उपद्व्यापी वाळवी

उपद्व्यापी वाळवी
“भ्रष्टाचार ही देशाला लागलेली वाळवी आहे.” हे नेहमी वापरलं जाणारं वाक्य असो अथवा “मधुमेह म्हणजे आपल्या शरिराला लागलेली वाळवी आहे.” असं वाक्य! वाळवीचं रूपक वापरून “हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचं” धोकादायक चित्रण अनेक वेळा केलं जातं. सध्याच्या भ्रष्ट वातावरणात रोजच कानावर पडणारा हा शब्द आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर एक दिवस अशी वेळ येईल की वाळवी ही केवळ लोकशाहीला किंवा सरकारी व्यवस्थेलाच लागते असं पुढच्या पिढीचा समज होईल. या पिढीने कदाचित “झाडाचं खोड खाण्याची खोड” असलेली खरी वाळवी कधी पाहिली नसेल, मात्र त्यांना वाक्प्रचार ठाऊक असेल! वाळवीला अर्थात तुमच्या म्हणी आणि वाक्प्रचाराशी काही घेणं देणं नाही. त्यांना केवळ “हाती घ्याल ते तडीस न्याल” ही एकच म्हण ठाऊक आहे. त्यामुळे जो पदार्थ ते चावायला घेतात, त्याचा पूर्ण भुगा केल्याशिवाय त्या शांत बसत नाहीत. मॅरेथॉनमध्ये धावत असल्याप्रमाणे वाळवी सतत मात्र मंद गतीने खात असते. हिंदी भाषेत दीमक, उधई तर संस्कृतमध्ये वल्म म्हणवून घेणारा हा कीटक झुरळ आणि मुंगी या दोघांशी नाते सांगतो. हा जीव तिच्या उपद्व्यापांमुळे बदनाम आणि नकोनकोसा झाला असला तरी काही ठिकाणी औषध तर काही ठिकाणी अन्न म्हणून तिचा वापर केला जातो. सृष्टीवरील जीवचक्राचा महत्त्वाचा भाग असलेली ही वाळवी!! वाळवीच्या या पृथ्वीवर सुमारे तीन हजार प्रजाती असून त्यांना सहा प्रवर्गात विभागलं जातं. सर्वात जास्त, १००० प्रजाती आफ्रिका खंडात सापडलेल्या आहेत. आफ्रिकेत, तब्बल वीस हजार वर्ग किलोमिटर क्षेत्रात पसरलेल्या क्रूगर नॅशनल पार्कमध्ये, वाळवीची अकरा लाख वारुळं आढळून येतात. अंटार्टिका खंड वगळता वाळवीनं संपूर्ण विश्व व्यापून टाकलं आहे. भारतात अडीचशेपेक्षा जास्त प्रकारच्या वाळवी आढळून आल्या आहेत. भारतापेक्षा चीनमध्ये वाळवीची जास्त जैवविविधता असून अन्न म्हणून वापर करण्यासाठी काही ठिकाणी वाळवी उत्पादन देखील केलं जातं.
दिसतं तसं नसतं असं उपशीर्षक असलेला वाळवी नावाचा मराठी सिनेमा २०२३ मध्ये आला होता. सिनेमा पाहताना एवढा बोर झालो की डोक्याला वाळवी लागली असे वाटायला लागले. २०२३ मध्येच व्हाईट अँट नावाचा लघुपट आला होता ती मात्र जबरदस्त होता. वाळवीच्या आवाजाला पकडणारे उपकरण घेऊन एक व्यक्ती वाळवी निर्मलुनसाठी आलेला असतो. त्या उपकरणात येणारा आवाज अंगावर काटा उभा करणारा होता. द व्हाईट अँट नावाचा चिनी सिनेमा देखील केवळ वाळवीसाठी अमेझॉनवर पाहिला मात्र त्याचा वाळवीशी काही संबंध नव्हता. त्याचा विषय भलताच होता आंबट शौकिनांनी स्वतः पहावा! पांढरी मुंगी असं टोपणनाव असलं तरी वाळवीचे नातं मुंगीपेक्षा झुरळाशी अधिक जवळचं आहे. पहिली बाब म्हणजे वाळवी ही मुंगीपेक्षा