एका कोळीयाने..

एका कोळीयाने..
माशी, मुंगी या कीटकांचा उल्लेख जसा नेहमी स्त्रीलिंगी केला जातो, तसच कोळी हा नेहमी पुल्लिंगी स्वरूपात वापरला जातो. हा कीटक वाटत असला तरी कीटक नाही बरं का! कारण त्याला सहा नाही तर आठ पाय असतात. म्हणून विंचूवर्गीयात त्याची गणना होते. आपल्या शरीरातून ते रेशीम तयार करू शकतात, ज्यामुळे ते एकदम खास बनतात. तब्बल अडीच वर्षे जरी खायला मिळाले नाही तरी काही कोळी जिवंत राहून दाखवतात. किती चिवट ना!! अगदी हेमिंग्वेच्या "ओल्ड मॅन अँड द सी" मधील म्हातारा!❤️ समुद्रात मासेमारीसाठी गेलेला एक म्हातारा महाकाय माश्याशी झुंजताना आपली सगळी अवजारे गमावतो, बहुतेक सगळी शक्ती गमावतो मात्र त्या माश्याला मारूनच परततो.. पु.ल.देशपांडे यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे.. "एका कोळीयाने!" मात्र आज आपल्याला मासे मारणारा कोळी नाही तर त्याला जाळे विणन्याची प्रेरणा देणारा कोळी या पोस्टमध्ये रंगवायचा आहे. सहा वर्षापेक्षा मोठे असलेले क्वचित एखादेच बालक असेल ज्याला स्पायडरमॅन बद्दल क्रेझ नसेल. एका तरुणाला कोळी किडा चावतो आणि तो स्पायडरमॅन बनतो ही कथा किशोरवयात असताना एवढी खरी वाटली होती की आमच्यापैकी अनेक मित्रांनी कोळी चावून घेण्यासाठी प्रयत्न केला होता🤣 आपल्यापैकी देखील असे अनेक बहाद्दर असतीलच म्हणा!! बरं झालं आपल्याला भेटलेला कोळी विषारी नव्हता!! तसे सगळेच कोळी विषारी असतात, मात्र त्यांचे विष मानवाला घातक नसते. केवळ काहीच उपजाती अश्या आहेत, ज्या मानवाला घातक ठरू शकतात.
कोळी.. ज्याच्या जगभरात साठ हजारपेक्षा जास्त उपजाती आहेत. त्यातील काही सुईच्या टोकावर बसतील एवढे असतात, तर काही आपल्या हाताच्या पंज्यापेक्षा मोठे. या पृथ्वीवर एकूण किती कोळी असतील?? तुम्ही आता बसले अस्सल, त्या जागेच्या कोणत्याही दिशेला दहा फूट जा..एक कोळी नक्की असेल. अंटार्टिका वगळता ते सर्वत्र असतात. अर्थात त्यांना तुमचे काही पडले नसल्याने ते तुमच्यासमोर येण्याची तसदी घेणार नाहीत. नर कोळी हिवाळ्यात मादीच्या शोधात बाहेर पडतात, सहसा तेव्हाच दिसून येतात. एरवी कोळी खूप लाजाळू, शक्यतो दडून राहणे त्यांना आवडते. आपण भले, आपले जाळे भले आणि आपली शिकार भली!! निर्मला सीतारामन जशी भवताली काय महागाई सुरू असेल, त्याकडे दुर्लक्ष करते, तसेच हे कोळी असतात. 😭 कोळ्यांची साधारण हातभर लांबीची जाळी नेहमी दिसतात, मात्र आपल्या सह्याद्रीत एक अशी प्रजाती आहे, जिचे जाळे दहा ते तेरा फूट मोठे असते. हे कोळी त्यांचे एवढे सुंदर जाळे विणतात तरी कसे?? त्याच्या पोटाच्या मागे असलेल्या तंतुका (spinneret) या अवयवातून एक वेगळ्या प्रकारचे रेशीम बाहेर टाकले जाते. या रेशीमाचा अतिशय पातळ असा धागा असतो.. ज्याचे दहा धागे एकत्र केले तर त्यांची जाडी आपल्या एका केसाएवढी असेल. कोळ्याच्या रेशीमग्रंथी नरसाळ्याच्या आकाराच्या असतात, त्यात फायब्रोईन प्रथिनांची साखळी, फॉलिक ॲसिड आणि झिंक यांचे मिश्रण पातळ जेलीच्या रुपात तयार झालेली