स्त्रिया आणि पाळीव प्राणी
काल मैत्रिणीशी गप्पा मारत होतो.. म्हणाली की अण्णा खूप दमते आहे नवरात्रीमध्ये.. नऊ दिवस घरातील सर्व पूजा व्यवस्थित करणे, घरातली नेहमीची कामे आहेतच, पण इथे उपवासाचे वेगळे पदार्थ करणे वगैरे.. जर हा स्त्रीशक्तीचा उत्सव असेल तर स्त्रियांना सुट्टी का नाही?? उलट त्यांनाच जास्त काम करायला लागत आहे.
तिचा प्रश्न गंभीर होता. कारण ती अतिशय देवभोळ्या घरामध्ये राहते. एका मागून एक बाळंतपणे करत चार मुलांना जन्माला घातली आहेत. तीन मुली आणि फायनली झालेला मुलगा यांचं संगोपन करते आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ती नवऱ्यावरच अवलंबून आहे. तिने सगळं रामायण महाभारत करून काढलं, आसपासचे सगळे एकमेकाला आया बहिणी वरून शिव्या देतात आणि इथे नवरात्रात “माता आली, माता आली” असे म्हणतात. वंशाला दिवाच हवा म्हणून कितीही मुलं जन्माला घालायला लावतात आणि शक्तीची पूजा करतात. बायकांच्या जन्माला काही अर्थ आहे?? खूप उद्बिन्न होऊन ती विचारत होती. म्हणत होती या जगामध्ये बायका नसल्याच पाहिजेत.
तिला समजावून सांगितले की एक वेळ पुरुष नसतील तर चालतील, पण स्त्रिया नसतील तर मानववंश संपून जाईल. तिला दीनानाथ मनोहर यांची एक गोष्ट सांगितली. या विज्ञानकथेमध्ये जगातील सर्व पुरुष नष्ट केलेले असतात, पृथ्वीवर केवळ स्त्रियाच उरलेल्या असतात. एक गोठवून ठेवलेली स्पर्मबँक असते, ज्यामध्ये स्त्रियांना हवं तेव्हा गर्भधारणा करण्याची सोय असते. त्या हवं तेव्हा मुलींना जन्म देऊ शकत असतात.: जगात पुरुष नसतील तर चालतील असं या कथेचे तात्पर्य होते.
मैत्रिणीला ही गोष्ट खूप आवडली. ती म्हणाली खरच अण्णा, जगात पुरुष नसले पाहिजेत. काही सेकंदातच तिच्या लक्षात आलं की ती हे एका पुरुषालाच सांगत आहे. तिला म्हणलं तू मैत्रीण समजून माझ्याशी बोल, काय तुझ्या मनात असेल ते सांग. तिने विचारले की, “पती हाच परमेश्वर हे आम्हाला लहानपणी शिकवलेलं असतं.. तूच तुझ्या आयुष्याची परमेश्वर आहे हे लहानपणी सांगितलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. स्त्रिया पुरुषांवर का अवलंबून असतात? स्वतःचे निर्णय का नाही घेऊ शकत?”
तिला काय उत्तर देऊ विचार करत होतो आणि अचानक काहीतरी सुचले. तिला म्हणालो, “तुला माहित आहे का, उत्क्रांतीमध्ये गाय, बैल, म्हैस, शेळी, बकरी, कुत्रा, मांजर, घोडा, गाढव हे सगळे प्राणी पाळीव का झाले? कारण त्यांना हे समजले की आपण मानवाचे ऐकलं तर आपल्याला चाऱ्यासाठी वणवण फिरायची गरज नाही. आपली शिकार करणाऱ्या प्राण्यांपासून लपण्याची गरज नाही. मानवाचे थोडं काम ऐकलं, थोडं हिशोबात राहील तर आपल्या आयुष्यामध्ये अन्न आणि जीवाची सुरक्षितता येऊन जाईल.. आणि हे प्राणी पाळीव झाले. स्त्रियांचे पण तसंच झालं असावं कदाचित “
तिला बोलून गेल्यावर मी विचार केला की हे थोडे वाढीव बोलत आहे का मी? पण आसपासचे काही संसार पाहिल्यानंतर हेच लक्षात आले की या बायका आपल्या कुंपणातील आयुष्यामध्ये विनाकुरकुर नांदत आहेत, त्यांचे पण पाळीव प्राण्यामध्ये रूपांतर झाले आहे. त्यांचे जणू काही स्वतंत्र अस्तित्वच नाही.. स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर त्यासाठी दोन-तीन गोष्टी लागतात. १. स्वतःची काळजी स्वतः घेण्याची क्षमता २. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता आणि ३. सर्वात महत्त्वाची म्हणजे आर्थिक स्वावलंबन. काही बायका या तीनही गोष्टींचा लोड घेत नाहीत, आपल्या आयुष्याचे नियंत्रण दुसऱ्याच्या हातात देऊन निवांत असतात. त्यातील काहींना चांगला जोडीदार मिळाला असेल तर त्यांचे आयुष्य सुखी असते. नाहीतर बाकीच्या जे आपले आयुष्य आहे, त्याला सुखी म्हणून दिवस ढकलतात. त्यांचा पाळीव प्राणी झालेला असतो.
(मला याची कल्पना आहे की स्त्रियांनी परावलंबी राहावे यासाठी आपल्या देशात हजारो वर्षे व्यवस्था राबवली गेली आहे, आजही ही व्यवस्था अस्तित्वात आहे, या पोस्टमध्ये केवळ स्वइच्छेने परावलंबी राहणाऱ्या बायकांच्या मानसिकतेचा विचार केला आहे.)
#Richyabhau
आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com/

Comments
Post a Comment