अधिक प्राचीन काळापासून या पृथ्वीवर आपलं अस्तित्व सिद्ध करत आहे. सुमारे तेरा कोटी वर्षांपूर्वीचे वाळवीचे जीवाश्म मानवाला सापडले आहे. उत्तर पर्मिनियन काळामध्ये म्हणजे सुमारे २३ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात वाळवी झुरळासारख्या पूर्वजापासून उत्क्रांत झाली असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या दोन्ही प्रजातीचा एक सामाईक पूर्वज २३ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असावा. झुरळं आणि वाळवी यांची जननेंद्रियं, धड आणि पोटातील अवयव यांमधील साम्य लक्षणीय आहे. आजही अनेक लाकूड भक्षक झुरळं आणि वाळवी यांच्या आतड्यात एकाच प्रकारचे जीवाणू आढळतात. वाळवीच्या पोटात वेगवेगळे शंभर प्रकारचे जीवाणू असतात, जे सेल्युलोजचं पचन करून त्यापासून ऊर्जा बनवतात. या जीवाणूंच्या जीवावरच वाळवी लाकूड, गवत, झाडाची पाने, पुष्ठे, जिप्सम किंवा इतर कोणतेही घटक फस्त करत असते. सागवान, महोगनी अशी काही विशिष्ठ झाडे सोडली तर इतर सर्व प्रकारच्या लाकडाला वाळवी लागते. मग साठ हजार वाळव्या मिळून सहा इंच बाजू असलेला चौरस आकाराचा चौदा इंच लांबीचा ठोकळा केवळ पाच महिन्यात फस्त करून टाकतात. अंधार आणि ओलावा यांवर वाळवीचं प्रेम असतं. वाळवीच्या अणकुचीदार नांग्या इतक्या धारदार असतात की लाकूड असो अथवा सिमेंट, त्या भुगा करून टाकतात. वाळवी अन्न मिळविण्यासाठी जेव्हा वारुळाबाहेर पडतात तेव्हा कवायती फौजेप्रमाणे कामकरी वाळवींची जमिनीवर रांग लागते. गवत असो अथवा कोणत्या फळाचे बी, जो खाऊ त्यांना मिळेल, तो ओढत वारुळामध्ये नेला जातो किंवा जागच्या जागी खाल्ला जातो. खाऊचा नवीन अड्डा समजला तर वाळवी आपल्या ग्रंथीमधून फेरोमोन नावाचा द्रव जमिनीवर सोडते. या फेरोमोनाचा वास अन्य वाळवींना समजतो आणि त्या देखील पार्टी करायला या अड्ड्यापाशी जमा होतात. “अंजनस्य क्षयं दृष्ट्वा वल्मीकस्य च संचयं” म्हणजे डोळ्याला लावलेले अंजन (काजळ) हळूहळू कमी होत जातं आणि लागलेली वाळवी हळूहळू वाढत जाते. वाळवीच्या एकेका कॉलनीमध्ये सरासरी दहा लाख किडे राहत असतात. मुंग्या तसेच मधमाश्यांप्रमाणे वाळवीमध्ये देखील एक राणी असते. त्या राणीला शोधून मारलं तर अख्खी वस्ती नष्ट होऊ शकते. काही प्रजातीमधील राणी वाळवी दिवसाला तब्बल ३६०० अंडी घालते आणि तिचा हा कारखाना तब्बल २५ वर्षं सुरू राहू शकतो. या प्रजातीमधील एक राणी वाळवी तब्बल ५० वर्षे जगल्याची देखील नोंद आहे. म्हणजे त्या राणीने ३६०० x ३६५ x २५ याप्रमाणे सुमारे सहा कोटी सत्तावन्न लाख अंडी घातली असतील! अर्थात या पृथ्वीवर अश्या अनेक प्रजाती आहेत, ज्या वाळवीपेक्षा जास्त अंडी घालतात. सरासरी चाळीस वर्षे जगणारा ब्ल्यूफिन टूना मासा दरवर्षी चार कोटी अंडी घालतो. सरासरी दहा वर्षे जगणारा मोला उर्फ ओशन सनफिश नावाचा मासा एका हंगामात ३० कोटी अंडी घालतो. म्हणजेच ब्ल्यूफिन टूना आणि मोला हे त्यांच्या जीवित काळात अब्जापेक्षा जास्त अंडी घालतात. निसर्ग त्याचं संतुलन राखत असतो त्यामुळे या अंड्यांवर जगणारे जीव देखील जवळपास राहत असतात आणि या अंड्यांची भुर्जी करून खात असतात! जागतिक तापमानवाढीमध्ये वाळवी देखील भर घालत असते. एक वाळवी एका दिवसात अर्धा मायक्रोग्रॅम मिथेन उत्सर्जित करते. म्हणजेच वीस लाख वाळव्या मिळून रोज एक ग्रॅम मिथेन तयार करतात. हा आकडा खूपच लहान वाटत असला तरी या पृथ्वीतलावरील सर्व वाळव्या मिळून दरवर्षी वीस अब्ज किलो मिथेन वायू उत्सर्जित करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की, हरितगृहवायू उत्सर्जनात १४ टक्के भर गाईकडून टाकली जाते. गायीच्या पोटात राहणारे आणि तिच्या अन्नपचन प्रक्रियेमध्ये मदत करणारे जीवाणू मिथेन वायू तयार करत असतात. गाई आपल्या ढेकरीमधून हा वायू बाहेर सोडते. एका वर्षात सरासरी ७० किलो याप्रमाणे प्रत्येक गाई मिथेन तयार करू शकते. या पृथ्वीवर असलेला एकूण दीड अब्ज गोवंश किमान एकशेपाच अब्ज किलो मिथेन वायू दरवर्षी हवेत सोडत असतो! वाळवी प्रजातीमध्ये कामाची विभागणी करण्यासाठी वर्गव्यवस्था तयार झाली आहे. केवळ राणी वाळवीने प्रजेचे उत्पादन करायचे असते. या प्रजेत सैनिकी आणि कामकरी वाळवी असे इतर दोन वर्ग असतात. कामकरी अथवा सैनिक वाळवी प्रजोत्पादन करू शकत नाहीत. त्यांना केवळ काम करणे ठाऊक असते. कामकरी वाळवी अन्न मिळवण्याचं आणि आणि सैनिक रक्षण करण्याचं काम करत राहतात. याशिवाय एक असा वर्ग असतो जो बदली प्रजोत्पादक म्हणून काम करू शकेल. राजा किंवा राणीचा मृत्यू झाला तर पुढील पिढी जन्माला घालण्याची जबाबदारी यांच्याकडून पूर्ण केली जाते.
राणी वाळवी जेव्हा अंडी घालते तेव्हा या अंड्यातून केवळ विशिष्ट प्रजातीच जन्माला येईल असं काही नसतं. अंड्यातून बाहेर आलेली सर्व पिल्ले सारखीच असतात. मोठी झाल्यावर ही पिल्ले परिस्थिती पाहून कामकरी, सैनिक किंवा राजाराणी बनतात. परिस्थिती पाहून वेगवेगळ्या अर्भकांच्या मेंदूमध्ये वेगवेगळी रयासने स्त्रवतात, ज्यातून ही अर्भके वेगवेगळे वर्ग आणि वर्गाला अभिप्रेत असलेले काम स्वीकारतात. एखाद्या वर्गाची संख्या कमी झाली असेल तर एका विशिष्ठ रसायनाचा पाझर करून वाळवी इतर वाळव्यांना चाटवते आणि त्या वाळव्यांचा वर्ग बदलतो.. संख्या कमी असेल तर अशी वाढवली जाते, मात्र जास्त असेल तर काय? एखाद्या हिटलर अथवा स्टॅलिन सारख्या क्रूरकर्म्याची आठवण यावी असा एक नियम वाळवीच्या विश्वामध्ये असतो. राजा राणी, सैनिक, कामकरी या सर्वांचे प्रमाण वारुळात नियंत्रित केलं जातं. त्यांच्या वारुळात कोणत्याही वर्गाची संख्या जास्त झाली तर त्या वर्गाचे प्रतिनिधी खाऊन टाकले जातात आणि संख्या पुन्हा प्रमाणात आणली जाते. समजा कामकरी