जोसेफ लिस्टर : अँटिसेप्टिक शस्त्रक्रियेचे जनक
जोसेफ लिस्टर : अँटिसेप्टिक शस्त्रक्रियेचे जनक
वाल्देमार हापकिन यांना मानवतेचे रक्षक हे संबोधन सर्वात पहिल्यांदा लॉर्ड जोसेफ लिस्टर यांनी दिलं होतं हे आपण पाहिलं. मात्र स्वतः जोसेफ लिस्टर हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. लंडनमधील रॉयल सोसायटीचं अध्यक्षपद भूषवणारी ही व्यक्ती सुरक्षित निर्जंतुक शस्त्रक्रियेची जनक मानली जाते. एकोणिसाव्या शतकात शस्त्रक्रिया करताना स्वच्छतेकडं फारसं लक्ष दिलं जात नव्हतं. ऑपरेशननंतर जखमांमध्ये पू होणे आणि संसर्ग होणे ही सामान्य गोष्ट होती. काही ठिकाणी तर पू होणं म्हणजे जखम बरी होत असल्याचं चिन्ह आहे असं मानलं जायचं. शस्त्रक्रियेनंतर अनेकवेळा रुग्णांचा मृत्यू होत असे. परंतु जोसेफ लिस्टर यांनी अँटिसेप्टिक पद्धत विकसित करून शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित केली. त्यामुळं त्यांना अँटिसेप्टिक शस्त्रक्रियेचे जनक असं म्हटलं जातं.
भारतामध्ये सुश्रुताच्या काळापासून शस्त्रक्रियेची साधनं अग्नीनं तापवणं किंवा उकळणं, जखम स्वच्छ पाण्यानं किंवा औषधी द्रव्यांनी धुणं यासारख्या गोष्टी केल्या जात होत्या, त्यामुळं संसर्गाचं प्रमाण थोडं कमी व्हायचं. याच पद्धतीनं जगभर वेगवेगळी रसायनं वापरली जायची. मात्र फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चरनं “रोग जंतू पसरवतात” हा सिद्धांत मांडला. तुम्हाला खात्रीशीर सुरक्षित शस्त्रक्रिया करायची असेल, तर तुम्हाला निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे हा विचार पुढं आला. लिस्टरनं शस्त्रक्रियेत जंतू नष्ट करण्यासाठी उपाय शोधण्याचे प्रयत्न केले आणि त्यामध्ये त्याला कार्बोलिक अॅसिड (फिनॉल) हा पर्याय सापडला. या शोधामुळं शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडली. लोकांना निर्जंतुकीकरणाचं महत्त्व समजावं यासाठी लिस्टरला आयुष्यभर पायाला भिंगरी बांधावी लागली. एका शास्त्रज्ञाच्या घरात जन्माला आलेल्या या शास्त्रज्ञाची, शस्त्रक्रियेतील स्वच्छतादूत जोसेफ लिस्टरची कहाणी मोठी रंजक आहे.
जोसेफ लिस्टरचा जन्म ५ एप्रिल १८२७ रोजी वेस्टहॅमजवळ असलेल्या अप्टन गावात झाला. लिस्टर कुटुंबीय पिढीजात व्यापारी होते. जोसेफचे खापरपणजोबा तंबाखूचा व्यापार करण्यासाठी वेस्ट यॉर्कशायरमधून लंडनमध्ये आले होते. जोसेफचे पणजोबा वाइनचा व्यापार करायचे. आजोबांनी घड्याळ दुरुस्तीचं दुकान टाकलं होतं. जोसेफच्या वडिलांनी आजोबा आणि पणजोबा दोघांचे गुण घेतले. ते उपजीविकेसाठी वाइनचा व्यापार करायचे आणि वेळ मिळेल तसं सूक्ष्मदर्शकाची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करायचे. जोसेफ जॅक्सन लिस्टर यांनी सूक्ष्मदर्शकाच्या विकासात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यांनी काही महत्त्वाची गणिती समीकरणं शोधून काढली, ज्यामुळं सूक्ष्मदर्शकासाठी अक्रोमॅटिक लेन्स तयार करणं शक्य झालं. त्यामुळे त्यांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून देखील निवडण्यात आलं होतं. त्यांना इंग्रजीसोबत फ्रेंच, जर्मन आणि लॅटिन भाषा उत्तम प्रकारे होत्या आणि ते चांगले चित्रकार होते. अशा सायंटिस्ट खोपडी बापाचा आपला जोसेफ मुलगा होता.
जोसेफची आई इसाबेला हॅरिस ही क्वेकर पंथाच्या शाळेमध्ये मदतनीस म्हणून काम करायची. तिच्या सात मुलांपैकी जोसेफचा चौथा नंबर होता. जोसेफला एक लहान तर दोन मोठ्या बहिणी होत्या आणि एक मोठा तर दोन लहान भाऊ होते. थेम्स नदीच्या किनारी असलेल्या शांत ठिकाणी त्यांचं मोठं आणि सुंदर घर होतं. हे सर्व कुटुंब अनेक पिढ्यांपासून क्वेकर पंथाचं अनुयायी होतं, किंबहुना त्या परिसरामध्ये बहुतांश लोक क्वेकर पंथाचे अनुयायी होते. या पंथामध्ये धर्मगुरू नसतो की धार्मिक रूढी नसतात. दिखाऊपणा, ऐषआराम टाळून निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे जगणं या पंथामध्ये अभिप्रेत असतं. या पंथानुसार सर्व मानव समान असतात आणि युद्ध ही सर्वात वाईट गोष्ट असते. म्हणजे या पंथामधील मूल्यं अतिशय चांगली आहेत, मात्र एकच अडचण असते की या पंथातील व्यक्तीनं पंथ सोडून दुसऱ्या कुणाशी लग्न नाही करायचं!
जोसेफचं बालपण अतिशय मस्त गेलं. निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या घरात, सहा भावंडांसोबत खेळत, मोकळेपणानं हुंदडत तो लहानाचा मोठा झाला. घरी श्रीमंती तर होतीच याशिवाय सूक्ष्मदर्शकासारख्या अनेक गोष्टी होत्या ज्या कदाचित इतर मुलांना पाहायला मिळणार नाहीत. बाहेरील पानं, फुलं आणि छोटे किडे पकडून आणायचे आणि सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचे हा जोसेफचा आवडता खेळ होता. वडील अर्थातच या खेळायला प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळं लहानपणापासून त्याला स्लाईड बनवता यायला लागल्या. तो या स्लाईडचं व्यवस्थित निरीक्षण करायचा आणि त्याच्या आकृत्या देखील छान काढायचा. त्यांच्या घराजवळ पाणथळ जमीन होती, त्यामुळं तिथं अनेक पक्षी उतरायचे. पशु, पक्षी, झाडं, वनस्पती, फुलं, फळं या सर्वांचं बारकाईनं निरीक्षण करत जोसेफ लहानाचा मोठा झाला. तब्बल अकरा वर्षाचा झाल्यानंतर त्याला शाळेत टाकण्यात आलं. तोवर तो बराच हुशार झाला होता.
क्वेकर पंथाच्या हिचिन शहरातील शाळेत जोसेफ दाखल झाला, जिथं तो दोन वर्ष शिकला. तेरा वर्षाचा झाल्यावर ग्रोव हाऊस स्कुलमध्ये तो शिकू लागला. आसपासच्या सर्व घटकांचं व्यवस्थित निरीक्षण करायचं, ते नोंदवून ठेवायचं, या नोंदींचं योग्य अनुमान काढायचं आणि ते लिखाणामध्ये मांडायचं त्याचं कौशल्य लहानपणापासून विकसित झालं होतं. त्यानं शालेय जीवनामध्ये असतानाच तीसपेक्षा जास्त लेख लिहिले होते, ज्यापैकी चार लेख मानवी सांगाड्यावर होते. यापैकी एका लेखात माकड आणि माणूस यांच्या शरीररचनेतील साम्यावर त्यानं चर्चा केली होती. त्याचा कालखंड लक्षात घ्या, कारण अद्याप चार्ल्स डार्विन यांनी आपला उत्क्रांतीवाद सिद्धांत मांडला देखील नव्हता. शाळेमध्ये चांगले गुण मिळवत त्यानं अभ्यासातील आपली चुणूक दाखवली आणि पदवीच्या शिक्षणासाठी लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये दाखल झाला. तिथं पदवी मिळाल्यानंतर, १८४८ मध्ये त्याचं वैद्यकीय शिक्षण सुरू झालं.
तेव्हा शस्त्रक्रिया करताना अॅनेस्थेशिया देण्याची पद्धत नुकतीच सुरू झाली होती. मात्र अद्याप तिचा प्रचार व्हायचा होता. लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये रुग्णांना शस्त्रक्रियेआधी भूल दिली जात होती. मात्र त्यांचं ऑपरेशन थिएटर एकदम लहान होतं. त्यात एक साहित्य ठेवायचं कपाट, मजबूत लाकडी टेबल, एक गॅस दिवा आणि एक बेसिन होतं. याच ठिकाणी रुग्णांना भूल देणं आणि शस्त्रक्रिया करणं अशी सर्व कामं होत असत. रुग्णांची स्थिती पाहताना लिस्टर यांच्या लक्षात आलं की शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरे होतील की मरतील हे जणू त्यांच्या नशिबावर अवलंबून असे. शस्त्रक्रियेनंतर अनेकदा जखमेवर सूज येणं, पू होणं, त्वचेला संसर्गजन्य आजार होणं तर कधी गँग्रीन होण्याच्या गंभीर समस्या निर्माण होत असत. ऑपरेशन करताना डॉक्टर लोकांकडून काहीतरी चूक होत आहे हे जोसेफच्या लक्षात आलं.
वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यानं अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. इतर विद्यार्थ्यांची तो क्वचित बोलत असे. त्याला एकटं राहून चिंतन करायला आवडायचं. मात्र जेव्हा होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी असा वाद चर्चेमध्ये असायचा, त्यावेळेस तो होमिओपॅथीच्या समर्थकांवर टीका करण्यासाठी बाह्या सरसावून पुढं यायचा. उन्हाळ्यात पोहणं आणि हिवाळ्यात आइस स्केटिंग हे त्याचे आवडते खेळ! १८५२ साली त्याला लंडन विद्यापीठाकडून एम.बी. पदवी मिळाली. अभ्यासाच्या काळात त्यानं काही मूलभूत संशोधन केलं. डोळ्यांच्या आत असलेल्या दोन स्नायूंवर त्याचं संशोधनपर लिखाण प्रसिद्ध झालं. दुसऱ्या एका लेखासाठी त्यानं त्वचेतील अनैच्छिक स्नायूंच्या तंतूंची रचना यावर संशोधन केलं. विद्यार्थी दशेमध्येच त्यानं अनेक देशांमध्ये भ्रमंती केली. प्रवासात येणारी अनुभव डायरीत लिहिण्याचा त्याला छंद होता. भूगर्भशास्त्र, वास्तुकला, लोकांच्या चालीरीती आणि संस्कृती इत्यादी विषयांचं बारकाईने निरीक्षण नोंदवलेल्या, चामड्याच्या कव्हर असलेल्या त्याच्या डायऱ्या आजही जपून ठेवलेल्या आहेत.
विल्यम शार्पे शिक्षकांचा जोसेफ आवडता विद्यार्थी होता. त्यांनीच जोसेफला सल्ला दिला की, “वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तू एडिनबरोमधील प्रसिद्ध शल्यचिकित्सक जेम्स साइम यांना जाऊन भेट. अतिशय ज्ञानी माणूस आहे तो, त्यांच्यासोबत राहून तुला खूप काही शिकायला मिळेल.” शस्त्रक्रियेच्या बाबत एडिनबरो हे लंडनपेक्षा अद्ययावत होतं. तिथं गेल्यानंतर साइम यांनी जोसेफचं स्वागत केलंच, शिवाय सोबत काम करण्याची संधी दिली. रेसिडेंट हाऊस सर्जन म्हणून जोसेफ काम करू लागला. साइम प्रत्येक रुग्णांच्या उपचारात फार हस्तक्षेप करत नसत. त्यामुळे रात्री हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या काही रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय जोसेफ स्वतः घेऊ शकत होता. त्यामुळं त्याला भरपूर अनुभव देखील मिळू लागला. जोसेफ अनेकदा मिलबँक इथं असलेल्या साइम यांच्या घरी जात असत. तिथं जगभरातून येणाऱ्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींशी भेट घडत असे.
मात्र इथंच त्याला त्याची जीवनाची जोडीदार देखील भेटली. साइम यांची मोठी मुलगी ॲग्नेस त्याला मनापासून आवडली, तिलादेखील त्याचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी वाटलं. काही महिन्यांच्या भेटीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपण एकमेकांसाठी बनलेलो आहोत. मात्र इथं एक अडचण होती, जोसेफ क्वेकर पंथाचा अनुयायी होता, त्याला पंथ सोडून बाहेरच्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी नव्हती. जोसेफने काय निर्णय घेतला असेल? हे सांगायची आवश्यक्ता आहे का?? जगभरातील प्रेमी करतात तेच यानं देखील केलं. त्यानं क्वेकर पंथाचा त्याग करून चर्च ऑफ इंग्लंडचा स्वीकार केला. त्यांचा विवाह २३ एप्रिल १८५६ रोजी मिलबँकमध्ये झाला. लग्नानंतर नवविवाहित दांपत्यानं एक महिना इंग्लंडमधील लेक डिस्ट्रिक्ट आणि अप्टन या आपल्या गावी घालवला. त्यानंतर ते तीन महिन्यांच्या युरोप दौर्यावर गेले. हा दौरा केवळ फिरण्यासाठी नव्हता, तर अनेक महत्त्वाच्या लोकांच्या भेटीगाठी घेऊन जोसेफ आपलं ज्ञान वाढवत होता.
एडिनबरोला परत आल्यानंतर त्याला सहाय्यक शल्यचिकित्सक म्हणून जबाबदारी मिळाली. म्हणजे आता त्याला विद्यार्थ्यांसमोर व्याख्यानं द्यायची होती. अर्थात त्याच्या पहिल्या व्याख्यानाला केवळ आठ विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी जखमेला सूज का येते यावर त्याचं स्वतःचं संशोधन देखील सुरू होतं. आजवर त्यानं एकट्यानं अनेक शस्त्रक्रिया केल्या होत्या, मात्र विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शस्त्रक्रिया करताना त्याची धडधड वाढली. पण एकदा काम सुरू केल्यावर त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानं त्या दिवशीच्या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या. नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना त्या शस्त्रक्रियेबाबत स्पष्टीकरणही दिलं. त्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं. सात वर्षात तो रुग्ण आणि विद्यार्थी या सर्वांचा आवडता झाला. मात्र इथं साइम यांच्यापुढं त्याची कारकीर्द झाकोळली जाऊ नये म्हणून जोसेफनं इतर विद्यापीठात नोकरी करावी असं साइम यांनी सुचवलं. ग्लासगो विद्यापीठात शस्त्रक्रियेच्या प्राध्यापकपदाची जागा त्याच्यासाठी उपलब्ध होती.
प्राध्यापकपद स्वीकारताना त्याला लॅटिन भाषेत प्रबंध सादर करावा लागला. हा प्रबंध त्यानं जवळजवळ संपूर्ण रात्र जागून लिहिला आणि एडिनबरोहून ग्लासगोला जाणाऱ्या रेल्वेमध्ये तो पूर्ण केला. अशी घाईगडबड करून शेवटच्या क्षणी काम पूर्ण करणं ही त्याची सवयच होती. त्याच्यावर नेहमी खूप कामाचा ताण असे. त्यामुळं व्याख्यानं लिहिण्यासाठी किंवा इतर कार्यक्रमांची तयारी करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळत नसे. प्रत्यक्ष रुग्णासमोर असताना तो वेळेचं भान विसरत असे आणि त्यामुळं इतर गोष्टींसाठी वेळ काढणं त्याला अवघड व्हायचं. मात्र तरीही त्याची व्याख्यानं अतिशय प्रभावी व्हायची. त्याच्या व्याख्यानाला १८० पेक्षा जास्त मुलं असायची. कदाचित त्या काळातील इंग्लंडमधील सर्व मेडिकल कॉलेजमधील हा सर्वात मोठा आकडा असेल. याच काळात त्यानं क्षयरोगामुळं खराब झालेल्या मनगटाच्या हाडांवर शस्त्रक्रिया या विषयावर एक महत्त्वाचा संशोधन लेख प्रकाशित केला. यामुळे त्याची कीर्ती अधिक वाढली.
त्याकाळात अगदी साधी शस्त्रक्रिया देखील रक्तातील संसर्गामुळं प्राणघातक ठरू शकत होती. ग्लासगो आणि इतर शहरांतील हॉस्पिटलमध्ये मृत्यूदर इतका जास्त होता की काही वेळा संपूर्ण वॉर्ड तात्पुरते बंद करावे लागत. न्युरेमबर्गमधलं तर हॉस्पिटल पाडून टाकण्याचा देखील विचार केला गेला होता. एरिसिपेलस, पायेमिया, सेप्टिसेमिया, हॉस्पिटल गँग्रीन आणि टेटनस यांसारख्या शस्त्रक्रियानंतर उद्भवणाऱ्या रोगांचं कारण नेमकं काय आहे हे कुणालाच नीट समजत नव्हतं. त्या काळात असं मानलं जात होतं की जखमेतील पू हा हवेतील ऑक्सिजनमुळं निर्माण होतो. समस्येच्या मुळांपर्यंत कोणी गेलंच नव्हतं. हॉस्पिटलमधील परिचारिका तुलनेनं स्वच्छ आणि नीटनेटक्या राहत. पण शल्यचिकित्सक आणि त्यांचे सहाय्यक मात्र स्वच्छतेबाबत फारशी काळजी घेत नसत.
सर्जन मंडळी त्यांचा कोट सहा सहा महिने धुवत नसत किंवा बदलत नसत. अनेक वेळा कोट काढून फक्त शर्टाच्या बाह्या वर करून शस्त्रक्रिया केली जात असे. संसर्गजन्य रुग्णांना वेगळं ठेवण्याची पद्धतही नव्हती. परिचारिका आणि सहाय्यक एरिसिपेलससारख्या संसर्गाच्या वॉर्डमधून थेट निरोगी रुग्णांकडे जात असत. शल्यचिकित्सकांना अनेकदा मृतदेहांची तपासणी करावी लागत असे. काही वेळा ते मृतदेहाच्या खोलीतून फक्त हातपाय धुवून थेट ऑपरेशन थिएटरमध्ये जात. एखाद्या व्यक्तीवर अवयव काढण्याची शस्त्रक्रिया केली असता इंग्लंडमध्ये सुमारे ४०% रुग्ण दगावत असत. फ्रान्समध्ये हाच दर ६० टक्के एवढा होता. म्हणजे लढाई लढणाऱ्या सैनिकापेक्षा ऑपरेशन थिएटरमध्ये गेलेल्या रुग्णाला जीवाचा धोका अधिक असायचा. अल्कोहोल, क्लोरीन, ग्लिसरीन, आयोडीन असे विविध अँटिसेप्टिक पदार्थ वापरले गेले, तरी संसर्गावर मात करता येत नव्हती.
कोळशाच्या डांबरातून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असतात, हे सन १८१५ पर्यंत माहित झालं होतं. १८३४ मध्ये फ्रिडलीब फर्डिनांड यांनी कार्बोलिक अॅसिड शोधलं होतं. १८५१ मध्ये इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक क्रेस कॅल्व्हर्ट यांनी मृतदेह जतन करण्यासाठी कार्बोलिक अॅसिड वापरायला सुरुवात केली होती. मात्र मृतदेह कुजायला सुरुवात झाल्यावर कुजण्याची गती कमी करणं एवढाच कार्बोलिक अॅसिडचा उपयोग होता. सन १८६५ मध्ये जोसेफला “जखमेत पू का तयार होतो?” याचा अभ्यास करत असताना, लुई पाश्चर यांच्या संशोधनाबद्दल समजलं. पाश्चर यांनी दाखवून दिलं होतं की “जखमेत पू होणे ही एक प्रकारची किण्वन प्रक्रिया आहे, जी सूक्ष्मजीवांमुळं होते. हे सूक्ष्मजीव हवेतील धुळीत असतात आणि ते जखमेत जाऊन संसर्ग करतात.” म्हणजेच “हवेमुळे किंवा हवेतील ऑक्सिजनमुळे संसर्ग होतो” ही अंधश्रद्धा होती हे उघड झालं होतं. हवेतील जंतूंमुळे संसर्ग होत असेल तर जखमेत हे सूक्ष्मजीव जाणं रोखलं पाहिजे असं साधं लॉजिक जोसेफ लिस्टर यांनी लावलं.
लिस्टर यांनी विचार केला की हवा पूर्णपणे रोखणे आवश्यक नाही; पण हवेत असलेल्या सूक्ष्मजीवांना नष्ट करणारे पदार्थ जखमेवर लावले, तर जंतूसंसर्ग संसर्ग टाळता येईल. याच तत्त्वावर त्यांनी आपली अँटिसेप्टिक शस्त्रक्रियेची पद्धत विकसित केली. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम कार्बोलिक अॅसिड वापरलं. सुरुवातीला त्यांनी “जर्मन क्रिओसोट” नावाचा कच्चा पदार्थ वापरून एका गंभीर फ्रॅक्चरवर प्रयोग केला. आधी तुटलेला भाग स्वच्छ केला आणि शक्य तितकं रक्त बाहेर काढलं. नंतर कार्बोलिक अॅसिडमध्ये भिजवलेला कापडाचा तुकडा जखमेत सर्व दिशांनी फिरवला, जेणेकरून आत गेलेले जीवाणू नष्ट होतील. त्यानंतर जखमेवर कार्बोलिक अॅसिडमध्ये भिजवलेलं आणखी एक कापड ठेवलं. मग पट्ट्या लावून जखम बांधली आणि रक्त किंवा द्रव बाहेर पडल्यास ते शोषून घेण्यासाठी कापूस ठेवला. काही दिवसांनी रक्त आणि कार्बोलिक अॅसिड मिळून जाड कवचासारखी पेस्ट तयार झाली.
यावर अधिक प्रयोग करताना लिस्टर यांनी फिनॉल आणि जवसाच्या तेलाचं मिश्रण वापरून एक मऊ पेस्ट तयार केली, जी त्वचेला कमी त्रासदायक होती. १८६६ मध्ये त्यांना फ्रॅक्चरची आणखी एक केस मिळाली. त्यावर ही पेस्ट उपयुक्त ठरली. रुग्णाच्या पायाला कसली सूज आली नाही किंवा पू देखील तयार झाला नाही. एक वर्षभरात त्यांच्याकडे आलेल्या अकरा केसेसपैकी दहा रुग्णांचा जीव वाचवण्यात ते यशस्वी झाले. १८६७ मध्ये त्यांनी आपलं हे संशोधन द लँसेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित केलं. परंतु त्यांच्या या दाव्यावर सर्वांनी विश्वास ठेवला नाही. काहींनी उघडपणे विरोध केला तर बहुतेक लोकांनी उदासीनता दाखवली. एका वृत्तपत्रात एक निनावी पत्र प्रसिद्ध झालं, ज्यामध्ये असा दावा केला की लिस्टर यांनी फक्त युरोपमध्ये आधीपासून चालत असलेली पद्धत चोरली आहे, नव्यानं स्वतः काही शोधून काढलं नाही.
या सर्व गोष्टींमुळे लिस्टर यांना खूप मानसिक त्रास झाला. मात्र त्यांनी वादात गुंतण्याऐवजी आपल्या संशोधनावर लक्ष केंद्रित ठेवलं. त्यांनी व्याख्यानांमधून आणि लेखांमधून पुन्हा पुन्हा सांगितलं की “त्यांचा शोध म्हणजे फक्त पट्टी बांधण्याची नवीन पद्धत नसून एक मूलभूत वैज्ञानिक तत्त्व आहे.” त्यांच्या उपचारांचे चांगले परिणाम मिळतच राहिले. अनेक देशांमधून डॉक्टर त्यांच्या वॉर्डमध्ये येऊन निरीक्षण करू लागले. जे लोक प्रत्यक्ष पाहायला आले, ते बहुतेकवेळा समाधानी होऊन परत गेले. हळूहळू लिस्टरच्या विद्यार्थ्यांमार्फत त्यांची पद्धत जगभर पसरू लागली. यानंतर लिस्टर यांनी जास्त तीव्र कार्बोलिक अॅसिड वापरणं बंद केलं. ५% द्रावण पुरेसं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. १९०८ मध्ये त्यांनी टाके टाकण्यासाठी वापरण्यात येणारा धागा (कॅटगट) निर्जंतुक करण्यासाठी क्रोमियम सल्फेट आणि कॉरोसिव्ह सब्लिमेट वापरण्याची पद्धत देखील शोधून काढली.
मधल्या काही काळात त्यांनी कार्बोलिक अॅसिड स्प्रे देखील वापरून पाहिला. हा स्प्रे जगभर अनेक वर्षे वापरला गेला. मात्र कालांतरानं यावर इतर डॉक्टरांनी खूप टीका केली. “आपला हा निर्णय चुकीचा होता” हे लिस्टर यांनी मान्य करण्याचं मोठेपण देखील दाखवलं. १८९० मध्ये इंटरनॅशनल मेडिकल काँग्रेसमध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितलं, “हवेतील जीवाणू नष्ट करण्यासाठी स्प्रे वापरण्याचा सल्ला मी दिला होता, याबद्दल मला लाज वाटते.” लिस्टर यांनी गॉजमध्ये भिजवण्यासाठी अनेक प्रकारचे अँटिसेप्टिक पदार्थ वापरण्याचे प्रयोग केले. ओकुम पट्ट्या, कार्बोलिक गॉज, मर्क्युरीच्या द्रावणात भिजवलेली गॉज, झिंक आणि मर्क्युरीचे डबल सायनाइड, बोरिक अॅसिड यांसारखे इतर अनेक निर्जंतुकीकरण करणारे पदार्थ या विषयावर त्यांनी अनेक लेख प्रकाशित केले.
हळूहळू लिस्टर यांच्या विचारांचा प्रसार होऊ लागला. तरुण डॉक्टर आणि शल्यचिकित्सक मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विचारांकडे झुकू लागले. लिस्टर यांच्या कल्पना जर्मनी, स्वित्झर्लंड आणि स्कँडिनेव्हिया या देशांमध्ये त्यांच्या मायदेशापेक्षा, इंग्लंडपेक्षा लवकर स्वीकारल्या गेल्या. फ्रान्समध्ये आधुनिक शस्त्रक्रिया पद्धती स्वीकारायला सर्वात जास्त वेळ लागला. आपल्या कल्पनेचा प्रचार आपणच केला पाहिजे ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी देखील युरोपमधील अनेक देशांमध्ये व्याख्यानं देण्याचा धडाका लावला. अनेक वैद्यकीय परिषदांमध्ये भाग घेतला. एडिनबरोमध्ये त्यांचं खूप मोठं नाव होतं, त्यामुळं त्यांच्या व्याख्यानाला ४००+ विद्यार्थी असत, मात्र कधीकधी त्यांच्या व्याख्यानांना फक्त बारा विद्यार्थी उपस्थित असत. हळूहळू त्यांच्या व्याख्यानांना काही सामान्य डॉक्टर आणि परदेशी विद्यार्थी देखील येऊ लागले.
