चावट भुंगा

चावट भुंगा
"भवरेने खिलाया फुल.. फुलको बेच रहा राजकुंवर" गाणं चुकलं का.. जाऊ द्या सध्या विकायचे दिवस सुरू आहेत. मात्र कवी आणि शाहिरांनी सर्वात जास्त प्रेम कोणत्या कीटकावर केलं असेल, तर तो म्हणजे भुंगा होय! कितीतरी लावणी, भावगीते, भक्तिगीतांमध्ये भुंग्याच्या गुंजारवाची दखल घेतली आहे. खरं तर याची भूणभूण डासापेक्षा किती तरी तीव्र असते, मात्र तरीही एखादी व्यक्ती प्रेमात असेल, त्यावेळेस तिला ही भुणभुण गोड गुणगुण वाटते, आणि त्यावर ती कविता लिहिते. अर्थात प्रेमात असताना व्यक्तीला आपल्या जोडीदाराचं बोलणं देखील गुणगुण वाटत असतं, मात्र लग्न झाल्यावर ती भूणभूण वाटायला लागते!! शृंगारकाव्यात भुंगा चावट म्हणून का बदनाम केला आहे काय माहित? कारण भुंगा अजिबात चावट नसतो. नर भुंगा खरं तर पोट भरायला या फुलापासून त्या फुलावर जात असतो. कामानिमित्त विविध व्यक्तींना भेट देणाऱ्या व्यक्तीला थोडीच आपण बदनाम करत असतो का? नाही ना.. म्हणजे भुंगा अजिबात चावट नाही. गंमत म्हणजे परागवेचनाचं काम मादीपेक्षा अधिक निगुतीनं नर करत असतो, नर भुंगा असेल तर फुलाची काळजी घेतली जाते. मादीवर जर पराग वेचायची वेळ आलीच तर ती फुलाची पार वाट लावून टाकते. स्वयंपाकाची सवय नसलेली मंडळी, जेव्हा क्वचित स्वयंपाक करायची वेळ येते तेव्हा, स्वयंपाक घरात राडा करून ठेवतात, तशी मादी भुंगा पराग वेचताना करते. नर आणि मादी दिसायला एकसारखेच असतात. मात्र नराच्या डोक्यावर पांढरा ठिपका असतो तर मादीचं डोकं पूर्ण काळं असतं. नराच्या शरीरावर पिवळी लव असते. मादीच्या छातीवर पिवळी तर इतर अवयवांवर काळी लव असते. नरभुंग्याशी मिलन झाल्यानंतर मादी भुंगा तिचं घर बनवायला घेते. ती हे घर कडक आणि शक्यतो मृत लाकडामध्ये बनवते. तिचे जबडे साधारण अर्धा इंच खोल छिद्र बनवून प्रवेशद्वार तयार करतात. तिथून आत बोगदे तयार केले जातात. हे बोगदे अतिशय सुबक गोलाकार असतात. त्यात परागकण साठवलेले असतात. प्राशन केलेला फुलांचा मकरंद घरात पुन्हा पोटातून बाहेर काढला जातो. हे मकरंद आणि परागकण यांना एकत्र करून बाळबाळंतिणीला अन्न तयार केलं जातं.
