व्हर्नर फॉर्समन : दिल का डॉक्टर

व्हर्नर फॉर्समन : दिल का डॉक्टर



हृदय.. दिल.. काळीज म्हणजे जगातील प्रत्येक भाषेमधील अगणित कवी, शायर मंडळींचं भांडवल. कुणी या काळजावर कशा सुगंधी जखमा झाल्या आहेत याचं वर्णन करतो तर कोणी आपल्या प्रेयसीसाठी काळजात किती मोठं घर केलं आहे याचं वर्णन करतों. प्रेम व्यक्त करायचं असो, विरहाची वेदना सांगायची असो, धैर्याची गोष्ट मांडायची असो किंवा माणुसकीचं महत्त्व सांगायचे असो, शब्द शेवटी येऊन हृदयाजवळच थांबतात. पण विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर हे कवींचं भांडवल असलेलं हृदय म्हणजे प्रत्यक्षात एक अद्भुत जैविक पंप आहे. आपल्या मुठीएवढ्या आकाराचा हा स्नायू दिवसरात्र अथक मेहनत करत रक्त शरीरभर पाठवत असतो. एका दिवसात हृदय सुमारे लाखभर वेळा धडधडतं आणि हजारो लिटर रक्त शरीरात फिरवतं. आपल्याला कधी प्रेम, राग, भीती किंवा आनंद वाटतो तेव्हा काळजाचे ठोके वाढतात, जणू काही भावनांची नोंद त्यात होत असते. 

म्हणूनच हृदय कवी आणि शास्त्रज्ञ या दोघांनाही मोहात पाडतं. कवी लोक आपल्या हृदयात घुसण्यासाठी प्रेयसीला रस्ता वगैरे बनवून देतात, त्यावर रेड कार्पेट वगैरे अंथरतात. “दिल की गेहराई मे झाक के देख, तू ही तू है” वगैरे म्हणतात. मात्र एक डॉक्टर असा होता, ज्यानं सर्वप्रथम हृदयात कॅथेटर म्हणजे नळी घालून हृदयाचा तळ शोधून काढला. विशेष म्हणजे हा पहिला प्रयोग त्यानं स्वतःवरच केला होता. सहकारी डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की अशी जोखीम घेणं जीवावर बेतेल. मात्र त्याला आपल्या अभ्यासावर विश्वास होता. त्यानं हा प्रयोग यशस्वी केला आणि त्यानंतर जगभर कॅथेटरायझेशन सुरू झालं. त्यामुळे आजवर ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी करून कोट्यवधी रुग्णांचे जीव वाचले आहे. कॅथेटरायझेशनचा प्रयोग स्वतःवर करणारा, आणि त्यासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारा हा धाडसी डॉक्टर होता व्हर्नर फॉर्समन!!

जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये २९ ऑगस्ट १९०४ रोजी व्हर्नरचा जन्म झाला. ज्युलियस फॉर्समन आणि एमी हिंडनबर्ग या जोडप्याचं हे एकमेव अपत्य! ज्युलियस हा वकील होता, फॉर्समन मंडळी फिनलंडमधून स्थलांतर करून इंग्लंड, हॉलंड, रशिया आणि जर्मनी या देशांमध्ये स्थायिक झाली, तेव्हा ज्युलियसचे वडील जर्मनीत आले होते. एमी मात्र पक्की प्रुशियन होती. जुलियसच्या वडिलांनी उत्तम व्यवसाय करून भरपूर पैसा कमावला होता, ज्युलियसची वकिलीदेखील चांगली चालली होती त्यामुळं घरात सुबत्ता होती. व्हर्नरचे बालपण मजेमध्ये गेलं. मात्र १९१४ मध्ये पहिलं जागतिक महायुद्ध सुरू झालं. ज्युलियसला सैन्यात सामील होण्याचा आदेश मिळाला आणि तो युद्धासाठी पूर्व आघाडीवर गेला. दोन वर्षांनी तो युद्धात शहीद झाल्याची बातमी घरी आली. त्या वेळी व्हर्नर अवघा बारा वर्षाचा होता. आई आणि आजी या दोन कणखर स्त्रियांच्या सावलीत तो लहानाचा मोठा झाला. 