या काळात लुई पाश्चर यांनी अँथ्रॅक्स आणि रेबीज या आजारांविरुद्ध कमजोर जीवाणू वापरून रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या लस शोधून काढल्या. अनेक वर्षे ब्रिटनमधील रेबीजग्रस्त रुग्णांना उपचारासाठी पॅरिसला पाठवावं लागत होतं. ही परिस्थिती बदलावी म्हणून लिस्टर आणि इतर डॉक्टरांनी ब्रिटनमध्येही अशीच संस्था सुरू करण्याचा प्रयत्न केला. या संकल्पनेला प्राणीप्रेमी लोकांचा जोरदार विरोध असूनही ५ जून १८९१ रोजी ब्रिटिश इन्स्टिट्यूट फॉर प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनची स्थापना झाली. पुढं या संस्थेला लिस्टर यांचं नाव देण्यात आलं. २७ डिसेंबर १८९२ रोजी पॅरिसमधील सोरबोन विद्यापीठात “पाश्चर जयंती” साजरी झाली. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे भाषण झाल्यानंतर रॉयल सोसायटीचे अध्यक्ष म्हणून जोसेफ लिस्टर भाषणाला उठले. त्यांनी आपल्या भाषणातून “पाश्चर यांनी मानवतेसाठी किती मोठं काम केलं आहे” हे सर्वांना सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगितलं. त्यांचं भाषण एवढं प्रभावी झालं की भाषण संपल्यावर पाश्चर उठले आणि त्यांनी लिस्टर यांना मिठी मारली
लिस्टर यांच्यासोबत काम करायला खूप अवघड होतं कारण त्यांना वेळेचं भान नसायचं. तहानभूक काही लागायची नाही. मात्र बाकीच्या सहाय्यकांच्या पोटात कावळे ओरडत असत. त्यांचे सहाय्यक म्हणायचे की हा माणूस रुग्णाची एवढी काळजी घेतो, मग आपल्या सहाय्यकांची का घेत नाही? लिस्टर यांनी रुग्णांसाठी दिवस दिला की संशोधनासाठी संध्याकाळची वेळ असायची. अगदी रात्री चार-पाच वाजेपर्यंत जागं राहून प्रयोगांची नोंद ते करीत. यामध्ये त्यांची पत्नी त्यांची पुरेशी काळजी घेत असे. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्यामुळे प्रत्येक पेशंटची त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेतली. १८९३ मध्ये ॲग्नेस न्यूमोनियामुळं मरण पावली. ३७ वर्षांच्या संसारात त्यांच्या पत्नीने भक्कम साथ दिली होती. ॲग्नेसला त्यांच्या वैज्ञानिक कामातही मोठी रुची होती. लिस्टर यांच्या प्रयोगांच्या नोंदी ॲग्नेसनं केलेला असायच्या. तिच्या मृत्यूनंतर जोसेफ लिस्टर एकाकी पडले. त्यांचं सार्वजनिक कार्यक्रमात जाणं बंद झालं.
तरी पुढील अठरा वर्षं त्यांचं संशोधन सुरू राहिलं. नोव्हेंबर १८९३ मध्ये त्यांची निवड रॉयल सोसायटीच्या परराष्ट्र सचिवपदासाठी झाली. सन १८९५ मध्ये ते या संस्थेचे अध्यक्ष झाले. वयाची सत्तरी पार केल्यानंतर ते बऱ्यापैकी थकले होते. या काळात त्यांच्या मेहुणीनं त्यांचा सांभाळ केला. अखेरीस १२ फेब्रुवारी १९१२ रोजी त्यांचं निधन झालं. वास्तविक पाहता त्यांचं दफन वेस्टमिन्स्टर अबे या शाही दफनभूमीत व्हायला हवं होतं. कारण सन १८८३ साली ब्रिटिश सरकारनं जोसेफ लिस्टर यांना बारोनेट हा किताब दिला होता. मात्र जोसेफची इच्छा होती की त्याला त्याच्या पत्नीच्या शेजारी चिरनिद्रा घेता यावी. त्याच्या या इच्छेचा मान ठेवण्यात आला.
लिस्टर यांचा आवाज त्यांच्या स्वभावाप्रमाणे गोड होता. सार्वजनिक ठिकाणी बोलताना ते हळूहळू आणि स्पष्टपणे बोलत असत. बोलण्यात थोडासा तोतरेपणा होता, पण उत्साहामध्ये विषय मांडताना तो जवळजवळ जाणवत नसे. त्यांनी रुग्णाला एवढे प्रेम दिलेलं असे की रुग्ण त्यांना देवाप्रमाणे माने. त्यांनी ज्या क्वेकर पंथाचा त्याग केला, त्या पंथात प्रत्येकजण भेटल्यावर एकमेकाला “मित्र” म्हणून संबोधतो. आपल्या कामातून जोसेफ लिस्टर हे जगाचे मित्र झाले आहेत. मानवजातीसाठी केलेल्या त्यांच्या अमूल्य सेवेमुळे, जगभरातील वेगवेगळ्या खंडातील, वेगवेगळ्या देशातील, वेगवेगळ्या धर्मातील, वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या वंशातील सर्व लोक त्यांना “मित्र” समजतात. जीवनाची सार्थकता अजून वेगळी काय असते!!
.jpeg)
Comments
Post a Comment