भुंगा चावट नसतो तसेच नर भुंगा तर चावत देखील नसतो, कारण त्याला मुळात डंखच नसतो. भुंग्यांच्या नर मादीमध्ये कामाची विभागणी जरा विचित्र पद्धतीने झाली आहे. डंख नसलेल्या नरावर घराचं संरक्षण करण्याची जबाबदारी असते, तर डंख असलेली मादी केवळ पिल्लांचं जनन आणि पोषण याची काळजी घेते. त्यामुळं तुम्हाला रस्त्यामध्ये कधी भुंगा दिसला तर घाबरू नका. तो भुंगा मादी असण्याची आणि त्यामुळे त्याला डंख असण्याची शक्यता फार कमी असते. तुमच्या घरात घरटं करण्यासाठी घुसलेल्या मादीपासून मात्र नक्की सावध रहा! हिवाळ्यामध्ये भुंगे जास्त तुम्हाला दिसणार नाहीत कारण नर भुंगे मेलेले असतात तर मादी भुंगे हायबर्नेट म्हणजे निद्रावस्थेमध्ये गेलेले असतात. हिवाळ्यात जन्माला आलेली पिल्लं आपल्या घरात तशीच बसून राहतात. वसंत ऋतू सुरू झाला की त्यांची गुणगुण सुरू होते. त्या अनुषंगाने त्यांच्यावर परागीभवनासाठी अवलंबून असलेली फळं आणि बिया यांचा हंगाम येत असतो. काही नर भुंगे माद्यांच्या भोवती गस्त घालून आपली मादी मिळवतात, तर काही भुंग्यांच्या डोक्यातून एक स्त्राव बाहेर टाकला जातो, ज्याच्या वासामुळं त्याचा अस्तित्वाची नोंद माद्यांकडून घेतली जाते. कीटक वर्गातील झायलोकोपिडी अर्थात काष्ठनिवासी कुलामध्ये भुंग्यांचा समावेश होतो. जगभरात भुंग्याच्या ५०० जाती असून त्यातील १८ जाती भारतात आढळतात. अंटार्टिका खंड सोडला तर भुंगे जगभर आढळतात. साडे तीन कोटी वर्षापूर्वीच्या भुंग्याचं जीवाश्म अमेरिकेत सापडलं आहे. वर म्हटल्याप्रमाणे नर भुंगा चावत नाही, कारण त्याला डंख नसतो. माद्या देखील विनाकारण चावत नाहीत. धोका जाणवला तर त्या आक्रमक बनतात आणि चावतात. चावून झाले तरी मादी तिचा डंख गमावत नाही. त्यांचा दंश सौम्य विषारी असतो, काही जणांना त्याची रिअँक्शन होऊ शकते. दंश झालेल्या जागेवर बर्फाने शेकले तर त्याचा परिणाम होतो. अर्थात तरीही वेदना कमी झाली नाही तर वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. भुंगे साधारण दोन सेंटिमीटर लांब असतात. सहा पाय आणि दोन पंखांच्या दोन जोड्या असलेल्या भुंग्याच्या शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग पडतात. त्यांच्या शरीरावर बारीक खळगे व डोक्यावर खंडमय अँटीना असतात. तोंडामध्ये जबडे आणि सोंड असते. नराला जबड्याच्या टोकावर दोन दात असतात, मादीला दोन दात जास्त असतात. जबड्याने लाकूड पोखरणे आणि जिभेने परागकण तसेच मकरंद गोळा करणे एवढंच भुंग्याना ठाऊक असतं. त्यांचे शरीर जेवढे मोठे असते, तेवढा त्यांना फायदा असतो कारण ते जमवलेले पदार्थ आपल्या शरीरावर गोळा करत असतात. मधमाशी किंवा भुंग्याचे पंख हे खरे तर उडण्यासाठी पुरेश्या लांबीचे नसतात, मात्र तरीही ते उडतात. पंख से कुछ नहीं होता; हौंसलों से ही उड़ान होती है याचे उदाहरण इथं आपल्याला मिळतं.
भुंग्यामध्ये मेंदू आणि शरीराचे इतर भाग जोडण्यासाठी वेंट्रल नर्व्ह कॉर्ड असते. रक्ताभिसरण तसेच श्वसन संस्थादेखील पूर्ण शरीरभर पसरलेली असते. त्यांच्या शरीरावर एक कवच असते ज्यामुळे भुंगा चिलखत घालून युद्धाला चाललेल्या सैनिकाप्रमाणे दिसतात. भुंग्यांना संयुक्त डोळे असतात, त्यामध्ये वेगवेगळी भिंगं असतात, त्यामुळे त्यांची दृष्टी अधिक सक्षम झालेली असते. अतिनील रंग पाहण्याची क्षमता भुंग्यांमध्ये असते. दृष्टीसोबतच स्पर्श, पंखांची फडफड तसेच रसायनांचा वापर करून भुंगे आपापसामध्ये संदेशवहन करत असतात. भुंगा हा “एकटा जीव सदाशिव” या प्रकारचा कीटक आहे. त्याला शक्यतो एकटं राहायला आवडतं. अर्थात त्याचं स्वतंत्र घर इतर भुंग्यांच्या घराजवळच असतं. आपलं घर, आपला संसार आणि आपली पिल्लं एवढंच त्याचं जग असतं. त्याची पिल्लं मोठी झाल्यावर स्वतंत्र राहतात. भुंग्यांच्या काही प्रजातीमध्ये माद्या त्यांच्या आई, मुली आणि बहिणीसोबत छोटा ग्रुप करून राहतात. अशा वेळी कामाची विभागणी केलेली असते. जी मादी अंडी घालणार आहे, तिच्यावर पिल्लांना भरवण्याची जबाबदारी देखील असते. तिचं आणि पिल्लांचं रक्षण करायची जबाबदारी बाकीच्या माद्या घेतात. तरुण माद्या अंडी घालण्याची जबाबदारी घेतात तर म्हाताऱ्या माद्या घर बनवणं, अन्नसाठा जमवून व्यवस्थित रचून ठेवणं यासारखी कामं करतात.
भुंगा लाकूड खातो ही एक अंधश्रध्दा आहे. भुंग्याला लाकूड खाणं आवडत नाही, तो केवळ लाकडात घर बनवत असतो. पोखरत असताना तो लाकडाच्या संरचनेचा फायदा घेऊन वेगवेगळे कक्ष बनवत असतो. भुंग्याचे घर एक फुटापर्यंत लांब असतं. लाकडाच्या आत पोखरून केलेल्या त्यांच्या घरात वेगवेगळे कप्पे केलेले असतात. घर बनवणे हे अतिशय श्रमाचे काम असते. त्यातही नर भुंगे काही घराचा उपभोग घ्यायला जास्त दिवस जिवंत राहत नाहीत, त्यामुळे घर बनवण्याची जबाबदारी मादीवर असते. मादीदेखील कधीकधी कंटाळा करते आणि नवीन घर बनवण्याऐवजी मेलेल्या भुंग्याचं घर ताब्यात घेण्यास प्राधान्य देते.
सर्व कीटकामध्ये भुंगाच्या अंड्यांचा आकार सर्वात मोठा असतो. मादी सहा ते आठ अंडी घालू शकते. प्रत्येक कक्षात एक अंडे घालून तो कक्ष पराग आणि इतर खाऊच्या साह्याने बंद केला जातो. जेव्हा अळी बाहेर येते, तेव्हा तिच्यासाठी खाऊ तयार असतो. अंडी, अळी, कोष आणि प्रौढ अश्या चार अवस्था भुंग्यांच्या आयुष्यात येतात. दहा दिवसात अंड्यामधून अळी बाहेर येते. पुन्हा वीस दिवस कोषावस्था पूर्ण करून प्रौढ अवस्था गाठल्यावर देखील दोन तीन आठवडे भुंगा घरातच राहतो. आपल्या भावंडांसोबत निवांत खेळत राहतो. मात्र नंतर आत्मनिर्भर बनतो आणि आकाशी झेप घेतो. भुंग्यांना इंग्रजीत कारपेंटर बी अर्थात सुतारमाशी असे नाव असले तरी त्यांना सुतार पक्ष्यापासून सांभाळून राहावे लागते. भुंगा आणि त्याची अळी स्वरूपातील पिल्ले हा सुतारपक्षांचा आवडता नाश्ता असतो.नर भुंगे साधारणतः एक वर्ष जगतात तर मादी दोन वर्षे जगू शकते. बहुतेक माद्यांना केवळ एकदाच अंडी घालायची संधी मिळते. काही माद्या दुसऱ्या हंगामापर्यंत जिवंत राहतात. वर सांगितल्याप्रमाणे माद्या कडक हिवाळ्यात निद्रावस्थेत जातात. उन्हाळा सुरू होईपर्यंत त्यांची पिल्ले तयार झालेली असतात. नर भुंगे मार्च एप्रिलमध्ये मिलन करतात मात्र वसंत ऋतू संपेपर्यंत नर मृत्युमुखी पडलेला असतो. भुंग्यामध्ये जोडीदाराची विवेकी निवड अतिशय रंजक पद्धतीने होते. आधी सर्व नर आणि मादी भुंगे एकत्र जमतात, त्यांचा नाच होतो आणि त्यातून ते आपला जोडीदार निवडतात. मिलनापूर्वी नर मादीची उडण्याची परीक्षा घेतो. त्यात पास झाली तरच तो तिच्यावर प्रेमाचा कटाक्ष टाकतो. म्हणून मिलनापुर्वी भुंग्यांमध्ये प्रीवेड फिरणं हा प्रकार सक्तीचा असतो. त्यांचं मिलन हवेत उडतानाच होतं. मिलन होत असताना मादी जर थकली आणि जमिनीवर उतरली तर नर लगेच बाजूला होतो. मादी पुन्हा उडण्याची वाट पाहत तो तिच्याभोवती घिरट्या घालत राहतो. काही वेळा नर खाली बसलेल्या मादीला पायांनी उचलून पुन्हा उडण्यास प्रेरणा देऊ करतो. मात्र तरीही मादी उडाली नाही तर नर त्या मादीला सोडून नवीन मादी शोधण्यास जातो. मादीला उचलण्यास मोठे, शक्तिशाली नर यशस्वी होतात, त्यामुळे त्यांच्या विश्वात मोठ्या नरांची चलती असते. आकाराने लहान असलेले नर मात्र त्यांच्याशी स्पर्धा करत नाहीत. ते घरांच्या जवळ फिरत राहून मादीच्या कृपाकटाक्षाची वाट पाहत असतात. नरांनी आपली सीमा आखलेली असते. त्या क्षेत्रात ते दोन आठवडे राहतात. आपल्या क्षेत्रात ते गस्तदेखील घालत असतात, दुसरा नर आपल्या हद्दीत आला तर त्याला हुसकून लावलं जातं. भुंगे दिवसा काम करतात तर रात्री आराम करतात. दिवसा देखील लहान लहान किटकॅट ब्रेक घेत असतात. मध्येच त्यांच्या घरात कोणी घुसखोरी करतो तेव्हा त्याला हाकलून लावण्यासारखी अनुत्पादक मात्र जीवनावश्यक कामं देखील त्याला करावी लागतात. शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता. एक नर भुंगा पकडून बेशुद्ध करून दुसऱ्या नर भुंग्याच्या हद्दीत नेऊन ठेवला. त्याच्या पायाला धागा बांधला होता. आपल्या हद्दीत दुसरा बेशुद्ध नर पाहून नर भुंग्यानं काहीच रिस्पॉन्स दिला नाही. त्याला वाटलं दुसरा भुंगा मेलेला असेल तर आपल्याला त्याची काही स्पर्धा नाही. मात्र थोड्या वेळाने दुसरा भुंगा शुद्धीत आला. त्यानं स्वतःला दुसऱ्याच्या हद्दीत असल्याचं पाहिलं आणि त्यानं क्षणात, धाग्यासकट उड्डाण केलं. दुसऱ्याच्या हद्दीच्या बाहेर गेल्यावरच त्याला सुरक्षित वाटलं. वनस्पतीच्या काही जातींचं परागीभवन केवळ भुंग्यांकडून होत असते. भुंग्यांचं तोंड लहान असल्यानं ते खोल नळीसारखा आकार असलेल्या फुलांच्या वाट्याला सहसा जात नाहीत. परागकण चोरत असताना काही वेळा भुंगा ते एवढ्या अलगद चोरतो की त्यामुळे परागीभवन होत नाही. त्यामुळे त्या वनस्पतीला फळं कमी येतात. अशा वेळी वनस्पतीदेखील युक्ती करून परागीभवन व्हायला भाग पाडतात. निसर्गाने प्रत्येकाची सोय केलेली असते. काही वनस्पतींमध्ये परागसिंचन होण्याची प्रक्रिया खूप अवघड असते. नेहमीच्या वारा अथवा माशीद्वारे होणारे परागीभवन इथे होत नसते, तिथे केवळ भुंगा आवश्यक असतो, जो फुलाला पायानं किंवा तोंडानं पकडून व्हायब्रेट होतो आणि त्यामुळे परागकण सुटे होऊन विखुरले जातात आणि परागीभवन होतं.
“भ्रमण करणारा भ्रमर” अशी भुंग्याच्या नावाची साधी उत्पत्ती आहे. हिंदीमध्ये भ्रमरगीत या काव्यप्रकाराची मोठी परंपरा आहे. गोकुळ सोडून मथुरेला आलेल्या कृष्णाला आपल्या गोपिकांची आठवण आलेली असताना कृष्ण आपला निरोप उध्दव या आपल्या मित्राकडे पाठवतो. मात्र गोपिका भुंग्याची उपमा देऊन कृष्णाची अवहेलना करतात. या वर्णनाला भ्रमरगीत असं नाव आहे. श्रीमद्भागवतासोबत सूरदास, नंददास, अयोध्या सिंह उपाध्याय, परमानंददास, मैथिलीशरण गुप्त आणि जगन्नाथदास रत्नाकर यांसारख्या कवींनी भ्रमरगीत या काव्यपरंपरेत महत्त्वाची भर टाकली आहे. सत्यनारायण कविरत्न यांनी या काव्यप्रकाराचा वापर करत देशभक्तीपर रचना देखील केल्या आहेत. चौदाव्या शतकात जन्मलेल्या विद्यापति ठाकूर या कवीच्या कीर्तीलता या संग्रहात भृंग भृंगी या पतीपत्नीचा संवाद दिला आहे. चौदावं शतक आहे म्हणजे अर्थातच बायको प्रश्न विचारणार आणि साऱ्या जगाचं ज्ञान असलेला तिचा नवरा उत्तर देणार! भृंगी विचारते, या जगात सर्वात भारी काय आहे..तेव्हा भृंग उत्तर देतो की सर्वात भारी आपण अश्या वीर पुरुषाला म्हणू शकतो, ज्याला युद्धभूमीमध्ये कीर्ती मिळवायची हाव असते, जो दान दिल्यावर दुसऱ्याच क्षणी विसरून जातो, दान देताना त्याचे प्रदर्शन करत नाही… इत्यादी इत्यादी. त्या काळात प्रचलित असलेल्या आदर्श मूल्यांबाबत भुंगा त्याच्या बायकोला सांगतो अशी मांडणी आहे. आपल्या देशाचं, भारताचं नाव ही देखील एका भुंग्याची देण आहे. कालिदासाच्या शाकुंतल या नाटकात शकुंतला आणि दुष्यंत यांच्या भेटीचं रंजक वर्णन आहे. शकुंतलेला एक भुंगा त्रास देत असतो. भुंगा काही केल्या पिच्छा सोडत नसल्यानं शकुंतला वैतागलेली असते, मदतीसाठी मैत्रिणीला हाका मारत असते. अशावेळी अगदी हिरोसारखी एन्ट्री घेऊन राजा दुष्यंत येतो आणि तिला त्या दुष्ट भुंग्यापासून वाचवतो. या दोघांचे प्रेम होते आणि त्यातून भरत राजाचा जन्म होतो.. त्याच भरतवंशाचं आज आपण नाव घेत आहोत आणि भारत हे नाव आपल्या देशाला मिळालं आहे. महाभारतात पुन्हा एकदा भुंगा कामगिरी करतो, जेव्हा कर्ण ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी परशुरामाकडे जातो. कर्ण उच्चवर्णीय नसल्याने त्याला द्रोणाचार्य संपूर्ण विद्या शिकवत नाहीत. द्रोणाचार्य शिकवत नाही तर डायरेक्ट त्याच्या गुरूकडून, परशुरामाकडूनच ब्रह्मास्त्र शिकावं असं कर्ण ठरवतो. मात्र परशुराम हा तर जातीच्या चिखलात अधिकच अडकलेला असतो, तो तर केवळ ब्राम्हण शिष्य घेत असतो. कर्ण ब्राम्हण असल्याची बतावणी करून त्याचे शिष्यत्व मिळवतो. एकदा गुरू कर्णाच्या मांडीवर झोपला असताना एक भुंगा त्याच्याजवळ येतो. तो हळूहळू कर्णाची मांडी पोखरतो. मात्र आपण पाय हलवला तर गुरुची झोप मोडेल म्हणून कर्ण वेदना सहन करतो. रक्ताचा ओघ वाहू लागतो, त्याने परशुरामाची झोपमोड होते. परशुराम सर्व प्रसंग पाहतो आणि म्हणतो “एवढी वेदना ब्राम्हण सहन करू शकणार नाही.” (स्वतःच्या जातीवर केवढा विश्वास!) तो कर्णाला शाप देतो की तुला ऐन युध्दात ब्रह्मास्त्र आठवणार नाही. जातीचा कीडा डोक्यात असलेल्या गुरूच्या झोपेसाठी कर्ण शापाचा धनी झाला.. अर्थात भुंगा तर केवळ निमित्तमात्र होता! अमेरिकेतील होपी जमातीमध्ये भुंगा हा देवदूत समजला जातो. आपल्याकडे आहेत अशा स्वर्गलोक, पाताळलोक सारख्या वेगवेगळ्या जगांमध्ये हा भुंगा संचार करत असतो. काही आफ्रिकन जमातीमध्ये भुंग्याची गुणगुण ही पृथ्वीच्या हृदयाची धडधड समजली जाते. इजिप्शियन संस्कृतीमध्ये भुंग्याला फॅरोह राजाच्या मुकुटामध्ये स्थान मिळालं आहे, कारण भुंगा हा समृद्धता आणि शक्तीचे प्रतीक मानला आहे. केशवृद्धीसाठी भृंगराज नावाच्या वनस्पतीचा वापर आयुर्वेदात सुचवला आहे. मात्र नावामध्ये भुंगा असला तरी त्या वनस्पतीचा भुंग्याशी काहीही संबंध नाही, याचं तेल वापरलं तर केस भुंग्यासारखे काळे होतात असं सांगितलं जातं. “रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा। सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥” या अभंगात संत ज्ञानेश्वर मनाला भुंग्याची उपमा देतात, एखादं अवखळ बाळ ज्याप्रमाणं एका जागी स्थिर बसत नाही, तसं आपल्या मनाचं असतं असं सांगताना माऊली म्हणतात की व्यक्तीनं चांगल्या गोष्टींचा ध्यास घेतला पाहिजे. संत तुकाराम “कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगितसे।।” या अभंगात म्हणतात की कमळाला आपल्या सुगंधाची जाणीव नसते, त्या सुगंधाचा आनंद भुंगा घेत असतो. तसं तुमच्या सद्गुणामुळे तुम्हाला नसला तरी समाजाला मोठा फायदा होत असतो. संत साहित्यात भुंग्याचा संचार असा अनेक ठिकाणी दिसून येतो. मराठीत आहे त्याचपद्धतीने हिंदीमध्ये देखील! “भइ मम कीट भृंग की नाई। जहँ तहँ मैं देखउँ दोउ भाई॥” या चौपाईमध्ये तुळशीदास म्हणतो की माझी अवस्था भुंग्याप्रमाने झाली आहे, मला सर्वत्र राम आणि लक्ष्मण दिसतात. (आजच्या मिडीयाला जसे सर्वत्र मोदी आणि शहा दिसतात) “जैसे भृंग कीट के पासा। कीट गहो भृंग शब्द की आशा।।” या दोह्यात संत कबीर म्हणतात की भुंग्याजवळ एखादा कीटक गेला तर त्याची सततची गुणगुण ऐकूनऐकून दुसरा कीटक देखील तसाच सुर काढू लागतो. ही गुणगुण कीटकाला काही काळ गोड वाटते, पण तोवर त्या कीटकाच्या मेंदूचा ताबा भुंगा मिळवतो. जसं दररोज टीव्ही चॅनेलवर विषारी पद्धतीनं धर्म द्वेष पसरवला जात असतो, तो आता सामान्य जनतेमध्ये देखील पसरत चालला आहे. गरज आहे ती या भुंग्यांचा डंख ओळखण्याची आणि यांची भुणभुण बंद करण्याची!!

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

मधमाशी : टू बी ऑर नॉट टू बी