कीटक उवाच:

कीटक उवाच:
रिच्यापुराणातील आठव्या अध्यायात भगवान विचारतात की आम्ही तुम्हा कीटकांपासून मुक्ती का मिळवू शकत नाही. भगवान उवाच: कथं वयं भवतः मुक्तिं कर्तुं न शक्नोमि? कीटक उवाच : अहं भवतः अपेक्षया श्रेष्ठः अस्मि। अहं पृथिव्याः एकमात्रः देवः अस्मि. अर्थात तुम्ही आमच्यापासून मुक्ती मिळवू शकत नाही, कारण आम्ही तुमच्यापेक्षा सरस आहोत. या पृथ्वीवर आम्हीच एकमात्र देव आहोत. “देवांना ही नाही कळला अंतपार ज्याचा” असा हा कीटकांचा चिवट प्रवर्ग. आणि त्यातही आपल्या केसांना चिकटून बसणारी उ हा प्रचंड चिवट असा कीटक!
“कोण नाही कोणचा आणि वरण भात लोणचा” हे जीवनातील अंतिम सत्य असेल तर उ मात्र त्याला अपवाद ठरते. आई वडील, बहिण भाऊ, जोडीदार, मुलं, मित्रमंडळी यापैकी कोणीही असो, व्यक्तीच्या सर्वच नात्यांमध्ये भविष्यात अहंकाराची दरी येऊ शकेल. अडचणीच्या वेळी ही सर्व मंडळी पाठ फिरवतील. मात्र उ हा असा साथी असतो, जो आयुष्यभर व्यक्तीची साथ देत राहतो. व्यक्तीचा आर्थिक स्तर कितीही ढासळला, तरी तिची साथ कायम असते. व्यक्तीने त्या उवेला मारायला काही उपाययोजना केली तरी त्याचीदेखील खुन्नस उ कधी धरत नाही. आपला सर्व अहंकार, आपली अस्मिता बाजूला ठेऊन उ सहजीवन जगत असते. व्यक्तीचा मृत्यू झाला तरच उ नवीन पार्टनर शोधते, बहुतांश वेळा त्या व्यक्तीसोबत मरते.. असे हे नाते जन्मांतरीचे!
शाळेत अजूनही उ उ उखळीचा असं शिकवलं जातं. मात्र किती विद्यार्थ्यांनी उखळ पाहिलेली असते? बहुतेक शिक्षकांनी देखील उखळ पाहिली असेल की नाही याची शंका आहे. मात्र आपली अंकलिपी उखळ आणि ऐरणी मधून बाहेर पडत नाही यातच शिक्षण व्यवस्थेची आयरनी दिसून येते. उ या अक्षरासाठी उ हाच ओळखीचा शब्द आहे की. एक चतुर्थांश विद्यार्थ्यांना उवांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. विद्यार्थीदशेतच उवांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. “डोक्याला डोकं भिडतं जिथं, उवांना नव घर मिळत तिथं” अशी जाहिरात माझ्या पिढीनं लहानपणी पाहिली आहे. जिथं दोन माणसं जात, धर्म, वंश, लिंग, वर्ण अथवा आर्थिक स्तर यांचा भेद न करता प्रेमाने एकत्र येतात, एकमेकाच्या डोक्याला डोकं भिडवतात, तिथं उवा देखील कोणताही भेदभाव न करता आपला प्रसार करून घेतात. उवांचं सर्वात जुनं, पंधरा कोटी वर्षापूर्वीचं, जीवाश्म सापडलं आहे. पेडिक्युलस कॉर्पोरीस ह्युमनस असं शास्त्रीय नाव असलेली उ मानवाची उत्क्रांती झाली तेव्हापासूनची साथी आहे. साधारण दोन ते चार मिलिमीटर आकार असलेल्या या उवांना पंख नसतात. म्हणजेच त्या उडून एका डोक्यातून दुसऱ्या डोक्यात जाऊ शकत नाही. उवा जरी संसर्गजन्य असल्या तरी लिखा मात्र केसांना चिकटून बसलेल्या असल्यानं त्यांचा संसर्ग दुसऱ्याला होत नाही. ऊवांचा बहुतांश प्रसार डोकं ते डोकं असा होत असला तरी दोन टक्के घटना अश्या असतात जिथं टॉवेल अथवा इतर वस्तूंच्या मार्फत उवांची लागण होते. तुम्ही केस विंचरून अथवा शोधून उवांना बाहेर केसाच्या बाहेर काढलं आणि त्यांना लगेच दुसरा आश्रयदाता मिळाला नाही तर त्या एक-दोन दिवसांमध्ये मरून जातात. कारण दर तीन तासानंतर त्यांना रक्त प्यायला हव असतं. डोक्यामध्ये उवा असल्या तरी देखील काही लोकांचं डोकं खाजवत नाही. काही लोकांच्या डोक्यातून पूर्ण उवा काढल्या तरी पुढील चौदा दिवस त्यांचा डोकं खाजवत राहतं. उवा अस्वच्छ केसांमध्येच होतात हे मात्र खरं नाही, कारण उवांना देखील अस्वच्छ केसांपेक्षा स्वच्छ केस जास्त आवडतात. एकट्या अमेरिकेत उवाबाधितांची एका वर्षातील संख्या १.२ कोटी एवढी असते. आशियायी देशात उवांचे प्रमाण त्यापेक्षा जास्त आहे तर आफ्रिकी देशात उवांचा प्रादुर्भाव सर्वात जास्त असतो. युरोपमध्ये उवांचा सर्वात जास्त प्रादुर्भाव इंग्लंडमध्ये आढळतो. तुमचे केस जेवढे काळेभोर, तेवढे तुम्हाला उवा होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून म्हणतो, जर तुमचे केस पिकले असतील तर उगाच डायफाय करत बसू नका. उवांना अवघं एक महिन्याचं आयुष्य लाभलेलं असतं. मीलनानंतर दोन दिवसात मादी अंडी घालते. एकाच मीलनानंतर उ मादी तिच्या हयातीमध्ये एकावेळी पाच आणि एका दिवशी दोन वेळा अशी रोज दहा अंडी घालते. साधारण एक उ मादी तिच्या आयुष्यात २०० अंडी घालते. या अंड्यांचा रंग पिवळसर पांढरा असतो. या अंड्यातून सात दिवसात छोट्या लिखा बाहेर पडतात. लिखा पारदर्शी रंगाच्या असतात. अनेक वेळा कात टाकत या लिखांचं रूपांतर उवेमध्ये होतं. उवेनं आता काळा रंग घेतलेला असतो. दोन आठवड्यामध्ये वयात आलेली मादी आता मीलनासाठी आणि अंडी घालण्यासाठी तयार असते.
उवेच्या शरीराचे डोकं वक्ष आणि पोट असे तीन भाग पडतात. डोक्यावर अँटीना, डोळे आणि रक्त पिण्यासाठी सोंड असते. उवेची सोंड तोंडात लपून बसलेली असते, केवळ रक्त पिताना ती बाहेर येते. तिला सहा पाय आणि खंडमय पोट असते. तिच्या पायावर नख्या असल्याने ती तुमच्या केसांना घट्ट पकडू शकते. तिची श्वसन आणि रक्ताभिसरण संस्था पूर्ण शरीरभर पसरलेली असते. शरीरावर असलेल्या अनेक लहान छिद्रातून उ श्वास घेते. तिला जर पाण्यात टाकले तर दोन तास ती श्वास रोखून जिवंत राहू शकते. तात्पर्य: तुम्ही जोरात शॉवर घेतला किंवा स्विमिंग टॅंकमध्ये एक तास पोहला तरी देखील उवा बाहेर पडत नाहीत. लिखाअवस्थेमध्ये त्यांची चेतासंस्था पूर्णतः विकसित झालेली नसते, मात्र हीच बाब त्यांचा बचाव करते. कारण तुम्ही उवा मारण्यासाठी वापरलेली रसायनं या लिखांच्या केसाला देखील धक्का लावू शकत नाही.
तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, कुणाला सांगू नका. “ओ पॉझिटिव्ह हा रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या डोक्यामध्ये जास्त उवा आढळतात.” अर्थात उवांना काही रक्तगट समजत नाही. या पृथ्वीतलावर ओ पॉझिटिव्ह रक्तगटाची जास्त माणसं असल्यामुळं शक्याशक्यतेच्या नियमाप्रमाणं उवाबाधितांमध्ये त्यांची संख्या जास्त असते. तुमचे केस जेवढे लांब, तेवढा तुमचा दुसऱ्यांच्या केसांशी संपर्क येण्याची शक्यता वाढते. ऊवांचं घाणेंद्रिय खूपच सक्षम असतं. टी ट्री, रोझमेरी, लॅव्हेंडर यासारखे वास उवांना अजिबात आवडत नाहीत मात्र उवांना पुदिन्याच्या वासाचा सर्वात जास्त तिटकारा आहे असं संशोधक सांगतात. केवळ डोक्यातीलच नाही तर शरीरातील इतर केसांमध्ये देखील उवा होऊ शकतात. अगदी डोळ्याच्या पापण्या देखील काही उवा आपल्या निवासासाठी वापरतात. उवांची दृष्टी डायक्रोमाटीक असते, म्हणजे तिला रंग समजत नाही, मात्र काळया पांढऱ्या रंगातील सर्व छटा समजतात. उवा शोधायचा प्रयत्न करत तुम्ही केस तपासत असता तेव्हा उवा देखील पटापट जागा बदलतात. त्यांना प्रकाश नको असतो. तुमच्या केसांच्या रंगानुसार तुमच्या डोक्यातील उवांच्या नवीन पिढ्या उत्क्रांत होतात आणि केसांना मिळता जुळता रंग धारण करतात जेणेकरून त्यांना सहज लपता येते. रॉबर्ट हुक याने १६६७ मध्ये लिहिलेल्या मायक्रोग्राफी या पुस्तकात उवांचा अभ्यास केलेला आढळतो. मात्र त्याआधी साहित्यामध्ये उवेचा उल्लेख इसवीसन पूर्वीच्या काळापासून आढळतो. ॲरिस्टॉटलपासून लुई पाश्चरपर्यंत सर्वांना उवांनी कामाला लावलं आहे. सबाथच्या दिवशी म्हणजे शनिवारी उवा मारण्याचा कार्यक्रम घरोघरी चालायचा. अनेक पिढीतील स्त्रिया एकमेकीच्या पुढं बसून “तांबुस निर्मल नखांवरी अन कृष्ण चांदण्या कुणी गोंदाव्या” याचा आनंद घेत असायच्या. उ जेव्हा चिरडली जाते, तेव्हा तिचा होणारा आवाज या मायमाऊलींना किती आनंद देत असेल ना! कधीकाळी उवा हेच या स्त्रियांच्या आनंदाचं निधान असावं! पहिल्या महायुद्धामध्ये मित्र देशांचे अनेक सैनिक उवा आणि त्यांच्यापासून येणाऱ्या आजारामुळे त्रस्त झाले होते. त्यावेळी जर्मन सैनिकांनी आपण उवांपासून कसे मुक्त राहिलो याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली असली तरी उवांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांना आपला दणका दाखवला. छळछावण्यांमध्ये ज्यू लोकांचे निर्घृण हत्याकांड करताना त्यांनी “डीलावूसिंग” म्हणजे “उवा निर्मूलन” हा शब्द वापरला होता, मात्र रशियावरील हल्ल्यामध्ये उवांनी त्यांना दाती तृण धरायला भाग पाडलं. सर्वे जन्तु रुटिना : । सर्वे जन्तु निराशया: ॥ सर्वे छिद्राणि पंचन्तु । मा कश्चित्‌ दु:ख-लॉग भरेत्‌ ॥ या मर्ढेकरांच्या कविताचा आशय कदाचित तेव्हा जगाला समजला असेल. इतिहासात उवांपासून सगळ्यात जास्त त्रास इजिप्तमध्ये झालेला आढळून येतो. इबर्स पॅपिरस नावाच्या इजिप्शियन वैद्याने इसवीसन पुर्व १५५० मध्ये उवांपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय सांगितला होता. तो म्हणतो उवा झालेल्या व्यक्तीने खजूर आणि पाणी तोंडात काही वेळ ठेवावे. नंतर ते पाणी डोक्यात लावावं. अर्थात असल्या उपायांना उवा का दाद देतील? इसवीसन पुर्व बाराव्या शतकात चीनमध्ये पारा आणि काही विषारी संयुगांचा वापर सुचवला होता. उवा निर्मूलनासाठी चीनमध्ये मागील दोन हजार वर्षांपासून सुरू झालेला पायरेथ्रम पावडरचा वापर एकविसाव्या शतकापर्यंत टिकला आहे. आपण केलेले सगळे उपचार वाया जात आहेत हे पाहून इजिप्शियन लोकांनी उवांपासून मुक्तता मिळवण्यासाठी संपूर्ण शरीरावरील केस पूर्णतः काढण्याचे निष्फळ प्रयत्न करून पाहिले. अनेक ममीमध्ये उवा आणि लिखा आढळलेल्या आहेत. इजिप्शियन साम्राज्याची शेवटची राणी क्लिओपात्रा, जिच्या धारदार नाकाला जरा कमी टोक असतं तर जगाचा इतिहास बदलला असता असं म्हणतात, तिच्या कबरीमध्ये उवा विंचरण्याची फणी ठेवली होती. ही फणी पूर्ण सोन्यापासून बनवलेली होती. इतर अनेक कबरीमध्ये देखील फण्या आढळून आली आहे. उवांपासून त्रस्त झालेल्या या स्त्रियांना तिच्या पारलौकिक जीवनात उवांपासून मुक्तता हवी असावी. मात्र या इजिप्शियन लोकांची वाट लावण्याचे आदेश डायरेक्ट देवाने दिले होते. ज्यू लोकांचा धर्मग्रंथ ओल्ड टेस्टमेंट अर्थात जुन्या करारामध्ये असा उल्लेख आढळतो की इजिप्शियन राजा फॅरो हा काही ज्यू लोकांनी मागितलेली इस्रायलची जमीन देऊ करत नव्हता. तेव्हा देवानं रागानं पूर्ण इजिप्तवर दहा वेळा महामारीचं संकट आणलं. देवानं सांगितलं की आरोन याने इजिप्तमधील धुळीवर काठी फिरवावी आणि त्या धुळीचं रूपांतर उवांमध्ये होईल, जी इजिप्शियन जनतेचा नायनाट करेल. आणि तसंच झालं. देव खूपच कनवाळू होता ना.. भारतीय संस्कृतीमध्ये देखील असे कोपिष्ट देव खूप आहेत. अपवाद फक्त विठ्ठलाचा.. संत जनाबाईच्या डोक्यातील उवा साक्षात पांडुरंगाने काढल्याचं कीर्तनकार सांगत असतात. उवा आणि संत साहित्य, लोककला यांचं घट्ट नातं आहे. संत एकनाथ महाराजांच्या वेडी या भारुडाचं सादरीकरण करताना वेडीचं सोंग घेतलेले कलाकार हमखास डोक्यातील उवा काढण्याचा अभिनय करताना दाखवतात. ते डोकं खराखरा खाजवतात, नंतर त्यातून उ काढून तिला नखावर चिरडतात आणि तिला चक्क खाण्याचा अभिनय करतात. प्रेक्षक हसले की वेडी म्हणते तुम्हाला पण खायच्या आहेत का.. आणि हात पुढे करते. या प्रसंगी हसूनहसून जाम मुरकुंडी वळते. “एक होती ऊ, तिला झाली टू. ती गेली खेळायला. तिला मिळाला पैसा. आई आई पैशाचं काय आणू ? भाजी. चिरू कशी? चराचरा. शिजवू कशी? रटारटा. खाऊ कशी? मटामटा. निजू कशी? डाव्या कुशी. आणि पादू कशी? ढम् दिशी.” वरवर निरर्थक वाटणाऱ्या या बडबडगीताने लहानपणी खूप हसवलं होतं. कारण पादने या क्रियेचं वर्णन चारचौघात आणि तेही शाळेत ऐकताना खूपच धमाल वाटायचं. आता शोधल्यावर समजलं की खुप वर्षांपूर्वी ताराबाई मोडक या शिक्षणतज्ज्ञांनी ही गोष्ट लिहिली होती. कदाचित आजच्या संस्कृतीरक्षक वातावरणात पादने ही क्रिया असांस्कृतिक वाटेल, कारण जे जे नैसर्गिक, ते ते असांस्कृतिक असं ठरवण्याचा रिवाज सुरू झाला आहे. रिवाज हा शब्द देखील असांस्कृतिक वाटत असेल तर त्यांनी इथं प्रथा, परंपरा हे शब्द वाचावेत. पुण्यातील नंदिनी जाधव या कार्यकर्त्या जटनिर्मूलनासाठी प्रसिद्ध आहेत. आजवर जवळपास तीनशे महिलांना त्यांनी जटमुक्त केलं आहे. केसांमध्ये अस्वच्छता वाढली की तिथं त्यांची गाठ तयार होते आणि आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात अशी गाठ आली की ती गाठ यलम्मा देवीने दिलेला शकुन आहे असं समजलं जातं. हे केस विंचारायचे तर नाहीतच, उलट या गाठीवर वडाचा चिक घालून पूजा केली जाते, ज्यामुळे गाठ मोठी होत जाऊन तिची मोठी जट तयार होते. या जटेत मग उवांचं साम्राज्य पसरते. नंदिनीताईंनी जट कापली अश्या काही प्रसंगी मी सोबत होतो. एका केसमध्ये उवांची संख्या एवढी मोठी होती की पूर्ण डोक्यात जखमा होत्या आणि त्यामधून उवांनी अंतर्गत रस्ते तयार केले होते. वारुळतून मुंग्या बाहेर पडाव्या तश्या उवा बाहेर पडत होत्या. माझ्या अंगावर काटा आला होता, मात्र नंदिनीताई शांतपणे जट कापत राहिल्या. विदर्भात असा गैरसमज आहे की गर्भवती बाईनं कुणाचं डोकं तपासलं तर त्या व्यक्तीच्या डोक्यातल्या उवा कधीच संपत नाही.. तसेच उवांबाबत आणखी एक अंधश्रद्धा ग्रामीण भागात आहे. उ पडकुन तिला माती वापरून जिवंत गाडायचं आणि कोणत्याही गर्भवती महिलेचे नाव घ्यायचं. त्या मातीचा लहान डोंगराप्रमाणे आकार करायचा. उ जिवंत असल्यानं ती मातीबाहेर येण्याचा प्रयत्न करणार. ती जर मातीच्या ढीगाऱ्याच्या वरच्या टोकावरून बाहेर आली की नाव घेतलेल्या गर्भवती महिलेला मुलगा होणार आणि उ जर बाजूने बाहेर पडली तर मुलगी होणार असा समज करून घ्यायचे. अर्थातच ही केवळ अंधश्रध्दा आहे, मुलगा होईल की मुलगी हे त्या उवेला समजणं शक्य नाही. आपला जीव वाचवण्यासाठी ती शक्य त्या मार्गाने बाहेर पडत असते. समाजात अंधश्रध्दा आणि बुवाबाजी का चालते यावर भाष्य करताना मंगेश पाडगावकर म्हणतात की “प्रत्येकास येथे हवा, कोणी तरी जबरी बुवा, जो काढील साऱ्या उवा, मनातील चिंतेच्या.” आपल्या उवा काढण्यासाठी मागे कोणी तरी लागते. मात्र आपल्या मानसिक दुबळेपणाचा फायदा घेऊन कोणी आपल्याला मानसिक गुलाम बनवत नाहीये ना, आपण कोण्या “भिऊ नकोस” सांगणाऱ्या, गल्लोगल्ली उगवणाऱ्या ब्रम्हांडनायकाच्या कच्छपी लागत नाहीये ना याचा विचार प्रत्येकाने करावा. मनातील चिंतेच्या उवा आपल्या आपण मारायला शिकले पाहिजे, आपले मन सक्षम केले पाहिजे. रिच्यापुराणातील शेवटच्या अध्यायात कीटक म्हणतो की तु तुझे मन बळकट कर, नाहीतर मी त्यात राहायला येईल. कीटक उवाच: मनः दृढं कुरु वा, अहं तत् गृह्णामि ॥

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

मधमाशी : टू बी ऑर नॉट टू बी