किंवा सैनिक वाळवीची संख्या प्रमाणापेक्षा जास्त वाढली तर इतर वाळवी त्यांना खाऊन फक्त करून टाकतात आणि प्रोटीन्स मिळवतात. जोपर्यंत वसाहतीमधील संख्या प्रमाणात येत नाही तोवर ही प्रक्रिया सुरू राहते. स्वजातीचं भक्षण करण्याची ही वृत्ती फार कमी प्रजातीमध्ये आढळते. वाळवीच्या पिल्लांचं पोषण करायच्या वृत्तीची तुम्हाला किळस वाटू शकेल. अन्नाचा साठा सापडला की वाळवी इतर कामकरी वाळव्यांना संकेत पाठवतात आणि त्या गपागपा पोटात बसेल तेवढे खाऊन घेतात आणि वारुळामध्ये परत येतात. घरी परत येऊन त्या खाल्लेलं अन्न उलटी तसेच विष्टेद्वारे बाहेर टाकतात. ही उलटी आणि विष्ठा वारुळात असलेल्या पिल्लांचं तसंच सैनिक आणि राजाराणी वाळवीचं अन्न असतं. मधमाश्या पिल्लांचं पोषण करताना भेदभाव करतात, राणी माशी होणार आहे त्या पिल्लासाठी खास खाऊ असतो. कामकरी वाळवी मात्र सर्व पिल्लांना सारखाच खाऊ एकाच प्रेमळ भावनेनं भरवते. झाडं,वाळलेलं लाकूड, जमिनीखाली तसेच जमिनीवर देखील वाळवी वारूळ करू शकते. ओलसर लाकडात राहणारी वाळवी आकाराने मोठी असते. लाकूड पोखरून त्यात छान हवामहल तयार केला जातो. वेगवेगळ्या हवेशीर खोल्या त्यामध्ये असतात. जमिनीखाली राहणारी वाळवी अतिशय दाटीवाटीने राहते. एका वारुळात असलेल्या वाळवीची संख्या दोन लाखांपर्यंत असू शकते. तीन चार मीटर पसरलेले आणि सुमारे सहा मीटर उंचीचं वारूळ सामान्यतः पाहायला मिळतं. ते तयार करताना वाळवी खूप कष्ट उपसतात. माती, चिखल, लाळ व विष्ठा यांचा वापर करत खोल्या, रस्ते तयार केले जातात. कामकरी वाळवीच्या खोल्या आतल्या बाजूस असतात तर बाहेरच्या खोल्यामध्ये राहून सैनिक वाळवी पहारा देत असतात. तळावरील जागा राजाराणी यांना राहण्यास राखीव असते. गोळा केलेल्या अन्नाची कोठारं राजाराणीच्या खोलीच्या सभोवती असतात. राणी वाळवीचा आकार इतरांपेक्षा मोठा असतो. राणी वाळवी अकरा-बारा सेंटिमीटर मोठी असते, अधिक अंडी साठवली असल्याने तिच्या पोटाचा भाग अधिक मोठा, फुगीर असतो. तिचा नर मात्र दोन सेंटिमीटर आकाराचा असतो. या दोघांचा रंग गडद तपकिरी असतो. केवळ प्रजोत्पादन नाही तर प्रेम म्हणून देखील हे दोघं आयुष्यभर मिलन करतात. राजाराणीच्या या प्रेमात खंड पडू नये म्हणून त्यांच्या दिमतीला इतर वाळव्या तैनात असतात. सैनिक वाळवी त्यांचे संरक्षण करतात, तर कामकरी वाळवी या सर्वांसाठी खाऊ आणून देतात. कामकरी वाळवीचा सुरुवातीचा पांढरा रंग प्रौढ होत जाताना पिवळा होतो. त्या प्रजोत्पादन करू शकत नाही. आकाराने तीन ते चार मिलिमीटर असलेल्या कामकरी वाळवीला डोळे नसतात, केवळ वासावर त्या अन्न शोधतात. अन्न गोळा करून आणणं, वारुळाचं बांधकाम आणि निगा राखणं अशी त्यांना ड्युटी असते. काही प्रजातीमध्ये कामकरी वाळवीच्या नर आणि मादीचे मिलन होत असतं. मात्र त्याचा फलनासाठी उपयोग होत नाही.
कामकरीपेक्षा सैनिक वाळवी आकारानं थोडी मोठी असते. तिचं डोकं चपटं आणि मोठं असतं. तोंडामध्ये नांग्या असतात, ज्याचा वापर ते प्रतिकार आणि हल्ला करण्यासाठी करतात. त्यांचे जबडे एवढे मोठे असतात की त्यांना स्वतःचं जेवण स्वतः खाता येत नाही. त्यांना भरवावं लागतं. त्यांच्यावर वारूळ, राजा राणी, अंडी आणि पिल्लं यांचं रक्षण करायची जबाबदारी असते. या सैनिक वाळवी वारूळ सोडून बाहेर पडत नाहीत, सीमेवर तैनात असतात. आलेल्या शत्रूला दंश करून त्याच्या शरीरात विषारी द्रव्ये सोडतात. कामकरी तसेच सैनिक वाळवी वारंवार कात टाकत असतात. फलित झालेल्या अंड्यामधून कामकरी, सैनिक तसेच राणी वाळवी जन्माला येते तर फलित न झालेल्या अंड्यामधून नर जन्माला येतात. राजा राणी एकमेकांशी आयुष्यभर एकनिष्ठ राहतात. ते त्यांच्या महालात अनेक दिवस बंदिस्त असतात, मात्र पावसाळा सुरू व्हायला लागला की ते बाहेर पडतात. त्यांच्या कक्षाचे दरवाजे कामकरी वाळव्यांनी उघडलेले असतात. वारुळाच्या बाहेर पडण्यासाठी देखील रस्ते तयार असतात, ज्यावर सैनिक वाळवी गस्त घालत असतात. या रस्त्यातून बाहेर पडून नर मादी मिलनउड्डाण करतात. यावेळी ते नवीन वसाहतीसाठी जागा शोधतात. जेव्हा ते जमिनीवर उतरतात तेव्हा त्यांचे पंख गळून गेलेले असतात. ते पुन्हा स्वतःसाठी एक कक्ष निवडतात आणि त्यात स्वतःला कोंडून घेतात. विष्टेचा वापर करून कक्षाचे दरवाजे लिपून घेतात. इथे त्यांचे पुन्हा मिलन होऊन अंडी घालण्याची प्रक्रिया सुरू होते. वाळवीमध्ये अंडी, अळी आणि प्रौढावस्था असे जीवनाचे तीन टप्पे असतात. एकदा प्रौढ झाल्यावर आयुष्यभर कामचं करायचं असल्यानं मानवाच्या बाळाप्रमाणे वाळवीचं बाळ देखील मोठं होण्याचा कंटाळा करतं आणि अनेक महिने किशोरअवस्थेत घालवतं. तिथं त्याला आयतं अन्न भरवलं जातं. मग काय खा प्या आणि लोळा मस्त! वाळवीला सहा पाय, दोन अँटेना आणि डोकं, छाती आणि पोट असे तीन भाग असतात. राजा राणीला दोन साधे आणि दोन संयुक्त डोळे असले तरी त्यांची नजर कमजोर असते. कामकरी आणि सैनिक वाळवी पूर्णतः दृष्टिहीन असते. इतर कीटकांप्रमाणे यांचे रक्ताभिसरण संस्था देखील शरीरभर पसरलेली असते. वारुळामध्ये खेळती हवा राहील याची काळजी त्यांनी घेतलेली असते. अंगावर असलेल्या अनेक छिद्रांमधून त्या श्वसन करतात. ज्या घरामध्ये वाळवी असेल तिथे मानवाला मात्र श्वसनाचा तसेच खोकल्याचा त्रास होऊ शकतो. कारण वाळवी कोणताही पदार्थ कुरतडून खात असताना अतिशय बारीक पूड करत असते, जी हवेमध्ये मिसळून आपल्या घशामध्ये जाते. यासोबतच बुरशीजन्य त्वचेचे आजार देखील वाळवी मानवाला देत असते..
या आजारांसोबतच वाळवी संपत्तीचं मोठं नुकसान करत असते. म्हणून मानव आजवर तिच्यावर मात करण्याचे एकेक जालीम उपाय शोधत आला आहे. वाळवी मारण्यासाठी मिथिल ब्रोमाइडाच्या धुराचा वापर केला जातो. इमारतीच्या वाश्यांना वाळवी लागल्यास लाकडाला एकेक फूट अंतरावर छिद्रं पाडून त्यांत सोडियम फ्लुओरोसिलिकेट, सोडियम फ्ल्युओराइड, कॅल्शियम आर्सेनट यासारखी रसायनं भरून छिद्रं बंद करतात. पायाभरणी करत असतानाच ही रसायनं जर पायामध्ये ओतली तर भविष्यामध्ये वाळवीचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. शेतात वाळवीचा प्रादुर्भाव झाला तर जवळचं वारूळ उकरून त्यात कीटकनाशक टाकलं जातं. वाळवीपासून मुक्तता मिळवण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे, नवनवीन कीटकनाशकं शोधली जात आहेत. विहीर खणण्यास वाळवीचं वारूळ असलेली जागा उपयुक्त असतं असं वराहमिहिरानं सांगितलं होतं. वाळवीसाठी असलेल्या वल्म या संस्कृत शब्दातून वल्मीक म्हणजे वारूळ हा शब्द तयार झाला आहे. वाल्याचा वाल्मीकी होणे ही कथा आपण नंतर तयार केली असावी, कारण तपस्येला बसलेल्या ऋषीच्या भोवती वारुळं तयार झाली होती म्हणून त्याला वाल्मिकी हे नाव पडल्याचे देखील कथा आहे. जगभरातील लोकगीतं आणि लोककथांमध्ये वाळवी डोकावून जात असते. अथक काम करण्याची वाळवीची निष्ठा आणि तिनं वारूळ बांधताना दाखवलेली कारागिरी तिला आफ्रिकन लोककथांमध्ये नायकाचं स्थान देते. “भई जब लाखो उदला वायरो वन जारण वाई लाखो उदल वाई” या लोकगीताप्रमाणे भारतातील अनेक आदिवासी वाळवीची पूजा करतात. वरील गीतात उदला म्हणजे वाळवी आहे. या गीतात म्हणलं आहे की सर्वप्रथम वाळवीची पूजा करावी, कारण या वाळवीमुळेच शंकराला वारूळ प्राप्त झालं आहे. यातील मातीतून शंकराने स्त्री आणि पुरुष घडवण्यास सुरुवात केली. अतिशय मऊ असलेली ही माती वापरून त्यानं मानवी आकाराच्या बाहुल्या केल्या आणि उन्हात सुकवत ठेवल्या. रात्रीच्या अंधारात इंद्राने या बाहुल्या पुन्हापुन्हा तोडल्या. मग शंकराने इंद्राला रंगेहाथ पकडून चांगली अद्दल घडवली वगैरे वगैरे.. नंतर शंकराने आपल्या जमातीचा आदीपुरुष आणि आदीमाता या मातीतून निर्माण केली असा कोरकू लोकांचा समज आहे. अर्थातच ही कथा प्रतीकात्मक असली तरी खूपच सुंदर आहे, मातेचं मातीशी नातं जोडणारी आहे. अजून एक कथा पाहू. ही मानवाच्या लबाडीची कथा आहे. एक शेठजी उडणाऱ्या पक्षाला म्हणतो, “तुझा एक पंख काढून दे आणि वाळवीचे दोन कीडे घे.” पक्षी खुश होतो. त्याला आयते कीडे मिळणार असतात. तो खुशी खुशी एक पंख देतो आणि कीडे खातो. थोड्या वेळानं पक्ष्याला पुन्हा भूक लागते. पुन्हा एक पंख देऊन तो दोन कीडे मिळवतो. या पक्षाचे वडील पाहतात की आपल्या मुलाचे पंख रोज कमी होत चालले आहेत. ते त्याला उपदेश करतात की तुझा हा मार्ग चुकीचा आहे. मात्र मेंदू हायजॅक झालेला हा तरुण पक्षी अजिबात ऐकत नाही. उलट आकाशात उडणाऱ्या पक्षांना तो बावळट समजू लागतो. सतत पंख काढून दिल्यामुळे काही दिवसांनी त्यानं आपली उडण्याची शक्ती गमावलेली असते. आता तो केवळ चालू शकत होता. एक दिवस अचानक त्याला एक वारुळ दिसतं. त्यामध्ये खूप साऱ्या वाळव्या असतात. तो पोटभरून वाळव्या खातो. अचानक त्याला शेठजी आणि आपल्या पंखांची आठवण होते. तो शेठजीकडे जातो आणि म्हणतो या साऱ्या वाळव्या घे आणि मला माझे पंख दे.. निर्दयपणे हसून शेठजी म्हणतो, ”या वाळव्यांचे मी काय करू. मी पिसे घेऊन वाळव्या विकतो, वाळव्या विकत घेत नाही!” सध्या धर्म आणि मंदिराची अशीच होलसेल विक्री सुरू आहे.. शेठजी केवळ या गोष्टी विकणार आहे, विकत घेणार नाही. आपले पंख गमावायचे की वेळीच शहाणं व्हायचं हे आता तरुण पिढीने स्वतः ठरवलं पाहिजे!! #richyabhau आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

मधमाशी : टू बी ऑर नॉट टू बी