असते. रेशीमग्रंथीमधून जेव्हा हा धागा बाहेर पडतो तेव्हा तो द्रव रुपात असतो, मात्र अतिशय पातळ असल्याने तो हवेत लगेच सुकतो. हा धागा वॉटरप्रुफ तर असतोच शिवाय खूपच दणकट असतो. आता तुम्ही म्हणाल हा धागा आणि दणकट.. असे कसे?? हा तर लगेच तुटतो.. नाही, वजनाचे आणि दणकटपणाचे गुणोत्तर पाहिले तर हा धागा लोखंडी तारेपेक्षा जास्त मजबूत असतो. म्हणूनच व्हायलीनच्या तारा असो अथवा बुलेटप्रुफ जॅकेट त्यात कोळ्याच्या तारांना मागणी असते. 😇 हा धागा जेवढा ताणला जाईल तेवढ्या लवकर सुकत असतो त्यामुळे कोळ्याची यंत्रणा अशी असते की ग्रंथी मधून एकावेळी अतिशय कमी जेली बाहेर येईल कोळी ती ताणत पुढे जाईल. सर्वप्रथम कोळी जाण्याची सर्वात शेवटची रेष पूर्ण करत सीमा निर्धारित करतो आणि त्यानंतर आत येतो. "धागा धागा अखंड विणूया" असे करत कोळी त्याचे आकर्षक जाळे तयार करतो आणि मग निवांतपणे भक्ष्याची वाट पाहतो. अडकलेली शिकार जीव वाचवण्यासाठी धडपडते आणि जाळे हलते. ही जाळी मूळ आकाराच्या चौपट ताणली जाऊ शकते. जाळीत हालचाल झाली की कोळ्याला समजतं, पार्टीची वेळ जवळ आली आहे. भक्ष्य सापडल्याची "तार" पोचल्यावर कोळी लगेच निघतो, आपल्या शिकारीला विषारी दंश करून तिची तडफड थांबवतो. ना हलाल, ना झटका, विष देऊन मारतो आणि मग त्यांना खातो.😮 मात्र त्याची जेवणाची देखील तऱ्हा निराळी आहे. आपण आधी अन्न खातो आणि मग पचवतो ना! कोळी मात्र आधी अन्न पचवतो आणि मग खातो. असे कसे?? सापडलेल्या भक्ष्यावर कोळी विषप्रयोग करतो, तेव्हा त्या विषात काही रसायने असतात. त्यामुळे ते भक्ष्य विघटित होऊन जेलीरुपात तयार होते. ( अन्न मस्त मॅरीनेट करतो असे म्हणा ना!!) कोळ्याला हा ज्यूस प्यायला आवडतं कारण नंतर तो पचवायला लागत नाही. चावायला देखील लागत नसल्यामुळे कोळ्याला मजबूत दातांची आवश्यकता नसते. तरीही त्याला कधी वेळ पडली तर चावणे, कापणे, भुगा करणे यासाठी सक्षम दात असतात. कधी कधी कोळी आपली शिकार आपल्या रेशमी सुतात मस्त गुंडाळून ठेवतो. का?? पुढे पाहूच!! "आताची भुक भागली" हा विषय मात्र त्यात नसतो. कोळ्याच्या शरीराच्या आकारावर जाऊ नका.. एका दिवशी शंभर चिलटं जरी त्याला जाळ्यात सापडली तरी तो एकटा कोळी ती सगळी फस्त करू शकतो. कदाचित ३५ पुरणपोळ्या पण खाऊ शकेल.🤣 कोळी जरी डंख करताना विष वापरत असले, तरी फारच कमी प्रजातीच्या कोळ्यांचे विष मानवाला घातक असते. मादी कोळी "नरभक्षक" असतात बरं का!! इथे "नरभक्षक" म्हणजे नर कोळ्याचे भक्षण करणारी!! खरं तर नरभक्षक हा शब्द आपण आजवर नेहमी चुकीचा वापरत आलो, कोणता वाघ नरभक्षक असेल तर तो स्त्रियांना खात नाही का?? म्हणजे अश्या वाघाला "मानवभक्षक" असा शब्द असायला हवा! मादी कोळी नर कोळी खात असते. त्यांच्या मिलनाचा क्षण मोठ्या आणीबाणीचा असतो बरं का!! जेव्हा त्यांचे मिलन पूर्ण होते, तेव्हा नर आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढतो, आणि मादी त्याला पकडून मारते. 👹 कोळ्याच्या एका प्रजातीचे नावच मुळात ब्लॅक विडो अर्थात काळी विधवा आहे.
"आता मिलनानंतर आपल्याला जी पोरं होतील, त्यांना खायला कोण घालणार.. तुझा बाप??" असा प्रामाणिक प्रश्न विचारत मादी नराला खाऊन टाकत असते. बिचारा नर.. तो काय बोलणार? त्याचा बाप पण त्याला जन्माला घालताना असाच शहीद झालेला असतो😭 मादीचा आकार नरापेक्षा मोठा असल्याने तिला हुकूमत गाजवता येते. काही प्रजातीतील नर अतिशय कनवाळू असतात. "जहापनाह तुसी ग्रेट हो, तोफा कबूल करो" असे म्हणत ते मिलनानंतर स्वतः मादीपुढे सादर होतात. मादी नको नको म्हणत असताना तिला स्वतचं भक्षण करायला भाग पाडतात. यांची ही प्रेमकथा शमा परवान्यापेक्षा अधिक खोल आहे ना!♥️ यांच्या विणीचा हंगाम हिवाळ्यात असतो. इतर प्राण्यांमध्ये मादी फलनासाठी चांगला नर शोधत असते.. आपली पिल्ले चांगली सक्षम, सुदृढ आणि देखणी जन्माला यावीत या हेतूने ती नराची निवड करत असते. कोळ्यात मात्र मानवासारखे वधूसंशोधन चालते. नर कोळी चांगल्या सुदृढ मादीची निवड करतात. अर्थात त्याला अंदाज असेलच की मिलनानंतर आपला मृत्यू येऊ शकतो, त्यामुळे "मरावे परी चांगल्या पिल्लारुपी उरावे" या हेतूने ते सुदृढ मादीची निवड करतात आणि आपल्या मरणाची शक्यता अधिक दृढ करतात. आवडलेल्या मादीसमोर ते नृत्य वगैरे करत तिला खुश करण्याचा प्रयत्न करतात. तिला भेट म्हणून शिकार वगैरे आणून देतात. "शिकार सूतात गुंडाळून का ठेवली होती" हे आता लक्षात आले असेल.😃 एका मादीने या भेटवस्तू नाकारल्या तर आजिबात खचून न जाता नर त्या वस्तू घेऊन दुसऱ्या मादीचे दार ठोठावतात. कोळ्यांच्या माद्या अंडी घालण्यासाठी तंतूंचे कोश विणतात. मादी आपल्या शरीरात शुक्राणू दीर्घकाळ साठवून ठेऊ शकते. तिला पाहिजे तेव्हा अंडी घालते. रेशमी तंतूंनी बनविलेल्या कोशावर सख्त पहारा ठेवून ती अंड्यांचे रक्षण करते कारण काही इतर कीटक त्याच कोशात आपली अंडी घालतात. त्यांच्या अळ्या आधी बाहेर पडतात आणि ते कोळ्यांची अंडी खाऊन टाकतात.😭 एकावेळी एक अंडे घालणाऱ्या देखील कोळी प्रजाती आहेत तर एका वेळी दोनतीन हजार अंडी घालणाऱ्या देखील. एक मादी एकावेळी सरासरी १०० अंडी घालते. त्यातून १५ दिवसांनी पिल्ले बाहेर आल्यावर कात टाकत अळी अवस्था पूर्ण करत दहा दिवसात मोठी होत असतात. या अवस्थेत पिल्ले आईच्या पाठीवर बसतात आणि आई त्यांचे रक्षण आणि पोषण करते. सर्वच कोळी जाळे विणत नाहीत, काही कोळी जाळे विणुन एका जागी वाट पाहत बसण्यापेक्षा शिकारी करत जंगलभर फिरणे पसंद करतात. हक्काचे जाळे नसल्याने या प्रजातीमधील मादी आपल्या पाठीवरच स्वतःची अंडी वाहत असते. 😭
"शिकारी खुद अपने जाल मे फसा" अशी म्हण आपण ऐकतो. मग कोळी स्वतःच्या जाळ्यात का नाही अडकत? कोळ्याच्या जाळ्याचे नीट निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल त्यात दोन प्रकारच्या तारा आहेत. काही तारा केंद्राशी समांतर असतात.. काही तारा केंद्रातून अक्षांकडे जाणाऱ्या असतात. या तारा गोलाकार तारांपेक्षा सुक्या असतात, चिकट नसतात. कोळी कायम याच तारांचा वापर करत जाळ्यात फिरत असतो.❤️ काही कोळी जाळे लावून वाट पाहत नाहीत तर समोर आलेल्या भक्ष्यावर जाळे फेकतात. काही कोळी जमिनीवरील छोट्या भेगेत, खड्ड्यात, बिळात राहतात, तिथेच त्यांचे जाळे बिळाच्या तोंडाशी लावतात. धडपडणारे कीटक त्यांना आयते सापडतात. मग त्यांना आधी डंख देऊन मारले जाते आणि बिळात ओढून नेले जाते. डंख हा नांगीसारखा लांबट, टणक, पोकळ आणि टोकदार असतो, त्याला विषग्रंथी जोडलेली असते. वर उल्लेख केलेल्या ब्लॅक विडो जातीच्या कोळ्याच्या दंशामुळे माणसाला अतिशय तीव्र वेदना होतात, क्वचित मृत्यू देखील ओढवतो. ऑस्ट्रेलियात सापडणारे पाठीवर लाल ठिपका अथवा पांढरा पट्टा असलेले कोळी विषारी असतात. त्यांच्या चावण्याने मानवी शरीराची चावलेली जागा लाल होते व आग होते. अशा वेळी योग्य ते उपचार घेणे गरजेचे असते. मानवी चेतासंस्थेच्या विविध आजारांवर कोळ्यांच्या विषाचा वापर करून औषध निर्मिती करता येईल का? यावर आता संशोधन करण्यात येत आहे. कोळ्यांनी तयार केलेले रेशीम हे लोखंडी सळ्यापेक्षा मजबूत असल्याने त्याअनुषंगाने देखील संशोधन होत आहे❤️ अन्नसाखळीमध्ये कोळी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
कोळ्यांचे स्नायू भक्कम असतात, मात्र त्यात एक गंमत आहे. कोळी आपले पाय आत सहज घेऊ शकतात मात्र तेच पुन्हा बाहेर काढायचे असतील तर त्यांच्या शरीरात हायड्रॉलिक प्रमाणे यंत्रणा काम करावी लागते. ही शक्ती वापरूनच त्याचे पाय पुन्हा बाहेर येतात. तुम्ही कोणताही मेलेला कोळी पाहिला तर त्याचे पाय तुम्हाला शंकर महाराजाप्रमाणे आत घेतलेले दिसतील, त्याचे हे कारण आहे!! कोळ्यांची श्वसनसंस्था खूप वेगळी असते. कोळ्यांचे नाक आणि फुप्फुसांची जोडी पोटापाशी असते आणि वायुनलिकांचे जाळे पूर्ण शरीरभर पसरलेले असते. कोळ्यांची उडी मारायची क्षमता खूपच जास्त असते. काही विशिष्ठ जातीतील कोळी तर त्यांच्या लांबीपेक्षा पन्नासपट अधिक दूर उडी मारतात.🤭 कोळ्यांना टीम वर्क आवडते, एकत्र राहणे, शिकार वाटून घेणे या बाबी त्यांना आवडतात. कोळ्यांना चार ते आठ डोळे असतात. त्यांना अतिनील (UV) किरणांना पाहण्याची देखील क्षमता असते. त्यांच्या अंगावरील केस अतिशय संवेदनशील असतात, संभाव्य धोक्याचा सुगावा त्यांना लागतो. त्यांच्यावर हल्ला झाल्यावर साळिंद्राप्रमाणे त्यांचे केस उभे राहतात.🔥 कोळ्यांचे रक्त लाल नसते बरं का.. निळे असते. आपल्या रक्तात असलेल्या हिमोग्लोबिनमुळे अर्थात लोहामुळे आपल्या रक्ताला लाल रंग येतो. रक्ताच्या रेणूंमधील लोहाशी ऑक्सीजनचा संबंध येतो, आणि रक्त लाल रंग घेते. कोळ्यांच्या रक्तात कॉपर असते. रक्ताच्या रेणूंमधील तांब्याशी ऑक्सीजनचा संबंध येतो आणि रक्त निळे दिसते.❤️ दुष्ट शक्तींपासून मानवाचा बचाव करण्यासाठी कोळी जाळे विणत असतात, असे अनेक संस्कृतीत मानले गेले आहे. हिंदू संस्कृतीत कोळी हे समृद्धतेचे प्रतीक मानले गेले आहे. इंद्रजाल, मायाजाल हे शब्द आपल्या परिचयाचे असतील..मात्र जगभरातील सर्वच संस्कृतीत कोळी देवतेच्या रुपात पुजला गेला आहे. ग्रीक संस्कृतीत एक दंतकथा आहे की तिकडच्या आटपाट नगरात एक कुशल विणकर होता, त्याने तिकडच्या विद्येच्या देवतेला, अथेनाला फसवले. अथेनाने त्याला शाप देऊन कोळी बनवले.🥳 नॉर्स पुराणकथांमध्ये कोळी हा ओडीन या सर्वोच्च देवाचा अवतार समजला जात होता. पश्चिम आफ्रिकेत अर्धनारी अर्धकोळी अशी देवता पुजली जाते. ख्रिस्ती धर्मात कोळी हा संयमाचे प्रतीक समजला गेला आहे. मोठे होत असताना आपल्याला समज येते की स्पायडरमॅन काल्पनिक बाब आहे,असे काही नसते. मात्र उत्तर अमेरिकेतील एका जमाती मध्ये असा समज आहे की स्पायडर वूमन असतेच, आणि ही सृष्टी तिनेच बनवली आहे.🤸 स्वप्नात कोळी आला तर मुलीचे लग्न लवकर होते असे आफ्रिकेत मानले जाते. छतावर कोळी दिसणे हे जपान मध्ये शुभशकुन मानले जाते. एका जपानी सणाच्या दिवशी कार्यक्रमात कोळ्यांच्या प्रतिमा मिरवल्या जातात. 🕺 युरोपमध्ये असा समज होता की खिशात कोळी सापडला तर लवकरच खूप मोठा धनलाभ होणार आहे. ❤️ कोळी पकडून त्याला मारले तर कुटुंबाचा नाश होतो असा समज काही ठिकाणी आहे तर याउलट काही संस्कृतीत कोळी अपशकुनी देखील मानला गेला आहे. काही ठिकाणी चेटूक, काळी जादू करण्यासाठी कोळी वापरला गेला आहे. कलहस्ती येथील शिवमंदिरात कोळ्यांना मानाचं स्थान आहे. त्यामागे अशी कथा आहे की एकदा कोळी शंकराला असं म्हणाला की भगवंत मला तुमचं दर्शन कायम झालं पाहिजे आणि त्याने शिवलिंगाच्या वर आपले जाळे विणले. त्याच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी शंकराने आपल्या शिवलिंगावर अग्नी पेटविला. मात्र आपल्या भक्तीपासून जरा ही न ढळता कोळी सहन करत राहिला, शेवटी सहन न झाल्याने त्याने त्या आगीत उडी घेतली आणि जळून मेला. 😭 आज पाहा, त्याला किती सन्मान मिळतो आहे. यातून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण आपली अंधभक्ती चालू ठेवली पाहिजे. आता आपल्याला धग लागत असेल, होरपळत असेल पण आपला भगवंत आपली परीक्षा पाहत आहे. या परीक्षेत आपला जीव जरी गेला तरी इतिहासात आपण अजरामर होणार आहात.. बुडाखाली किती पण आग लागू द्या.. आपण करत राहू नमो नमो!! ✊✊✊ #richyabhau #स्पायडर आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com/

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव