंचावर चाली खेळताना त्याला राजरोषाला सामोरे जावे लागले, मात्र तो म्हणतो की "तुम्हाला देशाचं भविष्य वाचवायचा असेल तर स्वतःच्या नुकसानीचा विचार न करता परिणामांना समोर जावे लागेलच." तो म्हणतो, "पुतीन हे तानाशहा आहेत, ते स्वतःहून खुर्चीतून लवकर उतरणार नाहीत, जेव्हा ते उतरतील तेव्हा ते त्यांचा वारस म्हणून त्यांच्यापेक्षा अधिक क्रूरकर्मा निवडतील." २००७ मध्ये मॉस्को मध्ये गॅरीच्या नेतृत्वाखाली "लोकशाही बचाव मोर्चा" निघाला होता, ज्याला पाशवी बळ वापरत चिरडण्यात आले. हजारो आंदोलकांना अटक करण्यासाठी ९००० पोलिसांना तिथे पाठवण्यात आले. दहा तास अटक आणि नंतर दंड भरून गॅरीची सुटका झाली. त्यानंतर त्याने निवडणूक आयोगावर मोर्चा काढला होता, तेव्हा त्याच्यावर अतिरेकी कारवाया करण्याचे कलम लावत गुन्हा दाखल करण्यात आला. पाच दिवस जेलची हवा गॅरी भाऊला खावी लागली. गंमत पाहा, या आंदोलनात गॅरीने रशियन भाषेऐवजी इंग्रजी भाषा वापरली, याचा अर्थ गॅरी देशद्रोही आहे असा प्रचार पुतीन समर्थकांनी केला. २००८ मध्ये त्याने पुतीनच्या विरुद्ध राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्याच्या सभेत कायद्याचे उल्लंघन झाले असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला, आणि त्याला आपला अर्ज मागे घ्यावा लागला. २०११ मध्ये जेव्हा रशियात मोठी आंदोलने झाली, तेव्हा गॅरी आघाडीवर होता. २०१२ मध्ये त्याला अटक करून न्यायालयात सादर केले होते, मात्र न्यायालयाबाहेरच रस्त्यावर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पुतीन समर्थकांनी आता त्याचे जगणे मुश्किल केले होते. नाईलाजाने २०१३ मध्ये त्याला देश सोडावा लागला. आता क्रोएशियाचे नागरिकत्व घेऊन तो मानवी अधिकारांसाठी लढत आहे. २०१७ मध्ये जागतिक मानवी हक्क संघटनेचा अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली आहे.. डोनाल्ड ट्रंपच्या शोबाजी वर टीका करताना देखील गॅरी कधी कचरत नाही, तो म्हणतो हा दुसरा पुतीन आहे, या दोघांचे एकमेकाशी लागेबांधे आहेत. जगभरात मानवी हक्कांसाठी तो फिरत आहे. त्याचबरोबर निर्णय क्षमता,तंत्रज्ञान आणि सकारात्मक विचार यांची सांगड घालत त्याची व्याख्याने जगभर होत असतात. एवढे सांभाळून त्याचे लिखाण देखील सुरू आहे. गॅरीची ग्रंथसंपदा विपुल आहे. विशीत असतानाच त्याने आत्मचरित्र लिहून खळबळ उडविली होती. विंटर इज कमिंग या पुस्तकात त्याने पुतीनशाहीमध्ये सुरू असलेली दडपशाही मांडली आहे. माझे महान पूर्वसुरी या पुस्तकांच्या मालिकेत त्याने दिग्गज बुद्धिबळातील खेळाडूंच्या खेळाचे विश्लेषण केले आहे. हाऊ लाईफ इमिटेट चेस या पुस्तकात त्याने व्यापार, व्यवहार आणि बुद्धिबळ यांचा संबंध जोडला आहे. तर डीप थिकिंग या पुस्तकात त्याने कृत्रिम प्रज्ञा या विषयाकडे कसे पहावे याचा आज आपण चॅटजीपीटी आणि कृत्रिम प्रज्ञांचे नवीन आविष्कार समोर आलेले पाहतो, त्यांना न घाबरता, त्यांचा वापर करून मानवाने तंत्रज्ञानाच्या लाटेवर कसे स्वार व्हावे यासाठी सकारात्मक दृष्टिकोन दिला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद मी केला आहे, मनोविकास प्रकाशन मार्फत तो प्रकाशित झाला आहे.
वरवर कोरडा वाटणारा मी आत खोलवर खूपच रोमँटिक आहे असे गॅरी म्हणतो. गॅरी जेव्हा भारतात आला होता, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला.. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात राहताना. तिथं तो 'चेस चॅम्पियन' ही खरी ओळख लपवून बिनधास्त फिरू शकतो. सही आणि फोटोसाठी धडपडणाऱ्या गर्दीची भीती बाळगायची त्याला अजिबात गरज नसते. पण जेव्हा तो व्याख्यान देण्यासाठी नवी दिल्ली इथं आला, तेव्हा हॉटेलमध्ये झालेल्या बुद्धिबळ चाहत्यांच्या प्रचंड अशा गर्दीतून त्याला बाहेर काढण्यासाठी हॉटेलवाल्यांना चक्क बाऊंसर बोलवावे लागले होते. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की तिथं 'विश्वनाथन आनंद' जर असता तर त्याची काय अवस्था झाली असती. अर्थात त्याने क्रिक्रेटपटुंना मिळणारे प्रेम पाहिले तर गॅरी बोलेल की यार उगाच मगजमारी करत बसलो एवढे अफाट प्रेम मिळणारे आपल्या देशातील खेळाडू किती खोलवर विचार करतात, आपले स्थान टिकवण्यासाठी काय काय बाबी करतात, केवळ थोडा दानधर्म करून समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात, मात्र दडपशाहीला विरोध करण्याचे सामर्थ्य अगदी निवृत्ती घेतली तरी त्यांना नसते.. अशा नेभळट, कणा नसलेल्या खेळाडूंच्या पार्श्वभूमीवर गॅरीचे वेगळेपण उठून दिसते. त्याचा कणा खूपच सॉलिड आहे राव.. आणि हे मी मनापासून बोलतोय.. त्याच्या पुस्तकाचा अनुवाद केला नसता तरी मला तो एवढाच आवडला असता…लव्ह यू गॅरी.. सौ साल जिओ. #richyabhau #garry_Kasparov आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव