पॉल एर्लिच: किमोथेरपी संकल्पनेचे जनक
पॉल एर्लिच: किमोथेरपी संकल्पनेचे जनक
कर्करोगावर मात करण्यासाठी आजवर अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले. पर्सिव्हल पॉट यांनी अठराव्या शतकात मांडणी केली की धुरामुळं कर्करोग होतो. रुडॉल्फ विरचो यांनी एकोणिसाव्या शतकात शोधलं की कर्करोग हा पेशींचा आजार आहे. त्यांनी मांडलेल्या या सेल थियरीमधून कॅन्सर समजण्याचा वैज्ञानिक पाया रचला गेला. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कमल रणदिवे, येल्लाप्रगडा सुब्बाराव या भारतीय संशोधकांनी देखील आपलं योगदान दिलं. नंतर जेव्हा विज्ञान गुणसूत्रांची उकल करायला लागलं, तेव्हा हरगोविंद खुराणा यांनी सिद्ध केलं की जेनेटिक म्युटेशनमुळे कर्करोग होतो. मात्र त्याच्या शंभर वर्ष आधी एका शास्त्रज्ञानं कर्करोगाला गोळी घालून संपवण्याची कल्पना केली होती. हा नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ होता पॉल एर्लिच..
“गोली मार भेजे मे, के भेजा शोर करता है” या गाण्यात पॉलच्या संशोधन कल्पनेचं तत्वज्ञान अगदी सोप्या शब्दात सांगितलं आहे. “जिथं प्रॉब्लेम आहे तिथंच हल्ला करून तो संपवणं.” त्यानं कर्करोगग्रस्त पेशींवर मॅजिक बुलेटचा वापर सुचवला. कर्करोगाशी लढताना मानवानं वेगवेगळी औषध वापरून पाहिली. मात्र हे औषध खाऊन लोकांना अशक्तपणा यायचा. साहजिकच होतं, कारण ही औषध बनवताना मानवाला समस्येच्या मुळापर्यंत जाता आलं नव्हतं. औषधानं निरोगी पेशींना नुकसान न करता फक्त आजारी पेशींवरच हल्ला करावा, कर्करोग पेशींवर काही विशिष्ट मार्कर्स असतात, त्यांना ओळखून औषधांनी त्यांच्यावर थेट हल्ला केला पाहिजे अशी मूलभूत संकल्पना पॉल एर्लिच यांनी मांडली होती. याशिवाय त्यांनी सिफिलीस या गुप्तरोगावर देखील त्यांनी सल्वर्सन हे प्रभावी औषध शोधलं होतं. महत्त्वाचं संशोधन करून देखील त्याच्या पदरी उपेक्षा आली अशा व्यक्तीचा संघर्ष जाणून घेऊया.
तेव्हा प्रशियात असलेल्या आणि आता पोलंडमध्ये असलेल्या स्ट्रझेलिन शहरामध्ये १४ मार्च १८५४ रोजी पॉल जन्माला आला. वसंत ऋतुच्या आल्हाददायक वातावरणामध्ये जन्माला आलेलं हे बाळ इसमार आणि रोजा एर्लिच या जोडप्याला एका मुलीच्या पाठीवर झालेलं हे दुसरं अपत्य. पॉलचे आजोबा हे प्रसिद्ध मद्यउत्पादक होते, सोबतच ते विज्ञानप्रेमी देखील होते. अगदी वयाची ऐंशी ओलांडली तरी ते विज्ञानाविषयीची व्याख्यानं देण्यासाठी फिरत असत. मद्यविक्री हा मुख्य व्यवसाय असलेला इसमार हा त्या शहरातला इनकीपर होता, म्हणजे शहरातील लहानमोठे तंटेबखेडे त्याच्या पातळीवर सोडवण्याचे त्याला अधिकार होते. तो अतिशय उत्कृष्ट वक्ता होता. त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये अलंकारिक शब्द असायचे. मात्र त्याला तपकीर ओढण्याचं व्यसन होतं. दिवसभर तो नशेमध्ये आकाशाकडे पाहत बसायचा. त्यामुळं घर चालवण्यासोबत व्यवहार पाहण्याची जबाबदारी रोजाला उचलावी लागली.
पॉलन आईकडून जबाबदारी उचलण्याचा, वडिलांकडून नेतृत्व आणि वक्तृत्वाचा गुण घेतला. त्यानं आजोबांकडून विज्ञानाविषयीचं प्रेम घेतलं. त्याला रसायनशास्त्राची विशेष गोडी लागली. तो शाळेत तर वेगवेगळ्या रसायनांचा उपयोग करायचाच, मात्र घरी असताना देखील वेगवेगळी केमिकल वापरून डिटर्जंट बनवायचा प्रयत्न करायचा. तो आठ वर्षाचा होता, तेव्हा त्यानं बनवलेलं खोकल्याचं औषध घेण्यासाठी लोक घरी यायचे. त्याची कल्पनाशक्ती अफाट होती, तो काही काल्पनिक पात्रं निर्माण करायचा, जे त्याच्या कल्पनेतील वैज्ञानिक प्रयोग करतील. त्यामुळं त्याला “डॉक्टर फॅन्टसी” असं टोपणनाव देखील मिळालं होतं. त्याला लहानपणी सिगरेट पिण्याची वाईट सवय लागली, जी त्याला सोडवता आली नाही. त्याचा मामेभाऊ कार्ल वेगर्ट हा त्याच्यापेक्षा एक वर्षांनी मोठा होता. पॉल हा कार्लला आदर्श मानायचा. दोघांची खूप छान गट्टी जमायची. मोठा झाल्यावर कार्ल वेगर्ट हा देखील पॅथॉलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध झाला.
प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेतच पूर्ण करून पुढं त्याला ब्रेस्लाऊ शहरातील मारिया-मॅग्डालेनेन जिम्नॅझियममध्ये पाठवण्यात आलं. विज्ञानासोबतच लॅटिन भाषा आणि गणित हे त्याचे आवडते विषय होते. पॉल हा स्ट्रझेलिनमधल्या मुलांचा आदर्श होता. त्यामुळं जेव्हा कधी सुट्टीमध्ये पॉल घरी येईल, तेव्हा काही क्षणात त्याच्याभोवती सात वर्षापासून सोळा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांचा गराडा पडायचा. मग काय! पुस्तकं कुठल्या कोपऱ्यामध्ये टाकून हा छोटा नेता त्याच्या अनुयायांशी गप्पा मारायचा. पॉल त्याच्या मित्रमंडळींना आणि त्यांच्या बहिणींना घेऊन नाटक देखील बसवायचा. सुट्टीमध्ये हे असे अनेक उद्योग चालायचे, मग वेळ असा निघून जायचा आणि सुट्टीचा अभ्यास तसाच अपूर्ण राहायचा. या मित्रमंडळींकडून पाली, सरडे, सापसुरळ्या, बेडूक आणि उंदीर पकडले जायचे आणि त्यांच्यावर पॉल भाऊच्या नेतृत्वात सामूहिक संशोधन केलं जायचं. त्याचा एक धमाल किस्सा आहे.
पॉल एकदा असा सुट्टीमध्ये घरी आला होता आणि निवांत झोपला होता. सकाळी जेव्हा त्यांची नोकर धुणं धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली, तेव्हा ती किंचाळत बाहेर आली. ती का किंचाळत आहे हे पाहण्यासाठी पॉलची आई देखील तिथं पोहचली. बाथरूममध्ये जाऊन पाहते तर काय पाली, सरडे, सापसुरळ्या, बेडूक आणि उंदीर यांनी बाथरूम गच्च भरलं आहे. झालं असं की, मित्रांनी आधल्या दिवशी संध्याकाळी या प्राण्यांना पॉलकडे जमा केलं होतं. या प्राण्यांनी एकमेकांना त्रास देऊ नये म्हणून प्रत्येकाला वेगळ्या कापडात गुंडाळून पॉलनी सुरक्षित ठेवलं होतं. मात्र का कोण जाणे, सर्व प्राणी त्यांना दिलेल्या घरातून बाहेर पडून बाथरूममध्ये हिंडत होते. या प्रकाराबद्दल आईनं पॉलचे कान उपटायला सुरुवात केली. मात्र त्याचवेळेस पॉलनं खिशातून काही किडे बाहेर काढले आणि म्हटला की माझ्या प्राण्यांना भूक लागली असेल, त्यांना खायला देतो. किडे पाहून आई आणि नोकर दोघी पळून गेल्या. जाता जाता आईनं सांगितलं की हे सगळे प्राणी पाच मिनिटांमध्ये इथून नाहीसे झाले पाहिजेत. आईची आज्ञा पाळण्यासाठी पॉल तत्पर होताच की!!
लॅटिन भाषेमध्ये निबंध लिहायचा असेल, तर पॉल काही मिनिटांमध्ये पूर्ण करायचा. अवघड गणितं देखील तो चुटकीसरशी सोडवत असे. त्यामुळे या विषयांचा अभ्यास घरी करून सुट्टी वाया घालवण्यात काही मजा नाही असा त्याचा हिशोब असायचा. मात्र जर्मन भाषा त्याचा घाम काढायची. शाळा चालू होण्याच्या आदल्या दिवशी तो रात्रभर निबंध लिहिण्याचा प्रयत्न करायचा. जर्मन भाषेत निबंध लिहिताना त्याच्या हातातील पेन्सिल कधी त्याच्या दाताखाली जायची, कधी कानात जायची, तर कधी केसात! दोन्ही हात एकमेकांवर जवळजवळ चोळले जायचे. अगदी हातावरच्या रेषा पुसल्या जातील एवढं! तरीदेखील आयडिया बाहेर यायची नाही. मग मेंदूला ऊर्जा देण्यासाठी एका बाजूनं आईने दिलेला फराळ खायचा, आणि थोडं लिहायचं. जेव्हा त्याचा निबंध पूर्ण व्हायचा तेव्हा त्याच्या लक्षात यायचं की आईनं दिलेल्या सर्व फराळ आपण एका रात्रीमध्ये संपवला आहे. पॉल बाकीच्या विषयात उत्तम होता, म्हणून जर्मन विषयात काठावर मार्क देऊन त्याला शालांत परीक्षेत पास करण्यात आलं.
पुढं शिकण्यासाठी त्यानं ब्रेस्लाऊ विद्यापीठात ॲडमिशन घेतलं, मात्र त्याला मजा येत नव्हती. त्याला जीवशास्त्र, सेंद्रिय रसायननशास्त्र हे विषय आवडायचे, मात्र विद्यापीठात हे विषय दुर्लक्षित होते. म्हणून पुढच्या वर्षी त्यानं विद्यापीठ बदललं आणि स्ट्रासबर्ग विद्यापीठात स्वतःला दाखल करून घेतलं. इथं त्याला प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी हेनरिक वाल्डेयर होते, ज्यांनी त्याच्या प्रयोगांना प्रेरणा दिली. एकदा प्रा. वाल्डेयर प्रयोगशाळेत आले, तेव्हा बाकी सगळे विद्यार्थी प्रयोग उरकून निघून गेले होते. मात्र पॉल एकटा प्रयोग करत होता. त्याच्या टेबल वेगवेगळ्या रंगांनी माखला होता. त्याच्या दोन्ही हाताची बोटं रंगांनी भरली होती आणि चेहऱ्याला देखील थोडा रंग लागला होता. पॉल एक डाय बनवण्याचा प्रयत्न करत होता. या डायची टेस्टट्यूब सूर्यप्रकाशात पकडल्यानंतर वाल्डेयर यांच्या लक्षात आलं की पॉलने प्रयोगशाळेतील सर्व सूचनांचं पालन केलेलं आहे, मात्र स्वतःचं डोकं लावून वेगळा रंग तयार केला आहे. “बंदे मे स्पार्क है” हे त्यांच्या लक्षात आलं.
पॉलनं मामेभाऊ कार्लसोबत रंगांचे प्रयोग लहानपणापासून केले होते. मोठा झाल्यावर कार्लनं त्यामध्ये संशोधन देखील केलं आणि जीवाणूंच्या निदानासाठी अॅनिलिन रंगद्रव्यांचा वापर सुरू करणारी तो पहिली व्यक्ती होता. त्याचं मार्गदर्शन घेऊन पॉल उती (टिश्यू) रंगवून त्यांचा अभ्यास मायक्रोस्कोपखाली करू लागला. दुसऱ्या टर्ममध्ये त्याला नव्या पेशीचा शोध लागला. प्लाझ्मा पेशींच्या प्रोटोप्लाझ्ममध्ये कणयुक्त रचना असलेली ही पेशी क्षारीय रंगाच्या साहाय्यानंच दिसू शकत होती. ही पेशी असणं म्हणजे चांगलं पोषण असल्याचं लक्षण होतं, म्हणून या पेशीला त्यानं मास्ट पेशी असं नाव दिलं. आता पुढील संशोधन करताना स्ट्रासबर्गपेक्षा ब्रेस्लाऊ विद्यापीठ अधिक उपयुक्त पडेल हे लक्षात घेऊन त्यानं तिसऱ्या टर्ममध्ये घरवापसी केली. त्याला ब्रेस्लाऊ विद्यापीठातील हायडेनहाइन आणि कोनहाइम या प्राध्यापकांकडून शरीरशास्त्र शिकायचं होतं.
पॉल ब्रेस्लाऊमध्ये शिकत असताना एकदा रॉबर्ट कोख विद्यापीठात आले. विद्यापीठाची पाहणी करत असताना त्यांना पॉल काम करताना दिसला, त्याचं काम पाहून ते खूप प्रभावी झाले, मात्र ते म्हणाले की “हा छोटा मुलगा खूप हुशार आहे, मात्र तो पास होऊ शकणार नाही.” पुढील काळात अँथ्रॅक्स, कॉलरा आणि क्षयरोग याचे जंतू रॉबर्ट कोख यांनी शोधून काढले. मात्र पॉल विद्यार्थीदशेमध्ये असतानाच कोख यांच्या नजरेमध्ये भरला होता. अर्थात त्यांची भविष्यवाणी खोटी ठरली आणि “उती रंगवण्याचा सिद्धांत आणि त्याचा वापर” या विषयावर प्रबंध सादर करून पॉलभाऊला पीएचडी देखील प्राप्त झाली. शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यानं लाइपझिग विद्यापीठामध्ये संशोधन केलं होतं. लाइपझिग मधील एका छोट्या खानावळीत तो जेवण देखील करायचा आणि संशोधन देखील.
तब्बल तीस वर्षांनंतर, सल्वर्सन औषधाचा शोध लागल्यानंतर जेव्हा कॉल जगप्रसिद्ध झाला, तेव्हा या खानावळीच्या मालकाच्या मुलीनं पॉलला पत्र पाठवलं आणि जुनी आठवण सांगितली. तिनं लिहिलं होतं की, “तुमच्या प्रयोगांमुळे पाहुण्यांच्या खोल्यांमधील टॉवेल्स आणि बिलियर्ड रूममध्ये लाल-निळ्या रंगाचे मोठमोठे डाग पडले होते. कितीही धुतले तरी ते जात नव्हते.”अगदी बिलियर्ड टेबलवरही त्यानं प्रयोग केले होते कारण हॉटेलमध्ये दुसरं मोठं टेबल नव्हतं. तेही रंगाच्या डागांनी भरलं होतं. पॉल भाऊच्या डायचा रंग असो किंवा त्याने दिलेल प्रॉमिस.. प्रत्येक गोष्ट अगदी पक्की होती. डॉक्टर होऊनच घरी येईल असं वचन देऊन तो बाहेर पडला होता आणि चोवीस वर्षांचा असताना पॉल सन १८७८ मध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन झाला.
डॉ. पॉल एर्लिच यांनी पहिली नोकरी बर्लिनमधील चारिटे हॉस्पिटलमध्ये केली. रुग्णांना पाहत असतानाच त्यांनी संशोधनावर देखील लक्ष केंद्रित केलं. क्षारीय, आम्लीय आणि न्यूट्रल असे तिन्ही प्रकारचे रंग वापरून त्यांनी पांढऱ्या रक्तपेशींवर प्रयोग केला. त्यांना या पेशींमधील लिम्फोसाइट्स ओळखणं शक्य झालं. १८८० पासून एर्लिच यांनी लाल रक्तपेशींचाही अभ्यास सुरू केला आणि एरिथ्रोसाइट्सच्या पूर्वरूपांचा शोध लावला. पांढऱ्या रक्तपेशींवरील संशोधनामुळं ल्युकेमिया अर्थात रक्ताचा कॅन्सर समजून घेण्यासाठी पाया तयार झाला आणि त्यामुळंच त्यांनी रक्तक्षय अर्थात अॅनिमिया विश्लेषणाचीही पायाभरणी केली. याशिवाय त्यांनी नवीन प्रकारची मूत्रचाचणी शोधून काढली, ज्यामधून रुग्णाला टायफॉइड झाला असेल तर ओळखता येऊ लागलं. पण त्यांच्या कामाला मान्यता मिळाली नाही. कारण बहुतेक डॉक्टरांकडं रसायनशास्त्राचं ज्ञान नसायचं. त्यांना एर्लिच यांचे दावे खोटे वाटायचे. त्यामुळं एर्लिच यांचं प्रमोशन देखील थांबलं गेलं.
इथं दगडावर डोकं आपटण्यापेक्षा आपल्या ज्ञानाची ज्याला कदर आहे, अशा रॉबर्ट कोखसोबत काम करण्याचा निर्णय एर्लिच यांनी घेतला आणि कोख यांनी सुचवल्याप्रमाणं बर्लिन-मोआबिट येथील सार्वजनिक रुग्णालयातील क्षयरोग विभागाची जबाबदारी स्वीकारली. सन १८९१ मध्ये बर्लिनमध्ये इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शस डिसीजेस” ही संस्था सुरू झाली, इथं काम करण्यासाठी मध्ये कोख यांनी एर्लिच यांना बोलावलं. “बिनपगारी फुल अधिकारी” अशी ही पोस्ट होती. इथ प्रयोगशाळा, कर्मचारी, रुग्ण, रसायनं आणि प्रयोगासाठी प्राणी या सर्व गोष्टी मिळणार होत्या, मात्र पगार मिळणार होता. अर्थातच एर्लिच यांनी ही पोस्ट आनंदानं स्वीकारली. त्यांनी इथं रोगप्रतिकारकशक्ती अनुवंशिकरित्या पुढच्या पिढीला मिळते का? यावर संशोधन केलं. गर्भाला आईच्या शरीरातून प्रतिपिंडं मिळतात, मात्र काही महिन्यांनी ही वारशानं मिळालेली प्रतिकारशक्ती कमी होत जाते. तसेच प्रतिपिंडं मातेच्या दुधातूनही मिळू शकतात हे त्यांनी सिद्ध केलं.
बेहरिंग नावाचा शास्त्रज्ञ डिफ्थेरिया आणि धनुर्वात या आजारांवर लस बनवत होता, मात्र त्याला अपेक्षित परिणाम मिळत नव्हता. कोख यांनी त्याच्या मदतीसाठी एर्लिच यांना पाठवलं. या दोघांना डिफ्थेरियावर लस बनवता आली आणि त्याबद्दल त्यांना पैसे देखील मिळाले. मात्र काम सुरू करण्याआधी “जो फायदा होईल तो अर्धा अर्धा वाटून घ्यायचा” असं ठेवलं होतं. बेहरिंगनं शब्द फिरवला आणि अवघी आठ टक्के रॉयल्टी एर्लिच यांना दिली. यामुळं या दोघांचे संबंध खूप ताणले गेले. १९०१ मध्ये डिफ्थेरिया संशोधनासाठी वैद्यकशास्त्रातील पहिला नोबेल पुरस्कार फक्त बेहरिंग यांना देण्यात आला. एर्लिचनं जास्त वाद न घालता आपल्या अँटीबॉडीजच्या व्हॅलेन्सीवर संशोधनावर लक्ष केंद्रित केलं. व्हॅलेन्सी म्हणजे अँटीबॉडीज किती रेणूंशी जोडून घेतात, यावर त्या लसीची परिणामकारक ठरते. याची शास्त्रशुद्ध मांडणी केल्यामुळं एर्लिचला देखील १९०८ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं.
नोबेल पारितोषिक घ्यायला पॉल एर्लिच स्टॉकहोममध्ये पोचले. इथं एक गमतीशीर किस्सा घडला. नोबेल विजेत्यांना एक नोबेल व्याख्यान द्यायचं असतं आणि यासाठी त्यांनी काही दिवस आधी जायचं असतं, त्याप्रमाणं पॉल एर्लिच तिथं गेले होते. एक पत्रकार त्यांच्या हॉटेलमधील रूममध्ये आला आणि त्यानं मुलाखत घेऊ का? असं विचारलं. एर्लिच अर्थातच हो म्हणाले. पत्रकारानं त्यांना अनेक प्रश्न विचारले. ते सर्व प्रश्न तत्त्वज्ञान विषयातील होते. मात्र प्रत्येक तत्त्वज्ञानाच्या प्रश्नाचं उत्तर देताना एर्लिच त्याची सांगड औषधनिर्मिती शास्त्रासोबत घालत होते. तासाभराची मुलाखत झाल्यावर पत्रकारानं निरोप घेताना वाक्य उच्चारलं की, “प्रा. यूकेन तुम्हाला भेटून खूप आनंद झाला.” त्यावर एर्लिच म्हणाले, “तुम्हाला प्रा. यूकेन हवे असतील तर शेजारच्या रूममध्ये जा. म्हणजे तुम्हाला जास्त आनंद होईल.” त्यावर्षी तत्त्वज्ञानाचं नोबेल प्रा. यूकेन यांना मिळालं होतं आणि पत्रकार चुकीच्या रूममध्ये आला होता. मात्र तत्त्वज्ञानाच्या प्रश्नांवर एर्लिच यांनी एक तास किल्ला लढवला होता. मजाक है क्या?
नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर एर्लिच यांचं महत्व वाढलं. त्यांना खुद्द जर्मन सम्राटानं सांगितलं की, “तुम्ही कर्करोगावर काम करा.” त्यासाठी एक्सपेरिमेंटल थेरपी या संस्थेशी संलग्न कर्करोग संशोधन विभागाची स्थापना झाली. एर्लिच यांनी आधीच स्पष्ट सांगितलं की, “कर्करोग संशोधन हे मूलभूत संशोधन आहे आणि तात्काळ काही ब्रेक थ्रू मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये.” त्यांच्या संशोधनातून असं दिसून आलं की जेव्हा ट्युमर पेशी एक पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात, तेव्हा त्यांची घातकता वाढते. प्राथमिक ट्युमर काढून टाकल्यास कर्करोगाचा प्रसार झपाट्यानं वाढतो हेही त्यांना समजलं. त्यांनी कर्करोग संशोधनात जीवाणूशास्त्रीय पद्धतींचा वापर केला आणि लसीकरणासारख्या पद्धतीने कमकुवत कर्करोग पेशी इंजेक्शनद्वारे देऊन प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थात हा प्रयोग अयशस्वी झाला.
कर्करोग हा साध्या जंतूसारखा बाहेरचा पाहुणा नसून, तो आपल्या शरीराच्याच पेशींमधून तयार होत असतो, त्यामुळं त्याच्याविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करणं अवघड असतं हे त्यांच्या लक्षात आलं. एर्लिच यांनी आपलं लक्ष्य केमोथेरपीवर केंद्रित केलं. मलेरियावर ज्याप्रमाणं क्विनाइन हे औषध वापरलं जातं, तसंच काहीसं “मिथेलिन ब्ल्यू” हे केमिकल वापरून प्रभावी पण कमी दुष्परिणाम असलेलं औषध तयार करावं, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी वेगवेगळ्या संयुगांच्या शास्त्रीय चाचण्या घेतल्या. कर्करोगाचे सर्व रोगजंतू पूर्णपणे नष्ट करणारा उपचार त्यांना अभिप्रेत होता. एर्लिच यांनी असा विचार मांडला की जर एखादं संयुग विशिष्ट रोगजंतूंना लक्ष्य करू शकतं, तर त्याच्यासोबत विषारी घटक जोडून त्या जंतूंना नष्ट करता येईल. यालाच त्यांनी “मॅजिक बुलेट” असं नाव दिलं. जंतूंना गोळी घालून मारण्याची त्यांची कल्पना काही दशकात शक्य झाली.
त्यांनी सिफिलिस निर्माण करणाऱ्या स्पायरोकीट जीवाणूंवर सल्वर्सन नावाचं औषध सन १९१० मध्ये शोधलं. त्यातच सुधारणा करून पुढच्या वर्षी नवसल्वर्सन हे औषध विकसित झालं. जोवर पेनिसिलीनचा शोध लागला नव्हता, तोवर नवसल्वर्सन या औषधाला पर्याय नव्हता. मात्र कुणीतरी अफवा पसरवली की सल्वर्सन औषध घेईल त्याला लैंगिक कमजोरी येईल. काही लोकांनी आरोप केला की हे औषध ज्यू धर्माविरुद्ध आहे,आर्थिक प्राप्तीसाठी एर्लिच हे करत आहे. एर्लिचचा सहकारी पॉल उहलेनहुथ यानं तर दावा केला की, “हे माझे संशोधन एर्लिचनं चोरलं आहे.” असा गदारोळ उठला असतानाच या औषधाच्या क्लिनिकल चाचण्यांदरम्यान काही रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे “एर्लिच हे कुठल्याही मर्यादा पाळत नाहीत” असा आरोप झाला. १९१४ मध्ये त्यावर खटला चालला आणि गंमत म्हणजे एका प्रमुख आरोपकर्त्याला न्यायालयात दोषी ठरवलं गेलं आणि एर्लिच निर्दोष सुटले. पण या सर्व प्रकरणात एर्लिच मानसिकदृष्ट्या खूप खचले. पुढच्याच वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. फ्रँकफुर्टमधील ज्यू स्मशानभूमी येथे त्याला चिरनिद्रा देण्यात आली.
अवघं ६१ वर्षांचं आयुष्य पॉल एर्लिच यांना लाभलं. त्यांच्या संशोधनाचा धडाका पाहता त्यांना पर्सनल आयुष्यासाठी खूप कमी वेळ देता आला असेल, हे उघड आहे. सन १८८३ मध्ये पॉल एर्लिच यांनी हेडविग पिंकस या तरुणीशी लग्न केलं. हेडविग ही उद्योगपती घरातील मुलगी होती. त्यांना स्टीफनी आणि मरियाना अशा दोन मुली झाल्या. लग्न झाल्यावर हेडविगने पॉलला विचारलं की, “तुझा थीसिस कुठं आहे.”अर्थातच पॉलला माहित नव्हतं, त्यांनी काही प्रबंध जपून ठेवला नव्हता. मग नाना खटपटी करून, सर्व विद्यापीठांना संपर्क साधून हेडविगनं त्या प्रबंधाची कॉपी मिळवली आणि जपून ठेवली. तेव्हाच तिच्या लक्षात आले की पॉल अशा बाबतीत कच्चा आहे. सासूप्रमाणे तिनंदेखील संसाराचा लगाम स्वतःच्या हाती ठेवला. मुलींचा सांभाळ,शिक्षण या सर्व गोष्टीत निर्णय घेतले. आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या पाच नातवंडांसोबत खेळण्याची संधी पॉलला मिळाली. नातवंडांना घेऊन ते प्रयोगशाळेत जात असत.
पॉल एर्लिच २० ऑगस्ट १९१५ रोजी मरण पावले. मात्र आजही पॉल एर्लिच हे नाव विज्ञानजगतात आदरानं घेतलं जातं. त्यांनी प्रत्यक्ष कर्करोगावर औषध शोधलं नसलं तरी ते कसं शोधता येईल याचा आदर्श रोडमॅप घालून दिला. पॉल एर्लिच यांनी तर्काच्या जोरावर केमोथेरपी आणि टार्गेट बुलेट या संकल्पना मांडल्या. त्याची मांडणी अतिशय तर्कशुद्ध होती. म्हणून आज तिचं महत्व आपल्याला वाटत आहे. आज त्यांच्या नावानं अनेक संस्था आणि औषधालयं आहेत, शेकडो शाळा आणि महाविद्यालयं आहेत. १९७० मध्ये चंद्रावरील एका विवराला (crater) एर्लिच यांचं नाव देण्यात आलं आहे. एर्लिचच्या जीवनात अनेक वेळा त्याच्यावर अन्याय झाला. मात्र मृत्यूनंतर देखील नियतीनं एर्लिच यांची पाठ सोडली नाही.
एर्लिच यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित “डॉ. एर्लिच’ज मॅजिक बुलेट” नावाचा सिनेमा सन १९४० मधे अमेरिकेत तयार करण्यात आला. या चित्रपटाला सर्वोत्तम मूळ पटकथेच्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळालं होतं. हा सिनेमा आला, तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं. त्यामुळं एका ज्यू वैज्ञानिकाचा गौरव करणारा हा सिनेमा एर्लिचच्या मायदेशात, जर्मनीत दाखवायला बंदी होती. पहिलं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा ज्या पॉल एर्लिचनं जर्मनीच्या धोरणांना पाठिंबा देणाऱ्या पत्रावर सही केली होती, तेच पॉल एर्लिच दुसऱ्या महायुद्धात ज्यू अर्थात दुय्यम नागरिक ठरले होते. एर्लिचसाठी त्यांचं काम हेच त्यांचा धर्म होता, त्यांनी कधी धार्मिक कार्यक्रमाला वेळ काढला नाही. मात्र मेल्यानंतर त्यांच्याच देशातील लोकांनी त्यांना ज्यू धर्मीय ठरवून नाकारलं. ज्या सिनेमात जर्मनीमध्ये एका डॉक्टरनं कशी वैज्ञानिक प्रगती साधली याचं चित्रण होतं, तोच सिनेमा पाहणं जर्मनीत गुन्हा ठरलं होतं. कालाय तस्मै नम: !!
.

Comments
Post a Comment