ॲलन ट्यूरिंग : संगणक विज्ञानाचा शिल्पकार
ॲलन ट्यूरिंग : संगणक विज्ञानाचा शिल्पकार
दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा जर्मनीनं सर्व युरोपवर आपली पकड बनवली होती. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जर्मनी इतर सर्व देशांच्या पुढं होती. जर्मनीकडे साधी टायपरायटरसारखी दिसणारी इनिग्मा नावाची एक मशीन होती. युद्धामध्ये जर्मनी या मशीनचा वापर करून गुप्त संदेश पाठवत असे. हे संदेश इतके गुंतागुंतीचे होते की त्यांचे डीकोड करण्यासाठी अब्जावधी शक्यता पडताळून पाहावे लागतील. म्हणजेच शेकडो जणांची टीम वापरून एकेक शक्यता पडताळून हा संदेश उलगडण्यासाठी अनेक वर्षे लागतील. त्यामुळे जर्मनी अगदी निर्धास्त होती. मात्र माणसानं बनवलेल्या मशीनवर दुसरा माणूस नक्कीच मात करू शकतो ही बेसिक शक्यता जर्मनीच्या लक्षात आली नाही. इंग्लंडकडे असा माणूस होता, ज्यानं इनिग्मा कोड उलगडून आपली अनेक जहाजं वाचवली. महायुद्ध पूर्ण होईपर्यंत जर्मनीला समजलंच नाही की आपले सांकेतिक संदेश डीकोड झाले आहेत. त्यामुळं महायुद्ध दोन वर्ष आधी संपलं असं मानलं जातं. इंग्लंडला वाचवणारा हा सुपरमॅन होता ॲलन ट्यूरिंग!!
आज आपण वापरत असलेले लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट या सर्वांच्या मागं काही मूलभूत कल्पना आहेत. त्या कल्पनांचा पाया मोठ्या प्रमाणात ॲलन ट्यूरिंग यानं घातला. संगणकाची सैद्धांतिक मांडणी अशी असते की कोणतीही गणितीय प्रक्रिया अल्गोरिदम म्हणजे नियमांच्या मदतीनं मशीनद्वारे सोडवता येते. याच पद्धतीने कोणतंही काम जर नियमांमध्ये लिहिता आलं, तर मशीन ते करू शकते. पूर्वी संगणकाला केवळ गणित सोडवण्याचं काम असायचं. प्रत्येक काम करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मशीनची गरज नाही, तर एकच मशीन वेगवेगळी कामं करू शकते अशी मांडणी ॲलन ट्यूरिंग यानं केली आणि खऱ्या अर्थानं आजच्या रोबोटिक्स, कृत्रिम प्रज्ञा या सर्व क्षेत्रांचा पाया भरला गेला. ॲलन ट्यूरिंगचं अवघं ४२ वर्षाचं आयुष्य अतिशय घडामोडींचं आहे. एवढ्या हुशार माणसाला आत्महत्या का करावीशी वाटली असेल? चला त्याची शोकांतिका समजून घेऊया.
ॲलनचा जन्म २३ जून १९१२ रोजी लंडनमध्ये एका सुखवस्तू घरात झाला. त्यांच्या ट्यूरिंग घराण्यामध्ये अनेक पिढ्यांपासून सरदारकी चालत आली होती. ॲलनचे वडील ज्युलियस हे ब्रिटिश सनदी अधिकारी. तेव्हा भारतामधील मद्रास प्रांतात असलेल्या, आता ओरिसा राज्यात असलेल्या छत्रपूर या जिल्ह्याचे ज्युलियस ट्यूरिंग जिल्हाधिकारी होते. इथेल ही ॲलनची आई देखील मद्रास प्रांतातील रेल्वेविभागाच्या प्रमुखाची मुलगी होती. मात्र इथेल आणि ज्युलियस दोघांनाही वाटायचं की आपली मुलं लंडनमध्ये जन्माला यावीत आणि लहानाची मोठी व्हावी. त्याप्रमाणे ॲलन आणि त्याचा मोठा भाऊ जॉन हे लंडनमध्ये जन्माला आले. वडिलांच्या इंग्लंड भारत खेपा सुरू असायच्या त्यामुळं या मुलांना लहानाचं मोठं करण्याचं काम दत्तक कुटुंबाला सोपवण्यात आलं. लंडनमध्ये अशी दत्तक कुटुंबाची पद्धत प्रचलित आहे.
