राजा रामण्णा : बुद्धाला हसवणारा शास्त्रज्ञ
राजा रामण्णा : बुद्धाला हसवणारा शास्त्रज्ञ
१९७१ मध्ये झालेलं भारत पाक युद्ध, यामध्ये अनावश्यक अमेरिकन हस्तक्षेप होऊ लागला. मात्र त्याला न जुमानता पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवण्यात भारताला यश आलं. यावेळी जाणीव झाली होती की अण्वस्त्रधारी देशांच्या मनमानी दंडुकेशाहीतून बाहेर पडायचं असेल, तर भारताला स्वतःला अण्वस्त्रधारी बनावं लागेल. १९६५ तसेच १९७१ मधील युद्धांमध्ये झालेले लागोपाठचे पराभव पाकिस्तान पचवू शकणार नाही आणि पुन्हा मोठ्या युद्धाला तोंड फुटू शकेल अशी परिस्थिती होती. १९६२ मध्ये भारतावर विजय मिळवल्यानंतर चीननं लगेचच १९६४ मध्ये अणुचाचणी करून स्वतःची क्षमता वाढवली होती. या पार्श्वभूमीवर भारत अण्वस्त्रसज्ज होणं अत्यंत गरजेचं होतं. अखेरीस १९७४ मध्ये पोखरणमध्ये चाचणी घेऊन भारतानं अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत स्वतःचं नाव नोंदवलं. डॉ. राजा रामण्णा हे या चाचणीचे शिल्पकार होते.
१९४५ मध्ये जपानवर अणुबॉम्ब टाकण्यात आले आणि दुसरं जागतिक महायुद्ध थांबलं. या घटनेतून जग आणि सत्तांचे नकाशे बदलले. नवी राष्ट्रं जन्माला आली. १९४७ मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी अणुशक्तीची महती ओळखून १९४८ मध्येच अणुऊर्जा आयोग स्थापन केला आणि होमी भाभा हे त्याचे अध्यक्ष झाले. वीजनिर्मिती, वैद्यकीय, कृषी यांसारख्या विधायक क्षेत्रांमध्ये आण्विक ऊर्जा वापरली जाऊ लागली. १९५६ मध्ये अप्सरा ही पहिली अणुभट्टी सुरू झाली आणि त्या पाठोपाठ अनेक ठिकाणी अणुऊर्जा तयार होऊ लागली. भारत आण्विक शक्तीमध्ये प्रगती करू लागला. होमी भाभा यांचे १९६६ मध्ये विमान अपघातात निधन झाले. मात्र तोवर त्यांनी अनेक शास्त्रज्ञ घडवले होते, ज्यांनी भारताची आण्विक प्रगती खंडित होऊ दिली नाही. डॉ. राजा रामण्णा हे होमी भाभा यांनी घडवलेल्या शिष्यांपैकी एक.
एक प्रख्यात अणुभौतिकशास्त्रज्ञ, एक अत्यंत कुशल तंत्रज्ञ, एक सक्षम प्रशासक, एक प्रेरणादायी नेता, एक प्रतिभावान संगीतकार, संस्कृत साहित्य आणि तत्वज्ञानाचा अभ्यासक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक मानवतावादी असं राजा रामण्णा हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. त्यांचा जन्म २८ जानेवारी १९२५ रोजी कर्नाटकातील तुमकूरु शहरात झाला. त्यांचे वडील बी. रामण्णा हे मैसूर संस्थानात जिल्हा न्यायाधीश म्हणून काम करत होते. आई रुक्मिणीअम्मा ही उच्चशिक्षित आणि बहुभाषा संपन्न होती. तिचे वडील देखील जिल्हा न्यायाधीश होते. आपल्या राजाचं नाव त्याच्या मावशीच्या नावावरून ठेवलं होतं. तरुण वयातच विधवा झालेली राजम्मा ही त्याची मावशी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करून शिक्षिकेची नोकरी करत होती. पुढं राजम्मा एका सरकारी माध्यमिक शाळेची मुख्याध्यापिका झाली होती. राजाच्या तसेच त्याच्या भावंडांच्या संगोपन आणि संस्कारांमध्ये तिचा मोठा वाटा होता.
रुक्मिणीअम्माचं वाचन चांगलं होतं. शेक्सपिअर, सर वॉल्टर स्कॉट आणि डिकन्स यांचे सर्व साहित्य तिनं वाचलं होतं. याशिवाय तिचा कन्नड भाषेचा देखील चांगला अभ्यास होता आणि ती स्वतः कन्नडमध्येच कविता आणि लेख लिहित असे. तिच्यामध्ये आधुनिकता आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टींचे मिश्रण होतं. ती राजाच्या मोठ्या भावांशी लैंगिक विषयांवर मोकळेपणाने चर्चा करू शकत होती, मात्र त्याचवेळी अनेक जुन्या प्रथा आणि अंधश्रद्धा ती पाळत होती. मैसूरमध्ये त्यांच्याच घरात पहिल्यांदा घरगुती वापरासाठी वीज वापरली गेली. तिला आधुनिक यंत्रसामग्रीबद्दल कुतूहल होतं. विद्युत उपकरणं उघडून पाहायला, दुरुस्त करायला तिला आवडत असे. आधुनिक साधनांचा वापर करून घर सजवणं तिला आवडायचं. मात्र तिचा पोशाख मात्र नेहमीच पारंपारिक राहिला आणि तिनं धर्माचं पालन अगदी कर्मठपणे केलं.
बी. रामण्णा हे मैसूर संस्थानच्या न्यायसेवेत एक दयाळू न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध होते. लोकांमध्ये मिसळणारे, मात्र तरीही जास्त न बोलणारे बी. रामण्णा टेनिस, ब्रिज, बिलियर्ड्स यांसारखे खेळ कुशलतेने खेळत असत. कधीकधी घरामध्येच बी. रामण्णा आणि रुक्मिणीअम्मा यांच्यामध्ये ब्रिजचा डाव रंगायचा. रुक्मिणीअम्मा तिच्या नवऱ्याएवढी तरबेज नसल्यामुळं विजयी होऊ शकायची नाही. मग त्यातून चिडाचिडी आणि रुसवाफुगवी अशी गंमत देखील व्हायची. मात्र या दोघांनीही आपल्या मुलांना अतिशय उत्तम संस्कार दिले आणि जगण्याचा, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकवला. याशिवाय या भावंडांवर राजम्माची करडी नजर असे. ती एक उत्तम स्टोरीटेलर होती. तिच्या तोंडून पुराणांतील आणि महाकाव्यांतील कथा ऐकताना या भावंडांचे कैक तास सरून जायचे.
राजा सात वर्षाचा असताना त्याची बहीण टायफाईडमुळं मरण पावली. राजासाठी हा मोठा धक्का होता. एक वर्ष आधीपासून म्हणजे राजा सहा वर्षाचा होता तेव्हापासून, या बहिणीनं प्रोत्साहन दिलं म्हणून राजा पियानो शिकत होता. आपल्या या बहिणीची आठवण म्हणून राजानं पियानोमध्ये चांगलंच कौशल्य मिळवलं. तो एवढा कुशल झाला की बारा वर्षाचा असताना त्याला म्हैसूरच्या राजापुढं पियानो वाजवण्याची संधी मिळाली. त्याच्या संगीतप्रेमाला शाळेमध्ये देखील प्रोत्साहन मिळालं. छोट्या राजाला सर्वातआधी मैसूरमधील डालव्हॉय स्कूल या शाळेत टाकलं होतं. मात्र या शाळेत प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थी असल्यामुळं लवकरच त्याची शाळा बदलली आणि त्याला गुड शेफर्ड कॉन्व्हेंटमध्ये दाखल करण्यात आलं. मैसूर घराण्यातील मुलं, युवराज जयचामराज वाडियार आणि म्हैसूर दरबारातील राजकन्यादेखील या शाळेत शिकत होती.
या शाळेचा सर्वात मोठा फायदा असा झाला की इथं युरोपियन संगीतही शिकवलं जात असे. रामण्णा कुटुंबात कर्नाटकी संगीताची चांगली जाण होती. मात्र राजाच्या आईवडिलांना वाटलं की किमान एका मुलानं तरी पाश्चात्य संगीत शिकावं. त्यामुळं सहा वर्षांच्या वयात राजाचे पियानोचे धडे सुरू झाले. आयरिश नन “मदर मॉरिस” या सर्वांना अतिशय तन्मयतेनं संगीत शिकवत असत. त्यांच्या शिष्यांपैकी अनेकांनी संगीतात मोठं नाव कमावलं आहे. त्यांचं लहान मुलांशी जुळवून घेत शिकवणं राजाला खूप आवडलं आणि राजाची सांगीतिक प्रगती वेगानं होऊ लागली. म्हैसूरचे महाराज कृष्णराज वाडियार हे स्वतः मोठे संगीतप्रेमी होते आणि पाश्चिमात्य तसेच भारतीय अशा दोन्ही प्रकारच्या संगीताची त्यांना उत्तम जाण होती. अनेक कर्नाटकी आणि हिंदुस्तानी संगीतकारांना ते आश्रय देत असत.
अशा महाराजांच्या नजरेत येण्याची संधी राजाला मिळाली. राजा खूप चांगला पियानो वाजवतो अशी बातमी महाराजांपर्यंत पोचली. आणि महाराजांनी त्याला दरबारी बोलवलं. १९३७ मध्ये जगन्मोहन पॅलेस इथं राजाची ऑडिशन ठेवण्यात आली. तेव्हा मैसूर दरबारात ऑटो श्मिट या जर्मन संगीतकाराच्या नेतृत्वाखाली उत्तम वाद्यवृंद होता. त्यांची साथ घेत राजानं मैफिल अगदी छान रंगवली. महाराजांनी मैफिलीचा आनंद घेतला आणि राजाला २०० रुपये बक्षीस दिले. तेव्हाचे २०० रुपये म्हणजे आजचे किमान पन्नास हजार रुपये असतील बर का! फक्त बक्षीस दिलं नाही तर महाराजांनी आपुलकीनं चौकशी देखील केली की राजाचे शिक्षक त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतात ना? युरोपियन विद्यार्थी आणि राजा यांना शिकवताना काही भेदभाव केला जातो का? बारा वर्षांच्या मुलाबद्दल महाराजांनी दाखवलेली ही आपुलकी राजाला पुढं आयुष्यभर लक्षात राहिली, तसेच आपल्याला सरावासाठी दीड महिन्याची मुदत दिली असताना देखील आपण आपले बेस्ट देऊ शकलो नाही याची त्याला खंत देखील राहिली.
काही वर्षानंतर कुटुंब बेंगलोरला आलं आणि राजाला बिशप कॉटन स्कूलमध्ये दाखल करण्यात आलं. सुरुवातीला अनाथ अँग्लो-इंडियन मुलांसाठी स्थापन करण्यात आलेल्या या शाळेमध्ये आता उच्चवर्गीयांची मुले शिक्षण घेत होती. या शाळेत केवळ अभ्यास चांगला असून उपयोग नसायचा. प्रत्येक विद्यार्थ्याला मैदानी खेळात सहभाग घ्यायला लागे, जे आपल्या राजाला आवडत नसे. मात्र संगीतामध्ये जी मुलं असतील, त्यांना खेळांपासून सूट मिळत असे. मग राजाभाऊला अजून काय पाहिजे! इथंदेखील पियानोवर हुकूमत मिळवणं सुरूच राहिलं. शाळेचे वॉर्डन कॅनन एल्फिक तसेच शिक्षक मॉरिस लॅन्यन हे दोघेही उत्तम संगीतकार होते, त्यांच्यासोबत राजाचा सराव चालत असे. राजाचा एकंदर प्रवास एक संगीतकार होण्याच्या दिशेने सुरू होता, मात्र नंतर त्याला कलाटणी मिळाली. तेव्हापासून भौतिकशास्त्र आणि संगीत असे दोन जिवलग मित्र राजाच्या सोबत राहू लागले.
मॅट्रिकचे शिक्षण घेण्यासाठी तो सेंट जोसेफ विद्यालयात दाखल झाला आणि त्याला विज्ञानाची गोडी लागली. त्यानं मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून भौतिकशास्त्रामध्ये पदवी मिळवली. त्याचं कॉलेज शिक्षण सुरू असताना गांधीजींनी छोडो भारत आंदोलन सुरू केलं होतं. गांधीजींच्या आंदोलनाला समर्थन म्हणून राजानं देखील उपोषण केलं होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यू लोकांचा झालेला भयंकर नरसंहार राजाला व्यथित करत होता. भारतासारख्या शेकडो जातीजमाती असलेल्या देशात या पद्धतीचं वातावरण येऊ नये असं राजाला वाटत होतं. राजकीय आंदोलनामध्ये भाग घेताना त्यानं अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नाही. राजानं ताम्बरम, मद्रास मधून बीएससी आणि मुंबई विद्यापीठामधून एमएससीची पदवी मिळवली. त्याची हुशारी पाहून टाटा ग्रुपनं त्याला स्कॉलरशिप दिली आणि राजा किंग्स कॉलेज, लंडनमध्ये आण्विक भौतिकशास्त्र विषयात पीएचडीसाठी दाखल झाला.
डॉ. अॅलन मे यांच्या मार्गदर्शनाखाली राजाची पीएचडी सुरू होती. ‘अणु अभिक्रियांमधून निघणारे, आयनीकरण करणारे कण ओळखण्यासाठी एक नवीन प्रकारचा आयन चेंबर विकसित करावा’ असं डॉ. मे यांनी राजाला सुचवलं होतं. मात्र डॉ. मे यांच्यावर हेरगिरीचा आरोप झाला. त्यांना पदावरून काढून टाकलं आणि त्यांना अटक देखील झाली. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये राजानं आपल्या प्रयोगशाळेतील इतर तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांसोबत प्रभावीपणे काम केलं आणि आयन चेंबरचं काम यशस्वीपणे पूर्ण केलं. याबद्दलचा संशोधन पेपर प्रसिद्ध करण्याची वेळ आली तेव्हा अनेकजण म्हणाले की आता डॉ. मे पदावर नाहीत आणि त्यांच्यावर गंभीर आरोप देखील आहेत. त्यामुळं मार्गदर्शक म्हणून त्यांचं नाव टाकू नकोस. मात्र राजाला असं करणं अनैतिक वाटलं. या संशोधनामागील कल्पना डॉ. मे यांनी सुचवली होती, हे त्यानं आपल्या पेपरमध्ये मांडलं. “वारे फिरतील तसे वासे फिरतात” या वृत्तीचा राजा नव्हता. म्हणूनच “राजाचं राजपण, कालपण आजपण” कायम राहिलं. राजा आयुष्यभर सर्वांच्या विश्वासास कायम पात्र ठरला.
राजाची होमी भाभांशी पहिली भेट १९४४ मध्ये झाली होती आणि त्याला संगीतप्रेम हे निमित्त झालं होतं. डॉ. मिस्टोव्स्की या संगीत शिक्षकांनी एकदा राजाला विचारलं की “भारतातील मोठा शास्त्रज्ञ आपल्या गेस्ट हाऊसवर आला आहे. तू देखील विज्ञानाचा विद्यार्थी आहेस, तुला त्यांना भेटायला आवडेल का?” राजा अर्थातच नकार देणार नव्हता. या भेटीत दोघांनी मोझार्टच्या संगीतावर चर्चा केली. पुढे जेव्हा पीएचडी करण्यासाठी राजा लंडनला गेला, तेव्हा देखील भाभा यांनी त्याला नव्यानं स्वतंत्र झालेल्या भारत देशामध्ये येऊन स्वतःचं योगदान देण्याबाबत आग्रह केला. भारतात नव्याने उभारण्यात येत असलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) संस्थेमध्ये नोकरी देखील देऊ केली. तेव्हा त्यांना राजा म्हणाला होता की मी पीएचडी पूर्ण केल्यानंतर नक्की येईल.
डॉ. रामण्णा यांनी आपला शब्द पाळला. पीएचडी पूर्ण करून ते १ डिसेंबर १९४९ रोजी TIFR मध्ये रुजू झाले. तेव्हा इमारतीचं बांधकाम अजून अपूर्ण होतं. अविवाहित शास्त्रज्ञांना छोट्या खोल्या दिल्या जात होत्या. मात्र रामण्णा यांची संगीताची आवड भाभा यांना ठाऊक होती. त्यामुळं त्यांना वसतिगृहाच्या सर्वात वरच्या, चौथ्या मजल्यावर स्वतःसाठी एक आणि पियानोसाठी एक स्वतंत्र खोली देखील मिळाली. वसतिगृहाचा तळमजला हाच रामण्णांचा अणुभौतिकी विषयाची प्रयोगशाळा बनला. तिथंच त्यांनी अणुविभाजन आणि स्कॅटरिंग यांवर आपलं संशोधन सुरू केलौ. इथं त्यांची भेट गणिताचे प्राध्यापक डॉ. डी. डी. कोसंबी यांच्याशी झाली. कोसंबी सर केवळ डिफरेंशियल जिओमेट्रीचे तज्ज्ञ नव्हते, तर नाणेशास्त्रज्ञ, इतिहासकार, भाषातज्ज्ञ, बौद्ध धर्म मार्क्सवाद आणि संस्कृतचे अभ्यासक आणि एक जिंदादिल व्यक्तिमत्व होते. त्यांना चांगल्या खाण्याचीही आवड होती. त्यांच्या नादानं डॉ. रामण्णा चायनीज अन्न तसेच खेकडे खायला शिकले.
भाभांचं कॉस्मिक रे फिजिक्समधील योगदान आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होतं. सैद्धांतिक भौतिकीतील काम भाभा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमुळं ओळखलं जायचं. तरुण रिऍक्टर भौतिकशास्त्रज्ञ म्हणून रामण्णा भाभा यांच्या टीममध्ये होते. या टीमनं भारताचा पहिला न्यूक्लिअर रिऍक्टर, अप्सरा ४ ऑगस्ट १९५६ रोजी सुरु केला. भारतातील न्यूक्लिअर कार्यक्रम शांततामय वापर, ऊर्जा-स्वावलंबन आणि राष्ट्रीय सुरक्षितता या उद्दिष्टांवर आधारित होता. वीजनिर्मिती सोबतच कर्करोग उपचार, (रेडिओथेरपी) औषधनिर्मिती, शेंगदाण्यासारख्या भूमिगत पिकांवर संशोधन तसेच अवकाश आणि औद्योगिक वापर करत भारताची प्रगती करायचं भाभांचं स्वप्न होतं. त्यावेळी भारतानं अणुसंशोधन करू नये यासाठी जागतिक प्रेशर होतं. मात्र भारताने कणखर भूमिका घेत आण्विक संशोधन सुरू ठेवलं. भाभांनी अतिशय चांगली टीम तयार केली असल्यामुळे त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर देखील संशोधनाची आणि तांत्रिक प्रगतीची गती थांबली नाही.
भारताच्या पहिल्या रिऍक्टर अप्सराच्या डिझाईन आणि बांधकामाच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून, राजा रामण्णांनी न्यूट्रॉन्सच्या थर्मलायझेशन प्रक्रियेचा अभ्यास केला. त्यांनी विविध वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये न्यूट्रॉन्स कसे मंद होतात आणि पसरतात हे अभ्यासलं. रामण्णा आणि त्यांच्या टीमनं पल्स न्यूट्रॉन स्रोत वापरून पाणी आणि बेरिलियम ऑक्साईडमध्ये न्यूट्रॉन डिफ्युजन आणि स्लोइंग-डाउन यांचे स्थिरांक मोजले. नियंत्रित परिस्थितीमध्ये बाहेर पडणाऱ्या न्यूट्रॉन स्पेक्ट्राचा अभ्यास केला, ज्यातून फ्रॅगमेंट्सच्या मास आणि चार्ज वितरणाच्या स्टोकास्टिक सिद्धांताचा विकास झाला. “दोन नवजात फिशन फ्रॅगमेंट्समध्ये नक्की काय उलाढाल होते” याचं भौमितीय स्पष्टीकरण देऊन डॉ. रामण्णा यांनी अणुभौतिकी क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं आहे.
अप्सरा पाठोपाठ, १९६० मध्ये सायरस हा रिऍक्टर देखील भारतामध्ये सुरू झाला. Cirus (Canada India Reactor Utility Services) रिऍक्टरचं उद्घाटन करताना झालेली धमाल डॉ. रामण्णा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे. भारत आणि कॅनडा यांच्या संयुक्त विद्यमानं हा प्रकल्प सुरू झाला होता, ज्यामध्ये कॅनडियन शास्त्रज्ञांचं योगदान देखील महत्त्वाचं होतं. पंतप्रधानांच्या हस्ते रिऍक्टरचं उद्घाटन झालं, फोटोशूट देखील झालं बरं का, पण त्यातून वीजनिर्मिती होत नव्हती. त्याच्यासोबत असलेला छोटा रिऍक्टर सुरू झाला, मात्र सायरस अद्याप ढिम्म बसला होता. कॅनडियन शास्त्रज्ञांना समजेना की नक्की काय चुकत आहे. अखेरीस प्रकरणाच्या तळाशी गेल्यावर रामण्णा यांना समजलं की कूलिंग करण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्यामध्ये काही जंतू आहेत, त्यामुळं अपेक्षित परिणाम मिळत नाही. कॅनडातील शुद्ध पाण्यात चालला असला तरी भारतीय पाण्यानं या रिऍक्टरला पाणी पाजलं होतं.
“स्माइलिंग बुद्धा” या मोहिमेमुळं डॉ. रामण्णा यांचं नाव भारतातील तळागाळात पोचले. स्वतः अण्वस्त्रधारी असलेले अमेरिका, रशियासारखे देश इतर देशांवर दबाव आणत होते की त्यांनी अणुचाचणी करू नये. अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (NPT) भारतानं सही करावी यासाठी प्रेशर वाढवलं जात होतं. मात्र १९७१ मधे आलेल्या अनुभवामुळं भारताला अणुसज्ज होणं गरजेचं होतं. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि भाभा अणुसंधान केंद्राचे प्रमुख राजा रामण्णा यांनी गुप्तपणे भूमिगत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. अतिशय मोजके शास्त्रज्ञ यामध्ये सहभागी करून घेतले. राजस्थानमधील पोखरणमध्ये असलेल्या वाळवंटी सैन्य तळामध्ये खोल खड्डा करून त्यात भाभा अणुसंधान केंद्रामध्ये तयार केलेला १४०० किलो वजनाचा बॉम्ब ठेवण्यात आला. १८ मे १९७४ रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी या बॉम्बचा स्फोट घडवून आणला आणि त्यातून सुमारे आठ किलोटन ऊर्जा बाहेर पडली.
"आणि बुद्ध हसला” असं नियंत्रणकक्षात बसलेल्या रामण्णा यांनी इंदिरा गांधी यांना फोन करून कळवलं आणि पंतप्रधान कक्षात जल्लोष सुरू झाला. “मोहीम यशस्वी झाली आहे” असं या कोडवर्डद्वारे समजलं होतं. अमेरिकेच्या सीआयए या गुप्तहेर संस्थेच्या नाकावर टिच्चून आणि त्यांच्या उपग्रहांना गुंगारा देत ही मोहीम पूर्णपणे गुप्त ठेवण्यात भारत यशस्वी झाला होता. मोहीम पूर्ण होईपर्यंत लिखित आदेश टाळून केवळ तोंडी सूचनांवरच काम झालं होतं. कोणत्याच शास्त्रज्ञाला मोहिमेची पूर्ण माहिती दिली नव्हती. “जितकी गरज, त्याला तितकीच माहिती.” हे धोरण राजा रामण्णा यांनी राबवलं होतं. बहुतेक खोदकाम रात्री झालं होतं. हालचाली नेहमीच्या वाटतील अशाच ठेवल्या होत्या, त्यामुळं उपग्रहांनाही संशय आला नाही. याशिवाय शास्त्रज्ञांचे परदेश दौरे काही काळ थांबवले होते. चाचणीसाठी लागणारं सर्व साहित्य भारतामध्येच तयार करण्यात आलं होतं, कोणतीही विदेशी मदत घेतली नाही. त्यामुळे बातमी लीक होण्याची शक्यता शून्य झाली. भारतानं जाहीर केलं तेव्हा जगाला ही चाचणी झाल्याचं समजलं. या चाचणीमुळं भारतावर अनेक निर्बंध आले, पण भारत कोणत्याच गोष्टींमध्ये पिछाडीवर नाही हे देखील अधोरेखित झालं.
राजा रामण्णा यांना त्यानंतर अनेक महत्त्वाची पदं सोपविण्यात आली. १९७२ पासून ते भाभा अणुसंधान केंद्राचे प्रमुख होते. १९७८ पासून १९८१ पर्यंत ते सुरक्षा मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार तसेच डीआरडीओचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. पुढं त्यांनी अणुऊर्जा आयोगाचं अध्यक्षपद स्वीकारलं. राज्यसभेचे खासदार झालेल्या रामण्णा यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्री यांसारखी जबाबदारी देखील पार पाडली आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवीत करण्यात आलं आहे. अनेक विद्यापीठांची मानद डॉक्टरेट त्यांना बहाल करण्यात आलेली आहे. आयआयटी मुंबईसारख्या अनेक शिक्षण संस्थांची महत्त्वाची पदं त्यांनी भुषवली आहेत. बेंगलोरमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऍडव्हान्स स्टडीज ही संस्था स्थापन करून त्यातून त्यांनी अनेक संशोधक घडवले आहेत. या संस्थेमध्ये फक्त विज्ञानच नाही तर मानवाला उपयुक्त असलेल्या सर्व विषयांवर संशोधन होते.
१९५२ मध्ये डॉ. रामण्णा यांचा विवाह मालथी नावाच्या तरुणीसोबत झाला होता. या दांपत्याला एक मुलगा आणि दोन मुली झाल्या होत्या. भौतिकशास्त्र आणि संगीत यांची सांगड इथंदेखील आपल्याला पाहायला मिळते. रामण्णा यांचं संगीतविषयक प्रेम आयुष्यभर कायम राहिलं. “ज्या दिवशी मला दिवसभर पियानो वाजवायला मिळेल, तो माझ्यासाठी सर्वात उत्तम दिवस असेल” असे ते म्हणायचे. ते बंगलोर संगीत विद्यालयाच्या स्थापनेत सक्रिय सहभागी होते. याशिवाय त्यांनी दोन पुस्तकांचे लेखन केलं आहे. “द स्ट्रक्चर ऑफ म्युझिक इन रागा अँड वेस्टर्न सिस्टीम” या पुस्तकात त्यांनी पाश्चात्य आणि भारतीय संगीतामधील सामायिक धागा अधोरेखित केला आहे. तर “इयर्स ऑफ पिलग्रिमेज” हे त्यांचं आत्मचरित्र आहे. स्माईलींग बुद्धा मोहीम यशस्वीपणे राबवणारे डॉ. रामण्णा आयुष्याच्या उत्तरार्धात बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध आणि इतर तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. रामण्णा यांना योगामध्येही खूप रस होता.
सद्दाम हुसेन यांनी डॉ. रामण्णा यांना इराकसाठी अणुबॉम्ब बनवावा यासाठी भरभक्कम रक्कम देऊ केली होती. मात्र रामण्णा यांनी ती नम्रपणे नाकारली होती. रामण्णा हे एक कट्टर देशभक्त होते. ते पीएचडी झाल्यानंतर परदेशात स्थायिक होऊ शकले असते, मात्र ते होमी भाभा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतात आले होते, पैसा ही त्यांच्यासाठी गौण बाब होती. १९७८ मध्ये रामण्णा यांना सद्दाम हुसेननं इराकमध्ये चालू असलेले अणुसंशोधन दाखवलं आणि त्यानंतर पूर्ण प्रकल्पाचं नेतृत्व करण्याची ऑफर दिली. सद्दामला नकार देणं किती अवघड असेल याची आपण आज कल्पना करू शकतो. रामण्णा यांनी तेव्हा कशीतरी वेळ मारून नेली आणि त्यानंतर लगेचच भारताचं विमान पकडून ते मायदेशी परतले. नंतर चार वर्षांनी ते मरता मरता वाचले होते. १९८२ मध्ये एअर इंडियाचे विमान क्रॅश झाले, तेव्हा विमानातील १११ पैकी १७ लोक मृत्युमुखी पडले होते, मात्र डॉ. रामण्णा त्यातून सुखरूप बचावले होते.
दिसायला गंभीर मात्र स्वभावानं विनोदी असलेले रामण्णा प्रत्येकाला आपलेसे करीत असत. त्यामुळे रामण्णा यांचे मार्गदर्शन घेताना तरुण शास्त्रज्ञ कधी घाबरले नाहीत. कॉपी-पेस्ट करणाऱ्या शास्त्रज्ञांपेक्षा नव्यानं शोधणारे शास्त्रज्ञ रामण्णा यांना आवडायचे. नवनवीन कल्पनांना त्यांनी कायम प्रोत्साहन दिलं. परदेशातून उपकरण आणता येत नसेल तर देशी जुगाड करून अपेक्षित परिणाम मिळवणं त्यांना आवडायचं. स्वभावानं प्रेमळ असलेले रामण्णा अतिशय संवेदनशील होते. एका मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला की “तुम्हाला सर्वात जास्त दुःख कधी होतं?” तेव्हा ते म्हणाले होते की “देश स्वतंत्र होऊन पन्नास वर्षे झाली, तरीदेखील आजही रेल्वे स्टेशनवर मोठे ओझे डोक्यावर घेऊन लोक उभी दिसतात तेव्हा खूप वाईट वाटतं.”
एकदा त्यांच्या एका नातलगाचा मृत्यू झाला आणि त्यावर विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा तिथला कारकून रामण्णा यांना म्हणाला की, “मी तुम्हाला कुठंतरी पाहिलं आहे.” त्यावर मिश्किल रामण्णा त्याला म्हणाले, “पाहिले नसलं तरी हरकत नाही, लवकरच मला इथं पाहतालच.” अर्थात हा विनोद तेव्हा त्या कारकूनाच्या डोक्यावरून गेला असला तरी ती वेळ लवकरच आली. २४ सप्टेंबर २००४ रोजी ७९ वर्षांच्या रामण्णा यांचं मुंबईमध्ये निधन झालं. त्यावेळी राष्ट्रपती असलेले एपीजे अब्दुल कलाम म्हणाले होते की “आज माझे गुरू, माझे मार्गदर्शक मला सोडून गेले. त्यांनी स्वतः जे संशोधन केलं त्यामुळे ते महान ठरतातच, मात्र त्यांनी वैज्ञानिकाची पिढी घडवली आणि या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची जी पायाभरणी केली यामुळे ते अधिक थोर ठरतात.”
डॉ. राजा रामण्णा एकदा म्हणाले होते, “एकेकाळी पंतप्रधानांकडे वैज्ञानिक सल्लागार समिती असायची. पंतप्रधान त्यांच्यापुढं देशातील समस्या मांडायचे आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी वैज्ञानिकांना सांगितलं जायचं. मात्र अशी वैज्ञानिक सल्लागार समिती नंतर विसर्जित करण्यात आली ही किती खेदाची गोष्ट आहे.” अर्थात आज आपल्या पंतप्रधानांकडे सल्ला देण्यासाठी वैज्ञानिक सल्लागार समिती नसली तरी त्यांच्याजवळ उद्योगपती असतात आणि त्यामुळे आपला देश त्यांच्या हुकमावर चालत असतो. भविष्यात हे उद्योगपती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनून आपल्या देशाचं नाव उंचावतील.. आपण म्हणत राहू “मेरा भारत महान!!”






Comments
Post a Comment