ज्योतिषाचा पाया

ज्योतिषाचा पाया.. दोन आठवड्यापूर्वीच्या रविवारच्या पोस्टवर एका सज्जन गृहस्थाची कमेंट आली की.. "चला ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे असं म्हणता म्हणता आपण मान्य करायला लागला आहात की ज्योतिषशास्त्र हे गणित आहे." कदाचित या गृहस्थाला यानिमित्तानं आपली संस्कृती किती महान आहे हे सांगायचं असेल. त्यांनी दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की ज्योतिषशास्त्र, ज्याला आपण एस्ट्रॉनॉमी म्हणू शकतो, ते निर्विवादपणे गणित आहे.. मात्र या गणिताचा वापर करून तयार करण्यात आलेलं फलज्योतिष, ज्याला आपण एस्ट्रॉलॉजी असं म्हणतो, ते निव्वळ थोतांड आहे.😡 सुर्य वगळता आकाशस्थ इतर कोणत्याही ग्रहगोलांचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. सूर्याचादेखील जो परिणाम मानवी जीवनावर होतो, तो कुणाची कुंडली पाहून होत नाही. दोन वेगवेगळ्या नक्षत्रांवर जन्माला आलेल्या व्यक्ती एकाच जागी थांबल्या असतील तर त्यांना सूर्याची उष्णता एकसमान मिळते.‌🔥
कदाचित या गृहस्थांना हे देखील माहीत नसावं की एस्ट्रॉनॉमी अर्थात खगोलशास्त्राचा जन्म भारतामध्ये नाही तर बाबीलोईन संस्कृतीमध्ये ६००० वर्षांपुर्वी झालेला आहे. आज आपण युक्लिडीयन भूमितीमध्ये जे नियम वापरतो, त्यातीलही बहुतेक शोध बाबीलोईन संस्कृतीमध्ये लागली होते. 😎 वर्तुळाचा परीघ हा त्याच्या व्यासाच्या साधारण तिप्पट असतो हे बाबीलोईनांना ठाऊक होते. (परीघ = व्यास x ३.१४१६) चंद्राच्या कला का दिसतात हे तेव्हा भारतीयांना माहीत नव्हतं, इथे चंद्राला मिळालेला शाप आणि त्याला शंकरानं दिलेलं वरदान यासारख्या कथा लिहिल्या जात होत्या तेव्हा बाबीलोईन संस्कृतीमध्ये मानवाला ठाऊक होतं की चंद्राला प्रकाश सूर्यापासून मिळतो, त्यामुळे चंद्राच्या कला दिसतात. मात्र त्याकाळात दळणवळणाअभावी या संस्कृतीचा भारताशी संबंध नसल्याने या ज्ञानाचं आदान-प्रदान झालं नाही. आणि एकदा पुराणातल्या भाकडकथा रचल्या गेल्या, की नंतर आलेले ज्ञान स्वीकारलं जात नाही याचा आपला मोठा इतिहास आहे😔
भारतामधील सुबत्ता आणि समृद्धता हे घटक देखील इथल्या प्रगतीतील अडथळा ठरले असं अनेक तज्ञांचं मत आहे. इजिप्तमध्ये नाईल नदीला दरवर्षी पुर यायचा, नदीचं पात्र आणि शेतीची जमीन यांची जागा बदलायची. त्यामुळं प्रत्येकाला शेताची वाटणी नव्यानं करून दिली जायची. प्रत्येकाला त्याचं जुनं क्षेत्र होतं, तेवढंच नवीन मिळायचं, मात्र ते पहिल्या क्षेत्रापेक्षा कुठंतरी दुसरीकडं दिलं जायचं. त्यासाठी त्यांना भुमितीची गरज लागली. 🤔 इजिप्शयन संस्कृतीचं वैशिष्ट्य सांगायचं तर त्यांनी हजारो वर्षे ग्रहणांच्या नोंदी अगदी अचूक ठेवल्या. या नोंदींचा अभ्यास करत त्यांना ग्रहणाची अचूक वेळ सांगता येऊ लागली. प्रत्येक पौर्णिमा अमावस्येला ग्रहण होत नाही, तसेच ग्रहणाच्या वेळांचं एक चक्र असतं, ते चक्र दर ६५८५ दिवसांनी रिपीट होत असतं, हे त्यांनी शोधून काढलं होतं. आज इजिप्तमधील पिरॅमिड संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत असले तरी त्यामागे भूमितीचा अगदी सूक्ष्म अभ्यास आहे याचा देखील विचार केला पाहिजे.❤️ त्रिकोणमितीच्या साह्यानं अवकाशातील अंतर मोजण्याचं श्रेय ग्रीक संस्कृतीला जातं. सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकत्र दिसतात, मात्र काही वेळानं ग्रहण सुटतं… असं का होतं?? कारण पृथ्वीवरून आपण सूर्य आणि चंद्र यांचा आकाशभ्रमणाचे निरीक्षण करताना आपल्या असं लक्षात येतं की सहा तासात सूर्य आणि चंद्र यांच्यात साधारण तीन अंशाचा फरक पडतो. ग्रीकांनी सहा तासातील चंद्राच्या स्थितीवरून ग्रीक लोकांनी त्रिकोणमितीचे सूत्र मांडलं. 