व्हर्नर लहान असताना एकदा त्यानं वडिलांच्या टेबलवरील पेन्सिल परवानगी न घेता वापरली होती. त्यासाठी त्याला खूप बोलणी खावी लागली. कारण ती पेन्सिल सरकारी मालमत्ता होती आणि वैयक्तिक कामासाठी वापरणे चुकीचं होते. या गोष्टीचा त्यानं आयुष्यभर धडा घेतला आणि प्रामाणिकपणा, त्याग, निष्ठा, सचोटी हे गुण त्यानं आयुष्यभर जपले. त्याचं प्राथमिक शिक्षण बर्लिनमधील स्थानिक शाळेत झालं. व्हर्नरचे एक काका जवळच्या गावामध्ये डॉक्टरकी करत होते. त्यांनी व्हर्नरला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मदतीनं माध्यमिक शिक्षणासाठी “अस्कानिशे जिम्नॅझियम” मध्ये व्हर्नरला दाखल करण्यात आलं. जर्मनीमध्ये उच्च दर्जाची माध्यमिक शाळा असेल, तर तिला जिम्नॅझियम असं म्हणतात. 

ज्युलियसची इच्छा होती की आपल्या मुलानं अस्कानिशे जिम्नॅझियम मध्ये शिकावं. ती इच्छा त्याच्या मृत्यूनंतर पूर्ण झाली. इथं व्हर्नरला ग्रीक आणि लॅटिन भाषा, इतिहास, मानववंशशास्त्र, धर्म, साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचं विस्तृत ज्ञान मिळालं. ग्रीक आणि रोमन संस्कृतीवर आधारित पाश्चात्त्य मूल्यं शिकायला मिळाली. यासोबतच त्याचं व्यक्तिमत्त्व कणखर होऊन स्वतंत्र विचार करण्याची सवय विकसित झाली. मात्र ही शाळा अतिशय कडक प्रुशियन शिस्तीची होती, याविरुद्ध व्हर्नर वेळोवेळी बंड देखील करत होता.‌ शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट जशी आहे तशी स्वीकारण्याऐवजी व्हर्नर “असं का?” हा प्रश्न विचारत असे. काही शिक्षकांना त्याची ही सवय आवडत नसे. व्हर्नरला निसर्ग आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकणं अधिक आवडत असे. त्यामुळं पुस्तकातील शिक्षणाबरोबरच तो बाहेर भटकणं, झाडं लावणं, बागकाम करणं यामध्ये रमायचा.

त्याच्या या शाळेमध्ये विज्ञान सोडून इतर सर्व विषयांना महत्त्व होतं, याचंदेखील व्हर्नरला वाईट वाटायचं. सुदैवानं त्याला तीन वर्षाचा एक ऑप्शनल अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळाली. माध्यमिक शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यानं हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि विज्ञानाबाबत स्वतःला अपडेट करून घेतलं. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर काकांच्या सल्ल्यानुसार व्हर्नरनं वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. १९२२ मध्ये त्यानं बर्लिनमधील हम्बोल्ट विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण सुरू केलं. मात्र निसर्गात रमणाऱ्या या मुलाला शस्त्रक्रिया पाहणं खूप जड गेलं. रक्त आणि जखमा पाहून त्याचं डोकं गरगरायचं. त्यामुळं आपण कदाचित चांगला डॉक्टर होणार नाही असं त्याला वाटायचं. हा विचार एवढा प्रबळ झाला की त्यानं वैद्यकीय शिक्षण सोडण्याचा निर्णय देखील घेतला. मात्र काकांनी त्याची समजूत काढली. कालांतरानं व्हर्नरला रक्त आणि जखमा पाहायची सवय देखील झाली. किंबहुना मानवी शरीर कसं कार्य करतं याबद्दल त्याची उत्सुकता वाढत गेली.

हम्बोल्ट विद्यापीठाचं एक वैशिष्ट्य होते की त्यांची अनेक शिक्षणकेंद्रं आणि रुग्णालयं होती. त्यामुळं विद्यार्थ्यांना कोणत्या प्राध्यापकांकडून, काय आणि कुठं शिकायचे हे स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. त्या काळात बर्लिनमधील वैद्यकीय शिक्षण हे जगात सर्वात अवघड आणि इथले प्राध्यापक हे जर्मनीतील सर्वोत्तम डॉक्टर आणि संशोधक मानले जात होते. त्यापैकी अनेकांची जगभर ख्याती होती. व्हर्नर अत्यंत जिज्ञासू आणि बुद्धिमान होता. त्यामुळं त्यानं या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. प्रत्येक सत्रात शक्य तितक्या उत्कृष्ट प्राध्यापकांकडून शिकण्याचा प्रयत्न करत त्यानं उच्च दर्जाचं वैद्यकीय शिक्षण मिळवलं. १९२८ मध्ये त्यानं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच मोकळा वेळ मिळाला की काकांसोबत राहून त्यानं रुग्णांची तपासणी, निदान आणि उपचार हे सर्व गोष्टी बालकाईनं शिकल्या होत्या, त्यामुळे पदवी मिळाली तेव्हा तो इतर विद्यार्थ्यांपेक्षा अधिक कुशल डॉक्टर झाला होता. .

काकानं त्याला शिकवलं होतं की रुग्णांबद्दल सहानुभूती ठेवायची आणि त्यांची शक्य तेवढी काळजी घ्यायची. रुग्ण कोणत्याही वर्गातील असो, त्याला मदत करणं हे डॉक्टरचं कर्तव्य आहे. व्हर्नरनं हे तत्त्व आयुष्यभर पाळलं. अनेकवेळा रुग्णाच्या हितासाठी त्यानं आपली नोकरी किंवा प्रतिष्ठा धोक्यात घालण्यासही मागंपुढं पाहिलं नाही. बाकीचे डॉक्टरमध्ये आणि त्याच्यामध्ये एक बदल होता की तो आपल्या कामाकडं डॉक्टर आणि वैज्ञानिक या दोन्ही दृष्टिकोनातून पाहत असे. तो म्हणायचा की “आपण एवढे पेशंट पाहतो आणि त्यांना औषध देतो हा एक प्रयोगच आहे. त्यामुळं त्याचं निरीक्षण, अनुमान इत्यादी गोष्टी व्यवस्थित लिहून ठेवल्या पाहिजेत.” आपण रोजच्या आयुष्यामध्ये देखील अनेक प्रयोग करत असतो. अगदी स्वयंपाक करणं असो किंवा झाडाला पाणी घालणं, प्रत्येक गोष्ट प्रयोगच आहे. व्हर्नर स्वतः देखील लिहायचा आणि सहकाऱ्यांना देखील प्रेरणा द्यायचा. तो खऱ्या अर्थानं क्लिनिकल सायंटिस्ट होता. 

प्राथमिक वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला मेडिसिनमध्ये रेसिडेन्सी करायची होती. यकृताच्या अर्काचे जास्त प्रमाणात सेवन केल्यावर शरीरावर काय परिणाम होतात यावर त्याचा प्रबंध होता. प्रसिद्ध डॉक्टर जॉर्ज क्लेम्पेरर हे त्याला संशोधनासाठी मार्गदर्शन करणार होते. त्यांनी व्हर्नरला मेडिसिन रेसिडेन्सी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण होऊ शकलं नाही. रेसिडेन्सी मिळेल मात्र पगार मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि व्हर्नरला तर पैशाची गरज होती. त्यामुळं त्यानं सर्जरीची रेसिडेन्सी स्वीकारली. बर्लिनजवळच्या छोट्या शहरात असलेल्या ऑगस्टे विक्टोरिया हॉस्पिटलमध्ये त्याची सेवा सुरू झाली. रिचर्ड श्नायडर यांच्या रूपानं त्याला इथं सर्जरीतील उत्तम मार्गदर्शक भेटला. त्यांनी अनेक प्रसंगांमध्ये व्हर्नरची बाजू सावरून घेतली, पाठराखण केली. 

वैद्यकीय शिक्षण घेताना व्हर्नरला शिकवण्यात आलं होतं की घोडे आणि इतर प्राण्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅथेटर घालून हृदयातील दाब मोजण्याचे काही प्रयोग संशोधकांनी केले आहेत. तेव्हापासून त्याच्या मनामध्ये एक कल्पना आली होती की माणसांच्या हृदयामध्येही कॅथेटर घालून त्याची तपासणी करता येईल आणि औषधंही थेट हृदयाजवळ सोडता येतील. छातीवर टकटक करून तपासणी म्हणजे परक्युषण, स्टेथोस्कोपनं ऐकणं म्हणजे ऑस्कलेशन, एक्स-रे आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम यांपेक्षा अचूक निदान करता येईल. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून जेव्हा त्यानं नोकरी सुरू केली, तेव्हा त्याने अनेकजणांना आपली ही कल्पना बोलून दाखवली. रिचर्ड श्नायडर त्याला सल्ला द्यायचे की आधी प्राण्यांवर प्रयोग करून पहा. मात्र वयाच्या गध्दे पंचवीशीमध्ये असलेल्या व्हर्नरला वाटायचं की प्राण्यांवर प्रयोग करणं म्हणजे वेळेचा अपव्यय करणं. अखेरीस त्यानं थेट स्वतःवरच प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. 

व्हर्नरनं आपल्या डाव्या हाताच्या क्यूबिटल व्हेनमध्ये सुई टोचली. त्यानं त्यातून सुमारे ४ शैरियर (१.३ मिमी) जाडीचा कॅथेटर आत घातला. कॅथेटर सुमारे ३५ सेंटीमीटर आत नेला. मात्र त्यांचा सहकारी पीटर याला हा प्रयोग धोकादायक वाटल्यामुळं तो थांबवण्यात आला. मग दुसरा प्रयोग करताना त्यानं आपल्या विश्वासातल्या गेर्डा डिट्झेन या ऑपरेशन थिएटरमधील नर्सला मदतीला घेतल. व्हर्नरनं तिला सांगितलं, “आपण एका महत्त्वाच्या प्रयोगासाठी माझ्या शिरेत कॅथेटर घालणार आहोत.” गेर्डा त्याला म्हणाली की “प्रयोग करायचा असेल तर माझ्यावर करा.” व्हर्नरनं तिला ऑपरेशन टेबलला बांधून ठेवलं आणि तिच्यावर ऑपरेशन करतोय असं दाखवलं. पण प्रत्यक्षात त्यानं स्वतःच्या हातातील शिरेत कॅथेटर घालण्याचा प्रयोग सुरू केला आणि कॅथेटर हळूहळू हृदयाकडं ढकलला.  

काही क्षणानंतर गेर्डाच्या लक्षात आलं की आपल्याला गुगली दिली आहे. मात्र तोवर व्हर्नरचं काम झालं होतं. कॅथेटर ६५ सेंटीमीटर आत, हृदयात उजव्या कर्णिका (ॲट्रियम) पर्यंत गेला होता. कॅथेटर हृदयात असतानाच ती दोघं ऑपरेशन थिएटरमधून खाली एक्स-रे रूममध्ये चालत गेली आणि त्यांनी हृदयाचे एक्स-रे घेतले. यावेळी व्हर्नरला शिरेत उष्णतेची जाणीव झाली. वेगस नर्व उत्तेजीत झाल्यामुळं हलकासा खोकला देखील आला. त्यांचा एक्स-रे काढून होत नाही, तोवर पीटर देखील तिथं आला आणि त्यानं व्हर्नरला खूप झापलं. तासाभरात संपूर्ण रुग्णालयात ही बातमी पसरली. हा इतिहासातील पहिला यशस्वी कार्डियाक कॅथेटरायझेशन प्रयोग होता. श्नायडर यांनी सल्ला दिला की “संशोधन पत्रिकेत या प्रयोगाची मांडणी करताना कॅथेटरायझेशन हे रोगनिदानापेक्षा उपचारासाठी कसं उपयुक्त होईल यावर भर दे.” 

त्यासाठी हा प्रयोग प्रत्यक्ष एका पेशंटवर करण्याचं ठरलं. त्यांच्या रुग्णालयामध्ये एक स्त्री प्रसूतीनंतर झालेल्या संसर्गामुळं अत्यंत गंभीर आजारी होती. तिचा रक्तदाब खूप कमी झाला होता आणि ती जवळजवळ मरणासन्न अवस्थेत होती. तिच्या हृदयावर थेट ॲड्रेनालीनचा परिणाम होतो का हे पाहण्यासाठी व्हर्नरन कॅथेटरायझेशनद्वारे औषध हृदयात सोडलं. हीच केस त्यानं आपल्या संशोधन पेपरमध्ये मांडली आणि सिद्ध केलं की “मानवी हृदयात कॅथेटर घालणं आणि औषधे थेट हृदयापर्यंत पोहोचवणं तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. त्यामुळं भविष्यात हृदयाच्या रोगांचे निदान आणि उपचार अधिक अचूक होऊ शकतात.” नोव्हेंबर १९२९ मध्ये व्हर्नरनं या प्रयोगावर संशोधन लेख प्रकाशित केला. गंमत म्हणजे त्याचा हा लेख प्रसिद्ध झाला आणि त्याच्यावर चौफेवर टीका झाली. “हा प्रयोग क्रूर आहे” इथपासून “हा प्रयोग मी सतरा वर्ष आधीच केला आहे, यानं तो चोरला आहे” इथपर्यंत सगळे आरोप झाले. 

फॉर्समनच्या प्रयोगानंतर पुढील काही वर्षांत जगभरातील अनेक देशांत या विषयावर संशोधन झालं. या ठिकाणी हृदयातील रक्तप्रवाह आणि हृदयाचे कार्य अभ्यासण्यासाठी कॅथेटर वापरले गेले. यामुळे आधुनिक कार्डिओलॉजीची पायाभरणी झाली. व्हर्नरने देखील यावर आणखी प्रयोग केले. त्यानं उजव्या कर्णिकेमध्ये आयोडीन मिसळून हृदयाचे एक्स-रे चित्र मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याला स्पष्ट चित्र मिळालं नाही. मात्र इतर संशोधकांनी अधिक दाट सोडियम बायोडाइड वापरून पहिला अँजिओकार्डिओग्राम मिळवला. अर्थात काही वैज्ञानिक आणि डॉक्टरांनी या पद्धतीला विरोध केला होता. आर्थर ग्रोलमन यांनी असा युक्तिवाद केला होता की कॅथेटर घातल्यामुळं रक्तात थ्रोम्बस (गाठी) तयार होऊ शकतात. त्यामुळं पद्धत धोकादायक आहे. शिवाय हे करताना रुग्ण घाबरल्यामुळं हृदयाचे मोजमाप अचूक येणार नाही.  

व्हर्नरच्या प्रयोगानंतर सुमारे दहा वर्षांनंतर अमेरिकन संशोधक आंद्रे कोर्नंड आणि डिकिसन रिचर्ड यांनी सिद्ध केलं की हृदयात कॅथेटरायझेशन करणं सुरक्षित आणि अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे आधुनिक कार्डिओलॉजीचा पाया मजबूत झाला. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत अनेक जणांवर प्रयोग झाले आणि ही पद्धत अधिक सुरक्षित होत गेली. आज हृदयातील रक्तदाब मोजणे, रक्तवाहिन्यांची तपासणी तसेच अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सारख्या उपचारांमध्ये कॅथेटरायझेशन वापरलं जात आहे. व्हर्नरसोबत आंद्रे कोर्नंड आणि डिकिसन रिचर्ड यांनादेखील १९५६ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं आहे. मात्र त्याआधी व्हर्नरला प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. त्याला अनेक ठिकाणी नोकरी नाकारली गेली, अनेक ठिकाणी कामावरून काढण्यात आलं. कारण तो काळाच्या पुढंच काही मांडत होता.

व्हर्नरचा लेख प्रसिद्ध झाला, तेव्हा तो बर्लिनमधल्या प्रसिद्ध चॅराइट हॉस्पिटलमध्ये काम करत होता. तिथले फर्डिनांड सॉरब्रुच हे प्रसिद्ध शल्यचिकित्सक हा लेख वाचून खूप चिडले आणि म्हणाले “तू सर्कसमध्ये व्याख्यान देऊ शकतोस, पण जर्मनीच्या प्रतिष्ठित विद्यापीठात तुझी जागा नाही.” त्यांनी व्हर्नर फॉर्समनला लगेच नोकरीवरून काढून टाकलं. १९३० मध्ये श्नायडर यांच्या मदतीनं त्याला बर्लिनमधल्या न्यूकोलन हॉस्पिटलमध्ये प्रयोग करण्याची परवानगी मिळाली, मात्र इथं त्यानं माणसांवर नाही तर प्राण्यांवर प्रयोग करायचे होते. त्यानं ससा आणि कुत्रा यांच्यावर प्रयोग केले. मात्र या प्रयोगातून त्याला अपेक्षित असं काही मिळत नव्हतं. इथं त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की त्याला एकट्याला खूप काही करणं शक्य नाही, कुणाची तरी मदत घ्यावी लागेल. फॉर्समन पुन्हा एकदा आपल्या जुन्या मार्गदर्शकाकडं, जॉर्ज क्लेम्पेरर यांच्याकडं गेला. 

मात्र इथं त्याला त्याचा स्पष्टवक्तेपणा नडला. क्लेम्पेरर त्यावेळी थोरोट्रास्ट (थोरियम डायॉक्साईड) नावाच्या किरणोत्सारी पदार्थावर संशोधन करत होते. यकृत आणि प्लीहाचे अधिक चांगल्या प्रकारचे एक्स-रे मिळवण्यासाठी हा पदार्थ वापरला जायचा. फॉर्समनने त्यांना सांगितलं की हा पदार्थ वापरणं घातक आहे, कारण हा शरीरातून कधीच नष्ट होणार नाही, आयुष्यभर किरणोत्सार करत राहील. वरिष्ठ प्राध्यापकांवर अशी टीका करणं हा त्या काळातील खूप मोठा गुन्हा होता. त्यामुळे क्लेम्पेररनं फॉर्समनला कामावरून काढून टाकलं. मुल्ला की दौड मज्जिद तक! पुन्हा चॅराइट हॉस्पिटलच्या फर्डिनांड सॉरब्रुचची मनधरणी करून तिथं नोकरी मिळवायला लागली. मात्र आता सॉरब्रुचनं त्याला अतिशय पिळून घेतलं. तो स्टाफ सर्जन होता, पण आता त्याला जवळजवळ इंटर्नसारखं काम करावं लागलं. सतत क्लिनिकल काम असल्यामुळं संशोधनासाठी वेळच नाही. एकच वर्षात “तू काय कामाचा नाही असं म्हणत“ त्याला पुन्हा काढून टाकण्यात आलं. 

या घटनेनंतर फॉर्समनचं कार्डिओलॉजीमध्ये करिअर करण्याचं स्वप्न भंगलं. यानंतर त्यानं आपलं करिअर बदललं आणि सर्जरी, युरोलॉजी या क्षेत्रात काम सुरू केलं. जर्मनीमध्ये हा काळ खूप स्थित्यंतराचा होता. साम्यवादाचा प्रभाव कमी करण्यासाठी साम्राज्यवाद वाढू लागला. बिस्मार्कनं नवा राष्ट्रवाद जन्माला घातला, ज्याची परिणीती पहिल्या महायुद्धात झाली. पहिल्या महायुद्धातील जखमांमुळे ॲडॉल हिटलर याला नाझीवाद वाढवण्याची संधी मिळाली आणि जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईमध्ये ढकललं गेलं. हिटलरच्या भाषणाच्या प्रभावामध्ये येऊन फॉर्समनदेखील नाझी पक्षाचा सदस्य झाला. ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती असं तो नंतर कबूल करायचा. मात्र त्यावेळी त्याला एका सक्षम जर्मनी देशाचं स्वप्न दिसत होतं. नुकतंच, १९३३ मध्ये त्याचं एका डॉक्टर मुलीशी लग्न झालं होतं आणि त्याला संसारासोबत स्वतःचं करियर सेट करायचं होतं.

नाझी पक्षाचा सदस्य असला तरी देखील डॉक्टर म्हणून त्यानं काही गोष्टींवर ठाम भूमिका घेतली. फॉर्समन १९३७ मध्ये बर्लिनमधील मोआबिट हॉस्पिटलमध्ये उपप्रमुख शल्यचिकित्सक या पदावर काम करत असताना त्याला भेटायला कार्ल गेबहार्ट आला, जो हायनरिक हिमलरचा डॉक्टर होता. हिमलर हा नाझी पक्षांमध्ये हिटलर नंतर सर्वात महत्त्वाची व्यक्ती मानला जायचा. गेबहार्टनं फॉर्समनला सांगितलं की तो संशोधनासाठी माणसं उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणजे प्रत्यक्षात ज्यू कैद्यांवर प्रयोग करण्याचा प्रस्ताव होता. फॉर्समनने हा प्रस्ताव ताबडतोब नाकारला. त्यांच्या अगतिकतेचा फायदा आपल्या संशोधनासाठी घेणं त्याला योग्य वाटलं नाही. एवढंच नाही तर नाझी काळामध्ये ज्यू लोकांवर उपचार करण्यास बंदी असताना देखील फोर्समन आपल्या वैद्यकपेशाच्या शपथेला जागून त्यांच्यावर उपचार करत राहिला.

१९३९ मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा फॉर्समन जर्मन सैन्यात डॉक्टर म्हणून दाखल झाला. त्यानं युद्ध संपेपर्यंत सैन्यदलाची साथ दिली, पूर्व आघाडीवरील जखमी सैनिकांना वैद्यकीय सेवा पुरवली. मात्र १९४५ मध्ये युद्ध संपलं आणि युद्धकैदी म्हणून फॉर्समन पकडण्यात आलं. युद्धकैदी छावणीतून एक वर्षानंतर त्याला घरी सोडण्यात आलं. तोवर त्याची बायको डॉ. एलिझाबेथनं ब्लॅक फॉरेस्ट या ग्रामीण भागामध्ये दवाखाना टाकला होता. नाझी सैनिकांना ज्या डॉक्टरांनी मदत केली होती, त्यांना पुन्हा वैद्यकीय पेशा सुरू करण्यास परवानगी नव्हती मात्र १९४८ मध्ये फ्रान्स सरकारनं फॉर्समनला सर्व गुन्ह्यांमधून मुक्त केलं आणि पुन्हा वैद्यकीय सुरू करण्यास परवानगी दिली. १९५१ मधे त्याला सरकारी नोकरी देखील मिळत होती, मात्र तोवर त्याचा कुटुंबाचा पसारा वाढला होता. पत्नीसोबत पाच मुलं आणि एक मुलगी यांचे संगोपन करण्यासाठी सरकारी नोकरी पुरेशी नव्हती, कारण सरकारी नोकरीत पैसा नव्हता. त्यानं ब्लॅक फॉरेस्ट भागातच आपली प्रॅक्टिस सुरू केली. 

१९५६ या वर्षातील नोबेल पारितोषिक जाहीर झालं आणि फॉर्समन अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला. तो सर्व कुटुंबीयांना घेऊन स्टॉकहोमला गेला. त्याच्या मुलांनी लहानपणापासून फक्त गरिबी पाहिली होती, आता ते प्रथमच परदेशात येऊन तिथला झगमगाट पाहत होते. स्वीडनच्या राजाच्या हातून नोबेल पारितोषिक स्वीकारताना तब्बल पंचवीस वर्षाचा संघर्ष फॉर्समनच्या डोळ्यातून वाहू लागला. नंतरच्या काळात त्याचे दिवस थोडे बदलले. १९५८ मध्ये त्याला ड्युसेलडॉर्फ शहरातील एव्हान्गेलिशे क्रांकेनहाउस” हॉस्पिटलमध्ये शल्यचिकित्सा विभागाचं प्रमुखपद मिळालं. १९६९ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यानं इथंच काम केलं. नंतर पुढं दहा वर्षे तो ब्लॅक फॉरेस्टमध्ये सखोल चिंतन करत जगला. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यानं मृत्युदंड, इच्छामरण, अवयव प्रत्यारोपण यांसारख्या अनेक नैतिक विषयांवर आपले विचार मांडले. 

फॉर्समन म्हणायचा की “कुणाही व्यक्तीला मृत्युदंड देणं चुक आहे, न्यायालय चुकू शकते आणि त्यातून एक निर्दोष व्यक्ती मारली जाऊ शकते.” तो इच्छामरण संकल्पनेचा देखील विरोधी होता. कारण तो म्हणायचा “डॉक्टरचं कर्तव्य जीवन वाचवणं आहे, जीवन संपवणं नाही. त्यानं वैद्यकीय सेवा सुरू करताना जी शपथ घेतली आहे, त्याच्या हे विरोधी आहे. डॉक्टरनं रुग्णाच्या वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्याचं जीवन संपवण्यासाठी नाही.” तो पॅसिव्ह युथानसियाचा समर्थक होता, ऍक्टिव्ह युथानसियाचा नाही. अवयव प्रत्यारोपणात तर तो अतिशय नकारात्मक भूमिका घेतो. तो म्हणतो की डॉक्टर-रुग्ण संबंध साधारणपणे दोन व्यक्तींचा असतो, तोवर काय प्रॉब्लेम नसतो. पण या दोघांमध्ये डोनर नावाची तिसरी व्यक्ती येते आणि नैतिक गुंता वाढतो. 

१९६७ मध्ये ख्रिस बर्नाड यांनी जगातील पहिलं हृदयाचं प्रत्यारोपण केलं. यावर फॉर्समन खूप चिडला. तो म्हणायचा की, “श्रीमंत व्यक्तीला अवयव हवे असतील, तर ते उपलब्ध करून देण्यासाठी इच्छामरण किंवा मृत्युदंड यासारख्या गोष्टींना खतपाणी घातलं जाईल. अवयवांसाठी स्पर्धा वाढेल, त्यामुळे मनमानी निर्णय घेतले जातील. एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर दुसऱ्या रुग्णाला मृत्यूच्या खाईत लोटतील.” अर्थातच आज काळाच्या पटलावर त्याची भूमिका चुकीची वाटते. मात्र त्यानं जे जग अनुभवलं, त्यावरून त्याचं तसं मत झालं असेल. नाझी लोकांनी माणसांना माणूस न पाहता एक ऑब्जेक्ट म्हणून कसं पाहिलं होतं, हे त्याच्या डोळ्यासमोर होतं. त्याला मानवाचं आणि त्याच्या अवयवांचं वस्तूकरण करणं थांबवायचं होतं. 

जगातील सर्वात मोठा पुरस्कार मिळून देखील व्हर्नर फॉर्समन अगदी जमिनीवर होता. नेहमीप्रमाणे तो पेशंट पाहत होता आणि तेवढंच काम करत होता. रुग्णांना तर “आपला हा डॉक्टर नोबेल पुरस्कार विजेता आहे” हेच माहीत नसे. तो प्रसिद्धीच्या मागं कधीच नव्हता, आणि त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली देखील नाही. गंमत पहा, २ जून १९७९ रोजी हृदयविकाराच्या आजारानंच या हृदयाच्या डॉक्टराचं निधन झालं. आज या “दिल का डॉक्टर”च्या नावानं एक मोठं रुग्णालय जर्मनीत आहे, ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये त्यानं स्वतःच्या हातानं काळजात कॅथेटर घातला, आणि ज्या एक्स-रे खोलीत फोटो काढले, त्या खोल्या आजही वापरात आहेत. कोट्यवधी लोकांचे जीव वाचवणाऱ्या कॅथेटरायझेशन पद्धतीमुळं तो अजरामर झाला आहेच!! काळजाला हात घालणाऱ्या 

या दिल का डॉक्टरला हृदयाच्या तळापासून सलाम! 

Comments

Popular posts from this blog

गोमू आणि गोमाजीराव

डॉ. येल्लाप्रगडा सुब्बाराव : छोटा डॉक्टर बडा धमाका

दहावीचे व्हाट्सअप ग्रुप