डॉ. येल्लाप्रगडा सुब्बाराव : छोटा डॉक्टर बडा धमाका

डॉ. येल्लाप्रगडा सुब्बाराव : छोटा डॉक्टर बडा धमाका 



येल्लाप्रगडा सुब्बाराव हे नाव आपण कदाचित ऐकलं असेल. अर्थात ऐकलं असण्याची शक्यता फार कमी आहे. भारतीय शास्त्रज्ञ म्हणलं की काही मोजकी नावं आपल्या डोळ्यासमोर येतात, रामन, भाभा, एपीजे अब्दुल कलाम अशी काही लोकप्रिय नावं आपण ऐकलेली असतात, मात्र या नावांच्या यादीत येल्लाप्रगडा सुब्बाराव असं अवघड नाव कधीच नसतं. पण सुब्बाराव यांनी जे शोध लावले आहेत, ते तुम्ही समजून घेतले तर तुमच्या लक्षात येईल की हा खूप मोठा माणूस होता. फॉलिक ॲसिड तसेच किमोथेरपीमध्ये वापरण्यात येणारी औषधं यांवर सुब्बाराव यांचं अतिशय महत्वाचं संशोधन आहे. म्हणूनच जगप्रसिद्ध पत्रकार डोरॉन ऍन्ट्रीम हे ऑर्गोझी या अमेरिकन नियतकालिकामध्ये म्हणतात की, “तुम्ही येल्लाप्रगडा सुब्बाराव हे नाव ऐकलेलं असो किंवा नसो, हा माणूस या जगात येऊन गेला म्हणून आपण आज जिवंत आहोत आणि अधिक आयुष्य जगणार आहोत.”

सोरायसिस आणि सेझरी सिंड्रोम यासारख्या आजारांवर भारतातील त्वचारोगतज्ज्ञ मेथोट्रेक्झेट हे औषध सर्रास लिहून देतात. कारण हे औषध स्वस्त आहे आणि परिणामकारक देखील आहे. शिवाय या औषधाला अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने मंजुरी देखील दिली आहे. मात्र हे औषध रेकमेंड करताना या भारतीय त्वचारोगतज्ञांना हे देखील ठाऊक नसेल की हे औषध कुणी भारतीय संशोधकानं बनवले आहे. या औषधी फॉर्मुल्याचा रेणू तयार करणारे डॉ. येल्लाप्रगडा सुब्बाराव हे बायोकेमिस्ट्री, फार्माकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि न्यूट्रिशनल सायन्स यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बापमाणूस म्हणून गणले जातात. “जर्नल ऑफ बायोलॉजिकल केमिस्ट्री”मध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा लेख "द कलरिमेट्रिक डिटरमिनेशन ऑफ फॉस्फरस” हा सर्वात जास्त वाचल्या गेलेल्या लेखांपैकी एक आहे, मात्र बहुतांश भारतीयांनाच त्यांचं नाव आणि योगदान माहित नसतं. चला तर मग, आज त्यांचे जीवन जीवन समजून घेऊया. 

सुब्बारावचे आजोबा सुब्बाराजू हे गावाकडील गरिबीला कंटाळून पोट भरण्यासाठी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यामध्ये असलेल्या भीमावरम या लहान शहरामध्ये स्थलांतरित झाले होते. हे तेलुगू ब्राम्हण कुटुंब गरीब असलं तरी त्यांच्या घरात शिक्षणाचं महत्व होतं. सुब्बाराजूच्या दोन मुलांपैकी जगन्नाथन हा एकच जिवंत राहिला, जो सरकारी खात्यामध्ये कारकून म्हणून रुजू झाला. योग्य वयाचा झाल्यावर जगन्नाथनचं लग्न लावून देण्यात आलं, मात्र त्याची बायको अल्पायुषी ठरली. मग तिच्याच बहिणीसोबत, वेंकम्मासोबत जगन्नाथनचा पुनर्विवाह झाला. त्या काळात बालमृत्यूचे प्रमाण अधिक असल्यामुळे घरामध्ये अधिकाधिक मुले जन्म घालण्यावर भर दिला जायचा. त्याप्रमाणे या जोडप्याला झालेल्या सात मुलांपैकी आपला सुब्बाराव हा चौथा. त्याचा जन्म १२ जानेवारी १८९५ रोजी झाला. 

येल्लाप्रगडा या त्यांच्या कुलनावामध्ये एक वारसा होता. प्रगडा हा मंत्री या अर्थाचा तेलुगु शब्द आहे. एकोणिसाव्या शतकापर्यंत सुब्बाराव यांचे पूर्वज कुतुबशाही दरबारामध्ये महत्वाचे अधिकारी होते. गोदावरी नदीवरील मुक्तेश्वरमपासून तीन मैल पूर्वेस असलेल्या कोट्टुरू जगन्नादापुरम येथे ते महसूल लेखापाल म्हणून काम करत होते. येल्लाण्णा या मंत्र्याचे आम्ही वंशज आहोत हे सुचित करणारं येल्लाप्रगडा हे कुलनाम!! अर्थात मंत्री म्हणून मिळालेली जहागीर अनेक पिढ्यांमध्ये वाटली गेली आणि सुब्बाराव यांच्या पिढीपर्यंत अगदी कफल्लक होण्याची वेळ आली होती. मात्र खायला नसलं तर चालेल, शिक्षण घेतलं पाहिजे हे धोरण सुब्बाराजू यांनी राबवलं म्हणून किमान दोन वेळच्या भाताची सोय जगन्नाथन येल्लाप्रगडा आपल्या नोकरीतून करू शकले. मात्र आरोग्यविषयक तक्रारीमुळं त्यांना खूपच लवकर निवृत्ती स्वीकारावी लागली. 

सुब्बारावचं बालपण अतिशय हलाखीचं गेलं. खंगलेले वडील बेरीबेरी आजार होऊन अपंग झाले आणि त्यांची नोकरी गेली, एकामागून एक आघात पचवलेल्या वेंकम्माने खमकेपणा दाखवत संसार रेटला. मात्र या खमकेपणामधून आलेली आईची हुकूमशाही सुब्बारावला अस्वस्थ करायची. आई “शिवगामी” बनली असली तरी सुब्बाराव “बाहुबली” बनला नव्हता. बाकीच्या भावांनी तिची हुकूमशाही मान्य केली होती. मात्र बंडखोर सुब्बाराव या हुकूमशाहीला आव्हान देत असायचा. घरामध्ये त्याला जेलमध्ये असल्यासारखं वाटायचं आणि या जेलमधून कसं पडता येईल याचा तो प्लॅन करायचा. म्हणूनच तेरा वर्षाचा असताना आपल्या मामेभावासोबत, वेंकटरामय्यासोबत त्यानं घरातून पळ काढला आणि थेट काशी गाठण्याचा बेत केला.

सुब्बाने वेंकटरामय्याला सांगितलं, “वाराणसीमध्ये तीर्थयात्री लोकांना केळी विकून पोट भरूया, वाटल्यास तिथं एखादी शाळा काढूया, मात्र इथून जाऊया, तू शक्य तेवढे पैसे घे.” त्याप्रमाणे वेंकटरामय्याने वडिलांचे साठ रुपये ठस्स केले आणि दोघा भावांनी रात्रीच्या अंधारात घरातून कल्टी मारली. वेंकटरामय्या भेदरलेला होता, मात्र सुब्बाराव अगदी निश्चिंत होता. त्यांना निदादावोलू गाठायचं होतं, तिथून पुढं वाराणसीची ट्रेन असणार होती. अर्थात निदादावोलूला पोहोचेपर्यंत त्यांचे २४ रुपये प्रवासात खर्च झाले. आता उरलेल्या ३६ रुपये कसं जायचं हा प्रश्न होता, मात्र सुब्बाराव अशा किरकोळ कारणांनी कधी चिंतीत झाला नाही. आणि त्यानं काही करायची गरज देखील उरली नाही कारण निदादावोलू दोन किलोमीटर अंतरावर असतानाच घरच्यांनी या भावंडांना पकडलं, परत घरी आणलं आणि चांगलं बडवून काढलं. लवकरच वेंकम्मा तिचं सगळं कुटुंब घेऊन तिच्या विधवा बहिणीकडं, बालम्माच्या घरी, मोडेकुरु इथं राहायला गेली.

तिथल्या हिंदू हायस्कूलमध्ये सुब्बारावचं शालेय शिक्षण झालं. त्याचं शाळेमध्ये लक्ष लागत नव्हतं. त्यामुळं त्यानं मॅट्रिक परीक्षेमध्ये दोन वेळा गटांगळ्या खाल्ल्या. पहिल्यांदा जेव्हा तो नापास झाला, तेव्हा त्याला मोठ्या भावाकडं, पुरुषोत्तमकडं पाठवण्यात आलं होतं. पुरुषोत्तम हा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सक्रिय होता. बंगालच्या फाळणीविरोधातील आंदोलनात तो सहभागी झाला होता. त्यामुळं त्याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं होतं, त्यामुळं त्याला एम.ए. आणि एल.एल.बी. करण्यासाठी दूर अलाहाबादला जावं लागलं होतं. त्याच्याकडून सुब्बारावनं देशभक्तीचं व्रत घेतलं. जेव्हा दुसऱ्यांदा नापास झाला आणि चालत आईकडे आला, तेव्हा २५ मैल पायी चालल्यामुळे त्याच्या पायाला फोड आले होते. मात्र त्याची दयामाया न करता आईनं त्याला झापलं. ती म्हणाली की “तुझ्या बापामुळं मी कधी ताठ मानेनं फिरू नाही शकले, किमान तू तरी असं काहीतरी कर की मी समाजात ताठ मानेनं फिरू शकेल.” आईने पोटतिडकीने बोललेल्या या वाक्याची सुब्बारावला चावी बसली आणि मग काय, मेरा वचन ही शासन!! पुढच्या परीक्षेत बाहुबलीप्रमाणे आज्ञाधारक झालेला सुब्बाराव मॅट्रिक पास झाला!!  


पुढील शिक्षणामध्ये त्याचा मित्र आणि रूममेट असलेल्या बी. नारायणमूर्तीनं त्याच्या शिक्षणाचा आर्थिक भार उचलला. त्याची केवळ एकच अट होती की सुब्बारावनं नापास होता कामा नये. याकाळात सुब्बाराव चिलकमर्ती लक्ष्मीनरसिंहम या कवीच्या संपर्कात आला, त्यांच्यासोबत सुब्बारावने “अंधश्रद्धा आणि कर्मकांड नसलेला हिंदू धर्म कसा असेल” यावर चर्चा केल्या. याच काळात तो रामकृष्ण मिशनकडं वळाला. तिथं त्यानं वेगवेगळे धर्म, पंथ यांचा अभ्यास केला तसेच प्राचीन खगोलशास्त्र समजून घेतलं. या सर्व अभ्यासामुळं तरुण सुब्बारावच्या मनात तेव्हा अनेक प्रकारच्या विचारांचं काहूर माजत होतं. आपलं जीवन कशासाठी आहे हे त्याला समजत नव्हतं. त्याला शंकराचार्यांचा माया सिद्धांत निरर्थक वाटत असला तरी संन्याशांचं एकाकी जीवन छान वाटू लागलं. मात्र मिशनचे लोक म्हणाले की, “तू तुझ्या आईची लिखित परवानगी आण, तरच तुला इथं कायमच राहता येईल.” आई अशी परवानगी देणं शक्यच नव्हतं. मग त्यानं पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि गणित या विषयात डिस्टिंक्शन मिळवत इंटरमीडिएट परीक्षा पास केली.

रामकृष्ण मिशनमधून त्याला सांगण्यात आलं होतं की, “तू जर डॉक्टर झालास, तर तुला वैद्यकीय सेवा देण्यासाठी मिशनच्या कामात सहभागी होता येईल.” त्याप्रमाणं १९१५ मध्ये त्यानं मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारा प्रचंड पैसा कुठून आणायचा हा प्रश्न होताच. मात्र इथं त्याला जात, गोत्र या बाबी उपयोगी पडल्या. ब्राह्मण जातीतील डॉक्टर होणारा तरुण ही गोष्ट त्याच्यासाठी फायद्याची होती. त्याच्यासाठी एक श्रीमंत घरातील मुलीचं स्थळ सांगून आलं. सुब्बाराव लग्न करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हताच. मात्र नियोजित सासरे, कस्तुरी सूर्यप्रकाश राव म्हणाले की, “तुझ्या शिक्षणासाठी आम्ही काही कमी पडू देणार नाही.” रेल्वेस्टेशनवर निरोप देताना त्यांनी सुब्बारावच्या हातात १२० रुपये दिले देखील. सुब्बारावनं आपली अट सांगितली की शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय मी सहजीवन सुरू करणार नाही. ही अट सहज मान्य झाली आणि सहा महिन्यांमध्येच शेषगिरीसोबत त्याचं लग्न होईल असं ठरलं. 

मात्र चार महिन्यांमध्येच सुब्बारावला गंभीर आजाराला सामोरं जावं लागलं. त्याला ट्रॉपिकल स्प्रू अर्थात अतिसारानं एवढं पोखरलं की त्याचं वजन अवघं ४१ किलो उरलं. अ‍ॅलोपॅथी उपचारांनी त्याला काहीच फायदा झाला नाही. आयुर्वेद मात्र त्याच्यासाठी जीव वाचवणारा ठरले. वैद्य डॉ. अचंटा लक्ष्मीपती यांनी केलेल्या भृंगराज वनस्पतीच्या ताज्या रसांच्या उपचारानं सुब्बारावची तब्येत सुधारू लागली. काही दिवसातच त्याचं वजन ६३ किलोपर्यंत वाढलं. मृत्यूचा धोका टळला. मात्र त्याचे दोन भाऊ पुरुषोत्तम आणि कृष्णमूर्ती हे अतिसारानं मृत्यू पावले. भावांचे मृतदेह पाहत असताना त्याच्या मनामध्ये विचार आला की जीवघेणा आजार कधी बरा होणार नाही का? आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी यांचा संगम करता येईल का? आणि वीस वर्षानंतर, १९४५ मध्ये सुब्बारावनंच फॉलिक अ‍ॅसिडच्या रूपानं अतिसारावर उपाय शोधला. त्याला बरी करणारी भृंगराज वनस्पती ही फॉलिक ऍसिडचा उत्तम स्रोत असते. आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी यांचा संगम सुब्बारावनं केला. 

आपण खूप पुढं गेलो का? परत मागं येऊ. वैद्यकीय शिक्षण सुरू असताना सुब्बारावनं गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीच्या आंदोलनामध्ये भाग घेतला. तो कॉलेजला जाताना खादीचे कपडे घालायचा. एका अर्थानं हा विद्रोह होता,ज्याचा फटका सुब्बारावला बसला आणि तो MBBS परीक्षेत शस्त्रक्रिया विषयात नापास झाला. ब्रॅडफील्ड या सर्जरीच्या प्राध्यापकाला असं वाटायचं की हा खादीचे कपडे घालून आपल्याला खिजवतो आहे. त्यामुळं लेखी परीक्षेमध्ये चांगले गुण असतानाही त्याला सर्जरीमध्ये नापास करण्यात आलं. त्याला MBBS नाही, तर LMS म्हणजे लायसेंटियट ऑफ मेडिसिन अँड सर्जरी ही पदवी मिळाली. सोप्या भाषेत सांगायचं तर तो “छोटा डॉक्टर” झाला होता, जो मोठी ऑपरेशन करू शकणार नव्हता. छोटी ऑपरेशन्स आणि औषधोपचार करण्याची त्याला परवानगी होती, मात्र शासकीय वैद्यकीय सेवेत त्याला संधी मिळणार नव्हती. 

सुब्बारावने लक्ष्मीपती यांच्याच आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शरीररचना आणि शरीरक्रिया विभागात व्याख्याता म्हणून नोकरी स्वीकारली. इथे त्याला खूप काही शिकायला मिळालं आणि जे तो शिकला त्याला त्याने ग्रंथबद्ध केलं. यादरम्यान त्याची भेट जॉन केंड्रिक्स या तरुण अमेरिकन डॉक्टरशी झाली. केंड्रिक्स रॉकफेलर शिष्यवृत्ती मिळवून तो शिकला होता. त्यानं सुब्बारावला सांगितलं की मद्रास मेडिकल कॉलेजची त्याची पदवी अमेरिकेतील वैद्यकीय संस्थांमध्ये मान्य होईल. त्यामुळं तुला अमेरिकेमध्ये संशोधन करता येईल. सुब्बारावला अतिसारावर संशोधन करायचं होतं. कस्तुरी सूर्यप्रकाश राव यांनी त्याला बोस्टनला जाण्यासाठी आर्थिक मदत केली. काकीनाडातील मल्लादी सत्यलिंगम नायकर चॅरिटीजमधून देखील थोडी आर्थिक मदत मिळणार होती. गर्भवती असलेल्या पत्नीनं, शेषगिरीनं मनाविरुद्ध का होईना, सुब्बारावला परदेशात पुढील शिक्षणासाठी जाण्याची परवानगी दिली. सुब्बाराव ऑक्टोबर १९२३ मध्ये बोस्टनला पोहोचला.

वसाहतवादी इंग्लंडपेक्षा सुब्बारावला व्यक्तीस्वातंत्र्यवादी अमेरिकेचं आकर्षण होतं. मात्र त्याचा हा गैरसमज इथं लवकरच गळून पडला. इथं त्याला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. भारतामध्ये ब्राम्हण म्हणून त्याला नाहक उच्च समजलं गेलं होतं आणि इथं त्याच्या त्वचेचा रंग त्याला दुय्यम नागरिक ठरवत होता. भारतीय लोकांसाठी नियम एवढे कडक होते की वाहतुकीचा एखादा छोटासा नियम मोडला तरीदेखील त्याला पुन्हा भारतात पाठवलं असतं. याशिवाय इथं महागाई देखील खूप होती. त्यामुळं सोबत आणलेली रक्कम हा हा म्हणता संपून गेली. त्याची पदवी अमेरिकेमध्ये चालली नाही, त्यामुळं पोट भरण्यासाठी या छोट्या डॉक्टरनं हॉस्पिटलमध्ये वार्डबॉयचं काम स्वीकारलं. रात्री तीन तास काम करायचं आणि दिवसा हार्वर्ड स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन कॉलेजमध्ये जाऊन आवश्यक असलेला डिप्लोमा मिळवण्यासाठी शिकायचं. दूध, ब्रेड किंवा कधी कधी तर केवळ बीन्स खाऊन पोटाचं खळगं भरायचं. 

मात्र सुब्बारावची ही मेहनत डॉ. स्ट्रॉंग या त्याच्या शिक्षकांच्या लक्षात आली आणि त्यांनी त्याला सर्व प्रकारची मदत केली. त्वचारोग आणि स्वच्छता हे विषय सुब्बारावनं मद्रासमध्ये शिकले असल्यामुळं या विषयात त्याला सूट दिली, आणि परजीवीशास्त्रात विशेष लक्ष घालण्यासाठी प्रोत्साहन दिलं. परिणामी केवळ आठ महिन्यांमध्ये, जून १९२४ मध्ये सुब्बारावला डिप्लोमा मिळाला. मात्र तत्पूर्वी, एप्रिल १९२४ मध्ये भारतातून बातमी आली की सुब्बाराव बाप झाला आहे. सुब्बारावनं कळवलं की “मुलाचा जन्म हा देवाची देणगी नसून स्त्री-पुरुषांच्या नैसर्गिक इच्छांमधून होणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी येऊ शकत नाही, बाळाचं नाव तुम्हाला जे योग्य वाटेल ते ठेवा.” हे बाळ अल्पायुषी ठरलं, डिसेंबरमध्ये हे बाळ वारल्याची बातमी समजली तेव्हादेखील सुब्बाराव यांनी अगदी कोरडेपणानं कळवलं की, “बाळाच्या रक्ताचा नमुना जर मद्रासजवळील किंग्स इन्स्टिट्यूट, गिंडी इथल्या संशोधकांना दिला असता, तर झालेल्या संशोधनांमधून भविष्यातील अनेक बाळं वाचली असती.”

असं नव्हे की सुब्बाराव यांना अजिबात ममता नव्हती. त्यांच्या मित्रांच्या बाळांचं कोडकौतुक त्यांनी केलं होतं. मात्र त्यावेळी त्यांच्यावर संशोधनाचा मोठा ताण होता. त्यातून हा कोरडेपणा आला असावा. डिप्लोमा मिळवल्यानंतर ते हार्वर्डमध्ये कनिष्ठ प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते, त्यामुळे आर्थिक चणचण कमी झाली असली तरी अध्यापन आणि संशोधन अशी दुहेरी जबाबदारी असल्यामुळे दिवसभरातील वेळापत्रक खूपच व्यग्र होते. याकाळात ते अर्नेस्ट ई. टायझर या शास्त्रज्ञासोबत इंटामोएबा कोली या निरुपद्रवी परजीवीवर संशोधन करत होते. याशिवाय सायरस फिस्के या शास्त्रज्ञसोबत शरीरातील फॉस्फरस मोजण्याची पद्धत विकसित करत होते, ज्यामध्ये त्यांना लवकरच यश आलं आणि फिस्के–सुब्बाराव पद्धतीला मान्यता मिळाली. ज्यामुळे त्यांना पीएचडी पदवी देखील मिळाली. 


डॉ. सुब्बाराव यांना नेहमी आपल्यापेक्षा सहकाऱ्यांना श्रेय देताना आनंद वाटायचा. आपल्याला कोणी श्रेय दिलं नाही तरी भविष्यात सत्य समोर येईलच असं त्यांना वाटायचं. अर्थातच तसं झालं नाही आणि त्यामुळं त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यांचा सहकारी सायरस फिस्के यानं मत्सरामुळं सुब्बाराव यांच्या काही महत्त्वाच्या कामांना दडपून टाकलं, नष्ट केलं, त्यामुळं सुब्बाराव यांनी वेगळे केलेले काही न्यूक्लियोटाइड्स नंतर इतर शास्त्रज्ञांना पुन्हा शोधावे लागले. मात्र तरीही फिस्केविषयी सुब्बाराव यांनी राग बाळगला नाही.‌ फिस्केसोबत त्यांनी स्नायूंच्या कार्यात फॉस्फोक्रिएटीन आणि ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट या घटकांची भूमिका शोधून काढली होती, ज्याचं पुर्ण श्रेय फिस्केनं घेतलं. त्यावर सुब्बाराव म्हणतात की “मी एक डॉक्टर आहे आणि फिस्के हा रसायनशास्त्रज्ञ, त्यामुळं आम्ही दोघांनी जरी यामध्ये मेहनत घेतली असली तरी या शोधाचे श्रेय त्याला मिळालं पाहिजे.” श्रेय मिळाल्यामुळं फिस्केला हार्वर्डमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि सुब्बाराव यांना डावलण्यात आलं. 

आपल्या फकीरानं याचंही मनाला लावून घेतलं नाही. तसंही शिकवण्यापेक्षा संशोधनामध्ये त्यांना जास्त रस होता. कारण वंशवादी अमेरिकन विद्यार्थी तक्रार करायची की, “सुब्बाराव यांचे उच्चार इंग्लिश नाहीतर भारतीय भाषेप्रमाणं वाटतात.” म्हणून त्यांनी नोकरीची संधी इतरत्र शोधली.‌ ‌‌लेडर्ले, मर्क कंपन्यात त्यांच्यासाठी पायघड्या घालून तयार होत्या.‌ लेडर्ले लॅबमध्ये जेव्हा त्यांना वार्षिक १५००० डॉलर्सची नोकरी ऑफर करण्यात आली, तेव्हा त्यांनी अट घातली होती की, “मला यातील निम्मा पगार द्या आणि निम्म्या पैशाची एक स्वतंत्र सुसज्ज इमारत पर्ल नदीच्या काठी उभारा, ज्यामध्ये मला आणि इतरांना संशोधन करता येईल.” लेडर्ले लॅबोरेटरीजमध्ये “संशोधन संचालक” या पदावर ते काम करू लागले. ट्रॉपिकल स्प्रू या आजारावर उपाय शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच होता, दोन दशकांनंतर त्यांना आपल्या भावांच्या मारेकऱ्यावर मात करण्यात यश मिळालं!!

ट्रॉपिकल स्प्रू आणि पर्निशस ॲनिमिया हे दोन वेगळे आजार आहेत हे सुब्बाराव यांच्या लक्षात आलं. सूक्ष्मजंतूंच्या किण्वनातून त्यांनी फॉलिक ॲसिड तयार केलं जे ॲनिमियावर वापरण्यात आलं. लेडर्ले लॅबमध्ये सुब्बाराव यांनी फॉलिक ॲसिड म्हणजेच व्हिटॅमिन B9 तयार करण्याची पद्धत विकसित केली. गर्भावस्थेत फॉलिक ॲसिड दिल्यास न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स टाळता येतात, बाळाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होते हे देखील त्यांनी शोधून काढलं. सुब्बाराव यांच्या संशोधनात दिसलं की किण्वनातून मिळालेल्या फॉलिक ॲसिडमुळे कर्करोग पेशींची वाढ थांबते, पण यकृतातून मिळालेल्या फॉलिक ॲसिडमुळे या पेशींची वाढ होते. या फॉलिक ॲसिडचा मार्ग अडवला, तर कर्करोगाच्या पेशी मरतील ही कल्पना म्हणजे केमोथेरपीचं मूळ तत्त्व आहे.

किण्वनातून टेरॉप्टरिन हा घटक मिळतो, जो ल्युकेमियावर परिणामकारक आहे. त्यांनी उंदरावर हा प्रयोग पाहिला, तेव्हा बाधित पेशी ४० टक्के नष्ट झाल्या. प्रसिद्ध बेसबॉलपटू बेबी रूथ याला झालेल्या कर्करोगावर टेरॉप्टरिन वापरलं गेलं, ज्यामुळं त्याच आयुष्य काही काळ वाढलं होतं. टेरॉप्टरिन अल्प प्रमाणात परिणामकारक ठरत होते. सुब्बाराव यांची टीम अधिक परिणामकारक औषध शोधत होती. यामध्ये त्यांना ॲमिनॉप्टेरिन हे औषध सापडलं, पण त्याचे साईड इफेक्ट्स भयंकर होते. ॲमिनॉप्टेरिन आणि टेरॉप्टरिन ही औषधे कर्करोगाच्या पेशींशी लढायची, मात्र ती शरीरातील निरोगी पेशींनाही हानी पोहोचवत होती. दीर्घ अभ्यासानंतर रुग्णांमध्ये आजार पुन्हा परत येत असल्याचं दिसलं. त्यामुळं सुब्बाराव यांनी आपल्या टीमला कमी दुष्परिणाम असलेले औषध तयार करण्यासाठी पिटाळलं . 

अखेरीस डॉ. सिडनी फार्बर यांच्यासोबत त्यांनी मेथोट्रेक्सेट हे एक महत्त्वाचं औषध तयार केलं, जे कर्करोगासाठी वापरल्या गेलेल्या सुरुवातीच्या केमोथेरपी औषधांपैकी एक आहे. मेथोट्रेक्सेट औषध ल्युकेमियावर प्रभावी होतंच, याशिवाय ते संधिवात आणि सोरायसिस या त्वचारोगावर देखील परिणामकारक ठरलं आहे. सोरायसिसवर मेथोट्रेक्सेटचा वापर अनेक दशकांपासून सुरू आहे. मात्र संधिवातावर हे औषध वापरण्यासाठी डॉक्टर घाबरत होते. मात्र नव्वदीच्या दशकामध्ये वाइनब्लॅट नावाच्या शास्त्रज्ञानं मेथोट्रेक्सेटची संधिवातावरील गुणकारीता सिद्ध केली. संधिवात हा ऑटोइम्यून प्रकारचा आजार असतो, ज्यामध्ये आपल्याच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच सांध्यांवर हल्ला करते. मेथोट्रेक्सेट हे औषध रोगप्रतिकारक प्रणालीची अति सक्रियता कमी करतं. त्यामुळे सूज आणि वेदना कमी होतात. म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करून आपल्याला संधिवातापासून वाचता येऊ शकतं मात्र त्यामध्ये बाकीचे आजार जडण्याचा धोका असतो.‌


सुब्बाराव यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानविरुद्ध लढायला चाललेल्या अमेरिकन सैनिकांसाठी डायएथिलकार्बामाझीन हे कृमिनाशक औषध देखील विकसित केलं, जे जागतिक आरोग्य संघटनेनं फिलेरियासिस अर्थात हत्तीरोगाच्या उपचारासाठी सुचवलं आहे. महायुद्धामध्ये अमेरिकन सैनिकांनी ठिकठिकाणची माती आणली होती, या मातीतील सूक्ष्मजीवांतून हे औषध तयार झालं. याशिवाय पॉलीमिक्सिन नावाचं अतिशय तीव्र अँटिबायोटिक लेडर्ले लॅबमध्ये तयार झालं. सुब्बाराव यांनी व्हिटॅमिन B3 अर्थात नायसिनचा पेलाग्रा रोगावर होणारा उपयोग तसेच व्हिटॅमिन B5 अर्थात पँटोथेनिक ॲसिड आणि बायोटिन यांचाही शोध लावण्यात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. सुब्बाराव यांच्या मार्गदर्शनाखाली बेंजामिन डग्गर यांनी १९४५ मध्ये क्लोर्टेट्रासायक्लिन उर्फ ऑरिओमायसिन हे टेट्रासायक्लिन प्रवर्गातील प्रतिजैविक शोधलं. हा त्यांचा सर्वात शेवटचा महत्त्वाचा शोध म्हणावा लागेल! 

मुलाखती देणे, व्याख्यानांचे दौरे या गोष्टी सुब्बाराव यांनी कटाक्षानं टाळल्या. ते म्हणायचे की, “आयुष्य लहान आहे आणि खूप कामं करायची आहेत.” त्यांचे हे म्हणणं अगदी योग्य ठरलं. कारण त्यांना अवघे ५३ वर्षांचे आयुष्य लाभलं. मात्र या काळात त्यांनी जीवरसायनशास्त्रामध्ये जे योगदान दिलं आहे, त्याला तोड नाही. ते दिवसातील बहुतांश वेळ प्रयोगशाळेत काम करत असत. त्यामुळं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आरोग्यावर परिणाम झाला. त्यांचा लठ्ठपणा खूपच वाढला होता. ८ ऑगस्ट १९४८ रोजी न्यूयॉर्कमध्येच डॉ. सुब्बाराव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या दिवशी त्यांची एक परिषद होती, मात्र परिषदेस हजर झाले नाही म्हणून त्यांची चौकशी सुरू झाली.‌ तेव्हा ते बेडरूममध्ये, झोपण्याच्या कपड्यांमध्ये पडलेले आढळले. रात्री वर्तमानपत्र वाचल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी करून, चष्मादेखील व्यवस्थित ठेवून, दिवा बंद करून ते शांतपणे झोपले होते आणि झोपेमध्ये शांतपणे आणि एकाकी असताना त्यांचा मृत्यू झाला. 

रामकृष्ण मिशनमध्ये त्यांना जसं एकाकी जीवन हवं होतं, तसं ते अमेरिकेमध्ये जगलं. कामाच्या पुढे त्यांना कोणत्याच गोष्टीचं महत्त्व वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबाला कधीच वेळ दिला नाही. किंबहुना त्यांच्या टीममध्ये असलेल्या एका शास्त्रज्ञाने जेव्हा हनिमूनसाठी सुट्टी मागितली तेव्हा त्यांनी ती नाकारली होती. थोड्या वेळानंतर त्यांना स्वतःची चूक समजली आणि सात दिवसाची सुट्टी मंजूर केली.‌ त्यांनी पत्नीला कधीही अमेरिकेमध्ये नेलं नाही. जेव्हा १९४१ मध्ये पत्नीनं तिकडं घेऊन जाण्याचा खूप आग्रह केला, तेव्हा त्यांनी खोटं सांगून टाकलं की “इकडं माझं दुसरं लग्न झालं आहे. मी तुला सोडलं आहे.” पुढील सात वर्ष शेषगिरी विनाकारण परितक्त्याच जीवन जगली. जेव्हा सुब्बाराव यांचा मृत्यू झाला, तेव्हा समजलं की त्यांनी आपली सर्व संपत्ती वेंकमा आणि शेषगिरी यांच्या नावावर केली आहे. अर्थातच त्यांनी दुसरं लग्न केलं नव्हतं. पहिल्या बायकोलाच ते वेळ आणि न्याय देऊ शकले नव्हते, मग दुसरं लग्न कशाला करतील?   

वैयक्तिक सुखाचा त्याग करत, एकामागून एक शोध लावले असले तरीदेखील अमेरिकेनं सुब्बाराव यांना नागरिकत्व दिलं नाही. कॉकेशियन वंशाचे किंवा चिनी वंशाचे लोक तिथं सहज नागरिकत्व मिळवू शकत होते. मात्र भारतीय वंशाच्या लोकांना त्यासाठी संघर्ष करावा लागत होता. किंबहुना सुब्बाराव यांना नेहमीच आपली ओळख सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं सोबत ठेवावी लागत असत. घराचा पत्ता बदलला तरी देखील शासनाला कळवणं त्यांना बंधनकारक होतं. त्यांच्याकडं कायम संशयाच्या भिंगातून पाहिलं गेलं. अशा अनेक पातळींवरील विषमतेचा सामना केला तरीदेखील त्यांचं संशोधनातील लक्ष कमी झालं नाही. ते ना भारतीय होते, ना अमेरिकन.. ते या विश्वाचे नागरिक होते. त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी अनेकवेळा आग्रह झाला, त्यावर ते म्हणायचे की, “मी बाप्तिस्मा घेण्याची काय गरज आहे? मी ज्या पद्धतीने जगतो, ते नक्कीच येशू ख्रिस्ताला आवडत असेल.“ कधी वेळ मिळाला की सुब्बाराव रिजवूड चर्चमध्ये जायचे, मात्र हीच गोष्ट नंतर त्यांच्या कुटुंबीयांना त्रासदायक ठरली 

त्यांची आई वेंकम्मा तब्बल ९४ वर्षे जगली. आपला मुलगा मोठा होताना तिनं पाहिलं आणि ताठ मानेनं जगण्याचं तिचं स्वप्न पूर्ण झालं. मात्र आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करण्याची तिची इच्छा अपूर्ण राहिली. तिची केवळ एकच इच्छा होती की आपल्या मुलाची राख नदीमध्ये विसर्जित करण्यात यावी. मात्र सुब्बारावचा अस्थीकलश एका धर्मांध, कर्मठ माणसाच्या ताब्यात होता. रिजवूड चर्चमधील फादर मर्टन लॉकहार्ट यान अतिशय असंवेदनशीलपणे अस्थी विसर्जित करायला नकार दिला. तो म्हणाला, “सुब्बाराव हे बाप्टिस्ट होते म्हणूनच चर्चमध्ये येत होते. आणि ख्रिस्ती धर्मामध्ये अशी मान्यता आहे की प्रत्येक मेलेली व्यक्ती ही जजमेंट डेच्या दिवशी जिवंत होणार आहे. त्यामुळे अस्थी विसर्जित करता येणार नाहीत.” त्याने या अस्थी आपल्या ताब्यातच ठेवल्या. अशा रीतीने विश्वाचा नागरिक असलेला आणि मानवताधर्म मानणारा एक शास्त्रज्ञ अवशेष रूपानं एका कर्मठ माणसाच्या ताब्यात गेला. 

अर्थातच त्या निर्जीव अस्थींमध्ये सुब्बाराव नाहीत. त्यांच्या कामामधूनच डॉ. येल्लाप्रगडा सुब्बाराव हे नाव चिरंतन राहणार आहे. सुब्बाराव यांनी आपल्या शोधांचं पेटंट घेतलं नाही‌ किंवा त्यातून पैसा कमावण्याचा प्रयत्न केला नाही. स्वार्थ न बाळगता मानवकल्याणासाठी काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळं अनेक अद्भुत औषधे सापडली, ज्याचा औषधनिर्मिती उद्योग आणि मानवजातीला मोठा फायदा झाला आहे. या औषधामधून सुब्बाराव आज अजरामर झाले आहेत. १९५३ मध्ये क्लिफर्ड हेसेलटाइन यांनी शोधलेल्या एका नवीन बुरशीला सुब्रोमाईस स्प्लेंडन्स असं नाव देण्यात आलं आहे. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठानं शोधलेल्या एका दुसऱ्या बुरशीला सुब्रोमाईस ॲक्वाटिका असं नाव दिलं आहे. उडी मारणाऱ्या एका कोळ्याच्या प्रजातीला टांझानिया येल्लाप्रगडिया असं नाव देण्यात आलं आहे. त्यांच्या जन्मगावी एका रस्त्याला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात, १९९५ मध्ये भारत सरकारनं त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढलं होतं.



डॉ. येल्लाप्रगडा सुब्बाराव यांना केमोथेरपीच्या इतिहासातील मूक शिल्पकार म्हणलं जातं. त्यांनी स्वतः “केमोथेरपी” हा शब्द वापरला नाही, मात्र आधुनिक केमोथेरपीची वैचारिक पायाभरणी त्यांनीच केली. कर्करोग केवळ शस्त्रक्रियेद्वारेच नव्हे, तर रासायनिक औषधांनीही नियंत्रित होऊ शकतो ही कल्पना त्या काळातील वैद्यकीय क्रांती होती.‌ या क्रांतीमधूनच आज केमोथेरपीमध्ये नवनवीन औषधे विकसित झाली आहेत.‌ १९९४ मध्ये जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये प्लेगचा आजार वाढला होता तेव्हा सुब्बाराव यांनी शोधलेले टेट्रासायक्लीन औषध उपयोगी ठरलं होतं. अशा रीतीनं भारतामध्ये छोटा डॉक्टर ठरवला गेलेला हा शास्त्रज्ञ एक मोठा धमाका करून गेला.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गोमू आणि गोमाजीराव