😇अष्टमीच्या दिवशी चंद्र अर्धा दिसत असतो, याचा अर्थ चंद्र आणि सूर्य काटकोनात आहेत. यादिवशी सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांचा झालेला काटकोन त्रिकोण आणि त्याच्या बाजू यांचा अभ्यास करून सूर्य आणि चंद्र यांच्या पृथ्वीपासून असलेल्या अंतराचा अंदाज करण्यात आला. चंद्रापर्यंत असलेले अंतर बरोबर आलं. सूर्य आणि चंद्र याच्या आकाराच्या तुलनेबाबत त्यांनी मांडलेले अंदाज मात्र चुकलेले आढळतात. हे अंदाज त्याकाळात पूर्ण जगाला दिशा देणारे ठरले होते.😇 परिवलन आणि परिभ्रमण या गतींशिवाय पृथ्वीला परांचन गती देखील आहे, हे आजही अनेक लोकांना माहीत नसतं. मात्र हिप्पार्कस या ग्रीक खगोलतज्ज्ञानं याचा अंदाज २५०० वर्षांपूर्वी केला होता. तेव्हा त्याचं गणित होतं की साधारण १०० वर्षात पृथ्वीचा आस एक अंशानं बदलतो. आज आपल्याला ठाऊक आहे की २६००० वर्षात पृथ्वीचा परांचन गतीचा फेरा पूर्ण होतो. म्हणजेच अधिक अचूक उत्तर २६०००/३६० = ७२.२२ वर्ष आहे. 🌐 हिप्पार्कसचं गणित आज जरी चुकलेलं दिसत असलं तरी त्याच्याकडं तेव्हा उपलब्ध असलेल्या साहित्याचा विचार करता त्याचा शोध देखील महत्त्वाचा आहे. या परांचन गतीमुळं आपले सणवार पुढे चालले आहेत बरं का.. अजून ८०० वर्षांनी मकरसंक्रांत २६ जानेवारी रोजी आली असेल. आणि अजून १६००० वर्षांनी दिवाळी जून जुलैच्या पावसाळ्यात आली असेल.🤪
पृथ्वीचा परीघ मोजण्याचं श्रेय देखील ग्रीकांना जातं. असवान नावाच्या शहरात एक खोल विहीर आहे. वर्षातील केवळ एकाच दिवशी, दुपारी बारा वाजता काही क्षण इथे सूर्य माथ्यावर येतो आणि या विहिरीतील तळापर्यंत सूर्यकिरण पोचतात. इराटोस्थेनिस या संशोधकाने अलेक्झांड्रिया शहरात यादिवशी अन याचवेळी सूर्याचा कोन मोजला. तो ८२.५ अंश भरला. याचा अर्थ साडेसात अंशाचा फरक होता. 😇 अलेक्झांड्रिया ते असवान हे अंतर सुमारे ५०० मैल होते. ५०० मैल अंतरासाठी साडे सात अंश तर किती मैलांसाठी ३६० अंश असे त्रैराशिक मांडले गेले. ५००x३६०/७.५ याचे उत्तर आले २४००० मैल. आज आपल्याला ठाऊक आहे की पृथ्वीचा परीघ २४८५५ मैल आहे. २००० वर्षांपूर्वी इराटोस्थेनिसने मांडलेल्या गणिताला आणि त्याने वापरलेल्या तर्काला सलाम केला पाहिजे. ❤️
भारतीयांनी खगोलशास्त्रातील काही बाबींमध्ये निश्चितच प्रगती साधली होती, आणि जगाला मार्गदर्शन केलं होतं. खगोलशास्त्र, भूमिती हे विषय नसले तरीही अंकगणित आणि बीजगणित हे या भारतीय भूमीत जन्माला आले आहेत. पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर नाही, तर अधांतरी आहे हे सर्वप्रथम निश्चित खात्रीपूर्वक सांगणारा भास्कराचार्य आपल्या मातीतच जन्माला आला होता. 😍 आर्यभटानं पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे दिवसरात्र होतात याची मांडणी केली. शून्याचा शोध ही ब्रम्हगुप्ताची खूप मोठी कामगिरी म्हणावी लागेल. बाबीलोईन संस्कृती भूमितीत जरी पुढे असली तरी अंकगणितामध्ये मागे पडली होती. त्यांच्याकडे एक ते नऊ या अंकांसाठी नऊ मुळाक्षरं वापरली जायची. पुढे दहा ते नव्वदसाठी पुढील नऊ मुळाक्षरं, पुढे शंभर ते नऊशे साठी पुढील नऊ मुळाक्षरं. अशा पद्धतीने संख्या लिहिताना त्यावर मर्यादा येत असत. शून्याचा शोध हा त्यामुळं महत्त्वाचा शोध ठरतो.❤️ शून्याचा शोध लावून भारताने दशमान पद्धतीचा वापर करत अंकगणितामध्ये आघाडी घेतली. वराहमिहिर यांनी पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहीत आर्यभटाच्या मांडणीला अधिक बळ दिलं. ब्रह्मगुप्ताने केलेली मांडणी आजही अगदी अचूक ठरते आहे. मात्र एकेकाळी सूर्यसिद्धांत मांडणारा आपला देश भास्कराचार्यानंतर खगोलविद्येत मागे पडला. फलज्योतिषासारख्या छद्मी विज्ञानाच्या मागे बुद्धिजीवी धावू लागले.😔 आधी कळस मग पाया अशा उलट्या पद्धतीने भूतकाळात घडलेल्या घटनांना फलज्योतिषाच्या सूत्रामध्ये ओढूनताणून बसवण्याचा प्रयत्न केला गेला. परिणामी खगोलविषयी पाश्चात्यांनी केलेली प्रगती केवळ कॉपी पेस्ट मारण्याचे काम भारतीयांनी केलं. 🤣 मुळात खगोल अभ्यासाच्या मागे असलेल्या प्रेरणेबाबत भारतीय आणि ग्रीक यांच्यामध्ये खूप अंतर होतं. पाश्चात्य देश नौकानयन आणि इतर जीवनमरणाच्या प्रश्नांसाठी खगोलाचा अभ्यास करत होते तर भारतीय मात्र केवळ फलज्योतिष आणि धार्मिक विधींसाठी. इथं समुद्र उल्लंघून जाणं हे धर्माच्या दृष्टीनं पाप होतं.‌ 😭 नौकानयन करताना जर काही निर्णय चुकले तर जीवावर बेतू शकते, त्यामुळे पाश्चात्य देशात खगोलशास्त्र अधिक काटेकोरपणे विकसित होत गेले. भारतात आजवर तरी सांगितलेलं ज्योतिष चुकलं म्हणून कोणत्या ज्योतिषाच्या जीवावर बेतल्याचे ऐकिवात नाही.😎 मुळात ज्योतिष सांगताना मुद्दाम मोघम भाषा वापरली जाते. त्यामुळे ऐकणाऱ्याला आपल्याला सांगण्यात आलेले भूतकाळ आणि भविष्य खरेच आहे असे वाटू लागते, शक्याशक्यतेचा नियम वापरत ज्योतिषी मंडळी आपला धंदा हजारो वर्षे चालवत आहेत.🤸 बाकी पुराणांनी अर्धवट माहितीच्या आधारे भरपूर गोंधळ घालून ठेवला होताच. असा एकही प्रश्न नव्हता ज्याचे उत्तर भारतीयांनी दिले नाही.. 🤣 वायुपुराण सांगत होते की चंद्र हा आकाराने सूर्याच्या दुप्पट आहे, शुक्राच्या पाऊणपट गुरू आहे, पृथ्वीचा परीघ साडेअकरा कोटी योजने (दीड अब्ज किलोमीटर) आहे. एक ना हजार.. अश्या चुकीच्या भरपूर बाबी 🤸 मुळात आपले पंचांग निर्माण झाले, त्याचा पाया "यवनी" आहे हेच मुळात आपण मान्य करत नाही. त्या पंचांगाचा वापर करून धंदे सुरू असतात, नवनवीन योग बनवले जातात. या धंद्यात भीती हेच भांडवल असते. सामान्य जनतेला काहीच माहीत नसल्याने हा भितीचा धंदा जोरात चालतो आहे. मात्र आज ज्योतिषांना देखील नक्कीच भीती वाटत आहे की त्यांचा धंदा लवकरच बंद पडेल.✊✊
कोलंबसने आपल्या खगोलीय ज्ञानाच्या जोरावर अमेरिकन बेटावरील लोकांना मूर्ख बनवले होते. तेव्हा तो तिथल्या बेटावर अडकला होता, त्याची रसद संपली होती आणि स्थानिक जनतेने त्याला मदत नाकारली होती. अश्या पेचप्रसंगात असताना त्याने शक्कल लढवली. चंद्रग्रहण केव्हा होणार आहे हे ठाऊक असल्याने त्याने टोळी प्रमुखाला बोलावून जाहीर केले की आमचा ख्रिस्ती देव तुमच्यावर खूप नाराज झाला आहे. आमचा देव आज चंद्राला लाल करून टाकेल. थोड्या वेळाने ग्रहण सुरू झाले, टोळीप्रमुख दाती तृण धरून कोलंबसकडे आला. आणि अर्थातच कोलंबसची प्रार्थना ऐकून योग्य वेळी चंद्राचं ग्रहण सुटलं.🤣 पुढे सहा महिन्यांनी कोलंबसची सुटका करायला दुसरी टीम आली, मात्र तोवर त्यांना खायलाप्यायला काही कमी पडलं नाही.🤸 अमेरिका असो किंवा भारत.. कुणाच्या अज्ञानाचा फायदा कुणीतरी घेत असतोच.. आपल्या वाडवडिलांना फसवलं असलं तरी किमान आपण तरी नको फसायला. ✊✊ जय विज्ञान✊ जय खगोलशास्त्र✊✊ ज्योतिषाच्या बैलाला होssssss #richyabhau आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com/

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

गोमू आणि गोमाजीराव