मात्र कदाचित यामुळं ॲलन एकलकोंडा झाला. पुढं त्याच्या आयुष्यामध्ये जी स्वमग्नतेची आणि विसतराळूपणाची लक्षणं दिसतात, त्यामागं कदाचित त्याचं बालपण असावं. सहा वर्षाचा झाल्यावर त्याला सेंट मायकल प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आलं. तिथे चार वर्ष शिकल्यानंतर पुढे माध्यमिक शिक्षणासाठी ॲलन ससेक्समधील हॅझलहर्ट्स शाळेमध्ये दाखल झाला. तेरा वर्षाचा असताना त्याला शेनबॉर्न शहरामधील निवासी शाळेमध्ये ऍडमिशन मिळालं. मात्र शाळेचा पहिला दिवस होता आणि त्यादिवशी इंग्लंडमधील मोठा संप सुरू झाला. रेल्वेविभागानं देखील या संपात भाग घेतल्यामुळं रेल्वेसेवा ठप्प झाली. शाळा घरापासून तब्बल ९६ किलोमीटर लांब. त्यामुळे आज काही शाळेत जाता येणार नाही असं त्याचे पालक म्हणाले. मात्र ॲलन नवीन शाळेत जाण्यासाठी खूपच उत्सुक होता. त्यानं सायकल काढली आणि टांग मारून एवढं अंतर पूर्ण करत शाळा गाठली.
असा लहानपणापासून जिद्दी असलेला ॲलन, ज्यानं सात वर्षाचा असताना स्वतःचा ज्ञानकोश लिहायला घेतला. त्याला शाळेमध्ये केवळ गणित आणि विज्ञान हेच विषय आवडायचे. इतर मुलांना खेळण्यात रस असताना ॲलन संख्यांची कोडी आणि वेगवेगळे प्रयोग यामध्ये दंग असायचा. तेव्हा शाळेत लॅटिन, ग्रीक यांसारख्या भाषा विषयांना जास्त महत्त्व दिलं जायचं, ज्याकडं ॲलननं पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. शाळेच्या मुख्याध्यापकांनी एक दिवस वैतागून त्यांच्या पालकांना लिहिलं की,“जर तो फक्त विज्ञानातच गुंतून राहिला तर तो चांगला विद्यार्थी होणार नाही.” बाकीची मुलं घोकंपट्टी करत असताना ॲलन मात्र पाठांतर बिलकुल करत नसे. सूत्र पाठ न करता ते कसं तयार झालं हे समजून घ्यायला त्याला आवडायचं. त्याचा हा स्वभाव पुढं त्याला गणितामध्ये यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडला.
ॲलन बागेत बसून फुलं आणि मधमाश्या कशा काम करतात याचं निरीक्षण करत असे. यंत्रं कशी काम करतात याची त्याला खूप उत्सुकता असायची. म्हणून तो कधी कधी घड्याळं, खेळणी आणि छोटी यांत्रिक साधनं उघडून त्यांचे भाग कसे काम करतात हे पाहत असे. त्यानं लहानपणीच घरामध्ये एक छोटी प्रयोगशाळा निर्माण केली होती, ज्यामध्ये तो वेगवेगळे रासायनिक प्रयोग करायचा. धातू उच्च तापमानावर गरम करणे, वेगवेगळी रासायनिक द्रव्ये मिसळणे असे उद्योग करून “सोनं बनवण्याचे” अनेक अयशस्वी प्रयोग ॲलनच्या प्रयोगशाळेमध्ये देखील झाले. विज्ञान आणि गणिताची पुस्तकं वाचायला त्याला खूप आवडत असे. कधीकधी तो शाळेच्या अभ्यासक्रमापेक्षा अधिक अवघड पुस्तकं वाचत असे. मात्र त्याची हुशारी शिक्षकांना समजत नव्हती. तो नापास होईल या भीतीनं त्याला या विषयाची राष्ट्रीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा देण्यापासून जवळजवळ रोखण्यात आलं होतं.
१९२७ मध्ये वडिलांनी निवृत्ती घेऊन गिल्डफोर्ड मध्ये एक छानसं घर बांधलं. जॉन आणि ॲलन सुट्टीमध्ये घरी येऊन आई-वडिलांसोबत राहू लागले. इथं अंगणात बसून तासंतास तारे पाहत बसण्याची त्याला सवय लागली. तो या ताऱ्यांच्या नोंदी देखील ठेवत होता. कागदावर रात्रीचे आकाश काढून त्यातील ताऱ्यांचे नकाशे बनवत होता. मात्र घरापेक्षा त्याचं मन शाळेमध्ये अधिक रमत होतं. शेनबॉर्न शाळेमध्ये त्याची ख्रिस्तोफर मोरकॉम या मित्राशी चांगली गट्टी जमली. ख्रिस्तोफर हे त्याचं पहिलं प्रेम असं आपण म्हणू शकतो. गणित हा या दोघांच्याही आवडीचा विषय, त्यामुळं दोघांचं छान भावविश्व तयार झालं होतं. दोघांनाही सांकेतिक भाषेमध्ये रस होता आणि एकमेकांशी ते सांकेतिक भाषेत संवाद साधायचे.
मात्र चारच वर्षात, सन १९३० मध्ये क्षयरोगामुळं ख्रिस्तोफरचा मृत्यू झाला आणि ॲलन पुन्हा एकलकोंडा बनला. त्या दोघांनी गणितामध्ये आपण काहीतरी मोठं करू असा प्लॅन केला होता. आता हा प्लॅन मी एकट्यानं पूर्ण केला पाहिजे असं ॲलननं ठरवलं. पुढच्या वर्षी त्यानं केंब्रिज विद्यापीठामधल्या किंग्स कॉलेजमध्ये गणित विषयासाठी प्रवेश घेतला. तर्कशास्त्र आणि गणनशास्त्रावर काम केलं आणि सन १९३४ मध्ये गणित विषयात ऑनर्स पदवी मिळवली. नंतर अमेरिकेमध्ये जाऊन प्रिंसटन विद्यापीठात गणित विषयात पीएचडीसाठी संशोधन सुरू केलं. “ऑन कॉम्पिटेबल नंबर्स” हा त्याचा विषय पेपर पब्लिश झाला आणि संगणक एका वेळी अनेक कामं करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला.
सन १९३८ मध्ये त्याला पीएचडी पदवी प्राप्त झाली आणि तो इंग्लंडमध्ये परतला. त्याने क्रिप्टोग्राफीचा अभ्यास देखील केला होता, ज्यामध्ये वेगवेगळे कोड्स कसे उलगडायचे याचा अभ्यास असतो. दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा ॲलनसारखे गणित आणि तर्कशास्त्र यांची सांगड घालणारे तज्ञ ब्रिटिश सैन्याला हवे होते. ॲलनची पहिली नोकरी सुरू झाली. ऑफिसमध्ये त्याचं वागणं इतरांना विचित्र वाटायचं. मात्र हा स्वतःमध्येच मग्न असायचा, त्याच्यामध्ये अनेक न्यूनगंड तयार झाले होते. विशेषतः चोरीबाबत त्याला कायम भीती वाटायची. सहकाऱ्यांनी आपला चहाचा कप वापरू नये म्हणून त्यानं चहाच्या कपाला लहान कुलूप लावलं होतं. महत्त्वाचे संशोधन पेपर चोरीला जाऊ नये म्हणून तो साखळी वापरून हे कागद कपाला बांधून ठेवायचा. आहे ना विचीत्र!!
तो सायकल वापरून ऑफिसला जायचा. मात्र गणित हा त्याच्या जीवनाचा एवढा अविभाज्य भाग होता की सायकलची चेन केव्हा पडते याचं गणित देखील त्यानं सोडवलं होतं. अमुक वेळा पेडल मारल्यानंतर चेन पडते हे त्याच्या लक्षात आलं आणि मग तो पेडल मोजू लागला. आणि चेन पडेल असा आकडा जवळ आला की तो थांबून चेन आधीच नीट करायचा. त्याला परागकणांची ॲलर्जी होती. त्यामुळे तो मास्क घालून सायकल चालवत कामावर जायचा. दिवसभर आकड्यांमध्ये खेळल्यानंतर तो संध्याकाळी धावायचा. धावताना खूपच जोर लावायचा ज्यामुळे त्याच्या तोंडातून आवाज यायचे. रनिंग क्लबचे सदस्य त्याला विचारायचे की एवढं कण्हेपर्यंत का धावतोस? त्यावर तो म्हणायचा की, “यामुळे माझा दिवसभराचा ताणतणाव आणि थकवा निघून जातो.”
तो एक उत्कृष्ट धावपटू होता. त्यानं अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. १९४८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक निवड चाचणीमध्ये तो पाचव्या आला होता. याच वर्षी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्यानं २ तास ४६ मिनिटं आणि ३ सेकंद ही वेळ नोंदवली होती, जी ऑलिंपिक विजेत्या स्पर्धकापेक्षा केवळ ११ मिनिट जास्त होती. धावणं हे त्याचं पॅशन होतं. राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा आणि डॉलिस हिलवरील इलेक्ट्रॉनिक्स इमारत या दोन ठिकाणांमधील १६ किलोमीटर अंतर देखील तो धावत पार करत असे. त्याचे इतर सहकारी वाहन घेऊन पोचण्याआधी तो पोचलेला असे. याशिवाय तो रोइंगसारख्या काही खेळांमध्ये भाग घेत असे. त्याचं राहणीमान अतिशय गबाळं असायचं, जणू काही हिप्पी संस्कृतीचा तो प्रतिनिधी आहे. अर्थात त्यामुळे त्याचं वय कळायचं नाही आणि तो नेहमी कॉलेजगोईंग तरुण वाटायचा.
त्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केल्यानंतर अनेक मानसिक आजार त्याला लहानपणापासून असल्याचं लक्षात येतं. वाढत्या वयासोबत त्याचे मानसिक आजार देखील वाढू लागले. विस्मरणाचा त्याचा आजार पराकोटीला जाऊ लागला. आपले पैसे चोरीला जाऊ नये म्हणून त्याने पैसे कागदात गुंडाळून काही ठिकाणी गाडून ठेवले होते. मात्र पैसे कुठं गाडले आहेत हेच नेमकं तो विसरला. त्याला पुर्ण बाग खणून काढावी लागली. कॉलेजमध्ये असल्यापासून लॉर्ड केन्स आणि आर्थर पिगू यांसारख्या डाव्या विचारांच्या अर्थशास्त्रज्ञांचा तो समर्थक होता. १९३३ मध्ये तो युद्धविरोधी चळवळीत सामील झाला असला तरी, त्यानं कधीही राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नाही. त्यानं शिकलेल्या क्रिप्टोग्राफीचा मात्र देशाला फायदा झाला.
दुसरं महायुद्ध सुरू झालं. जर्मनीनं फ्रान्स आणि इंग्लंडवर हल्ले चढवले. इंग्लंडने जर्मनीच्या अनेक युद्धसंदेशांचं इंटरसेप्शन केलं, मात्र या संदेशात नक्की काय आहे हे समजत नव्हतं. याचं कारण म्हणजे, जर्मनी इनिग्मा नावाची मशीन वापरून हे संदेश पाठवत होती. ही मशीन वापरून कोणताही संदेश टाईप केल्यानंतर तो कीबोर्ड, प्लगबोर्ड, रोटर्स अशा तीन पातळ्यावर बदलला जायचा. म्हणजे कीबोर्डवर ए टाईप केला तर प्लग बोर्डवर वेगळं अक्षर येणार आणि त्यानंतर रोटर्सवर वेगळं अक्षर येणार आणि त्यानंतर पाठवल्या जाणाऱ्या संदेशांमध्ये वेगळं अक्षर असणारं. समजा आता एका सैनिकाने HELLO हा शब्द टाईप केला तर या शब्दासाठी AXERH हा शब्द इनिग्मा वापरेल.
मात्र दुसऱ्या सैनिकानं देखील HELLO हाच शब्द टाईप केला तर त्याच्यासाठी वेगळा शब्द वापरला गेला असेल. आणि हे सर्व सेटिंग रोज रात्री बारा वाजता बदललं जायचं. म्हणजेच शत्रूने एखादा संदेश मध्येच पकडला तर त्यातील एका वाक्याची उकल करायची असेल तर दीडशे अब्ज अब्ज (दीडशेच्या पुढे अठरा शुन्य) शक्यता असणार. एवढ्या शक्यता मानवी मेंदूला तपासण्यासाठी शेकडो वर्षे लागू शकतील, इथं तुमच्याकडं अवघे काही तास असायचे. त्यामुळे आपले संदेश पकडले जाणार नाहीत याची जर्मनीला पक्की खात्री होती. मात्र ॲलन नावाचा जादुगार इंग्लंडकडे होता, ज्यानं या खेळाच्या व्याख्या बदलल्या. त्यानं ब्लॅचली पार्क इथल्या ऑफिसमध्ये बॉम्ब (Bombe) नावाची एक मशीन बनवली, जी इनिग्माचं मायाजाल भेदू शकली. ही मशीन हजारो संभाव्य शक्यता काही क्षणात तपासत असे.
बॉम्ब मशीनमध्ये अनेक फिरणारे रोटर्स होते, त्यात जोडलेल्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये हजारो संभाव्य कॉम्बिनेशन तपासण्याची क्षमता होती. अनावश्यक कॉम्बिनेशनची नोंद घेऊन ती पुढच्या वेळेस टाळली जात होती. ॲलनन एक महत्त्वाची युक्ती वापरली. जर्मन संदेशांमध्ये Heil Hitler सारखे काही ओळखीचे शब्द असणार हे त्याला ठाऊक होतं. त्यामुळे प्रत्येक वेळेस अशा “क्रीब वर्ड” साठी वापरल्या जाणाऱ्या पर्यायी शब्दांची निवड करताना इनिग्मा काय अल्गोरिदम वापरत आहे, रोटरची कोणती सेटिंग असू शकते याचा अभ्यास त्यानं अल्गोरिदम वापरून केला. ज्यामुळे संभाव्य शक्यतांची संख्या खूप कमी झाली. हजारो कॉम्बिनेशन काही मिनिटांमध्ये तपासणं शक्य झालं आणि यातच त्याला जॅकपॉट लागला.
जर्मन पाणबुडीनं पाठवलेला संदेश त्याला डीकोड करता आला आणि हल्ला होणार असलेल्या इंग्लंडच्या जहाजाला आपली जागा बदलण्याची सूचना देण्यात आली. मात्र फक्त एक जहाज वाचवून चालणार नव्हतं. ॲलननं हजारो जर्मन संदेश उलगडले. मात्र आपले संदेश उलगडले जात आहेत हे जर्मन सैन्याला कळू नये म्हणून काही कमी महत्त्वाचे टारगेट इंग्लंडनं मुद्दाम वाचवले नाहीत. तोवर इंग्लंडला जर्मन पाणबुड्यांची ठिकाणं समजली आणि युद्धाचं पारडं इंग्लंडकडे झुकलं. अभ्यासक म्हणतात की त्यामुळं जर्मनीचं कंबरडं मोडलं आणि युद्ध दोन वर्ष आधीच संपलं. युद्ध संपेपर्यंत इंग्लंडनं हे गुपित ठेवले की त्यांनी एनिग्मा कोड उलगडला आहे. कारण हे जर्मनीला कळलं असतं तर त्यांनी लगेच कोड बदलला असता.
ॲलन ट्यूरिंगनं संगणकाचा अतिशय कल्पकतेनं वापर केला. मानवी मेंदूचं काम सोपं व्हावं यासाठी काही यंत्र असावं असा मानवाचा हजारो वर्षापासूनचा प्रयत्न आहे. दोन हजार वर्षापूर्वी ग्रीक संस्कृतीमध्ये तीसपेक्षा अधिक गिअरचा वापर करून “अँटिकायथेरा यंत्र” तयार केलं होतं, ज्यामध्ये सर्व ग्रहगोलांची स्थिती निश्चित करता येत होती, सूर्यचंद्राची स्थिती आणि ग्रहणकाळ कधी येईल याचं गणित मांडता येत होतं. याला आपण जगातील सर्वात पहिला ॲनालॉग संगणक म्हणू शकू. एकोणिसाव्या शतकात चार्ल्स बॅबेज यानं गणित सोडवणारं डिफरेन्शियल इंजिन बनवलं, ज्यामध्ये मेमरी, इनपुट, आउटपुट यासारख्या आधुनिक संगणकाच्या सर्व गोष्टी होत्या. ॲडा लवलेसनं पहिला संगणकीय प्रोग्रॅम लिहिला. त्यानंतर शंभर वर्षांनंतर, १९४० मध्ये ॲलन आपली ट्यूरिंग टेस्ट घेऊन कृत्रिम प्रज्ञा जन्माला घालू पाहत होता.
ट्यूरिंग टेस्ट म्हणजे नक्की काय हे आपण एका उदाहरणातून पाहू. या चाचणीमध्ये परीक्षक एक यंत्र आणि एक माणूस यांच्याशी फक्त लिखित संभाषण करतो. त्याला दिसत नाही की कोण माणूस आहे आणि कोण यंत्र आहे. परीक्षक काही प्रश्न विचारतो जसं की, तुझं आवडतं अन्न काय? तुला पाऊस आवडतो का? गणितातील २+२ किती? जर आलेल्या उत्तरामधून परीक्षकाला संगणक आणि माणूस यात फरक ओळखता आला नाही, ३० टक्के पेक्षा जास्त वेळा परीक्षकाची चूक झाली तर ते यंत्र ट्यूरिंग टेस्ट उत्तीर्ण झालं असं समजलं जातं. ट्यूरिंग टेस्टही खूप बेसिक चाचणी होती आणि आजच्या युगातील कृत्रिम प्रज्ञा साधनं या चाचणीतील किमान अचुकतेच्या खूप पुढं गेली आहेत. मात्र ट्यूरिंग टेस्टची कल्पना आज कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्राचा पाया मानली जाते.
युद्धातील कामगिरीसाठी ॲलनला “ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर” या सन्मानानं गौरवण्यात आलं. त्यानंतर त्यानं नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीमध्ये गणित विभागात काम केलं. इथं त्यानं आधुनिक संगणकाचा आराखडा तयार केला. त्यानंतर त्यानं मँचेस्टर विद्यापीठात प्राध्यापक केली. इथंच त्यानं ट्यूरिंग टेस्ट विकसित केली. याशिवाय त्यानं सुरक्षित व्हॉइस कम्युनिकेशन साठी डेलिया नावाचं एक यंत्र देखील विकसित केलें. १९५१ मध्ये त्याची रॉयल सोसायटी ऑफ लंडन मध्ये फेलो म्हणून निवड झाली. समलैंगिकतेच्या खटल्यामध्ये तो अडकला नसता तर संगणक विज्ञान क्षेत्रानं प्रगती करण्यात तो मोठा हातभार लावू शकला असता. एवढा मोठा शास्त्रज्ञ, मात्र तेव्हा असलेल्या समलैंगिकतेविरोधी प्रतिगामी विचारांच्या कायद्यामुळं त्याची गळचेपी झाली.
१९५१ मध्ये त्याचे अर्नोल्ड मरे नावाच्या युवकाशी प्रेमसंबंध होते. मात्र हा मरे आपल्या घरात चोरी करत आहे असं ॲलनच्या लक्षात आलं. आता याची तक्रार करायची म्हटलं तर आपली समलैंगिकता जगजाहीर होणार याची त्याला भीती होती. त्याकाळामध्ये युरोपात सर्वच देशांमध्ये समलैंगिकतेविरुद्ध खूप कडक कायदे होते आणि कोणी असा गुन्हा करताना आढळला तर त्याला कठोर शिक्षा होत असे. मात्र इंग्लंडमध्ये समलैंगिकतेच्या हक्कांसाठी चळवळ देखील सुरू होती आणि लवकरच त्यांना त्यांचा हक्क मिळेल असा कायदा येणार होता. ॲलननं जोखीम घेतली आणि मरेची तक्रार केली. आपल्या संबंधांबद्दलही त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं. ॲलन आणि मरे दोघांवर खटला चालवण्यात आला.
ॲलननं आरोप मान्य केले, कारण त्याला वाटलं की लवकरच हा कायदा बदलणार आहे. पण प्रत्यक्षात समलैंगिकतेबाबत सुधारणा सुचवणारा कायदा येण्यासाठी १९६७ हे वर्ष उजाडावं लागलं. आता शिक्षा होणं क्रमप्राप्त होतं. तुरुंगवास किंवा हार्मोन उपचार असे ॲलनसमोर दोन पर्याय होते. तुरुंगवास टाळण्यासाठी त्याला वर्षभर रासायनिक हार्मोन उपचार सहन करावे लागले, ज्याचा त्याच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला. आणि अशातच ७ जून १९५४ रोजी त्याचा मृतदेह आढळला. त्यानं साईनाईड असलेल्या सफरचंदाचा घास खाल्ला होता. त्यानं मरताना कोणतीही चिठ्ठी ठेवली नव्हती. त्यामुळे ही आत्महत्या होती की घातपात होता की त्याच्या एखाद्या प्रयोगामध्ये झालेला अपघात होता हे शेवटपर्यंत गुपित राहिलं.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटमधील गणितज्ञ अँड्र्यू हॉजेस यांनी "अॅलन ट्युरिंग: द एनिग्मा" हे चरित्र लिहिलं होतं, जे जगभर लोकप्रिय ठरलं. १९८० च्या दशकात प्रकाशित झालेल्या या पुस्तकामधूनच ट्युरिंगवरच्या नाटकांना आणि चित्रपटाला प्रेरणा मिळाली आहे. २०१४ च्या द इमिटेशन गेम या चित्रपटात तुम्हाला अॅलन ट्युरिंगचं आयुष्य पाहता येतं, ज्यामध्ये बेनेडिक्ट कंबरबॅच या कलाकारानं ट्युरिंगची भूमिका केली आहे. काही माणसं जिवंतपणे दंतकथा बनतात आणि मृत्यूनंतर दंतकथांमध्ये वाढत जाते. अॅलनबद्दल देखील अशीच एक दंतकथा आहे की त्यानं अर्धवट खाल्लेलं शेवटचं सफरचंद हेच स्टीव्ह जॉब्जनं त्याला मानवंदना देण्यासाठी ॲप्पलचा आयकॉन म्हणून वापरला आहे. अर्थातच ॲप्पलनं हा दावा नाकारला आहे.
ट्युरिंगनं दुसऱ्या महायुद्धात बजावलेल्या कामगिरीबाबत १९७० च्या दशकापर्यंत कोणाला ठाऊक नव्हतं. जेव्हा युद्धासंदर्भातील गोपनीय माहिती बाहेर आली, त्यावेळेस ॲलन ट्यूरिंगचं महत्व जगाला समजलं. आता पन्नास ब्रिटिश पाउंडाच्या नोटेवर ॲलनचा फोटो आला आहे. २००९ मध्ये इंग्लंडमध्ये एक चळवळ झाली ज्यामध्ये ब्रिटिश सरकारनं ॲलन ट्यूरिंग सोबत झालेल्या अन्यायाबद्दल माफी मागावी अशी याचिका दाखल करण्यात आली आणि त्याला तीसहजार पेक्षा जास्त लोकांनी पाठिंबा दिला. यावर सकारात्मक प्रतिसाद देत ब्रिटिश पंतप्रधान तसेच राणीनं ॲलनसोबत झालेल्या अन्यायासाठी जाहीर माफी मागितली आहे. एक मोठा गणितज्ञ लैंगिकतेच्या खुळचट कल्पनांमुळे जगानं गमावला हे त्यांनी अधिकृतपणे मान्य केलं. फक्त त्याचीच नाही तर पूर्वी समलैंगिकतेसाठी दोषी ठरवलेल्या सर्व लोकांची माफी मागण्यात आली आहे. आज ॲलन ट्यूरिंग LGBTQA+ समूहाचा एक मोठा आयकॉन झाला आहे.
ॲलनने गणित आणि तर्कशास्त्र यांची सांगड अतिशय योग्य पद्धतीने घातली. मशीनला योग्य प्रकारे कमांड दिली आणि प्रक्रियेचा क्रम समजावून दिला, तर आपल्याला हवी कामं करून घेता येतील की त्याला सुचलेली कल्पना आज विशाल रूप घेऊन अस्तित्वात आलेली आहे. भविष्यात कृत्रिम प्रज्ञा हे क्षेत्र अधिक महाकाय होत जाणार आहे. गीतांजली राव आणि नील देशमुख यांसारखी जेन झी आज कृत्रिम प्रज्ञेच्या घोड्यावर स्वार झाली आहे. अल्फा, बीटा आणि त्यापुढील जनरेशन मधील मुलं तर कृत्रिम प्रज्ञेचा कसा वापर करतील याची कल्पना करणं देखील अशक्यच!! मग कृत्रिम प्रज्ञेचा जनक असलेल्या सायंटिस्ट खोपडी ॲलन ट्यूरिंगबाबत आपण कृतज्ञ असायलाच हवं ना?

Comments
Post a Comment